निवडणूक २०१४ अनुभव: १. नावनोंदणी

आतिवास's picture
आतिवास in राजकारण
17 Mar 2014 - 10:04 pm

भारतात सार्वत्रिक निवडणूक घ्यायची हे एक आव्हानात्मक काम आहे याची मला कल्पना आहे. निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक प्रक्रिया नीट व्हावी म्हणून राबणा-या इतर यंत्रणांचही त्यासाठी कौतुक करायला पाहिजे. दर वेळी या निवडणूक प्रक्रियेतून आपल्यासारख्या सामान्य लोकांना बरंच काही शिकायला मिळतं.

मला आठवतं – मी जेव्हा मतदान करायला ‘पात्र’ झाले त्यावेळी ‘पवित्र राष्ट्रीय कर्तव्य’ पार पाडण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होते. पण बरीच वर्ष मी आणि मतदान यांचा पाठशिवणीचा खेळ चालला. दरवेळी मी नाव नोंदवायला गेले की आधी एक तर कागदपत्रांची अडचण यायची. मी रहिवासी असल्याचा कसलाही पुरावा माझ्याकडे नसायचा. त्यावर मात करून एक दोनदा नाव नोंदवलं; पण प्रत्यक्षात मतदानाची तारीख येईतोवर मी गाव बदलेलं असे किंवा त्याच गावात असले तरी राहण्याची जागा बदललेली असे. या सगळ्यातून मार्ग काढत अखेर २००४ मध्ये पहिल्यांदा मी मतदान करू शकले आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका अशा विविध निवडणुकांत मतदान करायचा अनुभव माझ्या गाठीशी जमा झाला.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यामुळे मतदार यादीत माझं नाव असेल याची मला खात्री होती आणि सुदैवाने या मधल्या काळात माझा पत्ता बदलला नव्हता. सध्याच्या माझ्या सोयीच्या “ऑनलाईन” तत्त्वानुसार मी या पानाला भेट दिली. https://ceo.maharashtra.gov.in/marathi/FrmMainPage.aspx

Chief Electoral Officer, Maharashtra

Electoral Roll Search (मतदार यादीत नाव शोधणे)
Prepared By : Chief Electoral Officer, Maharashtra

Search In English मराठीत शोधा
Id Wise Name Wise

Go

YOU ARE VISITER NUMBER : 3593901

तिथं काही माझं नाव मिळालं नाही.

मग दुसरा पर्याय – नेहमीच्या भाषेत प्लॅन बी – ऑनलाईन नाव नोदणी.
https://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx

Chief Electoral Officer, Maharashtra

Greater Participation for a Stronger Democracy

Home PDF Electoral Roll (Partwise) Claims & Objections Online Voter Registration Online Complaints Contact Us
CEO Maharashtra
Online Voter Registration

Form 6 Inclusion of names for residents electors
Form 6A Inclusion of names for overseas electors
Form 7 Any objection on inclusion of names)
Form 8 Correction of entries in the Electoral Rolls
Form 8A Transposition within Assembly

आधी नावनोंदणी केली, मोबाईलवर पासवर्ड आला. अर्ज क्रमांक ६ उघडला – माहिती भरायला सुरुवात केली. एक फोटो, निवासाचा पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा जोडायचा होता. हे सगळे ‘पुरावे’ माझ्या संगणकात होते त्यामुळे अडचण येणार नव्हती मला. दुस-या पानावर गेल्यावर लक्षात आलं की पीडीएफ जोडून चालणार नव्हतं तर जेपीईजी इमेज जोडायची होती. मी निमूट अर्ज बंद केला आणि दुस-या कामाला लागले.

दुस-या दिवशी डिजिटल कॅमे-यावर ते दोन पुरावे टिपले, संगणकात ते साठवले आणि पुन्हा ऑनलाईन अर्जाचा दरवाजा ठोठावला. पहिला अर्धवट अर्ज मला उघडता येत नव्हता – मग पुन्हा सगळी प्रक्रिया केली आणि एकदाचा अर्ज भरून झाला.

तीन चार दिवसांनी पुन्हा नाव तपासलं – पण अजूनही ते नव्हतंच यादीत.

मग वर्तमानपत्रात एका बातमीत टोल फ्री नंबरची माहिती मिळाली. प्रत्यक्षात १९५० हा फोन चालत नव्हता. दहा वेळा प्रयत्न केला आणि मग गप्प बसले.

