उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
24 Jun 2014 - 3:46 pm

काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू
जणू स्वतंत्र झाल्या आहेत
----
बैठकीच्या खोलीत
कोपर्‍यातल्या मेजावर
एक फुलदाणी होती
..
काल रात्रीपर्यंत होती
सकाळी अंगणात सापडली
पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं
पदरात पडेल
या आशेने अंगणात आली असावी बहुदा
----
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत
----
तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे
उजाडल्यापासून बघतोय
थडाथड दारं आपटतायत
बहुदा तिची डायरीही असावी त्यात
----
काय झालं कुणास ठाऊक पण
गेला एकदाचा
रात्रभर बरसून
पाऊस फुलं देऊन.. गेला
आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
----
पण आता अंगणातली माती
चक्रीवादळात अडकल्यासारखी
आत-बाहेर होतेय
-----
अंगणातली फुलं सांभाळायची कि
उंबरठा नसलेले घर
तेच उमजत नाहीये तिला
-----
काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२४/०६/२०१४)

करुणशांतरसहे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Jun 2014 - 4:13 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

एस's picture

24 Jun 2014 - 4:47 pm | एस

असेच म्हणतो.

चाणक्य's picture

24 Jun 2014 - 4:35 pm | चाणक्य

मिका ईज ब्याक

यशोधरा's picture

24 Jun 2014 - 4:40 pm | यशोधरा

:)

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 5:04 pm | पिलीयन रायडर

सुंदर...

प्रीत-मोहर's picture

24 Jun 2014 - 5:10 pm | प्रीत-मोहर

अप्रतिम...

सूड's picture

24 Jun 2014 - 5:18 pm | सूड

नेहमीप्रमाणेच मस्त!!

किसन शिंदे's picture

24 Jun 2014 - 8:16 pm | किसन शिंदे

पुण्यातल्या घराचा उंबरठा चांगला खोलवर बसवून घ्या हो मिका. ;) तुझ्या रचना नेहमीच आवडतात.

सुहास..'s picture

24 Jun 2014 - 9:06 pm | सुहास..

व्वा !

अंगणातली फुलं सांभाळायची कि
उंबरठा नसलेले घर
तेच उमजत नाहीये तिला

यात असा बदल केला तर? ---

अंगणातली फुलं सांभाळायची कि
उंबरठा नसलेले घर
तेच उमजत नाहीये ”त्याला”

कविता नेहमीसारखी आवडलीच!

निरन्जन वहालेकर's picture

25 Jun 2014 - 12:32 pm | निरन्जन वहालेकर

आवडली ! !

प्यारे१'s picture

25 Jun 2014 - 1:04 pm | प्यारे१

हा वेडा माणूस आहे....

तुला एक पार्टी लागू आहे. :)
(आतापर्यंत किती पार्ट्यांचा काऊंट झालाय कुणास ठाऊक!)

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2014 - 2:05 pm | संजय क्षीरसागर

तुला इतक्या तरलतेनं कशा बांधता येतात, याचं नवल वाटतं. स्वातंत्र्य या आदिम इच्छेची, काव्यात्मक अभिव्यक्ती; आणि घर की अंगण या द्विधेत सापडलेली माती, मनापासून आवडली.

या ओळी :

देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत

(बहुदा) अशा हव्यात
............
वाहून गेलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2014 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__

दणकून लागतात रे तुझ्या कविता .....

कवितानागेश's picture

25 Jun 2014 - 3:20 pm | कवितानागेश

काय म्हणू?

माधुरी विनायक's picture

25 Jun 2014 - 4:09 pm | माधुरी विनायक

सुरेख कविता...

सस्नेह's picture

25 Jun 2014 - 9:26 pm | सस्नेह

भावविभोर कविता.

सुरेख.
तुमच्या कवितेत 'भाग १' वाचून आनंद झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2014 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या रचना नेहमीच वाचतो. कविता आवडतात. काल माझ्या मैत्रीणीने या कवितेवर चांगली चर्चा केली. मैत्रीणीच्या भाषेत '' माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का” असं म्हणुन कवितेवर चर्चा करायला दिलं आम्हाला कामाला लावून.

