जगातल्या तमाम बुद्धीबळ वेड्यांची दिवाळी यावर्षी सुरु होणार आहे तारीख ९ नोव्हेंबर २०१३, हॉटेल हाएट रीजन्सी, चेन्नैला!
६४ घरांच्या साम्राज्याचं विजेतेपद पाचव्यांदा राखण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या लाडक्या विशीला भिडतोय मॅग्नुस कार्लसन!
हा विश्वविजेतेपदाचा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. एकतर हा भारतात होणारा पहिलाच विश्वविजेतेपदाचा सामना आहे. आधीच्या गेल्फंड्-विशी सामन्याचं ठिकाण ऐनवेळी चेन्नैहून मॉस्कोला हलवलं गेलं होतं. तो अपमान भारतीय बुद्धीबळ महासंघाला चांगलाच सलत होता. त्यामुळे गेली दोन वर्षे अथक प्रयत्न करुन शेवटी हा सामना चेन्नैला खेचून आणण्यात त्यांना अखेर यश मिळालं.
'विशी'नं तीन वर्षांपूर्वीच चाळिशी पार केलीये ;)आणि कार्लसन आहे २२ वर्षांचा (अजून गद्धेपंचविशीतच आहे म्हणाना), म्ह्णजे जवळपास एका पिढीचे अंतर आहे दोघांच्या वयात! जगज्जेतेपदाच्या सामन्यात खेळाडूंच्या वयात इतकं अंतर असलेली ही दुसरीच वेळ आहे (याआधी कोर्चनॉय - कार्पोव यांच्या वयातही २० वर्षांचं अंतर होतं).
गॅरी कास्पारोवने निवृत्त होताना आनंदला उद्देशून पुढील मुक्ताफळे उधळली होती त्याची मला याठिकाणी प्रकर्षाने आठवण झाली -
I’m out, now you’re the oldest! You’re the dinosaur now! - (comments upon his own retirement) - Garry Kasparov
Vishy is a brilliant player. But it is very difficult to compete at 40. He is up against people half his age. I will be surprised if he can go on any longer. He can fight against anyone but time. - Garry Kasparov
गॅरीने हे दिवे लावल्यानंतर आनंदने दोनदा विजेतेपद पटकावले आहे! (गॅरीला बहुदा आता रिटायरमेंटचा पश्चात्ताप होत असावा! ;) )
आनंदचा एकूण अनुभव, त्याचा केवळ जगज्जेतेपदाच्या सामन्यांमधला प्रचंड अनुभव (आनंद हा जगातला एकमेव खेळाडू आहे की ज्याने, बाद फेरी, साखळी फेर्या आणि एकासएक लढत या तीनही प्रकाराने झालेल्या जगज्जेतेपदाच्या सामन्यात जेतेपद पटकावले आहे) याविरुद्ध कार्लसनचे तरुण रक्त आणि पहिल्यावहिल्या जेतेपदाची भूक असा हा अफलातून सामना होणार आहे! शिवाय या सामन्यात कार्लसनने पहिल्यांदाच 'इलनेस क्लॉज' समाविष्ट करायला भारतीय बुद्धीबळ महासंघाला भाग पाडले. या क्लॉज अंतर्गत खेळाडू काही कारणाने आजारी पडला तर त्याला दोन दिवसांपर्यंत सुटी घेता येऊ शकेल. भारतातले हवामान, पाणी आणि खाणे या गोष्टींची धास्ती घेऊन कार्लसनने हा क्लॉज घातलाय असं समजतं. हाएट रीजन्सीने परोपरीने समजावले की आम्ही तुझ्या आहाराची सगळी काळजी घेऊ, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही याची ग्वाही देतो परंतु हा क्लॉज आलाच! (शिवाय कार्लसन स्वतःचा खानसामा देखील घेऊन येणार आहे!) आनंदची प्रतिक्रिया सावध होती "मॅग्नुस एक जबाबदार खेळाडू आहे आणि या क्लॉजचा गैरवापर होणार नाही अशी मला आशा आहे!"
आता जरा या दोन्ही खेळाडूंची ओळख विश्वविजेतेपदाच्या सामन्याच्या दृष्टिकोनातून करुन घेऊयात.
