छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्

एस's picture
एस in काथ्याकूट
23 Sep 2013 - 2:50 pm
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना
छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे

ह्या लेखात आपण डीएस्एल्आर कॅमेर्‍यांना छायाचित्रण संयंत्रणा किंवा फोटोग्राफी सिस्टिम का म्हणतात हे पाहू.

कंझ्यूमर किंवा पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरे हे छायाचित्रकारांना कमीतकमी ताप देत छायाचित्रण सोप्पे बनवण्यासाठी असतात. एखादी छायाचित्रकार दुकानातून पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरा आणून थेट प्रतिमा घ्यायला सुरुवात करू शकते. तसेच नंतरही अशा कॅमेर्‍यांना फारफारतर जास्तीचे मेमरीकार्ड व बॅटरीशिवाय इतर काही घ्यायची सहसा गरज नसते.

डीएस्एल्आर अशा 'शूट राइट आउट ऑफ् द बॉक्स' तत्त्वानुसार वापरता येत नाही. एकतर डीएस्एल्आर हे कॅमेरा बॉडी आणि लेन्स मिळून बनतात. आपण कुठल्या प्रकारचे छायाचित्रण करणार आहोत आणि त्यानुसार कुठल्या प्रकारच्या लेन्सेस घेणार आहोत हे आधी ठरवायचे. मग फुलफ्रेम की डीएक्स फॉरमॅट, की फोर-थर्डस् त्यानुसार बॉडी पहायची. हे सगळं करताना बजेटही संभाळायचे. एवढे झाले म्हणजे ती छायाचित्रकार बनली असेही नाही. मग कॅमेर्‍याच्या व लेन्सेसच्या संख्येनुसार चांगली बॅग पहायची. त्यात फ्लॅश, दोन-तीन लेन्सेस, असल्या तर दोन कॅमेरा बॉडीज्, कार्ड व जास्तीच्या बॅटर्‍या, त्यानंतर फिल्टर्स, चार्जर्स, स्ट्रॅप्स, कव्हर्स, कॉर्डस्, रिमोट्स, आणि लॅपटॉपही बसला पाहिजे, ती स्टर्डी आणि वॉटरप्रूफही असली पाहिजे, एखादे गिंबल हेड, एखादा मिनी-गोरिलापॉडपण त्यात बसला पाहिजे... हुश्श...

तर मंडळी, या सगळ्याचे ओझे आपल्या खांद्यांना आणि खिशालाही परवडत नसते. (निदान म्या पामराला तरी नाही...) त्यामुळे दोनतीन जणांनी मिळून अ‍ॅक्सेसरीज घेणे जरा परवडते. कॅमेरे एकाच मेक चे असतील तर काही लेन्सेसही कॉमन घेता येतात. एकट्याला डीएस्एल्आर छायाचित्रण निव्वळ हौस म्हणून खरेतर परवडू शकत नाही. सो, धीराने कणाकणाने आणि अ‍ॅक्सेसरी-अ‍ॅक्सेसरीने आपली कॅमेरा बॅग हळूहळू सुसज्ज करत नेणे हीच खर्‍या छायाचित्रकाराची स्ट्रॅटेजी असते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता आपुन छायाचित्रकारभी बने... ;)

बॅक टू द बेसिक्स -

सर्वसाधारणपणे डीएस्एल्आर अ‍ॅक्सेसरीजचे खालील प्रकार मानता येतील.

     डीएस्एल्आर कॅमेरा अ‍ॅक्सेसरीज

     डीएस्एल्आर लेन्स अ‍ॅक्सेसरीज

     स्पीडलाइट्स/फ्लॅश अ‍ॅक्सेसरीज

     इतर अ‍ॅक्सेसरीज

डीएस्एल्आर कॅमेरा अ‍ॅक्सेसरीज

डीएस्एल्आर कॅमेरा बॉडींसाठी दोन फार महत्त्वाच्या अ‍ॅक्सेसरीज म्हणजे मेमरी कार्ड आणि जास्तीची बॅटरी. तसेच शोल्डर स्ट्रॅप म्हणजे कॅमेरा अडकवण्याचा पट्टा, कॅमेरा संगणकाला किंवा प्रिंटरवगैरेंना जोडण्यासाठीच्या कॉर्डस् म्हणजे जोडण्या वगैरे बाबीही महत्त्वाच्या असतात.

मेमरी कार्ड किंवा स्मृती (-पटल? -कोश? की नुसतेच स्मृती?)
जाऊद्या. आपले मेमरी कार्डच सोप्पेय... :P मेमरी कार्डचे डीएस्एल्आरसंबंधी महत्त्व हे, की ते कॅमेर्‍याच्या बॉडीवर ठरते. म्हणजे कॅमेर्‍याची अंतर्गत स्मृती किंवा बफर, कुठल्या प्रकारचे मेमरी कार्ड त्या बॉडीला चालते, कुठले नाही चालत, कमाल क्षमता किती, किमान रीड/राइट वेग किती, कार्ड स्लॉट किती आहेत, दोन स्लॉट असतील तर दोन्ही एकाच प्रकारचे आहेत की एक एसडी व दुसरे सीएफ्? आपण साध्या JPEG प्रतिमा घेणार की RAW? कॅमेर्‍याची न थकता प्रतिसेकंद प्रतिमा घेण्याची क्षमता किती आहे या सगळ्या बाबी पहाव्या लागतात.

Memory Cards

मेमरी कार्डचा वेग
डीएस्एल्आरची प्रतिसेकंद प्रतिमा घेण्याची क्षमता (FPS - Frames per Second) ही तीन ते आठ एवढी असू शकते. ही क्षमता कॅमेर्‍याचे शटर दाबून ठेवले असता जास्तीत जास्त वेळ राखणे हे खरे आव्हान असते. RAW प्रतिमा घेत असाल तर आजचे अत्याधुनिक डीएस्एल्आर त्यांच्या अगडबंब प्रतिमासंवेदकाच्या आकारामुळे तितक्याच अगडबंब प्रतिमा घेतात. साधारणपणे एकेका RAW प्रतिमेचा आकार वीस ते चाळीस MB एवढा असू शकतो. अशा समजा पाच ते सहा प्रतिमा कॅमेरा एकापाठोपाठ एका सेकंदात घेत असेल तर कॅमेर्‍याचे बफर भरायला जास्त वेळ लागत नाही. अशा वेळी काहीच सेकंदांनंतर अशी वेळ येते जेव्हा कॅमेरा प्रतिमा घेत प्रक्रिया करण्याचे थांबवून बफर रिकामे होण्याची वाट पहात शांत पडून राहतो आणि वाइल्डलाइफ छायाचित्रकारांसाठी अगदी थोडेसे असे मौल्यवान क्षण कायमचे निसटून गेलेले असतात.

