कुणी जाल का सांगाल का

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
27 Sep 2014 - 2:14 pm

विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल.

एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान.

त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार. तर असं हे मराठी भावगीतांच्या रम्य बागेतलं, ज्या खाली कधीही निवांत बसून रमावं असं, एक गुलमोहराचं झाड :

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा …(२)
रात्री तरी गाऊ नको …(२)
खुलवु नको अपुला गळा || धृ ||

खरं तर कोकिळा रात्री कधीही गात नाही. पण अनिलांच्या मनातली प्रियतमा त्यांना अहोरात्र घेरुन आहे. तिच्या मोहक आवाजाची जादू संध्याकाळपासनं अस्वस्थ करत होती. आता रात्री तरी तुझा आठव नको, अशी विनवणी (कोकिळेकडे संकेत करत) ते, प्रियतमेला करतायंत! रसिकानं फक्त कविशी समचित्त होण्याचा आवकाश आहे.

कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!

रात्री तरी गाऊ नको …(२)
खुलवु नको अपुला गळा || धृ ||
_________________________________

आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली …(२)
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली …(२)
हार पुर्वीचा दिला
जो श्वास साहुन वाळला .…(२)
आत्ताच आभाळातला …(२)
काळोख मी कुरवाळीला || १ ||

बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!

कविकल्पनेची प्रतिभा तर शेवटच्या चार ओळीत क्लायमॅक्सला पोहोचते.

एकतर जातांना तिचा गजरा तीनं भेट म्हणून दिला होता, तो श्वासांचा उष्मा साहून कोमेजलायं. आणि आता तर तिचा भास इतका अंतरर्बाह्य एकरुप झालायं की ती जवळ नसतांना सुद्धा असल्यासारखी आहे. प्रियकर तिला कवेत घेऊ गेला तर रात्रीचा काळोखच कुशीत शिरलायं!

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा …(२)
रात्री तरी गाऊ नको …(२)
खुलवु नको अपुला गळा || धृ ||

________________________________________

सांभाळुनी माझ्या जीवाला,
मी जरासे घेतले …(२)
इतक्यात येता वाजली,
हलकी निजेची पाऊले …(२)
सांगाल का त्या कोकिळा,
कि झार होती वाढली, .…(२)
आणि द्याया दाद कोणी, …(२)
रात्र जागून काढली || २ ||

आता जरा सावरलो तर `हलकी निजेची पाऊले' वाजली ! काय कमाल आहे कवी अनिलांच्या कल्पनेची, सो डेलिकेट! आणि शेवटाला तर ते जी काही उंची गाठतात त्याचा जवाब नाही.

ती आसपास सुद्धा नाही, जे काही तिचं गाणं चाललंय ते प्रियकराच्या मनात आहे. मनातली कोकिळा गातेयं. पण तो स्मृती कल्लोळ इतका पराकोटीचा वास्तव झालायं की; आत गाणार्‍या मनाचा स्वर देखिल झारदार झालायं, अत्यंत मोहक आणि जीवघेणा झालायं.

आता अशा कोकिकेळेच्या गाण्यानं हलकेच आलेल्या निजेला दूर सारुन, प्रियकर रात्रभर जागा राहिलायं, कारण इतक्या उत्कट क्षणी निजलो तर मग अशा मोहक गाण्याला दाद कोण देणार?

गीत : कवी अनिल, संगीत : यशवंत देव, गायक : डॉ. वसंतराव देशपांडे

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

इतक्या उत्कट क्षणी निजलो तर
मग अशा मोहक गाण्याला दाद कोण देणार?

व्वा...!

जयंत कुलकर्णी's picture

27 Sep 2014 - 2:33 pm | जयंत कुलकर्णी

श्री. क्षिरसागरांचे कौतुक करायची पण आजकाल भिती वाटते........

