छायाचित्रण भाग १०. एक्स्पोजर ट्रायॅंगल आणि हिस्टोग्राम

एस's picture
एस in काथ्याकूट
31 May 2014 - 2:59 am
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना
छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे
छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्
छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप्
छायाचित्रण भाग ७. लेन्स फिल्टर्स
छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन)
छायाचित्रण भाग ९. छायाप्रकाशाचा खेळ

सूची
       ०१. कॅमेरा एक्स्पोजर म्हणजे काय?
       ०२. एक्स्पोजर ट्रायअ‍ॅन्गल (उद्भासन त्रिकोण)
       ०३. अ‍ॅपर्चरचा प्रभाव
       ०४. शटर इन्टर्वलचा प्रभाव
       ०५. आयएसओ स्पीडचा प्रभाव
       ०६. कॅमेरा हिस्टोग्राम (स्तंभालेख) कसा वाचावा?
       ०७. हिस्टोग्रामवर टोनचा प्रभाव
       ०८. हिस्टोग्रामवर कॉन्ट्रास्टचा प्रभाव

      नमस्कार मिपाकर्स! आजचा हा दहावा भाग. आतापर्यंतच्या प्रवासात आपली मूलभूत तयारी झालेली आहे. छायाचित्रणासाठी आवश्यक साहित्य, त्यांची तांत्रिकता, प्रतिमेवर परिणाम करणारे कॅमेर्‍याबाह्य घटक उदा. विषयवस्तूंचा रचनाविचार व प्रकाश हे सगळे आपण पाहिले. आता कॅमेर्‍याचा वापर करून प्रत्यक्ष प्रतिमा घ्यायची वेळ आली आहे.

कॅमेरा एक्स्पोजर म्हणजे काय?

      कॅमेरा उद्भासन (एक्स्पोजर) म्हणजेच कॅमेर्‍याच्या प्रतिमासंवेदकावर पडणारा प्रतिएकक प्रकाश. कॅमेरा उद्भासन किती जास्त किंवा किती कमी आहे यावर कॅमेर्‍यात कैद होणारी प्रतिमा किती गडद किंवा किती फिकट येईल हे अवलंबून असते. सुयोग्य एक्स्पोज झालेली प्रतिमा मिळवणे-न मिळवणे हे कॅमेर्‍याच्या फक्त तीन सेटिंग्जवर अवलंबून असते. हे तीनही घटक एकमेकांशी संबंधित असतात आणि डीएस्एल्आर कॅमेर्‍याचा सर्वात मोठा फायदा हा की, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार हे तिन्ही घटक हवे तसे कमीजास्त करू शकता. काही हायएण्ड पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यांत तशी सोय असते, पण त्यात हवी तेवढी रेंज मिळत नाही.

      एक्स्पोजर म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपण मानवी डोळ्याचे उदाहरण घेऊया. आपल्याला तसं पाहिलं तर कमी प्रकाशात किंवा जास्त प्रकाशातही तसे चांगले स्पष्ट दिसते. कमी उजेडाच्या खोलीतून बाहेर उन्हात आल्यावर एकदम आपल्याला लगेच सगळं नीट दिसू लागत नाही. डोळे दिपतात. तसेच रात्री छानपैकी जेवणंबिवणं चालू असताना मध्येच कट्कन वीज गायब होते, तेव्हा काही मिनिटांसाठी आपण जवळजवळ आंधळे होतो. दोन्ही परिस्थितींमध्ये काही मिनिटांत आपले डोळे प्रकाशसंवेदी पेशींचे योग्य समायोजन करून आपली दृष्टी बर्‍यापैकी परत आणतात. (जास्त उजेडात रंग ओळखू शकणार्‍या दंडगोलाकार पेशी कार्यान्वित होतात, तर कमी उजेडात प्रकाशाची तीव्रता जाणू शकणार्‍या शंक्वाकार पेशी सक्रिय होतात.) पण एवढेच नव्हे, तर डोळ्यांच्या बाहुल्या यादेखील लहानमोठ्या होऊन डोळ्यांत जाणार्‍या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करतात. आणि पापण्यांची तोरणं तर राहिलीच की. नेत्रपल्लवीचा वापर नेहमी इशारा करण्यासाठीच होतो असे नाही. त्यातूनही आपण कळतनकळत आपल्या डोळ्यांची दृष्टी नियंत्रित करत असतो.

      कॅमेरा उद्भासन नियंत्रित करणारे तीन घटक - आयएसओ स्पीड, अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वल हे अनुक्रमे डोळ्यांच्या प्रकाशसंवेदक पेशी, बाहुल्या आणि पापण्या यांच्याप्रमाणेच काम करतात. ह्या प्रत्येक घटकाचे उद्भासनाच्या प्रक्रियेतील स्थान व कार्य आपण पाहूया.

एक्स्पोजर ट्रायअ‍ॅन्गल (उद्भासन त्रिकोण)

      वरील प्रतिमा पुरेशी बोलकी आहे. कॅमेर्‍याच्या एक्स्पोजरवर परिणाम करणारे तीन घटक वर दर्शविले आहेत. प्रतिमा नीट पाहिल्यास त्यातील प्रत्येक घटकाचे मूल्य कमीजास्त केल्यास काय परिणाम मिळतो हे दाखवले आहे.

अ‍ॅपर्चरचा प्रभाव

      डोळ्यांच्या बाहुल्या जशा कमीजास्त प्रकाशात प्रसरण किंवा संकुचन पावतात त्याप्रमाणे लेन्सचे अ‍ॅपर्चर हे लेन्समधून प्रकाश आत येणार्‍या छिद्राचा आकार ठरवते. (अ‍ॅपर्चरला पर्यायी मराठी शब्द 'छिद्रमान' असू शकतो हे http://www.mr.upakram.org/node/1553 येथे कळाले. मूळ शब्द सौजन्य - 'धनंजय'). अ‍ॅपर्चर हे f/1.4 (उच्चार एफ् स्टॉप वन फोर), f/2.0, f/2.8, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22 अशा पद्धतीने दर्शवले जाते. या संख्यांना फुल अ‍ॅपर्चर असे म्हणतात. f/1.4 म्हणजे मोठ्यातले मोठे अ‍ॅपर्चर, तर f/22 हे लहानातले लहान अ‍ॅपर्चर. अर्थात यापेक्षाही मोठे वा लहान अ‍ॅपर्चर उपलब्ध असू शकते, उदा. Leica 50mm f/0.95 Noctilux-M Aspherical Manual Focus Lens. या प्रत्येक संख्येनुसार अ‍ॅपर्चरचा आकार दुप्पटीने लहान वा मोठा होत जातो. उदा. f/1.4 च्या तुलनेत f/2.0 चा आकार निम्माच आहे. म्हणजेच जरी 1.8 ही संख्या 22 पेक्षा खूपच लहान वाटली तरी अ‍ॅपर्चरच्या आकारानुसार त्यांच्यातील संबंध नेमका उलटा असतो. याचे कारण म्हणजे f/stop या संख्या ही गुणोत्तरे आहेत. लेन्सच्या अ‍ॅपर्चरचा व्यास आणि लेन्सचे अभिधानित नाभीय अंतर यांचे गुणोत्तर म्हणजे f/stop. उदा. AF NIKKOR 50mm f/1.8D ह्या लेन्सचे अभिधानित नाभीय अंतर आहे ५० मिमी, तर f/stop आहे f/1.8. म्हणजेच या लेन्सच्या अ‍ॅपर्चरचा व्यास हा ५०मिमी / १.८ = २७.७७ मिमी इतका आहे. त्याचबरोबर Nikon AF-S Nikkor 50mm f/1.4G च्या अ‍ॅपर्चरचा व्यास हा ५० मिमी / १.४ = ३५.७१ मिमी, तर वर उल्लेखलेल्या लायकाच्या f/0.95 लेन्सच्या अ‍ॅपर्चरचा व्यास हा ५० मिमी / ०.९५ = ५२.६३ मिमी इतका मोठ्ठाच्या मोठ्ठा आहे...!

      खालील उदाहरणात आपण ५० मिमी लेन्ससाठी विविध f/stop संख्या आणि त्यांच्या तुलनेत अ‍ॅपर्चरचा आकार पाहूयात.

f/stop संख्या

(लेन्सचे अभिधानित नाभीय अंतर)

अ‍ॅपर्चर व्यास (मिमी)

(५० मिमी भागिले f/stop)

अ‍ॅपर्चर त्रिज्या (मिमी)

(व्यासाच्या एक-द्वितियांश)

अ‍ॅपर्चर क्षेत्रफळ (चौरस मिमी)

(π गुणिले त्रिज्येचा वर्ग)

f/1.0

50.0

25.0

1,963

f/1.4

35.7

17.9

1,002

f/2.0

25.0

12.5

491

f/2.8

17.9

8.9

250

f/4

12.5

6.3

123

f/5.6

8.9

4.5

63

f/8

6.3

3.1

31

f/11

4.5

2.3

16

f/16

3.1

1.6

8

f/22

2.3

1.1

4

      लेन्सच्या अ‍ॅपर्चरच्या क्षेत्रफळानुसार प्रतिमेतील चित्रणकक्षा (डेप्थ् ऑफ् फिल्ड) ठरते. अ‍ॅपर्चरचे क्षेत्रफळ आणि चित्रणकक्षा यांमध्ये व्यस्त प्रमाण असते. म्हणजेच मोठे अ‍ॅपर्चर वापरल्यास तितकीच निरुंद चित्रणकक्षा मिळू शकते. जास्तीत जास्त भागातील वस्तू सुस्पष्ट याव्यात यासाठी लहानात लहान अ‍ॅपर्चर वापरावे लागते.

