टबुडी टबुडी जसवंती

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 6:46 pm

गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्‍हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्‍या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती. नवरा, बायको, त्यांची छोटी मुलगी,जसवंती,एक म्हातारी आणि एक मुनीम. घरांत एक चोवीस तासांचा नोकरही होता. तो खास, या नवर्‍याला सांभाळायला ठेवला होता. कारण,हा नवरा साधारण तिशीचा असला तरी वेडा होता. कुणा गरिबाघरच्या सुस्वरुप मुलीशी त्याचे लग्न करुन देण्यात आले होते. त्याचे मानसिक वय ८-१० वर्षांचे होते. होता अगदी निरागस मनाचा. पण जेंव्हा झटका येई तेंव्हा दोघांनाही आवरत नसे. मुनीम एखाद्या हिंदी सिनेमात दाखवावा तसा लबाड होता. प्लॉट एकदम फिल्मी, पण खराखुरा! प्रचंड प्रॉपर्टी मुलाच्या नांवावर. मुलगी छान बाहुलीसारखी, पण मुनीमजीच्या चेहेर्‍यात आणि तिच्यात साम्य आहे,अशी शेजारपाजारी कुजबुज!

रहायला आल्यावर आई-नानांना हा प्रकार कळला.हळुहळु संवय झाली. तो मुलगा हुंदडत आमच्या घरांत घुसे,माझ्या आईकडे खाऊ मागे. त्याला माझ्या आई-नानांचा लळा लागला. चाळीतले बाकी लोक त्याला अत्यंत घाबरायचे आणि अर्थातच टाळायचे.त्या मुलाला सकाळी नोकर खालच्या अंगणात घेऊन जाई. तिथे, कोवळ्या उन्हात त्याच्यासाठी खुर्ची मांडे. मग तो,नाईट ड्रेसमधे,मोठ्या ऐटीत त्या खुर्चीवर बसून एकच गोष्टीचे पुस्तक हातात धरुन मोठ्यांदा वाचू लागे.

अंधेर नगरी,गंडु राजा
टक्का सेर भाजी, टक्का सेर खाजा.

पुस्तकांत प्रत्यक्षांत काय लिहिलेले असायचे कुणास ठाऊक. पण हे वाचल्यावर त्याला रोज तितकेच खदखदून हंसु येत असे. त्याचे त्याच्या मुलीवर कमालीचे प्रेम होते. तिला खेळवत तो लाडाने "टबुडी, टबुडी जसवंती" असे म्हणत असे. मुलीला मात्र तो कधीच इजा करत नसे.

आमच्या घरांत येऊन तो आई-नानांबरोबर कॅरम खेळत असे. म्हणजे बोर्ड आमचा आणि सोंगट्या त्याच्या. त्याचा नेमही बर्‍यापैकी लागत असे. जिंकला की त्याला हर्षवायु व्हायचा.पण हरला की रागाने सर्व सोंगट्या गोळा करुन स्वारी घरी धूम ठोकत असे.मोठा खोडकर स्वभाव होता त्याचा. आमच्या घरांत एक आरामखुर्ची होती.नाना त्यांत संध्याकाळी दमून आले की विसावायचे. हा मुलगा कोणाचे लक्ष नसताना,वरचा एक दांडा काढून कापड होते तसे लावून ठेवायचा. बहुतेक वेळा,नाना सावधपणे बसून पडल्याचे नाटक करायचे. तसे झाले की हा दारांत उभा राहून उड्या मारत टाळ्या वाजवायचा आणि मनसोक्त हंसायचा. पण कधीकधी लक्ष न राहून नाना जोरात पण पडले होते, असं आई सांगायची. माझ्या आई-वडिलांना त्याची कणव यायची आणि ते त्याच्याशी माणुसकीने वागायचे.घरी तो कधी अनावर झाला की, तो दुष्ट मुनीम, नोकराच्या मदतीने त्याला उलटा टांगून मिरच्यांची धुरी देत असे. अशा वेळेला तो मुलगा,मालती बेन, वासुभाई असा धावा करायचा. मग नाना त्यांच्याकडे जाऊन त्याला सोडवायचे.तो अगदी स्फुंदत नानांना मिठी मारायचा.

एकदा, नोकरीवरुन परत येताना, बाजारहाट करुन आई दोन्ही हातात मोठ्ठ्या पिशव्या घेऊन घरी आली.दरवाज्याजवळ कुलुप उघडत असताना,हा मुलगा आला, "मालतीबेन, मालतीबेन सुं लाव्या?' आई त्या दिवशी काही कारणाने कावलेली होती. तिने त्याची चेष्टा करत,'पेंडा,बर्फी, गाठिया' असे उत्तर दिले. वेडा असला तरी त्याला ती चेष्टा कळली. अचानक व्हायोलंट होत त्याने आईचे केस गच्च धरले! त्याची पकड जबरदस्त होती.आईला काय करावे ते कळेना.शेवटी तिने कुलुपच त्याच्या डोक्यांत घातले.त्याच वेळी त्यांचा नोकरही धावून आला.त्याला चुचकारत घरी नेले.

नानांना घरी आल्यावर आईने झाला प्रकार सांगितला. पण ते दोघे धीराचे.त्यांनी ती जागा सोडली नाही.कारण दुसर्‍या दिवशी हा मुलगा सोंगट्यांचा डबा घेऊन दारात हजर! चेहेर्‍यावर अपराधी भाव होते, त्याला तोंडाने क्षमा मागता आली नाही तरी त्याच्या आविर्भावावरुन ते कळत होते. नानांनी मुकाट्याने कॅरम बोर्ड काढल्यावर त्याला मनापासून आनंद झाला.
पुढे, आमच्या जन्माच्या आधीच ते कुटुंब जागा सोडून दुसरीकडे रहायला गेले. जाताना तो मुलगा आई-नानांकडे पुन्हा पुन्हा वळून बघत रडत होता. त्यावेळी आईलाही डोळ्यांतले पाणी आवरले नाही.

