निवडणूक २०१४ अनुभवः २ केजरीवाल मुंबईत (१)

आतिवास's picture
आतिवास in राजकारण
22 Mar 2014 - 12:07 am

अनुभव १

‘रोड शो’ ही संकल्पना मला स्वत:ला फारशी आवडत नाही. शहरांत रस्त्यावर आधीच कितीतरी वाहनं असतात, प्रदूषण असतं, वेळ लागतो. एखाद्या राजकीय नेत्याचा ‘रोड शो’ म्हटला की सामान्य प्रवाशांचे हाल वाढतात. काय ज्या यात्रा वगैरे करायच्या आहेत त्या चालत कराव्यात, अगदी फार फार तर सायकल वापरावी असं माझं मत. अर्थात माझ्या मताला कोण विचारतंय म्हणा!

तरीही ‘आप’चे श्री. अरविंद केजरीवाल यांचा मुंबईत ‘रोड शो’ आहे म्हटल्यावर मी १२ मार्चला मुंबईत जायचं ठरवलं. अरविंद केजरीवाल यांना पाहायचं किंवा ऐकायचं असा माझा हेतू नव्हता. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या आंदोलन काळात केजरीवाल यांना ‘जंतर मंतर’ आणि ‘रामलीला मैदान’ या दोन्ही ठिकाणी मी अनेकदा ऐकलं आणि पाहिलं होतं. ‘मेणबत्ती संप्रदाय’ अशी प्रसारमाध्यमांनी त्या आंदोलनाची कितीही हेटाळणी केली तरी त्या आंदोलनाच्या माझ्या आठवणी; विशेषत: त्यातल्या सामान्य लोकांच्या सहभागाच्या आठवणी प्रेरणादायी होत्या, आजही आहेत. ‘आप’ची स्थापना, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधीही ‘आप’मध्ये होणा-या चर्चा अशा गोष्टींचा मागोवा घेत असले तरी ‘केजरीवाल करतात ते सगळं योग्य’ अशी (टोकाची) भूमिका मी कधी घेत नाही. सुदैवाने व्यक्तीपूजा (आणि म्हणून व्यक्तीद्वेष) मला जमत नाही.

केजरीवाल या व्यक्तीचं ‘दर्शन’ घ्यायला मी काही मुंबईला जात नव्हते. सामान्य माणसांच्या अपेक्षा काय आहेत, मतदारांचा कल काय आहे; त्यांचा ‘आप’ला प्रतिसाद कसा आहे. गेल्या चार महिन्यांतील घडामोडींचा सामान्य माणसांनी कसा अर्थ लावला आहे – हे मला जाणून घ्यायचं होतं. कुठल्याही माध्यमाच्या चष्म्याविना हे जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी होती. शिवाय मेधाताई पाटकर ईशान्य मुंबईतल्या ‘आप’च्या उमेदवार आहेत; त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे हेही पाहायचं होतं.

केजरीवाल (आता प्रत्येक वेळी श्रीयुत लिहित बसत नाही) यांचा मुंबईचा कार्यक्रम कळला. त्यानुसार सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर उतरणार होते. रिक्षाने अंधेरी स्थानकावर येऊन लोकलने चर्चगेटला येणार होते. मला त्यांचा हा बेत थोडा ‘नाटकी’ वाटला – तो जसा राहुल गांधी यांचा वाटला होता किंवा अन्य कोणत्याही नेत्याचा वाटेल तसा आणि तितपत नाटकी होता हा बेत. ‘बाकी इतके दिवस मुंबईत प्रवाशांचे हाल होतात; मग दोन तास आमच्यामुळे झाले तर काय बिघडलं?’ या प्रकारचा युक्तिवाद मला हास्यास्पद वाटतो. जो प्रश्न सर्वाना माहिती आहे, त्याचा आपण व्यक्तिश: अनुभव घ्यायची गरज नसते हे एक; आणि दुसरे म्हणजे एखादा प्रश्न आपण कमी करू शकत नसू, तर त्यात निदान आपल्यामुळे भर पडू नये याची आपण काळजी घेऊ शकतो; घ्यायला हवी. इतर राजकीय पक्ष जो खेळ खेळतात तोच केजरीवाल यांनी खेळावा याचं मला वैषम्य वाटलं . पण असो.