      लेन्सच्या कमाल अ‍ॅपर्चर मूल्यावरून लेन्स किती फास्ट किंवा स्लो आहे ते ठरते. उदा. बर्‍याचशा प्राइम लेन्सेस ह्या f/2.8 किंवा त्यापेक्षा मोठे अ‍ॅपर्चर असलेल्या असतात. त्यामुळे अशा लेन्सेसना 'फास्ट लेन्स' असे म्हटले जाते. याउलट स्वस्तातल्या कन्झ्युमर झूम लेन्सेस जास्तीत जास्त f/5.6 पेक्षा जास्त मोठे अ‍ॅपर्चर देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा लेन्सेस वापरून जास्तीत जास्त बोके परिणाम मिळवणे किंवा कमी प्रकाशात सुस्पष्ट छायाचित्रण करणे हे जवळजवळ अशक्य होते. एखाद्या लेन्सचे कमाल अ‍ॅपर्चर किती आहे हे त्या लेन्सवर लिहिलेले असते. झूम लेन्सेसच्या बाबतीत त्यांच्या झूम रेंजच्या दोन टोकांच्या नाभीय अंतरांवर कमाल अ‍ॅपर्चर किती मिळू शकेल हे दर्शविलेले असते. उदा. AF-S Nikkor 70-300mm f/3.5-5.6 लेन्स. या लेन्सच्या ३०० मिमी नाभीय अंतर सेटिंगवर मिळू शकणारे जास्तीत जास्त अ‍ॅपर्चर हे f/5.6 एवढेच आहे.

      लेन्स 'स्टॉप डाउन' करणे म्हणजे अ‍ॅपर्चर कमी करणे. उदा. लेन्स जरी f/1.4 ची असली तरी f/2.8 किंवा f/5.6 पर्यंत लहान अ‍ॅपर्चर वापरणे म्हणजे लेन्स स्टॉप डाउन करणे. असे करण्याचे मुख्य कारण म्हणजे खूपच वाइड अ‍ॅपर्चरला लेन्स म्हणावी तितकी शार्प राहत नाही. कुठल्याही लेन्सचा सर्वात सुस्पष्ट परिणाम हा त्या लेन्सच्या कमाल अ‍ॅपर्चर मूल्याच्या एक ते दोन 'स्टॉप' कमी अ‍ॅपर्चरला मिळतो. अ‍ॅपर्चर मूल्यांच्या प्रमाणित विभागणीला अ‍ॅपर्चर स्टॉप असे म्हणतात. उदा. f/1.0 च्या निम्मे अ‍ॅपर्चर f/1.4 आहे. म्हणजे लेन्स एका स्टॉपने खाली आणली. स्टॅन्डर्ड अ‍ॅपर्चर स्टॉप मूल्यांना छायाचित्रणाच्या तांत्रिक बाजूत महत्त्व आहे. कारण त्या तुलनेत शटर इन्टर्वल आणि आयएस्ओ स्पीड यांच्याही प्रमाणित मूल्यसंख्यांचा तक्ता असतो. आजकाल डिजिटल युगात या सगळ्या संख्या आणि त्यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण लक्षात ठेवायचे कारण उरलेले नाही. तुम्ही सेट केलेले एक्स्पोजर हे सुयोग्य आहे की नाही हे कॅमेरा लगेच तुम्हांला व्ह्यू-फाइंडरमध्ये सांगतोच. मग पटकन त्याप्रमाणे अ‍ॅपर्चर, आयएस्ओ स्पीड, शटर इन्टर्वल वगैरे कमी जास्त करून आपण हवी तशी प्रतिमा मिळवू शकतो. पण निदान दुपारचा लख्ख सूर्यप्रकाश आणि संध्याकाळी गोधूळिवेळचा मंद प्रकाश यांवेळी किती शटर इन्टर्वल वापरणे योग्य राहील, किती आयएस्ओ वाढवावे लागेल, किती अ‍ॅपर्चर बदलावे लागेल या सगळ्याची सरधोपट माहिती तरी असायला हवी.

शटर इन्टर्वलचा प्रभाव

      प्रतिमा घेताना कॅमेर्‍याचे शटर जितका वेळ उघडे राहते त्या वेळास शटर इन्टर्वल असे म्हणतात. यालाच कित्येकजण शटरस्पीड असा चुकीचा शब्दही वापरतात. शटरस्पीड म्हणजे ज्या वेगाने शटर उघडले जाते वा बंद होते तो वेग. हा वेग कधीच बदलत नाही. म्हणजेच शटर उघडे राहण्याचा कालावधी 1/10 सेकंद असो वा 1/1000 सेकंद, शटरस्पीड हा कायम राहतो. फोकलप्लेन प्रकारच्या शटरमध्ये दोन पडदे एकापाठोपाठ खाली येतात. यातील एका पडद्यामुळे शटर उघडले जाते, तर दुसर्‍या पडद्यामुळे ते बंद होते. पेटल प्रकारच्या शटरमध्ये तीन किंवा जास्त पाकळ्या मध्यातून बाहेर उघडल्या जातात व मिटतात. इलेक्ट्रॉनिक शटरमध्ये सरळसरळ कॅमेराचा संवेदकाचा विद्युतपुरवठा चालूबंद करून शटरचा परिणाम साधला जातो. तेव्हा शटरस्पीड असे कोणी म्हणत असेल तर त्याला शटर इन्टर्वल म्हणायचे आहे असे आपले आपणच समजून घेणे. ;-)

      शटर इन्टर्वल आणि कॅमेरा उद्भासन यांचे एकमेकांशी समप्रमाण आहे. म्हणजे जितका जास्त शटर कालावधी तितका जास्त वेळ प्रतिमासंवेदकावर प्रकाश पडत राहणार. म्हणजेच जेव्हा बाहेर जास्त प्रकाश असतो तेव्हा लहान शटर कालावधी आणि कमी प्रकाश असतो तेव्हा मोठा शटर कालावधी वापरल्यास प्रतिमासंवेदकावर प्रतिमा उमटण्यासाठी योग्य तेवढा प्रकाश पडू शकतो.

      वाइड शटर इन्टर्वल (स्लो शटरस्पीड इन ले मॅन्स लॅन्ग्वेज :-) ) हे शक्यतो जाणीवपूर्वक गतीचा प्रभाव दाखवायचा असेल तर वापरतात. उदा. धबधब्यांच्या दुधाच्या प्रवाहासारख्या प्रतिमा किंवा आकाशातील तार्‍यांचे पथक्रमण दर्शवणारे स्टार ट्रेल्स. अशा छायाचित्रणात अ‍ॅपर्चर लहान ठेवावे लागत असल्याने एखादी साधी थर्डपार्टी वाइडअ‍ॅन्गल लेन्सही चालू शकते. पण कॅमेरा हलून प्रतिमेतील स्थिर असणार्‍या विषयवस्तू धूसर येऊ नयेत यासाठी लॉन्ग एक्स्पोजरच्या वेळी ट्रायपॉडसारखा आधार द्यावा लागतो. स्पोर्टस् फोटोग्राफी किंवा वाइल्ड फोटोग्राफीसारख्या ठिकाणी मात्र तुम्हांला लहानातले लहान शटर इन्टर्वल किंवा फास्ट शटरस्पीड वापरवे लागेल. नाहीतर तुमच्या प्रतिमा धूसर येतील. आणि पुरेसा प्रकाश संवेदकावर कैद करण्यासाठी इतका कमी वेळ मिळणार असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त अ‍ॅपर्चर देणारी फास्ट प्राइम लेन्स वापरावी लागेल. यासाठीच असे छायाचित्रकार हे मोठ्या तोफेसारखी दिसणारी AF-S NIKKOR 600mm f/4G ED VR किंवा Canon EF 600mm f/4L IS II USM लेन्स वापरतात.

आयएसओ स्पीडचा प्रभाव

      आयएसओ स्पीड म्हणजे कॅमेरा संवेदकाची प्रकाशाच्या तीव्रतेबद्दलची संवेदनक्षमता. आयएसओ स्पीड हा साधारणतः ISO100, ISO200 ते ISO8000 पर्यंत दर्शवलेला असतो. पूर्वी १०० चे, २०० चे, ४०० चे फिल्म रोल मिळायचे. यातले हे आकडे म्हणजे त्या फिल्मचा आयएसओ स्पीड असत. त्यानुसार फिल्मला सुद्धा फास्ट फिल्म किंवा स्लो फिल्म म्हणत असत. फिल्म युगात एकदा एका आयएसओ स्पीडची फिल्म लोड केल्यावर फक्त अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वलच्या जिवावर खेळायला लागत असे ते डिजिटल युगात पूर्ण बदलून गेले आहे. आता 100 पासून ते अगदी 8000 पर्यंत निरनिराळी आयएसओ स्पीड मूल्ये उपलब्ध असतात. आयएसओ स्पीड जसा वाढेल तसा प्रतिमेतील कुरव (नॉइज) वाढतो. त्यामुळे आयएसओ स्पीडची किंमत कमीत कमी ठेवणे जास्त चांगले. जिथे खूपच कमी प्रकाश असेल आणि आपल्याला हवे तितके कमी शटर इन्टर्वल किंवा लहान अ‍ॅपर्चर वापरता येणार नसेल तिथे मात्र नॉइज फारसा येणार नाही इतपतच आयएसओ वाढवून मग शटर इन्टर्वल आणि अ‍ॅपर्चर त्याप्रमाणात वाढविणे योग्य ठरते.

कॅमेरा हिस्टोग्राम (स्तंभालेख) कसा वाचावा?