संजय क्षीरसागर's picture

27 Sep 2014 - 2:42 pm | संजय क्षीरसागर

जो रंग असेल त्यात रंगून जा. वाद असेल तिथे तुटून पडा आणि मिठी मारायची तर सगळं विसरुन, बेहतहाशा मिठी मारा. जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2014 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

@जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!>>> वाह ये जिंदादिली!!!
----------------------------------------------
समांतरः- जी गोष्ट रसग्रहणाची,तीच प्रतिसादाची! ;)

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2014 - 12:38 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या या जीवनविषयक तत्वज्ञानाला सलाम. मूलतः चंचल स्वभाव असल्यामुळे व Multi-tasking करत राहण्यामुळे असे जगायला मला जमत नाही. क्वचित एखादेवेळेस जमतेही परंतु ते क्वचितच.

बाकी मूळ विषय सध्या तरी फारसा कळला नाही भविष्यात कळेल अशी आशा करतो.

>>जो रंग असेल त्यात रंगून जा.

मान गये !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2014 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है संक्षीसेठ...! आवडली कविता आणि भावार्थ. सावरलो की प्रतिसाद लिहिन.
सध्या दाद देतोय ती तुम्ही निवडलेल्या अनिलांच्या कवितेला.

आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली …(२)
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली …

अगं माय गं मेलो. खल्लास.

''बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!''

वॉव.. मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत. आता पुन्हा पावसात भिजणं आलं.

''कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!''

सुरेख...म्हणुन मी तिला म्हणत असतो गाणं नको म्हणु मला त्रास होतो ती ऐकत नै संक्षीसेठ. दुर आलोय तरी फोनवर गाणं म्हणतेच ती...तिला काय आपला जीव जातो इथे..कालच तिने सुर लावला होता.

अशी रुसली रुक्मिनी गेली पद्मपुरात
असा प्रितीचा विठ्ठल मिठी घालतो गळ्यास.

अशी रुसली रुक्मिनी अशी शेजारी बसेना,
असा अभीर गुलालाचा वास हिला सोसेना,

-दिलीप बिरुटे

आणि तो सांगतांना या कवितेवर लिहायचा मोह झाला.

प्रमोद देर्देकर's picture

30 Sep 2014 - 11:46 am | प्रमोद देर्देकर

वाह सं.क्षी. साहेब ,
मी ख. फ वर एका अक्षराचा अर्थ विचारला तर अख्खी कविताच तुम्ही आकलनासाठी सोप्पी केलीत. मजा आली.
धन्यवाद.

स्पा's picture

27 Sep 2014 - 3:20 pm | स्पा

वाह.. अप्रतीम लिहिलय
माझ्या काही निवडक गाण्यांपॆकि एक.. वसंतरावांनी वेगळ्याच उंचीवर नेलं गाण्याला
अनिलांचे शब्द तर कातीलच आहेत.

मझा आ गया, तुफान

चौकटराजा's picture

27 Sep 2014 - 3:27 pm | चौकटराजा

संक्षी , या तुमच्या रसग्रहणाने आज सॉंग ओफ द डे मिळाले. मग थोडेफार वाजवून ही पाहिले. ओ पी नय्यर , यशवंत देव ई महान संगीतकार म्हणतात शब्दच चालीला आपल्याकडे घेउन येतात. हे मला वाटते अशा प्रकारचे एक " कातील" उदाहरण आहे !

संजय क्षीरसागर's picture

27 Sep 2014 - 3:32 pm | संजय क्षीरसागर

हे एकदम खरंय. केंव्हा पासनं प्रयत्न चाललेत, गाण्याची एंबेडेड यूआरल पेस्ट होत नाहीये... कविता आणि फक्त कविताच!

अनिता ठाकूर's picture

27 Sep 2014 - 3:53 pm | अनिता ठाकूर

फार तरल भाव व त्यात श्री. वसंतरावांचा झारदार आवाज!गाण्यातील आर्तता मनाला भिडतेच अगदी. असेच, 'चाला वाही देस' व 'सहेला रे' चे रसग्रहण आपण कराल काय? मात्र, मी फक्त कानसेन हां..! मी शास्त्रीय संगीत अजिबात शिकलेली नाही.

