डिसेंबर........

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 4:26 am

ऐन डिसेंबरात आभाळ दाटून आलंय. ते तसे नेहमी एखाद्या दिवशी होतंच. "डिसेंबर" खरं तर मासानां मार्गोशीर्षोहमः म्हणावा असा. डिसेंबर म्हणजे नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली असते. सुट्टी संपवून शाळा कॉलेजे रुळावर येत असतात. गॅदरिंग चे वेध लागलेले असतात. दिवाळीच्या सुट्टीचा म्हणा की मस्त थंड हवेचा परीणाम म्हणा बहुतेक जण दुपारी सुद्धा उत्साही असतात. घरी कसाबसा एखादा कप चहा पिणारे मस्त पैकी आलं टाकून केलेल्या वाफाळत्या चहाचे दोन तीन राउंड सहज करतात.

सकाळचे कॉलेज असणारांची तर एक वेगळीच मजा असते. भल्या पहाटे अंथरुणावरुन बाहेर पडायची इच्छा नसते. गोधडीवर गोधडी "एक पाच मिनीटानी उठु" म्हणत पुन्हा गुडूप झोपतात. अशा घोरासूराना उठवायची एक मस्त ट्रीक कामी येते. घरभर वाफाळत्या आल्याच्या चहाचा सुवास दरवळतो. त्या मस्त गंधाने गारठा माघार घेतो. आपण एकदम फ्रेश होतो. मरगळ कुठे गायबते ते समजत देखील नाही. सुस्ती एकदम जादु झाल्यासारखी नाहीशी होते.
कॉलेज मधे तर एक वेगळाच माहौल असतो. एरवी काकूबाई छाप डार्क बदामी ,लाईट ग्रे, फिक्का मरून , असल्या मळखाउ रंगाना हद्दपार केलेले असते. पोपटी केशरी गुलाबी लाल जांभळा लेमन यलो अशा उत्साही रंगांची झगमग सुरु झालेली असते.
असे रंगीबेरंगी कपडे अंगावर असले की उत्साह अजूनच वाढतो.

कॉलेज कॅन्टीनला तिखट जाळ वडापाव आण गरमागरम कटिंग चहाच्या साक्षीने पीजे अर्थात डबड्या जोक्स च्या मैफिली सुरु होतात. एकातुन एक त्यातून अजून एक असे विषय निघत जातात. थेट मागच्या वर्षीच्या गॅदरिंग पर्यन्त जातो. गॅदरिंग च्या नाटकात काय धमाल झाली होती पासून लीना प्रधान ला मिळालेले फिशपाँड पर्यन्त चर्चा होत रहाते. या वर्षी देण्यासाठी जिलब्या पाडाव्या तशा चारोळ्या पडत असतात. गॅदरिंगच्या ऑर्केस्ट्रात दर वर्षी गायले जाणारे "दोनो ने किया था प्यार मगर. मुझे याद रहा तू भूल गया..... मैने तेरे लिये रे जग छोडा......" हे गाणे कोण गाणार याच्या चर्चा झडतात.

फर्स्ट इयर च्या मुलाना याची कल्पना नसते. त्यामुळे त्याना नईलाजाने ऑडियन्सची भूमिका घ्यावी लागते. पण त्यांच्या चेहेर्‍यावरची उत्सूकता आणि डोळ्यातील चमक बरेच काही सांगून जाते. आपणही हे असले क्षण मनात टीपत असतो.

गॅदरिंग मिस करायचे नाही. हा डोक्यातला विचार चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत असतो.
डिसेंबर महिन्यातील हवेचा परीणाम असो की नुकत्याच संपलेल्या दिवाळीचा. वातावरणात एक वेगळीच जादू असते.
नक्की काय ते सांगता येणार नाही.