दुपारी दोन वाजता ऑगस्ट क्रांती मैदानातून रॅलीची (रॅली आणि रोड शो हे शब्दप्रयोग पर्यायी म्हणून वापरले आहेत मी इथं!) सुरुवात होणार होती, त्यामुळे आम्ही (तीन मित्र होते सोबत) थेट मुंबई सेन्ट्रल स्थानकावर पोचलो. तिथं एका मैत्रिणीने ठरवलेली टॅक्सी होती, त्यात बसलो. चालकाला विचारलं, “केजरीवालांचा रोड शो सुरु झालाय का”? त्यावर त्याने सांगितलं की चर्चगेटला दंगल झालीय. मला ती बातमी चिंताजनक वाटली. पण खोलात गेल्यावर कळलं की चर्चगेट स्थानकावर गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथले सुरक्षा दरवाजे कोसळले. हेही पुरेसं चिंताजनक आहे मुंबईचा विचार करता. पण ते दरवाजे तसेही तकलादू आहेत. शिवाय मुंबई सेन्ट्रल स्थानकावर अनेकदा प्रवाशांना या सुरक्षा दरवाजांच्या बाजूने प्रवेश करताना (त्याच्या आतून नाही!) पाहिल्याने हे दरवाजे कोसळणं दंगलीच्या तुलनेत किरकोळ वाटलं. गर्दीच्या व्यवहाराचं हे समर्थन अर्थातच नाही. पण ‘आप’ समर्थकांनी मुद्दाम हे घडवून आणल्याचं प्रसारमाध्यमांनी रंगवलेलं चित्र काही पूर्ण खरं होतं अशातला भाग नाही.

दोन वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर केजरीवाल दहा मिनिटे प्रसारमाध्यमांशी आणि लोकाशी बोलणार असा कार्यक्रम होता. पण आम्ही दोन वाजून दहा मिनिटांच्या आसपास मैदानाजवळ पोचलो तोवर रॅली निघाली होती तिथून. त्यामुळे केजरीवाल प्रसारमाध्यमांशी काय बोलले, बोलले की नाही हे काही कळलं नाही. दुस-या दिवशी ते काही शोधायचा मी प्रयत्नही केला नाही.

नागपाडा जंक्शन ते खिलाफत हाऊस असा रॅलीचा मार्ग होता. आम्ही सामान टॅक्सीत ठेवून, चालकाला खिलाफत हाऊसला यायला सांगून नाना चौकात उतरलो. जाम झालेल्या ट्रॅफिकवरुन रॅली कोणत्या दिशेने गेली असेल याचा अंदाज येत होताच; तरीही वाटेत लोकांना विचारत गेलो. थोड्या अंतरावर ‘आप’च्या टोप्या दिसायला लागल्या आणि साधारण पंधरा मिनिटांत आम्ही रॅलीत सामील झालो.

rally 1

दोन्ही बाजूंनी पोलीस दोरी धरून चालत होते आणि त्या दो-यांच्या मधून आप समर्थकांनी चालावं अशी अपेक्षा होती. गर्दी नियंत्रणाची पोलिसांची ही नेहमीची पद्धत आहे. पण थोडं वाकून दोरीखालून आत प्रवेश करणं आणि बाहेर जाणं शक्य होतं आणि अनेक लोक ते करत होते. हिरव्या रंगाच्या उघड्या जीपमध्ये केजरीवाल दिसत होते.

kejariwal

त्यांच्या सोबत मेधा पाटकर, मीरा संन्याल आणि मयंक गांधी हे मुंबईतले ‘आप’चे उमेदवार उभे होते. गाडीभोवती गर्दी होती. काही लोक केजरीवाल आणि उमेदवारांच्या हातात हात मिळवत होते, काही घोषणा देत होते तर काही कापडी फलक घेऊन चालत होते. मोटरसायकलवर अनेक समर्थक होते. इकडेतिकडे‘आप’च्या टोप्या घातलेले लोक थांबून चहापान करत हो ते, विश्रांती घेत होते आणि थोड्या वेळाने परत रॅलीत सामील होत होते.

मुंबईत एरवी जेवढं उकडतं, तेवढा उकाडा आज नव्हता. रस्त्यावर अनेक लोक उभे होते. ‘आप’चे कार्यकर्ते त्याना पत्रकं वाटत होते. त्यातले बरेच लोक दुकानांतून बाहेर आले होते, तर काहीजण रस्ता ओलांडून जाता येत नाही म्हणून थांबले होते बहुधा. एक ‘आप’ कार्यकर्ता सगळ्यांना टोप्या पुरवत होता, त्याने मलाही एक दिली, पण मी काही ती घातली नाही. काहीजण हातात झाडू घेऊन चालत होते.