९ मार्च रोजी मतदार यादीत नाव नोंदवायची अजून एक संधी होती. मतदान केंद्रावर जायचं; यादीत नाव आहे का ते बघायचं; असलं तर ठीकच – नाहीतर अर्ज भरून द्यायचा. मी फोटो आणि त्या दोन कागदांच्या फोटोप्रती घेऊन गेले शाळेत – म्हणजे आमच्या मतदान केंद्रात.

तिथं चार जोडून ठेवलेल्या टेबलांच्या मागे चार लोक बसले होते.
election 1

केंद्रात पन्नासेक लोक असतील. प्रत्येक गटाच्या हातात एकेक यादी होती आणि त्या यादीत लोक डोकावून पाहत होते. मीही एका गटात डोकावून बघितलं – मग लक्षात आलं की आपल्याला प्रभाग अथवा वॉर्ड क्रमांक माहिती नाही.

election 2

मग तिथल्या कर्मचारी स्त्रीला माझ्या निवासस्थान संकुलाचं नाव सांगून यादी मागितली; तर त्या ‘प्रभाग सांगा’ म्हणाल्या. तो तर मला माहिती नव्हता.

तोवर मला एकंदर इकडून तिकडे टोलवलं जाण्याचा कंटाळा आला होता. इतकं झंझट करत बसण्यापेक्षा ‘नवा अर्ज भरू’ असं म्हणत मी दुस-या कोप-यातल्या कर्मचा-याकडे गेले. तर तिथं अर्ज संपले होते. सकाळी साडेदहा वाजताच अर्ज संपले होते. “आम्हाला फक्त दहा अर्ज दिले होते, आम्ही काय करणार? तलाठी ऑफिसात जाऊन भांडा तिथल्या साहेबांशी” असा त्या बाई मला सल्ला देत होत्या आणि इतर तीन कर्मचारी त्यांना अनुमोदन देत होते उत्साहाने. रविवारी काम करायला लागल्याचा रागही त्यांनी व्यक्त केला.

“नगरसेवकाच्या ऑफिसात मिळताहेत अर्ज, तिकडून घेऊन या”, दुस-या रांगेत उभ्या असलेल्या एका सद्गृहस्थांनी सल्ला दिला. आमच्या नगरसेवकाचं कार्यालय मला माहिती नव्हतं – पण ‘शोधा म्हणजे सापडेल’ या तत्त्वानुसार शोधल्यावर ते सापडलं. तिथं नमुना अर्जही मिळाला – तो घेऊन मी शाळेत परतले तर गर्दी (अपेक्षेप्रमाणे) अजून वाढली होती. लोक अधिकच वैतागले होते, कर्मचारी गर्दीला हाताळू शकत नव्हते, पुरेसे अर्ज नव्हते, प्रभागांचे नंबर लोकांना माहिती नव्हते – सगळा नुसता गोंधळ होता.

मी अर्ज भरण्याच्या तयारीत होते तर मला सांगितलं गेलं की कागदपत्र नुसती जोडून चालणार नाहीत; ती कागदपत्र खरी असल्याचा सही शिक्का हवा. कुणाचा आणायचा असतो तो? तो कुठून आणायचा आता रविवारच्या दिवशी?

मला त्या कर्मचा-यांची दया आली आणि माझ्यासकट तिथं आलेल्या इच्छुक मतदार लोकांचीही दया आली. निवडणूक आयोगासमोर काय प्रकारची आव्हानं असतात याची ही फक्त एक झलक!

election 3

मतदान करणं – हा हक्क आहे, तर तो सहजी का मिळू नये? प्रत्येक वेळी हक्क मिळवण्यासाठी इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया का करावी लागते? मुळात यादीत असलेली नावं गायब का आणि कशी होतात? निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काय होतंय याची माहिती कधी मिळते का? निवडणूक तयारीच्या बाबतीत ही माहिती देणारी यंत्रणा असते का? प्रश्नच प्रश्न!

या सगळ्या गदारोळात एक गोष्ट ठळकपणे जाणवली; ती म्हणजे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अभाव. इथं इच्छुक मतदारांना मदत करायला कुणीच नव्हतं. नेते येतात तेव्हा कार्यकर्त्यांची गर्दी असते – इतर वेळी ते कुठे असतात कोण जाणे! बहुधा फेसबुकवर किंवा तत्सम सोशल मिडीयायामध्ये आपापल्या नेत्यांना “लाईक” देत बसले असतील – किंवा दुस-या पक्षांबद्दल अपप्रचार करत बसले असतील.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

18 Mar 2014 - 7:03 am | खटपट्या

खालील लिंक वर नाव शोधायचा प्रयत्न केले पण व्यर्थ

https://ceo.maharashtra.gov.in/marathi/FrmMainPage.aspx

मग आता इथं जाऊन नाव नोंदवा : https://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx

लेखात उल्लेख केल्याप्रमाणे तुमचा फोटो, निवासाचा पुरावा (वीज बील, पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन चालवायचा परवाना यांपैकी एक)आणि जन्मतारखेचा पुरावा ( उदा. शाळा सोडल्याचा दाखला) यांच्या जेपीईजी इमेजेस तयार ठेवा. पाचेक मिनिटांत काम होईल.

