"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
प्रतिक्रिया
21 Jan 2014 - 8:05 am | बंडा मामा
बाप रे! काय घोर पाप केले त्यांनी. प्रत्यक्ष जनतेलाच विचारावे? कहरच झाला हा. एकदा निवडणुका संपल्या की नेत्यांनी पुढची पाच वर्षे जनतेला तोंडही दाखवायचे नसते. आमच्या रक्तात हे इतके भिनले आहे की कुणीतरी वेगळे केलेले आम्हाला सहनच होत नाही.
21 Jan 2014 - 10:16 am | संजय क्षीरसागर
इक्झॅक्टली!
क्या बात है!
एखाद्या व्यक्तीबद्दल :
"एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू असे माझे आधीच असलेले मत ही मुलाखत पाहून दृढ झाले." असे उद्गार केवळ ती व्यक्ती इथली सदस्य नाही म्हणून प्रकाशित होऊ शकतात? का असा प्रश्न पडतो.
21 Jan 2014 - 1:50 pm | माहितगार
21 Jan 2014 - 5:56 pm | llपुण्याचे पेशवेll
पाठींबा देण्यापूर्वी किमान सामायिक कार्यक्रमाबाबत सहमती होणे आवश्यक होते. ती न झाल्यामुळे हे प्रकार होत आहेत. एकंदर 'बिन फेरे हम तेरे' अशातला प्रकार झाला. आम आणि कोन्ग्रेस यांचा एकाच सहमतीचा मुद्दा होता. तो म्हणजे बी जे पी ला सत्तेपासून दूर ठेवणे. त्यामुळे हे पुढचे प्रकार अनपेक्षित नाहीत.
21 Jan 2014 - 7:30 pm | वेताळ
कजरी आता फक्त दिल्ली पोलिसांना बंडखोरी करुन त्यांच्यात सामिल व्हायला सांगत आहे.
भाउ उद्या हाच कजरी जर सैनिकाना बंडखोरी करायला सांगायला लागला तरी तुम्हाला ते सामान्य कृत्य वाटणार काय?
अहो आपण काय करतो काय बोलतो हे अजुन त्याला कळत नाही तो लोकांचे काय भले करणार?
21 Jan 2014 - 7:58 pm | वेताळ
आता परत दुसरा ड्रामा लिहावा लागणार.
21 Jan 2014 - 8:21 pm | विकास
अहो ड्रामा तोच चालू आहे, :) अंक संपला अथवा गोष्टी इतक्या झपाट्याने (बि)घडत आहेत की प्रवेश संपला असेच म्हणावेसे वाटते... आणि हो, ड्रामा पेक्षा नौटंकी हा जास्त योग्य शब्द आहे.
काल या ड्रामामुळे दुर्लक्षित झालेली एक बातमी आता लेटेस्ट: AAP's Kumar Vishwas accused of racist joke on Kerala nurses अफ्रिकन (युगांडाच्या) बायकांवरून बोलून झाले, आता केरळमधील नर्सेस बद्दल एक राजकीय पुढारी आणि प्राध्यापक बोलतोय: In a YouTube video clip, Mr Vishwas is heard saying, "Earlier nurses used to come from Kerala, kali-peeli (dark skinned), one would naturally feel like calling them sister."
21 Jan 2014 - 8:26 pm | पैसा
या मंडळींना कसं बोलायचं हे तरी कोणी शिकवायला हवं. सोमनाथ भारती यांची कालची मुक्ताफळे ऐका.
21 Jan 2014 - 8:43 pm | चिरोटा
जरा दमान घ्या सर्वांनी. अशा प्रकारची 'रोखठोक्','परखड' भाषा बोलणारे राजकारणी,सम्राट आपण पचवले आहेत.केंद्रात सरकार स्थापनेसाठी त्यांचा आधारही घेतला आहे.वरील विधानाचे समर्थन करण्याचा उद्देश नाही.पण ईतके हाय्पर होण्याचीही गरज नसावी.
21 Jan 2014 - 9:41 pm | माहितगार
I want to spit at the faces of ....leader .... and ..... to tell them to mend their ways
यात ओक ओक आहे रोखठोक किंवा परखड या शब्दात अंशतःतरी काही समर्थनीय असाव कि नाही ? :)
चला स्पिट पर्यंत माफ केल I warn you, the public is going to hound you and beat you. हे मंत्री नसलेल्यानी म्हणण मंत्री असलेल्यानी म्हणण आणि त्यातही कायदा मंत्री असलेल्यानी म्हणण आणि तेही कायद्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तीनी म्हणण काही फरक आहे का नाही ?
आपच्याच दुसर्या एका मंत्र्याच वाक्य आल आहे त्यातील दोष भावनेच्या भरात लक्षात येणार नाही "Delhi Education Minister: "You are asking for lawful protests over a young girl being burnt, wait till your daughter is burnt (he tells Ashok Malik on NDTV's show The Buck Stops Here)" दोष लक्षात येण्याकरता protests च्या ठिकाणी बिहेवीअर शब्द ठेऊन पहा म्हणजे एकाने कायदा हातात घेतला म्हणून दुसर्याने कायदा हातात घेण्याच समर्थन ? अशाने सगळ्या दंगलींच न थांबणार समर्थन होईल ना ? किमान मंत्री झाल्यावर काय बोलतो आहोत याची अधिक काळजी घ्यावयास हवी.
संदर्भ १
संदर्भ २
21 Jan 2014 - 10:20 pm | हुप्प्या
१. कुमार विश्वास हे कधी बोलला? काल परवा की दहा वर्षांपूर्वी? माझ्या मते अनेक वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हा ते उकरुन काढायची गरज नाही.
२. त्यावेळेस तो एक कॉमेडियन म्हणून बोलत होता. नेता म्हणून नाही. कॉमेडियन बर्याचदा पाचकळ, अतीरंजित, अतिरेकी विनोद करतात. त्यावरून त्यांची मनोवृत्ती ठरवणे आततायीपणाचे आहे. अशा प्रकारचा विनोद हा हसवण्यापुरताच असतो. त्यात फार खोल अर्थबिर्थ नसतो. फारतर हा एक फालतू विनोद होता इतकेच म्हणू शकतो. त्यावरुन कुमार विश्वासचा केरळी लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोनच वाईट असा निष्कर्ष काढणे चूक.
३. आता आपण एका पक्षाचे वरिष्ठ नेता आहोत. आता आपण असे विनोद करणे अनुचित आहे. असे समजण्याइतका विवेक ह्या माणसाकडे आहे की नाही? माझ्या मते आहे.
तेव्हा जुन्या गोष्टी उकरुन त्याची सनसनाटी बातमी बनवणे बंद करावे. आज नेता बनल्यावर तो काय बोलतो ते जरूर तोलून मापून बघावे.
22 Jan 2014 - 1:23 am | विकास
आत्ता अधिक बातमी शोधली तेंव्हा लक्षात आले की कुमार विश्वास यांचे ते बोलणे २००८ चे आहे. त्याच बरोबर ते (भाविक) हिंदू , मुस्लीम यांना देखील दुखावण्यासारखे बोललेले आहेत असे बाहेर आले आहे. त्यासंदर्भात अंशतः आपल्याशी सहमत आहे की, ते "तेव्हा ते उकरुन काढायची गरज नाही." अर्थात राजकारणात हे नेहमीच सर्वत्र होते. तेच कोणीतरी करत आहे. त्यांचे सगळे पॉलीटीकली इनकरेक्ट बोलणे युट्यूबरून काढून टाकण्यात आले होते. पण अर्थातच ते कोणीतरी "योग्य वेळेसाठी" जपून ठेवले होते. आता त्यांच्यावर खटले देखील भरले गेले आहेत. अमेरीकेतल्या कॉमेडीअनने कोणाविरोधातही कसाही विनोद केला तरी तो इथल्या कायदा आणि संस्कृतीप्रमाणे चालू शकतो. पण भारतात तसे शक्य नाही हे त्यांना माहीत असायला हवे नाही का?