पोलीस बंदोबस्त तगडा होता. महिला पोलिसांची संख्याही लक्षणीय होती. मला अशा पद्धतीने पोलीस वेठीला धरले जातात याचा नेहमी राग येतो; पण इलाज नाही. मागच्या टोकापासून केजरीवाल यांच्या वाहनापर्यंत साधारण साडेतीनशे चारशे लोक असावेत. मला वाटलं की कदाचित त्यांच्या वाहनाच्या पुढेही तितकेच लोक असतील; म्हणून पुढे येऊन पाहिलं तर पुढे फक्त निवेदन करणारं वाहन होतं. सगळा परिसर पाहता मुस्लीमबहुल परिसरातून मिरवणूक जात होती हे लक्षात आलं. हे नियोजन असेल तर मग हीदेखील इतर राजकीय पक्षांसारखीच (आणखी) एक खेळी झाली. तेच नियम पाळून, त्याच चौकटींना बळ देऊन कसा काय बदल घडवून आणणार आहे ‘आप’ – हा प्रश्न मनात येत राहिलाच दिवसभर.

घरांच्या बाल्कनीतून लोक पाहत होते. रॅलीतला एकजण मला म्हणाला, “मोदी को गुजरात जाकर, उनके घर जाकर ललकारा है अरविंदजीने, इसलिये मुस्लीम लोग सपोर्ट करेंगे ‘आप’को!” मी त्यावर हसले आणि पुढे गेले. लोक मयत पाहायला आणि लग्न पाहायला आणि गणपती पाहायला पण असेच उभे असतात, हे त्याला माहिती नसेल कदाचित, पण मला माहिती आहे. रस्त्यात वाहनं थांबवून ठेवली होती पोलिसांनी – त्यामुळे ते लोक वैतागलेले स्पष्ट दिसत होतं – स्वाभाविक आहे ते.

jam

मधेच लोक एकदम थांबले, मी तोवर पुढे आले होते. मग कोणीतरी म्हणालं, “केजरीवाल भाषण देताहेत मागे”. पण दुस-या दिवसेही वर्तमानपत्रात बातमी होती की कॉंग्रेस आणि आपचे कार्यकर्ते यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. खरं काय ते मला माहिती नाही.

अर्ध्या तासात मला अंदाज आला. समर्थक होते, जोशात होते! पण बघेही भरपूर होते आणि त्यांना फक्त ‘कौन है ये बंदा’ असं कुतूहल होतं. त्यांच्या तिथं असण्यावरून काही अंदाज बांधता येत नव्हता कारण अनेकांचे चेहरे काही बोलत नव्हते – म्हणजे मला ते कळत नव्हतं.

khilaphat

‘खिलाफत हाऊस’ला आम्ही आलो, तर बाहेर ही गर्दी आणि प्रवेशद्वार बंद. तिथं केजरीवाल लोकांशी बोलतील असा माझा समज होता (तो का होता, माहिती नाही). पण प्रत्यक्षात आत कुणाला सोडत नव्हते. फक्त वीस लोकांना आत सोडलंय अस कुणीतरी म्हणालं! चार किलोमीटर चालून लोक दमले होते – तिथं ‘आप’चे कार्यकर्ते पाण्याची व्यवस्था पाहत होते.

crowd

आपली लोकशाही किती जमीनदारी प्रवृत्तीची आहे हे अशा रॅलीत भाग घेतला की कळतं. एक तर लोकांना नेत्यांना ‘पाहायचं’ असतं याची मला गंमत वाटते. दूरदर्शनच्या जमान्याआधी हे ठीक होतं – पण आता इतक्या वेळी ‘दर्शन’ होतं असतं लोकांचं, की कामधाम सोडून त्यांना पाहायला कोण येणार असा मला प्रश्न पडतो – तरी लोक येतातच म्हणा! दुसरं म्हणजे अशा प्रसंगी नेत्यांचा ना कार्यकर्त्यांशी संवाद होतो ना लोकांशी. पूर्वी राजे महाराजे पालखीत बसून जायचे आणि लोक त्यांना पाहायला जमायचे – त्याची ही आधुनिक आवृत्ती म्हणायची – नेत्यांचीही आणि जनतेचीही! खरं तर ‘आप’ने अशी रॅली आयोजित करून नेमकं काय साधलं हे निदान मला तरी कळलं नाही.

इतस्तत: विखुरलेला आमचा गट इथं भेटला, टॅक्सीवालाही मागून येऊन भायखळा पोलीस ठाण्याच्या समोर थांबला होता. मग आम्ही निघालो ईशान्य मुंबईकडे – मेधा पाटकर यांच्या मतदारसंघात. साडेपाचपासून केजरीवाल तिकडे असणार होते. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघात लोकांच्या प्रतिसादात काही फरक आहे का हे पहायला मग आम्हीही तिकडे निघालो.