खटपट्या's picture

18 Mar 2014 - 11:32 am | खटपट्या

पाचेक मिनिटांत काम होईल.

Facebook smileys

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2014 - 10:11 am | पिलीयन रायडर

काय मजाय...

काल रात्री मोबाईल वरुन तुम्ही दिलेल्या लिंक वर माझं नाव शोधलं.. सापडलं..का कोण जाणे लगेच त्याचा स्क्रिन शॉट घेऊन ठेवला..

आता सर्च करतेय तर म्हणत आहे की तुमचं नाव लिस्ट मध्ये नाही, फॉर्म ६ भरा..!!

पण जर आय.डी नंबर वरुन सर्च केलं (जो सुदैवानं स्क्रिन शॉट मध्ये आहे..) तर मला माझे नाव दिसत आहे..

म्हणजे नक्की काय समजायचे? आणि मुख्य म्हणजे समजा माझे नाव यादीत आहेच (त्या आय.डी नंबर वरुन शोधुन..) तर पत्ता तर चुकीचा आहेच, पण माझा फोटो आणि बाकी डिटेल्स बरोबर आहेत की नाही हे कसे कळणार? मतदानाचे कार्ड कुठे मिळते..??

बाकी तुमचा लेख अगदी पटला.. हेच विचार माझ्याही मनात आले होते जेव्हा मी नोंदणीचा प्रयत्न करत होते. इतकं अवघड का करुन ठेवलं असेल सगळं.

आजकाल सगळ्यांकडे पासपोर्ट असतो.. आधार कार्ड आहे.. म्हणजे प्रत्येकाची माहिती कुठे ना कुठे घेऊन ठेवलेली आहेच ना.. मग जुन एकदा परत जन्माचा पुरावा, निवासाचा पुरावा कशाला करत बसायचं?

~ पहिल्यांदाच माझे नाव यादीत आले आहे.. तस्मात अनुभव नाही.. जाणकारांनी मदत करावी..

आतिवास's picture

18 Mar 2014 - 10:44 am | आतिवास

ही आणखी एक नवी गुंतागुंत.
https://ceo.maharashtra.gov.in/Search/SearchPDF.aspx या पानावर जाऊन बघा. तुम्हाला विधानसभा मतदारसंघ आणि प्रभाग नंबर माहिती असेल तर माहिती मिळेल इथं. त्या त्या प्रभागाची पूर्ण मतदार यादी आहे - त्यात तुमचं नाव शोधा (नकाशे असतात त्यामुळे आपला रहिवास शोधता येतो - थोडी चिकाटी लागते जरुर!). त्यात तुमचं नाव असेल आणि फोटोही असेल. फक्त नाव असेल पण फोटो नसेल तर फोटो ९ मार्च रोजी देण्याची सोय होती. आता फोटो देता येईल का नाही, ते शोधायला लागेल. काही शोध लागला तर सांगते!

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2014 - 11:10 am | पिलीयन रायडर

पीडीएफ पाहिली ना.. त्यात एका चौकोनात Photo available असा लिहीलय.. फोटो नाहीये..

आता काय करायचं?

त्या आख्या पिदीएफ मध्ये कुणाचाच फोटो नाहीये..

एक तारा's picture

18 Mar 2014 - 2:21 pm | एक तारा

माझ्या मते ते photos privacy issue मुळे दाखवले नाही आहेत. पण photo चं जाऊ द्या. तुम्हाला फक्त ID कार्ड दाखवावा लागेल.

पिरा, मला वाटतं पीडीएफचा आकार आवाक्यात ठेवण्यासाठी फोटो अपलोड केले नसतील.
मी फोटोंसह पीडीएफ यादी पाहिलीय (त्यादिवशी मतदान केंद्रात) असं मला वाटतं - पण खात्री नाही!

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2014 - 12:49 pm | पिलीयन रायडर

पण माझाच फोटॉ माझ्या नावा समोर आहे का ते कसं कळणार? दुसरं असं की समजा सगळं बरोबर असेलही.. पण आता मतदान करता येण्या साठि मी मतदानाचे कार्ड कुठुन घ्यायचे असते?