आता आपण एका पक्षाचे वरिष्ठ नेता आहोत. आता आपण असे विनोद करणे अनुचित आहे. असे समजण्याइतका विवेक ह्या माणसाकडे आहे की नाही? माझ्या मते आहे.
सहमत. असावा असे वाटते तरी.
21 Jan 2014 - 8:23 pm | चेतन
विकास माझा एक प्रश्न आहे - एका ठिकाणी चोरी होत आहे (किंवा बलात्कार) आणि समजा पोलिसांना त्याची कोणी सुचना दिली, तर पोलीस वॉरंट काढत बसणार, पुरावे मागणार का अॅक्शन घेणार?
21 Jan 2014 - 9:31 pm | चिगो
चेतनजी, दखलपात्र आणि अदखलपात्र असे दोन प्रकारचे गुन्हे असतात कायद्याप्रमाणे.. त्यातल्या दखलपात्र गुन्ह्यात पोलिस वॉरंटशिवाय अटक करु शकते, पण अश्या अटक केलेल्या व्यक्तीला २४ तासांच्या आत न्यायाधीशासमोर न्यावे लागते पुढील कार्यवाहीसाठी (सुट्टीचा दिवस असला तरी..) अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना आधी वॉरंट घ्यावे लागते अटक करण्यासाठी. आणि अटक म्हणजे बेड्या घालतातच असेही नाही. त्यातही रुल्स आहेत.
दिल्लीच्या कायदेमंत्र्याला हे आणि बाकीचे कायदे माहीत नसतील (वकील असूनही) तर वाईट आहे. आणि माहीत असूनही "जानता नहीं मैं कौन हूं" असा अॅटीट्यूड असेल तर आणखीच वाईट आहे.. आणि त्यांचा प्रचंड विजय, ज्याचे बील त्यांनी दिल्लीच्या जनतेवर फाडलंय, त्याकरीता त्यांचे "खास" अभिनंदन..
22 Jan 2014 - 12:42 am | काळा पहाड
मला एक कळत नाही. इथे लोक कायदा, सुव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे वर्तन वगैरे बद्दल बोलत आहेत. पण राजकारण्यांची (प्रचलीत) इमेज काय आहे? दिसला की कापा असे वाटण्यापर्यंत पाळी आली आहे. विषारी प्राण्यांना भूतदया वगैरे दाखवून फायदा नसतो. वहाणेने ठेचून मारणे हाच उपाय. एक लक्षात घ्या की "आप" ही ती वहाण आहे. एकदा या राजकारण्यांना, नोकरदारांना ठेचलं की "आप" ला रजा द्यायला सुद्धा हरकत नाही.
22 Jan 2014 - 1:12 am | विकास
आप वहाण नाही, तर जनतेला अक्कल गहाण ठेवायला लावून जनतेचीच वहाण करणारी कणिकनिती आहे.
22 Jan 2014 - 1:10 am | विकास
मगाशी भला मोठा मजकूर लिहीला आणि प्रकाशीत करताना एरर येऊन नाहीसा झाला. :( लकीली थोडासा जीमेल मध्ये सेव्ह केला असल्याने येथे देत आहे. अजून उत्तरे लवकरच देईन...
-----
सर्वप्रथम आपण सर्वांनी या चर्चेत सक्रीय भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक चर्चेसंदर्भातील प्रतिसादात उत्तर देण्याऐवजी सगळ्यांना सामायीक उत्तर देत आहे. इतक्या लवकर आपवर चर्चा कशाला हा प्रश्न काही जणांनी विचारला होता. त्याला चर्चाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणेच परत म्हणेन की अशी इच्छा नव्हती. पण गेल्या दोन दिवसात केवळ दिल्लीच नाहीतर एका अर्थाने देशास ओलीस ठेवणार्या मग्रुरीवर चर्चा घडली पाहीजे असे नक्की वाटले म्हणून चालू केली. आधीच्या काही चर्चा-लेखात वाचले तर लक्षात येईल की आप हा राजकीय पक्ष म्हणून तयार होत आहे हे मला देखील आवडले होते. जे इतर कुठल्याही विकसीत लोकशाही देशात दिसू शकत नाही ते भारतात परत एकदा झालेले दिसले होते. प्रस्थापित पक्षांना पण स्वतःच्या ध्येयधोरणांचा फेरविचार करायला लावण्याची ताकद आपच्या यशामुळे आली आणि हे जनतेसाठी चांगलेच झाले... पण त्याच बरोबर त्यांनी आता सत्ताधारी म्हणून वागणे गरजेचे होते असे आजही वाटते. आणि तेथे ते नुसते चुकतच गेले नाहीत तर खाप पंचायतीतल्या गावगुंडाचे समर्थन करण्यासारखे स्वत:च्या मंत्र्यांच्या त्यातही विशेष करून कायदेमंत्र्यांच्या बेताल वागण्यासंदर्भात त्यांचे समर्थन करणे गंभीर आहे...
आता वर आलेल्या प्रतिसादांसदर्भात...
सर्वप्रथम जर घटना सांभाळायची जबाबदारी दिलेल्या नेतृत्वानेच घटना पाळली नाही तरी चालेल असे तुम्हाला वाटत असेल आणि झुंडशाही म्हणजेच लोकशाही असे वाटत असेल तर खालचे वाचण्याची गरज देखील नाही. अॅग्री टू डीसअॅग्री म्हणूयात. पण लोकशाहीत स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी पण असते असे वाटत असेल तर चर्चा करूयात.
चष्मा, भाजपा, काँग्रेस यांच्या बाजूने वगैरे...
वास्तवीक त्याचा येथे काही संबंध नाही. निवडणुकांच्या संदर्भात, येथे आणि इतरत्र अनेकदा मी इतकेच सांगत आलो आहे की सर्वांनी शक्यतोवर मतदानाचा हक्क पाळावा. आता जर कोणी बाहेरगावी असले तर वेगळे. कुणाला मते द्या हे मी सांगण्याच्या भानगडीत पडत नाही (आणि कोणी ऐकण्याच्या पडेल असे वाटतही नाही. :) ) तुम्हाला भाजपा-काँग्रेसवर चर्चा करायची असली तर चालू करा धागे. करूयात चर्चा. माझ्या दृष्टीने हा सगळा तमाशा देशासाठी धोक्याची पातळी गाठू लागला आहे.
म्हणूनच सद्यस्थितीत संदर्भात काँग्रेस, भाजपा कसे आणि किती भ्रष्ट आहेत, पोलीस काय करताहेत वगैरे पेक्षा तुम्ही ज्या घटनेची शपथ घेऊन घटनेचे पालक आणि रक्षक झाला आहात ती पाळत आहात का हा मुद्दा आहे. त्या मर्यादेत जर काम न करता नुसतीच नौटंकीबाजी करायची असेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि दुर्दैवाने आप कडून तेच सारखे चालले आहे.
