आदिकैलास,ओम पर्वत दर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा भाग ८

खुशि's picture
खुशि in भटकंती
4 Sep 2014 - 3:55 pm

सातवा दिवस. बुधी ते गुंजी. १७ किमी. उंची १४००० फूट.

पहाटे पाच वाजता आमची विनोबा एक्स्प्रेस निघाली पदयात्रेला. बुधी ते छियालेक हा पहिला ३/४ किमी. चा चढणीचा प्रवास. रिमझिम पाऊस, दाट धुके म्हणजे फक्त पायाखालचेही जेमतेम दिसत होते. समोर ४/५ फुटांवर असलेली व्यक्ती दिसत नव्हती, एवढे दाट धुके होते. हा चढणीचा प्रवास दमछाक करणारा आहे. दर १०/१५ फूट चढणीनंतर श्वास शांत होण्यासाठी थांबावे लागत होते. ऑक्सिजनची कमतरता खूपच जाणवत होती, कापूर हुंगत तोंडात पेपरमिंटची गोळी ठेवून चढावे लागत होते.

छियालेक खिंड आली. टेकडीवर एक चौकी आणि एक टपरी होती. टपरीत नेपाळी वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या, चहाही होता. चौकीत आमच्या नाशिकजवळील येवल्याचा जाधव नावाचा मुलगा सैनिक होता. आमचे मराठी बोलणे ऐकून तो बाहेर आला. आम्ही नाशिकचे आहोत हे समजल्यावर त्याला इतका आनंद झाला की विचारू नका. जणू त्याला त्याचे आई-वडीलच भेटले होते. आम्हांला त्या टपरीत घेऊन गेला. चहा घ्यायला लावला. चहाचे पैसेही दिले त्याने. हो तो सैनिक होता, पोलिस नव्हता फुकट चहा प्यायला. मग मी त्याला घरून नेलेले लाडू देऊ लागले. आधी नको म्हणाला, कारण त्यांना असे कुणाकडूनही काही खायला परवानगी नाही. सिक्युरिटीचा प्रश्न असतो. तो आमच्या बरोबर जवळजवळ पाच किमी चालत आला. तो त्याच्या गस्तीचाच भाग होता. मी पुन्हा आग्रह केल्यावर त्याने एक लाडू खाल्ला. खाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाला आईची आठवण आली. सहा महिने होऊन गेले घरी जाऊन आलो त्याला. मग मलाही रडू आले. ह्यांचेही डोळे भरले. ही आपली लेकरे अशा प्रतिकूल वातावरणात सेवा देतात, डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करतात म्हणून आपण आपल्या घरी बिनधास्त राहू शकतो. जड अंतःकरणाने त्या पोराचा निरोप घेऊन पुढे निघालो.

दमछाक करणारी चढाई संपली होती. आता हिरवळीचे गालिचे, त्यावरील रंगीबेरंगी फुलांची नक्षी, समोर दिसणारी उन्हात चमकणारी शुभ्रधवल हिमशिखरे यांच्या रूपाने आपल्यावर शिवकृपेचा वर्षाव होत असतो. वाटेत छोट्याछोट्या हिमनद्या पार कराव्या लागल्या. याच प्रवासात भारत-चीन युद्धापूर्वीपर्यंत भारत-तिबेट यांच्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेले, व आता शिलाजीत या शक्तिवर्धक आयुर्वेदिक औषधाच्या चोरट्या व्यापाराचे केंद्र असलेले (या हिमालयाच्या भागात उन्हाळ्यात खडकांवर शिलाजीत ही शेवाळासारखी वनस्पती उगवते) गर्ब्यांग हे गाव लागते. हे गाव भूगर्भातील हालचालींमुळे जसेच्या तसे जमिनीत हळूहळू खचत चालले आहे. पण गंमत म्हणजे घरांच्या छपरावरील एकही धलपीसुद्धा हलत नाही. (इकडील घराच्या छपरावर कौले किंवा झाप नसून दगडाच्याच पातळ चिपांसारख्या दगडी धलप्या तिरप्या बसवलेल्या असतात.) गाव उठवावे अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. पर्यायी जागाही दिल्या आहेत. पण भरघोस उत्पन्नाचे साधन शिलाजित फक्त इथेच होते. त्यामुळे जीव धोक्यात असूनही लोक गाव सोडून जात नाहीत.

याच प्रवासात नेपाळ मधून येणारा पिवळ्याधमक पाण्याचा टेंकर नाला आणि काली यांचा, लाल रंगाच्या पाण्याची कुट्टी नदी व काली यांचा संगम बघायला मिळतो.

सातव्या दिवसाचा कठीण प्रवास ११ तासांनी संध्याकाळी ४ वाजता संपला. गुंजीचे मुक्कामाचे तंबू कुट्टी नदीच्या पैलतीरावर काली व कुट्टीच्या संगमाजवळ दुपारी दोन वाजल्यापासूनच दिसत होते. पण तिथे पोहोचण्यासाठी कुट्टीमैय्या पार करविणारा पूल जवळजवळ ३ किमी अजून पुढे होता; आणि कुट्टीचा प्रवाह इतका वेगवान आहे की तो त्यातूनच चालत पार करणे शक्य नाही. शेवटी आला एकदाचा तो पूल, झाला पार आणि पुन्हा तितकेच मागे येऊन मुक्कामावर पोहोचलो.

हे मुक्कामाचे ठिकाण मोठे आहे; म्हणजे ७/८ मोठे फायबरचे तंबू आहेत. टेलिफोनची सुविधा आहे. इथे पुन्हा मेडिकल चेकअप होते. सगळ्यांनी आपापल्या घरी फोन केले. इकडे स्वयंपाकात कांदा वापरला जात नाही, कारण तो खूप महाग असतो. आमच्यातील राजस्थानी मंडळी त्यामुळे बेचैन होती. गुंजी गाव थोडे मोठे आहे. मग डॉक्टर साहेब गेले गावात कांदे शोधायला. आले घेऊन ६० रुपये किलो दराने एक किलो कांदे. त्यांची बहीण शकुंतला गेली स्वयंपाक घरात. आणि मग बनवली राजस्थानी साककढी चांगली झणझणीत. पोटभर जेवलो सगळेजण. आता विश्रांती.

-----------

क्रमशः

प्रतिक्रिया

फारच ओघवत्या भाषेत लिहिता हो...कधी वाचून झालं कळत पण नाही! आणि अगदी डोळ्यासमोर उभं करताय सगळं दृष्य!

जरा दीर्घ लिहायचं बघा ही विनंती.

कविता१९७८'s picture

4 Sep 2014 - 4:24 pm | कविता१९७८

सैनिकाचा कीस्सा वाचुन माझ्या ही डोळ्यात पाणी आले, खुपच सुंदर लेखन

एकनाथ जाधव's picture

12 Jul 2017 - 12:20 pm | एकनाथ जाधव

+१

मंदार कात्रे's picture

13 Jul 2017 - 8:35 am | मंदार कात्रे

+१

अजया's picture

4 Sep 2014 - 4:54 pm | अजया

सुरेख वर्णन.पुभाप्र.त्या लाल पिवळ्या संगमाचे फोटो हवे होते.

मस्त वर्णन.बाकीचे भाग ही छान.

यशोधरा's picture

5 Sep 2014 - 7:40 pm | यशोधरा

>> हो तो सैनिक होता, पोलिस नव्हता फुकट चहा प्यायला. >> इतके जनरलायझेशन करु नका हो :)
बाकी छान लिहित आहात.