छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार

एस's picture
एस in काथ्याकूट
7 Apr 2013 - 1:30 am
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना

कॅमेर्‍यांच्या रचनेतील चौकटीचे महत्त्व

आधुनिक कॅमेरे आणि त्यांचे खापरखापरखापरपूर्वज यांच्यात आज जमीनअस्मानाचा फरक दिसून येत असला तरी आजही छायाचित्रणाचे आणि पर्यायाने कॅमेर्‍यामागचे तत्त्व तेच राहिले आहे. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, कॅमेरा ऑब्स्क्युरा (Camera Obscura) हा सर्व कॅमेर्‍यांचा पूर्वज मानला जातो. चिनी तत्त्वज्ञ झाओ यूकीनच्या लेखनात अशा कॅमेर्‍याचा उल्लेख आलेला आहे. एकोणिसाव्या शतकातील कॅमेरे हे खरंतर मोठाले लाकडी खोके असत. आजचे कॅमेरे एवढे गुंतागुंतीचे व एवढे यथातथ्य अचूक भागांनी (Precision parts) बनलेले असतात की त्यांची जुळणी यंत्रमानवांकरवीच केली जाऊ शकते.

कॅमेर्‍याच्या अंतर्गत भागातील संवेदक (Sensor) हा जरी सर्वात महत्त्वाचा हिस्सा असला तरी, त्याच्यासकट बाकीच्या सर्व भागांना आधार देणारी कॅमेर्‍याची चौकट (किंवा सांगाडा - Frame) ही आजच्या संक्षिप्तकरणाच्या युगात फार महत्त्वाची मानली जाते. आधुनिक कॅमेर्‍यांमध्ये अशा दोन चौकटी असतात. एक अंतर्गत चौकट, जिच्यात एका बाजूला कॅमेर्‍याचा संवेदक बसवला जातो, तर दुसर्‍या भागाचे काम मुख्यत्त्वे करून लेन्सला आधार देणे हे असते. कॅमेरे बनवणार्‍या कंपन्यांच्या आराखडा ते उत्पादन ह्या सगळ्या प्रक्रियेचा आणि त्यातील प्रत्येक घटकाचा ही चौकट बनवताना कस लागतो. कारण लेन्स, संवेदक, आरशाची यंत्रणा (असल्यास) आणि संकेद्रीकरण यंत्रणा (Autofocus Mechanism) हे सगळे भाग तितक्याच अचूकतेने व ताकदीने पेलण्याचे काम या अंतर्गत चौकटीला करावे लागते. या चौकटीची अभियांत्रिकी ही बल व अचूकता या दोन्हीं बाबतीत अत्त्युच्च दर्जाची असते. कंपन (Vibration), बाह्यबल किंवा तापमानातील चढउतारांमुळे आकारात होणारे बदल (Distortion), इत्यादी गोष्टींविरूद्ध प्रतिरोधक क्षमता तिच्यात असावी लागते. प्रकाशाभेद्यता (Lightproof) हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म या चौकटीत असावा लागतो. निव्वळ बाहेरचा प्रकाशच अडविणे नव्हे, तर आतील परावर्तित प्रकाश प्रारणांना त्वरित शोषून घेण्याच्या दृष्टीने ह्या चौकटीची रचना केलेली असते, कारण प्रकाशग्राही संवेदकांचा पृष्ठभाग हा एखाद्या सीडीच्या पृष्ठभागाप्रमाणेच अतिशय चमकदार असतो. कॅमेर्‍याच्या आतून प्रकाश परावर्तित होऊ नये व झालाच तर तो लगेच शोषला जावा यासाठी योजना केलेली असते. हलक्या दर्जाच्या कॅमेर्‍यांत व लेन्सेसमध्ये परावर्तित प्रकाशामुळे प्रतिमांवर Flair नावाचे प्रकाशाचे पट्टे दिसतात. हा त्यांच्या अंतर्गत रचनेचा दोष असतो.