मुद्दा २: सोमनाथ भारतींचे वर्तन
वास्तवीक हा सर्व तमाशा केजरीवाल यांनी प्रथमदर्शनी सोमनाथ भारतींवरचे लक्ष उडवण्यासाठी आणि तसेच सत्तेतून इतरांना नावे ठेवत लांब जाण्यासाठी (याबाबत अधिक खाली नंतर आले आहे) केला असे वाटण्यासारखीच परीस्थिती आहे. साधारणपणे आठवड्यापूर्वी भारतींना evidence tampering केले म्हणून कोर्टाने ताशेर मारले. तो आरोप आहे का नाही यावरून ते आणि केजरीवाल वाद घालत होते. पण कोर्टाने त्यांच्या अशीलाचे बँकेतल्या अफरातफरी संदर्भातले जामीनपत्र रद्द केले आहे. त्यावरून केजरीवालांचा लढा सुरू झाला. आता दिल्लीच्या बार कौन्सिलने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या सर्वातून बाहेर येण्यासाठी त्यांनी मध्यरात्रीची धाड घातली आणि काही युगांडामधून आलेल्या महीलांना जबरदस्तीने अटक करून पुढचा तमाशा केला. त्यात भर म्हणून नंतर जेटली आणि साळवेंच्या तोंडावर थुंकण्याची तसेच पब्लीकचा मार खातील अशी आपल्या पाठीराख्यांना हिंसेसाठी चेतवण्याची भाषा त्यांनी केली. त्यात भरीस भर म्हणून नंतर २४x७ उघडे असणार्या एका दुकानावर मध्यरात्रीनंतर धाड घातली. त्यानंतर या घेरावाच्या वेळेस महीलांच्या स्वच्छतागृहात गेले... चालूच आहे. पण केजरीवाल यांना त्यांच्या विरोधात काही करता येत नाही असेच दिसत आहे.
त्या व्यतिरीक्त युगांडा हायकमिशनने पत्र दिल्याचे खोटे बोलले गेले ते अजून एक लफडे स्वतः केजरीवाल यांनी नेहमीच्या आक्रस्ताळी स्टाईलमध्ये केले आहे.
पोलीसांचे वर्तन आणि त्यांच्यावरील अधिकार (ज्युरीसडिक्शन)
पोलीसांमधे भ्रष्टाचार आहे का? नक्कीच असेल पण म्हणून प्रत्येक पोलीसाला पुराव्याशिवाय भ्रष्टाचारी म्हणत त्यांनी मंत्र्यानी दिलेल्या ऑर्डर्स स्विकारत काम करा म्हणणे योग्य आहे का? आणि हे देखील एका वकीलीत असलेल्या आणि घटनेची शपथ घेऊन लोकप्रतिनिधी + कायदेमंत्री झालेल्या माणसाकडून होणे योग्य आहे का? आणि अशा माणसाला पाठीशी घालणारे नेतृत्व कसे आहे? आता प्रश्न पडतो की इतर काय चांगले आहेत म्हणून त्यांनी इतके केले तर काय बिघडले? हे म्हणजे बाळासाहेबांनी, "त्यांनी चाळीस वर्षे खाल्ले म्हणून आम्ही चार वर्षे खाल्ले म्हणून काय बिघडले" असे म्हणण्यासारखे आणि त्याचे समर्थन करण्यासारखेच झाले. बरं देशात अथवा दिल्लीत काय केवळ पोलीसच भ्रष्ट आहेत का? केजरीवाल ज्या रिक्षेवाल्यांचे-टॅक्सिवाल्यांचे समर्थन करतात ते काय पब्लीकला कमी फसवतात? मग काय त्यांना पण केजरीवालांच्या अधिपत्याखाली आणायचे? नवीन "रिक्षा-टॅक्सी मंत्रालय" काढून?
दुसरा प्रश्न पोलीस कुणाच्या अधिकाराखाली असावेत हा. त्या संदर्भात आप, काँग्रेस आणि भाजपा ह्या सगळ्याच पक्षांचे एकमत आहे की ते दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली असावेत. मग आधी राज्याचे (पक्षाचे नाही) नेता म्हणून सर्वपक्षिय बैठक बोलावून त्यावर सगळ्यांची सहमती घेणे योग्य ठरले नसते का? पण तसे केले असते तर त्यांना वाटते की प्रसिद्धी कमी झाली असती... अशी प्रसिद्धी कमी झाली असती पण नेतृत्व म्हणून चांगली प्रसिद्धी मिळू शकली असती. असो.
केजरीवाल
येथे अनेकांना ह्या महाशयांच्या संदर्भात, "प्रामाणिक, निर्भय आणि तत्वांना धरुन"; "कसलाही आवेश किंवा अस्मितांना हात वगैरे त्यात नसते. बर्याच लोकांच्या तारा त्यामुळे जुळून येतात"; असे काही वाटते... वास्तवीक जगातल्या कुठल्याही राजकारण्यासंदर्भात असे कुणालाही वाटत असेल तर ठीक आहे. ज्यांची त्यांची मते म्हणून सोडून देणे इष्ट आहे. पण मला तसे कुणाबद्दलच वाटत नाही. या चर्चेसंदर्भात, केजरीवाल यांच्याबाबतीत का वाटत नाही याचे कारण थोडक्यातः जे काही बोलतात ते पुर्ण नाटकी असते. खाली पहा:
आधी म्हणाले की निवडणूका लढवणार नाही आणि कधीच कुठले पद घेणार नाहीत... मग निवडणूका लढवायचे ठरवले. त्यानंतर म्हणाले की (मुलांची शपथ घेऊन) काँग्रेस-भाजपाकडून पाठींबा घेणार नाही - देणार नाही. मग म्हणाले की जनतेने सांगितले म्हणून... मग म्हणाले लोकसभा निवडणूक लढवणार नाही, पण आता म्हणतात की पार्टीसदस्य म्हणतात म्हणून लढवेन... हे एक उदाहरण आहे.
एकूण प्रामाणिकपणा आणि तत्वांना निर्भयपणे तिलांजली देणे चालूच आहे. असे माझे मत आहे.
रेल्वेमंत्रालयाजवळील तमाशा आणि अराजकता (अॅनार्की)
पक्ष कार्यकर्त्यांनी आंदोलन करणे समजू शकते पण जेंव्हा मुख्यमंत्रीच असे स्वतःच्या पक्षाच्या टोपी घालून करतो तेंव्हा तो केवळ त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री ठरतो राज्याचा नाही. त्याव्यतिरीक्त प्रजासत्ताक दिन पण आम्ही होऊ देणार नाही असली अथवा तत्सम भाषा करणे हे काही लोकशाही राज्याच्या नेतृत्वाचे लक्षण नाही. तुम्ही म्हणाल असे इतरही अनेक आहेत आणि ते मान्यच आहेत. पण मग यांच्यात वेगळे असे काय राहीले? इतर ठिकाणी अडाणी चोर असतील तर येथे आय आय टी मधले चोर आहेत, इतकेच.
22 Jan 2014 - 1:28 am | विकास
पक्ष कार्यकर्त्यांनी आंदोलन करणे समजू शकते पण जेंव्हा मुख्यमंत्रीच असे स्वतःच्या पक्षाच्या टोपी घालून करतो तेंव्हा तो केवळ त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री ठरतो राज्याचा नाही. त्याव्यतिरीक्त प्रजासत्ताक दिन पण आम्ही होऊ देणार नाही असली अथवा तत्सम भाषा करणे हे काही लोकशाही राज्याच्या नेतृत्वाचे लक्षण नाही. तुम्ही म्हणाल असे इतरही अनेक आहेत आणि ते मान्यच आहेत. पण मग यांच्यात वेगळे असे काय राहीले? इतर ठिकाणी अडाणी चोर असतील तर येथे आय आय टी मधले चोर आहेत, इतकेच.