मॅग्नुस कार्लसन -
१९९० साली जन्मलेला नॉर्वेचा हा तरुण पोरगा गेल्या दहा वर्षात बुद्धीबळाच्या नकाशावर एखाद्या धूमकेतूसारखा उगवला आणि झपाट्याने त्याने बुद्धीबळाचे अवकाश व्यापून टाकले. वयाच्या तेराव्या वर्षी जगज्जेत्या गॅरी कास्पारोवला बरोबरीत रोखायची अचाट कामगिरी याने केली आहे (यू ट्यूब दुवा या सामन्यात गॅरीची एका १३ वर्षाच्या पोरासमोरची उद्धट देहबोली तिडीक आणते. विशेषतः सामना सुरु होताना डाव्या हाताने बोर्डावरची धूळ झटकल्यासारखे हात करणे. अँड ही पेड फुल प्राईस. मॅच ड्रॉ झाली). साडेतेरा वर्षांचा असताना हा ग्रँडमास्टर झाला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी याचे एलो रेटिंग होतं २८०१! नुकतंच मार्च २०१३ मधे त्याने आतापर्यंतचं सर्वोच्च एलो रेटींग २८७२ मिळवलं आहे. चेस प्रॉडिजी असं याचं वर्णन केलं जातं.
सॅवॉय प्लेस लंडन, इथे मार्च २०१३ मध्ये झालेल्या कँडिडेट सामन्यातल्या आठ खेळाडूंमधून हा आनंदचा आव्हानवीर म्हणून पुढे आला. अर्थात कँडिडेट स्पर्धेत गंमतच झाली होती. कार्लसन आणि क्रामनिक दोघेही अटीतटीने स्पर्धा खेळत होते. अर्ध्या गुणाचाही फरक नव्हता दोघांच्यात शेवटच्या सामन्यापर्यंत. दोघांपैकी कोण अंतिम विजेता होऊन विश्वचषकासाठी आव्हानवीर ठरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अशा निर्णायक क्षणी (अतीव ताणामुळे असेल कदाचित) दोघेही आपापले शेवटचे डाव चक्क हारले! (नाही, अजून बुद्धीबळात तरी फिक्सिंगची लागण झालेली नाही, त्यामुळे हे दोघे खरोखरंच सामना हारले होते हे नक्की!!) ८.५ गुणांसह बरोबरी झाली. संपूर्ण स्पर्धेत जो जास्त डाव जिंकलेला असेल तो निर्णायक विजेता या नियमाच्या आधारे कार्लसनने बाजी मारली! क्रामनिक फार दु:खी झाला होता, सरळ आहे, हातातोंडाशी आलेली संधी नियमावर आधारित निकषाने निसटून जावी हे दुर्दैवच! या स्पर्धेनंतर नियमांवरती सगळीकडून ताशेरे ओढले गेले. नोवेंबरमधल्या आनंद-कार्लसन सामन्याचं वातावरण असं मार्चपासून तापत आलं आहे.
जून २०१३ मध्ये झालेल्या ताल मेमोरियल स्पर्धेत ४५ वर्षांच्या बोरिस गेल्फंडनं आपण अजूनही किती ताकदीचा खेळ करु शकतो हे दाखवत कार्लसनला दुसर्या क्रमांकावर ढकलून स्पर्धा जिंकली होती! याच स्पर्धेत कार्लसनने आनंदला जवळपास चिरडूनच हरवलं होतं! आनंदचा हा डाव आणि एकूण स्पर्धेतला खेळ खरोखरीच त्याच्यातलं बुद्धीबळ संपत आलं आहे की काय असं वाटावं इतका वाईट झाला होता (दहा खेळाडूंमधे आनंद आठव्या क्रमांकावर राहिला! :(). तर अशा सगळ्या उलथापालथीतून शेवटी कार्लसनची चेन्नै एक्सप्रेस मार्गाला लागली!
हा कार्लसन आहे तरी कसा? बराचसा अबोल आहे. कास्पारोवसारखा माजोरडेपणा आणि उद्धटपणा त्याने अजूनतरी दाखवलेला नाही. तसा तो बहुरंगी आहे. २०१० मध्ये जी-स्टार या कपड्यांच्या कंपनीने त्याला पुरुष मॉडेल म्हणून करारबद्ध केलंय.
आणि 'लॉर्ड ऑफ दि रिंग्ज' फेम हॉलीवुड अभिनेत्री लिव टेलरसोबत त्याने या कंपनीसाठी मॉडेलिंग केलंय! :)
जगातला एक नंबरचा खेळाडू असला तरी याचे पाय बर्यापैकी जमिनीवर आहेत असे म्हणायला हरकत नाही.