आनंद's picture

27 Sep 2014 - 3:53 pm | आनंद

अप्रतीम रसग्रहण.
अजुन येवु द्या.

चतुरंग's picture

27 Sep 2014 - 4:37 pm | चतुरंग

माझं एक अत्यंत आवडतं गाणं सकाळी सकाळी ऐकायला मिळालं. अनिलांचे जीवघेणे शब्द, यशवंत देवांनी असोशीने चालीत गुंफलेत आणि वसंतखांनी जीवघेणे गायले आहेत!!! त्रिवेणी संगम!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2014 - 5:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाह् !

सुंदर काव्याचे सुंदर रसग्रहण ही संक्षींची खासियत आहे ! असे अजून लिहा.

अनुप ढेरे's picture

27 Sep 2014 - 5:48 pm | अनुप ढेरे

मस्तं!

बॅटमॅन's picture

27 Sep 2014 - 6:16 pm | बॅटमॅन

धाग्याकरिता धन्यवाद.

रसग्रहण छानच लिहिले आहे. आता यावच्छक्य दिलेले गाणे ऐकतो.

जेपी's picture

27 Sep 2014 - 6:27 pm | जेपी

मस्तच.

किसन शिंदे's picture

27 Sep 2014 - 7:50 pm | किसन शिंदे

अतिशय जबराट रसग्रहण लिहिले आहे संक्षीजी. जाम आवडलेय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2014 - 8:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा सं.क्षी. :)

साती's picture

27 Sep 2014 - 8:46 pm | साती

गाणं आवडीचं आहे.
रसग्रहण उत्तम आहे.
हा आस्पेक्टही असू शकतो हे लक्षात आले.(कोकिळा म्हणजे प्रेयसी)

मला मात्र अजून पर्यंत कोकिळा गात नाही कोकिळ गातो असेच समजत होते.
'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते.

प्रचेतस's picture

27 Sep 2014 - 8:58 pm | प्रचेतस

अहो, गातो तो कोकीळचं.
कोकिळा गाणे ऐकत्ये आणि निवड करते.

साती's picture

27 Sep 2014 - 9:49 pm | साती

जिला सुचवायचंय ती प्रेयसी म्हणजे कोकिळा असती तर 'सुचवाल का त्या कोकिळे' असे गाणे असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2014 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते.

ते तसेच आहे. नाहीतर "सुचवाल का त्या कोकिळे" असे असते

तर कविता रसशून्य होईल. मग कोकिळ रात्री गात नाही असाही विचार पुढे येईल. आणि एकेक शृंखला वेगळी होत जाईल.

बरसात निव्वळ पाऊस होईल आणि तो थबकेल कशापायी? त्याचं `चिंब चुंबन' म्हणजे पावसात (एकट्यानंच) भिजणं होईल.

जर कोकिळ गात असेल तर त्याच्या आवाजाची झार, निजेला रोखू शकेल हे संवेदनाशिल मनाला तरी पटणार नाही आणि मग त्या गाण्याला दाद द्यायला कुणी रात्र जागून काढेलसं वाटत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2014 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

कवीने कवितेत व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्दाने (नर) 'कोकिळा'चाच उल्लेख केला आहे, (मादी) कोकिळेचा नाही.

(नर) कोकीळ आपल्या प्रेयसिला त्याच्या आवाजाने साद देतो... हे वास्तव आहे आणि कवितेतली कल्पनाही. कविता कोकिळाने दिलेल्या सादामुळे कविच्या मनात उठलेल्या आठवणींच्या तरंगांबद्दल आहे. तुम्ही तिचे उत्तम रसग्रहण केले आहे हे अगोदर लिहीले आहेच.