आता आंदोलन सुदैवाने संपले कारण त्यांना सन्मान्यपद्धतीने माघार घेण्यास केंद्राने / काँग्रेसने संधी दिली. त्यातून नक्की काय घडले?
थोडक्यात भारतीय राजकारणात एक विचित्र खेळी खेळली गेली आहे... ज्यात बहुमत नसलेल्या सत्ताधिशांना सत्तेतून बाहेर पडायचे आहे पण त्यांचे विरोधक बाहेरच पडू देत नाहीत. आणि एक आंदोलनाशिवाय बाकी काही करण्याची सवय नसलेल्या या नेतृत्वाची लोकप्रियता पण धोक्यात येऊ लागली आहे आणि पुढच्या महत्वाकांक्षा देखील गोत्यात जाऊ लागल्या आहेत... मराठीत म्हणतात ना, "गाढव ही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले!" तसेच काहीसे. असो.
22 Jan 2014 - 2:25 am | मराठीप्रेमी
तुमच्या या दोनही प्रतिसादांशी संपुर्णतः सहमत. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री या पदाची प्रतिष्ठा घालवली आहे.
22 Jan 2014 - 11:15 am | आनन्दा
मी देखील ९०% सहमत.
22 Jan 2014 - 3:12 am | अर्धवटराव
आआपचा सक्सेस व लोकप्रीयता एखाद्या अभिनव किंवा नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारलेला नसुन तो सरळ सरळ प्रस्थापीतांच्या विरोधातला राग आहे. त्याला सकारत्मक वळण देताना आआप जर आंदोलनाच्याच मार्गाचा अवलंब करत असेल तर ते समजण्यासारखं आहे. अर्थात, हा काहि कायमस्वरूपी उपचार नाहि. अन्यथा आआपची गत राडा आणि खळ्ळखटॅकवाल्यांसारखी होईल. तसं होऊ नये अशी प्रार्थना मात्र आपण करु शकतो.
आपच्या गृहमंत्र्यांनी नौटंकी करण्याऐवजी कायद्याच्या कक्षेत लढा दिला असता तर तो जास्त प्रभावी असता हे मान्य. सुब्रमण्यम स्वामी असलच काहितरी करत असतो व त्याचे परिणाम देखील दृगोच्चर झाले आहेत (स्वामी अजुनही बर्याच भानगडी करत असतो... पण तो भाग अलहिदा). कदाचीत हे गृहमंत्री पहेले लाथ, फिर बात, फिर मुलाकात स्टाईलने काहि करायचा प्रयत्न करत असावेत. कोण जाणे. स्टिल वेट अॅण्ड वॉच.
आआप काँग्रेसचं पिल्लु असले काय किंवा नसले काय, पण आआपच्या संवर्धनात आपला राजकीय फायदा-तोटा प्रत्येक पर्टी शोधत असणार आणि ते स्वाभावीक आहे. आआपने देखील या राजकीय सोयींचा फायदा घेत असेल तर ते हि स्वाभावीक आहे.
तसं पाहिलं तर आआप हॅज डन इट्स जॉब. मध्यंतरी सगळ्या आयटी कंपन्यांना आय.एस.ओ वगैरे सर्टीफिकेशन घ्यायची सवय लागली होती. त्याची खरच गरज किती व त्या सर्टीफीशनला कंपनीच्या दैनंदीन व्यवहारात आणि चारित्र्यात स्थान किती याची काळजी फारशी कोणि करत नाहि हा भाग वेगळा. तद्वत सगळ्या राजकीय पक्षांना आता भ्रष्टाचार निर्मुलन सर्टीफिकेशन घेणं अनिवार्य होणार आहे. आणि त्याचं ऑडीटींग करायचा सहाजीक मक्ता आआपकडे जाईल. तरुण रक्ताचा भारत देश आता डीमांडींग मोड मधे आला आहे. हा रेटा राजकीय पक्षांना अंतर्मुख करायला भाग पाडेल.
आआप आणि केजरीवालांच्या ताकतीचं पुरेसं आकलन मला तरी अजुन झालेलं नाहि. केजरीवाल आणि मंडळी आज नैतिकता आणि क्षमता यांचं मानबिंदु बनायला बघत आहेत. पण असे मानबिंदु आपल्याला नविन नाहित. साबरमती आणि सेवाग्राम आश्रमाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्या-कार्यकर्त्यांची फळी बघितली तर रामराज्य अगदी २४ तासांच्या अंतरावर वाटायचं. पार्टी विथ डिफरन्सची धुरा श्यामाप्रसाद मुखर्जी व दिनदयाळ उपाध्याय प्रभृतींच्या खांद्यावर होती तेंव्हा मांगल्याची पहाट होण्याची सर्वांची खात्री होती. नैतीक भेद कितीही असले तरी कॉम्रेड्स काहि प्रमाणात तरी नक्की सामाजीक समता आणतील हे कुणालाहि पटायचं. जयप्रकाश नारायण आपल्या यादव मंडळींच्या भरोशावर देश बदलायची स्वप्न बघायचे.... या सगळ्या अवास्तवाचं आज वास्तव काय आहे आपण बघतोच आहोत.
आआप करता आज कदाचीत राजकारण म्हणजे युद्ध आहे. त्यामुळे सर्वस्व अर्पण करणे, प्रामाणिक प्रयत्न करणे, ध्येयासक्ती, बौद्धीक कुशलतेची परिसीमा गाठणे वगैरे सर्व गुण ते दाखवत आहेत. पण राजकारण हा एक खेळ देखील आहे. त्यात एक डाव उलटला तर दुसर्या डावाची संधी आहे. भिडुंची अगदी स्वाभावीक अशी अदलाबदली आहे. जिंकल्याचं पारितोषीक आहे. हारलेल्यांसाठी रजत पदक पण आहे. अगदी थंड डोक्याने आनंद घेण्यासाठी वातानुकुलीत गॅलरी आहे आणि दर पाच वर्षांनी जागतीक स्तरावरची कॉम्पीटीशन करायला लागणारी अगदी पहिल्या दिवसापासुनची तयारी देखील आहे. युद्धातला सगळा आक्रास्ताळपणे एकवार क्षम्य आहे. पण खेळात तसं करुन चालणार नाहि. या खेळात निपुण होणं व तरिही आपली नैतीकता व क्षमता अबाधीत ठेवणं हि खरी परिक्षा. सध्याचे राजकीय पक्ष तर अजुनही उन्हाळी-हिवाळी पेपर्सला रेग्युलरली उपस्थिती दाखवत आहेत. या परिक्षेत उत्तीर्ण होण्यात केजरीवालांचा खरा कस लागणार आहे.
22 Jan 2014 - 6:34 am | विकास
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अर्थातच काही भागाशी सहमत तर काहीशी :(
आआपचा सक्सेस व लोकप्रीयता एखाद्या अभिनव किंवा नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारलेला नसुन तो सरळ सरळ प्रस्थापीतांच्या विरोधातला राग आहे.