चला आला धुंदूर मास. म्हणत आज्जी कधी गुळ घालुन मस्त गोडसर बाजरीच्या भाकर्‍या अन हिरव्या मिरच्यांचा ठेचा करायची. हिरव्या मिरचीचा सणसणीत तिखटजाळ कमी व्हावा म्हणुन सोबतीला ताटात लोण्याचा गोळा असायचा.
कच्चा कांदा मिर्चीचा ठेचा बाजरीची भाकरी अन सोबत तो लोण्याचा पांढरा शूभ्र गोळा. ही माझ्या लेखी तरी सर्वोच्च चैन आहे. कोणी डिसेंबर असे नुसते म्हंटले तरी मला त्या बाजरीच्या भाकरीचा खरपूस वास येतो.
डिसेंबरात लग्नांचा सुकाळ असतो. त्यामुळे बरेच महीने न भेटलेले सगे सोयरे मित्र नातेवाईक भेटत असतात. भेटल्यावर गप्पाना अक्षरश ऊत येतो. " अरे हो....... सकाळी लवकर उठायचे आहे." म्हणत रात्री किमान एक दीड पर्यन्त गप्पांचा जागर सुरूच रहातो.

डिसेंबर असतो स्नेह सम्मेलने काव्य सम्मेलने पुस्तक जत्रा आणि अशाच बर्‍याच सम्मेलनांचा. एकीकडे एकांकिका स्पर्धा. त्यातले ते जग वेगळेच असते. सदैव कसल्यातरी अचाट विचारानी भारलेलं. फुटकळ रोल असला तरी तो रोल ही पुढच्या भवितव्याची नांदी आहे या ठाम विश्वासावर अर्ध्या पाऊण तास चालणार्‍या एकांकिकेत नवं जग उभे करत त्यात जान ओतण्याचं सामर्थ्य त्या विश्वासत असते..

गावोगावी कोणती ना कोणती साहित्य सम्मेलने भरवली जातात. त्या निमित्ताने मोरोपंतांपासून नायगावकरांपर्यन्त नावे उगाळली जातात. त्यायल्या एखाद्या कार्यक्रमात शाळेत आठवी नववीत शिकलेली "नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूस.. माझे घर चंद्रमौळी .आणि दाराशी सायली.." ही इंदीरा संतांची कविता ही कविता संतूरच्या पार्श्व भूमीवर ऐकताना नव्याने भेटत जाते. कवितेचा शब्द न शब्द अंगभर संतुरचे झंकार उमटवतो.

डिसेंबर हा महिना गाण्याच्या, संगीताच्या मैफलींचा. नव्या जुन्या गायकाना ऐकण्याचा. त्या निमित्ताने पूर्वी ऐकलेल्या कुमार गंधर्व,शोभा गुर्टू, जसराज्, भीमसेन जोशी यांच्या मैफलींच्या आठवणीना उजाळा देण्याचा. हरीप्रसाद चौरसियांच्या बासरीवर ऐकलेला मालकंस, शिवकुमार शर्मानी संतूरवर छेडलेला हंसध्वनी आणि त्याला झाकीर हुसेन नी केलेली दणकेबाज साथ. त्याला मिळालेली टाळ्यांची छप्परफाड दाद. यांचे गारूड मानगुटीवरून उतरता उतरत नाही.
अशाच एखाद्या कार्यक्रमा कोणीतरी "आज जाने की जीद ना करो." ऐकवतं "रंजीशे सही......" ऐकवतं आपण पार हरवून जातो आणि नंतर स्वतःला कशाकशात शोधत रहातो.

डिसेंबर महिना असतो आकाशाचा. स्वच्छ निरभ्र आभाळ पहाण्याचा. शाळेत लहान असतानी मी निरभ्र या शब्दाचा अर्थ "निरभ्र म्हणजे अभ्रा न घातलेला" असा सांगितला होता. ते माझं निरभ्र वय होतं. कुठलाच अभ्रा, आवरण न चढवलेलं. जसं आहे तसं. डिसेंबरातलं आकाश तसंच असतं. डिसेंबरात संध्याकाळी मावळतीचं सूर्यबिंब दिसतं. ते जाणवतं ते त्याच्या पार्श्व भूमीवर उडणार्‍या पतंगाच्या हालचालीने. ईग्रजी व्ही च्या आकारात आकाशात उडणार्‍या बगळ्यांच्या माळे मुळे. डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात. हे कमी पडेल वाटले म्हणून की काय वृश्चिक राशी इंग्रजी एस आकारात आकाश व्यापून त्यातल्या अनुराधा मूळ ज्येष्ठा नक्षत्रानी दिवाळी साजरी करत असते.

