मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू जणू स्वतंत्र झाल्या आहेत ---- बैठकीच्या खोलीत कोपर्‍यातल्या मेजावर एक फुलदाणी होती .. काल रात्रीपर्यंत होती सकाळी अंगणात सापडली पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं पदरात पडेल या आशेने अंगणात आली असावी बहुदा ---- देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत ---- तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे उजाडल्यापासून बघतोय थडाथड दारं आपटतायत बहुदा तिची डायरीही असावी त्यात ---- काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसून पाऊस फुलं देऊन.. गेला आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल ---- पण आता अंगणातली माती चक्रीवादळात अडकल्यासारखी आत-बाहेर होतेय ----- अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला ----- काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२४/०६/२०१४)

वाचन 10900 प्रतिक्रिया 0