निवडणूक २०१४: अनुभव ६: दण्डकारण्य (२)

Primary tabs

आतिवास's picture
आतिवास in राजकारण
18 May 2014 - 1:49 pm

दण्डकारण्य (१)

काही कारणांमुळे १६ मे पूर्वी "दण्डकारण्य"चे पुढचे भाग लिहायला जमलं नाही. आता त्या अनुभवांबद्दल सविस्तर लिहिणं संदर्भहीन ठरेल. म्हणून हा धावता आढावा.

१० एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघात ५२% मतदान झालं - जे अंदाजापेक्षा जास्त होतं. बस्तर जिल्ह्यात ६७% मतदान झालं तर सुकमा आणि बिजापूरमध्ये प्रत्येकी २५% इतकं ते कमी झालं. (संदर्भ) माओवाद्यांच्या 'बहिष्कार' घोषणेनंतर वेगळं काय होणार म्हणा? इथला निकाल अपेक्षित असाच आहे. भाजपचे दिनेश कश्यप यांना ३,८५,८२९ मतं मिळाली तर कॉंग्रेसच्या दीपक कर्मा यांना २,६१,४७०. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विमला सोरी यांना ३३,८८३ मतं मिळाली तर सोनी सोरी यांना अवघी १६९०३. विशेष म्हणजे ३८,७७२ मतदात्यांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारला आहे. (संदर्भ) जे चित्र दिसलं होतं त्यावरून हा अंदाज काहीसा आला होता म्हणा!

रायपुर-जगदलपुर रस्त्यावर आणि जगदलपुर शहरात 'बसथांबे' लक्ष वेधून घेत होते. चांगली बांधणी आणि स्वच्छता होती. अगदी दिल्लीतसुध्दा असे बसथांबे नाहीत; मुंबईतही नाहीत.

bustop

पण या थांब्यावर लोक बसले आहेत असं दृश्य मात्र मला एकदाही दिसलं नाही. जगदलपुरमध्ये 'शहर बस सेवा' नसावी तरीही थांबे आहेत हे पाहून गंमत वाटली. एकूण छत्तीसगढमध्ये काही भागांत तरी पायाभूत सोयी चांगल्या दिसताहेत - असं प्रथमदर्शनी झालेलं मत!

जगदलपुरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात काही सहभागी होता आलं नाही कारण दिनेश कश्यप जगदलपुरच्या बाहेर होते. त्यांचा प्रचार सुरक्षेच्या करणांमुळे हेलीकॉप्टरमधून चालू होता - त्यामुळे आम्ही त्यात सहभागी होण्याची शक्यताही नव्हती. पण दीपक कर्मा यांना भेटायला गेलो तेव्हा मजा आली. कॉंग्रेस कार्यालयासमोर त्यांचं घर आहे. 'तिथून ते आता निघतील, लगेच जाऊन भेटा' असं कार्यालयात सांगण्यात आलं म्हणून घाईने तिकडे गेलो. बरेच लोक उभे होते तिथं. त्यातला एकाला म्हटलं "कर्मा साहेबांना भेटायचं आहे", त्यावर तो म्हणाला, "मै ही दीपक कर्मा. अभी हम प्रचार के लिये जा रहे है, आप भी चलिये हमारे साथ". मग आम्ही संध्याकाळी सात वाजताच्या प्रचारफेरीत सामील झालो.

prachar feri

मध्यभागी पांढरा कुर्ता आणि दोन्ही हात स्वत:च्या छातीवर असलेल्या स्थितीत आहेत ते दीपक कर्मा. भोवताली झेंडे घेऊन अनेक कार्यकर्ते. दुकानात जायचं, हातात हात मिळवायचा किंवा नमस्कार करायचा आणि बाहेर पडायचं; "मला मत द्या" वगैरे काही भानगड नाही. लोकांशी बोलताना कळलं की इथं सगळे सगळ्यांना ओळखतात त्यामुळे जाऊन फक्त 'आशीर्वाद' मागायचे मतदात्यांचे अशी पद्धत आहे. उगा भाषणबाजी नाही. अक्षरश: मिनिटभरही एका दुकानात थांबत नव्हते दीपक कर्मा आणि ते बाहेर पडले की दुकानदार नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागत होते. गंमत वाटली ते पाहताना. या प्रचारफेरीत स्त्रिया नव्हत्या; मी एकटीच होते त्यामुळे लोक माझ्याकडे पहायला लागले होते. एकूण प्रचारफेरीचा अंदाज आल्यावर आम्ही कर्मा यांच्या मागे हिंडणं थांबवलं!

