महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

निवडणूक २०१४: अनुभव ७: दण्डकारण्य (३)

Primary tabs

आतिवास's picture
आतिवास in राजकारण
22 May 2014 - 3:27 pm

दण्डकारण्य (२)

बस्तरमध्ये यायचं आणि दन्तेवाड्यात जायचं नाही हे फारचं वाईट. त्यामुळे प्रवासाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दन्तेवाडामधले संपर्क शोधायचं काम चालू झालं होतं. भाजप आणि कॉंग्रेस उमेदवार हेलीकॉप्टरने जात होते त्या भागात; त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नव्हतो. 'आप'च्या सोनी सोरी यांच्याबरोबर जाता येईल का ते पाहत होतो पण स्वामी अग्निवेश तिथं आल्याने तीही शक्यता मावळली. आता उरला होता तो एक संपर्क - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) उमेदवार श्रीमती विमला सोरी.

रायपुरमध्ये भाकपच्या दोन वरिष्ठ कार्यकर्त्यांशी भेट आणि सविस्तर गप्पा झाल्या होत्या. तुमच्यापैकी कोणी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना कधी भेटलं आहे का मला माहिती नाही; पण त्यांची काही वैशिष्ट्य मला नेहमी जाणवतात. कम्युनिस्ट विचारसरणी 'वर्गविग्रहा'चा, वर्गसंघर्षाचा विचार मानत असली तरी प्रत्यक्ष भेटीत हे कार्यकर्ते अगदी शांत बोलणारे असतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा अभ्यास जाणवतो आणि शोषित वर्गाबद्द्दलची त्यांची तळमळही. समोरच्या माणसाच्या विचारांत परिवर्तन घडवून आणायचं असतं त्यांना पण ते आक्रमक पद्धतीने मांडणी करत नाहीत. आपण जे काम करतो आहोत, त्यावर त्यांचा विलक्षण विश्वास असतो. श्री. राव, श्री. पटेल, श्री. मनीष कुंजम, श्री. श्रीवास्तव, श्री. शाजी अशा अनेक भाकप कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांची ही (वर उल्लेखलेली) शैली पुन्हा एकदा लक्षात आली.

भाकपच्या संपर्काच्या बळावर आम्ही दन्तेवाड्याकडे निघालो. जगदलपुर दन्तेवाडा हे अंतर साधारण ८५ किलोमीटर आहे - म्हणजे एका दिवसात जाऊन येण्याजोगं. पण आम्हाला थोडं पुढे बैलाडिला परिसरात जायचं होतं. इथली समस्या याच परिसरात मुख्यत्वे आहे कारण या डोंगररांगांत खनिज संपत्ती आहे. 'जल-जंगल-जमीन' यांच्यावर न्याय्य हक्क मागणारे स्थानिक अदिवासी एका बाजूला आणि टाटा, एस्सार, जिंदल अशा कंपन्याच्या ताब्यात खाणी देण्याचे करार करणारे सरकार (आणि कंपन्या आणि विकासाची वाट पाहणारे अन्य लोक) दुस-या बाजूला असा हा लढा आहे.

दन्तेवाडयाला जाणारा रस्ता मस्त होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन फक्त हिमालयात रस्ते बांधते असा माझा आजवर समज होता, तो दूर झाला.

border

रस्ता गुळगुळीत होता, एकही खड्डा नाही. बाजूला जंगल. वाहनांची ये-जा व्यवस्थित चालू होती.

road

वाटेत मृतांच्या स्मरणार्थ उभी केलेली अशी अनेक स्मारकं दिसली. आम्हाला दिसलेली स्मारकं तरी नैसर्गिक मृत्यूंची होती.

smarak

त्यावरचा विळा-कोयता लांबूनही लक्ष वेधून घेत होता.

