आदिकैलास,ओमपर्वतदर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा भाग-१०

खुशि's picture
खुशि in भटकंती
6 Sep 2014 - 8:20 pm

दहावा दिवस, अर्धी यात्रा संपन्न झाली. आता यात्रेच्या दुसर्‍या धेय्याकडे वाटचाल आज वीस कि.मि. चालुन एकदम गुंजी गाठायचे होते. मध्ये कालापानीमध्ये फक्त दुपारचे भोजन घ्यायचे होते. सकाळी दहा वाजता कालापानी मध्ये पोहोचलो. नबिढांग येथुन निघालो तरी सारखे मागे वळून बघत ॐ चे दर्शन घेत होतो, पाय निघतचे नव्हते. पण सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुते तुवा कधी फिरायचे हेच खरे, पुढे जाणेच होते. स्वयंपाक तयार होत होता म्हणून स्नाने उरकुन घेतली. भोजना नंतर निसर्गाचा पुनःप्रत्यय घेत तीन वाजता गुंजीला पोहोचलो.

अकरावा आदिकैलासपतीच्या दर्शनासाठी प्रस्थानाचा दिवस. गुंजी ते कुट्टी २० कि.मि.चा पल्ला उंची १२००० फूट. पहाटे ५-३० ला प्रवासाची सुरवात थोड्या पावसात व कुंद हवेत केली. हवेमुळे चालताना श्वास लागत होता. पहिले पाच कि.मि. फारशी चढण नव्हती पण डोंगराच्या कडेने चालावे लागत होते, खोल दरीत कुट्टी जोशात वाहात होती. तिचे लालसर गढुळ पाणी भितीदायक वाटत होते. थोड्याच वेळात चढण सुरु झाली आणि दाट जंगल सुरु झाले. कुट्टीमैय्याच्या अल्याड-पल्याड भुर्जपत्राची दाट जंगले आहेत. भुर्जपत्र म्हणजे वैदिक कालापासुन आपली पुराणे, वेद वगैरे साहित्य ज्यावर लिहिले गेले ती. भुर्जपत्राच्या व्रुक्षाच्या खोडावरील पातळसाली म्हणजे तो लेखनाचा कागद. हे व्रुक्ष खुप प्रचण्ड आहेत आपल्या कडील मोठमोठे वड-पिंपळाचे व्रुक्ष असतात तसे.

वादळ येउन गेलेले दिसत होते, लॅण्डस्लाइड झालेले होते, मोठमोठी झाडे कोसळलेली होती, रस्ता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खचलेला होता. या २० कि.मि.च्या प्रवासात सहा मोठे मोठे ग्लेशियर पार करावे लागले. बर्फावरुन चालण्याचा अनुभव वेगळाच असतो. बर्फ खचणार तर नाही, वरुन पुन्हा लॅण्डस्लाइड झालेतर, एखादा धोंडा अंगावर आला आणि आपण चिरडलो गेलो तर कसे असे काय आणि किती विचार मनात येत होते सांगू. आपण मेलो तर कैलासात आपली डायरेक्ट एंट्री होईल, आपल्या आयुश्याचे सोने होईल, कारण आपण कैलासाच्या प्रांगणात आहोत भिती मुळे का होईना मुखाने सतत ॐ नमःशिवायचा जप चालू असतो पण आपल्याबरोबरचे दुसरे यात्रेकरू,आपले नातेवाईक आणि निगम याना किती व्याप होईल या विचाराने प्रत्येकाची गाळण उडत होती. पाय बर्फावरुन सटासट घसरत होते सर्वांची लोटांगणे घालुन झाली. पांडेजी म्हणाले, घोड्याच्या टापेच्या खाचेत पाय ठेवत चालायचे कारण तिथला बर्फ घट्ट असतो खचण्याची शक्यता नसते. जीव मुठीत धरुन म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.