      डिजिटल युगात जसे प्रतिमा घेणे सोपे, जलद आणि स्वस्त झाले तसेच पोस्टप्रोसेसिंग किंवा प्रतिमाप्रक्रियासुद्धा लवकर संपवता येऊ लागले. विशेष म्हणजे कॅमेरा एक्स्पोजरसाठी जास्त नियंत्रणे छायाचित्रकारांच्या हाती आली, तसेच घेतलेले उद्भासन सुयोग्य आहे की नाही हेही क्लिक केल्याकेल्या एलसीडी स्क्रीनवर पाहून सांगता येऊ लागले. नंतरही कॅमेरा उत्पादकांनी प्रतिमा नीट एक्स्पोज झाली आहे की नाही हे छायाचित्रकारांना सांगण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या योजायला सुरुवात केली. त्यामध्ये एक म्हणजे आधी केवळ प्रतिमाप्रक्रियाप्रणालींमध्येच उपलब्ध असणारी प्रतिमेचा स्तंभालेख पाहण्याची सोय ही थेट कॅमेर्‍यात करता येऊ लागली. छायाचित्रणातील तांत्रिक बाजू समजणार्‍यांसाठी कॅमेर्‍याच्या एलसीडी स्क्रीनच्या मर्यादांवर मात करणारी ही सुविधा फारच उपयोगी ठरली. अर्थात, त्यासाठी हा स्तंभालेख कसा वाचावा आणि तो योग्य येण्यासाठी आपल्या उद्भासन त्रिकोणाच्या किंमतींमध्ये नेमके काय बदल करावेत हे माहित असणे आणि त्याचा सराव असणे महत्त्वाचे.

      इथे काहीजण असाही आक्षेप घेऊ शकतात की, प्रतिमा घेताना जरी ती अंडरएक्स्पोज किंवा ओवरएक्स्पोज झालेली असली तरी आता डिजिटल प्रतिमाप्रक्रियेत ती सूधारणे सहज शक्य आहे. हम्म्, मला ते तितकेसे पटत नाही. एकतर अशा पोस्टप्रोसेसिंगमध्ये बहुमुल्य वेळ जातो आणि तुम्ही कॅमेरा घेऊन फिल्डमध्ये असायला हवात, ते संगणकाच्या पडद्यावर फोटोशॉप नावाच्या जंजाळात अडकून पडता. दुसरे म्हणजे प्रतिमाप्रक्रियेत मूळ उद्भासन सुधारता येत असले तरी त्याचे 'मार्जिन' खूपच कमी असते. तुमचे शटरइन्टर्वलचे सेटिंग चुकले असेल आणि प्रतिमा धूसर (ब्लर) झाली असेल तर ती सुस्पष्ट करणे खूपच अवघड असते.

      कॅमेरा हिस्टोग्राम हा एक आलेख असतो. क्ष-अक्षावर शून्यापासून दोनशेपंचावन्न पर्यंत रंगउठाव किंवा प्रकाशसंपृक्तता (टोनल रेंज) दर्शवलेली असते, तर य-अक्षावर या दोनशेछप्पन शेड्समधील प्रत्येक शेडमध्ये किती प्रकाशकूप (पिक्सेल) आहेत ते दाखवले जाते. आलेखाच्या डावीकडे सर्वात जास्त गडद पिक्सेल येतात तर सर्वात फिकट पिक्सेल हे एकदम उजवीकडे दर्शवतात. याचा फायदा असा की, नुसत्या स्तंभालेखाकडे बघून तुम्हांला ती किती गडद किंवा किती फिकट आली असेल याचा अंदाज करता येतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले तर प्रतिमेच्या स्तंभालेखाकडे पाहून एखादी प्रतिमा नीट उद्भासित (एक्स्पोज) झाली आहे की नाही, नसेल तर ती अंडरएक्स्पोज झालीय की ओव्हरएक्स्पोज झालीय, अंडरएक्स्पोज झालेल्या प्रतिमेत पूर्ण काळसर भाग किती असेल आणि रॉ प्रोसेसिंगमध्ये नंतर सावलीतल्या भागातील डिटेल्स पुन्हा मिळवता येतील का, त्याचबरोबर ब्लोन-आउट म्हणजेच ओव्हरएक्स्पोज झालेल्या प्रतिमेत हायलाइट्स किती असतील आणि तेवढ्या भागाला प्रतिमाप्रक्रियेत पुन्हा थोडे गडद करता येईल का या व अशा बर्‍याच प्रश्नांची उत्तरे एखादा कसलेला छायाचित्रकार लगेच देऊ शकतो. याचा तेवढा उपयोग पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट प्रकारचे कॅमेरे वापरणार्‍यांना तेवढा कळणार नाही कारण कॅमेर्‍याच्या एलसीडी स्क्रीनवर प्रतिमा पाहून लगेच ती व्यवस्थित उद्भासित झाली आहे की नाही हे छायाचित्रकारांना कळेलच असा त्यांचा समज असतो. पण कॅमेर्‍याच्या एलसीडी स्क्रीनचे एवढेसे रिझोल्यूशन, स्क्रीनचा लहान आकार, स्क्रीन कॅलिब्रेशन भवतालच्या उजेडाला साजेसे असे केलेले नसणे आणि सोळा-सतरा-अठरा मेगापिक्सेलच्या प्रतिमेचे सुमारे ९२६००० एवढ्या लहान आकाराच्या पूर्वदृश्यात रुपांतर करावे लागणे या सगळ्या बाबींमुळे एलसीडी स्क्रीन काही झाले तरी खूपदा प्रतिमा चांगली उद्भासित झालेली आहे असे भासवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा स्क्रीनवर केवळ प्रतिमा पाहून समाधानी होऊन चालत नाही. प्रतिमेबरोबरच तिचा स्तंभालेखही पहावा लागतो. स्तंभालेख जर जास्त डावीकडे झुकला असेल तर प्रतिमा थोडी अंडरएक्स्पोज झालीये आणि स्तंभालेखात उजवीकडे उंचच उंच मनोरे दिसले व त्यामानाने डावीकडे सपाटी असेल, तर अशी प्रतिमा ओव्हरएक्स्पोज झालीये असे समजायला हरकत नाही - मग भलेही ती प्रतिमा एलसीडी स्क्रीनवर ठीकठाक का दिसत असेना. हौशी छायाचित्रकार आणि व्यावसायिक, अनुभवी छायाचित्रकारांमधील फरक दाखवणारा हाच भाग आहे.

      योग्य उद्भासित झालेल्या प्रतिमेचा स्तंभालेख हा शक्यतो सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सांख्यिकीतील नॉर्मल डिस्ट्रिब्युशन दर्शवतो, म्हणजेच जास्तीत जास्त पिक्सेल हे मध्यमपणे एक्स्पोज झालेले असतात आणि क्ष-अक्षावर ० ते २५५ या दोन्ही टोकांच्या मधल्या भागात जास्तीत जास्त उंच स्तंभ असतात. असा स्तंभालेख हा थोडासा देवळाच्या दारातील मोठ्या घंटेप्रमाणे दिसतो. याच्या सर्व स्तंभांच्या सर्वोच्च उंचीची टोके जोडणारा वक्र काढल्यास तो घंटेच्या बाह्याकाराप्रमाणेच दिसू लागतो (बेल कर्व्ह). अर्थात कलेतील रचनात्मकतेला असे सांख्यिकीचे कुंपण घालता येत नाही. त्यामुळे एखादी अतिशय सुंदर लो-की प्रकाश असलेली प्रतिमा स्तंभालेखात जास्तीत जास्त डावीकडे झुकलेली दिसेल, तर हाय-की प्रतिमेच्या स्तंभालेखात जास्तीत जास्त प्रकाशकूप हे ब्लो-आउट झालेले आढळून येईल.

हिस्टोग्रामवर टोनचा प्रभाव

      कॅमेरा स्तंभालेखात जिथपर्यंत सर्वात जास्त प्रखर असणारे प्रकाशकूप आहेत तिथून सर्वात जास्त गडद असणार्‍या प्रकाशकूपांपर्यंतच्या टप्प्याला त्या प्रतिमेची किंवा विषयवस्तूची 'रंगउठाव कक्षा' (टोनल रेंज) असे म्हणतात. जास्त टोनल रेंज म्हणजे प्रतिमेत खूप गडद आणि खूप प्रखर अशा दोन्ही प्रकारचे विभाग असणे. उदा. खिडकीतून अथवा गुहेतून बाहेरच्या दृश्याची घेतलेली प्रतिमा. अशा प्रतिमेत स्तंभालेख हा दोन्ही बाजूंना उंच आणि मध्यभागी खोलगट असा बशीसारखा दिसेल.

हिस्टोग्रामवर कॉन्ट्रास्टचा प्रभाव

      वैधम्र्य किंवा कॉन्ट्रास्ट म्हणजे प्रतिमेतील सर्वात गडद आणि सर्वात फिकट भागांच्या रंगउठावातील फरक. एखाद्या प्रतिमेत वैधम्र्य जास्त असेल तर अशा प्रतिमेचा स्तंभालेख हा जास्तीत जास्त पसरट असतो. याउलट प्रतिमेत मिड-टोन्सचा प्रभाव जास्त असेल तर या प्रतिमेचा स्तंभालेख हा जास्तकरून मध्यभागीच एकवटलेला दिसतो.

      प्रतिमेत जर खूप गडद असलेला पण आकाराने प्रतिमेत नगण्य असा काही भाग असेल तर अशा प्रतिमेच्या स्तंभालेखात जरी एरवी छानसा घंटेचा आकार दिसला तरी डावीकडे एकदोन चुकार उंचच्या उंच मनोरे दिसतील. तशाच प्रकारे काही भाग ब्लो-आउट झाला असल्यास असेच मनोरे उजवीकडे दिसतील. आजकाल डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये प्रतिमेतील ब्लो-आउट झालेले भाग आपोआप ब्लिंक होतील अशी सोय असते. हा योग्य उद्भासन मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.