या संदर्भातील आपल्या म्हणण्यास ११०% सहमत. अशी लोकप्रियता जेंव्हा स्पायडरमॅनला मिळाली तेंव्हा त्याला सतत लक्षात ठेवावे लागले की, “With great power comes great responsibility” :) आज केजरीवाल नामक स्पायडरमॅन नुसताच उड्या मारत आहे आणि मिळालेल्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत आहे असे वाटते. ते होऊ नये असे देखील प्रामाणिकपणे वाटते. कारण एकदा का त्यातील फोलपणा जनतेला समजला तर कोणी आदर्शपणे काम करू शकेल यावरचा पब्लीकचा आणि त्यातही तरूण पिढीवरचा विश्वास उडेल, जो परत बसायला किमान एक-दोन पिढ्या जाव्या लागतील. आणि "त्या वाट बघण्यात भारताचे काय होऊ शकेल कोण जाणे!", असे म्हणावेसे वाटत नाही. असो.
सुब्रमण्यम स्वामी असलच काहितरी करत असतो व त्याचे परिणाम देखील दृगोच्चर झाले आहेत (स्वामी अजुनही बर्याच भानगडी करत असतो... पण तो भाग अलहिदा).
अगदी सहमत! पण सुब्रम्हण्यम स्वामींना केजरीवाल यांच्या इतकी पॉवर नाही हे ध्यानात असुंदेत. त्यामुळे ते फारतर सततच्या कॉन्स्पिरसी थिअरीमुळे विदुषक ठरू शकतात पण केजरीवालांसारखे अॅनार्कीस्ट ठरू शकत नाहीत. (हे अर्थातच स्वामींच्या डिफेन्समधे लिहीत नसून, फरक काय आहे हे सांगत आहे!)
त्यामुळे सर्वस्व अर्पण करणे, प्रामाणिक प्रयत्न करणे, ध्येयासक्ती, बौद्धीक कुशलतेची परिसीमा गाठणे वगैरे सर्व गुण ते दाखवत आहेत.
आपचे नेते यातील कुठल्याही गुणाने वागत आहेत असे वाटण्यासारखी परीस्थिती नाही. हे मी कुठेही cynicism मधे बोलत नाही याची खात्री असावी.
22 Jan 2014 - 6:14 am | विकास
एनडीटिव्हीवर चेतन भगतचा त्रागा बघण्यासारखा आहे.
22 Jan 2014 - 1:38 pm | बॅटमॅन
कोण चेतन भगत? चीप थर्डक्लास कादंबर्या लिहून मोठा झालेल्या या तथाकथित मूर्ख लेखकाला काडीमात्र अक्कल नाही. स्वतःला ज्यातलं शष्प कळत नाही त्यात बोंबा मारण्यात हा प्राणी आघाडीवर आहे. लोकही याला डोक्यावर घेतात हे महदाश्चर्य आहे.
26 Jan 2014 - 7:46 am | बंडा मामा
कोणी का असेना, सध्या केजरी विरुद्ध बोलतोयना त्याच्याशी मतलब. बाकी सगळे माफ त्याला.
26 Jan 2014 - 7:46 am | बंडा मामा
कोणी का असेना, सध्या केजरी विरुद्ध बोलतोयना? मग बाकी सगळे माफ त्याला.
22 Jan 2014 - 6:33 am | माहितगार
माझ्या माहिती प्रमाणे 'परिवर्तन हे आपच्या आधीच समाजसेवा संघटन' चु.भू.दे.घे. आपच्या पुर्वाश्रमीची 'परिवर्तन' म्हणून तरुणांची समाजसेवा संघटन बनवल गेल होत त्याच्या संभांमध्येही आम्ही राजकारणात सुद्धा येऊ शकतो हे सांगितल जातच होत म्हणजे त्या अर्थाने राजकारण करण्याचा उद्दिष्ट अचानकच नव्हे व्यवस्थीत तयारी करूनच होत. अर्थात भारतीय राजकारणालाही चांगल वळण देऊ शकणार्या विश्वासार्ह तिसर्या पर्यायाची आवश्यकता आहे नाही असे नाही.'परिवर्तन' च्या कार्यशैलीत जी रचनात्मकता दिसत होती ती जाऊन कुठेतरी झूंडशाहीच समर्थनतर होत नाही आहे.दिल्लीतील स्थानिक कारणांनी ते होत असेल तात्कालिक असेल अनुभवातून शिकतील वगैरे सर्व ठिक पण राष्ट्रीयपक्ष म्हणून अशा पद्धतीच्या कार्य शैलीने अधिमान्यता मिळण अशक्य नसल तरी कठीण असेल हा एक भाग झाला.
आंधळ समर्थन जगात कशाचही करू नये पण भारत देशाच्या ऐक्याच आणि सिमांच्या रक्षणाच समर्थन हे डोळसपणातूनच आलेल आहे हे लक्षात घेण्याची जरूरी आहे स्वातंत्र्य पुर्व इतिहासात एकीकृत केंद्रीय सत्तेच्या अभावाने परकीय आक्रमण भारतावर सतत होत राहिली मिळवलेल स्वातंत्र्य पुन्हा गमवायच नसेल तर भारताची एकात्मता कोणत्याही पातळीवर यापुढे टिकवली जाईल याच अॅक्रॉस इंडियन पॉलीटीकल थॉट एक सहमती होती आणि आहे. त्यामुळे कुणीतरी सोम्या गोम्या उठतो आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संबंधीत बाबतीत जनमत वगैरे घेण्याची गोष्ट करतो. राष्ट्रीय एकात्मता टिवल्या बावल्यांचा खेळ नाही.कोणत्याही राजकीय पक्षात कुणी टिवल्या बावल्या करेल त्याला पक्षातील नेतृत्वाने खड्यासारख बाजूला केलच पाहीजे. विशेषतः एक राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता हवी असेल तर राष्ट्रीय एकात्मते सारख्या महत्वपूर्ण गोष्टींवर सुस्पष्ट भूमिका हवी.
भारत एक अण्वस्त्र सज्ज देश आहे.अण्वस्त्र सज्ज देशास स्टेबल लोकशाहीची गरज असते. आम्ही अॅनार्कीस्ट आहोत झूंडशाही करतो आम्हाला सत्ता द्या असे कुणी म्हणत असेल तर अण्वस्त्र सज्ज देशाच्या नागरीकाने राष्ट्रीय राजकारणात आपण एक जबाबदार नागरीक या नात्याने वागणे अभिप्रेत असावे असे वाटते .
दिल्लीची विधानसभा त्रिशंकु राहिली तर राज्यपाल कारभार चालवू शकतात.उद्या केंद्रात त्रिशंकु स्थिती असेल तर राजकीय विरोधकांशी सुद्धा जमवून घ्यावे लागते नमते घ्यावे लागते आपली वक्तव्ये आणि भूमिका सहसा टोकाच्या असणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.किमान पक्षी इतर भारतातून 'आप'ला अधिक मॅच्यूअर्ड कार्यकर्ता राष्ट्रीयस्तरावर काम करण्यास मिळावा ही शुभेच्छा
22 Jan 2014 - 6:40 am | विकास
आपच्या पुर्वाश्रमीची 'परिवर्तन' म्हणून तरुणांची समाजसेवा संघटन बनवल गेल होत त्याच्या संभांमध्येही आम्ही राजकारणात सुद्धा येऊ शकतो हे सांगितल जातच होत म्हणजे त्या अर्थाने राजकारण करण्याचा उद्दिष्ट अचानकच नव्हे व्यवस्थीत तयारी करूनच होत.
या संदर्भात आणि त्यांच्या सतत टोप्या फिरवण्याबद्दल खालील छोटिशी चित्रफित अवश्य पहावी...