तुम्ही फोटो दिला असेल (आधी, अर्जाबरोबर), तर तुमच्या मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र मिळण्याची व्यवस्था आहे - आजही माझ्या (म्हणजे मी जिथं मतदान करते त्या!) मतदार केंद्रावर एक कर्मचारी ती देण्यासाठी बसला होता. चक्कर मारून बघा तिकडं - ऑफिसला थोडं उशीरा जाता येत असेल तरच शक्य आहे म्हणा ते!

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2014 - 1:37 pm | पिलीयन रायडर

ओके.. शनिवारी मिळेल ना.. मग चक्कर मरते.. दुसर्‍या कुणाकडे तर देत नसतीलच.. अरे एक मिन..

तुम्ही दिलेल्या लिंक वर नाव, यादीम क्रमांका सोबत मतदान केंद्र दिलं आहे तिथेच मिळणार ना हे कार्ड? माझी आई त्याच शाळेत काम करते!!

खटपट्या's picture

18 Mar 2014 - 11:42 am | खटपट्या

इथे पीडीएफ उघडत नाही आहे.

Skype Emoticons

चिगो's picture

19 Mar 2014 - 1:44 pm | चिगो

ताई, ही मतदाता नोंदणी "कंटीन्युअस अपडेशन" टायपातली आहे.. ९ मार्चला झालेला "स्पेशल कँप" हा तुमच्या मतदाता केंद्रावर नावनोंदणीसाठी होता. पण तुम्ही तुमच्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येईपर्यंत (डेट ऑफ नोटीफिकेशन), तुमच्या जिल्हा निर्वाचन अधिकार्‍याच्या कार्यालयात तुमचे नाव नोंदवू शकता. निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर ही तारीख शोधू शकता.

आणखी एक : आता प्रत्येक मतदात्याला " फोटो व्होटर स्लिप" देखील दिल्या जाणार आहेत. ह्या स्लिप्स तुमच्या मतदाता केंद्राचा बुथ लेव्हल ऑफीसर तुम्हाला घरपोच देईल. जर तुमचे मतदाता कार्ड काही कारणाने मिळत नसेल, पन मतदाता यादीत तुमचे नाव असेल, तर ह्या "फो.व्हो.स्लि."च्या मदतीने तुम्ही मतदान करु शकता.. :-)

आणखी एक: तुमच्या मतदान केंद्रावर जर हात जोडून तुमचे स्वागत करण्यात आले, किंवा पाणी/ शरबत देण्यात आले, किंवा तुमचा फोटो घेऊन तुमच्याशी शेअर केला गेला... तर दचकु किंवा घाबरु नका. मतदान लोकाभिमुख आणि "फन टू डू" करण्याचा प्रयत्न आहे तो.. ;-)

आतिवास's picture

19 Mar 2014 - 1:57 pm | आतिवास

धन्यवाद चिगो या ऑथेंटिक (मराठी शब्द काय बरं?) माहितीबद्दल.

कुणाला "फन टू डू"चा अनुभव आला, तर नक्की इथं सांगा!

मुक्त विहारि's picture

19 Mar 2014 - 10:01 pm | मुक्त विहारि

मतदान यादीत नांव नसेल, तर पासपोर्ट चालू शकतो का?

किंवा मतदान ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट चालू शकतो का?

(कारण पासपोर्ट काढण्या साठी जी कागदपत्रे लागतात, तीच कागदपत्रे मतदानाचे ओळखपत्र काढायला पण लागतात.शिवाय पोलीस स्टेशनला जावून ओळख पटवायला लागेते, तो एक अधिकचा मुद्दा.)

आत्मशून्य's picture

19 Mar 2014 - 10:26 pm | आत्मशून्य

मतदान यादीत नांव नसेल,

तर आपणास ब्रम्हदेवही मतदान करु देणार नाही. पण यादीत नाव असेल तर मात्र पासपोर्ट, ड्रायवींग लायसन्स, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र अथवा आणखी कोणताही कागद जो आपल्या ओळखीचा व सदरील ठीकणचा रहीवासी असल्याचा (एकत्र) कायदेशीर पुरावा आहे तो चालवुन मतदान करता येइल (आधार कार्ड).

