मुलं - काही नोंदी

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
21 Oct 2013 - 12:40 pm

गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

अवनी. वय १७.
गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही !

नीरव,वय १९.
लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध !

रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सरयू.२१ वर्षे.
११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही.

संकेत आणि संध्या.
१४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले.

विरेन.१४ वर्ष.
अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही.

अक्षता. १५ वर्षं.
गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत.

रीमा. वय ८.
कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण..

अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक.

निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे.

अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही.

राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही.

सारिका वय ११
वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही.
आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. :(

केतन. वय १७.
वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत.

संकल्प, वय १२
आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय.

मृण्मयी वय १५.
दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे.

सारंग, वय ८
मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" !
आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो.

निनाद, वय ८
६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये."
निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती.
ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही.

अकल्पिता, वय ४
घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही.

मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?

समाजजीवनमानविचारअनुभव

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

23 Oct 2013 - 11:33 pm | रामपुरी

अरे ये पीएसपीओ नही जानता असं म्हणायचं आहे

बॅटमॅन's picture

23 Oct 2013 - 8:22 pm | बॅटमॅन

पोरांना शिस्त ही लावलीच पाहिजे-प्रसङ्गी मारूनही. पोराच्या अङ्गाला हात लावणे म्हणजे टॉर्चर नव्हे. तितपत निर्दय होणे म्हणजे मुलांचे घातकर्ते होणे नव्हे.

मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारणं हा "क्विक फिक्स" असतो. मारल्याने मुलांच्या मनात भीती निर्माण होते आणि ती गोष्ट पुन्हा करावयास मुलं धजावत नाहीत. परंतू असं केल्याने मुलं त्या कृतीच्या परीणामांपासून अनभिज्ञ राहतात. तसेच कृती आणि तिचे परीणाम यांची सांगड घलणं शिकण्याची संधीही मुलं गमावतात.

याला पर्याय हाच की मुलांना त्यांच्या कृतीचे भले-वाईट परीणाम समजावून सांगणं. मुलांना विश्वासात घेऊन हे केलं की मुलंही समजून घेतात. समजावल्यानंतरही मुलं समजत नसतील तर त्या छोटया मुला किंवा मुलीला बालरोगतज्ञाकडे नेणे उत्तम.

सुबोध खरे's picture

23 Oct 2013 - 9:23 pm | सुबोध खरे

धन्या साहेब, मुलांना अभ्यासाला बसविण्यासाठी मारणे आणी मुल दुसर्या माणसाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर त्यासाठी मारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपले मुल जर आपल्या आई वडिलांच्या किंवा शिक्षकाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर आपण त्याला काही प्रमाणात दहशत बसविणे अत्यंत आवश्यक आहे.मग त्या स्थितीत मुलाला त्याचा अर्थ समजत नसेल तरीही पण उठ सूट मुलाला मारत सुटणे हे वेगळे. आपण म्हणता तशी परिस्थिती हि आदर्श आहे आणी कदाचित अमेरिकेत स्वीकृत केली जाईल. प्रत्येक गोष्ट हि स्थलकाल सापेक्ष आहे.
दुर्दैवाने लोक पूर्णपणे वर्ज्य अशा गोष्टींची आणी करू नयेत अशा गोष्टींची गल्लत करताना आढळतात. चूक आणी गुन्हा यातील अंतर समजावून देणे हे अत्यंत आवश्यक आहे.
असा प्रयत्न एका मुलाने सरकारी कार्यालयात केला असता( मुलाने संगणकाच्या ups ची तार खेचली आणी त्यांची सिस्टीम क्रेश झाली. त्याच्या बापाला( हा आमचा मित्र होता) सरकारी माणसाने हाकलून दिले आणी अर्थातच पुन्हा कार्यालयात पाऊ ल ठेवू नका अशी तंबी दिली त्यानंतर आपल्या मुलाला शिस्त न लावल्याचा पश्चात्ताप त्या बापाला करायची पाळी आली.