( क्रमशः)

संस्कृतीमुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मिसळपाव's picture

8 Dec 2013 - 5:47 am | मिसळपाव

आमचं ईजुभाऊना कुणी मोंबासा - ठोंबासानं काळी जादू करून परत लायनीवर आणलं वाटतं! आणि लेखाचा शेवट फारच आवडला - 'क्रमशः' :-)

विटेकर's picture

8 Dec 2013 - 6:54 am | विटेकर

अत्यन्त सकस ललेखन
दिल.खूष. हुआ

पैसा's picture

8 Dec 2013 - 9:45 am | पैसा

प्रचंड आवडलं! शेवटचं क्रमशः वाचून तर लै गारेगार वाटलं!!

सोत्रि's picture

8 Dec 2013 - 10:04 am | सोत्रि

गुलाबी थंडीत, उबदार रजईत वाफाळता चहा घेताना ज्या भावना असतात नेमक्या त्याच भावना हा लेख वाचून झाल्या.

धन्यवाद हो विजूभौ!

-(नॉस्टॅल्जिक झालेला) सोकाजी

अर्धवटराव's picture

8 Dec 2013 - 10:05 am | अर्धवटराव

अगदी खरं खरं सांगा...
किती वर्षांनी भेटली आज 'ति' ??

यसवायजी's picture

8 Dec 2013 - 10:45 am | यसवायजी

छान लिहिलंय..
@

आज्जी कधी गुळ घालुन मस्त गोडसर बाजरीच्या भाकर्‍या अन हिरव्या मिरच्यांचा ठेचा करायची. हिरव्या मिरचीचा सणसणीत तिखटजाळ कमी व्हावा म्हणुन सोबतीला ताटात लोण्याचा गोळा असायचा.

आज सक्काळ्-सक्काळी घरी फोन झाला.. आज चंपाषष्ठी. बाजरीची भाकरी, वांग्याच्या भाजी + भरीत, मसालेभात + वरण-भाताचा मेन्यु आहे.
तुम्ही जखमेवर मीठ चोळ्ळत.. :P

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2013 - 11:01 am | प्रभाकर पेठकर

बाजरीची भाकरी, वांग्याच्या भाजी + भरीत, मसालेभात + वरण-भाताचा मेन्यु आहे.
तुम्ही जखमेवर मीठ चोळ्ळत..

आणि तुम्ही आमच्या जखमेवर.

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2013 - 11:00 am | प्रभाकर पेठकर

एन. आर. आय. म्हणून विजूभाऊ जोहान्सबर्गात आता स्थिरावलेले दिसत आहेत. 'माहेर'च्या आठवणींनी व्याकूळ होणं हे, 'ते' वातावरण आता तुटल्याची जाणीव जशी 'सासुरवाशीणी'ला सुरुवातीच्या काळात मनाला टोचत असते तशी 'नवएनआराआय'ला नविन देशात/वातावरणात स्थिरावताना होते. एकदा स्थिरावल्यावरही 'मेरा कुछ साSSमान तुम्हाSरेSS पाSSस पडा है। ही भावना मनाला छ्ळत राहतेच.

एकूण वर्णन आणि भावनोल्ल्हास अगदी मनाला भिडणारा आहे. लिहीत राहा, विजूभाऊ. तुमच्यामुळे माझ्यासारख्या 'मुरलेल्या' सासुरवाशीणीलाही 'घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात...'च्या आठवणी मनाला गुदगुल्या करतात आणि मनाची मरगळ खाली बसून उल्हासित हवेचा सुगंध 'सासुरवास' सुसह्य करतो.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

+१

लेखासाठी: ये बात विजूभाऊ!

मुक्त विहारि's picture

8 Dec 2013 - 11:05 am | मुक्त विहारि

मस्त...

बाकी....

