✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुलं - काही नोंदी

म
मितान यांनी
Mon, 10/21/2013 - 12:40  ·  लेख
लेख
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे. अवनी. वय १७. गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही ! नीरव,वय १९. लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध ! रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. सरयू.२१ वर्षे. ११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही. संकेत आणि संध्या. १४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले. विरेन.१४ वर्ष. अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही. अक्षता. १५ वर्षं. गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत. रीमा. वय ८. कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण.. अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक. निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे. अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही. राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही. सारिका वय ११ वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही. आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. :( केतन. वय १७. वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत. संकल्प, वय १२ आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय. मृण्मयी वय १५. दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे. सारंग, वय ८ मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" ! आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो. निनाद, वय ८ ६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये." निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती. ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही. अकल्पिता, वय ४ घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही. मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
35839 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

बलमनांच्या नोंदी वाचुन

मदनबाण
Mon, 10/21/2013 - 13:03 नवीन
बलमनांच्या नोंदी वाचुन अस्वस्थ व्हायला झालं ! संकेत आणि संध्या यांना तर भयानक अनुभव आलाय ! कोवळ्या वयातच मनावर ओरखडे ! :(
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/23/2013 - 16:00 नवीन
बालमनांच्या नोंदी वाचुन अस्वस्थ व्हायला झालं ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

भयाण आहे सारं. परंतू वाचून

धन्या
Mon, 10/21/2013 - 13:13 नवीन
भयाण आहे सारं. परंतू वाचून धक्का नाही बसला. अशी खुप मुलं आपल्या आजूबाजूला असतात. कळत नकळत आई-वडीलांकडून किंवा पालकांकडून भावनिक शोषण (इमोशनल अ‍ॅब्युज), शारिरिक शोषण (फिजिकल अ‍ॅब्युज) आणि शाब्दिक शोषण (व्हर्बल अ‍ॅब्युज) होत असते. नात्यातील कुणीतरी, शाळेत कॉलेजात किंवा अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये अगदी पालकांकडुनही लैंगिक शोषण होत असते. अशा वेळी मुलांची अवस्था "मुकी बिचारी कुणीही हाकावी" अशी असते. अशा शोषित मुलांच्या पालकांपैकी खुप कमी पालकांना जाणवत असतं की आपल्या मुलांना काही समस्या आहे किंवा आपण चुकीच्या पद्धतीने मुलांना वाढवतोय. खुप कमी मुलं समुपदेशकाकडे (कौन्सेलरकडे), मानसशास्त्रज्ञाकडे (सायकॉलॉजीस्टकडे) किंवा मानसोपचारतज्ञाकडे (सायकीयाट्रीस्ट्रकडे) नेली जातात. मुलांना धपाटे दिल्याशिवाय त्यांना वळण लावताच येत नाही हा आपला गोड गैरसमज असतो. ज्यांनी लहानपणी असे धपाटे खाल्लेले असतात त्यांना त्याचं केव्हढं कौतुक असतं. ते ही परंपरा पुढे चालू ठेवतात. मुलांवर ओरडणे ही तर एक क्षुल्लक बाब असते पालकांच्या दृष्टीने. मात्र या क्षुल्लक बाबींचा मुलांवर काय परीणाम होत असेल याचा विचारच होत नाही. डोक्यावर छप्पर, घालायला कपडे, खायला अन्न आणी शिकायला पुस्तकं दिली म्हणजे आपण जगातले सर्वोत्कृष्ट पालक झालो असं खुप सार्‍या पालकांना वाटतं. मुलांना ह सारं दयायलाच हवं. तो त्यांचा हक्क असतो. पण त्याचबरोबर मुलांना समजून घेणंही गरजेचं असतं. "आम्ही तुझ्यासोबत आहोत" अशी विश्वासाची भावना मुलांच्या मनात निर्माण करणं गरजेचं असतं. सात आठ वर्ष वयापर्यंत मुलांना मोठयांना खुप काही सांगायचं असतं, खुप सार्‍या प्रश्नांची उत्तर मिळवायची असतात. त्यांच्या प्रत्येक हाकेला पालकांनी ओ दयावी अशी त्यांची ईच्छा असते. दुर्दैवाने खुपच पालक हे सारं करतात. खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्रा असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे +१....