क्रमश:

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

22 Mar 2014 - 12:20 am | सुहास झेले

ह्म्मम्म्म... हा उत्तम (?) राजकारणी आहे आणि ह्याची बरीच खेळी टिपिकल कॉंग्रेस पद्धतीने पण वेगळ्या आणि सो कॉल्ड पांढऱ्या चेहऱ्यांचे उमेदवार देऊन. एकंदर रॅलीचा मार्ग आणि सगळा धुमाकूळ बघून ते लक्षात आलेच आहे. मेधा पाटकरांचे भाषण उत्तम झालेले. त्यावेळी मीदेखील तिथेच होतो. असो दिल्ली दूर नाही. बघू काय करतोय केजरू...

आतिवास's picture

22 Mar 2014 - 7:36 am | आतिवास

'पांढ-या चेह-यांचे' हा शब्दप्रयोग समजायला थोडा वेळ लागला :-)

आत्मशून्य's picture

22 Mar 2014 - 12:22 am | आत्मशून्य

आप मधे तरुण तरुणिञ्चा भरणा आहे म्हणुन डेट मिळावी या एकमेव कारणासाठी एका स्नेह्याने आप जॉइन केले आहे. काय खरं खोट त्यालाच माहीत पण आता मोबाइल रिचार्ज डबल मारतो हे मात्र खरे आहे.

कानडाऊ योगेशु's picture

23 Mar 2014 - 2:57 pm | कानडाऊ योगेशु

डेट मिळावी या एकमेव कारणासाठी एका स्नेह्याने आप जॉइन केले आहे.

लहानपणी अधेड उमर मे असताना ज्या ठिकाणी राहायचो त्या परिसरात एक आर.एस.एस ची व जरा दूरवर एक राष्ट्र सेवा दलाची अश्या दोन शाखा भरायच्या. आर.एस.एस च्या मानाने बरेच टगे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जायचे कारण तिथे मुली भरपूर यायच्या.इन फॅक्ट काही दिवसांनंतर परिसरातील ती आर.एस.एस ची शाखा ही बंद पडली व त्यात जाणारे उरले सुरले असेच अधेड उमर के टगे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत दिसू लागले. ( अर्थात हे सांगणे ही आवश्यक समज्तो कि सर्वच जणांनी केवळ "मुली येतात" ह्या कारणाने रा.से.द ची शाखा जॉईन केली नव्हती. तर संध्याकाळी ती शाखा सुरु होत असल्याने व बरेच मुले मुली येत असल्याने वेळही चांगला जायचा.) ह्या निमित्तने हे ही आठवले एवढेच नमूद करु इच्छितो.

मी कॉलेजमध्ये असताना अभाविप ह्या कारणासाठी फारच फेमस होती :)

आदूबाळ's picture

22 Mar 2014 - 12:22 am | आदूबाळ

निष्पक्ष वृत्तांकन आवडलं.

पिवळा डांबिस's picture

22 Mar 2014 - 1:23 am | पिवळा डांबिस

सहमत आहे.
विशेषतः टीव्ही/वृत्तपत्रांतील बातम्यांवर अवलंबून न रहाता फर्स्ट हॅन्ड घेतलेला अनुभव असल्यामुळे याचं मोल अधिक आहे.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत...

विकास's picture

22 Mar 2014 - 12:44 am | विकास

"आंखो देखा हाल" / वृत्तांत आणि तो देखील तटस्थ असा... एकदम आवडला. इथे मिपाकरांना सांगितल्याबद्दल आभार... !

विशेषत: त्यातल्या सामान्य लोकांच्या सहभागाच्या आठवणी प्रेरणादायी होत्या, आजही आहेत.

याच्याशी आपचे आत्ताचे अनेक विरोधक देखील सहमत होतील. यावर अधिक लिहीत नाही. :)

नुसताच नंबर्सचा विचार करायचा तर पाच आकड्यांपेक्षा खालचा कुठलाही क्रमांक मुंबईतील राजकीय रॅलीत असला तर तो तसा कमीच आहे. येथे जर तीन-चारशेच लोकं असतील तर फारच कमी आहे. अर्थात ते मतांचे त्रैराशिक मांडण्यास योग्य आहे असे म्हणत नाही. पण त्यात पक्षाची ऑर्गनायझेशन स्किल्स दिसतात. (इंडीया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेस ते नक्की दिसले असे वाटते).

राजकीय सभांच्या गर्दीबाबत काही अनुभव..

