माझं कोकणातलं गांव :- भाग - ३ ( दुपार ते संध्याकाळ)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
27 Feb 2014 - 10:27 am

माझं कोकणातलं गांव :- भाग-१

माझं कोकणातलं गांव :- भाग-२

मागील भागात>>>
कितीही पाऊस असो, ऊन असो वर्षाचे ३६५ दिवस कारावीच लागते. या गणपतीला नैवेद्य दाखवल्या शिवाय घरी कोणीही जेवत नाही. पण त्या विषयी पुढिल लेखात ..

तिथुन पुढे >>>

आता पर्यंत बरंच ऊन चढलेलं असायचं. काका स्वत: किंवा माझे वडिल मग सोवळं नेसुन गणपतीच्या देवळात जायला निघत असु. हे देऊळ परत घरापासुन लांब बागेच्या विरुद्ध बाजुला पुन्हा दुसर्‍या पर्‍याला ओलांडुन जावे लागते. या पर्‍यातही भरपुर मोठे दगडधोंडे, शिळा, आहेत. पर्‍याच्या दोन्ही बाजुला घनदाट झाडी आहेत. उजव्या बाजुने मात्र वर जाता येते. कारण पायवाटेचा रस्ता आहे जो वर सड्यावर जातो. येथे गुराखी आपली गुरं चरायला घेवुन जातात. या रस्त्याला एक प्रचंड शिळा इंग्रजी "सी" आकाराची असुन त्या मध्ये एक चांभार बसायचा.(आता तो नाहीये). तर दुसर्‍या बाजुने वर जाताच येत नाही. आम्हाला पिण्याचे पाणी याच पर्‍यातुन पण थोडं वरच्या बाजुने पोफळीच्या कोरलेल्या पन्हळीतुन घरापर्यंत नेले आहे. या पर्‍यात आमचे आंबा, फणस, रातांबा (कोकमचे झाड), अजनं ( ही जांबळासारखीच पण आकाराने गोल असतात जीभ पुर्ण जांभळी होवुन जाते.), गुंजा,जांबुळ अशी मोठी मोठी झाडे आहेत. काका मग पर्‍यात कलश भरुन पाणी घ्यायचे. या पर्‍यामध्येच एका ठिकाणी पाण्याचे मोठे डबके आहे; त्यात खुप छोटे छोटे मासे आहेत. पण या डबक्याची खोली जेमतेम हाताची ओंजळी खाली टेकेल इतकीच. मग काका कलशात पाणी भरेपर्यंत आम्ही हाताची ओंजळ करुन त्यात मासे पकडण्याचा प्रयत्न करायचो. ते खुप चपळ; हातात कधी आले तरी टुणकण उडी मारुन सटकत. या पर्‍यात कधी ऊन पोहचतच नाही. त्यामुळे इथं थंडगार वाटतं.

तसेच या ठिकाणाहुन खाडीचे विहंगम दृश्य दिसते. खालील चित्रात जे विहंगम दृश्य दिसतय त्यात समोर खाडीच्या पलिकडे दापोली तालुक्यातील गावतील जेटी दिसत आहे.तर उजव्या बाजुच्या कोपर्‍यात ए.स्टी.चा आमच्या गावात येणारा लाल रस्ता दिसत आहे. इथुन खाडीतलं पाणी हलताना दिसत नाही म्हणुन बर्फाची लादी आहे असं वाटतं.
पर्‍यातुन दिसणारे विहंगम दृश्य
1