'आप'च्या कार्यालयासमोर त्यांचं प्रचार वाहन उभं होतं. आठ दहा लोक बसू शकतील अशी मिनीबसही होती - ती दुस-या दिवशी पहिली; त्यात बसून काही तास प्रवासही केला.

minibus

संध्याकाळी आम्ही गेलो तेव्हा कार्यालयात शुकशुकाट होता. मग त्यांच्या स्थानिक सूत्रधाराकडे तिथल्या कार्यकर्त्यांनी नेऊन पोचवलं - ब-याच गप्पा झाल्या. अडचणी, विजयाची शक्यता वगैरे बरेच मुद्दे बोलले गेले. दुस-या दिवशी सकाळी 'आप'ची प्रचारफेरी पहायला मिळाली. प्रचारफेरी म्हणण्यापेक्षा 'घरोघर संपर्क' म्हणता येईल.

Soni Sori

इथेही पुन्हा तोच प्रकार. आश्वासनं नाहीत; प्रश्नोत्तरं नाहीत; अपेक्षा नाहीत; वाद नाहीत - एक नमस्कार आणि पुढे चालू पडायचं. उमेदवार मोकळा आणि मतदातेही मोकळे! इथं सोनी सोरी यांच्याभोवती पत्रकारांचा मोठा गराडा होता. इंग्लिश भाषिक पत्रकार किती अज्ञानी, उथळ आणि उर्मट असू शकतात त्याचा एक नमुना पहायला मिळाला इथं. आपण दिल्लीतून आलो आहोत तर प्रचार आपल्याला 'बाईट' मिळण्यासाठी व्हायला हवा असा या पत्रकार बाईंचा आग्रह होता. 'आप'च्या कार्यकर्त्यांशी या बाई अतिशय गुर्मीने बोलत होत्या. फोटोत कॅमेरा घेऊन चालताहेत त्या बाई नव्हेत या! या कॅमेरावाल्या बाई चांगल्या होत्या - पत्रकार जमातीला न शोभणारं सौजन्य त्यांच्याकडे होतं.

इथं बस्तर लोकसभा मतदारसंघासाठी तर जाऊ द्या, पण छत्तीसगढसाठी वेगळा जाहीरनामा नव्हता दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा - कॉंग्रेस आणि भाजप. पण सोनी सोरी यांनी मात्र 'बस्तर'साठी वेगळा जाहीरनामा काढला होता. प्रकाशचित्रात त्यांच्या हातात त्याच जाहीरनाम्याची प्रत आहे. हजार रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर काढलेल्या या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार निर्मुलन, रोजगार निर्मिती, गरीबी दूर करणे, ग्रामसभेला निर्णयप्रकियेत महत्त्व, बस सेवा, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, नशामुक्ती केंद्र निर्माण, स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्राधान्य, जेलवासियांना कायद्याची मदत, असे पन्नास मुद्दे होते. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास 'परत बोलावण्याचा अधिकार' (Right to Recall) या जाहीरनाम्यान्वये सोनी सोरी यांनी दिला होता. मतदात्यांवर याचा प्रभाव पडल्याचे निकालावरून दिसतं नाही.

कोन्डागावपर्यंत सोनी सोरी यांच्यासोबत त्यांच्या वाहनातून प्रवास केला आणि काही गप्पा झाल्या. पुढे गावांत त्यांच्या प्रचारसभेत जायचा बेत होता. पण इथं अचानक स्वामी अग्निवेश अवतरले.

agnivesh

स्वामी अग्निवेश यांनी 'माझा 'आप'ला पाठिंबा नाही पण सोनी सोरी यांना मात्र पाठिंबा आहे' असं म्हणून 'आप'च्या कार्यकर्त्यांची पंचाईत केली. आता अग्निवेश यांच्यासोबत 'आप'चा प्रचार कसा होणार असा प्रश्न आला. निर्णय घ्यायला 'आप'च्या कार्यकर्त्यांना थोडा वेळ लागला. तोवर आम्ही बाहेर उसाचा रस पीत होतो. तेवढ्यात अग्निवेश बाहेर आले आणि माझ्याकडे पाहून जणू ओळख असल्यागत हसले; मीही हसले. माझ्या सहका-याला "तुला ओळखतात ते?" असा प्रश्न पडावा इतकं ओळख दाखवणारं हसू होतं ते! पण अर्थात आमची काही ओळख वगैरे नाही. मी तिथं बाजूला टिपणं घेत उभी होते म्हणून अग्निवेश मला पत्रकार समजले असणार! आम्हाला अग्निवेश यांच्यासोबत हिंडायचं नव्हतं; त्यामुळे आम्ही जगदलपुरला परतलो.

रायपुरमध्ये बहुजन समाजवादी पक्षाच्या (बसप) एका पदाधिका-याशी चर्चा झाली. त्यांच्या मते राज्यात अगदी दहशतवादी वातावरण आहे आणि हा दहशतवाद सत्ताधारी पक्षाचा आहे. कांकेर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि त्यामुळे बसप तिथेच फक्त गंभीरपणे निवडणूक लढवते. (राखीव मतदारसंघांचे परिणाम हा चर्चेचा एक वेगळा विषय आहे!) बस्तरमध्येही बसपचा उमेदवार उभा होता - पण आम्ही काही त्याला भेटलो नाही. मनबोध बाघेल या उमेदवाराला ९७७४ मतं मिळाली (पाचवा क्रमांक) - पण भटकंतीत त्यांचा काही प्रचार मला तरी दिसला नाही.