सोनी अल्फा ९९ कॅमेरा - अंतर्दृश्य
Sony Alpha99 Internals

(Image Copyright: Sony Digital Imaging http://www.sonydigitalimaging.com)

बाह्य चौकटीचे काम म्हणजे आतील चौकटीला बंदिस्त करून प्रकाशाभेद्य बनविणे. कॅमेर्‍याचे सर्व नियंत्रक (Controls) उदा. चक्रे, कळा आणि दृश्यपटल (Dials, buttons and displays) यांसारखे भाग या बाहेरील भागावर बसवलेले असतात. या दोन चौकटींमधील पोकळीत प्रक्रियक, ऊर्जास्रोत, स्मृती व इतर विद्युतमंडले वगैरे बसवलेले असतात.

फिल्म कॅमेर्‍यांमध्ये या भागात फिल्म, शटर, एक्स्पोजर मीटरिंग यंत्रणा व इतर काही भागांची भर पडते.

अंतर्गत आणि बाह्य चौकटींना जोडणारा भाग जर काळजीपूर्वक सीलबंद केलेला असल्यास कॅमेर्‍यात धूळ किंवा बाष्प जाण्याचा धोका बराचसा कमी होतो. या चौकटी प्रो आणि सेमी-प्रो कॅमेर्‍यांमध्ये मॅग्नेशिअम किंवा अ‍ॅल्युमिनिअम संयुगांपासून बनवल्या जातात. मात्र कंझ्यूमर कॅमेर्‍यांत तसेच एन्ट्रीलेवल डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये त्यासाठी सर्रास प्लॅस्टिकचा वापर केला जातो. (निकॉनच्या फिल्म कॅमेर्‍यांच्या बंदुकीची गोळी अडवल्याच्या, रणगाड्याखाली सापडूनसुद्धा काही न झाल्याच्या दंतकथा किंवा कदाचित सत्यकथा फोटोग्राफी कम्युनिटींमध्ये यासाठी प्रसिद्ध आहेत.)

कॅमेर्‍यांचे प्रकार

         पिनहोल कॅमेरा

पिनहोल कॅमेर्‍याचे तत्त्व सोपे आहे. एक प्रकाशाभेद्य खोके घ्यायचे व त्याच्या एका बाजूला मध्यभागी छोटेसे छिद्र पाडायचे. या छिद्रातून मागील पृष्ठभागावर पडणारी प्रतिमा ही उलटी (Inverted) दिसते. वर्णविक्षेप (Chromatic Aberration) व दृष्टिवैषम्य (Astigmatic Aberration - Defect in an optical system in which light rays from a single point fail to converge in a single focal point) यामुळे पिनहोल कॅमेर्‍याच्या प्रतिमा धूसर असतात. तुम्हांला जर घरीच पिनहोल कॅमेरा बनवायचा असेल तर तुमच्या डीएस्एल्आर कॅमेर्‍याची बॉडी घ्या. तिच्या बॉडीकॅपला साधारणतः ५ मिमी चे छिद्र पाडा. या छिद्राला डब्यात वापरली जाणारी मेटल फॉइल लावा. या फॉइलच्या मध्यभागी ०.२ मिमी आकाराचे सूक्ष्म छिद्र पाडा. आता अशा कॅमेर्‍याने प्रतिमा घ्या. :) (सूचना - तुमच्या कॅमेर्‍यात तुम्ही केलेल्या बदलांची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल...)

http://www.inamarieschmidt.com/?project=how-to-build-a-pinhole-camera

         व्ह्यू-फाइंडर कॅमेरा

व्ह्यू-फाइंडर कॅमेरा हा खालील तत्त्वावर कार्य करतो. कॅमेर्‍याच्या लेन्सच्या बाजूला ज्याला व्ह्यू-फाइंडर म्हटले जाते ती छोटी लेन्स बसवलेली असते.या व्ह्यू-फाइंडरमध्ये बघून आपण फोटो काढतो. व्ह्यू-फाइंडर लेन्स आणि मुख्य लेन्स वेगवेगळ्या असल्याने अशा कॅमेर्‍याच्या प्रतिमांमध्ये समांतरभ्रंश (Parallax Error) येतो. लायका, बेस्सा, झाइस व इतर कंपन्यांचे व्ह्यू-फाइंडर कॅमेरे अतिशय उच्च दर्जाच्या छायाचित्रणात वापरले जात. आपण सर्वांनी ९० च्या दशकात वापरलेले कोडॅकचे कॅमेरे हे व्ह्यू-फाइंडर कॅमेरे होत. व्ह्यू-फाइंडर कॅमेर्‍यांच्या व्ह्यू-फाइंडर लेन्सच्या लांबीवर असलेल्या मर्यादेमुळे अशा कॅमेर्‍यांची लेन्स टेलिफोटो एण्ड कडे जास्तीत जास्त १३५ मिमी, तर समांतरभ्रंशाच्या मर्यादेमुळे वाइड एण्ड कडे जास्तीत जास्त २८ मिमी पर्यंतच ठेवता येते. त्यामुळे असे कॅमेरे हे स्ट्रीट फोटोग्राफी किंवा ज्याला फोटोजर्नलिझम् म्हटले जाते, अशा प्रकारच्या छायाचित्रणासाठी उपयुक्त आहेत.