भारत एक अण्वस्त्र सज्ज देश आहे.अण्वस्त्र सज्ज देशास स्टेबल लोकशाहीची गरज असते. आम्ही अॅनार्कीस्ट आहोत झूंडशाही करतो आम्हाला सत्ता द्या असे कुणी म्हणत असेल तर अण्वस्त्र सज्ज देशाच्या नागरीकाने राष्ट्रीय राजकारणात आपण एक जबाबदार नागरीक या नात्याने वागणे अभिप्रेत असावे असे वाटते .
अतिशय महत्वाचा मुद्दा! धन्यवाद.
22 Jan 2014 - 10:49 am | वेताळ
रात्री ३ला परदेशी स्त्रीयांना वेश्याव्यवसाय करता म्हणुन पोलिस किंवा स्त्री पोलिसांची मदत न घेता अंगलट करणार्या भारतीला तुम्ही कसा काय पाठिंबा देता? देहविक्रय करते म्हणुन कुनीही त्या स्त्रींयाची झडती घेवु शकते काय? पोलिसांच्या मते हा एक बलात्काराचा प्रकार आहे जो भारतीने केला आहे. व त्याला वाचवण्यासाठी कजरी रस्त्यावर नाटक करित आहे.दुसरी एक मंत्री राखी बिडला.... हिच्या गाडीची काच लहान मुलाने बॉल मारुन फोडली त्यावेळी हिचे नाटक तुम्ही बघितले नाही काय? ४००० पोलिसाना पहार्यावर ठेवुन रस्त्यावर निवांत झोपणार कजरी काय लायकीचा आहे हे सर्व जगाने बघितले आहे.
22 Jan 2014 - 11:15 am | संजय क्षीरसागर
जर पोलिस अधिकारी भ्रष्ट नसते तर सरकारनं समेट केलाच नसता. त्यामुळे केजरीवालांच्या मागणीत तथ्य आहे. मागणी मान्य व्हावी यासाठी केलेलं आंदोलन काय दिशा घेईल याची पूर्वकल्पना कुणालाही येणं अशक्य होतं.
कुणी काहीही म्हणो पण न्याय्य मागणीसाठी रस्त्यावर रात्र काढणं याला जी हिंमत लागते ती अत्यंत दुर्मिळ. भर पावसात आणि कडाक्याच्या थंडीत हा माणूस निश्चयापासून जराही न ढळता राहू शकतो हे मनाच्या एकसंधतेचं द्योतक आहे. SHO सारख्या वरिष्ठ अधिकार्याला सक्तीच्या रजेवर धाडून त्याच्या विरुद्ध चवकशी चालू झाली हे आंदोलनाच सर्वात मोठं फलित आहे.
केजरीवाल जे करतायंत त्यात त्यांचा कुठलाही निहित स्वार्थ नाही पण व्यवस्थाच इतकी कमालीची भ्रष्ट आहे की त्याविरुद्ध लढण्यासाठी पराकोटीचा निश्चय, हिंमत आणि प्रयत्न लागणार आहे.
22 Jan 2014 - 12:48 pm | वेताळ
अहो काय बोलताय?४००० पोलिसवाले राखणीला होते रस्त्यावर बंदुका घेवुन.थंडीत कुडकुदत उभे होते. कजरी खालुन गादी व वरुन गादी घेवुन मस्त झोपला होता.दिल्ली सरकारने पाणि,सार्वजनिक संडास इ. सोय केली होती. कजरीला फक्त झोपायचे होते ते काम मात्र त्याने चोख केले.
22 Jan 2014 - 12:48 pm | वेताळ
अहो काय बोलताय?४००० पोलिसवाले राखणीला होते रस्त्यावर बंदुका घेवुन.थंडीत कुडकुदत उभे होते. कजरी खालुन गादी व वरुन गादी घेवुन मस्त झोपला होता.दिल्ली सरकारने पाणि,सार्वजनिक संडास इ. सोय केली होती. कजरीला फक्त झोपायचे होते ते काम मात्र त्याने चोख केले.
22 Jan 2014 - 2:04 pm | आनन्दा
संक्षी, प्लीझ..
22 Jan 2014 - 3:52 pm | संजय क्षीरसागर
आयला, यात प्लीज काय आहे?
तमाशा झाला तो सर्वांनी पाहिला. पण अरविंदच्या हेतूविषयी माझ्या मनात जराही शंका नाही. He wants to clean-up the corrupt system, that's all! हेतू शुद्ध असेल तर मार्गातल्या अडचणींनी माणसाची पारख कशी होईल? त्याला काँग्रेसनं सपोर्ट काढायची भीती नाही की स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. जर भ्रष्ट पोलिस यंत्रणेवर केंद्राचं नियंत्रण आहे तर व्यवस्था बदलायला आंदोलनाशिवाय काय करता येणार? आणि एक मुख्यमंत्री आंदोलन करतो म्हटल्यावर सरकारनं दखल तरी घेतली.
रामदेवबाबांची साधी मागणी होती `भारतीयांची परदेशातली अघोषित संपत्ती देशाची मालमत्ता म्हणून जाहीर करा'. इतक्या उघड गोष्टीला काय प्रॉब्लम होता? पण संपूर्ण आंदोलन उधळून सरकारनं इतक्या सचोटीच्या माणसाला मरणोन्मुख अवस्थेत नेलं. आता केवळ राजकीय पाठबळ नाही म्हणून ते मोदींच्या सहकार्यानं ती मागणी प्रत्यक्षात आणू पाहातायंत.
केजरीवालांकडे सत्ता आहे म्हणून किमान इतकं तरी घडू शकलं.
22 Jan 2014 - 4:18 pm | सुनील
एखाद्याची अघोषित मालमत्ता ऑपॉप देशाची कशी काय होते?
कर बुडवला असेल तर, कर+व्याज+दंड घेणे ठीक. पण सगळी मालमत्ता? काय संबंध?
तशीही, ती बहुतेक संपत्ती परत भारतातच आलेली आहे. बहुतांशी रियल इस्टेटच्या रूपात.
असो.
22 Jan 2014 - 4:25 pm | बॅटमॅन
सहमत!!!
22 Jan 2014 - 6:04 pm | विकास
एखाद्याची अघोषित मालमत्ता ऑपॉप देशाची कशी काय होते? कर बुडवला असेल तर, कर+व्याज+दंड घेणे ठीक. पण सगळी मालमत्ता? काय संबंध?
सहमत
भारताबाहेर गेलेली संपत्ती परत "बहुतांशी" भारतात आली का "अंशतः" आली हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण हट्टीपणे नुसतेच सरकारला नाही तर जनतेला पण वेठीस धरणे हे कोणिही कशासाठी देखील केले तरी योग्य नाही. रामदेवबाबांचा पण आंदोलनाचा हक्क मान्य होता पण आत्ताच्या आत्ता मला हे झालेले हवे वगैरे भाषा कोणिही करणे अत्यंत चुकीची आणि घातक आहे. त्यांनी त्या वेळेस ती केली. सरकारने आंदोलन मोडले कारण त्यांच्यात वर आल्याप्रमाणे अधिकृत सत्तेची पॉवर नव्हती तसेच सरकारी अंदाजात तो प्रसंग कणखरपणे हाताळण्यात कमितकमी सामाजीक आणि राजकीय धोका असावा म्हणून केले गेले. तेच नंतर अण्णांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने केले गेले.
22 Jan 2014 - 8:00 pm | संजय क्षीरसागर
थोडक्यात `ब्लॅक मनी'.
आयकर कायद्यात ब्लॅक मनीवर बुडवलेल्या कराच्या तीनशे टक्के (म्हणजे दडवलेल्या रकमे एवढी) दंडाची तरतूद आहे (Sec. 271(1)(c). सो रामदेवबाबा इज परफेक्ट! आणि अशी संपत्ती राष्ट्रीय घोषित झाली तर सरकारला सर्व टॅक्सेस रद्द करता येतील (निदान काही कालावधीसाठी तरी) असा अंदाज आहे.