खाली आत्मशुन्य ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान यादीत नाव नसेल तर मतदान करु शकत नाही. नाव असल्यास त्या त्या राज्यात काही मान्यताप्राप्त ओळखपत्रे, जसे की पासपोर्ट, चालक परवाना इ. ओळख पटवण्याकरीता ग्राह्य धरल्या जातात. आसाममध्ये अशी (आठवतात त्याप्रमाणे) २४ ग्राह्य ओळखपत्रे होती. मेघालयात "फोटो व्होटर कार्ड" १००% मतदात्यांना दिलेली असल्याने, इथे इतर कुठलेही कार्ड चालत नाही.
तसेच वर सांगितल्याप्रमाफो, जर मतदार यादीत नाव असेल तर "फो. व्हॉ.स्लि." वाटल्या जातील, अशी अपेक्षा आहे..

एक तारा's picture

18 Mar 2014 - 11:16 am | एक तारा

त्या screen shot मध्ये तुम्हाला तुमचा मतदार संघ, यादी क्रमांक वगैरे मिळाला असेल. ते वापरून https://ceo.maharashtra.gov.in/Search/SearchPDF.aspx या लिंक वरून तुम्ही यादी मध्ये तुमचा नाव पाहू शकता. (part म्हणजे यादी क्रमांक).
त्याच यादीत तुम्हाला तुमच्या प्रभागाचा नकाशा पण मिळेल आणि election centre कुठे आहे त्याचा पण पत्ता लागेल.
यादीत नाव असेल तर नक्कीच मतदान करता येत पण नुसतं voting card असेल पण यादीत नाव नसेल तर मतदान करता येत नाही.

मी चेक केले, माझे नाव आहे. पण भेंडी व्होटर कार्ड बनवताना बाकीचे सर्व योग्य लिहूनही शेवटी जेण्डर तेवढे फीमेल केलेय =)) =)) =))

आतिवास's picture

18 Mar 2014 - 11:20 am | आतिवास

शाबास!
मतदान करता येणार का आता? फोटो आहे का?
https://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx या ठिकाणी अर्ज ८ तुम्हाला कदाचित उपयोगी असेल. बघा, जेंडर बदल करता येतोय का ते!

( अवांतरः बाकी इतर वेळी स्त्रीद्वेष्टा बिरुद मिरवण्याची ही शिक्षा मिळालेली दिसतेय ;-) - गंमत करते आहे हे वेगळे सांगायला नको!)

बॅटमॅन's picture

18 Mar 2014 - 11:22 am | बॅटमॅन

=))

आहे, बाकीचं आहे ठीकठाक.

अवांतरः बाकी इतर वेळी स्त्रीद्वेष्टा बिरुद मिरवण्याची ही शिक्षा मिळालेली दिसतेय Wink - गंमत करते आहे हे वेगळे सांगायला नको!

तरी म्हटलंच ही कमेंट आली नै कशी काय ;) =))

खटपट्या's picture

18 Mar 2014 - 11:46 am | खटपट्या

बघा, जेंडर बदल करता येतोय का ते!

Facebook smileys

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2014 - 11:09 am | डॉ सुहास म्हात्रे

आता मतदानाला जाताना दाढीमिशी सफाचट करून जायला लागेल !

बॅटमॅन's picture

19 Mar 2014 - 12:51 pm | बॅटमॅन

अगदी अगदी ;)

पैसा's picture

28 Mar 2014 - 10:11 pm | पैसा

असो. पण ऑनलैन रेकॉर्ड मॉडिफाय करता येते आहे. निदान गोवा राज्याचे तरी. तुमच्या प्रगतीशील राज्याचे काय ते बघा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2014 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख आणि प्रतिक्रियांतील माहिती वाचून माय्देशात सगळं पूर्वीप्रमाणे आलबेल चाललं आहे हे पाहून गार्गार वाटलं ;) मात्र हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या बाबतीत (कमीत कमी निवडणूकीचा परिणाम फार बदलेल इतका) तरी होउ नये हीच इच्छा !

तसं नाही हो! जसजशा सुधारणा होतात, तसतशा अजून सुधारणा होण्याच्या आपल्या अपेक्षाही वाढतात - त्यातून असे अनुभव येत राहतात.

शिवाय ही ऑनलाईन सोय वापरणारे फार कमी लोक असतील - त्यामुळे लोकांना फार फरक पडू नये. जसजशी ही सोय वापरणारे लोक वाढतील, तसतशा इथंही सुधारणा नक्की होतील.