(A Kodak KB-10 35mm Film Camera)
KodakKB10Camera

         इलेक्ट्रॉनिक व्ह्यू-फाइंडर कॅमेरा

इलेक्ट्रॉनिक व्ह्यू-फाइंडरचा वापर हा जास्त करून व्हिडिओ कॅमेर्‍यांमध्ये होतो. आजच्या डिजिटल युगात हाय-एण्ड कंझ्यूमर कॅमेर्‍यांमध्येही इलेक्ट्रॉनिक व्ह्यू-फाइंडर दिसून येतात. इलेक्ट्रॉनिक व्ह्यू-फाइंडर कॅमेर्‍यांमध्ये लेन्समधून संवेदकावर पडणारी प्रतिमा मागील एलसीडी स्क्रीनवर दाखवली जाते. त्यामुळे प्रतिमा घेण्याआधी फ्रेमिंग करणे, फोकसिंग करणे वगैरे क्रिया एलसीडीवर पाहून करता येतात. अशा कॅमेर्‍यात प्रतिमेचे पूर्वपरीक्षण करण्यासाठी कॅमेरा चालू करणे आवश्यक असते. या कॅमेर्‍यांमध्ये विद्युतघटां (Battery Cells) ची ऊर्जा जास्त प्रमाणात खर्ची पडते.

व्ह्यू-फाइंडर कॅमेर्‍यात बहुतांशी करून लेन्स बदलता येत नाही. लेन्स कायमस्वरूपी कॅमेर्‍याच्या बॉडीला बसवून टाकलेली असते. अशा प्रकारच्या लेन्स ह्या सुपरझूम प्रकारात मोडतात. उदा. 50X किंवा २८ मिमी ते १००० मिमी एवढी प्रचंड झूम रेंज एकाच लेन्समध्ये उपलब्ध असते. त्याप्रमाणात अशा कॅमेर्‍यांचा संवेदकही लहान असतो. काही हायब्रिड कॅमेर्‍यांमध्ये दोन-तीन प्रकारच्या लेन्सेस अ‍ॅडॅप्टरच्या सहाय्याने बदलता येण्याची सोय असते.

मिररलेस कॅमेरे हे मुख्यत्त्वे लेन्स बदलता येण्याजोगे इलेक्ट्रॉनिक व्ह्यू-फाइंडर कॅमेरे असल्याने त्यांचा वेगळा विचार येथे केलेला नाही.

         रेंजफाइंडर कॅमेरा

(A Leica M9 Digital Rangefinder Camera)

LeicaM9

रेंजफाइंडर कॅमेरे सुद्धा व्ह्यू-फाइंडर प्रकारचे आहेत. लायकाचे रेंजफाइंडर कॅमेरे सुप्रसिद्ध आहेत. उदा. Leica M7. रेंजफाइंडरमध्ये मुख्य लेन्सची व ऑफसेट लेन्सची अशा दोन प्रतिमा दिसतात. जेव्हा दोन्ही प्रतिमा एकमेकींशी तंतोतंत जुळतात तेव्हा संवेदकावर किंवा फिल्मवर पडणारी प्रतिमा अचूक फोकसमध्ये असते. रेंजफाइंडर कॅमेर्‍यांतील संकेंद्रीकरण एस्एल्आर पेक्षा वेगवान असते. तसेच हे कॅमेरे लीफ शटर वापरत असल्याने आवाज न करणारे असतात. मिरर व पेंटाप्रिझम यंत्रणेची गरज नसल्याने आकाराने लहान व वापरायला सुटसुटीत असतात. विशेषतः वाइड अ‍ॅंगल फोकसिंग हे अतिशय अचूक असते. व्ह्यू-फाइंडरमध्ये दिसणारे दृश्य लेन्समध्ये घेतल्या जाणार्‍या प्रतिमेपेक्षा जास्त मोठे (वाइड) असल्याने फोटोग्राफरला फ्रेममध्ये पुढच्या क्षणी काय येणार आहे याचा अंदाज आधीच येतो. या सर्व घटकांमुळे फोटोजर्नलिझमसाठी लायकाचे कॅमेरे आजही व्यावसायिक छायाचित्रकारांकडून वापरले जातात.