मुक्त विहारि
Mon, 10/21/2013 - 13:22 नवीन
"खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्राच असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर." एका "च" ची सुधारणा करावीशी वाटली,ती केली... बाकी आपण मुद्दाम गहन विचार करत नसल्याने तुमचे लेख आणि प्रतिसाद वाचनीय असतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

खरं तर लहान मुल वाढवणं ही एक

मितान
Tue, 10/22/2013 - 12:06 नवीन
खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्रा असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर. >> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मुलांना धपाटे देऊच नयेत,

रामपुरी
Wed, 10/23/2013 - 02:22 नवीन
मुलांना धपाटे देऊच नयेत, मुलांना रागवूच नये हा सुद्धा एक गोड गैरसमज असतो, एवढेच नमूद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अस्वस्थ!

स्पंदना
Mon, 10/21/2013 - 13:14 नवीन
अस्वस्थ!
  • Log in or register to post comments

मुले अशी वागत नाहीत.....

मुक्त विहारि
Mon, 10/21/2013 - 13:17 नवीन
त्यांचे पालक(?) त्यांना असे करायला भाग पाडतात. मुले काही आकाशातून सगळे घेवू न येत नाहीत,(एक अंकूरचे उदाहरण सोडले तर ... अर्थात तिथेही पालकांचा प्रश्र्न आहेच.....अरे तुम्ही एका मुलाला जन्म देत आहात तर त्याची काळजी कुणी करायची?) असो...
  • Log in or register to post comments

विमनस्क

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/21/2013 - 14:09 नवीन
विमनस्क करुन गेले लिखाण. असं काही वाचलं कि आजकाल फार त्रास होतो. पण या साठी कुणीतरी कुठेतरी काहीतरी करत असतीलचं ना? तिथे काही मदत करता येइल कां आम्हाला? हि परिस्थिती भयंकर आहे, पण यावर उपायही असतीलचं की.
  • Log in or register to post comments

मि का

मितान
Tue, 10/22/2013 - 12:08 नवीन
मि का यावर नक्कीच उपाय आहेत. पालक, समुपदेशक, शिक्षक आणि मूल अशी टीम यातून एकत्रितपणे यावर काम करू शकते. सर्वांचा सहभाग मोलाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

हतबुध्द, अवाक आणि खूप जास्त

क्रेझी
Mon, 10/21/2013 - 14:21 नवीन
हतबुध्द, अवाक आणि खूप जास्त चिंतीत! माझ्या घरातल्या नविन पिढीसोबत असं काही घडू नये ह्यासाठी काय करावं लागेल नेमकं?
  • Log in or register to post comments

आनंदयात्रा संगोपनाची नावाचं

धन्या
Mon, 10/21/2013 - 14:41 नवीन
आनंदयात्रा संगोपनाची नावाचं डॉ. लता काटदरेंचं एक छान पुस्तक आहे. मुलं वाढवणार्‍या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी

या क्षेत्रातील वास्तव किती

धन्या
Mon, 10/21/2013 - 15:43 नवीन
या क्षेत्रातील वास्तव किती भयाण आहे याचं ताजं, अगदी आज दुपारचं उदाहरण आहे. पिंपरीला मनपाच्या एका माध्यमिक शाळेत मुलांची मारामारी होऊन एका विदयार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
  • Log in or register to post comments

अवस्थ!

प्यारे१
Mon, 10/21/2013 - 17:12 नवीन
अवस्थ! - कॉलेजमध्ये असताना स्वतःसाठी आयपीएच ला भेट दिलेला प्यारे.
  • Log in or register to post comments

अस्वस्थ. टायपो एरर.

प्यारे१
Mon, 10/21/2013 - 17:13 नवीन
अस्वस्थ. टायपो एरर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

"टायपो एरर" समजू शकतो....