मेमरी कार्डची क्षमता
आजच्या घडीला मेमरी कार्ड ४, ६, ८, १२, १६, ३२, ६४ अशा वेगवेगळ्या क्षमतेत उपलब्ध आहेत. तुमच्या डीएस्एल्आर बॉडीची क्षमता पाहून त्यानुसार कार्ड घेणे चांगले. शक्यतो खूप जास्त क्षमतेचे कार्ड घेणे टाळावे कारण कार्ड अचानक खराब होऊन त्यातील विदा कायमचा नष्ट होण्याची वाईट शक्यता कमी असली तरी ती वेळ जाम वैतागवाणी आणि कटकटीची असते. त्याचं काय आहे की लोक तुमच्या कार्डमधील विदा उडाला म्हणून परत तुमच्यासाठी लग्न करत बसतील असं नाही ना! म्हणून कॅमेर्‍याच्या बॉडीमध्ये एकाऐवजी दोन स्लॉट असणे व त्यांचा 'ओव्हरफ्लो' पेक्षा 'सायमल्टेनिअस बॅकअप्' म्हणून उपयोग करणे केव्हाही सेफ साईड. थोड्या उसंतीमध्ये पटकन् दोन्ही कार्ड बदलता येतील. युद्धासारखे सैन्याची पुढची फळी बदलत राहणे.

मेमरी कार्डचा मजबूतपणा व विश्वसनीयता
तसे आजकालची अत्याधुनिक कार्डस् ऊनपाऊसथंडी-प्रूफ असतात असा निदान त्यांच्या उत्पादकांचातरी दावा असतो. तरी आपण आपलं सांभाळून राहणं व बाजारातील सर्वोत्तमच कार्ड घेणं चांगलं. UHS-1 स्टॅण्डर्डची कार्डस् या दृष्टीने सर्वोत्तम असा अनुभव आहे. कार्ड विद्युतचुंबकीय क्षेत्रापासून दूर ठेवणे, विदा-प्रेक्षण वगैरे चालू असताना कॉर्डबिर्ड न काढणे अशी मूलभूत काळजी घेणे चांगले.

बाजारात SD (Secure Digital), SDHC (Secure Digital High Capacity), SDXC (Secure Digital 'Xtra Capacity'), CompactFlash (CF), Micro SD, UHS-I, XQD इत्यादी प्रकारची कार्ड उपलब्ध आहेत. आपला कॅमेरा कुठल्या प्रकारचे कार्ड स्वीकारतो हे कॅमेर्‍यासोबत आलेल्या यूजर गाईड नावाच्या जाडजू़ड पुस्तकात एकदा पाहून ठेवावे. तसेच जे कार्ड घेणार आहात त्या प्रकाराला आणि विदा-प्रेक्षण वेगाला सांभाळू शकणारे चांगल्यातले कार्डरीडर घ्यावेत. अयोग्य कार्डरीडरमध्ये एकतर कार्ड अनरीडेबल तरी दाखवेल नाहीतर कार्डमधील विदाचे वाटोळे तरी होईल.

एक्स्ट्रा बॅटरी

Nikon EN-EL 15 Rechargeable Li-ion Battery

NikonEN-EL-15Battery

(मूळ प्रतिमा Nikkon USA वरून साभार)

टॉपएण्ड डीएस्एल्आर कॅमेर्‍याची बॅटरी तशी बराच काळ चालेल अशा क्षमतेची असली तरी जास्तीची बॅटरी सोबत असणे व त्याचे चार्जर वगैरे टूरवर जाताना सोबत नेणे चांगले. बॅटरीच्या बाबतीत चिंगूपणा करू नये. कॅमेराउत्पादकाचीच 'वरीज्नल' बॅटरी विश्वसनीय दुकानातून घ्यावी.

Body Caps
डीएस्एल्आरच्या बॉडी व लेन्स कायमस्वरूपी संलग्न नसल्याने बॉडी कॅप आणि लेन्स रिअर कॅप नेहमीच वापरावी लागते. त्यामुळे धुळीसारख्या तुमच्या नाजूक उपकरणाची धूळधाण करणार्‍या शत्रूपासून बचाव उपकरणांचा बचाव होतो.

Adapters, Couplers and Brackets
या प्रकारात कॅमेरा तुमच्या संगणकयंत्रणेला जोडण्यासाठी लागणारे हॉट शू किंवा सिंक टर्मिनल अ‍ॅडॉप्टर यासारखी उपकरणे येतात. कनेक्टिंग कॉर्ड किंवा अ‍ॅडॉप्टरसाठीच्या कॉर्डही यातल्याच.

GPS Accessories
साधारणतः तुमच्या डीएस्एल्आरच्या प्रकारानुसार त्याला लागणारे जीपीएस् युनिट वेगळे विकत घ्यावे लागते. जीपीएस् सीरियल अ‍ॅडॉप्टर कॉर्ड, कॅमेरा स्ट्रॅप क्लिप वगैरे सबअ‍ॅक्सेसरीज यातच समाविष्ट होतात. काही कॅमेर्‍यांत जीपीएस् बिल्ट-इन् प्रकारातही येतात.

Remotes and Releases

Nikon ML-L3 Wireless Infrared Remote

ML-L3RemoteNikon

(मूळ प्रतिमा Nikkon USA वरून साभार)

यामध्ये मुख्यत्त्वे कॅमेरा वायरलेस रिमोट आणि रिमोट रिलीज् एक्स्टेंशन कॉर्ड हे दोन प्रकार आहेत. जास्त शटर इंटर्व्हल वापरून केल्या जाणार्‍या छायाचित्रणात उदा. मोशन ब्लर किंवा कमी प्रकाशातील छायाचित्रण, वाइल्ड लाइफ छायाचित्रण, सेल्फ पोर्ट्रेट्स, स्टार ट्रेल इत्यादींसाठी रिमोट आणि स्टर्डी ट्रायपॉड म्हणजे एकदम आवश्यक व सोयीचे.