         ट्विन लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा

(Homai Vyarawalla with a classic Rolleiflex TLR Camera)

Homai_Vyarawalla_with_TLR_Camera

अशा प्रकारचे कॅमेरे तीस-चाळीसच्या दशकांत लोकप्रिय होते. यात एकाच फोकल लेन्ग्थच्या दोन लेन्सेस वापरल्या जात. वरील लेन्सची प्रतिमा एका ४५ अंशातील आरशाने वरच्या बाजूच्या व्ह्यू-फाइंडरला पाठवली जाई. छायाचित्रकार कॅमेर्‍यात खाली बघून प्रतिमा घेई. यात शक्यतो ६x६ सेंमी फिल्म म्हणजे मीडिअम फॉरमॅट फिल्मचा वापर होई. ह्या कॅमेर्‍यांत लीफ् प्रकारचे शटर असत. अशा शटरमध्ये शटरलॅग नगण्य असल्याने त्याचक्षणी प्रतिमा घेणे शक्य होई व छायाचित्रकाराचा सुवर्णक्षण निसटत नसे. व्ह्यू-फाइंडर सतत चालू असल्याने असे कॅमेरे वेगवान असत. पण बर्‍याच मर्यांदांमुळे लवकरच हे कॅमेरे निर्मिती (Production) मधून बाहेर गेले.

याविषयी अधिक माहिती खालील दुव्यावर मिळेल.

http://en.wikipedia.org/wiki/Twin-lens_reflex_camera

         एस्एल्आर कॅमेरा

एस्एल्आर म्हणजे "Single Lens Reflex". नावाप्रमाणेच अशा कॅमेर्‍यांमध्ये पूर्वदृश्यासाठी व प्रतिमा घेण्यासाठी एकच लेन्स वापरली जाते. एकाच लेन्समधून पूर्वदृश्य व प्रतिमा घेणे (TTL - Through The Lens) यामुळे अशा कॅमेर्‍यांवर प्रचंड विविधतेच्या वेगवेगळ्या नाभीय अंतराच्या लेन्सेस वापरणे शक्य झाले. एस्एल्आर कॅमेर्‍यांनी छायाचित्रणाची दुनिया बदलून टाकली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. लायकाने वापरात आणलेल्या व लोकप्रिय केलेल्या ३५ मिमी (सुमारे ३६ बाय २४ मिमी लांबीरूंदी) फॉरमॅटचाच वापर या कॅमेर्‍यांनी केला व अशा फॉरमॅटच्या क्रॉप फॅक्टरला प्रमाण मानून इतर आकाराच्या संवेदकांचे क्रॉप फॅक्टर ठरवण्यात येऊ लागले. उदा. ५० मिमी लेन्स ३५ मिमी संवेदकावर नॉर्मल ठरते. तीच लेन्स APS-C फॉरमॅटवर जवळजवळ ८० मिमी ठरते. म्हणून APS-C फॉरमॅटचा क्रॉप फॅक्टर 1.6x मानण्यात आला.