      हा भाग लहानच ठेवला आहे. खूप वेळाने खूप मोठा बकाणा भरण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने छोटा छोटा घास घेऊयात... *yes3*

जाताजाता
Two photographers walking along a street and they pass a beggar sitting with his hat up-ended on the pavement, begging for money. One guy keeps walking. The other stops. Later when they catch up with each other the first guy says to the other. "Hey I saw you stop for that beggar. What did you give him?" "Oh" says the first guy, "1/125th at f5.6" ... ;-)

क्रमशः

प्रतिक्रिया

अंतु बर्वा's picture

31 May 2014 - 4:27 am | अंतु बर्वा

सुंदर माहीती!! हिस्टोग्रामचा उपयोग पहिल्यांदा कळाला.

कंजूस's picture

31 May 2014 - 6:18 am | कंजूस

झकास लिहिते आहेस .फोकल स्टॉपचे आकडे 1.4,2.0.2.8,4.0इत्यादी 1.4पटीत असतात कारण भिंगाचा व्यास इतका वाढवला अथवा कमी केला की भिँगाचा उघढा राहाणारा भाग दुपटीने वाढतो अथवा कमी होतो .

एस's picture

31 May 2014 - 4:32 pm | एस

धन्यवाद, मी फार वाईट लिहितो आहे. (माझ्या सर्व लेखांत सर्वसामान्य सर्वनाम स्त्रीलिंगी मुद्दामच वापरले आहे. त्याबद्दल अदितीचं वाक्य उद्धृत करत आहे:

स्त्रिया फोटो काढतात, फोटोग्राफर म्हटल्यावर ती बाईसुद्धा असू शकते असं नेहेमीपेक्षा वेगळं दिसणारं व्याकरण वापरल्याबद्दल खास आभार.

याची प्रेरणा विख्यात वृत्तछायाचित्रकार महिला होमाई व्यारावाला या होत. त्यांची एक प्रतिमा मी छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार या भागात दिली होती.

वरचा खुलासा बेसनलाडूंच्या ह्या प्रतिसादावरून प्रेरित. ;-)

फोकल स्टॉपचे आकडे 1.4,2.0.2.8,4.0 इत्यादी 1.4 पटीत असतात

फोकल स्टॉप हे साधारणत: तीन श्रेण्यांमध्ये दर्शवले जाते. उदा.

'फुल एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.4, f/2, f/2.8, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22, f/32...

'हाफ् एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.2, f/1.4, f/1.7, f/2, f/2.4, f/2.8, f/3.3, f/4, f/4.8, f/5.6, f/6.7, f/8, f/9.5, f/11, f/13, f/16, f/19, f/22...

'वन-थर्ड एफ्-स्टॉप्स' श्रेणी - f/1.0, f/1.1, f/1.2, f/1.4, f/1.6, f/1.8, f/2, f/2.2, f/2.5, f/2.8, f/3.2, f/3.5, f/4, f/4.5, f/5.0, f/5.6...

यातील प्रत्येक फुल एफ्-स्टॉप हा आधीच्या फुल एफ्-स्टॉपपेक्षा म्हणजेच सुमारे ०.७०७१ इतक्या पटीने लहान असतो. ही लॉगरिदमची उतरती भूमितीय श्रेणी आहे.

सारांश असा की, किमान फुल एफ्-स्टॉपची f/1.0, f/1.4, f/2, f/2.8, f/4, f/5.6, f/8, f/11, f/16, f/22, f/32 ही श्रेणी जरी ढोबळ मानाने लक्षात ठेवली तरी आपण किती अ‍ॅपर्चर वापरतोय हे कळून मग त्यायोगे जसे चौरा म्हणताहेत तसे आयएसओ किंवा शटर इन्टर्वल मध्ये वाढ-घट करून योग्य उद्भासन कमीतकमी प्रयत्नांत मिळवता येते.

स्पा's picture

31 May 2014 - 8:58 am | स्पा

एकच नंबर सुरुये सिरिज.

nikon 50 mm तर कडक आहेच पण मी निकोन 35 mm f1.4 घेतलीये ती 50 चाही बाप आहे . जबराट पोट्रेट येतात

एस's picture

2 Jun 2014 - 8:51 pm | एस

35 mm f1.4 मला काय इतकी आवडली नाही. किंचित डिस्टॉर्शन वाटले. ५०मिमी इतकी शार्प पण नाही वाटली. पोर्ट्रेट लेन्स मात्र नक्कीच नाही. DX प्रकारच्या कॅमेर्‍यांवर सुद्धा परिणामी नाभीय अंतर सुमारे ५२.५ मिमी इतकेच येत असल्याने पोर्ट्रेट्समध्ये कान किंचित मोठे येतात. त्यापेक्षा ५० मिमी किंवा ८५ मिमी चांगलीय. अर्थात पोर्ट्रेट्स साठी सर्वात सुयोग्य परिणामी नाभीय अंतर किमान ८५ ते ३०० मिमी असायला हवं. त्या दृष्टीने ८५ मिमी, १०५ मिमी, १३५ मिमी, २०० मिमी, ३०० मिमी ह्या फास्ट प्राईम सर्वात क्लास. (वरील सर्व मत हे कीस काढणार्‍यांसाठी. *wink* नाहीतर ही खरंच चांगली आणि व्हॅल्यू-फॉर्-मनी लेन्स आहे.)

३५ मिमी ऑन डीएक्स फॉरमॅट हे कॉम्बिनेशन रिपोर्ताज प्रकारच्या छायाचित्रणासाठी जास्त सूटेबल आहे असं माझं मत आहे.

सुरेख लेखमाला. हिस्टोग्रामवर चा वापर मी प्रत्येक फोटोसाठी करतो.

निकोन 35 mm f1.4 घेतलीये ती 50 चाही बाप आहे . जबराट पोट्रेट येतात
स्पावड्याशी सहमत.मध्यंतरी निकॉन लेन्सची ऑफर चालु होती, त्यावेळी माझे तिर्थरुप कॅमेराच्या कामासाठीच फॉर्ट भागात गेले होते आणि तिथे त्यांनी ती ऑफर पाहिली आणि माझ्यासाठी ३५ एमएम लेन्स घेउन आले. :) पोट्रेट्स तर झकास येताच पण bokeh ही झकास मिळतो. ही लेन्स अनेक प्रकारच्या फोटोग्राफीसाठी उपयुक्त आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे In terms of composition, the 35mm lens is the closest to the focal composition of the human eye {अर्थात हे कितपत खरं आहे ते ठावुक नाही.}
हे फोटो:- { काहीही... }{शेवटचा सोडुन} ३५ एमएम लेन्स वापरुनच काढले आहेत. :)

काही रोचक दुवे :-
Why shooting with just a 35mm lens WILL improve your photography
The Top 8 Reasons Why I’m a Big Believer in 35mm Lens Photography
Why the 35mm lens is great for travel photography
सध्या माझी अभ्यासासाठी आवडती साईट :- http://35mmstreet.com/ :- 35mm Street :: Street Photography by Derek Clark

स्पा's picture

4 Jun 2014 - 10:51 am | स्पा

कुलच रे बाणा.. ;)

अजून काही वेब साईट असतील रिलेटेड तर खरड टाक बाबा

जालावर चक्कर टाकताना नविन काही सापडले तर नक्कीच कळवतो...
जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा इथे :- http://www.boston.com/bigpicture/ जातो. टॉप फोटोग्राफरांच्या नजरेतुन जग पाहताना अगदी होलसेल मधे शिकायला मिळत ! :)

ही साईट मस्त आहेच. विशेषत: तेथे रिपोर्ताज प्रकारच्या छायाचित्रणातील एकसे एक प्रतिमा पहायला मिळतात. पण ह्या साईटवर भारताचं काहीसं नकारात्मक रूपच जास्त ठसवलं जातं. विशेषतः काश्मीर, गरीबी, मूलतत्त्ववाद ह्यांचेच जास्त चित्रण असतं.

http://www.incredibleindia.org/ इथे सुपर्ब मॅटर आहे. खरंच विश्वास बसत नाही.

चौकटराजा's picture

31 May 2014 - 9:06 am | चौकटराजा

डी एसेल आर चे काही मालक यातील काहीचाही वापर न करताना दिसतात. कारण कमी नॉईज, डेप्थ ऑफ फिल्ड ,टोनल
डिस्टीब्युशन याचे फायदे काय हे त्यानी जाणूनच घेतलेले नसते. ( आहेत पैशे घे डीएसेलार ) ! सामान्य हौशींसाठी
खालील रूल्स चा वापर होउ शकतो.
१) सर्वात महत्वाचा गुण म्हणजे हव्या त्या फोटोविषयाचे फोकसिंग करता येणे.
२)लांबचा फोटो कमी छिद्र, जास्त शटर टाईम, ट्रायपॉड
३) जवळचा फोटो जास्त जास्त छिद्र , कमी शटर टाईम.
४)हलणारा विषय- कमी शटर टाईम, जास्त छिद्र
५) हलणारा विषय- मिश्रण इफेक्ट- ट्रायपोड, जास्त शटर टाईम .
६)हिस्टोग्राम मधील शिखर मधोमध दिसणे- फोटो चांगला येणार.

आपला लेख आपल्या लौकिकाला साजेसाच आहे. .

( आहेत पैशे घे डीएसेलार ) !