Straps
भाऊ, कॅमेर्‍याच्या पट्ट्याला कमी समजू नका. तुमचं लाख-दीड लाखाचं सामान आणि त्यातला तुमचा अर्धा जीव ज्याला लटकलेला असतो तो पट्टा तितकाच मजबूत आणि आरामदायकसुद्धा हवा ना.

Eyepieces and Viewfinders
यात आयपीस मॅग्निफायर, आयपीस अ‍ॅडॉप्टर, आयपीस कॅप, रबर आयकप, करेक्शन आयपीस अशा गोष्टी मिळतात. स्टार ट्रेल वगैरे काढताना एवढ्या मोठ्ठ्या एक्स्पोजरमध्ये कॅमेर्‍यात मागून प्रकाश शिरून प्रतिमा धूरकट येऊ नये म्हणून कॅमेर्‍याचा व्ह्यूफाइंडर आयपीस कॅप लावून बंद करायची प्रथा आहे. तसेच करेक्शन आयपीसचा वापर व्ह्यूफाइंडरचा फोकस किंवा संकेंद्रीकरण अजून अचूक बनवण्यासाठी करतात. विशेषतः मॅक्रोफोटोग्राफीमध्ये व्ह्यूफाइंडरचे संकेंद्रीकरण अचूक असणे महत्त्वाचे ठरते.

Power Accessories
पॉवर अ‍ॅक्सेसरीजमध्ये मल्टीपॉवर बॅटरी पॅक (यामध्ये शटर रिलीज बटन पण असते. फॅशन फोटोग्राफर अशा बॅटरी पॅकचा वापर जास्तकरून करतात.), बॅटरी चार्जर, बॅटरी चेंबर कव्हर, पॉवर सप्लाय कनेक्टर, इत्यादींचा समावेश होतो.

Stereo Microphone

Nikon ME Stereo Microphone with D5100

ME-Stereo-Microphone

(मूळ प्रतिमा Nikkon USA वरून साभार)

आधुनिक डीएस्एल्आरमध्ये आता फुल-एचडी प्रकारचे मूव्ही शूटींग करता येत असल्याने आवाज अधिक सुस्पष्टपणे रेकॉर्ड करण्यासाठी खास स्टीरिओ मायक्रोफोन वापरले जातात जे कॅमेर्‍याच्या पॉपअप् फ्लॅशच्या जागच्या हॉट शू टर्मिनलमध्ये बसवून व्हीडिओ शूटींग करता येते.

Wireless Transmitters
कॅमेर्‍यातून संगणकप्रणाली, प्रिंटर किंवा एलसीडी स्क्रीन वगैरेंना वायरींची कटकट आणि स्टुडिओमध्ये पाय अडकून धडपडणे टाळून विदा स्थलांतरीत करता यावा यासाठी असे वायरलेस ट्रान्समीटर उपयोगी ठरतात.

Waterproof Housing
पाण्याखालचे अद्भूत जग कॅमेर्‍यात पकडायचे तर कॅमेरा व लेन्सेस आधी पाण्यापासून सुरक्षित कराव्या लागतात. त्यासाठी असे खास जलविरोधी आवरण मिळते. निकॉनची हाउसिंग व निकोनोज कॅलिप्सो फिल्म कॅमेरे त्यांच्या दर्जासाठी प्रसिद्ध आहेत.

डीएस्एल्आर लेन्स अ‍ॅक्सेसरीज

Lens Caps and Covers

Lens Front Cap

NikonSnapOnLensFrontCap

(मूळ प्रतिमा Nikkon USA वरून साभार)

लेन्सला मागे व पुढे अशा दोन कॅप किंवा झाकणे असतात. यापैकी पुढचे झाकण फक्त प्रत्यक्ष छायाचित्रण करत असतानाची वेळ सोडून सतत लेन्सवर लावून ठेवणे लेन्सच्या फ्रंट एलिमेंट आणि महागड्या लेन्सफिल्टरवर ओरखडे पडू नयेत व धूळ बसून वारंवार पुसण्याची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक. खासकरून निकॉनच्या स्नॅप-ऑन प्रकारच्या लेन्सझाकणांना मध्ये बोटांच्या चिमटीत धरून झाकण काढण्या/घालण्याची सोय असते. हे मला कॅनन वापरताना फार जाणवले :P पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍याच्या लेन्सच्या टोपणांना धाग्याने कॅमेर्‍याशी संलग्न केलेले असते. पण डीएस्एल्आरमध्ये ही सोय नसल्याने ही झाकणे विसरण्याचे प्रकार निदान माझ्यासारख्या विसराळू प्राण्याच्या बाबतीत तरी वारंवार घडतात.

Lens Hoods

Lens Hoods

NikonLensHoodsWiki

(मूळ प्रतिमा Wikipedia वरून साभार)

टेलिफोटो प्रकारच्या लेन्सेना लेन्सहूडची गरज नसते. पण वाइड अ‍ॅन्गल लेन्सेस वापरताना इकडचातिकडचा खट्याळ उजेड लेन्समध्ये येऊन घोस्टींग, लेन्स फ्लेअर म्हणजे प्रतिमेवर मधूनच उन्हाची तिरीप आल्यासारखे लांबुळके प्रकाशाचे ठिपके दिसतात. टेलिफोटो लेन्सेससाठीही शूटिंग अगेन्स्ट द लाइट सारख्या प्रकारात लेन्सहूड बरे पडते. शिवाय लेन्सहूड जर धातूचे किंवा चांगल्या प्लॅस्टिक वगैरेचे असेल तर लेन्स चुकून खाली पडलीबिडली तर थोडेफार हेल्मेटसारखेही काम करते. भारी कमळाच्या पाकळीगत लेन्सहू़ड लावल्यावर लेन्स वेगळीच दिसते आणि चारचौघात उगाचच भाव खाता येतो, हाही एक फायदा आहे.