गावाला पाणी पुरवठा करणारा हा दुसरा पाणवठा. या पाणवठ्यावर पावसाळ्यात पलिकडे जाण्यासाठी २ वर्षा पुर्वी एक सा़कव बांधला आहे. साकव म्हणजे छोट्या मोठ्या लाकडाच्या ओंड्क्या पासुन बनवलेला पुल होय. आता पायवाटेची लाल माती खुपच तापलेली असायची सोवळ्यातल्या माणसाला अनवाणी चालणं अवघड होवुन जात असे. तो धावत पळत देवळात पोहचला की लगेच पुजेला सुरवात करी. तो पर्यंत आम्ही देवळाभोवतालचा रानचा मेवा खाण्यात मग्न असु. कधी जांबळं, कधी अळु (हे फळ दिसायला चिकु सारखे असते पण चव पचपचीत), करवंद, बोरं, काजुचा गर असे काही तरी उद्योग चालायचे. या दुपारच्या पुजे नंतर संध्याकाळी ७.०० वाजता परत दिवा लावायला याव लागतं. (कितीही अडचणी येवोत, यात अजिबात बदल झालेला नाही ).
घरी परतेपर्यंत पाय लालमातीने पोळलेले असायचे. मग हौदावर जावुन गार पाण्यात थोडावेळ उभं राहायचं. इकडे माजघरात जेवणाची जंगी तयारी झालेली असायची. सगळ्यांना केळीच्या पानावर गरम गरम भात, त्यावर तुपाची धार, लिंबु, लोणचं, सांडगे, पापड, चुलीवर भाजलेली गरम भाकरी किंवा पोळी , दही, ताक, काजुच्या बी घालुन केलीली आमटी, डाळीची चटणी , मुरांबा, असा खासा बेत असायचा.
हसत खेळत गप्पा मारत जेवणाची पहिली पंगत (जी बहुतेक करुन पुरुषांची आणि लहान मुलांची) उठायची. मग स्वयंपाक घरात दुसरी बायकांची पंगत बसायची. तेव्हा आम्ही सगळेजण ओटीवर जमायचो. जेवणानंतरचे मुख्य काम पान खाणं. कोकणी माणुस आणि विड्याचं पान याचं एक अचाट समीकरण आहे. काका आणि आजोबा सुपारीची चंची (सुपारीची पिशवी) उघडत असत. त्यात प्लास्टिकच्या सुरनळी मध्ये विड्याची पाने गुंडाळुन ठेवलेली असत. त्यातली काही पाने बाहेर काढत, मग त्याच्या शिरा मोडुन दाताने चावुन फेकुन देत असत मग तुंबाखुची डबी घेवुन त्याला चुना लावण्याचे काम आम्हा लहान मुलांचे असे. अडकीत्ता मात्र आमच्या हातात कधी येत नसे. सुपारी आमच्यासाठी ओली आणि त्यांच्यासाठी सुकी. ओली सुपारी म्हणजे नुसतं खोबरंच जणु. पान तायर झालं की त्याचा चोबरा तोंडात भरुन ओटीच्या पुढिल पडवीत झोपाळा लावलेला आहे, त्यावर जावुन झोके घेत पान खायचं. कोणाचं पान जास्त रंगतंय याची स्पर्धा लागायची.
दुपारच्या उन्हानं कौलारु घरात गरम झळा येतात, मग कोणी हवेशीर अशी जागा बघुन वामकुक्षीसाठी तिथे विसावायचा. पण बहुतेक करुन आम्ही आत्यां बरोबर सुपारीच्या बागेत दोन पोफळींच्या वाफ्यात जी मोकळी जागा असायची त्या ठिकाणी घोंगडी, कांबळ घेवुन बैठक मारायचो. कधी पत्ते कुटायचो तर कधी नुसतंच आड पाडायचो. आत्या मात्र आम्हाला आम्ही चटकन झोपावं म्हणुन "संधाकाळी बंदरावर कोणाला जायचंय, चला त्याने आता दुपारंच झोपा पाहु लवकर." असं आमिष दाखवायची आणि डोळे बंद करुन झोपी जायची.
जोरात वारा आला की पोफळीच्या झावळ्या टोकांशी एकमेकांना मिठ्या मारत, मग परत विलग झाल्या कि त्यामधुन निळं आकाश, पळणारे ढग, दिसत असे. मधेच येणारी वार्‍याची झुळुक, त्याने होणारी पानांची सळसळ, छोट्या किटकांचा गुंजारव, पक्षांची किलबिल वातवरणात भरुन राहिलेला एक प्रकारचा छानसा तिथल्या मातीचा, गवताचा वास या सगळ्यात गुंग होताना हळुहळु डोळे जड झालेले असायचे.
झोप झाली की संध्याकाळी ४.०० वाजता सगळ्यांना फुलपात्र भरुन चहा व्हायचा. मग संध्याकाळच्या कामाची लगीन घाई सुरु. कुठे जनावरांना चारा पाणी तर कुठे , पिण्याच्या पाटाचं पाणी कमी झालं म्हणुन किंवा अजिबातच बंद झालं म्हणुन पाट चोखळायला( पाट साफ करणे) जाणे, तर कोणी बंदरावर किराणा मालाचं सामान आणायला जायचा. आम्ही मुले मग आईवडिलांबरोबर आमच्या इतर नातेवाईकांकडे किंवा गावांतील वाड्यामध्ये फिरायला बाहेर पडत असु. बहुतेक करुन सगळे गावकरी भेटत असत "दत्ता कधी रं आलास , आणि ही तुझी पोरं काय? काय रे केवढा उंच झालास? असे म्हणत. तर बाया बापड्या म्हणत "काय गं वैनीबाय कशी हायेस बरी हायेस ना?" अशी विचारपुस करत. "या बसा आंबे, फणसाचे गरे खा" म्हणुन आग्राहाने बोलावणं करत.
कधी कधी आम्ही ए.स्टी. स्टॉप वर येवुन तिथुन खाली उतरत बंदरावर येत असु.