आता तुम्ही म्हणतायं:
कुणासाठी घातक? आणि कसलं आलंय घातक? इतक्या उघड गोष्टीवर उगीच कैच्या कै चाललंय.
मग तेच तर म्हटलंय मी.
आंदोलन उधळायला कसला लागतोय कणखर पणा? बाहेरच्या देशात इतक्या दिग्गज सत्ताधार्यांचा पैसा आहे तिथे रामदेवाजीबाबांना विचारतो कोण? आणि सामाजिक आणि राजकीय धोका? ही काय भानगड आहे? च्यायला देशाचा पैसा तुम्ही परस्पर परदेशात नेलायं आणि तो राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करायचायं यात कसला आलायं धोका?
आता इतिहास तुम्हाला माहिती!
22 Jan 2014 - 1:14 pm | श्रीगुरुजी
केजरीवाल सध्या जे करत आहेत तो बटबटीत पोरकटपणा आहे. त्यांना लवकरात लवकर प्रगल्भता यावी हीच इच्छा.
22 Jan 2014 - 4:09 pm | चौकटराजा
केजरीवालना घटना काय आहे ते शिकवायची आपल्याला गरज नाही. एक केमाल पाशा नावाचा राष्ट्र प्रमुख सत्तेवर असताना रात्री साक्षरतेचे वर्ग स्वतः घेत असे असे वाचले आहे.हे जर खरे असेल तर त्याचे ही ते एक आंदोलनच होते निरक्षरपणाविरूद्दद्ध. अगोदरच्या काही मुख्यमत्र्यानी काही आंदोलने केल्याचा इतिहास आहे म्हणे. तेंव्हा हा गहजब झाला होता का हे तपासावे लागेल. नाहीतर केजरीवाल मुख्यमंत्री असताना ते एक नागरिक देखील आहेत हे विसरून चालणार नाही.सबब एखाद्या लावणीनृत्य असणार्या कार्यक्रमास जाण्याची, देवळात पूजा करण्याची, साहित्य संमेलनाला साहित्य प्रेमी म्हणून हजर असण्याची मुभा असतेच ना? त्याच न्यायाने आंदोलन प्रेमी केजरीवाल यानी पदावर असताना असा प्रकार केला तर ते घटनेच्या कोणत्या कलमाप्रमाणे अराजकी वर्तन होते हे मला कोण सांगेल का ?
22 Jan 2014 - 4:53 pm | चिगो
छोटासा प्रयत्न..
१. पोलिसांना द्रोह करायला चिथावणे. माझ्या माहितीत हा भा.दं.वि. तसेच पोलिस कायद्यानुसार गुन्हा आहे..
२. प्रजासत्ताक दिनाला "लाखों लोकांना राजपथावर आणू. परेड होऊ देणार नाही.." हा स्टँड घेणे. संविधानाची शपथ घेणार्या नेत्याने देशाची "सार्वभौमता" दाखवणार्या "प्रजासत्ताक" दिनाबद्दल इतकी तुच्छता दाखवणे बरे नव्हे. संविधानात Preambleचे पहीले वाक्य We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC असे आहे. ह्यातला "डेमोक्रॅट"च "रिपब्लिक"च्या विरोधात बोलत होता.
३. "मैं दिल्ली का मुख्यमंत्री हूं. मै तय करुंगा शिंडे (त्यांचा उच्चार) कहां बैठेगा. शिंडे तय नहीं कर सकता की मैं कहां बैठूंगा.." साहेब प्रिपेरेशनच्या टायमाला वाचलेले "Indian Constitution is with a strong unitary bias", "Centre-State relations" पार विसरलेले दिसतात. कसं आहे ना, साहेब.. जर खरोखरच जनतेसाठी मनापासून काम करायचं असेल, तर आपल्याकडे येणारा पैसा, साधनं कुठून येतात ह्याचा आधी अभ्यास करा. हं, आता तमाशेच करायचे आणि बघायचे असतील, तर मग "आली लहर, केला कहर" आहेच.. ;-)
22 Jan 2014 - 5:00 pm | कवितानागेश
"परेड होऊ देणार नाही" हा तर नक्कीच चुकीचा स्टँड आहे. :(
तिथे तरी पक्षीय राजकारन मध्यी आणू नये.
परेड ही संपूर्ण देशाची शक्ती एकवटलेली क्रुती आहे आणि पूर्ण देशाचा अभिमान आहे.
त्यात मध्ये घोळ घालणं हा केवळ मूर्खपणा आहे.
22 Jan 2014 - 5:33 pm | चौकटराजा
शिंदे यांचे वर्तन कसे असते याचा इतिहास सर्वानाच माहीत आहे. असे ऐकण्यात आले आहे की केजरीवाल म्हणे त्या पोलीसांच्या कारवाई संबंधी शिंदेना भेटायला गेले होते. पण शिंदेनी त्याना एका मुख्यम़ंत्र्यास प्रतिसाद द्यावा तसा दिला नाही.
दुसरे असे की आपल्याला परेड, झेंडावंदन सार्यात फारच रस आहे.पण अफझलच्या फाशीला झालेला उशीर, काही दया प्रकरणातझालेला उशीर, सिलेंडर ६ , १२ की ९ यात झालेली धरसोड, संसदेचे कामकाजाचे वाया गेलेले तास, कलमाडींवर कारवाई होण्यास झालेला उशीर , गुंड राजकारण्याना केवळ सूडाच्या राजकारणाचा मुद्दा दाखवून संरक्षण देण्याचा प्रयत्न, त्याला मग फाडून टाका असे ठराव चे उत्तर , अकाली दलाचे पंजाब मधे खच्चीकरणाचा जुन्या काळातील प्रयोग, ई घटनात
काही अराजकीय वास आला नाही . केजरीवाला तापट डो़क्याचा आहे त्याचे चुकलेच. लबाडीने कसे गप्प बसायचे ते त्यानी
मनमोहन सिंग यांच्या कडून शिकायला हवे.
22 Jan 2014 - 6:11 pm | अनिरुद्ध प
+१
22 Jan 2014 - 7:24 pm | माहितगार
हेतू खूप चांगला आहे.
पण.. एकाच्या असमर्थनीय कृतीच समर्थन दुसर्याच्या असमर्थनीय कृतीतून होत किंवा कस ? व्यवस्था परिवर्तनाची भाषा करणार्यांकडून अव्यवस्थेच समर्थन होऊ शकत का की हेतू चांगला असलेल्यांबद्दल अपेक्षेचा बार जरा उंच असतो ?
ज्यांच्या कडे चांगला हेतूच नाही त्यांना कोणी समजावत बसण्याच्या भानगडीतही पडणार नाही. आम्हाला अरविंद केजरीवालांची चर्चा करावी वाटते कारण त्यांचा उद्देश चांगला आहे आपल्यात कुणी आपचा कार्यकर्ता असला तर त्यांचा मार्ग चुकण्याच्या आधीच त्यांना सुयोग्य सुधारणा करता याव्यात घडलेल्या चुकांची पुर्नरावृत्ती होऊ नये.
22 Jan 2014 - 7:27 pm | माहितगार
अशात तरी मी कुणाला आदर्श बद्दल मिपावर धागा काढलेल पाहील नाही. आप बद्दल काढला जातो कारण टिका करतानाही आपुलकीच असते.
