आदि कैलास ओमपर्वत दर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-९

खुशि's picture
खुशि in भटकंती
5 Sep 2014 - 1:29 pm

गुंजी. व्यासभूमीचे प्रवेशद्वार. कैलास यात्रेचा बेस कॅम्प. येथे डोंगरावर व्यास मंदिर आहे, छोटे पण सुंदर. येथेच त्यांनी श्रीगणेशाच्या हस्ते १८ पुराणे लिहिवली अशी आख्यायिका आहे. गुंजी, रौकाँग, नम्पा, नाभि आणि कुट्टी ह्या पाच गावांची मिळून होते व्यासभूमी. येथील रहिवासी व्यासऋषींचे वंशज आहेत. त्यांच्याप्रमाणेच बुद्धिवान आणि शिवभक्त. दर राखीपौर्णिमेला या गावांचा गुंजीमध्ये मोठा उत्सव होतो. पारंपारिक नृत्य, पूजा, प्रसाद असा पाच दिवसांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच देश-परदेशात काम-धंद्याच्या निमित्ताने राहात असलेले सर्व नागरिक येतात. पाचव्या दिवशी सारीपाटाचा कार्यक्रम होतो, त्यावेळी प्रत्येक घराण्याच्या नावाने सोंगट्या टाकल्या जातात. ज्याच्या नावाची सोंगटी निघते त्यांचे घराणे पुढील वर्षाच्या उत्सवाचे पहिले मानकरी ठरते.

आठवा दिवस - गुंजी ते कालापानी. फक्त १० किमी. उंची १२,००० फूट. आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात सोपा प्रवास. त्यामुळे मेडिकल चेकअप झाल्यावर नाश्ता करून निघालो. काली रस्त्याच्या जवळून वाहत असते, पण गाला ते बुधी या प्रवासात रौद्रभीषण सोबत करणारी काली येथे मात्र माहेरून सासरी जाणार्‍या घाबरलेल्या, गोंधळलेल्या अवस्थेतील नववधूसारखी लाजत मुरडत सोबत करत असते, आपण तिच्या माहेरचे पाहुणे असतो ना! जंगलही साधारण आहे. ओक, पाईन, चीड, देवदार यांचे मोठमोठे वृक्ष पण विरळ. चढ-उतारही तसे लहानच. या मार्गाची निर्मिती १८५० मध्ये त्यावेळच्या ११५ रुपयांमध्ये गुंजीच्या पुरणसिंग गुंजीयाल यांनी वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ केली.

कालापानीच्या कॅम्पच्या अगोदर १ किमी कालीच्या पात्राजवळ फक्त ५/६ फुटांवर गरम पाण्याचे कुंड आहे. मात्र तिथे जाण्यासाठी ५०/६० फूट खाली उतरावे लागते. निगमने तिथे स्नानासाठी बाथरुम बांधली आहे. बादली, मगही ठेवले आहेत. कुंडातील पाणी बादलीने काढता येते.

कालापानी कॅम्पजवळच कालीचे उगमस्थान आहे. तिथे भारतीय सेनेने मंदिर बांधले आहे. काली डिसेंबरमध्ये गुप्त होते आणि एप्रिलमध्ये पुन्हा प्रगट होते. शास्त्रीयदृष्ट्या डिसेंबरमध्ये उगमाजवळ बर्फ तयार होतो आणि एप्रिलमध्ये वितळतो. दोन्ही वेळा तेथे उत्सव करतात. उगमापासून डाव्या तीराला नेपाळ आणि उजव्या तीराला भारत अशी विभागणी होते. कालापानी येथेच उंच डोंगरावर व्यासऋषींची तपस्या गुंफा आहे. खालून डोंगरावर फक्त एक खोलगट जागा दिसते, प्रत्यक्षात प्रशस्त गुहा आहे.