(तुमचा लेख आणि अद्याप बिरुटे सरांचा प्रतिसाद नाही.... हे बघून जरा खंतावलो.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2013 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौचा काही लेख विचार आमच्या जालीय मित्रांच्या जीवाभावाच्या गोष्टी असतात त्यांच्या लेखनावर, प्रतिसादावर आमचं लक्ष असतं आणि त्यांच्या अशा हळव्या लेखावर आमची हजेरी जवळ जवळ असतेच. :)

-दिलीप बिरुटे

हे असेच जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध फक्त इथे पहायला मिळतात.

सुहास..'s picture

8 Dec 2013 - 11:43 am | सुहास..

आवडेश ! और भी आने दो !!

प्यारे१'s picture

8 Dec 2013 - 1:20 pm | प्यारे१

आहाहा...

मस्तच लिहीलंय. अजून येऊ द्या.

तुमचा अभिषेक's picture

8 Dec 2013 - 2:25 pm | तुमचा अभिषेक

सुंदर लिहिलेय...
खरेच डिसेंबर असतो असा..
किंवा असायचा..
हल्ली मुंबईतून थंडी पळाली आहे, कॉलेज संपल्याने तेथील मजाही .. असो, पण हे वाचताना बरे वाटले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2013 - 2:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ विजुभौ आपलं काय ठरलं होतं...! असे हळवे करणारे विषय नै घ्यायचे म्हणून. :)

लेख आवडला. महाविद्यालयाच्या काळातला म्हणजे शिकत असतांनाचा डिसेंबर भन्नाट असायचा. आम्ही पोरं सकाळच्या आठच्या पिरेडला घरुन निघायचो आणि कॉलेजला जावून भिंतीला टेकून उन खात बसायचो. जाता येता जिथं पोरी दिसतील त्याच बाजूला उन्हात उभं राह्यचो. हाय हॅलो व्हायचे. भित्तीपत्रकं, कवी संमेलने, स्नेहसंमेलने, नृत्य, नाटक याच्या गप्पा करायचो. नुसत्या मजेमजेचा काळ.

'ओ मेरे सामने बैठी है मगर उससे कुछ बात ना हो पाती है' हे ग्यादरिंगमधलं मित्रांनी म्हटलेलं गाणं आम्ही कितीतरी दिवस इंजॉय करायचो.

आता आम्ही मास्तराच्या भूमिकेत आणि तोच डिसेंबर पोरं नव्याने आमच्या आजूबाजूला थोड्याफार फरकाने तसाच जगत असतात. बाकी, बाजरीची चुलीवरची कडक भाकर, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कधीकधी चरचरीत माशांचा रस्सा. अगं माय गं...! असो.

विजुभौ, शेवटचा पॅरेग्राफ लंबर एक. वरीजनल डिसेंबर....! येऊ द्या पटापट पुढील भाग.

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

11 Dec 2013 - 7:59 pm | विजुभाऊ

येऊ द्या पटापट पुढील भाग.

आपका हुकूम सर आखों पर

हरिप्रिया_'s picture

8 Dec 2013 - 3:47 pm | हरिप्रिया_

अहाहा!! मस्त मस्त!!!
:)

भाते's picture

8 Dec 2013 - 3:57 pm | भाते

विजुभाऊ, तुमच्याकडून नेहमीप्रमाणे चानचान वाचायला मिळाले.

चाणक्य's picture

8 Dec 2013 - 4:29 pm | चाणक्य

मस्ता वाटलं वाचताना. पु.भा.प.टा.

प्राध्यापक's picture

8 Dec 2013 - 6:59 pm | प्राध्यापक

विजु भौ,लई भारी......
चला आता खरा डिसेंबर आल्यासारखा वाटला.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2013 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

@शाळेत लहान असतानी मी निरभ्र या शब्दाचा अर्थ "निरभ्र म्हणजे अभ्रा न घातलेला" असा सांगितला होता. ते माझं निरभ्र वय होतं. कुठलाच अभ्रा, आवरण न चढवलेलं. जसं आहे तसं. डिसेंबरातलं आकाश तसंच असतं.>>> __/\__

चावटमेला's picture

9 Dec 2013 - 11:24 am | चावटमेला

लै म्हणजे लै भारी वाटलं लेख वाचून.

