आदि कैलास, ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - ११

खुशि's picture
खुशि in भटकंती
7 Sep 2014 - 5:05 pm

बारावा दिवस. १४ किमीवरील जॉलिंगकाँग; म्हणजेच आदिकैलास-पार्वती सरोवर. उंची १५,७०० फूट. आधी चहा, नंतर बोर्नव्हीटा आणि आलूपराठ्यांचा नाश्ता करून सहा वाजता निघालो यात्रेच्या सांगतेकडे. वाटेत दोन ग्लेशियर पार करावे लागले, पण आता आम्ही अनुभवाने शहाणे झालो होतो. अगदी सहज पार झालो. कठीण चढ-उतार आहेत, पण फुलांच्या गालिच्यांचे सान्निध्य थकवा जाणवू देत नाही. पहाडाच्या भिंतींवर छोटी छोटी बिळे बनलेली पांडेजीनी दाखवली. जोरात वारा वाहतो, त्याच्या घर्षणाने अशी बिळे तयार होतात, असे म्हणाले पांडेजी. या बिळांमध्ये पक्षी घरटी बनवतात. आम्हांला त्या बिळांतून ये-जा करणारे चिमुकले पक्षीगण बघायला मिळाले. या मार्गात मोठे मोठे वृक्ष नाहीत. निरनिराळ्या रंगांची छोट्यामोठ्या फुलांची झुडुपे, उदाची झुडुपे, संजीवनी बूटीची झुडुपे निसर्गदेवतेला सजविण्याची आपली जबाबदारी पार पाडत असतात. थोड्याफार म्हणजे फक्त २००० खडांज्या चढाव्या लागल्या. मध्येमध्ये दाट, पाऊल बुडेल इतक्या मऊ हिरव्यागार मखमली हिरवळीच्या गालिचावरून चालताना थकलेल्या पावलांना आराम मिळवून देत होता. सहा/सात तासांचा प्रवास करून पोहोचण्याआधी २ किमी. आजही इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस स्वागताला हजर होते. चहापाणी घेतले आणि कॅम्पवर पोहोचलो. मौसम खराब झाला होता, आकाश ढगांनी झाकून टाकले होते, कैलास दर्शन कसे होणार?

स्वयंपाक तयार झाला. तंबूसमोर भोजनासाठी बसलो. सैनिक थाळी घेऊन आले. आणेपर्यंत सारे पदार्थ एकदम थंडगार होऊन गेले. भूक लागली होती म्हणून कसेबसे घशाखाली उतरवले. थंडी खूपच वाढली होती. त्यामुळे दुलई पांघरून गुडूप झालो. आमच्यागाठी काही पूर्वपुण्याई होती. मौसम बदलला; स्वच्छ ऊन पडले. आकाश गडद निळाईने झगमगू लागले. उत्साहाने सर्वजण तयार झालो. कँपपासून अगदी जवळ आदिकैलास पर्वत आहे. गेलो, आणि पुन्हा एकदा जिवाशिवाची भेट झाली. समोर सोनेरी उन्हात बर्फाच्छादित पर्वतशिखरावर ध्यानस्थ भगवान शंकराचे मुखदर्शन होत होते. भव्य कपाळ, त्यावरील भस्माचे पट्टे, तिसरा डोळा, अर्धोन्मिलित नेत्रकमळे, नासिका, ओठ सारे स्पष्ट दिसत होते. पायथ्याशी असलेल्या राक्षसताल मध्ये त्याचे मोहक प्रतिबिंब चमकत होते. साक्षात् शिवदर्शनाने मनुष्यजीवनाचे सार्थक झाले. जीवन कृतार्थ झाले. बम बम भोले, हर हर महादेव, ॐ नमःशिवाय! बाजूलाच दुसर्‍या पर्वताला पहिले तीन उंच शिखरे; मध्ये एक छोटे शिखर मागे दोन उंच शिखरे होती. ते पाच पांडव आणि सहावी द्रौपदी आहेत. महाभारताच्या युद्धानंतर पापक्षालनार्थ परमेश्वराची क्षमाप्रार्थना करण्यासाठी द्रौपदीसह पांडव आले, पण त्यांच्या हातून गुरू आणि बांधवांची हत्या झाली होती. त्यामुळे त्यांना दर्शन द्यायचे नाही म्हणून भगवान तिथून उठून आणखी वर गेले (सध्याचा मोठा कैलास-तिबेट).

बराच वेळ तिथेच खिळून उभे होतो. मग आणखी जवळ जाऊन राक्षसताल पाहिले. खोलवर स्वच्छ नितळ पाण्याचे मोठे सरोवर आहे राक्षसताल. पाण्यावर मावळतीची सूर्यकिरणे अशी चमकत होती की मानों हजारो तारका नृत्य करत होत्या. सौंदर्याची खाण आहे इथे. बहूरत्ना वसुंधरा ही उक्ती येथे सार्थ ठरते.