कालापानीचा मुक्काम विश्रांतीचा असतो. सकाळी आठ वाजता गुंजीहून निघाल्यावर दोन तासांत येथे पोहोचलो होतो. स्नान तर गरम पाण्याच्या कुंडावरच केले होते. मग कपड्यांचा साठलेला भारा धुण्याचा कार्यक्रम केला. पाणी खूपच थंड होते, पण तेथील कर्मचार्‍याने कपडे धुवायलाही गरम पाणी दिले. नंतर आरामात पुरी-भाजी, डाळभात, पापड-लोणचे, आणि गुलाबजाम. आज एक वेगळी पालेभाजी खायला मिळाली. तिला लसणीचा वास होता. खूपच छान चव होती त्या भाजीची. पोटभर भोजन झाल्यावर चांगली ताणून दिली. संध्याकाळी सैनिकांबरोबर क्रिकेटचा खेळ रंगला. व्यासगुंफा पाहून आलो. थोडी फोटोग्राफी केली. कालीच्या पात्राजवळ पाणचक्की होती. तिथे रोजचे दळण दळतात.

नववा दिवस - अर्धी यात्रा संपूर्ण करणारा. अंतर फक्त १० किमी. उंची १४,००० फूट. रस्ता गुंजी ते कालापानीपेक्षा कठीण आणि चढणीचा. उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवते, पण मार्गक्रमण करीत असताना विविध रंगी फुलांच्या ताटव्यातून सोनेरी हिमशिखरांतून थंड सुखद हवेतून भगवान शिवशंकर आपल्या भक्तांना रिझवत असतात. म्हणत असतात, आस्ते आस्ते चाला माझ्या लाडक्यांनो, या! आता थोड्याच वेळात तुमचा श्रम परिहार होईल, तुम्हांला ज्याची कामना आहे ते माझे ॐ रुपी दर्शन होईल.

आणि नबीढांगच्या मुक्कामी कॅम्पच्या आधी साधारणपणे १ किमी वर पांडेजी म्हणाले, "सामने वो काले पहाडपर देखो!" ओहो! बम बम भोले! उजव्या बाजूला दूरवर निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर सुंदर काळ्या पहाडावर बर्फाचा भलामोठा ॐ चमकत होता. त्या ॐ रूपी परमेश्वराच्या साक्षात् दर्शनाने भावविभोर झालो, शेजारी उभ्या माणसाला विसरलो. ती जिवा-शिवाची भेट होती. सर्वांच्या डोळ्यांना अक्षरशः भावनातिरेकाने धारा लागल्या होत्या. जणू अश्रूंवाटे भक्ती, प्रेम पाझरत होते. याचसाठी केला होता अट्टाहास. दर्शनाने दिवस गोड झाला. नकळत गजर होतो, "जय हो भोलेनाथ, बम बम भोले, हर हर महादेव, ॐ नमःशिवाय!" प्रत्येकाचे हात जोडले गेले. प्रत्येकजण नतमस्तक झाला. पाय तिथेच खिळून गेले, जगच थांबले...

पण मुक्कामाचा कॅम्प तर अजून दूर आहे. शेवटी गाईड स्वतः आधी भानावर आले. त्यांनी सर्वांना भानावर आणले. म्हणाले, "बसा, थोडा वेळ पाणी प्या. मग आपण कॅम्पवर जाऊ. तिथून मनसोक्त दिवसभर हेच दर्शन घेऊ या."

सकाळी सात वाजता स्नानादी उरकून कालापानीहून निघाल्यावर अकरा वाजता नबीढांग म्हणजेच ॐ पर्वताच्या मुक्कामावर पोहोचलो. मनसोक्त ॐ दर्शन होत होते. तंबूत जाण्याची इच्छाच होत नव्हती. पांडेजी म्हणाले, "तुम्ही भाग्यवान आहात. शिवजी़ की बडी कृपा है आप लोगों पर। नाही तर कधी कधी इथे येऊनही मोसम खराब असेल तर ढगांमुळे दर्शन होत नाही. जय हो भोले की! मोठ्या नाईलाजाने तंबूत गेलो. दुपारी भोजनानंतर विश्रांती घेऊन तिथेच मागे सैनिकांनी बांधलेल्या मंदिरात दर्शनाला गेलो. मंदिरामागे एका दरीत १९९७ साली कोसळले हेलिकॉप्टर बघायला गेलो. त्या हेलिकॉप्टरमध्ये दिग्विजयसिंग होते. पण त्यांचे दैव बलवत्तर. हेलिकॉप्टर असे पडले की त्यातील कुणालाही इजा झाली नाही की हेलिकॉप्टरला आग लागली नाही. तिथून पुढे मोठ्या कैलासला जाणारी लिपुलेक खिंडीची वाट बघून आलो.