अगदी बरोबर चौराकाका. नुकतीच मित्रांबरोबर या विषयावर चर्चा झाली होती त्यातही बहुतेक जणांचा हाच सूर लागला. "अरे, डीएसएलआर का घेऊ नको? आहेत आमच्याकडे पैसे, घ्यायचाय आम्हांला डीएसएलआर!" मी म्हटलं एवढीच खाज आलीय तर घ्या बाबांनो. (मग डी३२००/डी५३०० घेऊ का असे काय विचारताय, डायरेक्ट डी४एस किंवा गेलाबाजार डी८००ई तरी घ्या की.) :-P
यातला चेष्टेचा भाग सोडला तर एक गोष्ट नवीन डीएसएलआर घेऊ पाहणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो. कॅमेर्‍याला सगळे पैसे घालवून मग लेन्सेस हलक्या दर्जाच्या घेण्यापेक्षा कॅमेरा शक्यतो एक-दोन मॉडेल जुना घेऊन वाचवलेले पैसे प्राइम लेन्सेसमध्ये घालवल्यास त्यातूनतरी काहीतरी फायदा होईल. किंवा कॅमेरा बॉडी अगदी जुनी पण ओळखीच्याकडून घेतली आणि ५०मिमी f/१.८ किंवा टोकिना ११-१६मिमी f/२.८ सारख्या फर्स्टक्लास लेन्सेस घेतल्या तर खर्च केलेले पैसेतरी वसूल झाल्याचे समाधान लाभेल. जसा जात्याचे बल्लवाचार्य/र्या आंब्याचा केक अगदी कुकरमध्ये मीठ वा वाळू पसरून करू शकतात, त्यासाठी त्यांना महागड्या व सोफिस्टिकेटेड ओवनची गरज लागत नाही तसेच जातीच्या छायाचित्रकारांना अगदी मोबाइलचा कॅमेरा दिला तरी त्यातूनही ते चांगल्या प्रतिमा निश्चित घेऊ शकतात.

डीएसएलआर जमेल तेव्हा घ्यायचा विचार आहे. त्यावेळी ही मालिका खूप उपयोगी होईल मला.
सध्या फक्त वाचते आहे; पण प्रत्यक्ष करून पाहिल्यावर अधिक समजेल याची जाणीव आहे.

एस's picture

31 May 2014 - 4:52 pm | एस

तुम्ही यातली मूलभूत तत्त्वे पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यातही वापरून पाहू शकता. कॅमेरा जर मॅन्युअल मोड देत असेल तर उत्तमच. नाहीतर प्रतिमा घेतल्यानंतर तिचा Exif विदा पाहून ऑटो सेटिंगवर या सगळ्या घटकांची काय मूल्ये आलीत व एखादी प्रतिमा चांगली आली असेल तर त्यामागे उद्भासन त्रिकोणाची कुठली मूल्यसंगती (कॉम्बिनेशन) कारणीभूत ठरली व वाईट प्रतिमेच्या वेळी काय चुकले हे पाहून ठेवत चला. शुभेच्छा व धन्यवाद.

एस's picture

31 May 2014 - 4:47 pm | एस

अंतु बर्वा, कंजूस, स्पा, चौकटराजा, आतिवास, सर्वांचे आभार...!

उपाशी बोका's picture

4 Jun 2014 - 3:17 am | उपाशी बोका

इतकी मेहनत घेऊन एव्हडे छान लेख लिहिलेत, म्हणून मनापासून धन्यवाद, स्वॅप्स. ही लेखमाला संपली की हे सगळे लेख एकत्रित करून १ पुस्तक काढा. बेस्टसेलर होईल.

एस's picture

4 Jun 2014 - 11:21 am | एस

ह्या मूलभूत गोष्टींपेक्षा छायाचित्रणाच्या कलेसंबंधी मी कधीतरी लिहीन. मला त्यात जास्त रस आहे. Michael Freeman यांचे "The Photographers Mind: Creative Thinking for better digital photos", किंवा Nick Brandt यांचे "On This Earth, a Shadow Falls" ही पुस्तके कधी मिळाली तर वाचून पहा. ब्रिटिश लायब्ररीत मिळतील. लिहावं तर असं लिहावं आणि फोटो काढावेत ते असे काढावेत. मी तर कःपदार्थ आहे छायाचित्रणाच्या जगात. :-)

प्रचेतस's picture

4 Jun 2014 - 9:07 am | प्रचेतस

भन्नाट लेखमाला.

वाइड शटर इन्टर्वल (स्लो शटरस्पीड इन ले मॅन्स लॅन्ग्वेज शक्यतो जाणीवपूर्वक गतीचा प्रभाव दाखवायचा असेल तर वापरतात. उदा. धबधब्यांच्या दुधाच्या प्रवाहासारख्या प्रतिमा

आता ह्यात शटर इन्टर्वल जास्त ठेवलं तर प्रतिमा बरीच ओव्हरएक्पोज होऊन जाते. तेव्हा प्रकाशाचा जास्त परिणाम कमी करण्यासाठी एनडी फिल्टर वापरणे योग्य ठरावे का? किंवा एनडी फिल्टर न वापरताही ह्या प्रतिमा कशा प्रकारे घेता येऊ शकतात?

शैलेन्द्र's picture

4 Jun 2014 - 10:43 am | शैलेन्द्र

भन्नाट लेखन स्वॅप साहेब..

आता ह्यात शटर इन्टर्वल जास्त ठेवलं तर प्रतिमा बरीच ओव्हरएक्पोज होऊन जाते. तेव्हा प्रकाशाचा जास्त परिणाम कमी करण्यासाठी एनडी फिल्टर वापरणे योग्य ठरावे का

दोन मार्ग आहेत, एकतर आयेसो किंवा/व अ‍ॅपर्चेर कमीत कमी ठेवायचे, म्हणजे आत येणारा प्रकाश कमीत कमी येतो.. जर सुरवातीला हे जमत नसेल तर प्रोग्रॅम मोड मधे शटर स्पीड ठरवुन फोटो काढुन मग त्याचा एक्सीफ डाटा बघायचा, मग तसाच मन्युअल किंवा शटर प्रायोरीटीमधे काढायचा, त्याच वेळी त्याच्या जवळच्या व्हॅल्यु वापरुन दोन चार फोटो काढुन ठेवायचे....

प्रचेतस's picture

4 Jun 2014 - 10:48 am | प्रचेतस

धन्स रे शैलेन्द्र.
आता पावसाळ्यात धबधब्यांचे फोटो काढायची संधी येईलच. तेव्हा हे प्रयोग करून बघता येतील.

मग तसाच मन्युअल किंवा शटर प्रायोरीटीमधे काढायचा, त्याच वेळी त्याच्या जवळच्या व्हॅल्यु वापरुन दोन चार फोटो काढुन ठेवायचे....

एस , मी पण असेच करतो

एस's picture

4 Jun 2014 - 11:03 am | एस

होय, जास्तीत जास्त दुधाळपणा यावा यासाठी जास्तीत जास्त शटर इन्टर्वल ठेवावे लागते. त्यासाठी खालील काही उपाय करता येतीलः
१. अगदी सकाळी किंवा संध्याकाळी आकाश अभ्राच्छादित असताना असणार्‍या कमी प्रकाशाचा फायदा घेणे.
२. तिवई म्हणजेच ट्रायपॉड वापरणे.
३. किमान २ ते ३ स्टॉप देणारा एनडी फिल्टर वापरणे. असे दोन-तीन फिल्टर स्टॅक करून (एकावर एक जुळवून) वापरावे. एनडी फिल्टर नसल्यास वेल्डिंगची १४ नंबरची काच पण वापरू शकता.
४. अ‍ॅपर्चर f/16 पेक्षा जास्त मोठे असू नये.
५. मॅन्युअल संकेंद्रिकरण करणे. (जास्तीत जास्त वाईड अ‍ॅपर्चर वापरून फोकस सेट करून ठेवणे आणि समाधान झाल्यावर मग लेन्स स्टॉप-डाऊन करणे.
६. एक्स्पोजर मीटरिंग हे सेन्टर्-वेइटेड अ‍ॅव्हरेज मोड वर ठेवणे म्हणजे कॅमेरा अल्गोरिदम हा उगाच प्रतिमेतील पाण्याचा भाग अतिउद्भासित करणार नाही.
७. शुभ्रसंतुलन (व्हाइट बॅलन्स) हे जास्त निळाई येईल असे ठेवणे. (हे कॅमेरा-कॅमेरा वर अवलंबून आहे.)
८. शटर इन्टर्वल हे Bulb मोडवर आणणे.
९. एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन हे उणे २ किंवा उणे ३ पर्यंत खाली आणणे.
१०. कॅमेरा सेट करून झाल्यावर दूरनियंत्रक (रिमोट कंट्रोल) ने उद्भासन घेणे.

प्रतिमा RAW मध्ये घेतल्यास नंतर त्यातील प्रखर प्रकाशातील डिटेल्स पोस्टप्रोसेसिंगमध्ये मिळवता येतात.

हीच तत्त्वे लॉन्ग शटर टाइम वापराव्या लागणार्‍या सर्व प्रकारच्या छायाचित्रणास लागू होतील. उदा. स्टारट्रेल्स, लाइट पेण्टिंग, आकाशातली फटाक्यांची आतिशबाजी, विजांचा कडकडाट इ.

अशा छायाचित्रणात वाइड अ‍ॅन्गल लेन्स ला पर्याय नाही.

प्रचेतस's picture

4 Jun 2014 - 1:42 pm | प्रचेतस

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हे सर्वच प्रयोग सहज करून बघण्यासारखे आहेत.

प्रतिमा RAW मध्ये घेतल्यास नंतर त्यातील प्रखर प्रकाशातील डिटेल्स पोस्टप्रोसेसिंगमध्ये मिळवता येतात.

