जिमी (पूर्वार्ध)

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
23 Dec 2013 - 4:27 am

नव्या नोकरीचा पहिला दिवस नेहेमीच जरा भीतीदायक असतो. काम जमेल का? सहकारी कसे असतील? हजार प्रश्न. त्या नोकरीच्या वेळी तर धोपटमार्गा सोडून मुद्दाम बिकट वाटेची वहिवाट करायला घेतली होती. आमच्या सत्तावन पिढ्यांत कोणी हॉटेलात नोकरी केली नव्हती. मीही तसा कारकुनी पेशात असल्यामुळे करण्याची शक्यता नव्हतीच, पण या हॉटेलाने नोकरी देऊ केली, म्हटलं बघूया तरी कसं असतंय.

मध्य मुंबईतल्या जागेचे भाव प्रचंड. त्यामुळे हॉटेलातली जास्तीत जास्त जागा गेस्ट एरिया म्हणून वापरायला ठेवलेली. त्याखालोखाल किचन, बेकरी वगैरेचा नंबर. त्याखालोखाल हाऊसकीपिंगचा. अकाऊंट्स, एचार वगैरे भाकड डिपार्टमेंटांना कुठल्यातरी भोकात जागा दिलेली. दोन अरुंद जिने, वरून पाईप गेलेली एक काळपट बोळकंडी आणि एक शिडीवजा जिना चढून आम्ही अकाऊंट्स मध्ये पोचलो. पंचतारांकित हॉटेलाच्या चकचकीत आणि गुळगुळीत ग्राहकांपैकी कोणी इथपर्यंत पोचला असता तर झीट येऊन पडला असता. दृष्टीआड सृष्टी!

आत जुन्या पद्धतीची टेबलं आणि हातवाल्या लाकडी खुर्च्यांवर अकाऊंट्सचा स्टाफ विराजमान होता. टेबलखुर्च्यांची रचना शाळेच्या वर्गासारखी - एकामागे एक. वर्गशिक्षक बसतात त्या जागी मात्र लाकडी पॅनल्सने बनवलेली तकलादू केबिन आणि त्यावर "Financ Controller" असा बोर्ड. ई पडून गेला होता. कुणी बदलायचे कष्टसुद्धा घेतले नव्हते. अकाऊंट्स डिपार्टमेंटच्या सौभाग्यचिन्हांसारख्या असलेल्या बॉक्स फायली, जंबो पंच आणि स्टेपलर इतस्ततः पसरले होते.

आम्हाला पाहून आतला कोलाहल हळूहळू शांत झाला. डॉटमॅट्रिक्स प्रिंटरचा खरखराट तेवढा राहिला. झूमध्ये आलेल्या नवीन प्राण्याकडे जुने प्राणी कसे पहात असतील, तसा समोर बसलेला समुदाय मला निरखून पाहू लागला. "नया पंछी आनेवाला है" ची खबर बहुदा त्यांना लागली असावी. मीही त्यांना निरखून पाहू लागलो. काळ्या केसांपेक्षा करड्या पांढर्या केसांचा आणि टकलांचाच भरणा जास्त दिसत होता. एकंदर वातावरण आणि सहकारी पाहून "ये कहाँ आ गये हम" अशी भावना आल्याचं स्पष्ट स्मरतं.

आमचा नजरबंदीचा खेळ चालू असताना शेवटच्या टेबलावरून एक गोलमटोल इसम उठला आणि माझ्या दिशेने गडगडत यायला लागला.

"हेलो यंग मॅन! वेलकम! आय एम जिमी." माझा हात खांद्यापासून हलवत तो म्हणाला. हा हसरा गुब्ब्या पारशी आहे हे समजायला त्याचं बर्थ सर्टिफिकेट पहायची गरज नव्हती. बावाजींनी लगेच माझा ताबा घेऊन टाकला. सगळ्यांशी ओळख करून दिली, लाकडी केबिनमधल्या बादशहाकडे पेशी करून आणली, हॉटेलच्या शिंप्याकडे रवाना करून युनिफॉर्मचा सूट शिवायला टाकला वगैरे. मला स्टाफ कँटीनमध्ये जेवायला घेऊन गेला. मी मराठी आहे हे कळल्यावर सरळ मराठीत बोलायला लागला. माझं वय कळल्यावर "मला मुलगा असता तर तुझ्याच वयाचा असता" हे सांगितल्यावर त्याच्या वयाचा अंदाज आला. एरवी त्याचं वय समजणं अवघड होतं - पस्तिशीपासून साठीपर्यंत कुठल्याही वयाचा असू शकत होता तो.

शेवटी त्याने मला माझं टेबल दाखवलं. त्याच्या टेबलाच्या पुढेच होतं, शेवटून दुसरं. "तू तुज्या स्क्रीनवर काय बघतो ते कोनाला कलनार नाही, मला सोडून." आपले वाकडेतिकडे दात दाखवत म्हणाला. "पोर्न बगू नकोस फक्त, आयटीवाल्याला कलेल!" तो खट्याळपणे म्हणाला.

[जिमी-वाणीचं एक स्पष्टीकरण इथे देणं गरजेचं आहे - म्हणजे वाचकांना जिमीचा आवाज 'ऐकू' येईल. च, ज या अक्षरांचा हलका उच्चार (उदा. चमचा, जहाज) त्याच्या झोराष्ट्रीयन जिभेबाहेरचं काम होतं. ही अक्षरं जड बनून यायची (उदा. चार, जिरे). सोयीसाठी ती ठळक केली आहेत.]

युनिफॉर्मचा सूट शिवून आला आणि मंडळींनी मला त्यांच्यातलं मानलं. बरेचसे कोकणातून आलेले - राणे, सावंत, सामंत, महाडिक, संगे. दोनतीन बोहरी. दोनतीन गोवन कॅथलिक. बाकीचे पिढीजात मुंबैकर. इतका मोकळाढाकळा माणसांचा कळप मी कधी पाहिलाच नव्हता. जात/धर्म आणि त्याअनुषंगाने येणार्या गुणदोषांची चर्चा दबक्या आवाजात, बंद दारामागे व्हावी अशा पार्श्वभूमीतून मी आलेला - आणि इथे सगळंच उघडं, नागडं आणि वेशीला टांगलेलं. गोवन कॅथलिक डिकास्टाला सरळ सरळ "ए बाटग्या" असं पुकारलं जायचं. बिलात जमा झालेली टिप हिशोब करून कॅप्टनच्या स्वाधीन करणं हे माझ्या कामांपैकी एक होतं. त्यावरून "भटाच्या हातून कसले पैसे सुटतायत?" अशी माझी संभावना होत असे.

त्यातही जिमी आघाडीवर. साध्यासाध्या गोष्टींत चुका करणार्या अरिफ संगेला "अकलेला पण कटपीस आहे गेलचोदिया" असं खणखणीत आवाजात सांगायचा. मुंबईतली चौथी पिढी असलेल्या वेंकटचलमला "हटाव लुंगी, बजाव पुंगी" ची घोषणा देऊन सतावायचा. कॅशियर म्हात्रे तर जिमीचं लाडकं गिर्हाईक. पांचकलसी पांचकलसी म्हणून तो फार मागे लागायचा. कॅशियरच्या जाळीदार केबिनमध्ये एसी पोचायचा नाही म्हणून म्हात्रे शर्ट काढून बनियनवर बसायचे. जिमीची बडबड असह्य झाली की तसेच बाहेर यायचे आणि शिव्या घालायचे. जिमी अर्थातच पलटवार करायचा आणि पुढची पंधरा मिनिटं ही शिव्यांची मैफिल रंगायची.

जिमी अकाऊंट्स पेयेबल बघायचा - पेरिशेबल्सचे. म्हणजे आईस्क्रीमपासून लिंबापर्यंत हॉटेलला लागणार्या सगळ्या नाशिवंत पदार्थांची बिलं याच्याकडून पास व्हायची. या वस्तूंचे व्यापारी म्हणजे वाशी, भायखळ्याच्या बाजारातली मोठमोठी धेंडं. पैसे देण्यासाठी नव्वद दिवसांचं क्रेडिट असे. यानंतर व्यापार्यांच्या घिरट्या सुरू होत. पण जिमीचं स्वतःचं एक टाईमटेबल असे. म्हणजे सोमवारी भाजीपाल्याची बिलं पास करायची, मंगळवारी मांसमच्छीची, वगैरे. श्रावण पाळणार्या भटाच्या श्रद्धेने हे टाईमटेबल पाळलं जायचं. (याला अपवाद दोनच होते - कुलाब्यातल्या मच्छिमार नगरच्या कोळणींची सोसायटी आणि मोहम्मद अली रोडवरचा गोळ्या विकणारा एक बोहरी म्हातारा. त्यांची बिलं ताबडतोब पास व्हायची - बर्याचदा नव्वद दिवसांच्या आतच.) चुकीच्या दिवशी चुकीचा व्यापारी पैसे मागायला आला की जिमीची खोपडी सटकायची, आणि तो वयाने, मानाने, पैशाने किती का मोठा असेना - त्याला जिमी शिव्यांच्या फायरिंग स्क्वाडसमोर उभं करायचा.

सकाळी नवाच्या ठोक्याला जिमी त्याच्या खुर्चीत हजर असायचा. वाराप्रमाणे बिलांचे गठ्ठे अरिफ संगेने बांधून ठेवलेले असायचे. एक एक बिल काढून ते तपासायला सुरुवात. पद्धतशीरपणे बिलांवर लाल-हिरवे फराटे ओढले जायचे. मध्येच त्या वाराचं नसलेलं बिल सापडलं की अरिफच्या नावाने शंख. मग हिरव्या बिलांची सिस्टिममध्ये एंट्री. मग लाल बिलवाल्यांना फोन फिरवले जायचे. स्वभावाप्रमाणे प्रथम शिव्यांची बरसात, मग शंकानिरसन. शंका किमतीविषयी असेल तर त्याच्या दृष्टीने प्रश्न संपलेला असायचा - कारण जिमीवाक्यं प्रमाणम!

क्वांटिटीविषयक शंका असेल तर वेगळं नाटक. स्टोअरकीपर सामंत "रिसीव्ड क्वांटिटी"चा रिपोर्ट पाठवायचे. "बिल्ड क्वांटिटी" बर्याचदा जास्त असायची. व्हेंडर कुरकुरायचा. एरवी व्हेंडरची बारीकसारीक कारणावरून आईबहीण काढणारा जिमी अशा वेळी मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहायचा. जिमीचा सामंतांना फोन: "बाल सामंत, तू जीआरेन काढतो तेव्हा काय मूनशाईन पिऊन येतो काय?" अशी प्रस्तावना करून "माजा व्हेंडर माज्यावरच चढतो" अशी तक्रार करायचा. सामंत वैतागायचे: "च्यायला जिम्या, फोकलीच्या तूच काय तो कामं करतो आणि आम्ही पाट्या टाकतो होय रे भाड्या". सामंत, जिमी आणि व्यापारी यांची एकत्र रुजुवात होऊन शेवटी एकदाचा बिलाला मोक्ष मिळायचा आणि सिस्टिममध्ये जायचं.

एकदा आम्हाला कसल्याशा ट्रेनिंगला बरोबर जायचं होतं. वक्त का पाबंद जिमी आवरून माझ्या टेबलाशी घोटाळत होता. मला केबिनस्वामीने नेमकं एक अर्जंट काम दिलं होतं. जिमी अस्वस्थ होऊन घिरट्या घालत होता. माझं जरा आवरल्यासारखं दिसताच म्हणाला: "काय रे आदूबाल, कु कदी करायचा आपण?"

माझा कानांवर विश्वास बसेना! "काय कधी करायचं जिमी? परत बोल?"

"कु, कु. बरोबर बोलला ना मी?"

"शब्द एकदम पर्फेक्ट आहे जिमी! एवढं हाय क्लास मराठी कुठून शिकलास?"

"अरे काय सांगतोस!" खूष होत जिमी म्हणाला "बीस वर्षांपूर्वी अकाऊंट्स मदे आलो. तेवा एका बाजूला जोशी आणि एका बाजूला रनदिवे बाय. मराठी शिकेल नायतर काय होईल?"

"वीस वर्षांपूर्वी? त्या आधी काय करत होतास?"

त्या आधी दहा वर्षं जिमी "रनर" होता. दक्षिण मुंबईतली बडीबडी धेंडं हॉटेलात यायची. पंचतारांकित हॉटेलात आपण नेहेमीचे आहोत, आपल्याला ओळखतात, बिल येत नाही, हा म्हणे एक स्टेटस सिंबॉल होता. मग असं गिर्हाईक (बिल न भरताच) गेलं, की रनरने त्याच्या मागोमाग जायचं आणि "मेत्ता" कडून किंवा अकाऊंटंटकडून ते सेटल करून आणायचं.

अशाच एका सेठजीकडे त्याला महानाज दाडीसेट भेटली. आपण रनर, ती सेठजीची मुलगी असला कुठलाही विचार मनात न आणता तो तिला पटवण्याच्या उद्योगाला लागला. यथावकाश महानाज दाडीसेट आणि जमशेद रुस्तमजी सेठना यांचं लग्न झालं.

सासर्याचं आणि जिमीचं फारसं पटलं नाही. सासरा हिंदी सिनेमांचा परदेशातला डिस्ट्रीब्यूटर होता. त्या व्यवसायात जिमीने मदत करावी अशी त्याची अपेक्षा होती. जिमीला सासर्याच्या अंगठ्याखाली रहाणं मान्य नव्हतं. त्याने हॉटेलमधली नोकरी चालू ठेवली. सासर्याने वैतागून जिमीला आणि महानाजला "जायदाद से बेदखल" करायची धमकी दिली.

"साला आय डोंट ब्लडी केर... आहे त्यात मी खूष आहे"

माझ्या मनात एक अस्सल पुणेरी प्रश्न होता, पण विचारायचा संकोच वाटत होता. जिमीला बरोबर समजलं.

"नॉट ऑल पारसीज आर वेल्दी. सगले गोदरे आनि टाटा नसतात. माज्यासारखे गरीब पारसीज पन असतात."

गरीब पारशांसाठी त्यांच्या समाजाने अल्प भाड्यात रहायची सोय केली आहे. त्यातल्या एका "कॅप्टन्स कॉलनी" नावाच्या चाळीत जिमीच्या दोन खोल्या होत्या.

"या कावळ्यांचं काही सांगता येत नाही." आमचं संभाषण ऐकत असलेले म्हात्रेशेट म्हणाले. "उद्या सासरा खपला की याचंच आहे सगळं. ** पुसायला पण नोटा घेईल साला."

जिमी ठो ठो करून हसला. "आय वुड डाय सूनर दॅन द ओल्ड मॅन. मी असा रहानार, म्हात्रे. कॅप्टन्स कॉलनीतून शेवटचा अगियारीत जानार..."

जिमी सासर्याला बरोबर ओळखून होता, पण स्वतःबद्दलचं त्याचं भविष्य चुकणार होतं.

(अपूर्ण)

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

मिसळपाव's picture

23 Dec 2013 - 5:32 am | मिसळपाव

आदूबाळा, झक्कास सुरूवात केली आहेस! व्वा! पुभाप्र...
(हा पूर्वार्ध म्हणजे अजून फक्त उत्तरार्धच आहे?)

खटपट्या's picture

23 Dec 2013 - 5:46 am | खटपट्या

मस्त !!!!

जेपी's picture

23 Dec 2013 - 7:04 am | जेपी

आवडल .

नंदन's picture

23 Dec 2013 - 8:52 am | नंदन

सुरुवात मस्त झाली आहे. एकंदरीत हपिसातलं वातावरण आणि पारसीबाबा यांचं चित्रण छान वठलंय.

लॉरी टांगटूंगकर's picture

23 Dec 2013 - 9:28 am | लॉरी टांगटूंगकर

झकास सुरुवात
अपूर्ण लिहून जर का पुढचा भाग उशिरा टाकला.... तर..... तुमच्या फक्त तुमच्या सिस्टीमवर चार दिवस मिपा चालणार नाही.

अमित खोजे's picture

23 Dec 2013 - 11:54 pm | अमित खोजे

वाह काय शाप आहे ! :)

संजय क्षीरसागर's picture

23 Dec 2013 - 10:59 am | संजय क्षीरसागर

मस्त मजा आणलीस.

आतिवास's picture

23 Dec 2013 - 12:13 pm | आतिवास

सुरुवात मस्त झालीय. 'जिमी' डोळ्यांसमोर उभा राहिला अगदी.

बॅटमॅन's picture

23 Dec 2013 - 12:23 pm | बॅटमॅन

एक नंबर रे!!!!! हाय क्लास पर्फेक्ट.

स्वगतः साला ही व्यक्तिचित्रणाची हातोटी मली असती तर अजून काय पाहिजे होतं????????

अभ्या..'s picture

23 Dec 2013 - 9:04 pm | अभ्या..

+१
अर्थातच परफेक्ट.
आदूबाळाचे लेखन तर परफेक्टच.
त्यात अनुभवांचे वैविध्य, परफेक्ट ऑब्झर्वेशन अन भाषेवरील प्रभुत्व.
वा वा वा. अजुन काय पायजे म्हाराजा. खुष केलेत. :)

मृत्युन्जय's picture

23 Dec 2013 - 12:35 pm | मृत्युन्जय

झक्कास आहे रे. पुभाप्र

मुक्त विहारि's picture

23 Dec 2013 - 12:42 pm | मुक्त विहारि

उत्कंठा वाढली आहे...

प्यारे१'s picture

23 Dec 2013 - 1:17 pm | प्यारे१

ए डिक्रा, तू तर एकदम भारी लिवतो रे!

आजून जल्दी जल्दी येवन दे. थोरा जल्दी टाक हा पन.

सुहास..'s picture

23 Dec 2013 - 2:13 pm | सुहास..

वेगळाच विषय !! आवडेश ...

राजो's picture

23 Dec 2013 - 3:33 pm | राजो

अप्रतिम.. पुढील भागाची उत्कंठा आहे.
पारशी समाजाबद्दल एक प्रकारचे कुतुहल (curiosity साठी हा च शब्द आहे ना?) आहे. पारशी accent तर लाजवाब.

यशोधरा's picture

23 Dec 2013 - 3:51 pm | यशोधरा

मस्त सुरुवात.

अत्रन्गि पाउस's picture

23 Dec 2013 - 3:58 pm | अत्रन्गि पाउस

पुढील भागासाठी आपल्याला फार तर २४ तास दिलेले आहेत...सबब उर्वरित भाग तडक पाठविणे विषई आपणास विनंती करणेत येत आहे

मजा आला साला वाचताना डिक्रा...

चैत्रबन's picture

23 Dec 2013 - 8:48 pm | चैत्रबन

आदुबाळ फारच भारी लिहिलयेस...पुभाप्र..

सस्नेह's picture

23 Dec 2013 - 9:30 pm | सस्नेह

वेधक व्यक्तिचित्र. चित्रपटासारखं वाटलं.

अर्धवटराव's picture

24 Dec 2013 - 1:56 am | अर्धवटराव

मंग शाला पुडे काय जाला ते शांन नि लवकर.

सर्व वाचकांचे आभार! दुसर्‍या भागाच्या खटपटीत आहे, त्यामुळे तपशीलवार प्रतिसाद नंतर एकत्र देईन.

पैसा's picture

24 Dec 2013 - 6:24 pm | पैसा

अगदी गुंगवून ठेवणारं चित्र! मस्तच आहे!