वाटेत गीदम हे गाव लागलं - जगदलपुरपासून फक्त १२ किलोमीटर दूर. सोनी सोरी यांचं वास्तव्य या गावात असतं - तेव्हा तरी होतं. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले केंद्रीय राखीव दलाचे पोलिस (सीआरपीएफ) पाहताना आपण 'संवेदनशील क्षेत्रात' जात आहोत याची जाणीव झाली. रस्त्याच्या थोडे आत, दर वीस फुटांवर एक सशस्त्र पोलिस पाहणं ही काही फार चांगली गोष्ट नव्हती. पण दन्तेवाडा ते बचेली या भागात गावाला वेढा घालून असलेले, गावांत चेह-यावर काहीही भावना न दाखवता उभे असलेले आणि पाच वाजता वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे बाहेर पडून आपापल्या कॅम्पकडे मुक्कामाला परतणारे सीआरपीएफ जवान पाहिले आणि इथल्या रोजच्या जगण्याचं सुन्न करणारं वास्तव ध्यानी आलं.

गावात उभ्या असणा-या जवानांनी फोटो काढायला परवानगी दिली नाही. रस्त्यावर मागून काढलेला हा एक फोटो.

CRPF

दोन तीन गावांत गेलो. गावात जाण्याचे रस्ते हे असे आहेत.

village

रमणीय वाटतं ना एकदम? पण इथले लोक लढत आहेत - त्यांच्या जमिनीसाठी, त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या जगण्यासाठी. एका बाजूने सरकारचा धाक आणि दुस-या बाजूने .....! इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती आहे. छत्तीसगढ शासनाने अनेक चांगल्या योजना बनवल्या आहेत. गावांत दूरदर्शन संच दिसले (चालू अवस्थेत), हातपंप दिसले, सौरऊर्जा यंत्रणा दिसली; गावातले रस्ते सिमेंटचे दिसले.

in the village

पण कुपोषण दिसलं; अर्धनग्न लोक दिसले; दिवसभर एका शस्त्रधारी गटाचा वेढा तर रात्री दुस-या - असेही लोक दिसले. "नव-याला पोलिसांनी का पकडून नेलं, माहिती नाही' असं सांगणारी स्त्री भेटली. पावसाळ्यात खायचे वांधे होऊ नयेत म्हणून मोहाची फुलं साठवून ठेवणारी गावं दिसली.

एका गावातून दुस-या गावात जाताना राज्य महामार्गावर हे दिसलं आणि आम्ही थांबलो.

tiffin bomb

मला आधी कागद उडू नयेत म्हणून डबा ठेवलाय असं वाटलं - पण तो होता 'टिफिन बॉम्ब'. यात निवडणूक बहिष्कारही स्पष्ट होता. कॉंग्रेस, भाजप यांच्यासोबत 'आप'वरही बहिष्कार होता. अशी बहिष्कार पत्रकं जागोजागी दिसतात असं एका पत्रकाराने आम्हाला सांगितलं होतं. आम्ही जवळ जाऊन फोटो काढत होतो तेवढ्यात कुणीतरी ओरडलं आमच्यावर. एकाच्या मते ते माओवादी होते तर दुस-याच्या मते सीआरपीएफ. कोणी का असेना, जीव वाचवायला पळणं भाग होतं; पळालो तिथून.

बचेलीत पोचेतो संध्याकाळ झाली त्यामुळे खाण परिसराच्या जितकं जवळ जाता येईल तितकं जावं हा बेत फसला. किरन्दुलमध्ये भाकपच्या निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन होतं; तिकडे जाऊन आलो.

office

दहा तारखेला मतदान, इतक्या उशीरा हे कार्यालय उघडून काय फायदा - असा प्रश्न मनात आला. भाकप उमेदवार विमला सोरी सुकमा भागात गेल्या होत्या त्यामुळे त्यांची भेट झाली नाही.

उशीर झालाय म्हणून बचेलीत राहावं अशी एक कल्पना समोर आली. पण एक तर अशा संवेदनशील क्षेत्रात कोण नेमकं कुणाच्या बाजूने असतं याचा अंदाज येत नाही. शिवाय भाकप आणि माओवादी यांच्यातही वाद आहेत - त्यात कुठेतरी चुकून आपण अडकायला नको असा विचार मी केला. पूर्वतयारी असती तर माओवादी बालेकिल्ल्यात मी राहिले असते - पण आधी काही ठरलं नव्हतं. रात्री आठ वाजता निघालो.