उतरत असताना एका ठिकाणाहुन दिसणारं आमच्या गावच्या अगोदरच्या कारुळ गावचं दृश्य
1
एक लाँच पलि़कडल्या तिरावर जाताना. ही लाँच एकदा गुहागरच्या तिरावरील गाव तर एकदा दापोलीच्या तिरावरील गाव घेत घेत नागमोडी दाभोळ ते चिपळुण जाते. या वळणावर खाडीचे पात्र बरेच रुंद आहे. आणि उजवीकडे वळली की अजुन एकदा डावीकडे वळण आहे कि मग शेवटी दाभोळ बंदर. मग पुढे समुद्र.

1

बंदरावरुन तर एक वेगळाच नजरा दिसत असे.
एका बाजुला विठ्ठालाचे मंदिर समोर बोटीची पक्ती (जेटी), खाडीच्या कडेला असलेली खुरटी खारफुटीची झाडी,
या चिखालात फिरणारे खेकडे, किरव्या, लाटंचा चुबुक, चुबुक असा येणारा आवाज, पाण्यावर ओरडत जाणारी टिटवी, डागडुजी करण्यासाठी किनार्‍या वर टेकु देवुन उभ्या केलेल्या मच्छिमारी होड्या, खाडीतुन फट फट करत जाणारे मचवे, बाज, आणि पलिकडील तीरावरची पक्ती आणि त्यामागचे हिरवे, पिवळे डोंगर काय बघु आणि काय नको असे होवुन जात असे.
दाभोळच्या खाडीचे पात्र चांगलं २. ते २.५ कि..मी. रुंद आहे. या खाडीत तेव्हा तीन लाँच दाभोळ ते गोवळकोट (चिपळुण) अशा ये जा करायच्या. आता फक्त एकच आहे. बंदरावर लाँच सं. ६.०० वा यायची. पक्तीवर बसुन मग आणलेली भेळ, चिवडा तत्सम नाश्ता व्हायचा.

बंदरावर कडेने एका बाजुला मच्छिमार वस्ती आहे तर अधेमधे मुसलमान लोकांची आणि एक मशीद आहे. हे मुसलमान खरं तर सगळे पुर्वीचे हिंदु पण आता बाटलेले. सगळ्यांची नावे मराठीत कोणी देसाई, तेरेदेसाई, पाटील, ईनामदार काही नावे पाहुन तर अस्स्ल ब्राम्हणी म्हणजे फडके, फडणीस, खोत अशी. एक किराणा मालाचे दुकान आहे तिथुन सामान घेवुन वर एवढी डाग (उभी चढण) चढणं म्हणजे एक दिव्यच असे.