Lens Filters

Lens Filters

LensFilters

(मूळ प्रतिमा Wikipedia वरून साभार)

लेन्सफिल्टरवर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. लेन्स फिल्टरचे काम मुख्यत्वे लेन्स आणि कॅमेर्‍याच्या क्षमतेपलिकडच्या काही गोष्टी करण्याची मुभा मिळावी हे असते. लेन्सफिल्टरचे वेगवेगळे प्रकार असतात. उदा. अतिनील किरण शोषून घेणारे UV फिल्टर, लेन्समध्ये येणार्‍या प्रकाशाची तीव्रता वेगवेगळ्या प्रमाणात मंद करणे यासाठीचे ND (न्यूट्रल डेन्सिटी) फिल्टर - धबधब्यांची दुधाळ छायाचित्रे यांच्याशिवाय घेता येणं महाकठिण आहे, फिल्मच्या जमान्यात वापरले जाणारे रंग समायोजक किंवा कलर करेक्शन फिल्टर - तेव्हा व्हाइट बॅलन्स नंतर समायोजित करण्याची क्षमता नव्हती, अवरक्त किंवा इन्फ्रारेड किरण रोधणारे IR फिल्टर - विशेषतः कृष्णधवल छायाचित्रणात उपयोग, प्रकाशकिरणांचे ध्रुवीकरण किंवा पोलॅरिटी नियंत्रित करणारे CP (सेंट्रल पोलराइजर) फिल्टर - यांचा उपयोग पाण्याच्या किंवा काचेच्या पृष्ठभागावरील अपवर्तित प्रकाश रोखून पलिकडील दृश्य अधिक सुस्पष्ट घेण्यासाठी होतो, क्रॉस-स्क्रीन फिल्टर, पोर्ट्रेट्समध्ये थोडासा मुग्धपणा आणणारे डिफ्यूजिंग फिल्टर, असे अनेक प्रकार यामध्ये येतात.

Tripod Collar Ring
एक्स्ट्रीम टेलिफोटोसारखी ही भलीमोठी लेन्स एकट्या तुमच्या डीएस्एल्आरच्या बॉडीला ट्रायपॉड वापरताना झेपू शकत नाही. यासाठी कॅमेरा बॉडी लेन्समाउंटच्या भरवशावर लटकत ठेऊन लेन्सलाच तिवईशी अशा कॉलर रिंगने जोडून वाइल्डलाइफ छायाचित्रण केले जाते. बर्‍याचदा टेलिफोटो लेन्सेससोबतच या कॉलर रिंग पुरवल्या जातात. गुरुत्वमध्य साधून योग्य रितीने कॉलर रिंग अ‍ॅटॅच करणे महत्त्वाचे.

Lens Adapters
यामध्ये विशेषतः लेन्स टेलिकन्व्हर्टर्स, वाइड अ‍ॅन्गल कन्व्हर्टर्स, लेन्स एक्स्टेन्शन ट्यूब, बेलोज, लेन्स रिवर्सिंग अ‍ॅडॉप्टर रिंग, फिल्टर स्टेप-अप् रिंग वगैरेंचा समावेश होतो.

स्पीडलाइट्स/फ्लॅश अ‍ॅक्सेसरीज

डीएस्एल्आर छायाचित्रणाचे एक आकर्षण म्हणजे कॅमेर्‍यावर तसेच आजूबाजूला उलट्या पांढर्‍या छत्र्यांपलिकडे वगैरे ठेवलेले हे प्रकाशस्रोत. झगमगाट... फ्लॅश छायाचित्रणावर आपण प्रकाशावरील लेखात डिट्टेल माहिती घेऊ. येथे आपण फ्लॅश किंवा इतर प्रकाशस्रोतांसोबत वापरण्यात येणार्‍या अ‍ॅक्सेसरीजवर थोडा प्रकाश टाकू.

FlashAccessories

Flash Filters and Diffusers
सर्वात महत्त्वाचा प्रकार. यामध्ये सॉफ्टबॉक्स, डिफ्यूजन डोम, पॉपअप् फ्लॅश डिफ्यूजर, कलर फिल्टर, फिल्टर होल्डर, ब्रॉलीज म्हणजेच पांढर्‍या छत्र्यां, परावर्तक पृष्ठभाग म्हणजेच रिफ्लेक्टर - यात सोनेरी, चंदेरी, हार्ड, सॉफ्ट, गोल, चौकोनी वगैरे असे बरेच प्रकार येतात, फ्लॅश हू़ड, जेल यांचा समावेश होतो.

Power Accessories
फ्लॅश युनिट्सना विद्युत पुरवठा करण्यासाठीच्या तारा, अ‍ॅडॅप्टर, वगैरे.

Flash Adapters
मॅक्रोसाठी वापरल्या जाणार्‍या रिंग फ्लॅशच्या अ‍ॅटॅचमेंट रिंग, फ्लॅश युनिट कपलर, फ्लॅश बॅटरी व त्यांचे चार्जर, वायरलेस रिमोट थ्रू-द-लेन्स फ्लॅश कंट्रोलर, वायरलेस कमांडर, पॉकेट विझार्ड, वेगवेगळे स्पीडलाइट स्टॅण्ड, वगैरे बर्‍याच गोष्टी येतात.

Miscellaneous Accessories
फ्लॅशसाठी क्लोजअप् स्पीडलाइट किट केस, सॉफ्ट केस, आणि वापरात नसतील तेव्हा झाकायची आवरणे ह्या बाबी इतर अ‍ॅक्सेसरीजमध्ये येतात.

इतर काही अ‍ॅक्सेसरीज

Tripods, Monopods, Gorillapods, Bean bags etc.
एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्सेस, क्लोजअप् किंवा मॅक्रो आणि लॉन्ग एक्स्पोजरसाठी कॅमेर्‍याला योग्य असा आधार देणे क्रमप्राप्तच.

Tripod, Monopod, Gorillapod, Bean bag

TripodsMonopodsGorillapodsBeanbags

(मूळ प्रतिमा Wikipedia वरून साभार)