आमचा वाहनचालक शहाणा होता. सबंध रस्ताभर तो मला "या वळणावर मागच्यावेळी मला माओवाद्यांनी अडवलं होतं"; "या ठिकाणी सोळा ट्रक जाळले", " या ठिकाणी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला झाला" ... अशाच कहाण्या सांगत होता. जीव मुठीत धरून पण वरवर साहसाचा आव आणून मी त्याच्या गोष्टीना प्रतिसाद देत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. दूरच्या वळणावर एकदा काही माणसं दिसली तेव्हा "आता काय" असा प्रश्न मनात आला. पण काही संकट न येता आम्ही रात्री साडेदहाला जगदलपुरला पोचलो.

****
बस्तरमधली परिस्थिती पाहून मला खूप वाईट वाटलं. आपली विकासाची स्वप्नं नेहमी आपल्याच समाजातल्या एका घटकाच्या शोषणावर आधारलेली का असतात? जंगलातली खनिज काढायला नकोत का - तर जरूर काढावीत. पण ते करताना आदिवासी समाजाला आपण जगण्यातून उठवायलाच पाहिजे का? शहरात जगण्यासाठी आवश्यक कौशल्य त्याच्याकडे नाहीत - त्यामुळे शहरांत आणून त्यांना आपण फक्त भिकारी बनवतो. त्यांच्या गरजा काय आहेत हे तरी आपण जाणून घेतलं आहे का? ते कोणत्या शोषणाला बळी पडतात हे आपल्याला माहिती आहे का? त्यांना काय दहशतीचा सामना करावा लागतो त्याची झलक मला जी दिसली ती गुदमरवून टाकणारी होती. "आम्हाला तुम्हीही नको, अन "ते"ही नकोत, आमचं आम्हाला जगू द्या" असं मला सांगणारी ती वृद्ध स्त्री ..... तिला समजून घेणारी, सामावून घेणारी व्यवस्था आम्हाला निर्माण का नाही करता येत अद्याप? प्रश्न आणि प्रश्न .... उत्तरं कुठं आहेत?

खूप अस्वस्थ केलं आहे बस्तरने मला.

***
"निवडणूक २०१४: अनुभव" या लेखमालेचा हा शेवटचा भाग.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 May 2014 - 3:37 pm | प्रचेतस

विषण्ण करणारं वास्तव आहे.

ऋषिकेश's picture

23 May 2014 - 10:39 am | ऋषिकेश

!!!
आपल्या हाती सुन्न होणंच आहे का?

हाडक्या's picture

23 May 2014 - 3:19 pm | हाडक्या

आतिवास, आपण खूपच छान लिहीत आहात. बर्‍याचशा समस्यांवर त्या समस्या कधीही न पाहीलेले बोलत असतात तेव्हा आश्चर्य वाटते. पण तुमचा हा प्रत्यक्षदर्शी लेख आणि त्याचं विवेचन खरोखरच जबरदस्त आहे.

आपण मुद्दे मांडलेत, समस्या मांडल्यात, आपला व्यवसाय(कार्यक्षेत्र) काय आहे याची कल्पना नाही तरीही असे सुचवू इच्छितो की आपण या समस्यांच्या अनुषंगाने आपल्या दृष्टीतून याच्याबद्दल यावर उपाय मांडावेत, त्यावर इथे चर्चा घडावी.

आतिवास's picture

23 May 2014 - 4:54 pm | आतिवास

धन्यवाद.
या समस्यांवर उपाय आहेत तेही तितकेच गुंतागुंतीचे आहेत. मला वाटतं मिपावर पण याविषयी वेळोवेळी चर्चा झाल्या आहेत. पुनरुक्ती करण्यात अर्थ नाही आणि चर्चा करायची तर त्यात सहभागी व्हायला पुरेसा वेळ पाहिजे हातात - तो नसल्याने तूर्त गप्प बसतेय.

संधी मिळते तेव्हा संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात जे तुम्हाला-आम्हाला समजतं ते त्यांना समजत नाही अशातला भाग नसतो. तेही त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात इतकं म्हणता यावं अशी परिस्थितीही कधीकधी असते.

