नारकोंडम बेट-- पुढे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
4 Jul 2014 - 1:40 pm

नारकोंडम बेट-- पुढे

आमच्या सर्व लोकांच्या गणवेशात आणि बुटात समुद्राचे पाणी भरून ते जड झाले होते. जेमिनी किनार्यावर आणल्याबरोबर नौदलाच्या मुलभूत प्रशिक्षणाप्रमाणे मागे बसलेल्या नौसैनिकाने जेमिनीची मोटर सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण मोटार मध्ये सुद्धा पाणी शिरले होते आणि ती पण चालू होईना.आता प्रेम कुमारला अजूनच टेन्शन आले. कारण वायरलेस बंद होता. जेमिनीची मोटार चालत नव्हती (आणि त्याच्या खिशातील पाकीट आणि घड्याळ भिजले होते.) तो विचारू लागला सर आता परत कसे जायचे? मी का कुणास ठाऊक बेफिकीर होतो. मी त्याला म्हणालो कि जे होईल ते पाहू. कारण आपण किनार्यावर पाय घट्ट रोवून उभे आहोत हि गोष्ट फार दिलासा देणारी असते. मी किनार्यावर उतरून आजूबाजूचा निसर्ग पाहून खुश झालो होतो. मी विचार केला फार तर काय होईल आपल्याला पोलिसांच्या वायरलेस वरून पोर्ट ब्लेयर च्या मुख्यालयात संदेश पाठवावा लागेल कि आम्ही नारकोंडमच्या बेटावर अडकलो आहोत. मग ते पाठवतीलच मदत. तोवर तर सहल करून घ्या.

(अवांतर --- मुलभूत प्रशिक्षण म्हणजे -- कोणतेही जहाज समुद्रातून परत आले कि त्यावरील सैनिक घरी जाण्याच्या अगोदर त्यात इधन. वंगण शस्त्रास्त्रे इ चा साठा पूर्ण भरून(top up )ठेवला जातो.गरज पडली तर ६ तासात युद्धावर जाता आले पाहिजे. असेच मी माझ्या मोटार कार बद्दल करतो. मोठ्या सफरीनंतर परत आले कि लगेच त्यात पेट्रोल, चाकात हवा,वायपर चे पाणी भरून ठेवायचे. इंजिन, ब्रेक पॉवर स्टीयरिंग च्या तेलाची पातळी तपासून ठेवतो. याउलट आमचे मित्र सकाळी ७ वाजता निघायचे कि पहिल्यांदा पेट्रोल पम्प केंव्हा उघडतो याची वाट पाहतात.) असो.

आमची जेमिनी बोट येणार आहे हे तेथील पोलिसांना कळवले होते( वज्र वरून कळवले होते कि तटरक्षक दलाच्या पोर्ट ब्लेयर मुख्यालयातून कळवले होते ते माहित नाही). त्यामुळे तेथे पोलिसांचा एक सब इन्स्पेक्टर आणि तीन पोलिस आले होते. नमस्कार चमत्कार झाले आणि ते लोक आम्हाला त्यांच्या क्याम्प वर घेऊन गेले. तीन चार बैठ्या झोपड्या, एक बैर्रक आणि आजूबाजूला थोडे मोकळे अंगण त्यात एक व्हॉली बॉल कोर्ट. त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल थोडे बाजूला एक झुळझुळ वाहणारा झरा त्याच्या काठाला केळीची आणी नारळाची झाडे. फार छान पिकनिक साठी जागा होती. माझी तब्येत खुश झाली.सब इन्स्पेक्टर (के एन सिंग नाव होते बहुधा) पन्नाशीच्या पुढचा होता. मी डॉक्टर आहे हे पाहून त्याने मोठ्या प्रेमाने मला तेथे मांडलेल्या खुर्च्यांवर बसवले. बसल्यावर लक्षात आले कि आपण अन्तरबाह्य भिजलो आहोत आणी पैण्ट अंगाला आणी खुर्चीला चिकटत आहे. काय करावे सुचत नव्हते आणी कुणाला सांगून उपयोगही नव्हता. मी बूट काढले तिथल्या खडकावर मोजे वाळत टाकले आणी पाय जरा दगडावर ठेवून बसलो.

आमच्या सर्व जणांसाठी त्यांनी नारळाचे पाणी मागवले. मजेत नारळाचे पाणी प्यायलो. त्यानंतर त्याने तेथली केळी खायला दिली. साखर घालावी इतकी गोड आणी उत्कृष्ट केळी मी आजपर्यंत खाल्लेली नाहीत. पाहुणचार झाल्यावर प्रेम कुमार तिथल्या वायरलेस ऑपरेटर बरोबर पुढचे काम करायला गेला बाकी सैनिक जेमिनीची मोटार चालू होते का ते पाहायला गेले आणी मी त्या झाडाखाली बसून सब इन्स्पेक्टर बरोबर गप्पा मारू लागलो. त्याला काहीतरी त्वचेचा आजार होता ते पाहून मी माझ्या पेटीतील मलम दिले आणी काय उपचार करायचे ते सांगितले. त्यानंतर थोडा वेळ तिथल्या लोकांचे काय काय वैद्यकीय प्रश्न आहेत ते मी पाहून घेतले. बर्याचशा प्रश्नाचे उपचार माझ्याकडे होते. जे नव्हते त्याला मी त्यांच्या कडून कागद पेन मागून पोर्ट ब्लेयर ला गेल्यावर तिथल्या डॉक्टर ना चिठ्ठ्या दिल्या. बर्याच जणांचे बारीक बारीक प्रश्न सोड्वल्याने त्यांना पण जरा बरे वाटले. इतक्या दूर आपला कोणीच वाली नाही हि त्यांची एकटेपणाची जाणीव पण थोडी कमी झाली. त्यांना सर्वाना प्रश्न मामुली आहेत असा दिलासा पण दिला( खर तर बरेचसे प्रश्न मामुलीच होते पण एक स्पेशालीस्ट डॉक्टर येऊन तसे सांगतो याचा फार मोठा परिणाम त्यांच्या वर झाला). डॉक्टरला म्हणूनच कल्याण अधिकारी (WELFARE OFFICER) म्हणून पण काम दिले जाते.

यानंतर मला तेथे थोडे फिरायचे होते कारण पृष्ठ भाग वाळला होता पण पार्श्वभाग अजूनही ओला आणी चिकट होता म्हणून मी दोन पोलिसांबरोबर जवळच्या जंगलात एक फेर फटका मारावा म्हणून निघालो. तेथे डयाशून किंवा असे काही तरी नावाचे नळकांड्या सारखे लहान पायाचे कुत्रे असते तशा लहान पायाच्या बकर्या होत्या त्या इतक्या विचित्र दिसत होत्या कि मी पाहतच राहिलो. जंगल एकदम घनदाट होते आणी त्यात इतक्या तर्हेच्या पक्षांचे आवाज येत होते कि त्यानेच तुम्हाला छान वाटायला लागते. मुळात विशाखापट्टणमहून निघाल्यापासून इतके दिवस जहाजातच कायम मुक्काम होता. जहाजात यंत्रांचा आवाज दिवसरात्र तुमच्या आजूबाजूला सतत असतो कि शांतता काय असते याचा तुम्हाला विसर पडलेला असतो. त्यातून जहाज लोखंडाचे असल्याने हा आवाज कोप्र्याकोप्र्यात घुमत राहतो. आणी येथे तर यंत्राचा आवाज नाहीच पण निरव शांतता आणी पक्षांचा किलबिलाट. त्या शांततेतच इतके छान वाटायला लागले कि वाटले एक दिवस ती मोटार चालुच होऊ नये.

जंगलातील फेरफटका अगदी ताजेतवाने करणारा होता. आता माझे कपडे अंतर्बाह्य वाळले होते . दीड एक तास मजेत गेला. परत आलो तेंव्हा काही पोलीस तेथे व्हॉली बॉल खेळत होते. मी येऊ का विचारल्यावर त्यांनी मोठ्या प्रेमाने मला खेळात सहभागी करून घेतले. आमचे सैनिक आधीच तेथे सहभागी होते. दोन गेम होईपर्यंत प्रेम कुमार परत आला त्याने बहुधा वज्र वर संपर्क केला असावा. तो म्हणाला कि कॅप्टन ने परत येण्यास सांगितले आहे कारण आता ओहोटी चालू होईल आणी समुद्रातील प्रवाहामुळे जहाजाला किनार्यापासून फार जवळ येत येणार नाही. मला काय नाहीतरी काही काम नव्हतेच. परत चला तर परत चला पण मूळ मुद्दा आमच्या जेमिनीची मोटार चालू होत नव्हती. मग परत बरंच खलबत झालं. शेवटी सब इन्स्पेक्टरके एन सिंग नि त्यांच्या एका पोलिसाला त्यांची लाकडी बोट (व्हेलर) काढायला सांगितली. ती तेथेच किनार्यावर वाळूत एका खुंटाला बांधलेली होती. त्यात आमची जेमिनी आणि इतर सामान टाकले पोलिस आणि आम्ही मिळून लाकडाच्या ओंडक्यावरून ती बोट खेचत समुद्रात नेली आणि तिची मोटर त्यांच्या एका पोलिसाने चालू केली. पण लाटांचा तडाखा इतका होता कि बोट परत किनार्याला आपटली आणि त्या बोटीची मोटर बंद पडली. त्या पोलिसाने ती परत चालू केली आणि तो आम्हाला सांगत होता कि बोटीत पटकन चढा. एवढ्यात एक लाट परत आली आणि तिने बोटीला किंनार्यावर ढकलले. आता परत त्या मोटारचा पंखा किनार्यावर अडकून बोट बंद पडली. यावर तो पोलिस टरकला. तो म्हणाला सर मी बोट पाण्यात नेउन उभी करतो तुम्ही पोहत तिथपर्यंत या. आम्हाला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याप्रमाणे तो बोटीला समुद्रात साधारण १०० मीटर वर घेऊन गेला आणि तेथे थांबून आमची वाट पाहू लागलाऽ आम्ही आपले साग्रसंगीत गणवेश बुटासकट पाण्यातून पोहायला सुरुवात केली तर पाण्याचा आणि लाटांचा जोर इतका होता कि दहा मीटर जायला आम्हाला दहा मिनिटे लागली. तो पोलिस सारखा ओरडून सांगत होता कि सर लवकर या. मध्येच त्या बोटीची मोटार बंद पडण्याचा आवाज आला आणी आता ती बोट सुद्धा लाटांच्या तडाख्याने तरंगत आमच्या जवळ येऊ लागली जोर लावून आम्ही पोहत होतोच पण फुल शर्ट फुल प्यांट बूट मोजे यासकट लाटांच्या उलट पोहोणे इतके सोपे नसते.
नौदलात पहिली बढती मिळण्यासाठी पोहोण्याची स्पर्धा पास करावी लागते. यात नीळा फुल शर्ट फुल प्यांट बूट आणि मोजे अशा पूर्ण गणवेशात ५० मीटर तारण तलावात दोन फेर्या (१०० मीटर) माराव्या लागतात. तेंव्हा १०० मीटर पोहणे किती कठीण जाते ते समजून येते. यामागची विचार सारणी अशी आहे कि आपण जेंव्हा समुद्रात किंवा पाण्यात पडता तेंव्हा आपण अर्ध्या चड्डीत नसता तर पूर्ण कपड्यांसकट असता तेंव्हा अशा अवस्थेत लाइफ बोटीपर्यंत तरी पोहोत आले पाहिजे.
तरण तलावाच्या शांत पाण्यात पोहणे वेगळे आणि समुद्राच्या खार्या पाण्यात, लाटात पोहोणे वेगळे. जरा जरी पाणी तोंडात गेले तरी तोंड खारट होऊन जाते आणि इथे तर समुद्र तुम्हाला किनार्याकडे ढकलत होता.
असो. मी त्यातल्या त्यात सडपातळ होतो आणी जोरात पोहत त्या बोटीपर्यंत पोहोचलो. त्याच्या उंच कठड्यावरून कसरत करून आत पोहोचलो तोवर माझी दमछाक झाली होती. आता तो पोलिस म्हणाला सर वल्ही मारायला घ्या कारण मोटर सारखी बंद पडते आहे तेंव्हा आता सगळे आले कि एकदाच मोटर चालू करून न थांबता जहाजाकडे जाऊया. मग उजवीकडे तो आणि डावीकडे मी असे बसून लाटांच्या विरोधात आम्ही वल्ही मारायला सुरुवात केली. जड आणि लांब अशी मजबूत लाकडाची वल्ही मारायला फार कष्ट पडत होते परत आठ जणांनी वल्ही मारायची बोट आम्ही दोघेच वल्हवत होतो. पाच मिनिटांनी अजून एक सैनिक बोटीवर चढला. ताबडतोब त्याला पण वल्ही मारायला बसवले. असे करत करत शेवटी आम्ही सहाही जण बोटीवर आलो. देवाचे नाव घेऊन त्या पोलिसाने मोटर चालू केली. आता ती मोटर सुद्धा शहाण्यासारखी पटकन चालू झाली आणि आमचा उलट प्रवास चालू झाला.

मोटार चालू झाल्यावर मी जरा मोकळा श्वास घेतला. आता मला माझ्या अंगाची जाणीव होऊ लागली. एकदा समुद्राच्या पाण्यात भिजून कपडे आणि अंग वाळले होते ते परत ओले होऊन त्यात एवढ्या पोहोण्याच्या आणि वल्ही मारण्याच्या कष्टामुळे आलेला घाम याचे मिश्रण होऊन शरीर चिकचिकीत झाले होते त्यात उत्तमांगी टळटळीत सूर्य अंग भाजून टाकीत होता. पृष्ठभाग गरम आणि कोरडा आणि पार्श्वभाग ओला आणि गार अशी विचित्र अवस्था क्वचितच पाहायला मिळते. मी तोच विचार केला कि असा अनुभव तुम्हाला नाही तरी कुठे मिळणार आहे? मला त्याचे हसूच आले. प्रेम कुमारने विचारले सर हसताय का? मी त्याला म्हटले कि खिशात दमडा नसताना असा विलक्षण अनुभव तुला कुठे मिळेल? त्यावर त्याला आपल्या खिशातील पाकिटाची परत आठवण झाली. मोठ्या कष्टाने वाळवलेल्या नोटा परत भिजल्या होत्या. क्रेडीट कार्डाचे काय झाले ते कळत नव्हते. त्याचा चेहेरा परत आंबट झाला.

वीस एक मिनिटांनी आम्ही वज्र पर्यंत पोहोचले. तेथे आमचे जंगी स्वागत झाले. अधिशासी अधिकार्याने( executive officer कमांडन्ट राजकुमार) आमचे अभिनंदन केले. मला कळेनाच कि एवढे काय झाले आहे? त्यावर कॅप्टन म्हणाले डॉक्टर तू माझा हार्ट फेल केला असतास. मी म्हटले मी काय केले? त्यावर ते म्हणाले कि तुम्ही लोक मध्ये गायब कुठे झालात आम्हाला काही कळेचना वायरलेस वर संदेश पाठवतो तर कोणताही प्रतिसाद नाही. एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि चार सैनिक असे गायब झाले तर मला चौकड्या चौकड्याचा शर्ट घालून लष्करी इतमामाने तुरुंगात बसवतील नोकरी निवृत्ती वेतन तर विसराच. मला हसूच आले कारण मी किती बेफिकीर होतो आणि इथे मागे आपले लोक ग्यासवर होते. प्रेम कुमारने जेंव्हा पोलिसांच्या वायरलेस वरून झालेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या तेंव्हा त्यांच्या लक्षात आले कि काय झाले होते ते. तोपर्यंत वज्र नारकोंडम बेटा भोवती चकरा मारत होते कि हे लोक गेले कुठे? executive officer राजकुमार हसत म्हणाले डॉक्टर तेथे कोणते मंदिर होते काय? मी म्हटले कि हो एक छोटे श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्यावर ते हसत म्हणाले कि चल निदान प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य तरी मिळाले.
अशी हि एक चित्तर कथा पूर्वेच्या समुद्रात या आगामी लेखमालेतील.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

4 Jul 2014 - 1:45 pm | प्रसाद१९७१

मी पहिला

भिकापाटील's picture

4 Jul 2014 - 2:24 pm | भिकापाटील

मी पयला हा (डोक्यात जाणारा) काय प्रकार आहे.

अवांतर : डॉ सो. लेख आवड्ला

कानडाऊ योगेशु's picture

4 Jul 2014 - 2:31 pm | कानडाऊ योगेशु

ब्रेव्हो!.अविश्वसनीय वाटावा असा अनुभव. डॉक्टरसाहेब तुम्ही खरोखरच भाग्यवानही व धाडसीही आहात.स्पासाहेबांनी एका लेखात (मुंगळा इमॅगिनेशन)नमूद केलेल्या टेक्निकचा वापर करुन,समुद्रात किनार्यावरुन बोटीपर्यंत पोहोत जायचा भाग मी अगदी इमॅजिन करुन वाचला आणि नाकातोंडात पाणी गेल्याचा अनुभव आला.

जबर्‍या आणि थरारक अण्भव. लय म्ह. लयच आवडला.

मस्त अनुभव कथन. हा ही भाग आवडला.

असेच मस्त पण तितकेच उत्कंठावर्धक अनुभव येऊद्या तुमच्या पोतडीतून बाहेर.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jul 2014 - 2:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

पोहताना डोळ्यात आणि नाकातोंडात खारे पाणी गेल्यावर काय होते ते चांगलेच माहीती आहे.त्यात समुद्राच्या लाटांचा जोर म्हणजे बघायलाच नको.आणि गणवेषासकट? बाब्बो *clapping*

सुबोध खरे's picture

4 Jul 2014 - 2:48 pm | सुबोध खरे

एक पुरवणी
बेटाला भेट देण्याचे कारण -- नारकोंडम च्या आसपासहून जाणारी तटरक्षक दलाची किंवा नौदलाची जहाजे तेथिल पोलिसांना सदिच्छा भेट दत असतात आणि त्यांच्या कडून काही गुप्त माहिती/ खबरी ज्या बिनतारी यंत्रणेवर पाठवता येणार नाही ती गोळा करून लष्कर/पोलिस मुख्यालयाला पाठवण्याचे काम करतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jul 2014 - 2:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

थरारक थरारक,
कॅप्टन चे मात्र खरोखर हाल झाले असतील.

बायदवे या बेटावर जाउन चारसहा महीने रहाता येईल का?

पैजारबुवा,

एस's picture

4 Jul 2014 - 3:20 pm | एस

जाम इच्छा आहे. कमीत कमी त्या नारकोंडम हॉर्नबिलला पाहण्यासाठीतरी या बेटाला भेट द्यायची आहे...! :-)

बाकी डॉक्टरसाहेब, लेख अतिशय उत्कंठावर्धक. तुमच्यासारख्यांमुळे आम्हांला अशा हकिकती खिशात दमडी नसतानाही वाचायला तरी मिळतात. ;-) धन्यवाद! पुढचे भागही लवकर येऊ द्यात.

सुबोध खरे's picture

4 Jul 2014 - 3:29 pm | सुबोध खरे

नाही. तेथे माणसाना राहायला परवानगी नाही( माझ्या माहितीप्रमाणे)
तेथे मनुष्य वस्ती नाही. पोलीसांच्या तुकडीसाठी असलेल्या अंत्यंत अपुर्या सुविधा सोडल्या तर काहीच नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2014 - 4:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट, थरारक आणि खतरनाक !

वाचताना आमच्या मुसंडम पेनिनसुला आणि रब अल खालीतल्या उपदव्यापांची आठवण झाली.

अजून येऊद्या !!

वाचताना आमच्या मुसंडम पेनिनसुला आणि रब अल खालीतल्या उपदव्यापांची आठवण झाली.

तुमचे पण अनुभव येऊद्या लवकरच.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jul 2014 - 10:14 am | प्रभाकर पेठकर

३३ वर्षे मस्कतात काढून इतके वेळा ऐकलेल्या 'मुसंडम' वर जायचे अजून जमून आलेले नाही. तुम्ही लिहीलेत तर नक्कीच प्रेरणा मिळेल. लिहाच लवकर.

कवितानागेश's picture

4 Jul 2014 - 4:25 pm | कवितानागेश

भारी अनुभव. :)
@ इस्पिककाका, तुम्हीपण लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2014 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

@ लीमाउजेट, शिद आणि प्रभाकर पेठकरः

मुसंडम बद्दल लिहायचा विचार आहेच. पण तेव्हा काढलेले कागदी फोटो आता पिवळसर झाले आहेत त्यामुळे मांडी घालून शब्दांना जरा जास्त वेठीला घालून (खरं तर मलाच वेठीला बसवून) लिहायला लागेल. त्यामुळे डिजीटल फोटोवाल्या सहली लिहिणे संपल्यानंतर जुन्या भटकंत्या हाती घेईन. मुसंडम तर फार्फार जिव्हाळ्याचा विषय आहे... त्या स्ट्रॅटेजिक भूभागाचे 'चप्पा चप्पा छानके पहिले मिलिटरी मेडीकल इन्स्पेक्शन' करणारा डॉक्टर म्हणजे अस्मादिक ;) :) .

त्या स्ट्रॅटेजिक भूभागाचे 'चप्पा चप्पा छानके पहिले मिलिटरी मेडीकल इन्स्पेक्शन' करणारा डॉक्टर म्हणजे अस्मादिक

इस्पीकचा एक्का बदलून हुकुमीएक्का असा आयडी घ्या बघू आता लौकरात लौकर. _/\_

(दुसर्‍या आयडी हुकुमीएक्क्याने भावनाओंको कृप्या इ.इ. समजून घ्यावे.)

स्पा's picture

4 Jul 2014 - 4:38 pm | स्पा

झकासच

सविता००१'s picture

4 Jul 2014 - 4:50 pm | सविता००१

एकदम भन्नाट

रेवती's picture

4 Jul 2014 - 5:17 pm | रेवती

थरारक अनुभव.

आदूबाळ's picture

4 Jul 2014 - 6:43 pm | आदूबाळ

जबरदस्त!

पूर्वेच्या समुद्रात ही आगामी लेखमाला मिपावरच लिहिणार आहात की अन्य कुठल्या दैनिकात / साप्ताहिकात?

सुबोध खरे's picture

7 Jul 2014 - 12:04 pm | सुबोध खरे

माझे मिपा सोडून अन्यत्र कोठेही लिखाण नाही.( आमची दुसरी कुठेही शाखा नाही या धर्तीवर)
उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व

खटपट्या's picture

5 Jul 2014 - 12:57 am | खटपट्या

बाबौ !!! जवरी अनुभव !!!
अजुन येवुद्या !!!

वाडीचे सावंत's picture

5 Jul 2014 - 9:06 am | वाडीचे सावंत

फार दुर्मिळ आहे असा अनुभव आमच्यासारख्या civilians साठी. ... धन्यवाद शेअर केल्याबद्दल ...

नारकोंडम बेट आणि तुमचे लिखाण दोन्ही अप्रतिम ..........
मलाही नेवीत जाण्याची खूप इच्छा होती पण .........१० वि च्या रजेतच मी माझा पाय मोडून घेतला आणि नेवी,आर्मीचा विषय बाजूला पडला .

प्यारे१'s picture

5 Jul 2014 - 3:39 pm | प्यारे१

थरारक अनुभव. आमच्यासाठी दुरुनच बरा असा!

पेट थेरपी's picture

6 Jul 2014 - 7:02 am | पेट थेरपी

मस्त मालिका आहे. मी फॉलो करते आहे. माझ्याकडे आहेत ते नळकांड्यासारखे कुत्रे.

दोन्ही भाग वाचले... और भी आने दो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2

मुक्त विहारि's picture

6 Jul 2014 - 8:40 am | मुक्त विहारि

आवडला...

ब़जरबट्टू's picture

7 Jul 2014 - 1:49 pm | ब़जरबट्टू

तुमचा लेख व धाडसी प्रवास आवडला...

अजुन येऊ द्या...

टुकुल's picture

7 Dec 2015 - 6:09 pm | टुकुल

सुंदर वर्णन आणी अनुभव