22 Jan 2014 - 9:41 pm | चिगो
मला शिंदे कसे वागतात माहीत नाही. केजरीवालांमध्ये थोडी आशा वाटते. त्यांचं विश्वासमत सभेतलं भाषण पटलंही.. त्यांचं हे वर्तन त्यांनाच वाईट ठरेल. राजकारण हे शांतपणे,विचारपुर्वक करायचे असते, असे मला वाटते. "खळ्ळखट्याक" वाले थोडा वेळ मोहात पाडत असले, तरी त्यांच्याकडूनपण कामाची अपेक्षा असतेच की.. आणि होय, मला झेंडावंदन, परेड ह्यात रस आहे. कारण की ह्याच परेडमध्ये माझ्या देशाच्या सैन्यशक्तीची कल्पना येते. हा "शो-ऑफ" अत्यंत गरजेचा आहे, हे माझे वैयक्तिक मत आहे.
बाकी शिंदे किंवा काँग्रेसनी केलेल्या चुकांना किंवा टंगळमंगळीला किंवा भ्रष्टाचाराला ते क्षम्य आहे असं मी म्हणतच नाहीय.. पण केजरीवाल चुकलेत, ह्याबद्दल मलातरी शंका नाहीय. पुन्हा तेच म्हणतो जे आधी बोललो, " घाई क्या हैं?".. अननुभवी आहात, तर अनुभव येईपर्यंत जरा धीर धरा की.. माफ करा, पण Good intentions and self-professes honesty is not an excuse for anarchy and high-headedness. इतके न्यायनिष्ठ आहात, तर तेच "आत्ताच्या आत्ता आरोपी नेत्याला खेचा" वाले लॉजिक त्यांच्या मंत्र्याला का पाठीशी घालताहेत?
साहेबकेजरीवालांनामध्ये देशाला आशा दिसतेय, वाटतेय.. हीच आशेची भावना "बंदे को समय से पहले और औकातसे ज्यादा मील गया शायद.. झेल नहीं पा रहा है.." अश्या टिकेत बदलू नये, हीच सदिच्छा.
22 Jan 2014 - 9:32 pm | संजय क्षीरसागर
त्यांनी असा स्टँड घेतलेला निदान मी तरी पाहिला नाही. ते म्हणाले की "प्रजासत्तक दिन म्हणजे फक्त काही विआयपींसमोर होणारं प्रदर्शन आहे. आणि तेही अश्या भ्रष्ट पोलिसांच्या संरक्षणात कसं होईल"?
हा मिडीयानं काढलेला निष्कर्ष असावा. जे पोलिस इमानदार आहेत त्यांनी आमच्याशी सहकार्य करावं असं आवाहन केजरीवालांनी केलं. त्याचा अर्थ पोलिसांना द्रोह करायला सांगितला असा होत नाही. आणि पोलिस द्रोह कुणाविरुद्ध करणार? आणि द्रोह करणार म्हणजे नक्की काय करणार? देअर वॉज नो अदर पार्टी अगेंस्ट हूम टू रिवोल्ट!
हे तर मी स्वतः ऐकलंय. केजरीवालांना पत्रकारानं विचारलं की `शिंदेसाहेब तुम्हाला जंतरमंतरला उपोषणाला बसायला सांगत होते ना?' (खरं तर ती इतकी बिलंदर चाल होती की आंदोलनाला बेदखल करतकरत त्याचा बाजा वाजवणं सोपं होतं. पण केजरीवाल काही कमी नाही त्यांनी बरोबर जागा हेरली.) यावर केजरीवाल म्हणाले ` ये शिंदे कौन होता है जी, मैं कहां बैठूं डिसाईड करनेवाला? सीएम मैं हूं या शिंदे?
साला, इतकी बेक्कार रात्र काढून सकाळी हा माणूस इतका पॉजिटिव होता आणि बॉडी लँग्वेज इतकी कॉन्फिडंट होती की दहा दिवस उपोषणाला बसायची तयारी होती.
22 Jan 2014 - 10:01 pm | चिगो
"झांकीयां नहीं होने देंगे" हे त्याचंच वाक्य आहे. म्हणजे काय हो?
हे ऐकलंय ना? त्यांच्या बॉडी लँग्वेजबद्दल मला बोलायचं नाहीय, पण त्यांच्या एकंदरच वागणूकीवरून मला वाटतंय की त्यांना सरकार चालवणे किंवा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा ईगो सुखावत "मी बघा किती निस्पृह, सच्चा माणूस आहे" हेच दाखवत बसण्यात रस आहे. अन्यथा, दिल्लीत राज्यसरकारचा मुख्यमंत्री असलेला माणूस केंद्रसरकारविरुद्ध उगाच एवढ्या टोकाला जाणार नाही. कदाचित, आधी नुसतंच "घी" दिसत होतं, आता "बडगा" बघितला असेल..
माफ करा, पण ह्याचं मला अजिबात कौतूक नाहीये. एकतर, ते उपोषणावर नाही, धरण्यावर बसले होते.. दुसरं म्हणजे, कार्यकर्त्यांच्या गराड्यात, पोलिसांच्या पहार्यात थंडीचा पुर्ण बंदोबस्त करून झोपण्यात स्टंटबाजी असेल.. बाकी काहीच नाही. ह्याहून वाईट परीस्थितीत, कुठलाही गाजावाजा न करता जनोपयोगी काम करणारे माहीत आहेत, म्हणूनही असेल कदाचित..
23 Jan 2014 - 12:26 am | संजय क्षीरसागर
आय अॅग्री! पण याचा अर्थ केजरीवालनी स्वतःची प्रतिमा (इगो) मोठी करण्यासाठी धरणं धरलं होतं? What is the issue? तुम्हाला दिल्लीतली सामान्य माणसाची सुरक्षा किती धोक्यात आहे याची कल्पना असावी. आपल्या देशात, आपल्या राजधानीत, लोकांना रात्री सात नंतर मोकळेपणानं फिरता येत नाही. आणि केजरीवालांची दुविधा अशीये की त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जवाबदार धरलं जाणार आणि पोलिसांच नियंत्रण केंद्रिय गृहखात्याकडे!
And What's the point in becoming so emotional about the Republic Day Parade? महत्त्वाच काय आहे परेड का संविधानाला अपेक्षित असलेलं हे स्वातंत्र्य?:
Right to freedom which includes speech and expression, assembly, association or union or cooperatives, movement, residence, and right to practice any profession or occupation (some of these rights are subject to security of the State, friendly relations with foreign countries, public order, decency or morality), right to life and liberty, right to education, protection in respect to conviction in offences and protection against arrest and detention in certain cases.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्तीनं रजेवर पाठवलेला SHO करप्ट नाहीये का? तसं असतं तर सरकारनं चवकशीची तयारी दर्शवलीच नसती.
केजरीवालांनी टाइमिंग साधलं हा युक्तिवाद बरोबर ठरेल पण स्वतःच्या प्रतिमेपायी केजरीवाल रस्त्यावर झोपले आणि `पोलिसांच्या पहार्यात थंडीचा पुर्ण बंदोबस्त करून झोपण्यात स्टंटबाजी असेल' म्हणणं व्यक्तिगत रोष दर्शवतं.
आणि त्याही पुढे जाऊन :`त्यांना सरकार चालवणे किंवा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा ईगो सुखावत "मी बघा किती निस्पृह, सच्चा माणूस आहे" हेच दाखवत बसण्यात रस आहे' ...असा निष्कर्ष काढणं, तर्क कितीही ताणला तरी पटण्यासारखं नाही.