(DSLR Cameras)

D-SLR Market

(Image Copyright: Billy Wilson Photography)

एस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये लेन्स आणि संवेदक यांच्यामध्ये ४५ अंशात एक आरसा बसवलेला असतो. जेव्हा प्रतिमा घेण्याची क्रिया सुरू नसते तेव्हा हा आरसा लेन्समधून येणारा प्रकाश वरील पेंटाप्रिझम किंवा पोरोमिरर कडे परावर्तित करतो. पेंटाप्रिझम हा पंचकोनी आकाराचा एक काचेचा भाग असतो. तो त्यावर पडणारी प्रतिमा ९० अंशातून संवेदकाच्या बरोबर वरती असलेल्या व्ह्यू-फाइंडरकडे पाठवतो. अशा प्रकारे, जेव्हा आपण एखाद्या एस्एल्आर कॅमेर्‍याच्या व्ह्यू-फाइंडरमधून विषयवस्तूचे पूर्वदृश्य पाहत असतो तेव्हा आपल्याला ती प्रतिमा जवळजवळ तंतोतंत तशीच दिसते जशी संवेदकावर नंतर टिपली जाणार असते. याचमुळे एस्एल्आर मधून तंतोतंत अचूक फ्रेमिंग करणं शक्य होतं.

डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये ३५ मिमी फिल्म (१३५ फिल्म) ची जागा आता इलेक्ट्रॉनिक संवेदकांनी घेतली आहे. जरी फिल्मची गतिकीय कक्षा (Dynamic Range) संवेदकांमध्ये येऊ शकत नसली तरी संवेदकांच्या रूपाने एस्एल्आर कॅमेर्‍यांचा बहुआयामीपणा (Versatility) प्रचंड प्रमाणात वाढला आहे. उदाहरणार्थ आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे प्रकाशाच्या रंगाशी जुळणारी फिल्म वापरण्याची यातायात आता वाचली आहे. आता व्हाइट बॅलन्स नंतर पोस्टप्रोसेसिंग मध्येही समायोजित करता येतो. तसेच प्रतिमा विद्युतचुंबकीय स्वरूपात असल्याने त्या साठवण्याचा व फिरूनफिरून वापरण्याचा खर्च जवळजवळ शून्यावर आला आहे. शिवाय फिल्मसाठी लागणार्‍या जागेत एलसीडी स्क्रीन बसवता येऊ लागल्याने लाइव व्ह्यू आणि वीडिओ रेकॉर्डिंग शक्य झाले आहे.

         मीडिअम फॉरमॅट कॅमेरा

या कॅमेर्‍यांत सर्वात लोकप्रिय फॉरमॅट हा चौरसाकृती फिल्मचा आहे (६x६ सेंमी). ह्या फॉरमॅटचा सर्वात जास्त वापर फॉर्मल पोर्ट्रेट्स साठी केला जातो. तसेच चौरसाकृती चौकटीतील लॅण्डस्केप्ससुद्धा एक वेगळाच परिणाम साधून देतात जो नेहमीच्या आयताकृती चौकटींपेक्षा अतिशय तजेलदार दिसतो. नेहमीच्या ६ बाय ६ शिवाय ह्या प्रकारात ६ बाय ४.५ सेंमी, ६ बाय ७ सेंमी, तसेच ६ बाय १७ सेंमीचेही कॅमेरे येतात. एस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये फिल्मची रिळे वापरली जातात, तर मीडिअम फॉरमॅटमध्ये एका वेळी एक फिल्मप्लेट सुटी वापरली जाते. म्हणून अशा फिल्मप्लेटला रिळांप्रमाणे दोन्ही बाजूंना गोल छिद्रे नसतात. मीडिअम फॉरमॅट कॅमेरे हे शक्यतो रेंजफाइंडर असतात. पण डिजिटल बॅक पद्धतीचे हासेलब्लाडचे मीडिअम फॉरमॅट कॅमेरे हे डीएस्एल्आरच्या कार्यपद्धतीच्या जवळपास जाणारे आहेत. अशा डिजिटल बॅकची पृथक्करण क्षमता (Resolution) ही ३९ मेगापिक्सेल ते ८० मेगापिक्सेलपर्यंतसुद्धा असू शकते. मीडिअम फॉरमॅटने केले जाणारे छायाचित्रण हे फार विचारपूर्वक, evenly paced (मराठीत दमानं), आणि काळजीपूर्वक पद्धतीने केले जाते. मीडिअम फॉरमॅट हा वास्तुविशारदांचा आर्किटेक्चरल फोटोग्राफीसाठीचा आवडता फॉरमॅट आहे.