वजनाने हलका, सहजासहजी न हलणारा म्हणजेच भक्कम, सहजपणे कॅमेरा अडकवता किंवा फिरवता येणारा, आडव्या, तिरप्या आणि उभ्या हालचाली एका लयीत व्हाव्या यासाठी गिअर असणारा, जास्तीत जास्त अंशातून वळवता येणारा, जास्तीत जास्त उंच तसेच जवळजवळ जमिनीला समांतर इतके समायोजन करता येणारा आणि तुमच्या कॅमेरा बॉडी व लेन्सचं वजन सहज पेलण्याची क्षमता असणारा ट्रायपॉड किंवा तिवई हवीच हवी. तिवईची उंची तिवईचे पाय फाकवून किंवा पायांची लांबी आखूड करून कमीजास्त करता यायला हवी. जलाशयावरील पक्षी कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी जवळजवळ जमिनीवर झोपून छायाचित्रण करावे लागते. तेव्हा दलदल आणि चिखलापासून कॅमेरा योग्य उंचीवर, पण जास्तीत जास्त खाली ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी तिवई पूर्ण फाकवता आली पाहिजे. तिवईवर क्षितिजसमांतरपणा दाखवणारी बबललेव्हल दोन्ही बाजूंना व पुरेशी मोठी असावी. तिवईवर पॅनहेड, बॉल हेड किंवा गिम्बल हेड बसवता आले पाहिजे. तिवई कार्बन फायबरची असेल तर ती भक्कम तरीही वजनाने हलकी असते. अशी तिवई घेणे परवडत नसेल तर थोड्या स्वस्त अ‍ॅल्युमिनिअम संयुगाच्या तिवया मिळतात. तिवईला वार्‍याने किंवा जमिनीच्या कंपनाने हलू नये म्हणून मध्ये वजन अडकविण्यासाठी हूक असावे. मधला दांडा आणि पाय यांना जोडण्यार्‍या अतिरिक्त तुळयांसारख्या पट्ट्या असल्यास उत्तम. स्थिरचित्रिकरणासाठीच्या तिवया आणि व्हिडिओ शूटिंगसाठीच्या तिवयांमध्ये फरक असतो. डीएस्एल्आरसाठी स्थिरचित्रिकरणाच्या तिवया घेणे चांगले.

तिवई थोडी गैरसोयीची पडत असल्याने विशेषतः स्पोर्टस् फोटोग्राफीमध्ये मोनोपॉड किंवा एकच पाय असलेला टेकू वापरला जातो. मात्र जास्त वजनाच्या लेन्सेससाठी तो एवढा स्थिर राहत नाही. शिवाय एका हाताने टेकू पकडून दुसर्‍या हाताने छायाचित्रण करण्याची सवय व्हायला हवी.

गोरिल्ला पॉड किंवा मण्यामण्यांनी जोडलेल्या माळेचे छोटे ट्रायपॉड लहानशा प्रमाणात टेकू द्यायला बरे पडतात. यांचे पाय सरळसोट नसून पाहिजे तसे वाकवता येत असल्याने गोरिल्ला पॉड उभे करण्यासाठी सपाट जागेची आवश्यकता नसते. तसेच ते एखाद्या तारेसारख्या भागाला गुंडाळून वापरता येतात. बीन बॅगसोबत लेन्सच्या थोड्या पुढच्या भागाला आधार देण्यासाठी काहीजण गोरिल्ला पॉडचा वापर करताना दिसतात.

बीनबॅग म्हणजे धान्य ठेवायच्या गोणींसारखा प्रकार. त्यात भुसा भरून किंवा थर्मोकॉलचे छोटेछोटे गोळे भरून अशा आधारावर कॅमेरा वा लेन्स ठेऊन छायाचित्रण केले जाते.

आपल्याकडे अशा महागड्या वस्तू नसल्याने काही बिघडत नाही. पुस्तकांच्या गठ्ठ्यांचा वापर करा, ट्रेकिंग करताना ट्रेकिंग सॅक वापरा, एखादा दगड किंवा झाडाच्या बेचक्याचा आधार म्हणून वापर करा किंवा अगदीच काही नाही मिळाले तर बरोबरच्या सोबत्याला अंगठे पकडून उभे करा.

Tripod Accessories
प्रामुख्याने यात तिवईला कॅमेर्‍याच्या बॉडीशी किंवा लेन्स कॉलर रिंगशी जोडणार्‍या विविध प्रकारच्या हेडयुनिटचा समावेश होतो.

Tripod Movements and Tripod Head Types

TripodAngles&Heads

(मूळ प्रतिमा Vanguard व Wikipedia वरून साभार)

3D किंवा पॅन हेड
यात तिन्ही मितींमध्ये किंवा वेगवेगळ्या मितींमध्ये स्वतंत्रपणे वेगाने कॅमेरा फिरवणे शक्य होते. पण अचूक आणि सावकाश गतीसाठी या प्रकारच्या हेडचा उपयोग तितका चांगला होत नाही. कॅमेरा फिरवल्यानंतर स्क्रू किंवा कळ आवळताना कॅमेरा हलणार नाही इतका स्मूद हेड असणे चांगले. स्वस्तातील हेड या दृष्टीने बरेच इकडेतिकडे हलतात कळ आवळताना. परिणामी अचूक फ्रेमिंग चुकते.
बॉल-अ‍ॅण्ड-सॉकेट हेड
यात आपल्या गुढघ्याच्या वाटीच्या सांध्यासारखी काहीशी रचना असते. पुरेसे वजनदार हेड वापरल्यास पटकन समायोजित करता येण्यासाठी चांगला.
गिअर हेड
यात अचूक व तंतोतंत हालचाली गिअर नॉब्ज फिरवून साध्य केल्या जातात. पण फिल्डमध्ये फारसा उपयोग नाही. मॅक्रोसाठी सर्वोत्तम.
गिम्बल हेड
अतिशय जडशीळ आणि लांब एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्सेससाठी खास वापरले जाणारे हेड. यात लेन्सचा गुरुत्वमध्य साधून लेन्स अधांतरी ठेवण्याची सोय असल्याने सगळ्या प्रणालीची हाताळणी सोपी होते. आकाराने मोठे, जड आणि महागडे.

कॅमेरा हलवण्यासाठी कॅमेरा, लेन्स किंवा तिवईच्या पायांचा वापर करू नये. एकदा तिवई चांगली भक्कम उभी राहिली की त्यावरील हॅण्डल किंवा नॉब वापरून कॅमेरा सेट करावा.