थोडक्यात, कविता व्याकरण आणि वास्तव या दोन्ही दृष्टींनी योग्यच आहे. त्यात वादाचा काही प्रश्नच नाही असे मला वाटते.

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. त्याला प्रेयसी कोकिळाच वाटायला हवी, नाही तर काव्यातला सारा आर्जवच व्यर्थ होईल. कोकिळाच्या गाण्याला दाद द्यायला कवी रात्र जागणार नाही. खरं तर `आपली कोकिळा' आठवायला आणि कविता सुचायला, (मग तो भले गैरसमज असू दे), कविला कोकिळाच गातेयं असं वाटायला हवं

स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकरला सुद्धा गान-कोकिळाच म्हटलंय. (त्याला पक्षीतज्ञांचा आक्षेप असला तरी बेहत्तर!) त्यामुळे वास्तविकात जरी कोकिळ गात असला तरी कवी-मनात गाणारी कोकिळाच असायला हवी.

पैसा's picture

28 Sep 2014 - 2:47 pm | पैसा
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.

क्या बात है! हेच्च कधीपासून सांगतेय ना मी हे.
भावार्थ चांगला लावला आहे! पण मला वाटत होतं की कवी हे स्वतःच स्वतःला सांगतो आहे! कवीला लिहायचे स्वातंत्र्य आहे आणि वाचकाला अर्थ लावायचं. आणि माझाच अर्थ बरोबर असंही कोणाला वाटू नये!

संजय क्षीरसागर's picture

28 Sep 2014 - 2:52 pm | संजय क्षीरसागर

आभार मानतांना हे नमूद केलंय : जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.

कवीला पोएटिक लिबर्टी हवी आणि असायलाही यात काहीच दुमत नाही.

पण

सुचवाल का त्या कोकिळा …
रात्री तरी गाऊ नको

यात कवीने 'कोकीळ' हाच गात असल्याचे सूचित करून आपल्याला (म्हणजे कवीला) वास्तवाचे भान असल्याचेही सुचित केलंय. आता कोकीळ रात्रीही गातो हे मीही बर्‍याच वेळी पाहिलंय. म्हणजे येथेही कवीने वास्तवाचे भान सोडले नाही हे स्पष्ट आहे.

येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.

संजय क्षीरसागर's picture

28 Sep 2014 - 7:21 pm | संजय क्षीरसागर

येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.

कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल?

कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं. आणि कवितेचा सारा माहौल `रात्री तरी गाऊ नको' मधे एकवटलायं.

तुम्ही कुणीही, :

येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते

या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.

कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल?

येथे कवी म्हणजे स्वतः कोकीळ नाही पण त्याने रूपकार्थाने आपली तुलना ही कोकिळाशी केलीय.

कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं.

दिवसभर कोकिळाचे कुहूकुहु पक्षी गायन सुरु असतेच. मात्र रात्री आपल्या प्रेयसीचा विरह कवीला असह्य होतोय. त्याच आर्त भावनेने तो म्हणतोय
खुलवू नको अपुला गळा,
रात्री तरी गाऊ नको

निदान रात्री तरी विरहाग्नीत न तडफडता कवीच्या मनास शांतता मिळावी आणि हो, रात्रीच्या वेळी कोकिळगायनास दाद द्यायला त्याची कोकिळा नाही तेव्हा उगा गाऊन काही फायदा नाही हा ही एक उद्देश कवीच्या मनी असावा.

या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.

रसग्रहण माझा प्रांत नाही.

कोकिळ गातोयं, कवीला प्रेससीची आठवण आली, त्यानं आपल्या मनोदशेचं वर्णन केलं आणि कोकिळाला म्हणाला, रात्री तरी गाऊ नको, मला विरह सहन होत नाही...संपली कविता!

मग रसग्रहणाला अर्थच उरत नाही, सगळे सोपे शब्द आहेत आणि उघड वर्णन आहे.

इथल्या काही सदस्यांना असा अर्थ घ्यावसा वाटेल, ओके!