या खाडीच्या किनार्‍याला लागुन आमची २ आंब्याची झाडे आहेत. खाडीच्या पाणाने आमची शेती पण होती, पण आता ती करत नाही. एके वर्षी आमचा रेडा आणायला आम्ही इकडे बरेच खाडीच्या समांतर चालत गेलेलो. तो मस्त या चिखलात डुंबुन मुक्तपणे ८ दिवस संचार करत होता. आम्ही गावी जायच्या आधी ८ दिवस त्याला इकडे खाली चरण्यासाठी काकांनी सोडला होता.

खाडीकाठचे आंब्याचे झाड

1

उन्हं कलायला लागली की मग पुन्हा वरती डोंगर चढायला सुरवात. हि डाग (उभी चढण) चढणं म्हणजे ऊर धपापायचा नुसता. पण जाताना वाटेत करवंद खात जायचं. मग आधी बस स्टॉप यायचा . तिथे थोडावेळ थांबायचं कारण चिपळुणहुन संध्या. ४.०० वाजता निघालेली ए.स्टी. संध्या ७.०० वाजेपर्यंत तिथे यायची. मग कोण कोण आलंय हे पहायचं.

गावतला ए.स्टी.स्टँड

1

आता हा ए.स्टी. स्टॉपचा परिसरातील जागा कलर्स वाहिन्यातुन काम करणारी स्मृती ईराणी (अरुणा ईराणीची सख्खी बहिण) हिने घेतली आहे. तिने सगळा डोंगरावर व्यवस्थित झाडे लावुन तो भाग सुशोभित केला आहे. आणि एका उंच सापट जागेवर लाकडी घर केले आहे. तिच्या घरातुन खाडीचा किमान ६ कि.मी चा नजारा (दाभोळ खाडीचे पात्र, समोरील डोंगर) खुप छान दिसतो. महिन्यातुन एक दोन वेळा ती तिकडे विश्रांती करता येते. गावातल्या ४ लोकांना तिच्याकडे रोजगार मिळाला आहे.
घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा. सगळा दिवस असा जायचा कसली भ्रांत/चिंता नाही, सुट्टी कधी संपणार याच टेंन्शन नाही आरामत दिवस होते ते आता गेलो की पहिले यायचं आरक्षण कसं होईल ते पाहातो....

टीपः- आता पर्यंत गावातलं जीवनाचं वर्णन टिपुन झालं पुढिल भागापसुन लहानपणापासुन आता पर्यंत घडलेले प्रसंग देण्याचा प्रयत्न असेल. चुकभुल द्यावी घ्यावी. शुद्धलेखानासाठी क्षमस्व.
क्रमांश

वावरकथालेखअनुभव

प्रतिक्रिया

घन निल's picture

27 Feb 2014 - 12:21 pm | घन निल

छान लेख ! ते ओल्या सुपारी विषयी आमच्या मराठवाड्यात लय गैर समज आहेत हो . ओळी सुपारी खाल्ली असं काही ऐकून आहे,.

पहिला प्रतिसाद संपादित न करताच प्रकाशित झाला . ओली सुपारी खाल्ली कि माणूस मारतो असं काही ऐकलं आहे आणि तुम्ही त्याला खोबरं म्हणताय . काय खरं खोटं सांगा बघू

साकवावर भूत बीत नाही का एखादे!

प्रमोद देर्देकर's picture

27 Feb 2014 - 1:02 pm | प्रमोद देर्देकर

आयला असं काही नसतं हो! हा लेख लिहायला जिवंत आहोत ना आम्ही.

आम्ही खुप खात असु आणि म्हणुन तुम्ही पण बिन्धास्त खावा.

मुक्त विहारि's picture

27 Feb 2014 - 1:08 pm | मुक्त विहारि

आवडला....