Monitor Configuration Accessories
एकच प्रतिमा पाहिल्या जाणार्‍या माध्यमाबरोबर बदलल्यासारखी वाटते. एका मॉनिटरवर फिक्कट व धुरकट तर दुसर्‍या मॉनिटरवर जास्त संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड वाटते. प्रिंट काढल्यावर प्रतिमा सर्वात छान दिसते असा माझा अनुभव आहे. पण मॉनिटर नीट कॅलिबर केलेला नसेल तर तुमच्या डीएस्एल्आरच्या रंगअचूकतेचा काही उपयोग होत नाही आणि चुकीचे पोस्टप्रोसेसिंग होऊ शकते - विशेषतः व्हाइट बॅलन्स समायोजित करताना. मॉनिटर ट्रू कलर 8-bit per color channel असलेला आणि बिल्ट-इन ICC Color Profile असलेला हवा म्हणजे फोटोएडिटिंग प्रणाली आणि मॉनिटर क्षमतांचा योग्य मेळ घालता येईल. बाजारात मॉनिटर समायोजन करणार्‍या यंत्रणा मिळतात. त्यात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही बाबींचा समावेश असतो. मात्र अतिशय उच्च दर्जाचे छायाचित्रण करायचे असल्यासच अशा महागड्या बाबींकडे वळावे. नाहीतर आपला सीआरटी सगळ्यात चांगला आणि परवडेबल. एलसी़डी वा टीएफटी किंचित मार खातात ट्रू इमेज डेपिक्शन मध्ये. पण आता त्यांचीच चलती आहे. सो, चलता है.

External Hard Disks for Backup
एकच मंत्र - बॅकअप्, बॅकअप् आणि बॅकअप्. खूप क्षमतेची एकच हार्डडिस्क घेण्यापेक्षा कमी क्षमतेच्या पण चांगल्यातल्या दोन-तीन हार्डडिस्क घ्याव्यात. त्याचबरोबर उत्तम प्रतिमांची निवड करून अशा प्रतिमा मूळ RAW फाइल व प्रोसेस्ड JPEG किंवा TIFF अशा दोन्ही प्रकारे एकत्र किंवा स्वतंत्र जतन करण्यासाठी डीव्हीडी वा ब्लूरे डिस्कवर साठवून ठेवाव्यात.

Bags

Vanguard Uprise Camera Bag

VanguardUprise48CameraBag

(मूळ प्रतिमा Vanguard वरून साभार)

दोन प्रकारच्या पिशव्या लगेच डोळ्यांसमोर येतात. एक म्हणजे शबनम बॅगेसारखी एका खांद्यावरून घेता येणारी आणि दुसरी म्हणजे सॅक. पहिल्या प्रकारात फारफारतर कॅमेरा व एक-दोन लेन्सेस बसू शकतात पण वजन कमी असल्याने आणि पटकन कॅमेरा बाहेर काढणे/आत ठेऊन देणे शक्य होत असल्याने अशी पिशवी फिल्डवर न्यायला सोयीची. रकसॅक प्रकारात बर्‍याच लेन्सेस, दोन-तीन कॅमेरा बॉडी, डिफ्यूजर, स्ट्रोब्ज, बॅटरी पॅक, मेमरी कार्ड, व लॅपटॉपसुद्धा बसू शकतो. त्यामुळे मोठ्या असाइनमेन्टसाठी जाताना किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासात अशा बॅगेचा वापर चांगला. बॅग दणकट, पुरेशी पॅडिंग असलेली, कोरडी राहण्याची क्षमता असलेली, चांगल्या चेनची, बदलता येणार्‍या कप्प्यांच्या रचनेची, कॅमेरा पटकन वरून तसेच बाजूनेदेखील काढता येणारी अशी हवी. इथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करू नका. खच्चून माल भरलेली तिजोरीसुद्धा तशीच चांगली हवी हे ओघाने आलेच.

Light Meters

Sekonic L-358 Light Meter

SekonicLightMeterWiki

(मूळ प्रतिमा Wikipedia वरून साभार)

आधुनिक कॅमेर्‍यांमध्ये एक्स्पोजर मीटरिंगची यंत्रणा आता खूपच अचूक झाली असली तरी इन्सिडण्ट आणि रिफ्लेक्टेड अशा दोन्ही प्रकाशाचे मोजमाप करून एक्स्पोजरसाठी वेगवेगळी कॉम्बिनेशन सुचवणारे लाइट मीटर विशेषतः कमी उजेडात किंवा स्टुडिओ फोटोग्राफीमध्ये जास्त करून वापरले जातात. जेव्हा एकापेक्षा अधिक स्ट्रोब्ज तीन-चार ग्रुपमध्ये कमांडरचा वापर करून एकाच क्षणी वेगवेगळ्या कोनातून व अंतरावरून फायर केले जातात तेव्हा आपल्याला पाहिजे तसे एक्स्पोजर मिळवणे हे तांत्रिकदृष्ट्या थोडेसे किचकट होते. अशा वेळी हे हातात मावणारे छोटेसे लाइट मीटर आपल्याला अ‍ॅपर्चर-शटर इंटर्व्हल-आयएसओ ह्या त्रिकोणाची विविध गुणोत्तरे सुचवून आपले काम जरा सोपे करते.

इथपर्यंत आपण डीएस्एल्आर छायाचित्रणकलेच्या साधनांची तोंडओळख करून घेतली. आता पुढील भागापासून छायाचित्रणाच्या मूलभूत बाबींकडे वळूया.

जाताजाता - "फिफ्टी शेड्स ऑफ् ग्रे" इज नॉट "द कम्प्लीट गाइड टू अण्डरस्टॅण्डिंग द व्हाइट बॅलन्स"... ;)

----------------------------------------
क्रमशः

प्रतिक्रिया

सुखी's picture

23 Sep 2013 - 3:14 pm | सुखी

Mazya kade sadhya cannon D500 ahe va 18-55 chi kit lens ahe. Navin lens gheu icchito.
http://lensbaby.in/ ya prakarchya lens bajarat upalabdha ahet. Tumhi yancha wapar kadhi kela ahe ka? kinva tumchya mitragananpaiki kuni vaparlya astil tar, krupaya margadarshan kara.

एस's picture

23 Sep 2013 - 3:37 pm | एस

लेन्सबेबी प्रकारच्या लेन्सेस मी किंवा माझ्या ओळखीतल्या कुणाकडे नाहीत. अतिशय अरूंद डेप्थ ऑफ् फिल्ड व वेगळाच पर्स्पेक्टिव यामुळे ह्या लेन्सने नेहमीचे छायाचित्रण करता येत नाही. पण थोडा वेगळा प्रयोग करून पहायचा असेल चांगल्या आहेत. लेन्सबेबीमध्ये काही प्रकारचे प्रतिमाभ्रंश येतात. तरी वापरून पहायला हरकत नाही.