नंतर सर्वांनी मिळून ॐ समोरच्या मोकळ्या मैदानात बसून छोटेसे हवन केले. फडके, पटवर्धन यांनी रुद्र म्हटला, शिवमहिम्न म्हटले. सर्वांना प्रसाद वाटला. इथे सॅटलाइट फोनची सुविधा आहे, म्हणून सर्वांनी घरी फोन केले.

आज वटपौर्णिमा आहे. रात्री अचानक श्वास कोंडतो आहे असे वाटले. जीव गलबलू लागला. अंथरुणात उठून बसले, पण ठीक वाटेना. वाटले, तंबूबाहेर मोकळ्या हवेत जावे म्हणजे बरे वाटेल. बाहेर आले आणि अस्वस्थता कुठे पळून गेली क्षणार्धात हे कळलेच नाही. समोर पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात ॐ असा सुंदर चमकत होता की वर्णन करायला माझ्याजवळ शब्दच नाहीत. भराभर सर्वांना उठवले, म्हटले बघा. चला, हा क्षण पुन्हा आपल्या आयुष्यात येईल - न येईल... जीवनाचे सार्थक करू या. सर्वजण बाहेर आले आणि अवाक् झाले. मग दुलया बाहेर घेऊन आलो आणि सर्वांनी मोकळ्या मैदानातच बैठक मारली. हळू हळू पहाट झाली. रुपेरी ॐ सोनेरी होऊ लागला. पूर्वा उजळू लागली. आकाशाने केशरी लालसर रुपेरी सप्तरंगी शाल पांघरली. तेजस्वी ॐ दर्शन. आमचे भानच हरवले होते.

पौर्णिमेच्या रात्री पूर्णचंद्राच्या स्वच्छ प्रकाशात ॐ दर्शन हा एक अवर्णनीय अनुभव आहे. इथल्या सारखे निळे गगन आयुष्यात पाहिलेले नसते, प्रत्येकाचा मनमोर नुसता थुईथुई नाचत असतो, गात असतो. निळे गगन निळी धरा...धरा..! स्वच्छ मोकळी हवा, तशात गोड गारवा!

a5

a6

a7
--------

क्रमशः

प्रतिक्रिया

आजचा भाग अतिशय सुंदर्,खुशीताई.

कवितानागेश's picture

5 Sep 2014 - 6:17 pm | कवितानागेश

खूप छान वाटतय वाचूनच.
तुम्ही फार फार श्रीमंत आहात खुशिताई. :)

प्लीज फोटो टाका ना जमले तर.
आदि कैलास ट्रेकविषयी माझे काही प्रश्न आहेत, तुम्हांला व्यनि करते. :)

चैदजा's picture

5 Sep 2014 - 11:24 pm | चैदजा

निशःब्द

विवेकपटाईत's picture

6 Sep 2014 - 9:56 am | विवेकपटाईत

भाग्यवान आहात ख़ुशी ताई, वाचून आनंद झाला.

परिंदा's picture

6 Sep 2014 - 5:43 pm | परिंदा

छान लिहिता आहात. लेखाला छायाचित्राची जोड दिलीत तर बरे होईल.
तसेच लेखाच्या सुरुवातीस आधीच्या भागांच्या लिंक्स दिल्यात तर आधीचे भाग शोधणे वाचकांना सुलभ होईल.

सविता००१'s picture

18 Sep 2014 - 5:00 pm | सविता००१

हा भाग फार आवडला

सविता००१'s picture

18 Sep 2014 - 5:00 pm | सविता००१

हा भाग फार आवडला