मुक्त विहारि
Mon, 10/21/2013 - 17:17 नवीन
माझी पण तशीच अवस्था झाली होती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खरं आहे गं अगदी! काय बोलावं

रेवती
Mon, 10/21/2013 - 18:36 नवीन
खरं आहे गं अगदी! काय बोलावं सुचत नाही. पण आपल्यासारख्या साध्या घरातून आलेल्या मुलांना या विचित्र परिस्थितीतील मुलांचा त्रासच होतो. माझ्या मुलाच्या स्कूलबस्टॉपवरील एका मुलीच्या आईवडीलांचा डिव्होर्स होऊन २ महिने झालेत. ती बराचवेळ बरी असते पण कधीकधी एकदम सगळ्यांना मारत सुटते. तिला परिस्थिती स्विकारायला थोडा वेळ द्यायला हवा पण आईला वेळ नाही आणि कोर्टाने व्यसनी वडीलांवर निर्बंध घातलेत. बरं आता ही आमची टीनएजर मुले आणखीनच अवघडली आहेत. मग त्यावर सध्यापुरता एक उपाय काढलाय आणि तो बर्‍यापेकी वर्क होतोय. परवाच मुलाचा मित्र बस स्टॉपवर कोणाशीही बोलत नव्हता आणि एकदम झाडामागे जाऊन रडायला लागला. आम्ही सगळेच बघायला लागलो. तो कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. नंतर समजले की त्याचे आईवडीलही वेगळे होणारेत.
  • Log in or register to post comments

अस्वथ करणाय्रा नोंदी!

अनन्न्या
Mon, 10/21/2013 - 18:52 नवीन
या निदान समोअर तरी आल्या. पण आणि किती असतील ज्या समोरच येत नसतील.
  • Log in or register to post comments

हे सगळं अस्वस्थ करणारं आहे ,

लौंगी मिरची
Mon, 10/21/2013 - 19:32 नवीन
हे सगळं अस्वस्थ करणारं आहे , पण तुम्ही त्यातुन त्यांना काय मार्गदर्शन केलत हे वाचायला जास्त आवडेल .
  • Log in or register to post comments

लिही लिही म्हणून आग्रह केला

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/21/2013 - 19:39 नवीन
लिही लिही म्हणून आग्रह केला होता... !
  • Log in or register to post comments

.लिहिताना अर्थात त्या त्या

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/21/2013 - 19:46 नवीन
.लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.
हे जरी खर असल तरी समाजाचे चित्र अशा अनेक खाजगीपणाच्या आवरणाखाली नीट समजू शकत नाही. समाजात घडणार्‍या अनेक बाबी दबून राहिल्या. समाजाचे प्रश्न समजण्यासाठी अशा बाबींचा उलगडा होणे अपरिहार्य ठरते. साहित्य अशा वेळी चांगले काम करते.
  • Log in or register to post comments

माझ्या मुलगा आता ८ वर्षांचा

लौंगी मिरची
Mon, 10/21/2013 - 19:54 नवीन
माझ्या मुलगा आता ८ वर्षांचा आहे . एक दिवस फारच अपसेट होउन घरी आला , नेहेमी असा येत नाहि . थोडासा जरी फरक जाणवला तरी आजकाल घाबरायला होतं . हे जरी खरं असलं तरी संवाद साधणं महत्वाचच . मी आल्या आल्या काहि लगेच विचारलं नाहि ..... संध्याकाळी जेवणं झाल्यावर सगळेच थोडावेळ एकमेकांच्या संपूर्ण दिवसाचा आढावा घेतो , ती फक्त आवर्जुन कम्पल्सरी केलेली एकमेकांशी संवाद साधायची वेळ . त्यावेळी त्याच्या बाबाला मी आधीच सांगितलेला त्याच्या अपसेट होण्याचा विषय काढला तेव्हा तो अक्षरशा डोळ्यात पाणि आणुन म्हणाला " बाबा ठ्येयलर चे मॉम डॅड सेपरेट होतायत , तो फार रडतो , टिफिन सुद्धा देत नाहि कि स्नॅकहि मिळत नाहि घरुन असे का वागतात त्याच्याशी ? त्याची काय चुक आहे ? खरच काय बोलावं तेच समजलं नाहि :(
  • Log in or register to post comments

खरंच हेल्पलेस फीलिंग येतं अशा वेळी

मितान
Tue, 10/22/2013 - 12:10 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

अवघड आहे.