हे कसे करायचे यावर एखादा लेख अवश्य लिहा. कारण फोटोशॉप किंवा तत्सम पोस्ट प्रोसेसिंग करणार्‍या सॉफ्टवेयरबाबत शून्य ज्ञान आहे. थोडेसे मार्गदर्शन मिळाले की पुढचे स्वतःचे स्वत:च शिकता येईल.

एस's picture

4 Jun 2014 - 1:57 pm | एस

बेसिक पोस्टप्रोसेसिंग करता एक लेख येईलच. त्यात फोटोशॉपपेक्षा फक्त प्रतिमाप्रक्रियातील मूलभूत टप्पे घेईन म्हणजे सर्वांना ते करून पाहता येईल.

प्रचेतस's picture

4 Jun 2014 - 2:09 pm | प्रचेतस

धन्यवाद.

हिस्टोग्राम नी काँट्रास्टच्या संबंधाची माहिती मला नवीन आहे. आभार!

एस's picture

5 Jun 2014 - 7:14 pm | एस

वरच्या प्रतिसादातील टिप्समध्ये अजून एक अ‍ॅड करता येईल. ते म्हणजे मल्टी-एक्स्पोजर छायाचित्रण. बर्‍याच डीएसएलआर मध्ये दोन ते तीन प्रतिमा घेऊन कॅमेर्‍यातच त्या एकावर एक अशा स्टॅक करून लाँग एक्स्पोजरसारखा परिणाम मिळवता येतो. अर्थात त्यात खूप दीर्घ शटर इन्टर्वल सारखा चांगला परिणाम मिळत नसला तरी त्यातही बरेच काही क्रिएटिव करता येण्याजोगे आहे. पण यासाठीही लेन्स तेवढ्या पटीत स्टॉप-डाऊन करणे गरजेचे असते. पाहिलंत, इथेही हा उद्भासन त्रिकोण माहित असणे किती महत्त्वाचे आहे ते! :)

या सगळ्या गोष्टी कॅमेर्‍याच्या तुमच्या ज्ञानावर आणि नियमित सरावावर अवलंबून असतात. म्हणूनच तुमचे छायाचित्रणाचे साहित्य आणि त्याच्या वापरातील बारकावे नीट समजून घ्या.

पुढील भागात मीटरींग.

उदय's picture

5 Jun 2014 - 7:54 pm | उदय

या तंत्राला ब्रॅकेटिंग असे म्हणतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. अधिक माहितीसाठी बघा: ब्रॅकेटिंग

उदय's picture

5 Jun 2014 - 7:57 pm | उदय

या तंत्राला ब्रॅकेटिंग असे म्हणतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. अधिक माहितीसाठी बघा: ब्रॅकेटिंग

एस's picture

5 Jun 2014 - 11:27 pm | एस

ब्रॅकेटिंग हे मल्टीएक्स्पोजर शिवायही वापरता येते. किंवा मल्टीएक्स्पोजरमध्ये ब्रॅकेटिंग नाही केले तरी चालते, उदा. इंटर्वल टायमर फोटोग्राफी. यात कॅमेरा ठराविक वेळाने ठराविक वेळापुरते उद्भासन घेत राहतो. इथे ब्रॅकेटिंगचा प्रश्न येत नाही. धबधब्याचा तरलपणा टिपण्यासाठी जे मल्टीएक्स्पोजर मी म्हणत होतो ते या इंटर्वल टायमर फोटोग्राफीनेही करता येते.

ब्रॅकेटिंगमध्ये प्रत्येक एक्स्पोजर हे वेगळी प्रतिमा म्हणूनच गणले जाते. तोच ब्रॅकेटिंगचा मूळ उद्देश आहे. असे वेगवेगळे फोटो नंतर प्रतिमासंस्करणात एकावर एक स्टॅक करून HDR छायाचित्रणाचा परिणाम साधता येतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2014 - 2:43 pm | llपुण्याचे पेशवेll

लै भारी लेखमाला चालू आहे. संपूर्ण वाचायला हवी. मस्तं लिहीले आहे. भरपूर मदत होईल.

एस's picture

6 Jun 2014 - 3:24 pm | एस

धन्यवाद...!

सर्वसाक्षी's picture

6 Jun 2014 - 6:07 pm | सर्वसाक्षी

व सुरेख अशी माहिती देणारा लेख. बारकावे समजावुन घेण्यास यमुळे मदत होईल. लेख पुन्हा वाचणार आहेच.

धन्यवाद

सुधांशुनूलकर's picture

8 Jun 2014 - 8:51 pm | सुधांशुनूलकर

विषेशतः भाग १, ८, ९ आणि १० जास्त आवडले.
'शटर स्पीड'ऐवजी 'शटर इंटर्व्हल' हा शब्द वापरायला सुरुवात केली आहे.
अलीकडेच एक कॅमेरा घेतला. (एसएलआर नव्हे). त्यावर प्रयोग चालू आहेत. जरा हात बसला की एक-दोन वर्षांत एसएलआर घेणार आहे.

तुम्ही यातली मूलभूत तत्त्वे पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यातही वापरून पाहू शकता. कॅमेरा जर मॅन्युअल मोड देत असेल तर उत्तमच. नाहीतर प्रतिमा घेतल्यानंतर तिचा Exif विदा पाहून ऑटो सेटिंगवर या सगळ्या घटकांची काय मूल्ये आलीत व एखादी प्रतिमा चांगली आली असेल तर त्यामागे उद्भासन त्रिकोणाची कुठली मूल्यसंगती (कॉम्बिनेशन) कारणीभूत ठरली व वाईट प्रतिमेच्या वेळी काय चुकले हे पाहून ठेवत चला.

...असंच करतो.

वाचनखूण साठवून ठेवली आहे.

झकासराव's picture

9 Jun 2014 - 9:49 am | झकासराव

दन्डवत स्वीकारा :)

एस's picture

9 Jun 2014 - 1:33 pm | एस

सर्वसाक्षी, सुधांशुनूलकर, झकासराव, आभार!

मला व्यनिमधून एक प्रश्न नुकताच विचारण्यात आला आहे. हा प्रश्न नवख्या डीएसएलआर-मालकांसाठी महत्त्वाचा वाटल्याने आणि हा लेखही त्याचसंदर्भात असल्याने याचे उत्तर धाग्यावर देत आहे. (व्यनि असल्यामुळे प्रश्नकर्त्यांचा उल्लेख इथे करत नाही).

प्रश्न विचारणारी व्यक्ती आधी कंझ्यूमर कॅमेरे वापरत होती व त्यात मॅन्युअल मोड नव्हता. आता यांनी एक एन्ट्रीलेवल डीएसएलआर आणि किट लेन्स घेतली आहे, पण त्यातील तांत्रिकतेमुळे छायाचित्रण किंचित जड जात आहे.

प्रश्न असा आहे कि फोटोग्राफी शिकण्यासाठी नेमकी सुरुवात कशी करू ? सुरुवातीचा कॅमेरा Point And Shoot असल्याने फार कष्ट न घेता फक्त डायलर फिरवत इफेक्ट लाऊन फोटो काढणे इतपतच करायचो आणि तेच आता अंगवळणी पडल्याने SLR अवघड वाटतो. हा कॅमेरा टेबलावर ठेऊन त्याकडे बघत बसतो, ह्यात पण मला इफेक्ट मोडवर ठेऊनच वापरायचा खूप मोह होतोय, पण मला तस नकोय, aperture shutter speed मधलं नेमकं गुणोत्तर समजत नसल्याने फोटो अंधारलेले येतात सगळे. नेमकं काय करावं ते कळेनात. :/

पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरे तुम्हांला फक्त कॉम्पोजिशन करणे आणि शटर रिलीज बटन दाबणे इथपर्यंतच नियंत्रणाची मोकळीक देतात. बाकीचे सर्व काम म्हणजेच संकेंद्रीकरण करणे, उद्भासन त्रिकोणाच्या घटकांचे मूल्यगुणोत्तर ठरवणे, प्रतिमेवर प्रक्रिया करणे हा छायाचित्रणातील सर्वात महत्त्वाचा भाग स्वयंचलित किंवा ऑटोमॅटिकपणे घडून येतो.

डीएसएलआर कॅमेरा तुम्हांला या प्रत्येक टप्प्याचे नियंत्रण स्वतःकडे घेऊ देतो. हा या दोन प्रकारच्या कॅमेर्‍यांमधील सर्वात मोठा फरक आहे.

आता हे आव्हानपण आहे आणि संधीही. आणि हे आव्हान आता सोप्पं झालंय ते कॅमेर्‍याच्या मागील बाजूस असणार्‍या एलसीडी पडद्यामुळे. आता प्रतिमा घेतल्यावर लगेच ती कशी आली आहे हे स्क्रीनवर दिसते. डिजिटल युगात आपण हवे तितके फोटो घेऊ शकतो आणि नको असलेले फोटो पुसून टाकू शकतो. त्यामुळे आपल्याला प्रयोग करायला भरपूर वाव आहे.

डीएसएलआरच्या डायलवर तुम्हांला M, A, P आणि S (निकॉन) किंवा M, Av, Tv आणि P (कॅनन) असे मोड दिसतील. ह्या मोडची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे:

मोड
अर्थ
कार्य

M
मॅन्युअल
अ‍ॅपर्चर, शटर इन्टर्वल आणि आयएसओ छायाचित्रकाराला ठरवता येतात. संपूर्ण स्वातंत्र्य.

A किंवा Av
अ‍ॅपर्चर प्रायोरिटी
अ‍ॅपर्चर आणि आयएसओ छायाचित्रकार ठरवते. सुयोग्य शटर इन्टर्वल कॅमेरा स्वतः ठरवतो.