प्रचेतस's picture

28 Sep 2014 - 10:31 pm | प्रचेतस

:)

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 1:07 pm | प्यारे१

असंच आहे. उगाच कशाला काहीही आणता मध्ये? कैच्या काय!
(थांबा अजून काही प्रतिसाद चोप्य पस्ते करायचे आहेत.)

संपादितसंपादित

अनुप ढेरे's picture

29 Sep 2014 - 6:22 pm | अनुप ढेरे

संपादित

संपादित

नवीण संपादकांनी कात्रीचं उद्घाटन केलय का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2014 - 5:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. नक्कीच, पण न घेतलेली पोएटिक लिबर्टी त्याच्यावर लादण्याचा हक्क कोणालाच नाही, हे ही तितकेच खरे (अर्थात तुम्हाला मान्य असेल तरच) !

शिवाय "तुमचे म्हणणे तेच खरे" हे म्हणण्याचा हक्क तुम्ही ज्या निर्धाराने सतत वापरता (आणि त्यातून एखादा कवीसुद्धा सुटू शकत नाही) हे खरेच कौतूकास्पद आहे, इतके बोलून मी माझे भाषण पुरे करतो.

बाकी चालू द्या.

प्यारे१'s picture

28 Sep 2014 - 5:11 pm | प्यारे१

:)

विलासराव's picture

27 Sep 2014 - 8:50 pm | विलासराव

झक्कासच!!!!!!!

आतिवास's picture

27 Sep 2014 - 11:26 pm | आतिवास

गाण्याचं रसग्रहण आवडलं.

अवांतरः मलाही आधी रात्री कोकिळ कुठे गातो, असं वाटायचं. पण आता इतक्या वेळा रात्री 'कोकिळ'चा स्वर ऐकला आहे की, 'बाबा, रात्री तरी गाऊ नको' असं वैतागाने त्याला म्हणायची वेळ येते अनेकदा!

आणि ज्या तरल भावदशेत जाऊन प्रतिसाद देणार्‍यांना देखिल ती भावलीये, त्या चित्तदशेत कदाचित ते देखिल असावेत, नाही तर गाण्यातून आणि शब्दातून रसिकाला जाणवणारी इतकी उत्कटता कशी शक्य आहे?

सुधीर's picture

27 Sep 2014 - 11:55 pm | सुधीर

रसग्रहण उत्तम आहे.

दिपक.कुवेत's picture

28 Sep 2014 - 12:17 am | दिपक.कुवेत

गाणं तर अप्रतिम तर आहेच त्याचबरोबर तुम्हि समजाउन सांगीतलेला भावार्थहि.....अगदि साधा, सरळ आणि सोपा. हा प्रतिसाद दिल्यावरहि गाणं परत एकदा एकणार आहे.

प्रसाद गोडबोले's picture

28 Sep 2014 - 12:56 am | प्रसाद गोडबोले

सुंदर

प्यारे१'s picture

28 Sep 2014 - 2:32 am | प्यारे१

खूप छान तरल रसग्रहण केलंय. आवडलं.

vikramaditya's picture

28 Sep 2014 - 8:36 am | vikramaditya

आता गांणे रिपिट मोड वर पुनः पुनः एकणे आले....

अावडत्या गाण्याचं सुरेख रसग्रहण.खूप अावडलं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Sep 2014 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार

रसग्रहण नेहमीप्रमाणेच उत्तम.

गाणे आवडते आहेच पण हे रसग्रहण वाचल्या नंतर ते ऐकायला जास्त मजा आली.

जिओ सं. क्षी. जिओ.