एस's picture

26 May 2014 - 11:46 am | एस

माझा आधीचा प्रतिसाद कदाचित प्रकाशित झाला नसावा. असो. सविताताई, तुम्ही मांडलेल्या वास्तवाची कल्पना आहेच. येथील 'इकडे आड, तिकडे विहीर' प्रकारच्या वास्तवातून लवकर मार्ग निघणे तितके सोपे नाही. तिथल्या माणसांशी बोलून एक मात्र नक्कीच कळतंय की ती आता कोणावरच विश्वास ठेवत नाहीत. बाकी पुढच्या वेळी त्या भागात जाल तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांशी ओळख करून ठेवावी जेणेकरून काही कारणांनी आपल्यासारख्या बाहेरच्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काही अडचणी निर्माण झाल्यास आपला बचाव होऊ शकतो.

आपल्या ब्लॉग्स ना भेट दिली. सविस्तर वाचून मग लिहिनच तिथे. शुभेच्छा व धन्यवाद...

बाकी पुढच्या वेळी त्या भागात जाल तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांशी ओळख करून ठेवावी जेणेकरून काही कारणांनी आपल्यासारख्या बाहेरच्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काही अडचणी निर्माण झाल्यास आपला बचाव होऊ शकतो.

या काळजीवजा सूचनेबद्दल आभारी आहे. यावेळीही अडचण आली तर कुणाला फोन करायचे ते संपर्क हातात होते - पण अर्थात काही वेळा अशा दुर्गम भागातून फोन लागत नाहीत म्हणा. त्यामुळे काळजी घेणे अधिक चांगले या भावनेशी सहमत आहे.

जेपी's picture

27 May 2014 - 7:26 pm | जेपी

.

आदूबाळ's picture

27 May 2014 - 7:59 pm | आदूबाळ

जबरदस्त लेखन

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2014 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारताच्या आंतर्भागातलं (विवदास्पद सीमाक्षेत्रातलं नव्हे) हे विषण्ण करणारे आहे. याला खरंच बर्‍याच चुकीच्या गोष्टी कारण झाल्या असणार.

नेहमीप्रमाणे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले सत्य संतुलीतपणे सांगणार (अजून एक) लेख आवडला.

आतिवास's picture

28 May 2014 - 5:54 pm | आतिवास

नेमकं!
सीमाभागात असे प्रश्न असतात हे समजू शकतो आपण; कारण तिथं काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.
पण देशाच्या मध्यवर्ती भागातही आपण तीच परिस्थिती निर्माण केली आहे!

यशोधरा's picture

27 May 2014 - 11:58 pm | यशोधरा

वाचतेय..

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 May 2014 - 9:37 am | पुण्याचे वटवाघूळ

मला एक प्रश्न नेहमी पडतो.काळ बदलतो त्याप्रमाणे बदलत न जाणार्‍या कोणावरही अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो हे नक्की.अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर १९८० च्या दशकाच्या शेवटपर्यंत व्हिडिओ कॅसेट बनविणे हा बर्‍यापैकी नफा देणारा उद्योग होता.नंतरच्या काळात सीडी, डिव्हीडी इत्यादी आल्यानंतर या व्हिडिओ कॅसेटना फारसे कोणी विचारानासे झाले.जी कंपनी 'आम्ही व्हिडिओ कॅसेटच बनविणार' म्हणून हटून बसली असेल ती २००० च्या दशकात इतिहासजमा झाली असेल हे नक्की. काळ बदलला त्याप्रमाणे अनेक कुटिरोद्योगांची मागणी कमी झाली.तेव्हा या कुटिरोद्योगांवर अवलंबून असणार्‍यांना त्यांच्या प्रॉडक्टमध्ये बदल करणे भाग झाले.ज्यांनी तसे केले नाही त्यांना अस्तित्वाचा प्रश्न नक्कीच आला.फार पूर्वी ब्राम्हण कुटुंबांमध्ये गावात राहून भिक्षुकी/शिक्षकी पेशा/ आयुर्वेद इत्यादी मुख्य पेशे होते.नंतरच्या काळात शहरात जाऊन सरकारी नोकरी आणि आता सरकारी नोकरी बंद झाल्यावर खाजगी नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय करणे गरजेचे झाले आणि तसे ज्यांनी केले नाही त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला.

आता हे आदिवासी काळाची बदललेली पावले लक्षात न घेता जंगलातच राहायचे, आम्ही पिढ्यानपिढ्या करत होतो तेच व्यवसाय करणार, त्यात बदल करणार नाही असे म्हणत असतील तर ते कसे चालणार? त्याहूनही वाईट म्हणजे कम्युनिस्ट लोक या प्रकारच्या अ‍ॅटिट्यूडचे समर्थन करतात.

आतिवास's picture

29 May 2014 - 10:29 am | आतिवास

प्रतिसादाबद्दल आभार.

परिस्थिती बदलत जाते; त्यानुसार जगण्याची आव्हानं बदलत जातात आणि त्याला फक्त आदिवासींना नाही तर सर्वांनाच सामोरे जावे लागते" या आशयाच्या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.

आदिवासी बदलत नाहीत असं नाही. छत्तीसगढ जाऊ द्या. महाराष्ट्रात आजुबाजूला पाहिलं तर आदिवासी जीवनशैली बदलत चालली आहे हे स्पष्ट दिसतं.

प्रश्न असा आहे की बदलत्या सामाजिक जीवनात धोरणं बनवली जातात (ज्यांचा परिणाम व्यक्तिगत जीवनावरही होतो) त्यात आदिवासींचा जीवनविषयक दृष्टिकोन विचारात घेतला जातो का? आमच्या पद्धतीने जगा अन्यथा नामशेष व्हा असे दोनच पर्याय आपण आदिवासींना देतो यात काही चूक नाही का? आपण विकासाची जी फळं चाखतो, ती आदिवासी समाजापर्यंत किती पोचली आहेत? योजना खूप आहेत - पण त्या पोचतात का? पाणी, वीज, रस्ते, शाळा, आरोग्यसेवा .. अशा सोयी नसलेली किती गावं आहेत? गडचिरोली, धानोरा, मेळघाट, तळोदा, जव्हार, कळवण ... नावं घ्यावी तेवढी कमीच आहेत.

आदिवासींना जंगलातून बाहेर आणून तसंच सोडून द्यायचं का? तुमची आव्हानं तुम्ही निभावून न्या, आमचा काय संबंध - असं म्हणायचं का? बाहेरच्या जगात जगायची कौशल्यं त्यांच्याकडे नाहीत - याला फक्त आदिवासी जबाबदार आहेत असं म्हणणं म्हणजे माझ्या मते वस्तुस्थितीचा विपर्यास आहे.

पर्यावरणाचा एक वेगळा मुद्दा आहेच.

'दिल मांगे मोर' आणि 'थोडा है, थोडे की जरूरत है" या दोन दृष्टिकोनांमुळे फार मोठा फरक पडतो :-)

विरोध विकासाला नाही. विरोध विकास सर्वसमावेशक नसण्याला आहे.

पैलवान's picture

29 May 2014 - 1:40 pm | पैलवान


आता हे आदिवासी काळाची बदललेली पावले लक्षात न घेता जंगलातच राहायचे, आम्ही पिढ्यानपिढ्या करत होतो तेच व्यवसाय करणार, त्यात बदल करणार नाही असे म्हणत असतील तर ते कसे चालणार?

याला काही इतर पैलू असू शकतील काय?
उदा. आदिवासी दुसरं काही करायला तयार नाहीत, कारण त्यांना ती संधी उपलब्धच होत नाही. वरती जे ब्राह्मण कुटुंबाचे उदाहरण दिले आहे, (भिक्षुकी-सरकारी नोकरी-खाजगी नोकरी हा बदल) हे त्या त्या वेळी तशा संधी उपलब्ध झाल्याने होत गेले असावेत. उदा. खाजगी नोकर्‍या/आयटी/परदेशी नोकरी यामध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर असण्याचे कारण त्यांना त्या संधी मिळाल्या. कारण अगदी यात जर वर्गीकरण केले, तर शहरी(पुणे-मुंबई विशेषतः) ब्राह्मण वर्गाला जास्त संधी मिळाल्या. ग्रामीण भागात तुलनेने कमी संधी उपलब्ध होत्या. आणि हे केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्वच जातींविषयी म्हणता येऊ शकते. कोणत्याही क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये जर एकाच जातीमध्ये वर्गीकरन केले तर, शहरी वर्ग जास्त संख्येने आढळून येईल. कारण मुळात शिक्षणापासून सर्वच बाबतीत जास्त संख्येने व जास्त गुणवत्तेच्या संधी उपलब्ध होतात.

जर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कमी संधी उपलब्ध असतील, तर मध्यभारतातील जंगलपट्ट्यातील आदीवासींकडून बदलाची अपेक्षा कितपत ठेवायची?
(रच्याकने... सातपुड्याच्या भागातील बर्‍याच जनतेला राजकारण=इंदिरा गांधी एव्हढेच माहीती आहे, असे वाचले आहे.)

मला वाटतं संधी कमी असण्याचा मुद्दा तर आहेच, पण त्यांच्या कौशल्यांना 'बाजारी मूल्य' (मार्केट व्हॅल्यु) नसण्याचाही आहे. आदिवासींकडे अनेक प्रकारचं ज्ञान आहे. झाडं, त्यांचे औषधी उपयोग, अगदी जळणाला कोणतं लाकूड आणायचं याचं एक 'शास्त्र' आहे असं पुष्कळ सांगता येईल. या कौशल्यांचा काय उपयोग आपल्या जगात? आपण त्यांना शिकवणार "प्रमाण" मराठीतून! आदिवासी आश्रम शाळा खूप जवळून पाहिल्यात आणि तेव्हापासून अगदी दहावी पास होणं म्हणजे आदिवासी मुला-मुलीसाठी एक युद्ध जिंकणं असतं याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

खूप लिहिता येईल या विषयावर - पण ते अवांतर आहे हे लक्षात आल्यानं थांबते आता!

पुण्याचे वटवाघूळ's picture

31 May 2014 - 10:09 am | पुण्याचे वटवाघूळ

आदिवासींकडे अनेक प्रकारचं ज्ञान आहे. झाडं, त्यांचे औषधी उपयोग, अगदी जळणाला कोणतं लाकूड आणायचं याचं एक 'शास्त्र' आहे असं पुष्कळ सांगता येईल. या कौशल्यांचा काय उपयोग आपल्या जगात?

हाच तर मुद्दा आहे. काळ बदलतो त्याप्रमाणे ज्या प्रकारच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग होतो (आणि ज्याचा फायदा करून आपले पोट भरता येईल) ती यादी नेहमी बदलत असते.आमच्या आय.टी फिल्डमध्ये तर हे अगदी प्रकर्षाने जाणवते.काही वर्षांपूर्वी ज्या स्कीलला प्रचंड मागणी होती त्यांना आता कोणी विचारत नाही.तेव्हा नव्या प्रकारची स्किल आत्मसात करणे गरजेचे आहे की जुनेच चोंबाळून बसणे आणि आपण बदलू शकत नाही याचा दोष इतरांवर ढकलणे? तेव्हा आता काळ बदलला आहे तुम्हालाही बदलायला हवे, नव्या प्रकारचे ज्ञान आत्मसात करायचे प्रयत्न करायला हवेत असे माओवादावर तळमळीने लिहिणार्‍यांपैकी एकानेही आदिवासींना सांगितल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्याहूनही वाईट म्हणजे ही मंडळी म्हणताना म्हणणार की आम्ही हिंसेचे समर्थन करत नाही पण बस्तर, दांतेवाडा अशी घटना घडली तर त्याचे अगदी अनइक्व्हिव्होकल निषेध करतानाही ही मंडळी कधी दिसत नाहीत.

प्रसाद१९७१'s picture

30 May 2014 - 1:19 pm | प्रसाद१९७१

त्या त्या वेळी तशा संधी उपलब्ध झाल्याने होत गेले असावेत. उदा. खाजगी नोकर्‍या/आयटी/परदेशी नोकरी यामध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर असण्याचे कारण त्यांना त्या संधी मिळाल्या

संधी उपलब्ध झाल्या हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. कोणी ब्राह्मणांसाठी संधी उपलब्ध करुन वगैरे दिल्या नाहीत. ज्या संधी अस्तित्वात होत्या त्या कष्टानी आणि स्वतात बदल करत ब्राह्मणांनी मिळवल्या ( खुप प्रतिरोध असताना )

का बुवा?
कोणी ब्राह्मणांसाठी संधी उपलब्ध करुन वगैरे दिल्या नाहीत. ज्या संधी अस्तित्वात होत्या त्या कष्टानी आणि स्वतात बदल करत ब्राह्मणांनी मिळवल्या
याच्याशी सहमत. संधी उपलब्ध "करून दिल्या नाहीत." म्हणूनच संधी उपलब्ध "झाल्या", हा शब्दप्रयोग केला आहे.
संधी उपलब्ध करून देणे(हे मला आणि तुम्हालासुद्धा चुकीचं वाटतं) आणि संधी उपलब्ध होणे(हे तुम्हाला चुकीचं वाटतं) , याव्यतिरिक्त कोणता तिसरा शब्दप्रयोग जास्त उचित ठरला असता?

आत्मशून्य's picture

29 May 2014 - 2:56 pm | आत्मशून्य

पूर्वतयारी असती तर माओवादी बालेकिल्ल्यात मी राहिले असते - पण आधी काही ठरलं नव्हतं. रात्री आठ वाजता निघालो.

रात्री आठ वाजताचा प्रवास ? अशा भागात ? अफाट तयारी आहे की... इथे फक्त बाइमाणुस सोबत असताना दुचाकीवर प्रवास असेल तर आपल्या कोकणात सायंकाळी ६.३० - ७.०० नंतर प्रवासाचे धाडस करत नाही राव...!

लेखन आवडले.
- धन्यवाद.

आतिवास's picture

29 May 2014 - 6:14 pm | आतिवास

:-)
आठ वाजता निघाल्यावर मुक्कामाला परत पोचेपर्यंत ते अडीच तास "आपण 'साहस' केलं आहे" हे मला सतत जाणवतं होतं!

पैसा's picture

29 May 2014 - 10:46 pm | पैसा

परिस्थिती वाईट आहे हे माहित होतं, पण इतकी वाईट आहे हे पहिल्यांदाच कळतंय. त्या हिंदी सिनेम्यातल्या गाँव की छोरीयाँ आणि छोरे कुठे गेले सगळे?

आतिवास's picture

30 May 2014 - 11:07 am | आतिवास

ही परिस्थिती राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आणि राज्य महामार्गाच्या कडेच्या गावांची आहे. मी जिथं गेले नाही त्या सुकमा आणि बिजापुर परिसरात तर काय असेल, आणि दन्तेवाड्यातही आणखी आत काय असेल ते माहिती नाही. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात, ओडिशात, झारखंड आणि आंध्र प्रदेशात अनुभवली आहे. मणीपुर, नागालँड, असम, मेघालय, त्रिपुरामध्ये काहीसं हेच चित्र ( तिथं नावं वेगळी आहेत) पाहिलं आहे... :-(

चष्मेबद्दूर's picture

14 Sep 2017 - 12:46 pm | चष्मेबद्दूर

खूप छान लिहिलंय. सगळ्या अतिरंजित , भडक आणि एकांगी वर्णनापेक्षा हे असं लेखन किती समाधानकारक असत याचा सगळे लेख वाचत असतांना अनुभव येत होता. तीन वर्षांपूर्वीची सर्वसामान्य लोकांची परिस्थिती आणि आजची यात किती बदल झालाय देव जाणे. अतिवास ताई, तुम्ही या सगळ्या प्रदेशांतून हिंडलात आणि हे सगळे अनुभव निष्पक्ष पणे लिहिलेत या बद्दल तुम्हाला सलाम.( ' कौतुक' हा शब्द लिहिण्याची माझी योग्यता नाही. ) अजून असेच लिखाण वाचायला आनंद होईल.
बा.द.वे. तुमच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया लिहिली होती, पण प्रकाशित करायला गेले तर ती जंजाळात गायब झाली.