माझं कोकणातलं गांव :- भाग-४ (परतीचा प्रवास)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
19 Mar 2014 - 2:27 pm

माझं कोकणातलं गांव :- भाग - ३
मागील भागात>>
घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा.
तिथुन पुढे >>

कधी दुपारी मी आणि काका घराजवळच्या हौदात पन्हाळीला पिण्याचे पाणी येत नाही म्हणुन जिथुन पाणी येतं तिथपर्यंत पर्‍यात पाट साफ करत जायचो. हा पर्‍या गणपतीच्या देवळाकडे जाताना जो पर्‍या लागतो तोच पण त्याच्या थोडं वरती जावं लागतं. तिकडे जायला वेगळी एकेरी पाऊलवाट आहे. वाटेत भरपुर दगड धोंडे आहेत. जर एखादी पन्हळ गुरांच्या धक्क्याने जागेवरुन हलली असेल तर ती पुन्हा परत जोडुन, टेकु देवुन, माती लिंपुन डागडुजी करायला लागते की परत पाणी सुरळीत चालु व्हायचे. काही ठिकाणी हा पाट जिथं जमीनीवरुन जातो तिथे कधी कधी रात्रीचं एखादं रानडुक्कर पाटात मध्येच ठंडाव्याला लोळयला यायचं. कि तिथली माती पुन्हा सारखी करुन पाटात चर खणुन पाट वाहता करवा लागे. या पाटात जसं जसं वरती चढत जायचो तसं तसं वाट अधिक दुर्गम होत जाते. जिथुन पाणी झिरपत येते ती जागा तर एका मोठ्या शिळे खाली आहे. (खालील फोटो पहा)

शिळेच्या आंतमध्ये दोन दगडांच्या फटीत तुन झिरपणारे पाणी

काका आणि मी त्या शिळेत आंतमध्य जावुन आजुबाजुची जागा पालापाचोळा साफ करतो. पाणी जिथे पन्हळीत शिरते तिथे माती लिंपुन होणारी गळती थांबवतो. या शिळेत भरपुर कोळी, किटक, इतर वन्यजीव आहेत. या यंदा मला त्यात एक वटवाघुळही वस्तीला होते ते खुप जवळुन पहायला मिळाले.
वटवाघुळ

वटवाघुळ

आताशा येवुन सात ते आठ दिवस कसे भुरकन उडुन गेलेले असायचे. आता आम्हाला मामाच्या गावाला दापोलीला जायचे वेध लागलेले असायचे. कारण तिकडे कळव्यातील मामा मामी नि आमची भावंड आधीच येवुन काय काय मजा करत असतील असे वाटायचे. मग घरातील लहान मोठ्या मंडळीचा आम्ही मुक्काम वाढवा असा आग्रह होत असे. "एवढं लांब आला आहात तर रहा ना अजुन दोन एक दिवस, तर आजोबा "मी शनिवारी तुम्हाला जावु देणार नाही" (त्यांची अशी समज होती की शनिवारी कोणताही लांबचा प्रवास करु नये) असे बजावत असत.
यावेळ पावतो दोन दिवस आधी पुन्हा सामानाची बांधाबांध चालु व्हायची. आंब्यासाठी लाकडाच्या चौकोनी पेट्या, घरच्या माडापासुन काढलेल्या हिरकुटा पासुन बनवलेला खराटा, सुंभ, कोकम सरबताची बाटली, फणस, काजु, सुपारी, नारळ, लोणच्याची बरणी, फणसपोळी, आंबेवडी, साठं, काय घेवु नी काय नको असे होवुन जायचे.

आदल्या दिवशी काका खाली परत बंदरावर यायचा. कोळी लोकांकडे जावुन दुसर्‍या दिवसाची पहाटेची होडी /मचवा मिळेल काय हे ठरवायचा. लाँच आमच्या वेळेत नाही आली तर एवढं सामान घेवुन (आमच्या सोईनुसार) या होडीने खाडी पार करुन पलिकडे पैलतीरावरिल दापोली तालुक्यातील एका गावातील बंदरावर उरतायचं व तिथुन ए.स्टी पकडुन दापोलीला जायचे असा बेत असायचा.
निघायच्या आदल्या दिवसाची रात्र तर खुप जड जायची. सामना वर एकदा शेवटचा हात फिरवुन घ्यायचा की काही राहिलं तर नाही ना? "पुन्हा केव्हा येणार", "आता गणपतीला या एकदा" अशी आमंत्रणं व्हायची की आम्ही म्हणायचो "तुम्ही कधी येणार मुंबई बघायला." कारण आत्या, चुलत भावु यांनी कधीच मुंबई बघीतलेली नव्हती. माझी काकु तर अजुनही फक्त दोन तीन वेळाच मुंबईला येवुन गेलेली आहे. रात्री मग लहान मंडळी "आम्हलाही सकळी लवकर उठवा" म्हणजे निरोप घेता येईल असा हट्ट करत.