आतिवास
Mon, 10/21/2013 - 19:59 नवीन
अवघड आहे. ही मुलं-मुली निदान तुमच्यापर्यंत पोचली तरी, ज्यांना ती संधी नाही, त्यांच काय असेल या विचारांनी अजून अस्वस्थता वाढली. पण थोडा विचार करता असंही वाटलं की निदान हा प्रश्न समोर येतोय - म्हणजे तो आहे हे मान्य केलं जातंय पालकांकडून हीही एक मोठ्ठी पायरी गाठली आहे आपण समाज म्हणून. "प्रश्न नाहीच" असं मानून जगण्यापेक्षा हे कैक पटींनी उत्तम; कारण त्या प्रश्नातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते प्रश्न स्वीकारण्यातून!
  • Log in or register to post comments

अस्वस्थ करणार्‍या नोंदी

पैसा
Mon, 10/21/2013 - 20:11 नवीन
आपल्या आसपास अशा खूप कहाण्या खरे तर दिसतात. पण आपण कशाला मधे पडा या विचाराने आपण गप्प रहातो. खरं सांगायचं तर तुझ्याकडे ही मुलं आणली गेली असतील तर त्यांचं नशीब म्हणायला पाहिजे. माझ्या मुलीच्या वर्गातला एक मुलगा फारच हायपर वागतो, त्याला सायकिअ‍ॅट्रिस्टकडे न्या म्हणून आईला सांगितलं तर "तो अपुर्‍या दिवसाचा आहे त्यामुळे त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि तो असा करतो" हे उत्तर मिळालं. काय बोलणार?
  • Log in or register to post comments

कठीण आहे.....

मुक्त विहारि
Mon, 10/21/2013 - 20:49 नवीन
सायकॉलॉजी हा विषय शाळेपासूनच शिकवायला हवा. (त्या नागरीक शास्त्रापेक्षा हे कितीतरी बरे.....हे वाक्य किंचीत विचार करून लिहीले असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी ह्या उपप्रतिसादावर आपल्या मताची पिंक टाकू नये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मुक्त विहारी, सुदैवाने अशी

मितान
Tue, 10/22/2013 - 12:11 नवीन
मुक्त विहारी, सुदैवाने अशी संधी मला मिळतेय. सध्या मी एका शाळेत ७ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांना भावना आणि विचार शिकवतेय. मला खूप आनंद मिळतोय यातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माझे मत....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 12:21 नवीन
मुलांपेक्षा त्यांच्या जन्मदात्यांना त्याची जास्त गरज आहे. (जन्मदाता ते पालक ते सूजाण पालक असा प्रवास करु इच्छिणारा) मुवि..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

सहमत.

कवितानागेश
Mon, 10/21/2013 - 22:03 नवीन
'आपण कशाला मधे पडा', हाच अडथळा होतो आणि जीव हळहळतो. अगदी जवळच्या नात्यातल्या मुलांचे पण काही बिघडताना दिसलं तरी काही करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

समाजप्रबोधनाची जास्त गरज आहे.

सुबोध खरे
Tue, 10/22/2013 - 11:54 नवीन
असेच बरेचसे पालक आमच्याकडे मुलांची तक्रार घेऊन येतात कि तुम्ही मुलांना काही तरी सांगा. त्यांच्याशी बोलले तर हे लक्षात येते कि आईबापांची फार मोठी चूक होत आहे. पण ती चूक जर लक्षात आणून दिली तर ते स्वीकार करण्याची तयारी नसते किंवा कळते पण वळत नाही. अशा अनुभवातून आम्ही( मी आणी माझी पत्नी) शहाणे झालो आहोत. लोक फुकट सल्ल्यासाठी येतात त सुद्धा आम्ही त्यांच्या मुलांचे समुपदेशन करावे यासाठी. त्यांना त्यांची चूक दाखवून दिलेली आवडत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आता मानसशास्त्रज्ञांकडे समुपदेशनासाठी जा असा सल्ला देतो. ज्यांना तितकी तळमळ असते ते जातात. ज्यांना नसते ते आपला प्रश्न बासनात गुंडाळून बसतात. याचा माझ्या पत्नीस फार त्रास होत असे पण तुम्ही जग सुधारू शकत नाही हे माझे बाकी तिला आता आता पटायला लागले आहे. आपण लोकांना सल्ला द्यावा पण त्यांनी तो ऐकल अन्ही तर आपण जीवाला त्रास करून घेऊ नये हे आता तिला पटायला लागले आहे. नेकी कर दरिया मी डाल. चार पावले चालल्यावर धाप लागत असलेला माणूस इ सी जी मध्ये हृदयविकार बळावल्याची लक्षणे असताना मी दिवाळीनंतर रुग्णालयात गेलो तर चालेले का असे विचारतो. मग या माणसाना त्या गोष्टीचे गांभीर्य कसे पटावे . यावर मी एक लेख लिहिला होता (तेरी आंख के आंसू पी जाऊ) http://www.misalpav.com/node/25642 . केवळ जास्त प्रशिक्षित समुपदेशकांची गरज आहे असे नव्हे तर समाजप्रबोधनाची जास्त गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सुबोध खरे, सहमत ! +१