चौरसाकृती व्यक्तिचित्र प्रकारातील प्रतिमा

SquareFormat by Andrew Gibson

(Image Copyright by Andrew Gibson)

Bronica SQ-B आणि SQ-Ai, Hasselblad 501cm आणि 503cw, Rolleiflex 6001, Mamiya RB67 आणि RZ67 वगैरे ह्या फॉरमॅटमधील मुख्य कॅमेरे आहेत.

         लार्ज फॉरमॅट कॅमेरा

खर्‍या अर्थाने ज्याला व्यावसायिक कॅमेरा म्हणता येईल तो म्हणजे लार्ज फॉरमॅट आणि अल्ट्रालार्ज फॉरमॅट कॅमेरा. छायाचित्रणाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वच कॅमेरे हे लार्ज किंवा अल्ट्रालार्ज फॉरमॅटचे होते. मीडिअम फॉरमॅटपेक्षा जास्त मोठी फिल्म म्हणजे ४ बाय ५ इंच फिल्म लार्ज फॉरमॅटमध्ये वापरली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रकाशसंवेदी पृष्ठभागामुळे सर्वसामान्यांना कल्पना करता येणार नाही इतकी डेप्थ ऑफ् फिल्ड व गतिकीय कक्षा या फॉरमॅटमध्ये मिळू शकते. आजही विशेषतः एरिअल म्हणजे हवाई छायाचित्रणासाठी मेकॅनाइज्ड अल्ट्रालार्ज (८ बाय १० इंच, ९ बाय ९ इंच, ९ बाय १८ इंच इ.) फॉरमॅट कॅमेर्‍यांचा वापर केला जातो. लार्ज फॉरमॅट कॅमेर्‍यांमध्ये कॅमेर्‍यांची पुढील आणि मागील बाजू वेगवेगळी हलवण्याची सोय असते. त्यामुळे Scheimpflug principle चा वापर करून हे कॅमेरे शिफ्ट व टिल्ट मूवमेंट साधू शकतात. (जर कॅमेर्‍यापेक्षा विषयवस्तू उंचावर असेल तर पुढची बाजू वर उचलून प्रतिमा घेतली जाते. - Shift. तसेच कॅमेर्‍यात एरवी येणारा पर्स्पेक्टिव भ्रंश म्हणजे समांतर रेषा समांतर न दिसणे या दोषासाठी कॅमेर्‍याची पुढील बाजू तिरकी करून प्रतिमा घेतली जाते. - Tilt).

लार्ज फॉरमॅटसाठीही डिजिटल बॅक उपलब्ध आहेत. अशा एका प्रतिमेचा आकार जवळजवळ १ जिगाबाइट्स पर्यंत जाऊ शकतो.

अ‍ॅन्सेल अ‍ॅडम्स ह्या महान छायाचित्रकाराने घेतलेली ही प्रतिमा पहा.

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/2/21/Adams_The_Tetons_and_...

क्रमशः

हा भाग चांगलाच मोठा झाल्यामुळे डीएस्एल्आर कॅमेर्‍याची रचना पुढील भागात घेण्यात येईल. त्यापुढील भागात लेन्सेस बद्दल सविस्तर माहिती घेऊ.

पुढील भागात - छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍याची रचना

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

प्रतिक्रिया

वाचनीय लेख. आवडेश. पु.भा.प्र.

प्रचेतस's picture

7 Apr 2013 - 8:49 am | प्रचेतस

प्रचंड माहितीपूर्ण धागा.
क्रॉप फॅक्टरबद्दल अधिक वाचायला आवडेल. तसेच APS-C आणि CMOS मध्ये नेमका फरक काय?

एस's picture

7 Apr 2013 - 3:44 pm | एस

क्रॉप फॅक्टरबद्दल अधिक वाचायला आवडेल. तसेच APS-C आणि CMOS मध्ये नेमका फरक काय?