आता निदान आपलं नाव यादीत नाहीये हे आधी कळतं तरी; म्हणजे उगाच मतदान केंद्रापर्यंत जाऊन यायला नको :-)

किंवा काही सांगता येत नाही, ऑनलाईन नाव दिसत नसलं तरी प्रत्यक्ष यादीत ते असू शकेलही ;-)

चिगो's picture

19 Mar 2014 - 1:59 pm | चिगो

ह्यानी काही मदत होते का पहा, ब्वॉ.. दोनतीन कॉम्बो ट्राय करावे लागतील. जसे मी सगळे तपशील भरले तर "नाव नाही" म्हणून सांगण्यात आलं. मग मी बाकी सगळे तपशील तसेच ठेऊन " वडीलांचे/पतीचे नाव" रिक्त ठेवले, तर नाव सापडले..;:-) गंमत म्हणजे त्या दाखवलेल्या डिटेल्समध्ये वडीलांचे नावही दाखवत आहे.. ;-) जास्त डिटेल्स भरल्यास वेबसाईटला धाप लागतेय वाटतं.. ;-)

एक तारा's picture

18 Mar 2014 - 2:27 pm | एक तारा

त्यांचं काम आता बऱ्यापैकी फास्ट झालंय. पण election commission साठी probably सर्वात मोठा issue हा शाळेतले कर्मचारी असावेत. कारण त्यांच्यासाठी हे काम extra आहे आणि वर त्यांचे सुटीचे दिवस वाया जातात. म्हणून त्यांची चिडचिड होते आणि पर्यायाने आपली. बऱ्याच गोष्टी online झाल्या आहेत आणि बऱ्याच व्हायला हव्या आहेत. ते हि दिवस येतील.

आतिवास's picture

18 Mar 2014 - 4:13 pm | आतिवास

हेही एक कारण आहेच गोंधळ असण्यामागे.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना किती मानधन मिळते याचा अंदाज या बातमीवरून यावा. पण निवडणूक तयारीसाठी काही मानधन मिळते का नाही हे आयोगाच्या संकेतस्थळावर मला तरी सापडले नाही.

चिगो's picture

19 Mar 2014 - 2:00 pm | चिगो

ह्या स्पेशल कँपसाठी मिळाले.. म्हणजे आम्हीतरी दिले, ब्वॉ.. ;-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Mar 2014 - 3:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी मतदारयादीत नावनोंदणीसाठी प्रयत्न करत होतो तेव्हाही थोड्याफार फरकाने हाच अनुभव आला.पण कंपनीमध्ये एक बूथ टाकला होता आणि त्यावर नशिबाने काहीबाही माहीती मिळत होती. फॉर्म ६ व ७ डाउनलोड केले व भरले.मग ते एका प्रतिनिधीकडे जमा केले (कंपनीमध्येच्)..त्यामुळे गर्दी वगैरे त्रास झाला नाही. मग त्या फॉर्म ७ (आधीच्या मतदारसंघातले नाव कॅन्सल करणे) वरुन काही शंका उपस्थित झाल्या आणि फॉर्म ७ त्या त्या मुन्सिपालिटीत जाउन भरावा लागतो असे कळले.त्यासाठी एकदा सुट्टी घेउन गावी जाउन आलो. नंतर मतदान अधिकार्याचा फोन आला की तुमचा फॉर्म ७ अपुर्ण आहे. आता तो कुठल्या फॉर्म ७ बद्दल बोलत होता (पहील्या की दुसर्या) काय माहीत. पण तेव्हा कामाच्या रगाड्यात काही करणे जमले नाही. १-२ महीने तसेच गेले. जाउदे ती मतदानाची कटकट,नाही केले तर काय होणारे वगैरे आगपाखड झाली. आणि एक दिवस ...................
........................जवळच्या केन्द्रातुन सहीसलामत माझे आणि बायकोचे नवे वोटर आयडी मिळाले..अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण

आतिवास's picture

19 Mar 2014 - 7:31 pm | आतिवास

थोडक्यात काय तर 'फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म करण्याचा अधिकार आपला':-)

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2014 - 3:47 pm | प्रकाश घाटपांडे

पुर्वीच्याच रहिवासी पत्त्यावर मी मतदान करीत असे. कारण पत्ता बदलला तरी उपनगर बदलले नव्हते. मग कार्पोरेशन च्या निवडणुकीच्या वेळी मी वॉर्ड बदलत असल्याने मी पत्ता बदलल्याचे झंजट केले. पण झाले काय की घर नं बरोबर पण सोसायटी भलतीच. त्या बाईंना मी सांगितले असे झाले आहे. त्यांनी व्यावहारिक सल्ला दिला की आता राहू द्यात नाहीतर हे ही नाव गायब व्हायचे. या वेळी ऑनलाईन करेक्शन चा किडा केला आहे. स्टेटस पेंडिग दाखवत आहे. आता मला भीती काही तांत्रिक गडबड होउन करेक्शन ऐवजी नावच गायब झाले तर?