याच्या खेळाची शैली कशी आहे याबद्दल बरीच चर्चा होत असते.
"Self-confidence is very important. If you don’t think you can win, you will take cowardly decisions in the crucial moments, out of sheer respect for your opponent. You see the opportunity but also greater limitations than you should. I have always believed in what I do on the chessboard, even when I had no objective reason to. It is better to overestimate your prospects than underestimate them."
"Some people think that if their opponent plays a beautiful game, it’s OK to lose. I don’t. You have to be merciless."
हे कार्लसनचे उद्गार वाचले की त्याची आक्रमकता ध्यानात यायला हरकत नाही!
बर्याच जणांना त्यात कार्पोवच्या खेळाची सुधारित आवृत्ती दिसते. प्रतिस्पर्ध्याच्या खेळण्याच्या वाटा एकेक करुन बंद करत, फास आवळत नेणे हे साम्य दिसते. परंतु माझ्यामते कार्लसन कार्पोवपेक्षा आक्रमक आहे. अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे तो बराचसा इंट्यूशनने खेळतो. प्रचंड विश्लेषणाने खेळी ठरवण्यापेक्षा अंतस्फूर्तीने खेळी ठरवून त्यात अगदी ढळढळीत तोटे किंवा चुका नाहीत ना इतके तपासून चाल करायची हा त्याचा विशेष. धोका पत्करण्याची त्याची तयारी असते, शिवाय त्याचा बचाव अतिशय कल्पक आहे. अगदी हाताबाहेर जात असलेल्या परिस्थितीतूनही थंड डोक्याने तो डाव बरोबरीत नेऊ शकतो.
आनंद, क्रामनिक आणि गेल्फंड हे सध्याचे ओपनिंगमधले महारथी समजले जातात. त्यांच्या तुलनेत कार्लसनचे ओपनिंग दुबळे आहे, तो ओपनिंगची फारशी तयारी करत नाही अशी एक चर्चा ऐकू येत असते. त्यात थोडे तथ्य देखील आहे. त्याला स्वतःला ओपनिंग वरती फार वेळ घालवून अभ्यास केलेला पसंत नाहीये. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक खेळीला तो त्याची मोहोरी योग्य जागी ठेवली जातील याची काळजी घेतो आणि तेवढे पुरेसे आहे!
डावाच्या मध्यात तणाव निर्माण करुन प्रतिस्पर्ध्याला चूक करायला भाग पाडणे आणि छोटीशी जरी चूक झाली तरी त्याचा फायदा उठवून डावाचा कब्जा घेणे अशी त्याची खेळाची पद्धत दिसते. डावाच्या मध्यात आणि अंतिम टप्प्यांवरती तो फारच चांगला खेळतो. मला जाणवलेली त्याची आणखीन एक खासियत म्हणजे पटावरची जास्तितजास्त जागा भराभर व्यापत जाणे. सर्वसाधारपणे राजा आणि वजीरासमोरची प्यादी सोडली तर इतर प्यादी डावाच्या सुरुवातीलाच फार चटकन पुढे ढकलू नयेत असा संकेत आहे परंतु कार्लसनच्या बर्याचशा डावात तो प्याद्यांनी चाल करुन अंगावर येतो आणि मागून मोहोरी सरकवत कब्जा घेत जातो. एकदा जागेची घुसमट सुरु झाली की प्रतिस्पर्ध्याच्या मोहोर्यांना हालचालीला वाव राहत नाही.
डावाच्या मध्यात आवश्यक असणारी १०-१२ खेळ्यांचे वेरिएशन बघण्याची क्षमता, काही चांगल्या खेळ्यांमधून सर्वोत्तम खेळी हुडकणे हे त्याच्या इंट्यूशनमुळे शक्य होते. त्याची वेळावरतीही चांगलीच हुकुमत आहे. फार क्वचित तो टाईमट्रबलमधे सापडतो. प्रामुख्याने पोझीशनल खेळ असे त्याच्या खेळाचे वर्णन करता येईल.
ऑगस्ट महिन्यात कार्लसनने चेन्नैला भेट देऊन सामन्याच्या ठिकाणाची पाहणी केली.चेन्नैवासियांनी त्याचे खास दक्षिण भारतीय पद्धतीने स्वागत केले.