धन्या's picture

23 Oct 2013 - 10:53 pm | धन्या

आपले मुल जर आपल्या आई वडिलांच्या किंवा शिक्षकाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर आपण त्याला काही प्रमाणात दहशत बसविणे अत्यंत आवश्यक आहे.

हा परिस्थीती हाताबाहेर गेल्याचा प्रकार आहे.

आई वडीलांनी मुल समजावून सांगण्याच्या वयाचं असताना लाडावून ठेवल्यावर ते मुल थोडं मोठं झाल्यावर असे प्रकार होणारच. असं मुल एकदा धपाटा देऊन शांत बसण्याऐवजी अजून एकदा आई वडील किंवा शिक्षकांवर थुंकेल.

सूड's picture

23 Oct 2013 - 10:59 pm | सूड

अरे एखादा धपाटा घालणे याचा अर्थ मारणे असा करत असशील तर ते तसं नाहीये. मूल राग आला म्हणून चावत असेल आणि समजावूनही ऐकत नसेल तर पुन्हा कोणाला चावलं तर तिथल्या तिथे एक धपाटा घालणे थोबाडीत मारणे म्हणजे चूक नव्हे. मुलाच्या कलानं घेऊ म्हणता म्हणता मुलं डोक्यावर बसायला वेळ लागत नाही. आणि लहानच कशाला मोठ्या मुलांनाही कळलं की आईबाप आपल्या तालावर नाचतायेत की मग मिर्‍या वाटायला कमी करत नाहीत डोक्यावर.

अगदी पाहण्यातलं उदाहरण आहे. मुलाला स्टमक अल्सर झाला म्हणून तो बरा होईस्तवर नोकरी सोडायला लावली घरच्यांनी, विशेषत: आईने! याआधीही खुट्टं काही झालं की कित्येक नोकर्‍या सोडायला लावल्याच होत्या. आता अल्सर बरा होऊन दीडेक वर्ष उलटलं मुलगा घराबाहेर पडायचं नाव घेत नाही की आई ठामपणा दाखवत नाही. कोणी विचारलंच तर मुलाला पाठीशी घालणं असतंच. आता स्वत:चेच पाय स्वतःच्या गळ्यात पडलेत, पण सांगणार कोणाला अशी गत आहे. मुलांवर प्रेम नक्कीच असावं पण फाजील लाड हे असे अंगाशी येतात.

बॅटमॅन's picture

24 Oct 2013 - 1:08 am | बॅटमॅन

सुडक्याशी पूर्ण सहमत!

यसवायजी's picture

23 Oct 2013 - 9:00 pm | यसवायजी

Fondle a son until he is five years of age, and use a stick for another ten years, but when he has attained his sixteenth, treat him as a friend.

c

मारलं, अन त्याच्या मागचं कारण जर समजावता आलं.. तर लै बेष्ट. न्हाईतर पॉर गेलं कामातन..

(आजोबांचा दररोज न चुकता मार खाऊन मोठ्ठा झालेला.. अन अजुन त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा..)

बॅटमॅन's picture

24 Oct 2013 - 1:10 am | बॅटमॅन

लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् | प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||

खरे तर मारण्याची फारशी गरज पडू नये इतपत धाक असला तरी बास. पण हा धाक असणे आणि पोराला कुत्र्यागत जखडून ठेवणे यात तारतम्याने फरक केला पाहिजे.

खटासि खट's picture

24 Oct 2013 - 1:13 am | खटासि खट

आधी स्वतःचं वागणं चेक करून बघायला लागेल असं वाटलं. घरातलं आपलं वागणं एकवेळ कंट्रोल करू. पण बाहेर काय होतं यावर लक्ष ठेवणं हे तितकं सोपं नाही. पण मुलांमधल्या बदलांवर लक्ष ठेवणं, त्याला बोलतं करणं हे जमू शकतं. शक्यतो, ज्या मुलांना आईचं प्रेम मिळतं तिथे कमी समस्या येत असाव्यात (घरचं इतर वातावरण नॉर्मल असल्यास). काही घटना (मृत्यू वगैरे) घडल्यास उदाहरणाने समजावून सांगाव्या लागतात.

या समस्यांबद्दल मितान यांच्याकडून अधिक जाणून घ्यावंसं वाटतंय. बरेच कन्सेप्टस क्लिअर व्हायला मदत होईल.