S किंवा Tv
शटर इन्टर्वल प्रायोरिटी
शटर इन्टर्वल आणि आयएसओ छायाचित्रकार ठरवते. सुयोग्य अ‍ॅपर्चर कॅमेरा स्वतः ठरवतो.

P
प्रोग्रॅम्ड ऑटो
आयएसओ छायाचित्रकार ठरवते, अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वल यांच्या वेगवेगळ्या मूल्यांची कॉम्बिनेशन कॅमेरा सुचवतो. त्यातील योग्य कॉम्बिनेशन छायाचित्रकार निवडू शकते.

छायाचित्रण शिकायला सुरुवात करताना आपण मॅन्युअल मोडपासून सुरुवात करू आणि क्रमाक्रमाने अ‍ॅपर्चर प्रायोरिटी, शटर इन्टर्वल प्रायोरिटी आणि प्रोग्रॅम्ड ऑटो ह्यांचा वापर कसा करायचा हे शिकूया.

१. मॅन्युअल मोडमध्ये अ‍ॅपर्चर, शटर इन्टर्वल आणि आयएसओ यांची मूल्ये कशी बदलायची हे प्रत्येक कॅमेर्‍याच्या व लेन्सच्या मॉडेलवर अवलंबून आहे. हे एकदा कॅमेरा युजर गाईड वाचून शिकून घ्या व त्याचा सराव करा.
२. तसेच संकेंद्रीकरण (मॅन्युअल फोकसिंग) कसे करायचे ह्याचाही सराव करा.
३. सुरुवातीला छायाचित्रणासाठी सोप्पे अशा स्थिर विषयवस्तू घ्या. त्यावर पुरेसा नैसर्गिक प्रकाश असू द्या. आता तुमची लेन्स पहा. त्यावर त्या लेन्सचे कमाल अ‍ॅपर्चर मूल्य दिलेले असते. १८-५५मिमीच्या बाबतीत हे f/3.5 ते f/5.6 इथपर्यंत झूम बदलेल तसे बदलते. उदा. लेन्स १८मिमीला ठेवली असता मिळू शकणारे कमाल अ‍ॅपर्चर हे f/3.5 इतके असते. लेन्स टेलिफोटो एण्डकडे झूम करत असताना हे कमाल अ‍ॅपर्चर f/4, f/5.6 असे लहान होत जाते हे लक्षात ठेवा.
४. कॅमेरा हलणार नाही अशा पद्धतीने ट्रायपॉडवर किंवा टेबलासारख्या स्थिर आधारावर ठेवा. चौकट हलू देऊ नका म्हणजे कॉम्पोजिशन बदलणार नाही. आता डायल मॅन्युअल मोडवर आणा. विषयवस्तूवर लेन्स संकेंद्रीत करा.
५. आपल्याला सुरुवातीला उद्भासन त्रिकोणातील एकेक घटकाचे मूल्य बदलत आणि बाकीच्या घटकांची मूल्ये कायम ठेवत प्रतिमेवर त्याचा काय परिणाम होतो हे पहायचे आहे.
६. सुरुवातीला आयएसओ स्पीड स्थिर ठेवा - उदा. आयएसओ १००.
७. आता शटर इन्टर्वल स्थिर ठेवा - उदा. 1/100.
८. मग एकेक करून अ‍ॅपर्चर व्हॅल्यू बदलून कॅमेरा हलणार नाही अशा पद्धतीने शॉट घ्या. प्रत्येक वेळी प्रतिमा कशी येतेय हे पहा. अ‍ॅपर्चर जास्त असताना जास्त प्रकाश येईल व प्रतिमा ब्राइट येईल. जसजसे अ‍ॅपर्चर कमी करत जाऊ (f/3.5, f/4, f/5.6, f/8, f/11 वगैरे) तसतशी प्रतिमा गडद व अंधारी होत जाईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त भाग हा इनफोकस येत राहील. म्हणजेच डेप्थ ऑफ् फिल्ड वाढत चाललीय.
९. आता अ‍ॅपर्चर स्थिर ठेवा, उदा. f/3.5.
१०. अशाच पद्धतीने आता आयएसओ स्पीड वाढवत न्या. इथे हळूहळू प्रकाशाचे प्रमाण वाढत जातेय त्यामुळे प्रतिमा जास्त ब्राइट होत जाईल. पण कॅमेर्‍यातील एलसीडी स्क्रीनवर प्रत्येक वेळी प्रतिमा झूम करून नीट पहा. त्यात तुम्हांला कुरव किंवा नॉइज वाढलेला दिसेल. विशेषतः अंधुक प्रकाशात हा प्रयोग करून पहा. म्हणजेच आयएसओ स्पीड हा कमीत कमी ठेवणे का आवश्यक आहे हे तुम्हांला कळेल. तुमचा कॅमेरा किती जास्त आयएसओ पर्यंत कुरव नियंत्रणात ठेवतोय ह्याची नोंद करा. साधारणतः ISO640 पर्यंत कुरव नियंत्रणात राहतो की नाही हे पहा.
११. शटर इन्टर्वलचा परिणाम पाहण्यासाठी कॅमेरा हातात घ्या व घरातील एखाद्या व्यक्तीचा फोटो काढायला सुरुवात करा. इथे अ‍ॅपर्चर कमाल मूल्यावर ठेवा, आयएसओ किमान ठेवा (f/3.5, ISO100). शटर इन्टर्वल 1/1000s पासून सुरुवात करून 1/800s, 1/400s, 1/200s, 1/100s, 1/80, 1/60, 1/50, 1/40, 1/30, 1/20, 1/10, 1/5, 1", 1.5", 2" असा वाढवत न्या आणि प्रतिमा कॅमेरा हातात धरून सुस्पष्ट येतेय का ते पहा.
१२. हलत्या व्यक्तीनंतर आता एखाद्या स्थिर वस्तूचे फोटो कॅमेरा हातात धरून काढा. वरीलप्रमाणेच शटर इन्टर्वल कमीजास्त करून कुठल्या शटर इन्टर्वलला प्रतिमा स्थिर येते आणि पुरेशी ब्राइटपण येते हे पडताळून पहा. (रूल ऑफ् थंब इज, तुम्ही कॅमेरा हातात घेऊन जास्तीत जास्त शटर इन्टर्वल हे एक भागिले तुमच्या लेन्सचे परिणामी नाभीय अंतर इतकेच ठेऊ शकता. त्यापेक्षा मोठा शटर इन्टर्वल वापरल्यास प्रतिमा हलेल. उदा. १८ मिमीला हॅण्डहेल्ड पद्धतीत कमाल शटर इन्टर्वल हे १/(१८ गुणिले क्रॉप फॅक्टर) इतकेच ठेवता येते. म्हणजे साधारणपणे 1/27s.)
१३. यानंतर तुम्ही अ‍ॅपर्चर प्रायोरिटी मोड कसा काम करतो, शटर इन्टर्वल प्रायोरिटी मोड काय करतो हे टप्प्याटप्प्याने शिकू शकाल. प्रोग्रॅम्ड ऑटो हा जास्त अभ्यासाचा विषय आहे. ते नंतर कधीतरी.

एकदा विशिष्ट प्रकाशयोजना आणि हलत्या विषयवस्तू असताना सुयोग्य उद्भासन कसे घ्यायचे हे जमू लागले की मग तुम्हांला मॅन्युअल मोडची भीती वाटणार नाही. पण कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन ऑटो मोडकडे वळू नका. ऑटो मोडचा वापर हा फक्त कॅमेरा कसा विचार करतो हे पडताळण्यासाठी करा. उदा. मॅन्युअली एक प्रतिमा घेतल्यावर ऑटो मोडवर ठेऊन पुन्हा तीच प्रतिमा घ्या. दोन्हींमध्ये फरक वाटल्यास ऑटोमोडमध्ये कॅमेर्‍याने काय सेटिंग वापरले ह्याची नोंद करा. मग मॅन्युअल मोडमध्ये तीच सेटिंग स्वतः करा आणि प्रतिमा घ्या. आता त्यातील आयएसओ 100 ला ठेऊन त्यातील अ‍ॅपर्चर आणि शटर इन्टर्वलची वेगवेगळी कॉम्बीनेशन करून तीच प्रतिमा पुनःपुन्हा घेत रहा. एका कॉम्बिनेशनला ऑटो मोडसारखी प्रतिमा मिळेल. अशाच पद्धतीने प्रयत्न करत रहा.

प्रॅक्टिस इज द की. सराव करत रहा. आता फिल्मरोल नाही, त्यामुळे कितीपण फोटो काढत बसा. डोळ्यांसमोर विविध नियतकालिकांतील त्याच विषयांतील सर्वोत्तम फोटो ठेवा. आपल्याला तसे फोटो काढण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास करा.

अजून काही मदत हवी असेल तर जरूर कळवा. तुम्ही घेतलेल्या प्रतिमा जर व्यनिमधून पाठवल्या तर त्यांचे परीक्षण करून कुठे सुधारणा करता येईल हेही सांगण्याचा प्रयत्न जरूर करेन. एकमेकां सहाय्य करू। अवघा करू क्लिकक्लिकाट।।

प्रचेतस's picture

22 Jun 2014 - 2:30 pm | प्रचेतस

सविस्तर प्रतिसाद आवडला.