प्रमोद देर्देकर's picture

27 Feb 2014 - 1:11 pm | प्रमोद देर्देकर

@अजयातै :- नाही साकवावर भुत नाही. खरं तर वडिलांच्या गावात कुठेच अशी वावगी जागा नाही. पण आईच्या गावात अशा काही जागा आहेत.
मी तर या मे-२०१३ मध्ये तिथेच कित्येक वेळा गेलो होतो. आमचे लाकुड कापण्याचे काम चालले होते. शिवाय या पर्‍याच्या पुढच्या डोंगर उतारावर आमची आंब्याची कलमे आहेत. तिथे राखाणासाठी जावे लागते.

धन्स

मग ठीक आहे.

कारण कोंकणाचे वर्णन आणि भूते नाहीत, असे कसे काय होईल.

जमल्यास एक १०/१२ भूतांच्या गजाली पण येव्वु देत.

बरेच दिवस झाले अशा गजाली ऐकून आणि वाचून.

सानिकास्वप्निल's picture

27 Feb 2014 - 2:47 pm | सानिकास्वप्निल

वर्णन आवडले.
पुलेशु

कुसुमावती's picture

27 Feb 2014 - 3:50 pm | कुसुमावती

माझ आजोळ देखील कोकणातलच. गावातलं शेवटचं घर. त्यामुळे नदी अगदी जवळ. पूर्ण दुपारभर नदीच्या काठी, तापटण्यात (फणस, सुपारी, आंब्यच्या बागा) हिंडायचं, गोठ्यात वासरु असेल तर त्याच्याशी खेळायच, लाजाळूच्या पानांना मुद्दामून हात लावायचा, नावाडी नाव किनार्‍याला लागली की हाळी द्यायचा त्याची नक्कल करायची, पत्ते कुटायचे असे उद्योग चालायचे. बाकी झोपळा आणि कुणाची जीभ पान खाउन जास्ती लाल झालीये हे पाहणं वगैरे सेमचं.

पुभाप्र.

अनन्न्या's picture

27 Feb 2014 - 4:20 pm | अनन्न्या

अगदी लहानपणीच्या सगळ्या गोष्टींचेच वर्णन वाटले. ते पोफळीच्या बागेत पत्ते खेळणे, रानोमाळ भटकणे आणि रात्री अंगणात झोपताना वर मोकळे आकाश , भयाण शांतता ...भुताच्या गोष्टी! असे पटकन डोळे मिटायचे की परत उघडायची हिंम्मतच व्हायची नाही. उन्हाळ्यातला मेवा मात्र आधी मुंबईत पाठवायचा आणि मग आपण खायचा.
मी लहानपणी नेहमी आमटीतच कोवळे काजूगर खाल्लेत, चांगल्या जून बिया कोरून वाळवायच्या आणि मुंबईत पाहुण्यांना पाठवायच्या, हाताला फापरं पडायची आमच्या! आंबे पण तसेच, आडीतले आंबे मुंबईला, गाळ्साळ आम्हाला घरात खायला!
पण तेव्हा ते पाठवायला आवडायचं कारण त्याच्या बदल्यात फरसाण, माहिम हलवा, बोर्नव्हिटा असा मस्त मस्त खाऊ यायचा तिकडून! बोर्नव्हिटा घालून दूध पिणं म्हणजे कपाला राहिलेला थेंब सुध्दा चाटून साफ करायचा. तेव्हा लहान मुलांना चहा कधीच मिळायचा नाही, दूध असेल तेव्हा भरपूर दूध प्या नाहीतर एकदम मऊभात खा.
तुमचा लेख आणि माझा प्रतिसादच जास्त मोठा होतोय!

अनन्न्या तुझा प्रतिसाद पण आवडला ! तू स्वतंत्र लिहिपर्यंत तुझे कोकण प्रतिसादातून तरी येऊ देत!

यशोधरा's picture

28 Feb 2014 - 7:19 am | यशोधरा

असेच म्हणते.

अनिरुद्ध प's picture

27 Feb 2014 - 8:47 pm | अनिरुद्ध प

मस्तच पु भा प्र

रम्य ते बालपण आणि ते सुट्टीत कोकणात घालवलेलं !तुमच्या बरोबर आम्हीही रमलो .छान लेखन .
ओली सुपारी खातांना कधीकधी लहानमुलांना तोठरा बसतो म्हणून त्यापासून दूर राहायचे .