खटपट्या's picture

24 Oct 2013 - 1:20 am | खटपट्या

आणखी एक प्रसंग

आणखी एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतोय. माझी मोठी मुलगी आणि छोटी मुलगी यात ५ वर्षाचे अंतर आहे. लहान मुलीचा जन्म झाल्यावर मोठ्या मुलीकडे आईचे थोडे दुर्लक्ष होवू लागले. मोठी मुलगी विचित्र वागू लागली. आणि हे स्वाभाविक होते.

आम्ही नेहमी तिला समजावत असू कि छोटी बाळ आहे तो पर्यंत आई तिच्याकडे जास्त लक्ष देणार कारण तिला चालता बोलता येत नाही आहे. एकदा बाळ चालू बोलू लागले कि तिला पण आम्ही दम देणार मारणार सर्व काही तुझ्या सारखे करणार.

बरेच दिवस मोठी गप्प राहिली. एक दिवस म्हणाली कि तुम्ही मला मारून का टाकत नाही? आणि मग बाळाचे लाड करत बसा.

आम्हाला काय करावे सुचत नव्हते. आम्ही निरुत्तर होवून गप्प बसतोय हे बघून ती हेच वाक्य वरचेवर उच्चारू लागली?

बरेच समजावले, मुद्दामून तिच्यासमोर छोट्या मुलीला ओरडायचो. छोटीला काही कळत नसल्यामुळे तिचा प्रश्नच नव्हता.

थोडा अति झाल्यावर माझ्या आई ने एक युक्ती केली. एक दिवस नेहमी प्रमाणे मोठी म्हणाली मला मारून टाका.
त्यावर आई म्हणाली "चला आपल्याला तयारी करायला पाहिजे हिला मारण्याची. कस मारायचे हिला. विचार करावा लागेल "

हा प्रतिसाद मोठीला नवीन होता. ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली कि तुम्ही खरच मला मारणार आहात?

मी म्हणालो, "हो, तुला तेच हवे ना?"

त्यावर आई म्हणाली अरे बघत काय बसलास एक दोरी आण तिचे हात पाय बांधावे लागतील.

हि मात्र बरोबर लागू पडली. मला घट्ट बिलगून म्हणाली कि बाबा मला वाचव. मी सर्व तिच्याकडून कबुल करून घेतले. परत असे बोलणार नाही. बाळाला त्रास देणार नाही. तिने सर्व कबुल केले. त्यानंतर तिने ते वाक्य कधी उच्चारले नाही.

आम्ही कदाचित चुकीचे हि वागले असू. मला माहित नाही. पण मुलांना धाक दाखविल्याशिवाय कधी कधी ती ऐकत नाहीत

स्पंदना's picture

24 Oct 2013 - 5:28 am | स्पंदना

काही चुकीचे नाही वागलात.
माझ्यापण दोन्ही मुलात सहा वर्षाचे अंतर आहे अन मलापण थोडाबहुत हा प्रश्न आला, अजुनही येतो. पण मग तू ताई ना? तू ताई ना? अस म्हणुन आम्ही संभाळुन नेल.
जेंव्हा द्यायला हवेत तेंव्हा दणकेच दिलेले योग्य असतात, फक्त डोक फिरवुन घेउन मारण्याऐवजी सुबोध खरे मह्णतात तसे शांतपणे फटके द्यावे.अगदी डोळ्यात पाहुन्न सांगावे मला आवडत नाही तूला मारायला पण मला असे करणे भाग आहे. माझी मुलगी एका मुलीचे पाहुन थुंकायला शिकली. मी दोनदा सांगितले परत असे केलीस तर तोंडाला चटका देइन, ऐकल नाही...तिसर्‍यावेळी उदबत्ती पेटवली. बाईसाहेब जाम घाबरल्या. चटका द्यायच धाडस माझ्यातही नव्हत, पण आता खरच आई देणार हे तिला पटल.