जिथे भरपूर फोटो घेणे आवश्यक वाटतात तिथे ऑटो मोड मला तरी आवश्यकच वाटतो.
उदा. वेरूळसारख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फोटो घ्यावे लागतात. अगदी कमीत कमी म्हटले तरी ४०० पेक्षा जास्त तरी नक्कीच. अशा ठिकाणी पुरेशा वेळेअभावी मॅन्युअल मोडवर फोटो घेणे फारसे शक्यच होत नाही.
अर्थात तिथल्या काही अंधार्‍या ठिकाणी मॅन्युअल मोड वापरणे भागच पडते. ऑटो मोड फोकस करत नाही.

अशा ठिकाणी मॅन्युअल मोडवर कमीत कमी वेळात भरपूर फोटो काढण्यासाठी प्रचंड सराव आवश्यक आहे असे मला वाटते.

एस's picture

22 Jun 2014 - 3:30 pm | एस

लेण्यांच्या छायाचित्रणाबाबतीत सविस्तर प्रतिसाद सोदाहरण काही दिवसांत देतो. तुमचे निरीक्षण बरोबर आहे.

चौकटराजा's picture

26 Jun 2014 - 8:55 am | चौकटराजा

आपल्या फोटोतील प्रकाश बरोबर आहे की नाही हे प्रगत पॉईन्ट शूट कयामेर्‍यात फोकस करताना हिस्टोग्राम प्रकट होतो. ते पहावे . त्यातील डोंगर मधोमध उंच आला तर फोटोला न्याय मिळतो. मॅन्यल मोड मधे एक आडवा पट्टा दिसतो त्यावरील लाईटची रेघ डावीकडे सरकल्यास कमी प्रकाश उजवी कडे सरकल्यास जास्त प्रकाश व मधोमध टिपक्याच्या स्वरूपात दिसल्यास योग्य प्रकाश .( फक्त त्या सिच्वेशनला ) .अशा दोन ते तीन सिचवेशन चे सेटींग साठवता येते व ते परत परत वापरता येते. या गोष्टीचा वापर थोडाच फरक ( प्रकाश स्थीतीचा )असलेल्या जागी वापरता येईल. मग आटो मोड वापरायची गरज लागणार नाही.

एस's picture

26 Jun 2014 - 11:10 am | एस

आपली उद्भासन त्रिकोणाची मूल्यसंगती बरोबर आहे की नाही हे 'हिस्टोग्राम' आणि 'एक्स्पोजर इंडिकेटर बार' या दोन्ही मार्गाने मॅन्युअल मोडमध्ये पडताळून पाहता येते. त्यातल्या त्यात 'एक्स्पोजर इंडिकेटर बार' समजायला जास्त सोपा आहे. पण त्यासाठी आधी एक्स्पोजर सेट करताना काय टप्पे घ्यावेत हे माहीत हवे. आधी आयएसओ स्पीड, मग अ‍ॅपर्चर आणि मग शटर इन्टर्वल अशा टप्प्यांनी जर सेटिंग बदलत गेलो की मग ठराविक प्रकारच्या प्रकाशाला साधारण तेच सेटिंग वापरता येते याचा अंदाज येतो.

लेण्यांसारख्या अंधारी जागेत जास्त आयएसओ वापरावे लागेल, पण ८००च्या वर गेलो तर कुरव येईल. मग अ‍ॅपर्चर कमाल ठेवावे लागेल, त्यानंतर शटर इन्टर्वल स्लो करावा लागेल. एवढे करूनही प्रतिमा अंडरएक्स्पोज होतेय असे इंडिकेटर बारवरून दिसले तर मग एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन शून्यावरून धन बाजूकडे +१, +२ असे वाढवून पहावे लागेल. हे केवळ एक उदाहरण झाले.

ऑटो मोडमध्ये कॅमेरा ३२००च्या पुढे आयएसओ वापरेल किंवा शटर इन्टर्वल इतका स्लो ठेवेल की हात थरथरून प्रतिमा पुसट येईल. आणि एलसीडी स्क्रीनवरून प्रतिमा कशी आली असावी याचा अंदाज बांधणे कठीण जाते कारण एलसीडीपण कॅलिब्रेट करायची असते, जे न केल्यामुळे प्रतिमा एलसीडीवर वेगळ्या आणि नंतर मॉनिटरवर वेगळ्या दिसतात.

बाकी यात मीटरींग नेमके काय करते आणि कुठे चुकते हे पुढच्या भागात. :-)

चौकटराजा's picture

26 Jun 2014 - 1:07 pm | चौकटराजा

प्रतिमा एलसीडीवर वेगळ्या आणि नंतर मॉनिटरवर वेगळ्या
हा अनुभव येतोच येतो .पण काय व कसे करायचे ब्वॉ ?

एस's picture

26 Jun 2014 - 2:05 pm | एस

कॅमेर्‍याचा एलसीडी पडदा आणि संगणकाचा पडदा हे दोन्ही कॅलिब्रेट करून घ्यायचे असतात. या दोन्हींसाठी बरेच वर्कफ्लो आणि हार्डवेअर+सॉफ्टवेअर पर्याय उपलब्ध आहेत. तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

सोपा उपाय म्हणजे एलसीडी ब्राइटनेस योग्य ठेवणे. विशेषतः मॅन्युअल मोडमध्ये एलसीडीकडे न बघता हिस्टोग्राम आणि एक्स्पोजर इंडिकेटरवरून प्रतिमेचे उद्भासन जोखणे महत्त्वाचे आहे. रात्रीच्या वेळी किंवा गुहा/लेणी अशा कमी प्रकाशात एलसीडी स्क्रीनचाही प्रखरपणा कमी केला पाहिजे. हे कॅमेर्‍या-कॅमेर्‍यावर अवलंबून आहे. काही कॅमेर्‍यांना असे करायची गरज भासत नाही. काही कॅमेर्‍यांचा एलसीडी नेहमीच थोडा डार्क ठेवावा लागतो. जी प्रतिमा एलसीडीवर नीट उद्भासित झाली आहे असे वाटते तीच संगणकाच्या पडद्यावर १००% झूम करून पाहिल्यास जास्त काळपट दिसते. तिला नंतर ब्राइट करायला गेलो की मग कुरव वाढणे, क्रोमॅटिक अ‍ॅबरेशन प्रकर्षाने दिसणे, शार्पनेस कमी होणे, रंग एकदमच सॅच्युरेट होणे, काळा काळा न उरणे आणि पांढरा एकदम जळून गेल्यासारखा दिसणे असे दोष आपल्याला पोस्टप्रोसेसिंगमध्ये दिसून येतात.

दुसरा उपाय म्हणजे प्रतिमेच्या पूर्वदृश्यात अतिउद्भासित होऊन ब्लो-आऊट होणारे भाग हे हायलाइट करण्याची सोय काही कॅमेर्‍यांत असते. तिचा वापर करावा. RAW मध्ये प्रतिमा घेत असाल तर एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन नंतर कमी करता येते.

संकेंद्रीकरणाचेही असेच आहे. एलसीडीवर छान सुस्पष्ट प्रतिमा दिसते आणि मोठ्या पडद्यावर ती किती धूसर आलीय हे नंतर कळते. म्हणून एकतर प्रत्येक कॅमेर्‍याचे फोकसिंग पॉईंट ठरलेले असतात. त्यात कुठला फोकसिंग पॉईंट आपण प्रतिमेत वापरलाय आणि फोकस तिथे केले असताना व्ह्यू-फाइंडरमध्ये हिरवा ठिपका दिसतोय की नाही हे पहावे. (पॉइंट-अ‍ॅण्ड्-शूट मध्ये लाल/पिवळी चौकट हिरवी होणे.)

शेवटी काही झाले तरी कॅमेर्‍याचा एलसीडी कमी रिझॉल्यूशन चा असतो (e.g. 921000 Dots). त्यात मूळ प्रतिमा दिसत नसून तिचे पूर्वदृश्य दिसत असते आणि त्या प्रक्रियेत पूर्वदृश्याचा आकार कमी झाल्यामुळे ज्याला 'कलर गॅमुट' म्हणतात तो रंगभेदन आवाका एकदम आकसतो. म्हणून कॅमेर्‍याच्या एलसीडीवर अवलंबून राहू नये. :-)

प्रचेतस's picture

26 Jun 2014 - 2:13 pm | प्रचेतस

तुम्हा दोघांचेही प्रतिसाद खूप माहितीपूर्ण आणि उपयुक्त.

पैसा's picture

28 Jun 2014 - 11:33 pm | पैसा

किचकट तांत्रिक परिभाषा सगळ्यांना समजेल अशा प्रकारे समजावून देत आहात. धन्यवाद! सोबत उदाहरण म्हणून समर्पक छायाचित्रे दिल्याने पटकन समजते. प्रतिसादातूनही बरीच माहिती मिळते आहे. खूप छान! मिपावरच्या काही अतिउत्तम लेखमालिकांपैकी एक मालिका झाली आहे ही!

एस's picture

28 Jun 2014 - 11:56 pm | एस

चर्चेत सहभाग घेणार्‍या सर्वांचे आणि विशेषतः चौरा व वल्लींचे खास आभार. मीटरींगवर लेख लवकरच टाकतो.

चौकटराजा's picture

29 Jun 2014 - 7:04 am | चौकटराजा

हा लेख तयार करताना जाता जाता म्हणून एक्पोझर कॉम्पेंसेशन कोणत्या परिस्थितीत करावे लागते वा उपयुक्त ठरते त्याची माहिती द्यावी. माझ्या अंदाजाने मॅनुअल मोड न वापरताना या सोयीचा वापर होणे स्वाभाविक आहे.

एस's picture

29 Jun 2014 - 12:57 pm | एस

एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन आणि टीटीएल फ्लॅश या दोन्ही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत.

शैलेन्द्र's picture

29 Jun 2014 - 11:52 am | शैलेन्द्र

+१११

असेच म्हणतो.