शेवटी हा प्रवासाचा कठीण भाग संपला. आता सुरु झाले सुंदर नेबुजीचे जंगल. नेबुजी म्हणजे काटेरी रानटी गुलाबाची बने. विविधरंगी अप्रतिम सुवासाची, विविध प्रकाराची गुलाबाच्या झुडूपांची बनेच्या बने. सगळा शिणवटा कुठल्याकुठे पळून गेला. एका ठिकाणी डोंगरावरुन नऊ धारांमध्ये खाली येणारा दुधा सारखा शुभ्र प्रवाह आहे. हा हिवाळ्यातही गोठत नाही. इथल्या रहिवाश्यांची श्रद्धा आहे की ही दुधगंगा आहे. डोंगरावर असलेल्या त्यांच्या राजुदेवीचा दुधाचा घट फुटला; त्यातील हे दुध वाहते आहे. आमच्या बरोबर सुरज नावाचा नम्पा गावचा रहिवासी सध्या दिदीहाट येथील नारायणस्वामी कॉलेजात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेला मुलगा बर्‍याच वेळापासुन चालत होता. तो दर शुक्रवारी सुटीसाठी घरी येतो आणि सोमवारी परत जातो. त्याने बरीच माहिती दिली. इथल्या जंगलात पांढरे वाघ, पांढरी अस्वले, कस्तुरीम्रुग आहेत. चालता चालता रौंकांग, नाभि ही चिमुकली गावे मागे टाकुन एक टेकडी चढून नम्पा येथे आलो. तिथे एक टपरीवजा घर-दुकान होते, सुरज आमचा निरोप घेउन गेला. आम्ही थोडावेळ बसावे म्हणून त्या टपरीमधील बाकडांवर बसलो. आमचे मराठी बोलणे ऐकुन आतील भागातुन एक ग्रुहस्थ आले. आम्हाला नमस्कार करुन म्हणाले कसे काय चालले आहे, आवडले का आमच्या या खेडेगावातील काही? आम्ही आश्चर्याने उडालोच. खुपच सुंदर आहे सारे काही, पण तुम्हाला कसे काय मराठी येते? माझे नाव देवीसिंग! मी पुण्याजवळ खडकीला मिलीटरीत खुप वर्षे होतो त्यामुळे मला मराठी येते, तुम्हाला भेटून खुप आनंद झाला. त्यानी मग आम्हाला स्थानिक कोदू या धान्याच्या पीठाचे घावन आणि कच्च्या कुलमचे लोणचे असा नास्ता दिला. परत येताना भुर्जपत्र देईन असेही सांगितले. त्यांचा निरोप घेउन निघालो. आता पुन्हा कठीण चढाई सुरु झाली.

मोठमोठे व्रुक्ष जणू गायबच झाले, खुरटी झुडपे सुरु झाली. आपण धुपारती साठी संध्याकाळी जो धुप जाळतो त्या धुपाची झुडपे, संजिवनी बूटी {लक्ष्मण ज्यामुळे शुद्धिवर आला} यांची झुडपे खुप आहेत. एक मोठी चढण उतरुन खाली आलो. एक मोठा धबधबा डोंगरातुन खाली आला होता, तो पार करण्यासाठी झाडाचा ओंडका आडवा टाकलेला होता. बाप रे! आधी सुनीलने ओंडक्यावर पाय ठेवला तो डगमगला कसातरी तोल सावरुन सुनील पित्रे पार झाला. मग मीना, रोहिणी मग त्यांच्या मागुन सुनील शिंदे गेला. त्याने माझ्या साठी काठी पुढे केली ती धरुन मी पार झाले, नंतर हे आणि पांडेजी आले. समोर दुसरा डोंगर उभा होता. हातातील काठी रोवत आस्ते कदम चालत चढलो एकदाच. समोर इंडो-तिबेट बॉर्डरचे सैनिक पाण्याचे मोठेमोठे कॅन आणि चहाचे थर्मास, बिस्किटे वगैरे घेउन आमच्या स्वागतासाठी हसतमुखाने तयार उभे होते. जयहिंद! ॐ नमःशिवाय म्हणुन आमचे स्वागत करुन आग्रहाने आम्हाला बसवले. कॅम्प अजुन २/३ कि.मि. दुर आहे, दमला असाल म्हणून चहा घेउन आलो असे म्हणून सर्वाना प्रथम पाणी आणि मग चहा बिस्किटे दिली. या आदरातिथ्याने आमचा दमला-भागला जीव विश्रांती पावला. आम्ही अगदी भारावुन गेलो.

कुट्टी हे या गावाचे नाव माता कुंतीच्या नावावरुन पडले आहे. पांडव वनवासात असताना येथे राहिले होते. गावाजवळ मध्यभागी एका टेकडीवर पांडवांच्या वाड्याचे अवशेष आहेत म्हणतात. हा वाडा आठ मजली होता. आता फक्त तळमजला आणि पहिल्या मजल्याचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. सहाजिकच आहे, पांडव ५००० वर्षापुर्वी होऊन गेले. येथील उत्खननात बौद्ध व जैन संस्क्रुतिची काही शिल्पे सापडली आहेत. कुट्टी जवळील डोंगरात सैधव मीठाची खाण आहे. कुट्टी नदीचा उगम याच डोंगरात होतो. एकंदरीत हा वीस किलोमीटरचा प्रवास फारच कठीण.

a4
-------------------------

क्रमशः

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

6 Sep 2014 - 8:58 pm | कवितानागेश

सगळा परिसर डोळ्यापुढे उभा राहिला. :)

कविता१९७८'s picture

8 Sep 2014 - 2:11 pm | कविता१९७८

छान वर्णन केलंय , प्रसन्न वाटतय.

विवेकपटाईत's picture

8 Sep 2014 - 8:21 pm | विवेकपटाईत

सुन्दर, वाचताना प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव आला.