आतिवास's picture

19 Mar 2014 - 7:34 pm | आतिवास

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींत यामुळे फारसा फरक पडत नाही; पण महापालिका निवडणुकीत नक्कीच पडत असावा. पण नगरसेवक आणि त्यासाठीचे इच्छुक उमेदवार याबाबतीत निवांत असतात. कदाचित 'हा गृहस्थ नाहीतरी आपल्याला मत देणार नाहीच' अशी त्यांना खात्री असावी! :-)

आत्मशून्य's picture

18 Mar 2014 - 4:06 pm | आत्मशून्य

लेख फार चटकन वाचला. एकच नजर ती सुधा बरीच वाक्ये गाळत गाळत फिरवली, कारण ही नाँदणी १५ तारखेलाच(अधिकृतपणे बंद झाल्याने) व त्यापुर्वी नोंदणी केलेल्यांसाठीच आहे असे स्मरते. आणी धाग्याची तारीख १७ दिसत आहे.

असो, प्रश्न हा होता नुसत्या जेइजी अधिकृत पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार ?

आतिवास's picture

19 Mar 2014 - 9:43 am | आतिवास

दुवे माझ्याकडे उघडताहेत.
कदाचित खाली अलबेला सजन यांनी माहिती दिल्याप्रमाणे htpps:// चालत नाहिये. http:// वापरुन साइट उघडतेय...

माझ्या माहितीनुसार मतदार यादीत नावनोंदणी वर्षभर (काही अपवाद वगळता) करता येते. मात्र निवडणूक आयोग फक्त ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत, आणि इतरवेळी आयोजित केलेल्या खास मोहिमांच्या वेळी या याद्या अद्ययावत करतं. निवडणूक काळात उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची जी तारीख असते, त्याआधी दहा दिवस नावनोंदणी बंद होते - निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर ती पुन्हा चालू होते.

ऑनलाईन अर्ज केला तरी प्रत्यक्ष घरी येऊन पडताळणी होते अशी प्रक्रिया आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते - पण नेमका दुवा सापडत नाहीये आत्ता. त्यामुळे फक्त जेपीईजी प्रत दिल्याने काम होईल असे नाही.

ही माहिती ऐकीव आणि आंतरजालावर मिळाली आहे. ती चुकीची असल्यास कृपया वाचकांनी ती दुरुस्त करावी.

आत्मशून्य's picture

19 Mar 2014 - 10:42 pm | आत्मशून्य

अर्ज स्वीकारण्याची जी तारीख असते, त्याआधी दहा दिवस नावनोंदणी बंद होते......निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर ती पुन्हा चालू होते.

नेमक्या याच कारणाने आता नाव नोंदणी जरी केली तरी आताच्या निवडणूकीमधे मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. बहुतेक १५ तारिखच पुण्यासाठी अंतीम होती. अर्थात ज्यानी अजुनही नाव नोंदणी केली नाही त्यांनी निकाल जाहीर झाल्यावर ती लगेच करणे अपेक्षित आहेच.

ऑनलाईन अर्ज केला तरी प्रत्यक्ष घरी येऊन पडताळणी होते

घरी येउन पडताळणी आवश्यक वाटत नाही, क्लायंटसाइड वॅलीडेशन तसेही बायपास करता येते. सर्वरसाइड वॅलीडेशन हवे. म्हणजेच दिलेली माहीती संबधीत कागदपत्रांच्या सरकारी नोंदीशी बरोबर की चुकीची आहे पडताळायला हवे. तसेच होत असावे.

माहितीसाटी धन्यवाद.

बदल केल्यानंतर नाव लगेच यादीत येत नाही कारण त्यावर अधिकाऱ्याची सही होऊन ते अपलोड केले जाते .

या माहितीबद्दल आभार. साधारण किती काळ लागतो अर्ज अपलोड व्हायला? काय अनुभव/अंदाज आहे तुमचा? शिवाय मतदारसंघ/प्रभाग अशी माहिती चुकीची भरली गेल्यास ती अधिकारी दुरुस्त करुन घेतात की आपण नव्याने काही प्रक्रिया करावी लागते? म्हणजे उदाहरणार्थ मी प्रभाग ३१ च्या ऐवजी चुकून ४१ लिहिले तरीही अर्ज स्वीकारला जातो का? हा प्रश्न अर्थातच ऑनलाईन अर्जाच्या संदर्भात आहे. समोर अर्ज भरताना कदाचित अधिकारी माहितीची खातरजमा करून घेत असतील अशी अपेक्षा आहे.

बदल प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन फॉम दिलेला असो अथवा ऑनलाइन .
अद्ययावत लगेच होत नाही .