सकाळी लवकर उठुन चहा नाश्ता झाला की निघताना सगळ्या मोठ्या मंडळींना वाकुन नमस्कार करायचा. देव्हार्‍यात सुपारी ठेवायची की आम्ही सगळे निघायच्या तयारीत. आमच्याकडे कामाला असलेला धोंडीबा आमच्या सामानाचे डाग घेवुन झपझप आधीच बंदराकडे निघुन गेलेला असायचा. "परत या", "तब्येतीची काळजी घ्या", "गेल्यावर पत्र पाठवा" असे दोन्हीकडुन आश्वासानांची देवाणघेवाण झाली की आम्ही घरातुन बाहेर पडत असु. घरातील इतर मंडळी कुंपणा पर्यंत निरोप द्यायला येत असत. मग होता होईल तो मागे वळुन त्यांना हात हलवीत टाटा केला जायचा. काका मात्र आमच्या बरोबर बंदरावर यायचे.

स़काळच्या वेळीस नुकतेच उजाडालेले असताना पक्षांच्या किलबिटात, वरुन दिसणारी शांत खाडी, पलिकडच्या तिरावरले डोंगर असं सगळं विहंगम दृष्य मनात साठवंत ती डाग (उतरण) उतरायची. पक्टीला आमचा होडी लागलेली असायची, धोंडीबाने आणलेले सामान आधीच त्यावर चढवलेले असायचं. मग उरलेल्या सामाना सकट आम्ही होडीत चढलो की इकडे बंदरावर पुन्हा काका आणि वडीलांची अखेरच्या निरोपाची देवाणघेवाणा व्हायची.

मग होडीने किनारा सोडला की लांबवर जात जाता काका आणि धोंडीबा हात हलवत असताना दिसत असे. मग मात्र ते दोघे वळुन वर डाग चढताना दिसत असत. आता डोंगर हळुहळु दुर दुर जाताना बंदरावरील माणसे झाडे लहान होत जातं. नंतर तर हिरव्या पिवळ्या डोंगरावर ते दोघे पांढुरके ठिपकेच वाटत असत. आता पर्यंत होडी मुख्य पात्रात आलेली असे, शांत आवाजात दोन्ही बाजुंनी उंच डोंगर, सकाळचा खाडीचा गार वारा आणि त्यात नावेच्या वल्हींचा चुबुक चुबुक आवाज करत चाललेली आमची होडी, कधी माशांच्या झुंडी , पाण्यावर उडणारे पक्षी, वातावरण एवढं मस्त वाटतं की हा प्रवास संपुच नये असे वाटत राहयचं.

मग दापोली तालुक्यातील डोंगर, समोरील पक्टी त्यावरील माणसे हळुहळु दृष्टीक्षेपात येत असत. बंदरावरच दापोली तालुक्याची लाल डब्याची ए.स्टी. येवुन लागलेलीच असे. एकदा होडी किनार्यावर लागली की त्यातले सामानाचे डाग काढुन ए.स्टी.त चढवायचे कि मग पुन्हा घाटातील चढ वळवळणाने चढत एक एक गावं घेत दापोलीला जाण्यासाठी ए.स्टी. आपला मार्ग चालु लागे.

मग प्रवासातील प्रत्येक वळणावर जिथ पर्यंत दिसत असेल त्या शेवटपर्यंत मागे पळणार्‍या झाडांमधुन दिसणार्‍या खाडीचे, त्या मधिल होडयांचे, पैलतीरावरिल डोंगरांचं विहंगम दृष्य नजरेत साठवण्यचा अट्टाहास असे. कारण आता इकडे येणं हे पुढिल मे महिन्या शिवाय होणार नाही तेव्हा पुढिल वर्षभर या आठवणींचा ठेवा जपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असे. पुढे या प्रवासात आम्ही मुलं सकळी लवकर उठलेली असल्याने पेंगुळलेली असायचो. मग साधारण तासा दिड तासाने गाडी दापोलीच्या स्टँडला पोहचत असे की आई हलवुन जागं करत असे स्टँडवर मोठा मामा आम्हाला न्यायला आलेला असे. मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे.....