सस्नेह's picture

9 Dec 2013 - 4:28 pm | सस्नेह

डिसेंबर ऐवजी मार्गशीर्षच शोभतो लेख वाचून.

विजुभाऊ's picture

10 Dec 2013 - 4:30 pm | विजुभाऊ

स्नेहांकिता , बिरुटे सर ..सहमत

बॅटमॅन's picture

10 Dec 2013 - 5:21 pm | बॅटमॅन

आहाहा!!! गोधडीत गुरफटून मस्तपैकी उबदारपणे टीव्हीवरील म्याच बघत बसावी, वाफाळत्या कांदाभजीची प्लेट समोर असावी, त्या वासाला आणि गोधडीच्या उबेला भुलून घरच्या पाळीव मांजराने तिथेच ठाण मांडावे तसं वाटलं बघा हा लेख वाचून एकदम. आपण झोपलो असताना त्याची ती गुर्रगुर्र एकदम जाणवावी आणि आपल्याला जाग यावी, आंघोळ परम जुलुमाने करावी पण केल्यावर थंडी पळून जावी अन गलासभर दूध पोटात भरून उंडारण्यासाठी सैकल काढावी इ.इ.इ. अनेकोत्तम आठवणी या थंडीशी निगडित आहेत.

बाकी लेख आवडलाच, पण त्यातही

"डिसेंबर महिना असतो आकाशाचा. स्वच्छ निरभ्र आभाळ पहाण्याचा. शाळेत लहान असतानी मी निरभ्र या शब्दाचा अर्थ "निरभ्र म्हणजे अभ्रा न घातलेला" असा सांगितला होता. ते माझं निरभ्र वय होतं. कुठलाच अभ्रा, आवरण न चढवलेलं. जसं आहे तसं. डिसेंबरातलं आकाश तसंच असतं. डिसेंबरात संध्याकाळी मावळतीचं सूर्यबिंब दिसतं. ते जाणवतं ते त्याच्या पार्श्व भूमीवर उडणार्‍या पतंगाच्या हालचालीने. ईग्रजी व्ही च्या आकारात आकाशात उडणार्‍या बगळ्यांच्या माळे मुळे. डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात. हे कमी पडेल वाटले म्हणून की काय वृश्चिक राशी इंग्रजी एस आकारात आकाश व्यापून त्यातल्या अनुराधा मूळ ज्येष्ठा नक्षत्रानी दिवाळी साजरी करत असते."

हा प्यारेग्राफ फारच भावला. डिसेंबरातल्या अनेक संध्याकाळी मिरजेच्या आसपास आणि खुद्द मिरजेच्या गल्ल्यांत केलेल्या एकांती फेरफटक्यात दिसणारं आभाळ जाणवत राहिलं.

गणपा's picture

10 Dec 2013 - 6:07 pm | गणपा

एप्रिल फळां नंतर आता डिसेंबरातील 'गुलाबी' थंडी.
हौन जावद्या जंगी मालिका. :)

युगन्धरा@मिसलपाव's picture

10 Dec 2013 - 6:22 pm | युगन्धरा@मिसलपाव

अहो मस्तचं लिहिल आहे.............. पुरानी यादे ताजा कर दी.

राही's picture

10 Dec 2013 - 7:02 pm | राही

कार्तिक-मार्गशीर्षातले निरभ्र आकाश ज्यांना अजूनही पहायला मिळते त्यांचा हेवा वाटतो. मुंबईत कुठूनही, कितव्याही मजल्यावरून पहा, तारे तारका दिसतच नाहीत. एक तर इमारती आड येतात आणि दुसरे म्हणजे जमिनीवरचा प्रदूषित पिवळा प्रकाश आकाशातल्या त्या शुद्ध निरभ्र अंधाराला धुरकटून, काळवंडून टाकतो. गडद-गंभीर खोल अंधार कधी अन्य्भवायला मिळतच नाही. नितळ नीरव अंधारात आपले श्वासोच्छवास आपल्याला स्पष्टपणे ऐकू यावे, त्या अंधारात 'पहावे आपणासी आपण' अशी अवस्था होऊन आपण स्वतः आपल्याला लक्ख दिसू लागावे आणि अचानक 'प्रकाशू' उजळावा, काळोखाच्या त्या प्रकाशाने आपले डोळे दिपून जावे असे क्षण फार कमी वेळा वाट्याला येतात. 'मध्यरात्रि नभघुमटाखाली, शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी..' बोरकर आठवतातच..
आपल्या लेखाने हे सर्व विचार जागे झाले, धन्यवाद.
जाता जाता : डिसेंबरच्या शेवटी शेवटी घनदाट थंडीत उघड्यावर कधी उल्कावर्षाव अनुभवला आहे का?