ठाण्यात या संदर्भात बाळासाहेबांच्या बघितलेल्या सभा आठवल्या. बर्‍यापैकी शिस्तीत असायच्या. शिवाय सभा संपायच्या आधी राष्ट्रगीत असायचे. त्याला कोणी हलायचे नाही, नंतर शिस्तीत मैदानातून बाहेर पडून मुकाट्याने मार्गी लागायचे असा डायरेक्ट बाळासाहेबांचा दम असायचा. जनता पार्टीच्या निवडणुकांच्या वेळेस खरे लहान होतो पण मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडीस, सुब्रम्हण्यम स्वामी, रामभाऊ म्हाळगी यांच्या सभा पाहील्याचे/ऐकल्याचे चांगले आठवते. त्यात पण काही गडबड नव्हती. विरोधीपक्ष नेते असताना शरद पवार यांची सभा अनुभवली आहे ती पण व्यवस्थित झाली होती. आणिबाणी नंतरच्या काळातील सभांना वातावरणामुळे गर्दी असायची. बाळासाहेबांचे बोलणे / वक्तृत्व ऐकायला शिवसैनिक नसलेल्या (माझ्यासारख्यांची पण) गर्दी असायची. विरोधी पक्ष नेते असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला एक आशा दिली होती कारण त्या आधी पुलोदचे मुख्यमंत्री म्हणून काही चांगले काम झालेले होते. पण नंतर केजरीवालांपेक्षा वेगळ्या अर्थाने, पण जनतेची निराशाच केली.

असो.

नुसताच नंबर्सचा विचार करायचा तर पाच आकड्यांपेक्षा खालचा कुठलाही क्रमांक मुंबईतील राजकीय रॅलीत असला तर तो तसा कमीच आहे.

मला हा नंबर कमी वाटला; पण कदाचित माझा अंदाज चुकला असेल अशीही शक्यता आहे.
शिवाय रॅलीचा मार्ग, तिची वेळ, चर्चगेटला 'दंगल' झाल्याची बातमी - असे अनेक कंगोरे असतील. अनेकांचा सहभाग काठावरून होता असं मी म्हटलं आहे; ते लोक धरले तर नंबर काही हजारांत जाईल :-) ते 'बघे'सोडून (म्हणजे पोलिसांनी धरलेल्या दो-यांच्या आत असलेल्यांची) ही संख्या आहे. इथं 'जनसभा' नव्हती.
चित्राचा हा एक भाग झाला. पुढे काय दिसलं त्याबद्दल पुढच्या भागात लिहिते आहे.

श्रीगणेश आणि सरस्वतीमातेच्य उत्सव मिरवणुका सोडुन मी आजवर कधि रॅली वगैरे अटेण्ड केल्या नाहित. पण एकदा अनुभव घेण्यासारखा असावा. अडवाणि, पुतणे पवार वगैरेंची भाषणं ऐकली आहेत.

कुठलिही टोपी न चढवता केलेलं रॅलीचं थेट वर्णन आवडलं.
पु.भा.प्र.

शक्यतो आपलं डोकं दुस-यांच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची - 'रेडी टू थिंक' असा दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न असतो माझाही ;-)

चिगो's picture

22 Mar 2014 - 12:43 pm | चिगो

कुठलिही टोपी न चढवता केलेलं रॅलीचं थेट वर्णन आवडलं.

क्या बात, अर्धवटराव.. हेच म्हणतो.
अवांतर : अर्धवटरावांनी आता "टॅगलाईन्स" द्यायचा पार्टटाईम, निवडणूक काळपुरता पुरक व्यवसाय करावा असं सुचवावंसं वाटतंय.. ;-) जमतंय तुम्हास्नी.. (हलकेच घ्याल, ही अपेक्षा.)

अर्धवटराव's picture

22 Mar 2014 - 7:46 pm | अर्धवटराव

रेडी टु विंक आणि रेडीमेड टु थिंक असे दोन ब्रॅण्ड सध्या चांगला भाव देतील असा आमचा मार्केट सर्व्हे रिपोर्ट आहे ;)

कुठल्याही रंगाचा चश्मा न लावता केलेलं लेखन आवडलं.
पुभाप्र.

नानासाहेब नेफळे's picture

22 Mar 2014 - 6:02 pm | नानासाहेब नेफळे

एकदंर आपले वृत्तांकन हे पुर्वग्रहदुषीत वाटले, काहीतरी चीरफाड करायची याच उद्देशाने आपण तिथे गेला होतात असे स्पष्ट जाणवते.

एकदंर आपले वृत्तांकन हे पुर्वग्रहदुषीत वाटले, काहीतरी चीरफाड करायची याच उद्देशाने आपण तिथे गेला होतात असे स्पष्ट जाणवते.

फक्त केजरीवाल गुजरातमध्ये खरोखर अभ्यास करायला गेले होते. बाकी कोणीही काहीही लिहिले तरी ते पूर्वग्रहदूषित आणि काहीतरी चिरफाड करायच्याच उद्देशाने. दॅट्स लाइक रिअल आआप सपोर्टर :)

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी

आणि इतका अभ्यास त्यांनी फक्त ४ दिवसातच केला आणि त्यात मधेच इंडिया टुडेच्या विमानातून दिल्लीला एक फेरी देखील मारून आले.