मितान
Tue, 10/22/2013 - 12:14 नवीन
सुबोध खरे, सहमत ! +१ आमच्याकडे आलेले पालकही बहुतांश वेळेला त्यांच्या वागण्यात बदल सुचवले की परत येत नाहीत. मग हाताशी असणार्‍या मुलासोबत जेवढे काम करणे शक्य आहे तेवढे करते. पालकांना ' चॉइस आणि प्राइस" ची थिअरी मात्र आवर्जून सांगते. माझ्या कामाच्या मर्यादा मी कधीच मान्य केल्यात म्हणून शांत झोपू शकते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

किती दिवसांनी लिहिलंस गं

कोमल
Mon, 10/21/2013 - 23:51 नवीन
किती दिवसांनी लिहिलंस गं मितान, भिडलं अगदी.. पुन्हा लिहित जा नं..
  • Log in or register to post comments

हेच

स्वाती दिनेश
Tue, 10/22/2013 - 13:15 नवीन
किती दिवसांनी लिहिलंस गं मितान, भिडलं अगदी.. पुन्हा लिहित जा नं.. कोमल सारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

बापरे, नोकरी निमित्त परदेशी

खटपट्या
Tue, 10/22/2013 - 02:36 नवीन
बापरे, नोकरी निमित्त परदेशी असल्यामुळे मी गेले एक वर्ष माझ्या मुलीना भेटू शकलो नाही आहे….
  • Log in or register to post comments

स्काइपवर भेटत असालच ना? मग

स्पंदना
Tue, 10/22/2013 - 04:12 नवीन
स्काइपवर भेटत असालच ना? मग आता अस करा. वेळ ठरवुन घ्या. मुलींना अस लिहील्याने दोन असाव्यात अशी माझी समजुत. तर एक तास फक्त एकटीने तुमच्याशी कानगोष्टी करायच्या. त्यावेळी अगदी आईला सुद्धा जरा वेळ दे ग तिला एकटीला अस सांगा. मग पुढच्या आठवड्यात दुसरीला. अन रात्री कधीतरी किंवा मुलींना सांगुन एकट्या आईला असा वन टु वन वेळ द्या. तुम्ही लांब असल्याने आता फटकन ओरडु नाही शकणार हे चुकल, ते चुकल म्हणुन,आणि मुलींनापण आपलही कोणी ऐकतय ही भावना निर्माण होइल. इतका दुरवर असलेला बाबा असा एकदम जवळचा होउन जाइल की त्याच्याशी कान गोष्टी कराव्या. टिनएजर असतील तर मात्र हे सगळ विसरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

स्काइप वर बोलतो, कधी कधी छान

खटपट्या
Wed, 10/23/2013 - 10:25 नवीन
स्काइप वर बोलतो, कधी कधी छान संवाद होतो. कधी कधी लहान मुलगी (तिसरीत आहे) गप्प बसून माझ्याकडे एकटक बघत राहते. बोल म्हणता बोलत नाही. आणि मग एकदम रडू लागते. नंतर आई जवळ म्हणते कि बाबा बरोबर फिरायला जायचे आहे. मन सुन्न होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

खरी गोष्ट........

मुक्त विहारि
Wed, 10/23/2013 - 10:48 नवीन
दोन वेळेच्या जेवणाची किंमत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

स्काईपवरुन खेळ खेळा.