त्याला बघायला भरपूर गर्दी लोटली होती. तो मॉडेलदेखील असल्याने प्रेक्षकांमध्ये सहाजिकच मुलींचा भरणा होता!
त्याची मुलाखत देखील झाली. ज्युनियर जागतिक विजेत्या, आशियाई स्पर्धा विजेत्या दहा खेळाडूंबरोबर तो एकावेळी दहा डाव खेळला आणि त्यातल्या चौघांनी त्याला चक्क हरवले देखील!
लहानग्यांच्या तडाखेबंद खेळानं तो अचंबित झालेला होता. (चेन्नैच्या कडक मसालेदार रस्समनं त्याला चांगलाच झटका दिला - ये बात कुछ अलग है - इतका धडा त्याने नक्कीच घेतला!)
कार्लसनला मदत करणारी टीम म्हणजे त्याचे सेकंड्स. (कँडिडेट स्पर्धेत पीटर नील्सन हा त्याच्या टीममध्ये होता. जो आधी आनंदच्या सेकंड्स टीममध्ये होता, परंतु यावर्षी तो आनंदच्या टीममध्ये नाहीये. आता तो कार्लसनच्या टिममध्ये सुद्धा नाहीये कारण नैतिकदृष्ट्या ते बरोबर नाही. अजूनही हे संकेत प्रामाणिकपणे पाळले जातात याने बरे वाटते.)
कास्पारोव कार्लसनला मदत करणार अशाही वावड्या उठल्या होत्या परंतु त्यात तथ्य नाही. २००९ दोघांनी काहीकाळ एकत्र काम केलंही होतं. परंतु ते फार चालू शकलं नाही. एकतर कास्पारोव भडक स्वभावाचा आणि अतिशय ईगोइस्टिक आहे. त्यामुळे ग्रँडमास्टर दर्जाला आवश्यक असा धीर आणि आपली मते दुसर्यावर न लादणे हे दोन्ही त्याला जमणे अवघड आहे. त्यामुळे सध्यातरी कार्लसनचे सेकंड्स कोण आहेत याची कल्पना येत नाहीये. उत्तम खेळासाठी कार्लसनला शुभेच्छा देऊयात!
विश्वनाथन आनंद (विशी) -
लहानपणी 'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आपला विशी जगज्जेता झाला तेव्हा 'दि मद्रास टायगर' ह्या नावाने ओळखला जाऊ लागला.
स्वभावतः शांतपणा आणि सहजासहजी उत्तेजित न होणं ह्या वैशिष्ठ्यांमुळे आनंद एक आदरणीय जगज्जेता म्हणून नाव कमवू शकला यात शंका नाही.
"There are some things we do much better than computers, but since most of chess is tactically based they do many things better than humans. And this imbalance remains. I no longer have any issues. It’s bit like asking an astronomer, does he mind that a telescope does all the work. He is used to it. It is just an incredible tool that you can use."
"Just before a game, I try to keep a clear mind so that I can focus better. I'm the kind of person who plays fast and relies a lot on intuition, so being at peace with myself is vital. Saying my daily prayers helps me achieve this heightened state of mind."
ही त्याची वाक्यं वाचली की त्याच्या विचारांमधलं वेगळेपण जाणवतं.
त्याचा ओपनिंगचा प्रचंड अभ्यास हाच एक अभ्यासाचा विषय होईल! सिसिलियन डिफेन्स, किंग्ज इंडियन डिफेन्स, सेमी-स्लाव मेरान वेरिएशन अशा वेगवेगळ्या ओपनिंग्जमधे त्याची ताकद आहे. काळ्या आणि पांढर्या दोन्ही मोहोर्यांकडून खेळताना तो उत्तम खेळू शकतो. टॅक्टिकल खेळ हे त्याचे शक्तिस्थान. अतिशय कल्पक सापळे रचून प्रतिस्पर्ध्याला सुगावाही लागू न देता कचाट्यात पकडणे ही त्याची खासियत (आठवा गेल्या विश्वचषकात गेल्फंडविरुद्ध खेळलेला डाव क्र. ८) गुंतागुंतीच्या स्थितीतदेखील अतिशय वेगवान आणि तरीदेखील अचूक कॅलक्यूलेशन्स करु शकत असल्याने तो देखील घड्याळाच्या कचाट्यात कधी फारसा सापडत नाही.