सुबोध खरे's picture

24 Oct 2013 - 10:52 am | सुबोध खरे

याला सिबलिंग रायव्हलरी म्हणतात पहा http://en.wikipedia.org/wiki/Sibling_rivalry.
यासाठी त्या मुलाची मानसिक तयारी हि आई गरोदर असताना सुरु करावी म्हणजे त्या मुलाला येणाऱ्या भावण्डा बाबत आपले पण निर्माण होईल.

खटपट्या's picture

24 Oct 2013 - 11:14 pm | खटपट्या

छान माहीती. धन्यवाद

सांजसंध्या's picture

24 Oct 2013 - 7:44 am | सांजसंध्या

विचारात पाडणारा लेख. समस्या कशा हाताळाव्यात याबद्दल वाचायला आवडेल.
मिपाकरांच्या प्रतिक्रिया खूप प्रामाणिक. उगीचच धक्का बसला छाप प्रतिक्रिया नाहीत.
मुलाला मारावं कि नाही याबद्दल प्रामाणिक मतं व्यक्त केली आहेत. मितान यांना देखील त्यामुळं उत्तरं देताना सोपं जाईल.

मितान's picture

24 Oct 2013 - 8:43 am | मितान

शिस्त आणि शिक्षेविषयी स्वतंत्र लेख लिहिण्याची प्रेरणा तुम्ही मंडळींनी दिली आहे. विषय डोक्यात तयार आहे. लवकरच लिहिते. :)

अवांतर ! प्रतिक्रीयांचा पाऊस बघून घाबरले ना मी !!!!!! म्हटलं इथे कोणाची जुंपली की काय :))

मुक्त विहारि's picture

24 Oct 2013 - 9:55 am | मुक्त विहारि

जो पर्यंत "मुद्दाम गहन विचार करून कुणी टंकत नाही" तो पर्यंत जूंपत नाही.

पामर's picture

24 Oct 2013 - 10:29 am | पामर

मी ज्या सामाजिक संस्थेसाठी काम करतो, तिथे गेल्या बालदिनानिमित्त आम्ही, सातारा जिल्ह्यात अनाथ मुला-मुलिंसाठी आश्रमशाळा चालवणा-या एका ताईंच अनुभव कथन ठेवलं होतं. ताईंनी सांगितलेले अनुभव पण असेच भयंकर होते.
ताई सांगत होत्या,तिकडे एक १३-१४ वर्षाची एक मुलगी भरती झाली.ती मुलगी भरती झाल्यापासुन कोणालाही जवळ येऊ देत नव्ह्ती.चौकशी केल्यावर समजलं की ती मुलगी घरातुन पळुन आलेली होती. ती वयात आल्यापासुन तिचा सख्खा बापच तिच्यावर,रोज बलात्कार करत होता...आणि तिची आई पण, माझी सवतं म्ह्णुन माझ्याच पोटी जन्माला आली म्हणुन तिला मारहाण करत असे...एक दिवस अगदीच सहन झालं नाही आणि ती मुलगी घरुन पळुन गेली....हे सगळं ऐकताना अंगावर काटा येतं होता....हा लेखं खरोखर अंर्तमुख करणारा आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Oct 2013 - 11:17 am | डॉ सुहास म्हात्रे

लेख आणि प्रतिक्रिया प्रचंड आवडल्या ! कितीतरी जणांनी इतक्या खोलवर विचार करून मत लिहीले आहे तर कित्येक स्वानुभव लख्ख प्रामाणिकपणे लिहीले आहेत. असे सभासद असलेल्या मिपाकुटुंबात असल्याचा अभिमान वाटला !

जो पर्यंत "मुद्दाम गहन विचार करून कुणी टंकत नाही" तो पर्यंत जूंपत नाही.
या विषयावर कुणी गहन विचारी पिंक टाकली नाही याचे खूप समाधान वाटले.

सुबोध खरे's picture

24 Oct 2013 - 12:20 pm | सुबोध खरे

धाग्याने शंभरी गाठली म्हणजे चान्स्लेस सेन्चुरी सारखे वाटले

मराठी कथालेखक's picture

29 Oct 2013 - 2:25 pm | मराठी कथालेखक

मला तरी माझ्या आयुष्यात "मूल नको" असणेच ठीक वाटते आहे.