प्रदीप's picture

10 Dec 2013 - 7:48 pm | प्रदीप

प्रसन्न, व आठवणी चाळवणारे लिखाण.

पुलेप्र.

सुरेख लिहिले आहे विजूभाऊ. फार आवडले.

भावना कल्लोळ's picture

18 Dec 2013 - 3:17 pm | भावना कल्लोळ

विजु भौ … लय मस्त बगा

निमिष ध.'s picture

10 Dec 2013 - 9:13 pm | निमिष ध.

मस्त लेख विजुभाउ. डिसेंबर मधल्या आठवणी जाग्या झाल्या. संगमनेरला असताना थंडी मध्ये सायकली वर मफलर बांधून शाळेत जाणे. मुद्दामून कोपर्यावर मित्रांबरोबर रेंगाळणे. रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जाणे आणि पाववडा खाणे.

आणि पुण्यात असताना कॅम्प मध्ये डिसेंबर निमित्त सजावट पाहण्यासाठी जायचे (पण खरे कारण म्हणजे एम जी रोड आणि इस्ट स्ट्रीट वरील सृष्टीसौंदर्य पाहायचे असायचे)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2013 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखादा दिवस आणि तीही डिसेंबरातली सायंकाळ. मंदिराच्या परिसरात तू आणि मी आपल्याच नादात. मंदिरात किती ती शांतता. भजनाचे हलके सूर तेव्हाच तुझ्या माझ्या गप्पांना पूर. पु.शि.रेगे म्हणतात 'तशी झाडं पानात यायला लागतात. आकाशाच्या खिडक्या मिटायला सुरुवात होते' तु चाफ्याची फुलं ठेवतेस माझ्या हातात. थंडीतला उबदार स्पर्श. दूर झाडीतून एक थंड हवेची झुळुक हलकेच तुझ्या माझ्यातून वाहात जाते, 'किती थंड असतो रे तुझा तळहात' अंगावर सांडलेली ऊब मला काहीच सूचू देत नाही. तु हलकेच अंगावरुन मोरपिस फिरवावा तशी हलके हलके बोलत असतेस. मी निरखत असतो तुला.. 'वा-याच्या बोटांनी तुझ्या चेह-याची तळाशी गेलेली पाने भराभरा उलगडून पाहतो, ही नाधोंची ओळ मला आठवून जाते. तु मला मी तूला वाचत असतो. सर्वांगातून लहरत जातो आपण. मंदिरात आता शांतता 'आता निघलं पाहिजे' थंडीत तुला काहीही सुचतं जातं. किती वर्ष जगु रे आपण. मी हसतो तुला. चल, आता निघलं पाहिजे. एकमेकांचे हात एकमेकांच्या हातातून सुटत नाही. तीच ओढ, तीच हुरहुर, निरोप घेतांना डोळ्यात दाटलेलं आभाळ आपण दिसू देत नाही, दूरपर्यंत जातांना पाहात राहतो मी तुला आणि माझं एकेक पाऊल तुझ्याभोवतीच रेंगाळत चालते डिसेंबरातल्या एका सायंकाळी.

-दिलीप बिरुटे

कोमल's picture

11 Dec 2013 - 5:07 pm | कोमल

क्या बात है..
सुरेखच.

वाचतेय.. पुभाप्र.

विजुभाऊ's picture

15 Dec 2013 - 12:24 am | विजुभाऊ

पुढील भाग http://misalpav.com/node/26437