सुखी's picture

30 Sep 2013 - 6:37 pm | सुखी

धन्यवाद

प्रचेतस's picture

23 Sep 2013 - 5:32 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
यातील क्यामेरा फ़िल्टर्सवर सविस्तर लेख नक्कीच लिहा.

चौकटराजा's picture

23 Sep 2013 - 5:49 pm | चौकटराजा

अगदी कष्टपूर्वक लेख तयार केलेला दिसतोय . यातील काही गोष्टी बहुदा पुढच्या जन्मी मी घेइन म्हणतो. बाकी गौतम राजाध्यक्ष डिफ़्युझिंग फ़िल्टर वापरत असावा काय ?

जॅक डनियल्स's picture

23 Sep 2013 - 8:00 pm | जॅक डनियल्स

खूप उच्च टेक्निकल माहिती.
सगळे लेख एका एका रिसर्च पेपर सारखे आहेत, प्रत्येक वाक्य महत्वाचे आहे.
खूप आवडले आहेत.

@वल्लीशेट, फिल्टरवर लेख यायला थोडा वेळ लागेल. पुढच्या लेखापासून रचना, प्रकाश, छायाचित्रणातील काही मूलभूत टीपा, एक्स्पोजर ट्रायन्गल, छायाचित्रणाचे विशेष प्रकार उदा. पोर्ट्रेट, लॉन्ग एक्स्पोजर, वाइल्डलाइफ आणि पक्षी, मॅक्रो, असे काही विषय हाताळण्याचा मनोदय आहे. पण फिल्टरचाही विषय छान आहे. पाहतो. आधी फिल्टरवर लिहितो.

@चौरासाहेब, राजाध्यक्षांनी घेतलेल्या सचिन, मंगेशकर भगिनी, धर्मेन्द्र आदींच्या प्रतिमा अभ्यास करण्यासारख्या आहेत. विशेष म्हणजे पोर्ट्रेटसाठी ते नेहमी मोठ्या खिडकीतून येणार्‍या प्रकाशाचा वापर जास्त करून करायचे. आपल्या सब्जेक्टला घरी बोलावून गप्पा मारता मारता कॅन्डिड स्वरूपाचे त्यांचे फोटो काढणे हे गौतम राजाध्यक्षांचे वैशिष्ट्य. त्यातील नैसर्गिक प्रकाशाचा वापर हा चेहर्‍यावरील नैसर्गिकता फार छान खुलवायचा. मला वाटतं कृष्णधवल फिल्मवर फोटो घेताना ते डिफ्यूजिंग फिल्टरसोबतच इन्फ्रारेड फिल्टरचे कॉम्बिनेशन वापरत असावेत किंवा खास पोर्ट्रेटसाठीच्या किंचित सॉफ्ट अशा लेन्सेस वापरून फोटो घेत असतील. त्यांच्या प्रतिमांमधील गतिकीय कक्षा (Dynamic Range) सखोल असायची. माणूस म्हणून ते ग्रेट होते आणि मराठी नवोदितांना मदतही करायचे.

@जेडी, धन्यवाद! कधी तुमच्याबरोबर सर्पोद्यानात भेट देण्याचा योग आला तर किंग कोब्रा या माझ्या सर्वात आवडत्या सापाचे (लांबूनच) फोटो घेईन म्हणतो! :D

पैसा's picture

24 Sep 2013 - 7:33 pm | पैसा

माहितीत भर टाकणारा लेख. असले डी एस एल आर क्यामेरे घेण्याची एवढ्यात शक्यता नसली तरी माहिती नोंदवून ठेवत आहे.

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2013 - 8:45 am | श्रीरंग_जोशी

छायाचित्रणासाठी लागणार्‍या साधनांची बरीच किचकट माहिती एकदम सोपी करून सांगितल्याबद्दल लेखकाचे अनेक आभार.

पुभाप्र.

चौकटराजा's picture

30 Sep 2013 - 8:51 am | चौकटराजा

नैसर्गिक प्रकाश हाच सर्वोत्तम ओम्नी लाईट या तत्वावर ठाम राहणारी एक दोन नावे आठवली. देवीदास बागुल, सतीश पाकणीकर व गोपाल नीलकंठ दांडेकर !

एस's picture

1 Oct 2013 - 12:50 am | एस

नैसर्गिक प्रकाशाच्या जवळपास जाण्याचा इतर सर्व कृत्रिम संसाधने प्रयत्न करतात. तसेच मीटरिंग सिस्टिम्स सुद्धा.

सतीश पाकणीकरांच्या छायाचित्रणाचे प्रदर्शन सध्या पुण्यात सुरु आहे.

मदनबाण's picture

30 Sep 2013 - 8:56 am | मदनबाण

चांगली माहिती... :)
होया {HOYA}कंपनीचे फिल्टर उत्तम दर्जाचे असतात.मी कधी कधी polarising filter वापरतो.
अधिक इथे :-
Hoya-catalog
http://www.hoyafilter.com/

एस's picture

1 Oct 2013 - 12:45 am | एस

सिंग-रे यांचे फिल्टर सर्वोत्तम, पण अतिशय महाग असतात. होयासुद्धा चांगली कंपनी आहे (टोकिना ही लेन्स् ऑप्टिक्स बनवणारी कंपनी होयाशी संबंधित आहे. त्यामुळे ऑप्टिकली होयाचे फिल्टर उत्तम दर्जाचे असतात.)

बाकी फिल्टरवर सविस्तर माहिती पुढच्या लेखात पाहूच.

चिगो's picture

30 Sep 2013 - 8:22 pm | चिगो

उत्तम अभ्यासपुर्ण लेख. आवडला.. लेन्स फिल्टर्सबद्दल आणखी माहिती येऊ देत.. आणखी एक, निकाॅर ३५मिमि १.८ जी कशी लेन्स आहे? ५० मिमी १.८डी मध्ये पोरीचे फोटो घेतांना फोकसिंग करता-करताच ८०% मोमेंट्स निसटून जातात.. :-(

एस's picture

1 Oct 2013 - 12:39 am | एस

५०डी ही एएफ् प्रकारची लेन्स असली तरी तिच्यात बिल्ट-इन् सायलेन्ट वेव्ह फोकसिंग मोटर नसल्याने संकेंद्रिकरण तितकेसे वेगाने होत नाही. तसेच संकेंद्रिकरण करायला अवघड अशा परिस्थितींमध्ये म्हणजे कमी प्रकाश, कमी कॉन्ट्रास्ट, हलते सब्जेक्ट इत्यादींमध्ये व अ‍ॅपर्चर लहान असताना ही लेन्स फोकस हंटिंग करत बसते. म्हणजे फोकसिंगच्या प्रतलाच्या पुढे-मागे होत राहते. ही लेन्स अ‍ॅपर्चर रिंग असल्यामुळे (डी टाइप) तिच्यावर एक प्रकारचा फिल्म एस्एल्आर् वापरल्यासारखा फिल येतो. म्हणून मला ती आवडते.