चतुरंग
Wed, 10/23/2013 - 11:13 नवीन
जिथे असाल तिथून तुम्ही तिच्यासाठी फोटो काढून पाठवा. तिला चित्रं काढायला लावून रोज स्काईपवरुन दाखवायला सांगा. तुम्ही रोज कायकाय केलंत हे तिला सांगत रहा. तिच्या मित्रमैत्रिणींची चौकशी करा.तिने कायकाय खाल्लं हे विचारत रहा अधूनमधून एखादं खेळण्याचं पार्सल तिच्या नावाने पाठवा, फार महागाचं काही लागतं असं नाही, माझ्या नावाने काहीतरी आलंय हेच त्यांना अप्रूप असतं! तुम्ही लांब का आहात हे तिला सांगा. मुलांना आपल्याला वाटतं त्यापेक्षा भरपूर समज असते. हळूहळू ती निश्चितपणे बोलायला लागेल. मुख्य म्हणजे तुम्ही तिच्यासमोर उदास होऊ नका नाहीतर मुलं लगेच गळपटतात. आपल्याला लांब राहण्याचा ताण असतोच परंतु आता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तो ताण कमी कसा करता येईल हे बघा. शुभेच्छा! -(बाप्)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

+ १

मुक्त विहारि
Wed, 10/23/2013 - 12:05 नवीन
कं लिवलय.... तुमास्नी आमच्या कडून एक कटिंग बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अपर्णा ताई आणि तुमचे खूप खूप

खटपट्या
Wed, 10/23/2013 - 12:21 नवीन
अपर्णा ताई आणि तुमचे खूप खूप आभार. मी हे करून बघेन. आता तर मी दिवाळी साठी भारतात जात आहे. येताना दोघींना महिन्याभरासाठी घेवून येत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

@ खटपट्या....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 11:20 नवीन
तुमच्याच जात्यातला. त्यामुळे ह्या कर्माची फळे भोगणारा.... (हतबल मुवि)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

विचारात पाडणारं लेखन.

चतुरंग
Tue, 10/22/2013 - 11:01 नवीन
मुलांना द्यायला वेळ नसणं हे आई-बाप आणि मुलं सगळ्यांचच एकप्रकारे दुर्दैव मग ते स्वेच्छेने असो की परिस्थितीने.
  • Log in or register to post comments

वरचं वाचून खूप मोठ्ठा

सूड
Tue, 10/22/2013 - 11:20 नवीन
वरचं वाचून खूप मोठ्ठा प्रतिसाद लिहावासा वाटत होतं पण झाकली मूठ सवा लाखाची !! आपण मुलांना हवं ते खायला दिलं, म्हणतील ते कपडे दिले की झालं असं वाटतं काही पालकांना. मुलांच्या मनात काय चाललंय, त्यांना खरंच काही प्रॉब्लेम आहे का हे जाणून घ्यायची इच्छा सुद्धा नसते. मी म्हणेन ते आणि तसंच केलं पाह्यजे मुलांनी (रादर सगळ्यांनीच हे सांगतील ते ऐकावं असं वाटत असतं, जो ऐकणार नाही तो वाईट) अशी अपेक्षा असते. दुसर्‍यांना उपदेशाचे डोस देणारे हे मात्र स्वत:च्या बाबतीत त्याच गोष्ट लागू करताना डळमळतात. अशात मुलांनी एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध केली की अहंकाराला प्रचंड धक्का बसतो आणि मग उभं राहतं चार भिंतीतलं रणांगण!!
  • Log in or register to post comments

आधी .... चार भिंतीतलं रणांगण!!.....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 11:22 नवीन
आणि मग स्मशान शांतता... फार जवळून अनुभव घेतला आहे अशा कुटुंबांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आणि मग स्मशान शांतता...

सूड
Tue, 10/22/2013 - 11:28 नवीन
परफेक्ट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सर्वांच्या संवेदनशील

मितान
Tue, 10/22/2013 - 12:16 नवीन
सर्वांच्या संवेदनशील प्रतिसादांबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

इतक्या लवकर आभार नका मानू,,,,,

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 12:23 नवीन
ज्या दिवशी असा लेख लिहायची पाळीच येणार नाही, त्या दिवसाची वाट बघत आहे.... आशावादी मुवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

भयाण वास्तव.

सस्नेह
Tue, 10/22/2013 - 12:23 नवीन
खूप अस्वस्थ करत आहे हे सारं. पण पालक खरंच या सगळ्याला तॉड द्यायला पुरे पडतील का ? आपण फार तर हे करू शकतो...
  • Log in or register to post comments

लिंक

सस्नेह
Tue, 10/22/2013 - 12:24 नवीन
http://www.misalpav.com/node/20650
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

पालक खरंच या सगळ्याला तॉड द्यायला पुरे पडतील का ?

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 12:27 नवीन
का नाही? माझ्या सारखा "ढ" मुलगा जर हे करू शकतो तर इतर माणसे का नाही करू शकणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा