शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
21 Sep 2014 - 7:26 pm

शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

शिकार करणे किंवा शिकार होणे हा प्राणिमात्रांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. अगदी प्रागैतिहासिक काळी जेव्हा उत्पादनाची शेतीसारखी साधने मानवाला ज्ञात नव्हती तेव्हा मानवाचा अस्तित्त्वसंघर्ष हा प्रामुख्याने दोन कौशल्यांवर आधारीत होता - हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजेच शिकार आणि (कंदमुळे वगैरे) गोळा करणे. निसर्गातील इतर प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूत आणि मानवाच्या हेतूत एक मोठा फरक हा होता की प्राण्यांसाठी शिकार हे अन्न मिळवण्याचे साधन होते, तर मानवासाठी शिकार अन्नप्राप्तीबरोबरच मनोरंजनासाठी केला जाणारा खेळही होता. मनोरंजनाच्या ह्याच हव्यासापायी मानवाने अगणित प्राण्यांना, पक्ष्यांना नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर ढकलले. खाली एक यादी केवळ उदाहरणासाठी देत आहे.

इसपू ९९५० - Cuvieronius नामक आजच्या हत्तींसारख्या दिसणारे प्राणी नामशेष झाले.

इसपू ९६८० - श्रब ऑक्स (Euceratherium) ह्या गव्यासारख्या एका प्रजातीचा अंत झाला.

इसपू ९१३५ - Pleistocene South American Jaguar ह्या मार्जारकुलातील प्राण्याचा शेवटचा दिवस ठरला.

इसपू ९०८० - Pygmy mammoth अतिशिकारीमुळे नामशेष झाला.

इसपू ८७६० - Columbian mammoth ह्या अजून एका सस्तन प्राण्याचा अंत झाला.

इसपू ७२९० - Cyprus dwarf hippopotamus ही पाणघोड्याची जमात मानवाकडून संपवली गेली.

इसपू ६९१० - Steppe bison ह्या गव्याच्या प्रजातीची शेवटची घटका ठरली.

इसपू ५३७० - Megatherium americanum ह्या हत्तीच्या आकाराच्या प्राण्याचे अस्तित्त्व पृथ्वीवरून शिकार्‍यांनी पुसून टाकले.

इसपू ५०२० - Sardinian giant deer हा रेनडिअरसदृश्य प्राणी नामशेष झाला.

इसपू ४८६६ - Irish elk ह्या हरीणवर्गीय महाकाय प्राण्याची शेवटची शिकार केली गेली.

इसपू २५५० - Bennu heron ह्या पक्ष्याचे अस्तित्त्व पुसले गेले.

इसपू १७८० - Woolly mammoth ह्या मॅमथ कुलातील शेवटच्या प्रजातीचा अंत झाला.

इसपू १०० - Syrian elephant ही हत्तींची एक जात हस्तिदंताच्या हव्यासापायी संपवली गेली.

इस ४५० - Meiolania ह्या कासववर्गीय प्राण्याचे अस्तित्त्व मानवी संपर्कानंतर केवळ तीनशे वर्षांतच कायमचे संपुष्टात आले.

११ वे शतक - Moa-nalo ह्या उडू न शकणार्‍या बदकांच्या प्रजातीचा अतिशिकारीमुळे र्‍हास झाला.

१४ वे शतक - Koala lemur ह्या प्राण्याच्या प्रजातीने शेवटचा श्वास घेतला.

१५ वे व १६ वे शतक - Haast's eagle ह्या गरुडाच्या प्रजातीचा अंत त्याच्या नैसर्गिक भक्ष्य असलेल्या Moa ह्या पक्ष्याच्या अतिशिकारीमुळे झाला.

इस १६२७ - Indian Aurochs ही गवासदृश्य प्रजाती पृथ्वीतलावरून हद्दपार झाली.

इस १६६२ - Dodo ह्या उडू न शकणार्‍या पक्ष्याचे अस्तित्त्व मॉरीशस बेटावर रहायला आलेल्या रहिवाश्यांमुळे संपुष्टात आले.

इस १७६८ - Steller's sea cow नामक प्रजाती मांस व कातड्यासाठीच्या बेसुमार शिकारीमुळे नष्ट झाली.

इस १८०० - Bluebuck हा देखणा आफ्रिकन प्राणी युरोपियन शिकार्‍यांकडून कायमचा संपवला गेला.

इस १८२६ - Mauritius Blue Pigeon या पक्ष्याचे अस्तित्त्व शिकारीमुळे कायमचे संपले.

१८ वे शतक - Great Auk, Sea Mink, Falkland Islands wolf, Quagga, Hokkaido wolf, Atlas Bear, Eastern Elk... अजूनही कित्येक प्राणी-पक्षी संपले.

२० वे शतक - Pig-footed bandicoot, Honshū wolf, Newfoundland wolf, Passenger pigeon, Carolina parakeet, Ukrainian wild horse, Kenai Peninsula wolf, Desert Rat-kangaroo, Mogollon Mountain wolf, Thylacine, Bali tiger, Cascade Mountain wolf, British Columbia wolf, Texas wolf, Barbary lion, Caribbean Monk Seal, Mexican grizzly bear, Caspian Tiger, Javan tiger, Indian Cheetah...

२१ वे शतक - Pyrenean Ibex, Baiji Dolphin, Liverpool Pigeon, Eastern Cougar, Western Black Rhinoceros, Japanese River Otter, Formosan clouded leopard... मानवाची प्रगती चालूच आहे.

शिकारीस विरोध का?

मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे ज्यातून दर वर्षी हजारो-लाखो पशुपक्षी मारले जातात. त्यापैकी कित्येक हे जखमी होतात आणि वेदनेने तळमळून शेवटी आपला प्राण सोडतात कारण त्यांच्या शिकार्‍यांकडे एकतर अचूक नेम साधण्याचे कौशल्य नसते किंवा जखमी झालेल्या शिकारीचा माग काढत त्या दुर्दैवी प्राण्याची तडफड संपवण्याइतपत धाडस नसते. शिकार्‍यांना शिकारीतून कोणता आनंद मिळतो हे माहीत नाही. पण त्यांच्या सावजांच्या वाट्याला मात्र येतात त्या प्राणांतिक वेदना, अन्न न मिळवू शकल्याने भुकेने तडफडून मृत्यू, कुटुंबाची वाताहत, मातापित्यांवर अवलंबून असलेल्या पिलांच्या जगण्याचा आधार हिरावला जाणे. अगदी ज्यांच्यावर वन्यजीवनाचे संरक्षण करायची जबाबदारी आहे त्या शासकीय किंवा इतर संस्थादेखील पैशासाठी शिकारीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करताना दिसतात ही दुर्दैवाची बाब आहे.

शिकार ही किती क्रूर असू शकते हे खालील काही उदाहरणांवरून दिसून येईल.

प्राण्यांवर शिकारीचा काय परिणाम होतो? शिकारीच्या दरम्यान जीवाच्या आकांताने केलेली धडपड ही कदाचित त्यांना कधीकधी निसटून जायला मदतही करते. पण त्या अनुभवाचा कल्पना करता येणार नाही इतका ताण त्यांच्यावर पडतो. शिकार्‍यांचा आरडाओरडा, एकाचवेळी अनेक माणसांनी घेरून प्राण्याला एकटे पाडणे, बंदुकीच्या आवाजासारखे अनोळखी आवाज, कळपापासून तुटून एकाकी पडल्याची भावना, माद्यांमध्ये आपल्या पिल्लांनाही वाचवण्याची असलेली आस, ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की वन्यजीव हे अतिताणामुळे एकतर तेथील प्रदेश सोडून सुरक्षित प्रदेशात आसरा घेण्याचा प्रयत्न करतात - जे दिवसेंदिवस संकुचित होत चाललेल्या त्यांच्या अधिवासाच्या आकारामुळे अशक्यप्रायः होते, किंवा अपत्यांच्या सुरक्षिततेची खात्री नसल्यामुळे प्रजनन लांबणीवर टाकतात. आपसूकच अस्तित्त्वाच्या लढ्यात मानवी हस्तक्षेपाच्या क्रौर्यापुढे हतबल असलेले हे दुर्दैवी जीव हरणार हे स्पष्ट होते.

पर्यावरण संतुलनावरील विपरीत परिणाम

पर्यावरणात प्रत्येक प्रजातीची एक भूमिका ठरलेली आहे. भक्ष्य-भक्षक ह्या जीवसाखळीच्या पिरॅमिडसारख्या रचनेत सूक्ष्मजीव आणि वनस्पती, त्यांच्यावर अवलंबून असणारे तृणभक्षी प्राणी, त्यावर गुजराण करणारे मांसभक्षक प्राणी ह्यांचे एक विशिष्ट स्थान असते आणि त्यांच्या संख्येचा त्यात खूप महत्त्वाचा वाटा असतो. यातील एका प्रजातीने दुसर्‍या प्रजातीचा भक्ष्य म्हणून वापर करणे हे प्रथमदर्शनी क्रूर जरी वाटले तरी त्यातून प्रत्येक प्रजातीच्या संख्येवर योग्य तेवढे नियंत्रण राहत असते. उदा. तृणभक्षी प्राण्यांची संख्या अपरिमित वाढली तर त्याचे कारण वरच्या पातळीतील मांसभक्षी प्राण्यांचा झालेला विनाश हे असू शकते. आपापसातील निसर्गनियंत्रित संघर्ष हे उत्क्रांतीचे सर्वात महत्त्वाचे कारण आणि साधन आहे.

Ecological Pyramid

(प्रतिमा गूगल डॉक्सवरून साभार)

कुठल्याही कारणाने जर यातील एका घटकाच्या संख्येच्या पिरॅमिडशी असलेल्या प्रमाणाचे संतुलन ढळले तर त्या अधिवासातील जैवविविधता धोक्यात येते आणि पर्यायाने एकूणच संतुलन ढासळून त्या अधिवासाचा, पर्यावरणाचा विनाश होतो.

केवळ लोभापायी मानवाने केलेल्या बेसुमार शिकारीमुळे कित्येकदा केवळ विशिष्ट प्रजातीच्या प्राण्यांची संख्या घटते आणि त्यावर अवलंबून असणारे इतर घटक उपासमारीने मृत्युपंथाला लागतात.

पर्यावरण असंतुलनाचा मानवावर होणारा परिणाम

सर्वात महत्त्वाची आणि प्रत्येकाने कधीही विसरता कामा नये अशी गोष्ट म्हणजे मानव हाही ह्याच पर्यावरणाचा एक अविभाज्य आणि जबाबदार घटक आहे. मानवाचे अस्तित्त्वही इतर कुठल्याही प्रजातीप्रमाणेच निसर्गाच्या संतुलनावर तितकेच अवलंबून आहे आणि पर्यावरणाची झालेली कुठल्याही प्रकारची हानी ही मानवी जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम घडवत असते. शिकारीमुळे हा परिणाम कसा होतो, तर उदाहरण वाघाचे घेऊयात. केवळ शंभर वर्षांपूर्वीपर्यंत भारतात सुमारे एक लाखापेक्षा जास्त वाघ अस्तित्त्वात होते. आज अधिकृत नोंदीनुसार फक्त १३०० च्या आसपास शिल्लक राहिले आहेत आणि काहीच वर्षांमध्ये उरलेसुरलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला वाघांच्या बेसुमार शिकारीमागील कारणे ही निव्वळ मनोरंजनात्मक होती. पण अतिपूर्वेकडील देशांमध्ये असणार्‍या वाघाच्या अवयवांच्या मागणीमुळे आता वाघांची शिकार करण्याचा हेतू आणि पद्धत दोन्ही बदलले आहेत. ह्यामुळे अजून एक चिंताजनक गोष्ट अशी निर्माण झाली आहे की वाघांच्या शिकारीचे तंत्र बदलले आहे. पूर्वीसारखे जंगल उठवत किंवा बंदुकीच्या गोळीने नव्हे तर लोखंडी वा तारेच्या फासात अडकवून वाघ मारले जातात. ह्या पद्धतीत कितीतरी अधिक क्रौर्य आहे कारण वाघ अडकल्यानंतर सुटण्याची जी जीवापाड धडपड करतो त्यात त्याच्या अडकलेल्या पंजाचे चामडे अक्षरशः सोलून निघते आणि तरीही तो निसटू शकत नाही. निसटलाच तरी अशा पद्धतीने अपंग झालेला असतो की काहीच दिवसांत भुकेने व्याकुळ होऊन मरतो. हे लिहायलाही मला फार भयंकर वाटतेय पण ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे.

वाघांचा वावर संपल्याने जंगलात जाण्याचे भय लोकांना वाटेनासे होते. पर्यायाने जंगलसंपत्तीची, झाडांची बेसुमार तोड होऊ लागते तसेच इतर प्राण्यांच्याही शिकारीला ऊत येतो. थोड्याच काळात तो प्रदेश निर्जीव असल्यासारखा होतो. पावसाचे पाणी साठवण्याची जंगलांची क्षमता संपते, नद्यांना पूर येऊ लागतात, काठावरची गावे-वस्त्या उध्वस्त होतात, वने नष्ट झाल्यामुळे त्यावर अवलंबून असणार्‍या आदीम मानवी लोकसंख्येचा जगण्याचा आधारच हिरावला जातो. वनांचा पर्यावरणीय दर्जा अधिकृतरित्या घटल्यामुळे पैशाची मस्ती असलेल्या धनदांडग्यांच्या घशात अशा जमिनी पडायला वेळ लागत नाही किंवा सरकारही त्यावर काही करत नाही. आजच्या आर्थिक व्यवस्थेचा एक दोष असा आहे की नफा ही गोष्ट जितकी व्यक्तिगत ठेवता येईल तितकी ठेवायची आणि तो मिळवण्यासाठी होणारे जे काही नुकसान असेल, जी काही जबाबदारी असेल ती मात्र शक्य तितकी समाजावर, सरकारवर ढकलायची. वन्यजीवनावर, जंगलावर अतिक्रमण करणे हा मानवी हक्क आहे असा आरडाओरडा करून जमिनी बळकावायच्या पण जंगलांचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी मात्र घ्यायची नाही.

पर्यावरणवाद्यांवर घेतले जाणारे काही आक्षेप

एक आक्षेप तर वर आलेलाच आहे. शाकाहार वि. मांसाहार, हिंदू वि. मुस्लिम, वगैरे नेहमीचेच. खाली एका प्रतिसादात जे आलेय ते बरोबर आहे. मांसासाठी ज्या जनावरांची वा प्राण्यांची हत्या केली जाते त्यांची पैदासही मुद्दाम केली जाते आणि पर्यावरणसाखळीवर त्याचा अतिताण येणार नाही याची काळजी घेतली जाते. वन्य प्राण्यांची शिकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यांच्या संगोपनासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का असा प्रश्न स्वतःला विचारत नाहीत. जंगलातली एक कोंबडी, एक रानडुक्कर मारल्याने काय बिघडते असा विचार करणार्‍यांनी त्यांच्यासारखाच विचार करणारे अजून कितीतरी जण आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. तुम्ही एक रानकोंबडं मारलं, तसंच अजून कित्येक जण रानकोंबड्यांची अशीच शिकार करत असतील. यातील एकहीजण त्या रानकोंबड्यांच्या संवर्धनासाठी किंवा अधिवासासाठी प्रयत्न करत नसतो. मग ह्यांना ह्या पशुपक्ष्यांना मारण्याचा नैतिक अधिकार येतोच कसा? माळढोक पक्ष्यांची एकेकाळी मांसासाठी खूप शिकार व्हायची, तोही असाच काहीसा विचार करून. मी एक माळढोक मारल्याने काय बिघडणार आहे? आज सोलापूर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्यात केवळ एक-दोन माळढोक दृष्टीस पडतात तेही नशीब असेल तरच. माळढोकांची ही अवस्था रानकोंबडे, ससे, भेकरे, रानडुक्करे, चितळ, काळवीट ह्या प्राण्यांचीही एक दिवस होणार हे दुर्दैवाने निश्चित आहे. केवळ चारदोनजण माथेफिरू हे पर्यावरणासाठी धडपडणार्‍या हजारो हातांच्या मेहनतीवर पाणी फिरवत असतात ते असे.

महाराष्ट्रात अरूण बाड्डा किंवा पिंक हेडेड डक हे सुंदर बदक केवळ त्याच्या गुलाबी पिसांच्या हव्यासापोटी कायमचे अस्तंगत झाले.

मासेमारी

ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे ह्या गृहीतकाला छेद देणारा एक प्रकार म्हणजे मासेमारी. कृत्रिम जलाशयांमध्ये केली जाणारी मत्स्यशेती वगळता इतर प्रकारची मासेमारी ही आजकाल इतकी बेसुमार वाढलेली आहे की माशांच्या अनेक प्रजाती एकतर विलुप्त पावल्या आहेत किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनाच्या नावाखाली जपान करत असलेली देवमाशांची कत्तल ही तितकीच निंदनीय आहे. दरवर्षी जगात दहा हजारांपेक्षा जास्त शार्क मासे हे फक्त त्यांच्या कल्ल्यांसाठी मारले जातात कारण त्यांच्या कल्ल्यांना सूप बनवण्यासाठी मागणी आहे. सामन जातीचे मासे बेसुमार मासेमारीमुळे इतके कमी झाले आहेत की त्यांच्यावर अवलंबून असणारे ग्रिझली अस्वलांसारखे अन्य प्राणीही नष्ट होतील की काय अशी भीती वाटू लागली आहे.

ह्या विषयावर खूप काही लिहिता येईल, पण तितका वेळ नसल्यामुळे इथेच थांबतो. जाताजाता, चैतन्य गौरान्गप्रभु ह्यांनी लिहिलेल्या मिपावरच्याच एका अप्रतीम लेखाचा दुवा खाली देत आहे. वाचा आणि विचार करा, तुम्ही काय करता आहात.

http://www.misalpav.com/node/21469

धन्यवाद.

- स्वॅप्स

समाजजीवनमानप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Sep 2014 - 7:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे छान केलेत. दुसर्‍या धाग्यावच्या प्रतिक्रियेपेक्षा ती वेगळा धागा म्हणून का टाकली नाही हाच विचार करत होतो.

जेव्हापासून माणसाने फेकून मारण्याची आयुधे (भाल्याच्या आदीम प्रकारापासून सुरुवात झाली) शोधून काढली तेव्हापासून मॅमथने सुरुवात करून आतापर्यंत मोजायला कठीण पडेल इतक्या प्राण्यांचा स्वार्थासाठी (अन्न यात समाविष्ट नाही) आणि क्रिडेसाठी समूळ संहार केला आहे... यात अनेक मानवी समाजही समाविष्ट आहेत.

"भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे !

सुबोध खरे's picture

21 Sep 2014 - 11:17 pm | सुबोध खरे

+१००
फक्त "भूक लागलेली नसताना" आणि "अन्नासाठी उपयोगी नसलेलेही" प्राणी मारणारा माणूस हाच प्राणी पृथ्वीतलावर आहे ! असहमत.
सिंह हे तरस चित्ता बिबळ्या किंवा त्यांची पिल्ले यांना मारून टाकतात ( न खाता). तसेच तरस सुद्धा संधी मिळेल तेंव्हा सिंहाच्या छाव्यांना मारून टाकतात. या मध्ये आपल्या अन्ना साठीची स्पर्धा कमी करणे हि अन्तः प्रेरणा (INSTINCT) असते. तसेच हत्ती किंवा रानरेडे हे सिंह वाघ बिबळे यांच्या छाव्यांना ठार मारतात कारण ती पिल्ले मोठी होऊन त्यांना / त्यांच्या शावकाना धोका निर्माण करू शकतात.

एस's picture

22 Sep 2014 - 12:57 pm | एस

इएसाहेब आणि खरेसाहेब, तुमचे दोघांचेही बरोबर आहे.

जीवसृष्टीच्या दोन मूलभूत प्रेरणा म्हणजे जिवंत राहणं आणि वंशसातत्य टिकवणं (सर्व्हायवल आणि रिप्रॉडक्शन). ह्यामध्ये जे प्राणी/घटक स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांच्यापुढे इतरांवर अवलंबून रहाण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे हरित वनस्पती, त्यावर जगणारे तृणभक्षी आणि तृणभक्षकांवर जगणारे मांक्षभक्षी आणि या सर्वांच्या मृत्यूनंतर विघटनाचे काम करणारे सूक्ष्मजीव अशी अनेकस्तरीय आणि गुंतागुंतीची रचना उत्क्रांतीच्या माध्यमातून विकसित होत असते. यातला अन्न मिळवण्यासाठीचा एक हेतू सोडला तरी दुसर्‍यांना मारण्यामागे आपले वंशसातत्य टिकवणे ही नैसर्गिक प्रेरणाही तितकीच कारणीभूत असते.

सिंह हे चित्त्यांनी किंवा बिबळ्यांनी केलेली शिकार हिसकावून घेतात. त्यामुळे उलट एखादा हुशार सिंह असता तर त्याने असे चित्ते आणि बिबटे मुद्दाम पाळले असते आणि आरामात बसून दिवस काढले असते. तरीही सिंह आपल्या प्रभावक्षेत्रात चित्त्यांना सहजासहजी राहू देत नाहीत. त्यांच्या पिल्लांवर हल्ला करून मारून टाकतात. ह्यामागे अन्न मिळवण्याची स्पर्धा कारणीभूत नसून चित्त्यांपासून स्वतःच्या बछड्यांचे संरक्षण करणे हे खरे कारण असते. सिंहच काय, बिबटे, चित्ते, तरस, रानकुत्री, लांडगे, हत्ती, गेंडे, गवे, असे सर्वच घटक हे इतरांचे वर्चस्व स्वतःच्या अस्तित्त्वाच्या आणि वंशसातत्याच्या आड येणार नाही ह्याचा जीवापाड प्रयत्न करतात.

अजून एक भाग सिंहांच्या बाबतीत आढळतो किंवा बोकेपण की मादीच्या आधीच्या नर पिल्लांना नवा सिंह ठार मारून टाकतो, जेणेकरून मादी पुन्हा त्याच्याशी मीलनाला तयार होईल. ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते.

माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 5:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण...

१. तरस, चित्ता, बिबळ्या इत्यादी प्राणी पिल्ले मारतात त्याची मुख्यतः दोन कारणे आहेत :

अ) दुसर्‍या नराचा वंश संपवणे : पहिला नर कमजोर होउन तो पराजीत झाल्यावरच हे शक्य असते. अर्थात कमजोर नराचा वंशच्छेद होतो.

आ) स्वतःचा वंश वाढवणे : दुभती मादी जनन करायला असमर्थ असते. नविन नराने दुसर्‍या नराची पिल्ले मारल्यावर लवकरच ती जननक्षम होते आणि नविन, जास्त ताकदवान नराचा, वंश वाढवायला लायक होते.

२. नवजात भावंडांमध्ये (सिबलिंग्ज) अन्नासाठीची स्पर्धा कमी करण्यासाठी हत्या होते. याचा एक महत्वाचा नैसर्गिक फायदा म्हणजे नविन पैदाशीतली निर्बल पिले नसल्याने मोजकेच असलेले सर्व अन्न सबल पिलांना मिळून पुढची पिढी बलवान राहते.

वरील दोन्ही प्रकारचा संहार त्या प्राणीजमातीचा समूळ नाश करत नाही. उलट हे त्या जाती मानवी हस्तक्षेपाच्या अगोदर करोडो वर्षे तगून होत्या यावरून सिद्ध होते. किंबहुना हा संहार पुढची पिढी अधिक सबळ ठेवण्याच्या नैसर्गिक तरतूदीचे काम करते.

या धाग्यात "प्राणीजमातीचा होत असलेला समूळ संहार" हा मुख्य मुद्दा असल्याने अवांतर टाळण्यासाठी मी येथे तेवढ्या खोलात गेलो नव्हतो.

प्यारे१'s picture

21 Sep 2014 - 7:51 pm | प्यारे१

खूप छान माहितीपूर्ण लेख.
स्वॅप्स ह्यांचं कौतुक आणि संपादक मंडळाचे प्रतिसादाला लेखरुपानं स्वतंत्रपणं प्रकाशित केल्याबद्दल आभार.

अवांतरः बव्हंशी ;) शाकाहारी झाल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करुन घेतो.

एस's picture

21 Sep 2014 - 9:02 pm | एस

तुमचे आमच्याकडूनपण अभिनंदन बरं का! :-)

विलासराव's picture

23 Sep 2014 - 7:22 pm | विलासराव

मस्त माहितीपुर्ण लेख.

माझंपण अभिनंदन झालंच पाहीजे. साडेतीन वर्षांपासुनचा शाकाहारी म्हणुन.

दशानन's picture

21 Sep 2014 - 9:36 pm | दशानन

सुरेख लेख!
अत्यंत माहितीपूर्ण व सखोल अभ्यास करून लिहिलेला.

शिद's picture

24 Sep 2014 - 1:47 pm | शिद

+१

मानवी क्रुरतेचा हा असला बेजबाबदार व किळसवाणा खेळ पाहिल्यावर आपण स्वताला 'निसर्गातला सर्वात बुद्धिमान प्राणी' कसे काय म्हणवून घेउ शकतो ?? स्वताला तसे म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार माणसाला आहे का ?? गरज नसतानासुद्धा इतर प्राण्यांचा जगण्याचा नैसर्गिक हक्क हिरावून घेणे हे कुठल्या 'नैसर्गिक न्यायात' बसते याचा विचार व्हायलाच हवा. यावर अधिक चर्चा व्हावी.

धन्यवाद स्वॅप्स, अप्रतिम लेख...!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

माणुस निसर्गातला सर्वात बुद्धीमान प्राणी आहे यात काहीही शंका नाही... मात्र तो त्याच्या बुद्धीचा उपयोग बहुतेक वेळी सारासार विवेकाने करण्याऐवजी अंध स्वार्थासाठी करतो हीच शोकांतिका आहे.

एस's picture

22 Sep 2014 - 5:41 pm | एस

आणि तो स्वार्थही फारच संकुचित, बेगडा आणि अल्पजीवी असतो हे मूळ दुखणे आहे.

प्रचेतस's picture

22 Sep 2014 - 8:28 am | प्रचेतस

धन्यवाद स्वॅप्स ह्या लेखाबद्दल.

पिवळा डांबिस's picture

22 Sep 2014 - 10:47 am | पिवळा डांबिस

वीस हजारांहून अधिक सभासद असलेल्या मिपाकरांपैकी दोन-चार अपवाद सोडले (तेही निश्चित विदा नाही म्हणून) तर कोणी स्वतः शिकार करत असतील असं वाटत नाही...
तर मग तुमचं प्रतिपादन तरी काय आहे?

एस's picture

22 Sep 2014 - 11:15 am | एस

ओ पिडांकाका, इथल्या 'बोक्यां'ना विसरलात काय? ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

छ्या, छ्या ! मिपावर लई "एकांडे" आणि "टोळीबाज (तेला हितं कंपू म्हंत्यात)" तरबेज शिकारी हैत... त्यात "कहीपे निगाहे कहीपे निशाना" स्टाईल विडबन्जिल्बीवाले कसलेले शिकारी ही तर मिपाची लैच खास (आणची आम्ची आव्डती) पेशालिटी हाय ! ;) :)

मदनबाण's picture

22 Sep 2014 - 4:29 pm | मदनबाण

माणसा सारखा स्वार्थी आणि कॄतघ्न दुसरा प्राणी या भूतलावर शोधुनही सापडणार नाही !
पुढच्या पिढ्यांना फक्त फोटो आणि डिव्हीड उपलब्ध राहतील की काय अशी भिती वाटते! :( मनुष्य प्राण्याची प्रजा मात्र फारच वाढत चालली आहे, आपल देश सुद्धा या प्राण्यांच्या संख्येत पुढे आहे त्यामुळे या प्राण्याचे जीवन सुद्धा सध्याच्या काळात तणाव ग्रस्त झाले आहे. :( हल्ली या मोकाट सुटलेल्या प्राण्याच्या वागण्याचा मला तिटकारा येउ लागला आहे. :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

एस's picture

22 Sep 2014 - 4:39 pm | एस

इस्पीकचा एक्का, सुबोध खरे, प्यारे१, दशानन, विनोद१८, वल्ली, पिवळा डांबिस, मदनबाण आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

सस्नेह's picture

22 Sep 2014 - 4:46 pm | सस्नेह

मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे.
शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

एस's picture

22 Sep 2014 - 5:12 pm | एस

मानवी हस्तक्षेपाचा अगदी अजाणतेपणानेही कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बेटांवर जेव्हा युरोपियन वसाहतवाद्यांनी पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी आणलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींमुळे तिथल्या मूळ पर्यावरणातील जैववैविध्याची प्रचंड हानी झाली.

http://www.teara.govt.nz/en/human-effects-on-the-environment/page-3

तिथल्या नैसर्गिक वृक्षांच्या वनांची कत्तल करून पाईनवृक्षाची लागवड केली गेली. तळी आणि दलदलींच्या प्रदेशांवर भर घालून बुजवण्यात आली.

Coastal sand dune habitats have been altered dramatically, with native plants like pīngao (Desmoschoenus spiralis) being replaced by marram grass (Ammophila arenaria) and tree lupin (Lupinus arboreus). Herbaceous hawkweeds (Hieracium species) have taken over some grasslands, reducing them to wasteland, and are spreading into forests and along creeks.

न्यूझीलंड सी लायन आणि व्हेलसारख्या स्थानिक सस्तन प्रजातींची कत्तल तर झालीच, पण डुकरे, कुत्री आणि मांजरांसारख्या बाहेरून आणलेल्या प्राण्यांमुळे तिथल्या अपृष्ठवंशीय आणि सरपटणार्‍या प्राण्यांवर, पक्ष्यांवर भयानक परिणाम झाला.

Since the late 1700s, 54 more mammal species have been brought to New Zealand. Nineteen of these, including two devastating predators (the Indian grey mongoose and the North American raccoon) did not become established in the wild. However, 11 predators successfully became naturalised: three more rodents; three mustelids (ferrets, stoats and weasels); pigs, hedgehogs, possums, dogs and cats. These have had a massive impact on the remaining native birds, invertebrates and reptiles. Forty out of a total 91 land birds are now extinct, with many others in serious decline.

असेच एक उदाहरण म्हणजे मॉरिशस बेटावरील डोडो हा उडता न येणारा पक्षी. ह्याबद्दल वरच्या यादीत दुवा दिलाच आहे.

सस्नेह's picture

22 Sep 2014 - 5:38 pm | सस्नेह

पर्यावरणाचा पिरॅमिड आणि त्याचा बॅलन्स हा खरोखर एक इंटरेस्टिंग विषय आहे.

सस्नेह's picture

22 Sep 2014 - 4:50 pm | सस्नेह

मानवाने पर्यावरणावर अमर्याद आक्रमण केले आहे आणि त्याची फळे ग्रीन हाउस इफेक्टच्या रूपाने तो भोगतो आहे.
शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 2:31 pm | प्रसाद१९७१

शिकारीबरोबरच औद्योगीकरण, जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण हेही दुर्मिळ जमाती नामशेष होण्याचे कारण आहे.>>>>>

एकतर हा अभिनवेश सोडुन द्या की मानवाचे अस्तित्व बाकीच्या प्रजाती नामशेष होऊ न देण्यासाठी आहे. एकुणच सर्व सजीव सृष्टीची निर्मीती ही कुठलाही हेतू समोर ठेवुन झालेली नाही. प्राणी तयार होयच्या आधी पण ही सॄष्टी होती आणि सर्व नष्ट झाले तरी ही सृष्टी असणारच आहे.

अगदी साधी हत्यारे असणारा मानव सुद्धा गेल्या ४-५ हजार वर्षातला आहे. प्राण्यांच्या करोडो प्रजाती तयार झाल्या आणि करोडो नष्ट झाल्या.
वाघ नष्ट झाले, साप नष्ट झाले तरी मानवाला काही फरक पडत नाही. गेल्या शंभर वर्षात वाघांची संख्या १% पण राहीली नाही, काय फरक पडला.
हा फक्त स्मरण रंजन वाद आहे.

माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद. माणूस जे करतो तसेच करणार्‍या अजूनही काही प्राणीजाती असाव्यात. पण माणसाचा दिमाग लै पावरफुल पडल्याने त्याच्या प्रत्येक कृतीला लय धार आली. याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.

एस's picture

22 Sep 2014 - 7:36 pm | एस

याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.

हेच तर आपल्यातल्या काही स्वार्थी लोकांना मान्य करायला जड जातेय.

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 12:37 pm | प्रसाद१९७१

झाल्या काही प्रजाती नष्ट, मग काय नुकसान झाले. माणुस नव्हता तेंव्हा ही लाखो प्रजाती नष्ट झाल्या आणि नविन निर्माण झाल्या.
नाही आता डोडो पक्षी दिसत, तर काय हरकत आहे.

ह्या पर्यावरण वाद्यांचा कंटाळा आलाय

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 1:05 pm | टवाळ कार्टा

:(

एस's picture

23 Sep 2014 - 2:54 pm | एस

मोबाइलवर जास्त टंकू शकत नाही तरी अगदी थोडक्यात फक्त मुद्दे मांडतो.

१. उत्क्रांतीच्या ओघात अनेक प्रजाती नष्ट झाल्या, पण त्यामागे नैसर्गिक कारणे होती. उदा. हिमयुग, उल्कावर्षाव, प्रबळ भक्षकांपुढे आणि खाद्य मिळवण्याच्या स्पर्धेत टिकाव धरता न येणे, बदलत्या परिस्थितीत स्वतःमध्ये बदल करता न येणे इ.
२. ही प्रक्रिया अतिशय सावकाश घडते. मानवी हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेचा वेग लाखोहजारो पटींने वाढला.
३. उत्क्रांतीचा फायदा असा की स्पर्धा एकांगी नसते. कमकुवत जीव नष्ट होतात तर सबल जीव टिकतात.
४. मानवाकडून इतर प्रजातींच्या होणार्‍या कत्तलीत सरसकटपणा असल्याने त्याचा मास अ‍ॅण्ड रॅपिड एक्स्टिंक्शनसारखा परिणाम होतो.
५. यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते.
६. मानवाचे अस्तित्त्व पर्यावरणाच्या संतुलनाशी इतके अविभाज्यपणे जोडले गेले आहे की पर्यावरणाची थोडीशी हानीसुद्धा आपल्याच पायावर मारून घेतलेली कुर्‍हाड ठरते.
७. नुकसान करणारे थोडेचजण असतात. पण त्याची फळे सर्वांनाच भोगायला लागतात.

सविस्तर प्रतिसाद नक्कीच लिहीन. तूर्तास इत्यलम...

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 4:18 pm | प्रसाद१९७१

पर्यावरणाचे नुकसान होते म्हणजे
तुमच्या डो़क्यात पर्यावरण म्हणजे जे आत्ता किंवा ५०-१०० वर्षा पूर्वी होते तेच खरे आणि बरोबर पर्यावरण आहे अशी काही कल्पना आहे.
पर्यावरण पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होते आणि जर पुढे आण्विक युद्ध झाले तरी असणार आहे.
पर्यावरणाचे कशानीच नुकसान वगैरे होत नाही. पर्यावरण फक्त असते.

प्रजाती नष्ट झाल्या म्ह्णुन माणसाला काही फरक पडत नाही. तुम्ही नॉस्टालजिक होऊन तुम्हाला आवडते तेच पर्यावरण चांगले असा हेकट स्टँड घेताय.

खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल.
खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही.
एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

एस's picture

23 Sep 2014 - 5:40 pm | एस

अजून कायकाय आक्षेप आहेत ते सांगा म्हणजे एकदमच परामर्ष घेता येईल.

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 6:44 pm | प्रसाद१९७१

तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप. त्याबद्दल मी लिहीलेच आहे.

दुसरा आक्षेप - पर्यावरण वादी ( विषेश करुन भारतातले ) हे भोंगळ, स्वार्थी, प्रसिद्धीलोलुप, स्वताच्या तुमड्या भरणारे, स्वता: सर्व गोष्टी एंजॉय करुन दुसर्‍यांनी गिल्ट देणारे, सर्व गोष्टीत काड्या घालणारे, दुकान चालवणारे, चुकीचा डाटा देणारे, खोटा डाटा देणारे, बागुलबुवा दाखवणारे, कुठल्या तरी राजकीय पक्षाचे/कंपनीचे एजंट, सत्याचा विपर्यास करणारे , फुकटे असतात.

काउबॉय's picture

23 Sep 2014 - 6:55 pm | काउबॉय

बहुतांश सहमत. दुसर्या आक्षेपावर.

एस's picture

23 Sep 2014 - 7:12 pm | एस

तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेप

माझा लेख नेमक्या कोणत्या गृहीतकावर आधारलेला आहे असे तुम्हांला वाटते?

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 7:39 pm | प्रसाद१९७१

१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल.

२. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही.

३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार.

४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या.

५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे.

ताकः मी शाकाहारी आहे, मला स्वताला प्राणी मारुन खाणे जमत नाही. पण हे प्रजाती नष्ट होणे वगैरे पटत नाही

मुळात मी हा लेख स्वतंत्र असा लिहिला नव्हता. तो दुसर्‍या एका लेखावर दिलेला प्रतिसाद होता. मला स्वतंत्र लेख लिहायचा असता तर तो काही भागांमध्ये आणि अतिशय विस्तृतपणे, सर्व संदर्भांसहीत लिहिला असता. तसे नसल्यामुळे ह्या लेखात काही त्रुटी राहिल्या आहेत ज्यामुळे तुमचा माझ्याबद्दल काहीसा पूर्वग्रह निर्माण झाला आहे. राहिलेल्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे माझे पर्यावरण वि. विकास ह्या मुद्द्यावर काय मत आहे. तसेच मी रॅशनल इकॉलॉजिस्ट आहे की नाही, दुसर्‍या शब्दांत माझा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन डोळस आहे की नाही. लोकसंख्यावाढ हे फार गंभीर कारण आहे आणि त्याविषयी लेखात काहीच लिहिलेले नाही. ह्या आणि तुम्ही वर आजच्या पर्यावरणवाद्यांच्या दुटप्पीपणाच्या अनुभवावर जसे म्हणता आहात त्या काही कारणांनी कदाचित मीही काही मुद्दे मुद्दाम टाळत असेल आणि सोयीस्कर भूमिकाच तेवढी घेत असेल असा आपला माझ्याबद्दल ग्रह झाला असावा.

ह्यातील सर्वच मुद्द्यांवर मला वेळेअभावी बोलता येणार नाही, पण आधी कृपया तो पूर्वग्रह मनातून काढून टाका अशी विनंती करतो.

आता वरील प्रतिसादातील मुद्द्यांकडे वळूयात:

१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल.

>>>प्रजातींच्या परस्परसंबंधातील अचानक आणि फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या बदलांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते, उत्क्रांतीतील जो प्रजातींचा र्‍हास होत असतो त्याचा वेग अतिशय म्हणजे अतिशय, काही लाख-कोटी वर्षांच्या कालावधीत घडत असतो. मानवाने केलेल्या बेकायदा आणि अनिर्बंध शिकारीमुळे प्रजाती नष्ट होण्याचा कालखंड हा लाखो वर्षांवरून काही दशकांवर येऊन ठेपला आहे. इतक्या बेसुमार र्‍हासाची भरपाई नवीन प्रजातींच्या रूपाने पर्यावरण करू शकत नाही कारण उत्क्रांती हे एकमेव साधन त्यासाठी उपलब्ध आहे. मानव हा प्रजाती मारू शकतो, नव्याने निर्माण करण्याइतपत अजून त्याची प्रगती झालेली नाही. पर्यावरण नेहमीच बदलणार, पण त्यातला बदल करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य मानवाने स्वतःच्या हाती घेऊ नये. शेदीडशे वर्षांपूर्वीचेच पर्यावरण मला हवे आहे असे म्हणणे प्रॅक्टीकली शक्य नाहीच. तसे माझे म्हणणेही नाही.

२. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही.

>>>चूक. जोपर्यंत मानवाची लोकसंख्या अतिशय लहान होती आणि शेतीसारख्या उत्पादनक्रियेचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत अन्न मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या शिकारीत आणि वाघ/डायनॅसोर आदींनी केलेल्या शिकारीत फरक नव्हता. मध्य भारतातील एका संस्थानिकाने गेल्या शतकाच्या सुरूवातीला तब्बल १४०० च्या आसपास वाघ केवळ शिकारीच्या हौसेखातर मारले. ह्याचे समर्थन तुम्ही कसे कराल?

३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार.

पिरॅमिड नष्ट/निर्माण होण्याचा वेग हा निसर्गनियंत्रित जोपर्यंत आहे तोपर्यंत हा युक्तिवाद ठीक आहे. वरती म्हटल्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शनचे तत्त्व ज्यात अंतर्भूत नाही अशा बेसुमार कृत्रिम कत्तलीतून केवळ सर्वंकष विनाशच मानवाच्याही वाट्याला येईल. मानव आहेच आणि राहणार हा दंभही अशाच गैरसमजुतीतून आलेला आहे. मानवाच्या जगण्याची सर्व साधने ही अंतिमतः निसर्गावरच अवलंबून आहेत. निसर्ग नसेल तर मानव कुठे जाणार?

४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या.

>>>जैवविविधतेचे काहीएक प्रयोजन नाही असे तुम्हांला थोडक्यात म्हणायचे आहे. हा समज चुकीचा आहे. जितकी जैवविविधता जास्त तितका नैसर्गिक निवडीला स्कोप जास्त असतो आणि एकूणच जीवसृष्टी तगून राहण्यासाठी जैवविविधता जितकी जास्त असेल तितकी ती शक्यता जास्त असते हे विविध सांख्यिकी आणि शास्त्रीय मॉडेलनी सिद्ध झालेले आहे.

५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे.

दुर्दैवाने सहमत. एकीकडे वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारी नैसर्गिक संसाधने अपुरी पडू लागलेली आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसंख्यावाढीचा वेग अगदीच ऋणात्मक होणेही त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू मृत्युपंथावर नेते हा एक गुंतागुंतीचा पॅराडॉक्स आहे आणि ते गणित सोडवणे, योग्य मेळ घालणे तितके सहजसोपे नाही. गेली कित्येक वर्षे मी यावर विचारमंथन करतो आहे पण यावर कुठलाच रामबाण उपाय नाही अशा निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. लोकसंख्या आहे त्यापेक्षा कमी करण्याला खूप सामाजिक-राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय मर्यादा आहेत ज्यांची विस्तृत चर्चा इथे शक्य नाही. सध्यातरी आहे तो इकोबॅलन्स टिकवून ठेवणे इतकेच आपल्या हाती आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 9:07 pm | टवाळ कार्टा

आणि मानवांची लोकसंख्या वाढल्यावर काय होते त्याचा हा पुरावा

एस's picture

23 Sep 2014 - 11:22 pm | एस

मला नाही वाटत डोळ्यांवर झापडे बांधलेले हे मान्य करतील. अगदी सखोल, काटेकोर संशोधनातून पुढे आणलेल्या शास्त्रीय पुराव्यांनाही 'हे असं काही घडतच नसतं, तुम्ही अमुकतमुकचे हस्तक आहात, दुटप्पी आहात' वगैरे पद्धतींच्या दाव्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. असोत. गोबेल्सनीती. ...ठासून बोला!

प्रचेतस's picture

23 Sep 2014 - 9:44 pm | प्रचेतस

प्रतिसाद आवडला.

सनी स्॓आस's picture

23 Sep 2014 - 9:27 pm | सनी स्॓आस

दुसऱ्या आक्षेपावर १००% सहमत

एस's picture

23 Sep 2014 - 11:47 pm | एस

तुम्ही ह्याची काही उदाहरणे देऊ शकाल काय? सरसकट सर्वच पर्यावरणवाद्यांना महाचोर ठरवून मोकळे होणे योग्य तर नाहीच, तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय असाही लोकांचा भ्रम होऊ शकेल.

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 2:19 pm | प्रसाद१९७१

ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे>>>>>>
हे विधान कुठल्या जोरावर. समजा जर कोणी तसे करतच असेल तर तो गुन्हा असे तुम्हीच ठरवणार. ही तर हुकुमशाही झाली.

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 2:23 pm | प्रसाद१९७१

मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे >>>>>>>
असे का हो? मग ह्याचे काय उत्तर
१. मांजर उंदराला खेळवुन खेळवुन मारते. हा मनोरंजनाचा प्रकार नाही का?
२. सिंह , वाघ किंवा सर्वच प्राणी स्वता पेक्षा दुबळ्या आणि संरक्षण करु न शकणार्‍या प्राण्यांना मारतात हे कसे काय चालते तुम्हाला? तुम्ही असे का नाही म्हणत, "वाघा तुला अन्नच पाहीजे असेल तर दुसर्‍या वाघालाच मारुन खा. हरिणाची पिल्ले मारुन खाणे हे घृणास्पद आहे."

एस's picture

23 Sep 2014 - 8:47 pm | एस

वर दिलेला माझा हा प्रतिसाद वाचा.

http://misalpav.com/comment/614715#comment-614715

ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते.

माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.

मग कसा बरं फरक नाही?

जेपी's picture

23 Sep 2014 - 2:33 pm | जेपी

लेख आवडला.

काव्यान्जलि's picture

23 Sep 2014 - 2:55 pm | काव्यान्जलि

खूप छान आणि माहितीपूर्ण लेख …
मी तर शाकाहारीच आहे बाबा

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 4:19 pm | प्रसाद१९७१

खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे असे पर्यावरण पाहीजे असेल तर मानवाची लोकसंख्या वाढ थांववावी लागेल आणि आहे त्याच्या ती १/४ तरी करावी लागेल.
खर्‍या पर्यावरण प्रेमींनी त्याच्या कडे लक्ष द्यावे. पण ती गोष्ट ग्लॅमरस नसल्यानी त्यात कोणाला इंटरेस्ट नाही.
एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत जाणार, मग त्याचा साईड इफेक्ट म्हणुन जंगले कमी होणारच.

पैसा's picture

23 Sep 2014 - 10:24 pm | पैसा

लेख आवडला. प्रतिसादाचा लेख केल्यामुळे काही मुद्दे राहिले आहेत हे खरे असले तरी आहेत तेही पुरेसे आहेत. दुर्दैवाने कोणतेही सरकार पर्यावरणाच्या बाबत संवेदनाशीलतेने वागत नाही. त्यांना फक्त तात्कालिक फायद्यासाठी खाणसम्राटांना लीज देण्यात रस असतो. जंगले आणि वाघांचां कोणाला काय पडलंय? कागदोपत्री शिकारीवर बंदी आहे, पण मध्यंतरी गोयात एक पट्टेरी वाघ मारला तो एका मोठ्या राजकीय पुढार्‍याच्या घरी नेल्याचे फोटो लोकानी मोबाईलवर काढले होते. :(

एस's picture

25 Sep 2014 - 12:04 pm | एस

गोलाबारूद खतम हो गया क्या? धागा इतक्या लवकर थंड पडेल असं वाटलं नव्हतं. :-)

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 12:49 pm | टवाळ कार्टा

नै मियां...मैं तो कबसे तैय्यारीच बैठा है...कोई आताईच्च नै ;)

एस's picture

25 Sep 2014 - 12:59 pm | एस

:-) )

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 2:27 pm | प्रसाद१९७१

तुमची मते काही बदलणार नाहीत. वाघ नाहीसे झाल्यामुळे मानव जातीचे नुकसान होणार/झाले आहे असल्या सिद्ध न झालेल्या गोष्टी तुम्ही बोलत रहाणार. मग मी काय बोलणार?

मी तुमच्या प्रतिसादाला दिलेल्या
http://misalpav.com/comment/615484#comment-615484
ह्या उत्तरावर तुमचे काय म्हणणे आहे हे आधी सांगता का? वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:22 pm | प्रसाद१९७१

अहो वाघ कधीच नष्ट झाले. गेल्या ५०-७० वर्षात वाघाचा पर्यावरणावरचा आणि बाकी प्राणीजगतावरचा प्रभाव पूर्ण संपला आहे.
मानवावर काही परीणाम झाला का?
ह्याच ५० वर्षात भारतातल्या मानवाचे आयुष्यमान वाढले, रहाणीमान सुधारले. मानवजातीचे काय नुकसान झाले?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:29 pm | प्रसाद१९७१

वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?

नक्की बदलीन. पण तुम्ही जे काही वाईट परिणाम झाले ते वाघ नष्ट झाल्यामुळेच झाले हे सिद्ध करायला पाहीजे.

एस's picture

25 Sep 2014 - 5:18 pm | एस

आधी त्या प्रतिसादाबद्दल बोला. मुद्द्यांना बगल देऊ नका.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:25 pm | प्रसाद१९७१

कुठले मुद्धे सोडले मी. काही राहीले असेल तर परत लिहा.

एस's picture

25 Sep 2014 - 5:33 pm | एस

तुम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर दिलेत आणि मी मांडलेली कारणमीमांसा खोडून काढलीत तर माझा तसा समज होणार नाही पुन्हा.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:35 pm | प्रसाद१९७१

तुम्ही बेधडक विधाने फक्त करत आहात. कारण मिमांसा कुठेच नाही. सिद्धता कुठेच नाही.

एस's picture

25 Sep 2014 - 5:39 pm | एस

हे तर मी तुमच्या प्रतिसादांच्या बाबतीत म्हणायला हवे.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 6:18 pm | प्रसाद१९७१

गेल्या १०० वर्षात वाघ आणि बाकी अनेक प्रजाती भारतातुन नष्ट झाल्या तरी अन्नधान्य उत्पन्न वाढले, आयुर्मयादा वाढली. हीच सिद्धता आहे की वाघ संपले तरी काही फरक पडत नाही.

ही तात्पुरती सूज आहे. पर्यावरण विनाशाचे दुष्परिणाम शेवटी मानवाच्याही अस्तित्त्वावर घाला घालणार हे निश्चित.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 6:31 pm | प्रसाद१९७१

घालू दे की काय घाला घालायचा तो १००० वर्षानी. म्हणुन आत्तच्या माणसांनी वाघांच्या हातुन मरायचे का?

तसे ही जेंव्हा पर्यावरण जर जास्तच बिघडले ( मानवाच्या दृष्टीने )तर मानवाची लोकसंख्या कमी होउन, पुन्हा बॅलंस होइलच ना. पण मानव आता इतका प्रगत झाला आहे की अणुयुद्धा नी स्वताचा शेवट करु शकतो. पण प्रदुषणात सुद्धा मानवजात शिल्लक राहील.

प्रदुषणात सुद्धा मानवजात शिल्लक राहील.

याला म्हणतात झापडे. किती दिवस शिल्लक राहील?

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 9:26 am | प्रसाद१९७१

नक्की राहील. फारच प्रदुषण झाले तर आत्ताच्या ७०० कोटी ऐवजी १० कोटी शिल्लक रहातील पण मानवजात शिल्लक राहील हे नक्की.
आणि लोकसंख्या १० कोटीच उरल्यामुळे पुन्हा जंगले होतील आणि प्रदुषण कमी होईल. की पुन्हा ७०० कोटी होतील.

बादवे तुम्ही तिथे उत्तर द्यावे अशी तुम्हांला पुन्हा एकदा विनंती.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 6:32 pm | प्रसाद१९७१

तिथे कुठे? काय राव चेष्टा करताय?

माझे अन्न कुठुन येत हा तुमचा प्रश्न आहे का? कुठल्या तरी शेतातुन येते. कुठल्या हे माझ्यासाठी महत्वाचे नाही.

एस's picture

25 Sep 2014 - 8:05 pm | एस

तिथे कुठे?

http://misalpav.com/comment/615484#comment-615484

इथे उत्तर द्या. मी जसे दिले आहे तसे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2014 - 6:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा नविन शिकारीसाठी हाकारा की काय !? =))

मदनबाण's picture

25 Sep 2014 - 12:25 pm | मदनबाण

काही दिवसांपूर्वी मी काही बातम्या वाचल्या होत्या, त्या इथे देतो :-
Evidence Suggests World’s Largest Solar Farm Burns Birds That Fly over It
Solar Farms Threaten Birds
California’s new solar power plant is actually a death ray that’s incinerating birds mid-flight

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 2:33 pm | प्रसाद१९७१

बर मग?
काय फरक पडतो?

तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर फार्म बंद करायचा?

तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर फार्म बंद करायचा?
प़क्षी कसे वाचवले जातील त्यावर अधिक भर द्यावा... बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 2:47 pm | प्रसाद१९७१

समजा मेले ते पक्षी तर काय फरक पडतो. तुम्हाला ही बातमी वाचुन वाईट वाटणे सहाजीक च आहे. पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे?

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 2:51 pm | प्यारे१

माणूस जमात संपणं जास्त श्रेयस्कर आहे असं नाही वाटत त्यापेक्षा? हे 'मंद' पशु पक्षी जसं जमेल तसं राहतील तरी. जायच्या वेळी जातीलच.

असहमत. प्राणी पक्षी काय नि माणूस काय, कुणीही संपणे कमीजास्त श्रेयस्कर नाही - जर तत्त्वतः पाहिले तर.
पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:25 pm | प्रसाद१९७१

प्रश्नच नाही. मी माणुस आहे म्हणुन मी माणसांचा विचार करतोय आणि करणार.
१०००० वर्षापूर्वी मानवाकडे काही हत्यारे नव्हती तेंव्हा मानवाची लोकसंख्या १ कोटी पण पार करत नव्हती.
जर हत्यारांचा शोध वेळीच लागला नसता तर मानवजात कदाचित लुप्त झाली असती डोडो सारखी.

काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल

हाडक्या's picture

25 Sep 2014 - 4:33 pm | हाडक्या

हम्म्म..

काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल

असा कधी आधी विचार केला नव्हता.. रोचकच.. :)

(शिकारीचे समर्थन नाहीच पण हा मुद्दा रोचक आहे.)
माणूस विचार करु शकतो म्हणून कदाचित हे एवढे चर्चासत्र सुरु आहे. वाघ कमी होत असताना वाघांनी स्वतःहून काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत स्वतःची प्रजा वाचवायला.
वरून एक वाघ दूसर्‍या नरापासून झालेली म्हणून वाघिणीची इतर पिल्ले जेव्हा मारत सुटतो तेव्हा तो वाघ पण वाघांची संख्या कमी व्हायला तेवढाच दोषीच नाही का?

एस's picture

25 Sep 2014 - 5:16 pm | एस

इएसाहेबांनी दिलेला हा प्रतिसाद वाचा.

http://misalpav.com/comment/614904#comment-614904

त्यातूनही बोध नाही झाला तर बोलूच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2014 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल

झालेले आहेत आणि संपलेले आहेत. त्यांची यादी इथे सापडेल.

पण "होमो सॅपियन सॅपियन" म्हणजे आधुनिक मानवाने (म्हणजे आपण हो !) नवनविन आयुधे (टुल्स) शोधून काढून जो प्राणीसंहार आणि पर्यावरणसंहार केला आहे / करत आहे त्याला या पृथ्वीच्या इतिहासात तोड नाही !

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 5:45 pm | प्यारे१

@ बॅटमॅन,

अहो माणूसच निसर्गव्यवस्था त्याला हवी तशी वाकवतोय ना?
इतर कुठले पशु पक्षी अशी ढवळाढवळ करत आहेत का?
बरं केली तर मग बोंबा मारण्यापेक्षा तुलनेनं माणूस जमात संपलेली बरी असं म्हणतो आहे.

एनीवेज धिस इज ऑल अबाऊट इफ्स अ‍ॅण्ड बट्स.

>>> पण मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे. संपला विषय.

संपला विषय. हे बरोबरच आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2014 - 7:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे.

मुख्य मुद्दा हाच आहे ! केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण असा नाही आणि नकोच.

कारण, तसे म्हणणार्‍यांकडून आणि तशी समजूत ठेवणार्‍यांकडून खरे तर मूळ मुद्द्याचा विपर्यास होतो.

माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे.

करोडो वर्षांच्या निसर्गाच्या क्रिया-प्रतिक्रियेतून जो परिणाम साधला गेला आहे त्याचा मानवाला मानव बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्या परिणामात मानवाच्या मेंदूच्या ताकदीने तयार झालेल्या साधनांचा उपयोग सुरू होण्याअगोदर आणि विषेशतः खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वीचा मानवाचा सहभाग बराचसा नैसर्गिकरित्या नियंत्रित होता. त्यामुळे "संहार आणि पुर्निर्माण" या चक्रात निसर्गाला सावरायला पुरेसा वेळ मिळत होता.

भाल्याच्या उपयोगाने मानवाने मॅमथ संपवले. त्यातले बहुतेक मांसापेक्षा त्याचे दात आणि हाडांसाठी मारलेले असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. एका बंदूकीने एक माणूस जेव्हा डझनावारी प्रजननक्षम प्राणी काही दिवसांत मारतो तेव्हा कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक क्षमता तेवढ्या वेळात तेवढ्या संख्येने नविन प्राण्यांना जन्म देउन त्यांना प्रजननक्षम बनवण्याइतकी प्रबळ नसल्याने ती प्राणीजात संहाराच्या दिशेने जाते.

हेच समीकरण जंगलतोडीला लागू पडते. तयार व्हायला शेकडो-हजारो वर्षे लागलेले जंगल आधुनीक साधने वापरून मानव काही वर्षांत / दशकांत ऊजाड करू शकतो / करत आला आहे... बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत. मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे आणि तेथे मुख्यतः निलगिरी सारखी सहजासहजी आग्नीच्या भक्षस्थानी न पडणारी झाडेच का आहेत याबाबत जे पुरावे समोर आले आहेत / येत आहेत तेही रोचक ठरावे.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 9:33 am | प्रसाद१९७१

माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे

मी कुठे म्हणतोय की एकांडा जगु शकेल. आत्ता १० लाख प्रजाती असतील. समजा त्यातल्या १ लाख शिल्लक राहील्या तर मानव एकटा कुठे रहाणार आहे.

बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत.

असे काय पुरावे सापडले आहेत? तुम्हाला काय म्हणायचे की थर चे वाळवंट जंगल तोडीमुळे तयार झाले?

मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे

ह्याचे काही पुरावे आहेत का? ऑस्ट्रेलिया मधे १७ व्या शतका पर्यंत काही लाखांची पण लोक वस्ती नव्हती. त्या लोकांनी सगले जंगल तोडले असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग टास्मानियात इतके प्रचंड जंगल कसे शिल्लक राहीले?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2014 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडे वाचन वाढवा. सगळेच पुरावे तुमच्यासाठी शोधून आणायला (आणि त्यातली खुसपटे परत नीट करायला) वेळ नाही... पण अगदी आंतरजालावरही ते सर्व आहेत, तेव्हा स्वतः खात्री करून घेऊ शकाल. वेळ आणि श्रम करावे लागतील, पण त्याशिवाय नविन ज्ञान आणि विचार मिळत नाही... निदान मिळालेले बहुदा पटत नाही :)

शिवाय केवळ एक मुद्दा पकडून त्याची केवळ स्वतःच्या समजूतीने साल काढण्याऐवजी कोणत्याही प्रश्नाचा त्याबद्दल जगात इतर काय पुरावे आहेत ते सारासार विवेकाने पडताळून मगच मत लिहीले तर जास्त फायद्याचे होईल असे वाटते.

असो, जगातल्या सर्वांचे मत बदलणे हा माझ्या जीवनाच उद्देश नाही. मी काही मुद्दे दिले आहेत... त्याचा उपयोग करून स्वसंशोधन करु शकता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण पर्यावरणाचे अतीसमर्थक जितके एकांगी विचार करतात तेवढाच एकांगी विचार त्याचे अतीविरोधकही करतात असा अनुभव आहे.

माझ्या मते... "कोणतीही किंंमत देऊन पर्यावरणासाठी पर्यावरण वाचवा" हे योग्य नाही तर "माणसाच्या भल्यासाठी आवश्यक तेवढे पर्यावरण योग्य किंमत देऊन वाचवा" हे जास्त योग्य आहे. पण, हा दुसरा पर्यायही नैसर्गिकपणे आपोआप होणारी घटना नाही... कारण माणसाचा पर्यावरणातील सद्याचा हस्तक्षेप ही आपोआप होणारी नैसर्गिक घटना नाही.

असो.

पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा त्यांची पूर्ण प्रजाती नष्ट झाली असेल तर तुमच्या मुला नातवंडांना काय फरक पडणार आहे?
त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ? बाकी तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाहीत ? ते आधी द्या पाहु.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:09 pm | प्रसाद१९७१

त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ?

असे कसे, तुमच्या खापर पणजोबांच्या वेळी हजारो वाघ होते, आता ते नाहीत. तुम्हाला ( तुमच्या पिढीला ) काय फरक पडला?
आता डोडो नाही, मॅमथ नाही तुम्हा/आम्हाला काय फरक पडला?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:07 pm | प्रसाद१९७१

बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे काय

हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत.

पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे.
मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे.
साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

एस's picture

25 Sep 2014 - 3:22 pm | एस

हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत.

पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे.
मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्‍या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे.
साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

वर मला कुणीतरी हेकट म्हणालं होतं. तुम्हीच होतातना?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:26 pm | प्रसाद१९७१

माझ्या हेकटपणाचा दुसर्‍या मानवाला त्रास होत नाही :-)

एस's picture

25 Sep 2014 - 5:11 pm | एस

अभ्यास वाढवा. अशाच काही थोड्या हेकट माणसांमुळे आक्ख्या सृष्टीलाच त्रास होतोय.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:18 pm | प्रसाद१९७१

कुठला त्रास हो, काहीतरीच. काही त्रास वगैरे होत नाहीये सृष्टीला.
तुमच्या मनात जे सृष्टीचे चित्र असेल त्याला होत असेल त्रास पण सृष्टी ही पृथ्वी जन्माला आली तेंव्हा पण होती आणि पृथ्वी सूर्य गिळंकृत करेल तो पर्यंत असेल. त्यात कधी जीवन असते कधी नसते.

मानवपण त्याच जीवनाचा भाग आहे की नाही?