तळटीपः - माझ्या आईच्या आठवणींतील ही एक सत्यकथा आहे. ती मला जशी उमजली तशी तुमच्यासमोर मांडत आहे. पुढे, कित्येक वर्षांनंतर, दिलीप प्रभावळकरांचा 'चौकटराजा' हा सिनेमा टीव्हीवर बघताना, आमच्यापेक्षाही जास्त आईला रडु येत होते.

कथामुक्तकरेखाटनप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

2 Nov 2013 - 7:25 pm | जेपी

प्रतिक्रीया नाय .

शिवोऽहम्'s picture

2 Nov 2013 - 7:48 pm | शिवोऽहम्

तिमा, चटका लागला अगदी.

जसवंतीच्या वडिलांचा उल्लेख 'मुलगा' असा झाल्याने माझा गोंधळ झाला थोडा.
लेखन 'हृद्य' आहे असंही म्हणवत नाही इतकं परिणामकारक आहे.

तिमा's picture

2 Nov 2013 - 8:26 pm | तिमा

तो जीव बिचारा नांवालाच प्रौढ होता.त्याच्या आंत एक मुलगाच होता.म्हणून मुलगा असा उल्लेख केला आहे.

डोळ्यांसमोर पूर्ण व्यक्तिचित्र उभं केलंत, तुमच्या आई-वडिलांनाही सलाम!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2013 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृदयस्पर्शी !

मुक्त विहारि's picture

2 Nov 2013 - 8:51 pm | मुक्त विहारि

चटका लावलात तुम्ही...

अप्रतिम कथा.

बॅटमॅन's picture

2 Nov 2013 - 8:54 pm | बॅटमॅन

च्यायला. जरा जास्तच परिणामकारक होतं हे. :(

असा एक जीव मीही जवळून पाहिला आहे त्यामुळे थोडेफार रिलेट करू शकतो. एका प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा. बाकीची पोरे त्याची चेष्टा करीत, मी कधी करत नसल्याने माझ्याबरोबर बरंच बोलायचा. अर्धवट होता पण पूर्णपणे नाही. घरचे प्रॉब्लेम्स बरेच होते, ते त्याला कळायचे तेही सांगत असे. पण जनरल बोलण्यात जास्त संगती नसे.

"कसलं गरम व्हायलंय!"
"मी परवा त्या इंदरला कसला मारलो *&&^%!!"
"सचिन काय झाप्पझाप्प शॉट मारला"
"तुझी सायकल पूस रे, किती धूळ लागलीय"

हे आणि इतर २-३ विषयच कायम बोलण्यात रिपीट व्हायचे. पण एक मॅच्युरिटी होती पोरात. त्याचा सख्खा भाऊ शिकला, मेडिकल परंपरा पुढे चालू ठेवली. पण याचे काय त्रांगडे होते कुणास ठाऊक. डीनायल मोड मध्ये गेला असावा बिचारा. पुढे ते कुटुंब दुसरीकडे रहायला गेल्यावर संपर्क तुटला. या लेखाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली....

इन्दुसुता's picture

2 Nov 2013 - 9:34 pm | इन्दुसुता

तिमाजी अप्पा, लेखन आवडले. कथा हृदयस्पर्शी आहे.

पैसा's picture

2 Nov 2013 - 11:04 pm | पैसा

दुर्दैवी जीवाची अगदी चटका लावणारी हकीकत. :(

प्यारे१'s picture

3 Nov 2013 - 12:13 am | प्यारे१

च्च्च्च्च!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2013 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा

......

आदूबाळ's picture

3 Nov 2013 - 1:09 am | आदूबाळ

तिमा - सुंदर लेखन...

शीर्षक जरा वेगळं चालं असतं का?

जसवंती थोडी मोठी होईल तेव्हा तिचं आणि तिच्या बापाच्या भावविश्व कसं असेल याची कल्पना करून थोडं गलबललं...

कवितानागेश's picture

3 Nov 2013 - 12:21 pm | कवितानागेश

:(

यशोधरा's picture

3 Nov 2013 - 12:54 pm | यशोधरा

आई गं.. :(

बाबा पाटील's picture

4 Nov 2013 - 1:12 pm | बाबा पाटील

देवास काळजी... दुसरे काय.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Nov 2013 - 1:38 pm | llपुण्याचे पेशवेll

सत्यं घटनेइतकं मनाचा ठाव घेणारं दुसरं काहीच नाही.

शिल्पा ब's picture

11 Nov 2013 - 10:25 pm | शिल्पा ब

मुलगा "नॉर्मल" नसल्याचं वाईट वाटलंच पण त्याच्याशी लग्न लाऊन दिलेल्या मुलीचही वाईट वाटलं. अर्थात त्यापलीकडे काय करू शकतो?

सस्नेह's picture

12 Nov 2013 - 1:53 pm | सस्नेह

पूर्वी अशा ट्रॅजेडीज आसपास बर्‍याच दिसत.
(अलिकडेही दिसतात पण पहायला वेळ कुणाला असतो ...?)

सूड's picture

12 Nov 2013 - 5:50 pm | सूड

.

सिरुसेरि's picture

22 Feb 2017 - 4:41 pm | सिरुसेरि

अरेरे .. सुन्न करणारे लेखन .

हळहळण्यापलिकडे काही करू शकत नाही! :-(

अभ्या..'s picture

23 Feb 2017 - 1:10 am | अभ्या..

अर्रर्रर्र.