आता लोक जमिनी घेतात आणि छानसा मॉडर्न बंगला आणि शोभेची झाडं लावतात .आंबे ,नारळ(माड) मात्र असतात .त्यांच्या खाजगी जागेत काय लावायचं हा त्यांचा अधिकार असला तरी त्यांना सुचवायला हवे की जांभूळ ,रिठा ,अंजन ,भोकर ,उंबर ,अळू यापैकी एकतरी लावा .ही गोष्ट सातबाराचे नाव बदलतांना त्यांना सांगता येईल .हळूहळू रस्त्याकडच्या जमिनी विकल्या जाताहेत आणि कोकणपण हरवत चाललंय .

बाकी तुम्ही असेच लिहा .भुते येउद्यात घाबरत नाही .

हळूहळू रस्त्याकडच्या जमिनी विकल्या जाताहेत आणि कोकणपण हरवत चाललंय >> खरं आहे.

यशोधरा's picture

28 Feb 2014 - 7:20 am | यशोधरा

वाचते आहे लेखमालिका.

सुरेख लिहिताय देर्देकर साहेब.

प्रमोद देर्देकर's picture

28 Feb 2014 - 10:15 am | प्रमोद देर्देकर

आली आली वल्ली साहेबांची टिपण्णी आली आम्ही धन्य जाहलो.
@ मुक्त विहारि:- ओ मु.विं. नो घाई कित्याक करतांव वाईच कळ काढा कि, त्येका मी आमंत्रण दिलंय ते नक्की येतलंय.

@ अनिरुद्ध प ,सानिकास्वप्निल,यशोधरातै, अजयातै  :- धन्यवाद,

@ कुसुमावतीतै अनन्न्यातै:- तुम्ही सुद्धा लिहा की आपल्या कोकणा विषयी, या लाल मातीचा मृदगंध दरवळू दे मी. पा वर , अनन्यातै तुम्हाला व्य.नि केला होता. ती साईट पाहिलीत की नाही?

कंजूस साहेबः- ओली सुपारी खातांना कधीकधी लहानमुलांना तोठरा बसतो म्हणून त्यापासून दूर राहायचे . होय, होतं असं कधी कधी त्याला आम्ही सुपारी अंगावर येणे म्हणतो.छाती जाम होते , श्वास घेता येत नाही. पण पाणी प्यायलो की झालं, पण त्यापेक्षा वाईट म्हणजे सुपारीचा खंड गिळताना त्याची टोकधार बाजु कधी कधी गळ्यात टुपते, त्यातुन ढसका जाम लागतो.

धन्स

भूतांना नक्की घेवून या.

अनन्न्या's picture

28 Feb 2014 - 4:30 pm | अनन्न्या

पाहिली मी साईट!