-- क्रमश: --

वावरकथालेखअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Mar 2014 - 4:15 pm | कंजूस

आवडले .

मुक्त विहारि's picture

19 Mar 2014 - 4:28 pm | मुक्त विहारि

ते

-- क्रमांश --

च्या जागी "क्रमश:" असे हवे होत का?

प्रमोद देर्देकर's picture

19 Mar 2014 - 4:39 pm | प्रमोद देर्देकर

अरे हो धन्यवाद मु.वि साहेब. टंकन चुक दुरुस्त करतो.

कोकणी पुणेकर's picture

28 Mar 2014 - 11:36 am | कोकणी पुणेकर

अतिशय सुरेख वर्णन. सकाळीच्या खाडी प्रवासाचे वर्णन वाचुन, पूर्वी अनेकवेळा केलेल्या चिवेली ते पन्हाळजे प्रवासाची आठवण झाली.

खटपट्या's picture

28 Mar 2014 - 10:05 pm | खटपट्या

मस्त पम्या !!!

पैसा's picture

28 Mar 2014 - 10:24 pm | पैसा

आंब्यासाठी लाकडाच्या चौकोनी पेट्या, घरच्या माडापासुन काढलेल्या हिरकुटा पासुन बनवलेला खराटा, सुंभ, कोकम सरबताची बाटली, फणस, काजु, सुपारी, नारळ, लोणच्याची बरणी, फणसपोळी, आंबेवडी, साठं, काय घेवु नी काय नको असे होवुन जायचे.

टिपिकल कोकणी! पूर्वी यस्टीत हे सगळं कोंबून जायचं. आता मांडवी आणि दिवा प्यॅसेंजरमधनं जातं. एवढाच फरक!

सौंदाळा's picture

29 Mar 2014 - 2:25 am | सौंदाळा

मस्तच रंगत चाललीये मालिका,
सुंदर लिहिताय.
पुभाप्र

कोकणी पुणेकर's picture

30 Mar 2014 - 9:15 pm | कोकणी पुणेकर

@प्रमोद देर्देकर,
तुमच्या वर वर्णन केलेल्या गावाचे नाव काय? कुठे आहे ?

आता कळव्यात खारेगावच आपले गाव, आन तिथली बोकड क्रिकेट मॅच आपला विश्व काप

प्रमोद देर्देकर's picture

31 Mar 2014 - 8:54 am | प्रमोद देर्देकर

@कोकणी पुणेकर
तुमच्या वर वर्णन केलेल्या गावाचे नाव काय? कुठे आहे ?>>>>
तालुका गुहागर , पण चिपळुण गुहागर रस्त्याला गुहागर पासुन ३५ कि.लो. मीटर अगोदर चिवेली गावातुन ११ कि.लो. आतमध्ये जाण्यासाठी फाटा लागतो पेवे-पांगारी म्हणुन. पण पांगारी शेवटचे ठिकाण त्या अगोदर एक स्टॉप विसापुर हे आमचे गाव. चिपळुणवरुन आलेली वाशिष्ठी नदी पुढे दाभोळची खाडी बनते. आमच्या गावाच्या खाडी पलिकडील तिरावर दापोली तालुक्याची गावे वसली आहेत.

@देव मासा
आता कळव्यात खारेगावच आपले गाव, आन तिथली बोकड क्रिकेट मॅच आपला विश्व काप>>>
तुम्ही माझी सही बघीतली नाहीत काय मी ही कळव्याचाच आहे. तुम्ही खारेगांवला कोठे असता? तुम्हाला व्य.नि. केला आहे.

कोकणी पुणेकर's picture

1 Apr 2014 - 12:10 pm | कोकणी पुणेकर

@प्रमोद
नमस्कार गाववाल्यानु. माहिती बद्दल धन्यवाद. माझे गाव खाडी पलिकडे. म्हणजे मी आता तुम्हाला 'गाववाले' म्हणू शकतो.