१) राष्ट्रीय ऑनलाइन यादीत नाव असणे ,आणि
२)आपले मतदार ओळखपत्र असणे फार महत्त्वाचे आहे .

स्पंदना's picture

19 Mar 2014 - 5:23 am | स्पंदना

चि. पप्पुस कळवाना हा घोटाळा. त्यास फार मते हवी आहेत. करुन देइल काम तुमच.

विकास's picture

19 Mar 2014 - 6:12 am | विकास

लेख छान आहे. सर्व निवडणुकांच्या संदर्भातले लेख राजकारण सदरात घालण्याचा प्रयत्न आहे. हरकत नसली तर आपला देखील त्यात ठेवूया. (राजकारण म्हणजे केवळ चर्चा/वाद इतकेच मर्यादीत नसावे कारण शेवटी त्याचा समाजकारणासाठी उपयोग होणे महत्वाचे आहे. :) )

बाकी तुम्ही दिलेल्या दुव्याला टिचकी मारली तरः Secure Connection Failed - Renegotiation is not allowed on this SSL socket. वगैरे मेसेज आला. मला वाटते ही साईट फक्त भारतातच चालत असावी का? :(

लेख 'राजकारण' सदरात हलवायला माझी काही हरकत नाही; पण या लेखात फक्त अनुभव आहेत - माहिती अथवा/आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण नाही. त्यामुळे कदाचित वाचकांचा अपेक्षाभंग होऊ शकतो म्हणून तिकडे टाकला नव्हता. संपादकांनी हा लेख 'राजकारण' सदरात हलवल्यास त्यातल्या शेवटच्या दोन ओळी काढून टाकाव्यात. लेखकांना काय, लेख वाचला गेल्याशी कारण, सदर कुठचे का असेना ;-)

साईट फक्त भारतात चालते का हे माहिती नाही. या दुव्यातील अर्ज नमुना ६ अ "Inclusion of names for overseas electors" यासाठी आहे, त्यामुळे भारताबाहेरुनही तो दुवा खरं तर उघडायला पाहिजे.

विकास's picture

19 Mar 2014 - 8:45 am | विकास

नाही... तो दुवा पण चालत नाही आहे. :(

इथे इंग्लंड मध्ये उघडतोय.
नाव गायब आहे, पण यावेळी मतदान करता येणारच नाहीय तर कशाला फॉर्म वगैरे भरायचा? म्हणून तूर्तास राहू दिलंय!

मला वाटलं अर्ज ६ अ भरल्यावर अनिवासी भारतीयांना मतदान पण ऑनलाईन किंवा पोस्टाने करता येईल. तसं प्रत्यक्षात नाहीये का? मग अर्ज भरून नावनोंदणी तरी कशाला करायची? नेमका काय आहे या अर्जाचा उपयोग? जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.

कॉलिंग चिगो :-)

त्या फॉर्म च्या नवव्या पानावर नववा ( शेवटचा) नियम आहे, की जर आपण प्रत्यक्ष मतदानादिवशी उपस्थित असाल तरच मतदान करता येईल. ते शक्य नसल्याने यावेळी प्रयत्न केला नाही.

या पूर्वीही एका निवडणुकीला भारता बाहेर असल्याने यादीत नाव आणण्यासाठी बरेच निष्फळ प्रयत्न केले होते.

गम्मत अशी की मुळीच जागरूक नसलेल्या मतदारांबाबत राजकीय कार्यकर्त्याना फारच रस असतो.
त्यांची एक गठ्ठा मते मिळवायची असतात. त्यांची नावे नेहमी असतात आणि माझे आता पर्यंत ५ वेळा गायब झाले - पत्ता तोच! सुशिक्षितांचा पत्ता कापणारा एक गटच कार्यरत असतो अशी शंका येते.

इतके असून यादीत नाव आले म्हणून खूष होऊ नये. 'त्या' केंद्रावर पण दिशाभूल करणारे हजर असतात. आपल्यां कडे पाहूनच त्याना कळते हा विरोधक आहे! :)
सगळी कडे असे नाही होत, गावाकडे नाव असताना चांगला अनुभव होता.

शिवाय १९९० पासून एकदाही माझ्या पसंतीचा उमेदवार निवडून आला नाही ती निराशा वेगळीच!

अलबेला सजन's picture

19 Mar 2014 - 9:11 am | अलबेला सजन

http://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx हे वापरा. htpps:// चालत नाहिये. http:// वापरुन साइट उघडतेय...

विकास's picture

19 Mar 2014 - 9:19 am | विकास

http वापरल्यावर मिळाले!