परतलो कॅम्पवर. छोटेसे हवन केले, आरती केली, साखर-फुटाण्याचा प्रसाद वाटला. रात्री भोजनाची पंगत स्वयंपाकघरातच मांडली, कारण बाहेर थंडीचा प्रचंड कडाका होता. मुगाच्या डाळीची पातळ खिचडी, साजूक तूप, पापड-लोणचे असा भोजन प्रसाद. पण त्याआधी गरम गरम टोमॅटो सूप बटरक्यूब घातलेले. त्यात तळलेल्या टोस्टचे तुकडे, खूपच चविष्ट. भोजनानंतर गाण्याच्या भेंड्या खेळल्या. सैनिकही सामील झाले होते.

तेरावा दिवस. सकाळी स्नान करून चहापाणी, नाश्ता करून पार्वतीसरोवर दर्शन-परिक्रमा करण्यासाठी गेलो. पोहोचायला एक तास लागला. पार्वती सरोवर, स्वच्छ निळे पाणी, त्यात पडलेले निळ्या आकाशाचे प्रतिबिंब, कैलास पर्वत, पार्वती मंदिर, पांडव पर्वत, पार्वती मुकुट पर्वत या सार्‍यांची प्रतिबिंबेही सुंदर दिसत होती. सारा परिसरच अप्रतीम सुंदर. आमच्याबरोबरच्या दोघा-तिघांनी या पार्वती सरोवरात स्नान केले आणि मग असे कुडकुडले की तिथे आधी शेकोटी पेटवून शेकावे लागले. नंतर पार्वतीमाता मंदिरात जाउन पूजा-अर्चा आरती केली. मंदिर अगदी साधेसुधे, पत्र्याचे उतरते छ्प्पर असलेले आहे. मग निघालो परिक्रमेला. सरोवर उजव्या हाताला ठेवून चालू लागलो. एक ग्लेशियर पार केले तर दोनतीन ठिकाणी पाण्याच्या प्रवाहातून जावे लागले. बूट काढून पाण्यात पाय टाकताच पायापासून मस्तकापर्यंत थंड शिरशिरी गेली. दगडधोंड्यांतून कसेतरी पळत प्रवाह पार केले. पाण्यातून बाहेर आल्यावर बसकण मारून पाय कोरडे करीपर्यंत पाय बधीर झाले. चिमटा काढला तरी समजेना. आधी हातावर हात घासून गरम केले आणि मग दोन्ही पावले घासत बसलो. पाय थोडे गरम झाल्यावर लोकरीचे गरम मोजे घालून बूट घातले तरीही जरावेळ चालणे जमतच नव्हते. अशा प्रकारे परिक्रमा पूर्ण करायला पाच तास लागले. कॅम्पवर आल्यावर रुद्राचे हवन केले. पटवर्धन, फडके यांनी रुद्र आणि शिवमहिम्न म्हटले. यात्रेची सांगता झाली.

जाले साधनाचे फळ। संसार झाला सफळ।
निर्गुण ब्रम्ह ते निश्चल। अंतरी बिंबले।।
हिशेब जाला मायेचा। झाला निवाडा तत्त्वांचा।
साध्य होता साधनाचा। ठाव नाही।।
स्वप्नी जे जे देखिले। जागृतीस ते ते उडाले।
सहजची अनिर्वाच्य झाले। बोलता न ये।।
ऐसे हे विवेके जाणावे। प्रत्ययी खुणेसी बाणावे।
जन्म-मृत्यूच्या नावे। शून्याकार।।

_______________

a1

a2

a3

क्रमशः

प्रतिक्रिया

स्वतन्त्र's picture

7 Sep 2014 - 6:19 pm | स्वतन्त्र

कृपया फोटो टाका !

प्लीज कृपया फोटो डकवा अथवा लिंक द्या. तुम्हि जो निसर्ग डोळ्यासमोर उभा करताय तो प्रत्यक्षात तरी बघुदे.

खुशि's picture

8 Sep 2014 - 3:31 pm | खुशि

पिकासा वेब अल्बम-वन्दना परांजपे.

सगळे भाग शांतपणे वाचून काढणार आहे. पण मधे मधे ओझरतं वाचुन जायची ओढ मात्र प्रचंड वाढली आहे.

प्रचेतस's picture

7 Sep 2014 - 8:35 pm | प्रचेतस

लेखमालिका खूप सुरेख आहे.

विनोद१८'s picture

7 Sep 2014 - 11:32 pm | विनोद१८

सगळे भाग वाचुन झाले अतिशय सुंदर ओघवते लिखाण, असेच लिहा.

स्पंदना's picture

8 Sep 2014 - 7:07 am | स्पंदना

वाचतेय हो खुषि ताई.

कविता१९७८'s picture

8 Sep 2014 - 2:13 pm | कविता१९७८

तुम्ही खरंच भाग्यवान आहात , निसर्गाचे निखळ सौंदर्य तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची संधी मिळाली.

कवितानागेश's picture

8 Sep 2014 - 3:14 pm | कवितानागेश

छान.:)

विवेकपटाईत's picture

8 Sep 2014 - 8:34 pm | विवेकपटाईत

सुंदर लिखाण, आणखीन लिहा, वाजून आनंद मिळाला.