क्लिंटन's picture

22 Mar 2014 - 6:21 pm | क्लिंटन

लेख आवडला. पुढील भागाची वाट बघत आहे.

यशोधरा's picture

22 Mar 2014 - 7:03 pm | यशोधरा

वाचतेय. पुढला भाग लवकर येऊद्यात.

तिमा's picture

22 Mar 2014 - 9:21 pm | तिमा

लेख आवडला. इतक्या नि:पक्षपणे लिहूनही कोणी टीका करत असेल तर तो 'आप' चा आक्रस्ताळी सदस्य असावा असाच निष्कर्ष निघतो.
काहीही अनुभव नसताना एखादे राज्य आणि आता तर देश चालवण्याचा आत्मविश्वास बघून काळजी(देशाची) वाटू लागते.

नानासाहेब नेफळे's picture

22 Mar 2014 - 9:40 pm | नानासाहेब नेफळे

काहीही अनुभव नसताना राज्य आणि आता तर देश...

गुजरातचे तथाकथित विकास(?)पुरुष मोदी यांनी मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधी साधी नगरपालिकेचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, भाजपच्या केडरचा एक कार्यकर्ता ज्याला गव्हर्नन्सचा कसलाही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले गेले तेव्हा आपल्याला काळजी वाटली नसावी ..नै का?

गब्रिएल's picture

22 Mar 2014 - 9:59 pm | गब्रिएल

लै फरक नेभळेकाका.
दोगांच्या सुर्वातीला कोनालाच म्हय्त न्हव्त. पन आस बगा. मोदी आतापरंत तीन्दा निवडून आल्यात. ब्येष्ट सर्कार चालव्ल. गुजरात लईच फुड ग्येला न्हवं ? मोनीबाबाच्या सर्कार्ला पन लई बक्शिसा देयाला लाग्ली तेला. आता तर लोकं म्हन्त्यात त्योच बेष्ट हाय पियेम व्हाय्ला. आनी त्यो ओबामाबी आता त्येला मस्का लावाय्ला लागला किवो. त्याउप्पर ह्ये केज्रिवाल दोन म्हैनेबी शियेम नाय र्‍हाऊ शक्ला. तितबी लै नवटंकी क्येली आनि कायबाय सांगून ताबडतोड पाय लावून पळाला. आता इत्क व्हऊन ग्येल्यावर बी कोना लोकान्ला आक्कल येत न्हाय. आसतेया यकायकाच डोस्क रिकाम. तुमी नका दिलाला लाउन घ्येउ. तुमी लिवा आसच. त्ये तुमच्या जबानित काय म्हंतात ना... आजून येक जोक सांगा काकानु.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 1:23 pm | श्रीगुरुजी

>>> गुजरातचे तथाकथित विकास(?)पुरुष मोदी यांनी मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधी साधी नगरपालिकेचीही निवडणुक कधी लढवली नव्हती,

मोदींनी १२ वर्षे यशस्वी सरकार चालवून स्वतःला सिद्ध केले. केजरीवाल १२ आठवड्यांच्या आतच पळून गेले.

नानासाहेब नेफळे's picture

24 Mar 2014 - 11:08 am | नानासाहेब नेफळे

केजरीवालांनी 12 आठवड्यात जनलोकपालसाठी राजीनामा दिला, असा एक मुख्यमंत्री दाखवा की ज्याने आजपर्यंत' भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदा करण्यात कमी पडलो' म्हणून राजीनामा दिला...
या उलट विकासपुरुष(?)नरेंद्र मोदींनी बारा वर्षेँ एकाधिकारशाही केली, १२ वर्शे गुजरातमध्ये 'लोकायुक्त' नव्हता. मोदींना कोणती भीती वाटत होती ?.आपच्या मंत्रीमंडळात सामन्य लोक मंत्री झाले, तर गुजरात मंत्रिमंडळात अंबाणीचा जवळचा नातेवाईक मंत्री आहे. आता विचार करा ,लोकाभिमुख कोण आणि चार पाच बड्या कॉर्पौरेट्सचे भले करणारे कोण...

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2014 - 1:05 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांनी जनलोकपालसाठी राजीनामा दिलेला नाही. सरकार चालविणे जमत नव्हते, निवडणुकीच्या वेळी दिलेली भरमसाठ अव्यहार्य आश्वासने पूर्ण करणे जमत नव्हते, म्हणून जनलोकपालचे निमित्त करून शेपूट घालून धूम पळून गेले.