थेट राजकारणाशी संबधित नसलेल्या काही लोकांनाही आम्ही भेटलो. जगदलपुरमध्ये दोन तरुण स्त्रिया भेटल्या - त्या वकील आहेत. Human Rights Law Network या संस्थेच्या ईशा आणि पारिजाता भेटल्या. पारिजाताने पुण्यातून वकिली शिक्षण पूर्ण केलं आहे - त्यामुळे चर्चा करायला 'पुण्याचा' दुवा उपयोगी पडला - म्हणजे त्याने सुरुवात चांगली झाली. या दोघींनी तिथल्या काही गोष्टी सांगितल्या त्या अस्वस्थ करणा-या होत्या. उदाहरणार्थ जगदलपुर तुरुंगात केवळ ९० महिला कैद्यांची राहण्याची व्यवस्था आहे - पण तिथं शेकडो स्त्रिया आहेत - म्हणजे किमान राहण्याच्या, जेवणाच्या काय 'सोयी' असतील याचा अंदाज करू शकतो आपण! सोनी सोरी या तुरुंगाच्या 'अनुभवा' बद्दल पुष्कळ काही इतरत्रही बोलल्या आहेत - ते अंगावर शहारा आणतं. कैद्यांचे खटले तीन-चार वर्ष चालतही नाहीत. विशेष म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. पण दरम्यान काही वर्ष तुरुंगात हवा खावी लागण्यामुळे लोकांची जीवनं उध्वस्त होत राहतात, त्यांचं पुनर्वसन अवघड होऊन जातं. हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पुन्हा कधीतरी!

आयबीसी २४ या वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार नरेश मिश्रा यांची भेट बस्तरबद्दल बरीच माहिती देणारी आणि एक नवा दृष्टिकोन देणारी होती. मिश्रा यांची अभ्यासू, प्रामाणिक, संयत आणि अभिनिवेशरहित निरीक्षणं ऐकणं हा एक सुखद अनुभव होता. गेली चौदा वर्ष ते जगदलपुरमध्ये आहेत. "मी बोलतोय ते ऑफ द रेकॉर्ड आहे" हे त्यांनी संवादाच्या सुरुवातीस सांगितलं - त्यामुळे ते इथं लिहिता येणार नाही.

रायपुर, जगदलपुर, बचेली इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांशी भेट आणि गप्पा झाल्या. त्याबद्दल पुढच्या भागात.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 May 2014 - 3:19 pm | मुक्त विहारि

"कैद्यांचे खटले तीन-चार वर्ष चालतही नाहीत. विशेष म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. पण दरम्यान काही वर्ष तुरुंगात हवा खावी लागण्यामुळे लोकांची जीवनं उध्वस्त होत राहतात, त्यांचं पुनर्वसन अवघड होऊन जातं. हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पुन्हा कधीतरी!"

पुन्हा कधीतरी , कशाला?

जमल्यास लगेच लिहा.

तुमचे लेख नुसतेच वाचनीय नसतात, तर मनांत कुठेतरी, काही तरी खळबळ माजवून जातात..

या विषयाच्या खोलात जावं लागेल - अनेक गोष्टी तपासून बघाव्या लागतील, या विषयाचे दुसरे पैलू आहेत; तेही समजून घ्यायला लागतील ...
'माओवादा'सारखा संवेदनशील विषय आहे ...
म्हणून 'नंतर कधीतरी'!!

पैसा's picture

18 May 2014 - 4:19 pm | पैसा

अजून जंगल आणि जंगलचा कायदा आहे तिथे!

चाणक्य's picture

19 May 2014 - 6:49 am | चाणक्य

भाग वाचून काढले. पुभाप्र

श्रीरंग_जोशी's picture

19 May 2014 - 9:36 am | श्रीरंग_जोशी

ज्या शब्दांत दीपक कर्मा यांनी स्वतःची ओळख करून दिली जवळपास त्याच शब्दांमध्ये त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या हत्येपूर्वी बंदूकधारी माओवाद्यांना स्वतःची ओळख करून दिली होती - 'जी मैं हूं महेंद्र कर्मा'. त्या भीषण हत्याकांडाला अजून वर्षही झालेले नाही.

आतिवास's picture

19 May 2014 - 10:29 am | आतिवास

प्रचंड गुंतागुंत आहे या राज्यात. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. तूर्त त्याबद्दल जास्त लिहिणार नाही. पण 'सलवा जुडुम' बद्दल खूप काही उपलब्ध आहे आंतरजालावर. महेंद्र कर्मा हे 'सलवा जुडुम'चे संस्थापक होते.

आतिवास's picture

23 May 2014 - 1:18 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आभार.
मुक्त विहारी, पैसा, चाणक्य आणि श्रीरंग जोशी - तुम्हा सर्वांचे आभार.