क्रॉप फॅक्टरबद्दल अतिशय विस्तृत प्रमाणात माहिती लेन्सेस वरील लेखात येईलच. तोपर्यंत जरा धीर धरा. :)

APS-C (Advanced Photo System type-Classic) हा संवेदकाचा आकार आहे. साधारणपणे फुलफ्रेम (३६ बाय २४ मिमी) च्या निम्मा आकार (२५.१ बाय १६.७ मिमी) असल्याने फुलफ्रेमवरील ज्या डेजिग्नेटेड फोकल लेन्ग्थ ची लेन्स असेल ती या संवेदकावर दीडपट लांबीचे नाभीय अंतर देते. उदा. ५० मिमी लेन्स ह्या संवेदकाच्या कॅमेर्‍यावर वापरल्यास तिचे परिणामी नाभीय अंतर (Effective focal length) हे सुमारे ७५ मिमी, म्हणजे ५० मिमीच्या दीडपट होते. आणखी एक उदाहरण म्हणजे फुलफ्रेम संवेदकावर जी लेन्स ४०० मिमी नाभीय अंतर देते, तीच लेन्स APS-C संवेदकावर ६०० मिमी बनते. यालाच क्रॉप फॅक्टर असे म्हणतात. म्हणजेच, फुलफ्रेम संवेदकावर क्रॉप फॅक्टर १ येतो, तर APS-C प्रकारातील संवेदकावर क्रॉप फॅक्टर १.५ असतो. तुमचा कॅमेरा जर अशा प्रकारातील असेल, तर कुठलीही लेन्स वापरण्याआधी तिच्यावर लिहिलेल्या नाभीय अंतराला १.५ ने गुणून जे अंतर येईल ते तिचे त्या कॅमेर्‍यावरील नाभीय अंतर असेल. त्यामुळेच जर खर्‍या अर्थाने वाइड अ‍ॅन्गल लेन्स वापरायची असेल (१०-१२ किंवा १४-२४ मिमी इ.) तर सेन्सर जेवढा मोठा असेल तेवढी मोठी लेन्स वापरता येईल. APS-C प्रकारच्या कॅमेर्‍याच्या क्रॉप फॅक्टरमुळे खरी वाइड अ‍ॅन्गल लेन्स वापरायला मर्यादा येतात, व लॅण्डस्केप फोटोग्राफी तितकीशी उठावदार होत नाही. अर्थात फायदा असा, की टेलिफोटो लेन्सेसचे नाभीय अंतर वाढते. म्हणून उदा. कॅननची सुमारे लाखभर रुपयांत मिळणारी ४०० मिमी लेन्स वापरून बर्ड फोटोग्राफी करता येते कारण कॅननच्या APS-C संवेदकांचा क्रॉप फॅक्टर १.६ आहे. म्हणजेच ४०० गुणिले १.६ = ६४० मिमी एवढी मोठी फोकल लेन्ग्थ तुम्हांला आपसूकच मिळते.

विविध ब्रॅण्ड्स मध्ये ह्या प्रकारच्या संवेदकांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
उदा.

Nikon - DX
Canon - EF-S
Konica Minolta - DT
Pentax - DA
Samsung - NX
Sigma - DC
Sony - DT
Tamron - Di II
Tokina - DX

कॅननच्या EF-S डीएस्एल्आर मध्ये क्रॉप फॅक्टर १.६ येतो (APS-C साठी १.६x, APS-H साठी १.४x), तर निकॉनच्या DX डीएस्एल्आर मध्ये तोच क्रॉप फॅक्टर १.५ इतका असतो. प्रत्येक कॅमेरा कंपनी फुलफ्रेम आणि APS-C फॉरमॅट्स साठी वेगवेगळ्या लेन्सेस बनवते. याविषयी अधिक माहिती लेन्सेसवरील लेखात.

CMOS (Complementary metal–oxide–semiconductor) हा संवेदकाचा प्रकार आहे. संवेदकाचा दुसरा प्रकार म्हणजे CCD (charge-coupled device). याविषयीही विस्तृत माहिती त्यावरील लेखात देईन.

प्रचेतस's picture

7 Apr 2013 - 5:41 pm | प्रचेतस

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पुढील भागांची वाट बघत आहेच.

चौकटराजा's picture

7 Apr 2013 - 8:58 am | चौकटराजा

अगदी विसाव्या वर्षी आयसोली १ हा कॅमेरा विकत घेतला. मग दोन तीन कॅमेरे झाले. सध्या लायका लेन्स असलेला पॅनासोनिक टी झेड माझ्या कडे आहे. पण अगदी अलिकडे पर्यंत सेन्सर आकाराचे महत्व काय हे माहीत नव्हते. १९२० साली
काढलेल्या विन्ट्ज फोटोग्राफीची गुणवत्ता एवढी जास्त कशी याचे कारण बहुदा लार्ज फॉर्मॅट फिल्म मधेच असावे ! बाकी ही माहिती उपयोजन पातळीवर असलेल्यांच्या डोक्यावरून जाण्याची शक्यता असल्याने प्रतिसादात quality and quantity कमी
येण्याची शक्यता आहे. पण एकदा कॅमेरा फीचर्स व त्यांचे उपयोग हा धडा सुरू झाला की मजा येईल.( ख्याल गायकी ऐकताना बरेच श्रोते आलापीत झोप काढून घेतात मध्यलय चालू झाली की मग माना डोलावायला लागतात याची नोंद घ्यावी )

एस's picture

7 Apr 2013 - 3:53 pm | एस

ह्या लेखातील प्रत्येक बाबीचा संदर्भ पुढील लेखांमध्ये येणार आहे. उदा. फक्त थोडा भाग इन फोकस ठेऊन बाकीची पार्श्वभूमी आउट ऑफ् फोकस कशी करायची (थोडक्यात, डेफ्थ ऑफ् फिल्ड चे नियंत्रण कसे करायचे) हा मला नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे. याचे अंशतः उत्तर संवेदकांच्या आकारात आहे, तसेच ते कॅमेर्‍यांच्या प्रकारातही आहे.

म्हणूनच हा काहीसा नीरस पण महत्त्वाचा विषय आधी घेतला आहे.

छायाचित्रणाच्या एकेका छोट्या छोट्या बाबीवरही बोलायसारखे इतके काही आहे की प्रत्येकीसाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल. पाहूयात. जेवढं जमेल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. :) :)

अभ्या..'s picture

7 Apr 2013 - 3:57 pm | अभ्या..

बाकी ही माहिती उपयोजन पातळीवर असलेल्यांच्या डोक्यावरून जाण्याची शक्यता असल्याने

अगदी राजासाबांशी सहमत. बाकीच्या बर्‍याच प्रोफेशनल्सना माहीती अस्ल्याने झेपेल पण मला मात्र पार डोक्यावरूनच गेले. :(

सुहास झेले's picture

7 Apr 2013 - 3:52 pm | सुहास झेले

माहितीपूर्ण धागा... वाचनखुण साठवली आहे :)

शैलेन्द्र's picture

7 Apr 2013 - 5:01 pm | शैलेन्द्र

मस्त, मजा आली..
खासकरून संवेदकांबद्दलची माहिती आवडली ..

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Apr 2013 - 6:41 pm | लॉरी टांगटूंगकर

पु.ले.प्र

ऋषिकेश's picture

8 Apr 2013 - 12:00 pm | ऋषिकेश

वा वा!
तुमी लिवत र्‍हावा.. आमी वाचनखुणेत अ‍ॅडवत र्‍हातो

स्पा's picture

8 Apr 2013 - 12:36 pm | स्पा

सुरेख

और आंदो

माहितीपुर्ण लेख... धन्यवाद. :)

सुमीत भातखंडे's picture

8 Apr 2013 - 5:18 pm | सुमीत भातखंडे

महितीपूर्ण लेख...हळू हळू समजेल अशी आशा आहे
इतर प्रतिसादकांप्रमाणेच आम्हीही वाचनखूण साठवली आहे...अजून येऊद्यात

मोहन's picture

9 Apr 2013 - 1:49 pm | मोहन

वा.खू. साठवण्यात आली आहे.

पु.भा.प्र.

पैसा's picture

14 Apr 2013 - 10:18 am | पैसा

खूप माहितीपूर्ण आणि उपयोगाचा धागा. प्रतिसादांतूनही छान माहिती देत आहात. धन्यवाद!

एस's picture

14 Apr 2013 - 11:24 am | एस

धन्स पैसाताई.. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jul 2014 - 10:33 am | llपुण्याचे पेशवेll

वाह ही देखील माहीती उत्तम. धन्यवाद स्वॅप्स.

एस's picture

18 Jul 2014 - 11:21 am | एस

:-)