सौंदाळा's picture

28 Feb 2014 - 3:08 pm | सौंदाळा

सही. आधीच्या दोन्ही भागांपेक्षा आठवला.
आम्हीसुध्दा सुट्टीत कोकणात (लांज्याला) जायचो.
सकाळी निवांत उठायचो आणि चहा-खारी खाऊन मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या झाडांवरच्या कैर्या पाडायचो, काजूच्या झाडावर चढुन काजुची बोंडे खुडुन आणि मीठ लावुन खायचो.
काकांबरोबर बाजारात चक्कर मारुन मासे खरेदी करुन दुपारी मस्त ताव मारायचो, त्यातही शहरात न मिळणारी कालवे, मोठे शिंपले मिळाले की जेवण दुप्पट जायचे. शाकाहारी जेवणात चैन म्हणजे फणसाची गर्या-गोट्याची भाजी, ओल्या काजुची उसळ, मुगाचे कर्मणे, वांग्याची कापे, कधी कधी सकाळी केलेले गोड, तिखट धोंडस. दुपारी ताणुन द्यायचो. संध्याकाळी राजापुर रोड्ला थोडे पुढे जावुन जंगलातुन काकांसाठी गुळवेल आणायचो, गुंजा गोळा करायचो, लाजाळुला लाजवायचो, करवंद खायचो. असे करत अंधार पडायला घरी यायचो.
संध्याकाळी काका बर्याचदा रुपये-सुट्टे पैसे, पाढे, डझन वगैरेची तोंडी गणिते घालायचे.
रात्री जेवायच्या आधी काका स्वामी स्वरुपानंदांचा जप करीत. जेवण झाले की पत्त्यांचा डाव ३०४ किंवा ५/३/२, चॅलेंज (२ कॅट घेऊन), बदाम सात, गुलाम चोर खेळुन मोठ्या दादाजवळ झोपायला आमची भांडणे लागायची. तो आमचा रोलमॉडेल :)
कधीमधी पावसला, रत्नागिरीला भाट्याच्या बीचवर चक्कर व्हायची.
शहरातुन पाहुणे आलेत समजल्यावर आजुबाजुचे ओळखीचे लोक आंबे, फणस पाठवुन द्यायचे. परत घरी जाताना पाय निघायचा नाही.
तुमचा लेख वाचुन सगळे आठवले.
पुभाप्र

सौंदाळा's picture

28 Feb 2014 - 3:09 pm | सौंदाळा

दोन्ही भागांपेक्षा आवडला.

असे वाचावे

प्रमोद देर्देकर's picture

28 Feb 2014 - 3:16 pm | प्रमोद देर्देकर

@ सौंदाळा :- माझ्या गावासारखेच तुम्ही ही आपल्या गावच्या आठवणीत रमलाय की राव ! मग पडू दे जिलब्या , होवु दे खर्च. लिहा लिहा तुम्ही पण लिहा म्हणजे मला पण सोबत होईल.

हा भाग पण मस्त झाला आहे... वाक्यावाक्याला गावी केलेली धमाल आठवतेय...

मस्त... पु.भा.प्र.

आंबट चिंच's picture

3 Mar 2014 - 12:47 pm | आंबट चिंच

हा भाग पण मस्त झाला आहे.>>
हेच म्हणतो. यावेळी फोटोही छान आलेत.
पु.भा.प्र.

स्पा's picture

3 Mar 2014 - 12:49 pm | स्पा

सुंदर लिहिलंय

फोटो मात्र जरा अजून चांगले असते तर सोने पे सुहागा वाटले असते

मदनबाण's picture

3 Mar 2014 - 12:53 pm | मदनबाण

वाचतोय...
पिकलेला काजु खाल्ला होता... ते आठवले.

बेस झाले सांगितले ते ! काय तो सोक्ष मोक्ष लागला ! नक्की खाऊ आता ओल्या सुपार्या कोकणात आल्यावर !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Mar 2014 - 3:38 am | निनाद मुक्काम प...

हाही भाग आवडला

कोकणी पुणेकर's picture

4 Mar 2014 - 2:13 pm | कोकणी पुणेकर

या खाडीवरच पुढे (चिपळुणकडे) माझे गाव 'पन्हाळजे' आहता. मी एकदाच केलेला दाभोळ ते गाव असा खाडीप्रवास अविस्मरणिय होता.

प्रमोद देर्देकर's picture

4 Mar 2014 - 3:00 pm | प्रमोद देर्देकर

स्पा, मदनबा,आंबट चिन्च , शिद, निनाद, धन्स्य सर्वांना.

@ कोकणी पु.:-
पन्हाळजे म्हणता ते पन्हाळेकाजी मला वाटते. भडवळंच्या आधी पण दापोली तालुक्यात आले ते.
तिथे आत्ता नुकत्याच लेणी सापडल्यात तेच ना .

जयदिप नाईक's picture

15 Mar 2014 - 2:43 pm | जयदिप नाईक

अति सुन्दर

पाषाणभेद's picture

16 Mar 2014 - 5:46 am | पाषाणभेद

फारच छान लेखमालिका.

खूप छान. इतका तपशील तुम्हांला अजून आठवतो हे देखिल कौतुकास्पद.