पैजारबुवा,

रिकामटेकडा's picture

28 Sep 2014 - 11:12 am | रिकामटेकडा

या आधीही हे गाण आवडीच होत.
आता तुमच्या या रसग्रहणामुळे. तर स्पेशल मधे आलाय
वाचून अगदी वाह! अस झालं

पुनश्च एकदा धन्यवाद

संजय क्षीरसागर's picture

28 Sep 2014 - 2:25 pm | संजय क्षीरसागर

प्रमोद (देर्देकर) चे विषेश आभार कारण त्यानं :

सांगाल का त्या कोकिळा,
कि झार होती वाढली, .…(२)

या शब्दाचा अर्थ विचारला होता. तो शोधतांना गाणं पुन्हा लक्षपूर्वक ऐकायची संधी मिळाली. मग या ओळी खास वाटल्या :
आणि द्याया दाद कोणी, …(२)
रात्र जागून काढली || २ ||

आणि सर्वांसाठी रसग्रहण करावंस वाटलं. जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

बरेच दिवसानी दर्जेदार वाचल्याचे समाधान मिळाले.
आसक्ति शिवाय कला निर्माण होत नाही... आसक्ति नजाकतीने अभिव्यक्त होणे म्हणजेच कला होय. आणि या काव्य नजाकतीची एक अविट गोडी आपल्यामुळे चाखायला मिळाली याबद्दल आपला ऋणी आहे. खुप धन्यवाद या धाग्याबद्दल संजय अंकल.

क्या बात है! प्रतिसाद बेहद्द आवडला.

गा़लिबचा एक शेर आहे :

कोई मेरे दिलसे पूछे तेरे तीर-ए-निमकश को,
ये खलिश कहांसे होती जो जिगरके पार होता |

जर तुझ्या अर्धोन्मिलित नयनांचा तीर हृदयाच्या आरपार गेला असता तर ही वेदनाच उरली नसती... आणि उरात वेदना नसती तर शायरीच झाली नसती!

vikramaditya's picture

28 Sep 2014 - 8:15 pm | vikramaditya

रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती.

एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही."

तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

vikramaditya's picture

28 Sep 2014 - 8:20 pm | vikramaditya

रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती.

एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही."

तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

संजय क्षीरसागर's picture

28 Sep 2014 - 9:12 pm | संजय क्षीरसागर

कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही."

हे आस्वादाचं मर्म आहे! ललित कलेचा आस्वाद घ्यायचा तर व्याकरण, वास्तविकता, शब्दबदल यापेक्षा इंपॅक्ट महत्त्वाचायं.

चित्रगुप्त's picture

28 Sep 2014 - 9:20 pm | चित्रगुप्त

सुंदर र्‍हदयस्पर्शी काव्य, गायन आणि रसग्रहण.
कवी अनिलांच्या 'अजुनी रुसूनि आहे' च्या संदर्भात 'कुणी जाल का सांगाल का' चा काहीसा वेगळा अर्थ मनात घोळत आहे. लवकरच लिहेन म्हणतो.

चित्रगुप्त's picture

29 Sep 2014 - 2:52 pm | चित्रगुप्त

या कवितेविषयी:

अनिलांची 'ती' कविता मुकुलसाठीची..
मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले..
''कुणी जाल का.. सांगाल का..
सुचवाल का त्या कोकिळा..
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा..
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!''
सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, 'मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..'
महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. ही आठवण जागवली ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी गायिलेल्या 'बुलबुला' व 'दिलबरा' या दोन ध्वनिचित्रफितींच्या प्रकाशनाच्या निमित्ताने.
दुवा इथे देत आहे:
http://www.loksatta.com/pune-news/mukul-shivputra-poetry-dvd-kavi-anil-4...

अनुप ढेरे's picture

29 Sep 2014 - 3:16 pm | अनुप ढेरे

मला संक्षींनी लावलेला अर्थ पटला आणि आवडला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2014 - 4:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

कैच्या कैच तुमचं चित्रगुप्तजी, रसिकांच्या पोएटिक लिबर्टीवर असा घाला घातल्याबद्दल तुम्चा पोय्टिक णीषेढ करावा तेव्हढा कमीच आहे !

मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

चौकटराजा's picture

29 Sep 2014 - 7:41 pm | चौकटराजा

अनेक काव्यांची निर्मिती व त्यावरील रसिकांचे अंदाज ही एक गंमत आहे. " श्रावणात घन निळा बरसला" हे गीत अगदी पाडगावकर यानी खंडाळ्याला मस्त गरम गरम बजी खाऊन झाल्यावर ऐन पावसाळी वातावरणात लिहिले असेल असे अनेकाना वाटते. प्रत्यक्षात चेंबूर ते शिवाजी टर्मिनस या दरम्यान अंगातून घामाच्या धारा वहात असता गच्च भरलेल्या लोकलमधे कवि साहेबाना त्याचा मुखडा व पहिले कडवे सुचले आहे.

संजय क्षीरसागर's picture

29 Sep 2014 - 4:07 pm | संजय क्षीरसागर

खरं तर काल रात्री मी सुद्धा ती लिंक वाचली आणि क्षणभर वाटलं की झक मारली आणि इतकं तरल रसग्रहण केलं!

पण क्षणभरच! कारण नंतर लक्षात आलं की ज्या भावार्थानं रसग्रहण केलंय, त्या चित्तदशेतून तीच कविता गायली तर काव्य काय अपरिमीत उंची गाठतं!

आणि अनुप माझ्याशी सहमत आहे कारण तो म्हणतो : मला संक्षींनी लावलेला अर्थ पटला आणि आवडला आहे!

अशी कधीकधी तरल कल्पना, वास्तवावर मोहकशी मात करुन जाते.

चित्रगुप्त's picture

29 Sep 2014 - 4:25 pm | चित्रगुप्त

मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

संजय क्षीरसागर's picture

29 Sep 2014 - 4:43 pm | संजय क्षीरसागर

कधी मित्रांच्या मैफिलीत गाण्याची वेळ आली तर हे गाणं मी, गवसलेल्या आणि भावलेल्या अँगलनंच म्हणेन !

चित्रगुप्त's picture

29 Sep 2014 - 7:11 pm | चित्रगुप्त

संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत.
वसंतराव आणि यशवंत देव या दिग्गजांबद्दल काय बोलावे ? तरी सुद्धा एक वैयक्तिक मत नोंदवू चाहतो. या गाण्याला तबल्याची सरधोपट साथ नसती, तर ते जास्त खुलले असते, असे वाटून गेले. ओपींची अशी काही गाणी आहेत, ती नेमकी कोणती हे आत्ता पटकन आठवत नाहिये.

संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत.

होय मी पण :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2014 - 6:30 am | अत्रुप्त आत्मा

खिक्क!

चौकटराजा's picture

1 Oct 2014 - 6:36 am | चौकटराजा

स्पाउ बरेच दिवसात तुझे गाणे आलेले नाही तूनळीवर !

प्रमोद देर्देकर's picture

30 Sep 2014 - 12:10 pm | प्रमोद देर्देकर

अजुन एक विनंती सं.क्षी साहेब " भय इथले संपत नाही" या कवि ग्रेस यांच्या कवितेचेही असेच रसग्रहण होवुन जावुद्या.

संजय क्षीरसागर's picture

30 Sep 2014 - 12:14 pm | संजय क्षीरसागर

ती एक वेड लावणारी कविता आहे. जितकं खोल शिरु तितके गहन अर्थ आहेत. जरुर करीन.

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 9:34 am | प्रसाद१९७१

मला अश्या अर्थ लावायला लागणार्‍या कविता पटत नाहीत. म्हणजे असे का लिहावे हे कळत नाही.
त्यापेक्षा उर्दू शायर ( गालिब, साहीर, शकील ) सरळ लिहीतात, ते जास्त भावते. रुपक वगैरे काही भानगड नाही.

संक्षी साहेबांनी फार ओढ्न ताणुन अर्थ काढला आहे असे वाटते. कवि ला असे काही म्हणायचे असेल असे वाटत नाही.

मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची :-)

संजय क्षीरसागर's picture

1 Oct 2014 - 12:50 pm | संजय क्षीरसागर

पण ज्यांनी प्रेम केलंय आणि विरहव्यथा जाणलीये, त्यांना तो भावलायं असं प्रतिसादांवरुन दिसतंय. कवि अनिल खुद्द असते तर त्यांना देखिल तो आवडला असता कारण त्यांच्या प्रतिभेला आणखी उंची देण्याचा प्रयत्न या रसग्रहणातून केलायं.

राहूल देशपांडेशी कधी गाठ पडली तर त्याला हे रसग्रहण वाचायला देण्याची मनिषा आहे. मला भावलेल्या अर्थानं तो ते गाणं पुन्हा गायला तर कमाल करेल हे नक्की!

vikramaditya's picture

1 Oct 2014 - 8:32 pm | vikramaditya

अलौकीक कलावंत असे मानतात व जाहीरपणे सांगतात की एखादी कलाकृती त्यांच्या हातुन 'घडली' आणि त्याचे श्रेय ते स्वतःकडे न घेता कोणा 'Higher Power' ला देतात. ही कलाकृती 'कशी' घडली ह्याचा वृत्तांत फार तर ते सांगु शकतील, पण त्या मागे नेमकी काय स्फुर्ती / प्रेरणा होती ह्याचे अचुक विष्लेषण करणे त्यांनाही जड जाते.
एवढेच नव्हे तर प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या अनेक कलाकृतींचा रिव्हुयु करताना मूळ कलाकार सुद्धा संभ्रमात पडतो.

पण त्याच बरोबर अशा कलाकृती रसिकांना मात्र खुप आनंद देतात. परंतु त्या कोणाला कश्या रुपात भावतील हे सांगणे कठीण. प्रेक्षक / श्रोता स्वतः ज्या मनस्थितीत असेल तसा तो त्या कलेचा आनंद घेतो असे बरेचदा घडते. या उलट "आपल्या या कलाकृतीमध्ये असे काय आहे की ज्याने लोक एवढे मंन्त्रमुग्ध झाले?" असा प्रश्न स्वतः काही कलावंतांनी जाहीरपणे प्रकट केला आहे.

'कालातीत' कलाविष्कार हा 'निर्मितीचा एक क्षण' असतो, कॅलिडोस्कोप मध्ये आपल्याला जे दिसते त्याचा अनुभव आणि आस्वाद मनसोक्त घ्यावा. तोच कॅलिडोस्कोप इतरांना वेगळे रुप दाखवेल, so what?
After all, beauty lies in the eyes of the beholder.

चित्रगुप्त's picture

10 Dec 2014 - 12:33 pm | चित्रगुप्त

हे गीत ज्याच्यासाठी लिहिले गेले, त्या खुद्द मुकुलने हे गायले आहे का? असल्यास उपलब्ध आहे का ?

संजय क्षीरसागर's picture

10 Dec 2014 - 12:56 pm | संजय क्षीरसागर

मुकुलनं हे गाणं गायलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण या गाण्यातली दोन्हीही कडवी, म्हणजे :

आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली …(२)
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली …(२)
हार पुर्वीचा दिला
जो श्वास साहुन वाळला .…(२)
आत्ताच आभाळातला …(२)
काळोख मी कुरवाळीला || १ ||

आणि

सांभाळुनी माझ्या जीवाला,
मी जरासे घेतले …(२)
इतक्यात येता वाजली,
हलकी निजेची पाऊले …(२)
सांगाल का त्या कोकिळा,
कि झार होती वाढली, .…(२)
आणि द्याया दाद कोणी, …(२)
रात्र जागून काढली || २ ||

संपूर्णपणे वेगळी भावदशा आणि अभिव्यक्ती दर्शवतात, त्यांचा मुकुलशी (किंवा त्याच्या मातृवियोगाशी) सुतराम संबंध नाही.