प्रमोद देर्देकर's picture

1 Apr 2014 - 1:00 pm | प्रमोद देर्देकर

हो अवश्या म्हणा की पण तुमचा गांव कोणतं ते नाही सांगीतलंत ते.

कोकणी पुणेकर's picture

1 Apr 2014 - 2:12 pm | कोकणी पुणेकर

माझं गाव पन्हाळजे (ता.खेड). चिवेलीच्या एकदम समोर. चिपळुन-चिवेली बसने चिवेली बंदर व तिथून पलिकडे नावेतुन. खेड मार्गे मात्र खेड -पन्हाळजे गाडी थेट गावात जाते.

बाकी माझे बाबा मुंबईला जाताना अळू, डांबे, कढीलिंब, अंबाडीची भाजी, आंबोशी, आमसुलं, चिंचेचे गोळे असला खाऊ न्यायचे, म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर जाताना कसेतरीच वाटे. ती माणसे आपल्याकडे एवढा खाऊ आणतात आणि तुम्ही हे काय जमवून नेताय?, असे मनात येई आमच्या! पण तेव्हा हे कुठे कळत होते की याच गोष्टींचे अप्रूप असते तिथल्या लोकांना!

देव मासा's picture

11 Apr 2014 - 12:56 am | देव मासा

आम्ही मुळचे मुंबईकर , बाबा सेवा निवृत्त झाले आणि आम्ही आलो कळव्यात राहायला , पारसिकला , झाली आता १० वर्ष , हा लेख वाचुन आर्कुट वर मित्राने एकमालवणी मिश्रित मराठी कविता पाठवली होती ती जर आठवली , चेपू पेस्ट करीत आहे इथे .

1

चाकरमानी म्हणजे मुंबईच्या गर्देतलो *"कॉमन माणूस "*
गावाची नाळ तोडून, पोट भरुक येता
नशिबाक दोष देत, मुंबईकर होवन जाता
तेका सुद्धा वाटता, गावाकडे रवायाचा सकाळच्या पारार उठान, गायीच्या बोम्बांका तोंड लावायचा
झाड्यासाठी लायन न लावता, नदीकाठी धावायचा
पिशयेतल्या दुधान तेची, तहान मिटान जाता
बाजारातल्या बेसनाक, तो पिठी समजान खाता
आपल्या भाषेक गावपण, मुंबईत जपाक जाता
ट्रेन मध्ये भजन, गावून पोलीसाचो मार खाता
बाल्कनीत तुळशी लावन आणि ,गावाची उकड्या तांदळाची ,पेज खावन समाधान मानून घेता
पण इंग्राजलेल्या पोरांसमोर, नाईलाज तेचो होता
मालवणी जत्रेक जावन, वाडे सागुती खाता
खटखटे लाडू आणि खाजा, घेवन घराकडे येता
मालवणी बोलाचा कि मराठी ,ह्या कन्फ्युजन मध्ये रवता
"मी भांडूप ला रवतो" सारख्या,मालवणी मिश्रित भाषेत मराठी तो बोलता
गावाकडे जाताना मातुर, खूप खुश होता
रोज 2 तास OT मारून, नवीन लुंगी बनियन घेता
खावक म्हनान प्रेमान तो, "मैसूर पाक" नेता
मेल्या "शिनेला" कसली हाडलस, म्हटल्यार तोंडात मारून घेता
गावात्ल्यान्का वाटता मेलो, खूप कायतरी कमावता
पण पोरांचा शिक्षण, आणि बिल्ला भरता भरता तो पुरा आयुष्य गमावता
गणपतीच्या येलेक मात्र, पुन्हा "फिनिक्स " पक्षी होता
गावाकडे जावाचा म्हनान, राखेतसून जन्म घेता
असात नसात ता गहान ठेवन, गावाकडे पळता
10 बाय 10 च्या खोल्येत हुक्लेलो, "रोमान्स" करुक गावातच तर येळ मिळता
अजून सुद्धा न चुकता, मनी आर्डर पाठवता
आपण एक वेळ खावन, पोरांका खूप शिकवता
आयुष्याचा शेवटी मात्र, पुन्हा मन व्हावता
शेवटचे दिस मजेत काडुक, गावाकडे धावता
असो आमचो चाकरमानी, नो *" मनी "* पण मोठेपनाचो *"धनी"*