याउलट, काँग्रेसने नेमलेल्या व केंद्रसरकारचे एजंट असलेल्या राज्यपालांनी मोदी सरकारने विधानसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर केलेली अनेक विधायके राज्यपालांनी सही न करता अडवून धरली होती. तरीसुद्धा मोदींनी केजरीवालांप्रमाणे पळपुटेपणा केलेला नाही.

नानासाहेब नेफळे's picture

24 Mar 2014 - 1:40 pm | नानासाहेब नेफळे

मोफत पाण्याचे आश्वाशन पुर्ण केले ,दिल्लीकरांना वीजेचे दर अर्धे करुन दिले ,रस्त्यावर राहणार्या गरीबांसाठी अन्नछत्र सुरु केले. जनलोकपालसाठी लढा दिला. एवढे सगळे होऊनही केजरीवालांनी आश्वासनांची पुर्तता केली नाही असे म्हणणे कृतघ्नपणाचे द्योतक नव्हे तर काय ..
रॉयटर्स नावाच्या जगविख्यात निरपेक्ष वृत्तपत्रातला हा वृत्तांत वाचा .n.mobile.reuters.com/article/idINDEEA1D0CT20140214?irpc=932
NEW DELHI (Reuters) -
Activist-turned-politician
Arvind Kejriwal resigned
as chief minister of Delhi
on Friday, frustrated by
obstacles put in the way
of an anti-corruption bill,
and immediately
proposed fresh elections
for the capital.
A former tax collector
who heads the fledgling
Aam Aadmi Party (AAP),
Kejriwal made a stunning
debut in the city's state
elections in December,
tapping into public
disgust with corruption
and misgovernance.
The Jan Lokayukta bill
would have set up an
ombudsman with the
power to investigate
politicians and civil
servants. Kejriwal had
wanted it to be passed in
the Delhi assembly in the
coming days, but the
Congress and the
Bharatiya Janata Party
(BJP) thwarted him,

arguing that it must be
approved by the central
government first.
Kejriwal announced he
was standing down after
a chaotic stand-off that
had paralysed the Delhi
assembly through the
day, with lawmakers
bawling at each other
and some trying to
snatch the microphone of
the legislature's speaker.
"The Delhi assembly
should be dissolved and
fresh elections should be
held," he said, holding up
a copy of his resignation
letter at his party's
headquarters as
supporters outside
cheered, despite a chilling
downpour of rain.
Kejriwal said the
Congress and BJP had
united against the bill
after he had ordered a
probe into India's richest
man, Reliance Industries
(RELI.NS) chairman
Mukesh Ambani as well
as policymakers over gas
pricing.

अंबानीच्या गॅसवर पोळ्या भाजायची मोदींना भारी हौस नै का.
एक फूकटचा सल्ला, तरुणभारत आणि पांचजन्य वाचून निष्कर्ष काढू नका.

श्री गावसेना प्रमुख's picture

24 Mar 2014 - 3:19 pm | श्री गावसेना प्रमुख

विजेचे दर कमी करण्यासाठी जे अनुदान देणे गरजेचे होते त्याची व्यवस्था न करता केजरीवाल पळाले की,

विवेकपटाईत's picture

25 Mar 2014 - 7:44 pm | विवेकपटाईत

कोणी सांगितले बुआ तुम्हास्नी. संपूर्ण खोट आहे पाण्याचे बिल कमी केले नाही अपितु १८% वाढविले आहे. एप्रिल पासून महाग पाणी. मासिक २०,००० लिटर पर्यंतची सूट केवळ तीन महिन्यासाठी होती. त्यात ही १ लिटर जास्त झाल्यावर कमीत कमीत ९०० रुपयाचे बिल येणार होते. लोकांनी पाणी सुरु केली (दुसर्या शब्दात भ्रष्टाचार वाढविण्याचे काम केले). शिवाय तृतीयांश दिल्ली पिण्याच्या पाणी साठी टेनकर वर अवलंबून आहे (माझ्या घरी ही पाणी येत नाही).
२. विजेचे दर कमी झाले नाही. २०० युनिट पर्यंत आधीही सूट होती. ती काही पैशांनी वाढविली फक्त तीन महिन्यांसाठी. एप्रिल पासून नो सूट अर्थात २०० युनिट पेक्षा कमी वापरणार्याला ही ७ रुपये प्रती युनिट द्यावे लागतील. (अंतरिम बजेट मध्ये सूट साठी कुठलीही व्यवस्था केली नाही आहे).
३. कमाल तर आणखीन ही आहे वीज न भरणार्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय केजरीवाल ने केला. त्या साठी तरदूत करणे सोयीस्कर रीतीने विसरून गेले. ( २ आणि ३ साठी दिल्ली सरकारचे कोर्टात दिलेले अफेडेविड वाचा). सत्य कळेलच.
शेवटी तवाकी ने शिकारीत मदत करून दिल्लीची गादी शेरखानला सौपविलली. आता महावली रेड्याच्या शिकारीत मदत करायला निघाला आहे.

अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2014 - 1:11 pm | श्रीगुरुजी

>>> आता विचार करा ,लोकाभिमुख कोण आणि चार पाच बड्या कॉर्पौरेट्सचे भले करणारे कोण...

म्हणजे केजरीवाल लोकाभिमुख?

नानासाहेब नेफळे उपाख्य ग्रेटथुंकर उपाख्य टॉपबिअर्ड फिलॉसॉफर,

काही दिवसांपूर्वीच एका धाग्यावर तुम्ही ,"केजरीवाल एक नंबरचा खोटारडा आहे आणि आप म्हणजे खाप पंचायत आहे" असे लिहिले होते. ते सोयिस्कररित्या विसरलेले दिसताय. आणि आता केजरीवाल एकदम लोकाभिमुख झाले!

तुमच्या आठवणीसाठी तुमचीच विधाने खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा.
________________________________________________________________________________

केजरीवाल हा खोटारडा आहे हे
टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32
केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा ....

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥

.उत्तर द्या

____________________________________________________________________________

ठरवून केलेले निष्पक्ष लेखन मला फारसे आवडत नाही.
मात्र हे 'वार्तांकन' स्वरूपाचं लेखन खासच वाटलं. आवडलं

>>>ठरवून केलेले निष्पक्ष लेखन मला फारसे आवडत नाही.

+१

>>>मात्र हे 'वार्तांकन' स्वरूपाचं लेखन खासच वाटलं. आवडलं

+१११

- अर्धवटरावांच्या टॅग लाईनशी सहमत, विकासरावांच्या मताची प्रशंसा करत, नानासाहेबां च्या मताला छेद देणार्‍या मतांचा आदर करीत नि खुद्द नानासाहेबांना नि संपतरावांनाही शुभेच्छा देत स्वतःचं मत राखून ठेवलेला ;)

आवलेसाहेब, शुभेच्छाबद्दल आभार. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा. :)
वृतांकन छानच. बाकी मुस्लीम जनतेची मते आआपला मिळाली तर भाजप आणि आआप दोन्ही समर्थकांना आवडेल असे वाटते. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Mar 2014 - 7:11 pm | निनाद मुक्काम प...

च्यायला

उद्या आपने मुंबईत मुस्लिमांची मते खाऊन प्रिया दत्त , सारख्या आपल्या मतदार संघात लोकप्रिय असलेल्या नेत्यांना पाडले व त्यामुळे महायुती चा उमेदवार जिंकला किंवा मधेच मनसे ची लॉटरी निघाली तर आप समर्थकांवर पप्पू ते मोदी ह्यांचे एजेंट असल्याचा आरोप करतील.

मुस्लिमांची मते , दलितांची मते , हिंदूची मते अश्या राजकीय समीकरणांवर पोसली जाते धर्मनिरपेक्ष देशाची निवडणूक .

आतिवास's picture

25 Mar 2014 - 2:53 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
केजरीवाल यांचेही आभार मानायला हवेत खरे तर ;-)

विकास's picture

25 Mar 2014 - 8:26 pm | विकास

केजरीवाल यांचेही आभार मानायला हवेत खरे तर

आहेतच आमचे केजरीवाल आभार मानण्याजोगे! *yes3*

पैसा's picture

30 Mar 2014 - 4:52 pm | पैसा

रॅलीचा मार्ग वगैरेबद्दल वाचताक्षणी डोक्यात आलेले प्रश्नच लिहिलेत! आता पुढचा लेख वाचेन!

आत्मशून्य's picture

31 Mar 2014 - 12:30 am | आत्मशून्य

त्याचे सुधा निपक्ष वार्तांकन करावे ही आग्रही विनंती आहे.

चिंतामणी's picture

27 Apr 2014 - 10:20 am | चिंतामणी

https://lh3.googleusercontent.com/-343DK8tjHUw/UyC4mz_rHVI/AAAAAAAABkM/acaKAGG2ELE/s650/13-03-12%2520%2528B%2529.jpg

बहूत क्रांतीकरी है.

आतिवास's picture

27 Apr 2014 - 11:58 am | आतिवास

फोटोचा अर्थ समजला नाही :-(
सांगितल्यास कदाचित (!) समजेल :-)

चिंतामणी's picture

28 Apr 2014 - 12:55 am | चिंतामणी

ह्या वरुन समजायला हरकत नव्हती.
असो.

थोडा अजून विचार करा. नाही उत्तर मिळाले तर देइन.