बाकी लहान मुलांना तुमच्या कॅमेर्‍यात आणि तुमच्या छायाचित्रणात अजिबात रस नसतो. त्यामुळे चाइल्ड पोर्ट्रेट्ससाठी फार संयम लागतो. डी प्रकारच्या लेन्सने गतिमान विषयवस्तूंच्या प्रतिमा घ्यायच्या असतील तर थोडेफार प्रेडिक्टीव फोकसिंग करायचे कौशल्य, वाइड अ‍ॅपर्चर आणि फास्ट शटर इंटर्वल यांचा वापर करावा लागतो.

AF-S प्रकारची कुठलीही लेन्स तुझ्या D5100 वर चांगल्या प्रकारे वेगाने संकेंद्रिकरण साधू शकेल. Nikkor AF-S 35mm f/1.8G ही लेन्स छानच आहे. पण DX आकाराच्या संवेदकांसाठीच वापरायची लेन्स आहे. पुढे FX वर अपग्रेड करताना ही लेन्स मग निरुपयोगी ठरेल. लेन्सचा बोके 50mm 1.8 पेक्षा थोडा कमी पण तरीही किट लेन्सच्या तुलनेत चांगला आहे. फोटो थोडे जास्त जवळून घ्यावे लागतील. कुणा ओळखीच्याकडे असेल तर एकदा स्वतः वापरून पहा. मगच घे. ही लेन्स जुनी पण चांगल्या स्थितीतही बाजारात उपलब्ध असते. फक्त प्रो म्हणजे व्यावसायिक छायाचित्रकारांकडून घेऊ नकोस. एखादा हौशी असेल तर त्यांच्या इक्विपमेंटचा तितकासा भुगा पडलेला नसतो. :)

आणि तू काढलेले फोटो दाखवायला विसरू नकोस.. :) ऑल द बेस्ट रे..

नन्दादीप's picture

1 Oct 2013 - 4:43 pm | नन्दादीप

सुंदर माहिती.... वाचनखूण साठवून साठवून ठेवली आहे....भविष्यातील वापरासाठी...

मराठी कथालेखक's picture

31 May 2016 - 5:39 pm | मराठी कथालेखक

मी Nikon D3200 चा इनबिल्ट फ्लॅश वापरुन छायाचित्रण करतो.
पण अनेकदा फ्लॅश वापरल्यास समोरची व्यक्ती डोळे मिटते अगदी प्रयत्न करुनही डोळे न मिटणे हे काहींना जमत नाही. तसेच लहान मुलांचे फोटो काढतानाही फ्लॅश वापरणे योग्य वाटत नाही.
मात्र कमी प्रकाशात फोटो चांगले येत नाहीत , ISO खूप वाढवूनही उपयोग नसतो. शटर १/१५ पेक्षा हळू करणे शक्य नसते.
अशा वेळी काय करावे ? Flash Diffuser चा उपयोग होईल का ?निदान मोठ्या व्यक्तींचे डोळे मिटण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल का ? soft box बरेच महाग आहेत (Diffuser च्या तुलनेने ) असे वाटते म्हणून आधी Diffuser वापरुन बघावा असा विचार करतोय. कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.

सह्यमित्र's picture

31 May 2016 - 6:21 pm | सह्यमित्र

पॉप अप flash ला बऱ्याच मर्यादा आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तो प्रकाश direct सब्जेक्ट वर टाकतो. त्यामुळे image मध्ये सगळा harsh light दिसतो. उत्तम व्यक्तिचित्रे (portraits) काढण्या साठी soft light असणे फार आवश्यक आहे. त्यातून सब्जेक्ट वर direct light पडल्याने तो परावर्तीत होऊन कॅमेरया मध्ये येतो ज्यामुळे चेहऱ्या वरील oil चा थर चमकतो (प्रत्येकाच्याच चेहेर्यावर हा कमी जास्त प्रमाणात असतोच ) आणि चेहेरे एकदम oily दिसतात.

हे टाळायला external flash वापरून तो छत अथवा भिंती वरून परावर्तीत करून वापरणे. ह्याने चांगला soft light मिळतो. अर्थात ह्यालापण मर्यादा आहेत, जसे कि छत उंच असेल तर प्रकाश नीट परावर्तीत होत नाही अथवा परावर्तीत प्रकाशाची intensity हि बरीच कमी होते. त्यासाठी external flash चांगल्या power चा असणे गरजेचे आहे.

सह्यमित्र's picture

31 May 2016 - 6:25 pm | सह्यमित्र

अजून एक indoor photos साठी एखादी fast (Wider Aperture ) लेन्स वापरा. ५० mm f /१. ८ or ३५ mm फ/१. ८ अशी

मराठी कथालेखक's picture

31 May 2016 - 6:46 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद
पण मी सगळ्या accessories वर एकदम खर्च करु इच्छित नाही. प्रयोग करत स्वतः शिकणे आणि मग असलेल्या उपकरणांची मर्यादा अगदीच जाणवू लागली तर मग गरजे प्रमाणे पुढची जोड देणे असा कार्यक्रम चालू आहे.

एस's picture

31 May 2016 - 6:23 pm | एस

DIY Pop-up flash diffuser असा गूगल सर्च करून पहा. घरच्या घरी अगदी कमी खर्चात छान डिफ्युजर बनव्ता येतात. मी एक डिफ्युजर स्वतः बनवून बरीच वर्ष वापरला होता.

फ्लॅशमध्येही काही सेटिंग्ज वापरून फ्लॅश मोड हा फिल लाइट करता येतो. पण डिफ्युजर हा जास्त चांगला उपाय आहे. निकॉनची 'क्रिएटिव्ह लाईटिंग सिस्टिम' डिफ्युजरमधूनही चांगले रिझल्ट्स देते.

मराठी कथालेखक's picture

31 May 2016 - 6:47 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद..