जिमी (उत्तरार्ध)

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
24 Dec 2013 - 10:19 pm

जिमी (पूर्वार्ध)

...पण स्वतःबद्दलचं त्याचं भविष्य चुकणार होतं.

"रामजीभाई कमानी मार्ग कुठे आला रे जिमी?"

बिकट वाटेची वहिवाट करायला काही साधलं नव्हतं. मी नवी नोकरी शोधत, इंटर्व्यू देत हिंडत होतो. भारताच्या आर्थिक राजधानीच्या कुठल्याकुठल्या कोपर्यांत जावं लागे. मुंबईतले - विशेषतः 'टाऊन' (जिमीचा शब्द) मधले रस्ते बर्याचदा सासरची, माहेरची अशी दोन नावं घेऊन वावरतात. कॅडल रोड म्हणजेच वीर सावरकर मार्ग, हुतात्मा चौक म्हणजेच फ्लोरा फाऊंटन, एस्प्लनेड रोड म्हणजे पी डिमेलो मार्ग हे कळायला बरेच टल्ले खावे लागतात. अशा वेळी सर्वात सोपा उपाय म्हणजे जिमीला विचारणे. रनर असण्याच्या काळात सगळे रस्ते त्याच्या पायाखालचे होते. "तुला कशाला रे पायजे? कुठे जाचाय?" कधी फारसा भोचकपणा न करणारा जिमी या वेळी मात्र खोदखोदून विचारत होता.

कसाबसा त्याला कटवून त्याच्याकडून इष्ट माहिती काढली आणि इंटर्व्यूला दाखल झालो. बॅलार्ड इस्टेटमधली जुनाट इमारत. कंपन्यांची कॉर्पोरेट ऑफिसेस, वकिलांची चेंबर्स वगैरे टिपिकल गोष्टींनी भरलेली. इंटर्व्यू संपवून बाहेर आलो आणि लिफ्टसाठी थांबलो होतो. सहज समोर नजर गेली, तर एका चेंबरच्या अॅन्टेरूममध्ये जिमी बसला होता. मुंबईचा बर्यापैकी प्रतिष्ठित वकील होता. "याच्याकडे जिमीला काय काम?" असा विचार मनात येऊन गेला. त्यानेही पाहिलं असावं मला. अशा वेळी "तेरी भी चुप, मेरी भी चुप" हेच धोरण योग्य आहे हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं.

यथावकाश मला नोकरी मिळाली. माझा पंचतारांकित प्रवास संपला. अकाऊंट्समधल्या मंडळींनी नाही म्हटलं तरी जीव लावला होता. त्यांना सोडून जाताना कसंसंच होत होतं. मंडळींनी झकास सेंड ऑफ दिला. जिमीने आपणहून आयोजन स्वीकारलं असल्यामुळे त्याच्या आवडीच्या ब्रिटानिया रेस्टॉरंटमध्ये पार्टी झाली. जिमीने आग्रह करकरून रेस्टॉरंटची स्पेशालिटी असलेला खास पारशी "बेरी पुलाव" खायला घातला. निरोप देताना सगळ्यांचेच डोळे ओलसर झाले होते.

पुण्याला आलो, नव्या नोकरीत रमलो. Out of sight is out of mind या तत्वानुसार मंडळींचा संपर्कही कमी कमी होत तुटल्यासारखाच झाला.

वर्षा-दीडवर्षांनंतरची गोष्ट. एका कॉन्फरन्ससाठी त्याच हॉटेलात जायचं होतं. म्हटलं वा! चांगली संधी आहे, मंडळींना भेटून घेऊ. राणेला फोन करून अमुक दिवशी येतो आहे, स्टाफ कँटीनमध्ये जेवायला जाऊ, इतरांना सांग वगैरे कळवलं.

कॉन्फरन्सच्या लंच ब्रेकमध्ये इतर सहकार्यांना कटवून कँटीनच्या दिशेने जाणार तोच बँक्वेट हॉलचा मॅनेजर आला, आणि म्हणाला तुम्हाला साहेबांनी बोलावलंय सातव्या मजल्यावर.

सातव्या मजल्यावर डायरेक्टर्सची ऑफिसं होती. हॉटेलची मालकी अग्रवाल नावाच्या कुटुंबाकडे होती. पूर्वी काही ना काही कारणाने त्यांना भेटलो होतो, पण आज त्यांनी आवर्जून आठवण काढायचं कारण काय, असा विचार करत सातव्या मजल्यावर पोचलो. न्यायला आलेल्या मनुष्याने मला एका लाकडी दरवाज्यासमोर नेऊन उभं केलं.

त्यावरची "जमशेदजी रुस्तमजी सेठना, डायरेक्टर" ही पाटी बघून मी पडायचाच बाकी राहिलो होतो!! जिमी?! डायरेक्टर?! असं कसं काय झालं?! वंडर ऑफ वंडर्स!! बरं मला कुणीच काहीच कसं बोललं नाही?! दरवाजा उघडला आणि आत युनिफॉर्मच्या सुटाऐवजी बिस्पोक टेलरिंगचा झकास सूट परिधान केलेला साक्षात जिमी!

माझा वासलेल्या आ वर नेहेमीप्रमाणे गडगडाटी हसत त्याने मला आत ओढलं आणि घट्ट मिठी मारली. कुठल्यातरी झकास परफ्युमचा वास सुटाला येत होता. (पूर्वीचा जिमी अरिफ संगेकरवी नळबाजारातून कुठली कुठली भयानक अत्तरं आणवायचा.) मी काही बोलायच्या आधीच शँपेनचा उंच निमुळता पेला हातात सरकवला.

"जिमी! हे काय रे बाबा?"

"आय कुड हॅव नॉक्ड यू डाऊन विथ अ फेदर" हसायचा गडगडाट संपला नव्हता. "एटले राजू बन गया जेंटलमन, आं!"

जिमीची कोणतीतरी दूरची आत्या निपुत्रिक वारली होती आणि तिचा एकमेव वारस जिमी होता.

"बूढीकडे फारसा काय नवता रे. नो कॅश, नो जुवेलरी. हर हजबंड वॉज फाऊंडर ऑफ धिस हॉटेल, विथ अग्रवाल्स. त्याच्याच रेफरन्सनी मी इथे लागला रनर म्हणून. ही हॅड शेअर्स."

"हो पण एकदम डायरेक्टर?"

"तुला मायती आहे अग्रवालसायबाचा कसा असतो. बूढा डिविडंड देतो कुठे? दॅट्स वाय माय आन्ट डिण्ट हॅव कॅश. सगला पैसा आतल्याआत ठेवतात बास्टर्डस. सो मी गेला दुर्गेससायबाकडे, आणि म्हणला - मेक मी अ डायरेक्टर."

दुर्गेश अग्रवाल म्हणजे 'बूढ्या अग्रवालसायबा'चा मुलगा. या दिवट्या चिरंजीवांचे 'चौफेर पराक्रम' हा अख्ख्या हॉटेलच्या गॉसिपचा पेटंट विषय असायचा. याची व्यसनं ट्रॅडिशनल 'बाई-बाटली' पुरतीच मर्यादित राहिली असती तर म्हातार्याने भगवान अग्रसेनाचे आभार मानून कधीच सुखाने प्राण सोडला असता.

"दुर्गेशने बरं ऐकलं तुझं"

"आय गेव्ह हिम अॅन ऑफर विच ही कुडंट रेजिस्ट" जिमीने ऐटीत मार्लन ब्रँडोचा आजरामर डायलॉग मारला.

माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. स्वार्थासाठी दुर्गेश अग्रवालने स्वतःच्या आईला फोरास रोडला उभं करायला कमी केलं नसतं - या लायकीचा मनुष्य होता तो.

"अँड व्हॉट वॉज हिज पाऊंड ऑफ फ्लेश?"

"अबे छोड ना यार! वॉट बिजिनेस टॉक. शँपेन घे थोडा - पॉमेरी आहे." जिमीने सफाईने विषय टाळला. तो घेणार असलेला नवीन बंगला, पोर्शे, क्रूज वगैरेबद्दल बरंच काय काय सांगत बसला. पण दुर्गेश अग्रवालच्या उल्लेखाने मला एक अस्वस्थपणा आला होता तो तसाच राहिला. "बाकीच्यांना पण भेटायचं आहे" असं सांगून शेवटी मी त्याचा निरोप घेतला.

माझी वाट पाहून मंडळींनी जेवून घेतलं होतं. तरी मला कंपनी द्यायला थांबले. गावभरच्या गप्पा झाल्या. एकमेकांच्या बातम्या देऊनघेऊन झाल्या. अरिफ संगेचं लग्न झालं होतं, सामंतांच्या मुलाला आयआयटीत प्रवेश मिळाला होता, महाडिकच्या हृदयात ब्लॉकेज सापडलं होतं. कुणी स्वतःहून जिमीचा विषय काढला नाही. मी काढला तेव्हा "आलास भेटून साहेबांना?" यापलिकडे कुणी प्रतिक्रियासुद्धा दिली नाही. म्हात्रेशेटने खूण केली. मी समजलो, आणि विषय वाढवला नाही. हा काय प्रकार होता? मत्सर? पोटदुखी? आपल्यातलाच एक लायकी नसताना पुढे गेल्याची जळजळ? का अजून काही?

रात्री मी म्हात्रेशेटना त्यांच्या नेहेमीच्या पानाच्या दुकानावर गाठलं. नेहेमीप्रमाणेच ते तीर्थप्राशन करून आले होते. त्यामुळेच की काय, दुपारपेक्षा जास्त मोकळेपणाने बोलले.

दुर्गेश अग्रवालचा मामा - ओसवाल - हॉटेलवर कबजा करू पहात होता. त्यासाठी त्याने पद्धतशीरपणे होल्डिंग गोळा करून "होस्टाईल टेकओवर"चं गंडांतर आणलं होतं. दुर्गेशला अर्थातच ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी हातची जाऊन द्यायची नव्हती. आपल्या ताब्यात सव्वीस टक्के शेअरहोल्डिंग ठेवण्यासाठी त्याला जिमीच्या शेअर्सची गरज होती आणि त्याबदल्यात त्याने जिमीला डायरेक्टर बनवून आपल्या बाजूला ठेवलं होतं.

"च्यायला! जिमीने बरा फायदा करून घेतला स्वतःचा..." मी अचंब्याने म्हणालो.
"अरे त्या भाड्याला काय घंटा कळतंय? भोसडीचा मॅट्रिक नापास आहे." पानाच्या पिचकारीबरोबर आंबुस वासाचा भपकारा सोडत म्हात्रेशेट म्हणाले. "त्याचा वकील आहे कुणीतरी ब्यालाड इस्टेटमधे. त्याची अक्कल."

मला रामजीभाई कमानी रोडवरच्या चेंबरमध्ये बसलेला जिमी आठवला.

"पण तुला एक सांगू का?" म्हात्रेशेट तांबारलेले डोळे माझ्यावर रोखत म्हणाले. "ही माणसं भिकारचोट आहेत रे. जिम्याला हजारदा सांगितलं या सांडांच्या साठमारीत पडू नकोस. पण तुला माहितीय तो कसा आहे - साठीला आला तरी मूलपणा गेला नाही भडव्याचा. आपल्या फायद्यासाठी दुर्गेशने चढवलं त्याला, आणि तो पण चढून गेलाय."

"हो सांगत होता तो - नवा बंगला, पोर्शे काय काय"

"आज गरज आहे दुर्गेशला म्हणून ओरबाडू देतोय पायजे तसं. उद्या काम झालं की देईल फेकून कुठल्यातरी गटारात." म्हात्रेशेट कळवळून सांगत होते.

"पण म्हात्रेशेट, हे सगळं तर त्याच्या सासर्याने दारात आणून उभं केलं असतं. तेव्हा नाही म्हणाला, आणि आज का असं हपापल्यागत करतोय?"

"अरे मूल आहे तो. काही काही मुलांचं कसं असतं बघ. त्यांना स्वतःचंच खेळणं हवं असतं, दुसर्याचं दिलेलं नको असतं." म्हात्रेशेट म्हणाले. "आता मी काय सांगणार म्हणा मुलांबद्दल. मी तर निकम्मा बाप..."

हा विषयात मला जायचं नव्हतं. म्हात्रेशेट आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध हा एक वेगळाच भयानक विषय आहे. तसंही त्यांचं विमान उंच हवेत गेलं होतं, त्यामुळे निरोप घेऊन मी सटकलो.

"सांडांची साठमारी" हे म्हात्रेशेटचे शब्द कुठेतरी ठसल्यासारखे झाले होते. या भानगडीत जिमी फक्त एक प्यादं आहे हे सरळसरळ दिसत होतं. अभद्राची शंका येत होती. एखाद्या किळसवाण्या गोष्टीचा विचार करायलासुद्धा मन धजावत नाही तसं काहीतरी होत होतं. मैत्रीचा लिप्ताळा जिमीला सावध करायला सांगत होता. दुसरीकडे स्वभावातला पाषाणकोरडा व्यवहारी भाग म्हणत होता "अरे काय सांगणारेस तू त्याला? तुझ्या बापाच्या वयाचा तो. तुझी हैसियत काय? आणि "सावध रहा, जपून रहा" यापलिकडे सांगणार तरी काय? कशाच्या बळावर?"

अशा उलटसुलट विचारातच मी पुण्याला परतलो. परत रुटीन. Out of sight is out of mind. पण दातात बडिशेपेचं तूस अडकावं तसा हा विषय डोक्यात अडकून बसला होता. फायनान्शियल वृत्तपत्रांतून हॉटेल टेकओवरच्या ओसवालच्या प्रयत्नांबद्दल छापून यायला लागलं होतं. अग्रवाल-ओसवाल साठमारी कोर्टात पोचली होती. कुठेही जिमीचं नाव येतंय का, हे मी बारकाईने बघायचो, पण ते नसायचं - बहुदा या मोठ्ठ्या गेममधला तो छोटासा प्लेयर होता.

असेच आठ दहा महिने गेले. दिवाळीला जिमीचं ग्रीटिंग कार्ड ऑफिसच्या पत्त्यावर आलं, ते वगळता काही संपर्क नव्हता. माझंही मुंबईला जाणं झालं नाही.

एके दिवशी अचानक म्हात्रेशेटचा फोन आला.

"जिमी मेला."

कुठलीही प्रस्तावना न करता म्हात्रेशेट म्हणाले. सुन्न होऊन मी ऐकत राहिलो. अंबरनाथजवळ दगडाच्या कुठल्यातरी खाणीत त्याचं प्रेत मिळालं. दोनतीन दिवस तसंच पडलेलं, सडलेलं, कुजलेलं. हल्ली तो रात्र रात्र घरी येत नसे. दोन दिवस आला नाही म्हणून महानाजने पोलिस कंप्लेंट केली तेव्हा हा प्रकार समजला.

"मारून टाकलं रे मादरचोदांनी त्याला..." म्हात्रेशेट फोनवर हमसून हमसून रडत होते. मलाही कढ आवरेना, मी फोन कट करून टाकला.

तीनचार महिन्यांत ओसवालचं टेकओवर बिड यशस्वी झाल्याची बातमी सीएनबीसीवर पाहिली. आज ते हॉटेल एका आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी समूहाचा भाग आहे. ओसवालने आपलं उखळ चांगलंच पांढरं करून घेतलं.

दैववशात प्याद्याचा वजीर होतो. मग तो वजिराच्या कर्माला बांधला जातो. त्याचं परत प्यादं होऊ शकत नाही. हा वजीर मात्र प्याद्याच्या मोलाने गेला. खेळणार्यांनी पट आवरून ठेवला.

माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर मी आयुष्यात परत बेरी पुलाव खाऊ शकलेलो नाही.

(समाप्त)

कथा

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

24 Dec 2013 - 10:27 pm | अत्रन्गि पाउस

अतिशय हादरून जायला झालं ...दाटस इट ..

अर्धवटराव's picture

24 Dec 2013 - 10:44 pm | अर्धवटराव

हि सत्यकथा आहे का हो साहेब? नसल्यास शेवट नाहि आवडला :(
चांगला होता कि पारशी बाबा... कशाला त्याला सामान्यांच्या लायनीत उभा करुन आडवा केलात... :(

मिसळपाव's picture

24 Dec 2013 - 10:44 pm | मिसळपाव

पण शेवट पिचपिचीत वाटला. टिकाकार असतो तर "चटकन पकड घेणारा गाभा, ओघवतं वर्णन, मोजक्या शब्दात प्रसंग रेखाटणारी धाटणी असलेल्या या गोष्टिचा शेवट मात्र सपक, सरधोपट केल्यामुळे खिळवून टाकणारी ही गोष्ट अकस्मात साध्याशा कारणाने संपते आणि वाचकाचा थोडा हिरमोड होतो. मात्र या लेखकाकडून सशक्त लेखनाची अपेक्षा आहे" असा अभिप्राय दिला असता!

पण आदूबाळ, सुरेख भट्टी जमली आहे. टिकाकाराचं शेवटचं वाक्य अगदि बरोबर आहे!

ता. क. - कीत्ती दिवसानी 'हिरमोड' आठवला...

बॅटमॅन's picture

24 Dec 2013 - 10:47 pm | बॅटमॅन

च्यायला ....................... :(

आदूबाळ *&^%$!!!!! काय बे हे. असो.

सुन्दर कथा..

विनोद१८

मी-सौरभ's picture

24 Dec 2013 - 11:04 pm | मी-सौरभ

माझ्या पहिल्या जॉब मधल्या 'बावा' सहकार्‍यांची आठवण झाली

खेडूत's picture

24 Dec 2013 - 11:12 pm | खेडूत

कथा आवडली! शैली त्याहूनही आवडली!

लॉरी टांगटूंगकर's picture

25 Dec 2013 - 11:12 am | लॉरी टांगटूंगकर

कथा आवडली! शैली पण आवडली!

खटपट्या's picture

24 Dec 2013 - 11:52 pm | खटपट्या

आवडली

मोदक's picture

25 Dec 2013 - 12:59 am | मोदक

!!!!!!!!!!

सत्यकथा नसावी अशी इच्छा आहे.

प्रभावी लिखाण आदूबाळ.

प्रभाकर पेठकर's picture

25 Dec 2013 - 1:16 am | प्रभाकर पेठकर

भयानक. हादरवून टाकणारं कथानक. अंशतः सत्यकथाच असावी असे वाटते आहे (शेवट मुद्दाम कलाटणी दिल्यासारखा जाणवला). कदाचित जिमी दारूच्या आहारी जाऊन मेला असावा. असो.

कथा चांगली जमली आहे.

पिंपातला उंदीर's picture

25 Dec 2013 - 9:29 am | पिंपातला उंदीर

झक्कास

अनुप ढेरे's picture

25 Dec 2013 - 9:42 am | अनुप ढेरे

खूप आवडली गोष्ट. प्यादं आणि वजीराची वाक्यं पण खासचं

सत्यकथा नसावी अशी इच्छा आहे. +१
बाकि खूप आवडली गोष्ट. +१

जे.पी.मॉर्गन's picture

25 Dec 2013 - 1:51 pm | जे.पी.मॉर्गन

दोन्ही भाग एकदम वाचले. पहिल्यात जिमीचं व्यक्तिचित्र अजून ठसलं असतं तर दुसर्‍या भागातला झटका अजून जोरात लागला असता. शेवट थोडा आवरता घेतल्यासारखा वाटला. अजून एक भाग वाढवला असतात तरी चाललं असतं.

पण जिमी मनाला चटका लावून गेला.....छान वाटलं वाचायला !

जे.पी.

आतिवास's picture

25 Dec 2013 - 2:12 pm | आतिवास

मलाही शेवट थोडा आवरता घेतल्यासारखा वाटला.
परिणामकारक लेखन.

खुप सुरेख किस्सा..शेवट अतिशय दारुण आहे. :(

पु.ले.शु.

अभ्या..'s picture

25 Dec 2013 - 4:19 pm | अभ्या..

मस्त जमलेय आदूबाळा.
एकदम आवडले.
थोडे अनंत सामंत आठवत होते पण जिमीचे केलेले निरिक्षण अन प्रभावी भाषाशैली, थोड्क्यात आटपलेले कथानक अन शेवटचा धक्का हे जमून आलेय.
मस्त मस्त.

प्यारे१'s picture

25 Dec 2013 - 5:12 pm | प्यारे१

हे बेक्कार आहे राव!

पैसा's picture

25 Dec 2013 - 7:17 pm | पैसा

अतिशय परिणामकारक शैली आहे तुमची! अगदी समर्थपणे दुसराही भाग लिहिलाय. माणसाला ती ती वेळ तसं वागायला लावते बरेचदा.

नाखु's picture

26 Dec 2013 - 1:45 pm | नाखु

ना पाल्हाळ ना "पाणि टाकू" भावनांचा (अतिरेक्)..कदाचीत आपण नियतीच्या पटावरच्या सोंगट्या आहोत हे या कथेवरून दिसते.पु.ले.शु.

जॅक डनियल्स's picture

30 Dec 2013 - 11:40 am | जॅक डनियल्स

फार सुंदर लिहिले आहे. वक्तिचित्र वाचताना सिडीने शेल्डन ची आठवण झाली.
शेवट काय होणार याचा अंदाज आला होता, तरी सुद्धा लेखाची पकड शेवट पर्यंत होती. बारीक सारीक बारकावे खूप मस्त पणे टिपले आहेत. अजून लेख येउदेत.

जेम्स वांड's picture

6 Apr 2018 - 7:41 pm | जेम्स वांड

कसलं अतिरेकी भयानक हाहाकारी सुंदर लिहिता हो तुम्ही. व्यक्तिचित्रण तुमच्या पायाशी बसून शिकावे इतकं उत्तम!!.

जिमी सोबत तुमच्याजागी मीच त्या शिडीवजा जिन्यावरच्या ब्रँच मध्ये बसलोय इतपत समरसून गेलो. तुम्ही आजकाल जास्त लिहीत का नाही, असा आगाऊ भोचक प्रश्न विचारणे जमत नाहीये पण तुम्ही अजून खूप खूप लिहावेत ही विनंती नक्कीच करतोय मी इथे!. च्यायला आता दरवेळी बेरी पुलाव समोर आला की जिमी सेठना आठवत राहणार