एखादी कविता वाचली की कवितेत असलेली सर्व कथा उलगडावी असे वाटते. एखाद्या कवितेच्या काही ओळी खास वाटतात कारण त्यात असलेल्या कल्पनेने आणि त्यातल्या अर्थाने. मला कवितेची थीम आवडली. धो धो पाऊस आलाय आणि घराचा उंबरठा वाहून गेला. घरात कोंडमारा झालेल्या सर्व वस्तू आपल्या व्यक्तिमत्वासहीत बाहेर पडल्या आहेत, बाहेरची ओढ आहेच. म्हणुनच सुरुवातीच्या ओळी मला खूप आवडल्या. बैठकीच्या खोलीतली फुलदानी बाहेर पडलीय ती पहाटेच्या वर्षावात ''एखादं फुलं पदरात पडावं म्हणुन'' निर्जीवपणा जावा, टवटवीतपणा यावा फुलदानीच्या जगण्याला अतिशय सुरेख ओळी आणि छान कल्पना. आणि मग कवितेत असा एखादा अर्थ लागला की पुढच्या ओळींमधुन तसाच अर्थ वाचायला मिळतो का असे म्हणुन वाचलं

समईची मंद ज्योतीचं आता देव्हा-यात लक्ष नाही. तिचंही लक्ष विचलित झालंय तीही घराबाहेर पडलेल्या उंबरठ्याच्या दिशेने पाहात आहे, ज्योतीचं बाळकृष्णावर अतिशय प्रेम आहे, सतत त्याच्यापुढे मंद तेवत आणि झुलत असते. पण उंबरठाच गेलाय तर कदाचित तिलाही हे बंध नकोत का ? पण असं नसावं. आपल्या आयुष्याला शोभा देव्हा-यामुळे आणि मग आपल्यालाही बाहेर पडावं लागतंकी काय, म्हणुन ती थरथरते आहे. याही ओळी छान आहेत. डायरीतल्या आठवणीही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. उंबरठाच वाहून गेलाय तेव्हा आपलं म्हणुन काही अस्तित्व उरलं नाही असे वाटतं घरातल्या प्रत्येक वस्तुला.

आणि मग ''काय झालं कुणास ठाऊक पासून ते उंबरठाच वाहून गेला'' इथपर्यंतच्या ओळी मला विस्कळीत वाटतात. कवितेचा आनंद मिळत नाही. 'अंगणातली माती आत बाहेर होत आहे' असू दे नाही तर ’फुलं सांभाळायची कि
उंबरठा नसलेले घर’ यात ओळी चांगल्या आलेल्या असूनही एका सलग थीमची मजा घेता येत नाही. अर्थात कवीच्या मनातल्या कल्पना आणि अर्थ वाचकाच्या कल्पना आणि अर्थाशी जुळलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही आपलं आपल्याला काही पोहोचतं का इतक्याच शोधात असतो. आपल्या कवितेवर आम्हाला चर्चा करतांना मजा आली. आभार लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

26 Jun 2014 - 11:40 am | संजय क्षीरसागर

डिबी, मला तरी मांडणी विस्कळीत वाटली नाही. अर्थात, मिकाच्या भावना, तो स्वतःच स्पष्ट करेल. पण मला पोहोचलेला अर्थ असा :

माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का”

स्वच्छंद आणि रुटीन-आयुष्य, यातली उंबरठा ही सीमा आहे. स्वच्छंद आपल्याला सतत खुणावत असतो, उंबरठा ओलांडावासं कैकदा वाटतं पण रोजचं रुटीन, ते साहस करु देत नाही.

`मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो' या अप्रतीम कवितेत, संदीप खरे म्हणतो :

मी जुनाट दारा परी किरकीरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो,
तो लंघून चौकट पार निघाया बघतो |

....ही चौकट पार करणं मिकाच्या कवितेचा उंबरठा वाहून जाणं आहे. तुमच्या मैत्रिणीला बहुदा, तो अर्थ पोहोचला नसावा आणि त्यामुळे पुढचे संदर्भ लागले नसतील.

काय झालं कुणास ठाऊक पण
गेला एकदाचा
रात्रभर बरसून
पाऊस फुलं देऊन.. गेला
आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल

पावसानं चित्तवृत्ती फुलल्या होत्या. त्या फुलांनी स्वछंदाची ओढ लावली होती. उंबरठा वाहून गेला होता. पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे अंगणात शांतता पसरलीये. पुन्हा ती ओढ विरतेयं.
.........

पण आता अंगणातली माती
चक्रीवादळात अडकल्यासारखी
आत-बाहेर होतेय

ही माती म्हणजे आपण आहोत. आपली द्विधा मनस्थिती आहे. घरात जावं, पुन्हा रुटीनला लागावं की मोकळ्या अंगणात थांबावं हे चक्रीवादळ, मनाला घेरतंय. एकदा आत जावंसं वाटतंय, तर पुन्हा अंगण खुणावतंय.
-----

अंगणातली फुलं सांभाळायची कि
उंबरठा नसलेले घर
तेच उमजत नाहीये तिला

स्वच्छंदाची उधळण झालेली फुलं वेचावी की पुन्हा घरात शिरावं हा मनाला संभ्रम आहे. कारण उंबरठा वाहून जाण्याची संधी; ती चौकट लंघून जाण्याची उर्मी, पुन्हापुन्हा येत नाही.
-----

काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय

हे रिपीटिशन, थीम हायलाइट करतं.... तुम्हाला परत एकदा कविता वाचाशी वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2014 - 1:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आस्वादक म्हणुन विस्कळीत ओळीअर्थांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न उत्तम वाटला. आवडलेली कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे आता पुन्हा वाचण्यासारखं आणि शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही, जे वाटलं ते लिहिलंच आहे तुम्हीही आणि मीही....!

दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2014 - 1:29 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

माझ्या कवितेवर इतका विचार आणि चर्चा झाली हे वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं. मुळात त्या कवितेचा अर्थ मी देखिल इतक्या विस्तृतपणे मांडू शकेन कां यावर मलाच शंकाच आहे. तुम्ही उभयतांनी केलेले रसग्रहण अगदी तंतोतत आहे असे जरी म्हणता येत नसलं तरी मला अभिप्रेत असलेला भावर्थ तुमच्या रसग्रहणाशी खुप जवळ जातो. मला शेवटच्या ओळी अश्या कां लिहावाश्या वाटल्या हे मलाही सांगता येणार नाही, पण ज्या मातीचा मी उल्लेख केलाय ती माती त्या घराला धरुन होती (पाऊस येऊन उंबरठा वाहून जाण्याआधी). त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे. असो, मला खरचं नाही सांगता येणार.
तरीही तुम्ही माझी कविता इतक्या मनःपूर्वक वाचली आणि आपला विस्तृत अभिप्राय मांडण्याचे कष्ट घेतले यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

आणि, या खुलाशानं

त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे

मी केलेल्या रसग्रहणाचं सार्थक झालं!

इतकं वेगळं काही बघितल्याच्या आनंदात असतानाच, एक जरा खटकलं- उंबरठा कालच वाहून गेलाय तर "आजकाल असं होतंय" याला काय संदर्भ? "आज असं होतंय" हे जास्त नैसर्गिक झाले असते ?

तरीही इतकी सुंदर कल्पना ज्यांच्या डो़क्यातून निघाली त्यांच्यासमोर काय बोलायचे हो? अनेक धन्यवाद!

अनुप ढेरे's picture

26 Jun 2014 - 10:49 am | अनुप ढेरे

कविता आवडली. प्रा.डाँ.च रसग्रहण पण छान

पैसा's picture

26 Jun 2014 - 10:54 am | पैसा

सुरेख रचना! प्रा.डो. बिरुटे सरांचं रसग्रहणही आवडलं.

पद्मश्री चित्रे's picture

26 Jun 2014 - 12:36 pm | पद्मश्री चित्रे

सुंदर कविता. अगदी ओळ नि ओळ मनाला भिडली.

एस's picture

26 Jun 2014 - 11:33 pm | एस

कविता पुनःपुन्हा वाचतोय. 'भय इथले...' डोक्यात वाजत राहतेय आणि आपली ही कविता जणू उर फुटूून धावत सुटलीय.

देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत

निव्वळ टचिंग!!!

वॉल्टर व्हाईट's picture

28 Jun 2014 - 4:14 am | वॉल्टर व्हाईट

वाहुन गेलेला उंबरठा ह्या रुपकाने प्रत्येक वाचकाच्या मनात आपापले कल्पनाविश्व उभे राहिले नसल्यास नवलच. बहुदा अशी ताकतवान रुपकेच अश्या भावविभोर करणार्‍या कवितांना इतके परिणामकारक बनवत असावीत.

कवितेतली जी इन्विजिबल प्रोटोगॉनिस्ट आहे तिची प्रत्येक वाचकाने आपापली तरल प्रतिमा बनवली असणार.. कुणी गेलेली आजी, कुणाची परगावी असलेली आई तर कुणाची लग्नघरी नांदणारी बहिण अन कुणाची लॉस्ट प्रेयसी. सगळ्यांच्या या प्रतिविश्वात प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख ही भावना मात्र सारखी, सगळ्या वाचकांची प्रतिविश्वं एका माळेत ओवणारी.

ब्राव्हो !

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jun 2014 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

मिका रॉक्स

अनिदेश's picture

30 Jun 2014 - 12:42 pm | अनिदेश

सुंदर कविता.....!आवडलं.

मिसळलेला काव्यप्रेमी फार सुंदर कविता...बर्‍याच दिवसांनी खुप सुंदर कविता वाचली. कवि म्हणुन तुम्ही खरच फार मोठे आहात साहेब.

मुक्त विहारि's picture

23 Jul 2014 - 7:33 pm | मुक्त विहारि

आवडली..

फिझा's picture

29 Jul 2014 - 11:14 am | फिझा

छान.......मस्त !!

रातराणी's picture

22 Mar 2016 - 11:54 pm | रातराणी

!!

प्राची अश्विनी's picture

23 Mar 2016 - 8:44 am | प्राची अश्विनी

क्या बात!