आणखी एक म्हणजे घोड्यावर त्याची मांड अतिशय पक्की आहे. घोड्याच्या कल्पक उड्या आणि त्याने बसणारे फोर्क्स याचा वापर तो हमखास करतो.
गेल्या काही स्पर्धांमध्ये, जसे ताल मेमोरिअल, त्याची कामगिरी अतिशय खालच्या दर्जाची झाल्याने त्याच्यासाठी तो एक मोठा चिंतेचा विषय असणार आहे हे नक्की. त्या बॅड पॅचमधून लवकरात लवकर बाहेर पडणे आणि मानसिक तणावाखाली न येता खेळू शकणे हे त्याच्यासमोरचे आव्हान आहे. जगज्जेतेपदाची स्पर्धा फक्त १२ डावांची आहे आणि पहिल्यांदा जो बाजी मारेल तो विजेता ठरण्याची शक्यता फारच जास्त आहे. (गेल्या स्पर्धेत गेल्फंडने सातवा डाव जिंकला लगोलग पुढच्याच डावात आनंदने बरोबरी साधली हे जरी खरे असले तरी दरवेळी तसे होईलच असे सांगता येत नाही!)
आनंदचे सेकंड्स - गेल्या विश्वचषकापर्यंत पीटर नील्सन, रुस्तम कासिमद्झानोव, सूर्यशेखर गांगुली आणि रादोस्लाव वोज्सेक हे चौघे त्याचे सहकारी होते. यापैकी पीटर नील्सन तर आनंदसोबत २००२ सालापासून काम करत होता. तो टीममध्ये असताना आनंदने एकूण ४ वेळा विश्वविजेतेपद पटकावले ही बाब उल्लेखनीय आहे. यावर्षी तो टीममध्ये नाहीये. इतक्या प्रदीर्घकाळ एकत्र काम करणारा सहकारी नसणे ही आनंदसाठी नक्कीच मोठी उणीव आहे. यावर्षी ग्रँडमास्टर सांदीपन चंदा याचा समावेश आनंदने त्याच्या टीममधे केलाय.
नव्या टीमची 'केमिस्ट्री' जमणे हे सुद्धा महत्त्वाचे. ही सगळी टीम यूरोपातल्या कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी गेल्या महिन्यापासून सरावात गुंतलेली आहे. आनंदचा दिवस सकाळी व्यायामाने सुरु होतो आणि त्यानंतर न्याहरी घेऊन तो आठ ते दहा तास सराव करतो (दुपारचे जेवण आणि एखादा छोटा ब्रेक वगळता). मागे एकदा मी या सरावाबद्दल लिहिले होते. ते पुन्हा एकदा लिहितो. सरावादरम्यान आनंदची संपूर्ण टीम कार्लसनच्या सगळ्या डावांची चिरफाड करत असते. तो जिंकलेले आणि हरलेले डाव कसून अभ्यासले जातात. खेळण्याची पद्धत, त्यातले कच्चे-पक्के दुवे, फसलेल्या चाली यांचे विश्लेषण केले जाते. तसेच आनंदच्या डावांचेही होते. या व्यतिरिक्त ऐनवेळी काही सरप्राईझ एलेमेंट असू शकेल काय? उदा. एकदम वेगळेच कधी न खेळलेले ओपनिंग प्रतिस्पर्ध्याकडून केले जाईल का? गेले तर कोणते असू शकेल? त्याची तयारी कशी करायची? शिवाय हे काळ्या आणि पांढर्या अशा दोन्ही बाजूकडून ठरवायला हवे. हे सगळे विश्लेषण आनंदला नुसते लक्षातच ठेवायचे नसते तर प्रत्यक्ष सामन्यात वापरायचे देखील असते! (अर्थात हे सगळे कार्लसनच्या तयारीलाही लागू आहे.) ऐन डावात यांना ७-८ वर्षांपूर्वीचे डाव आठवू शकतात (त्यांचेच नाही तर इतरांचेही!). कोण काय चाल खेळलं हेही आठवतं. स्मरणशक्तीच्या बाबतीत हे राक्षस असतात!
सध्या आनंद जिथे गेलाय तिथून तो रोज स्काईपने घरी संवाद साधून असतो. अरुणा आणि त्याचा दीड वर्षाचा मुलगा अखिल यांच्याशी बोलून त्याला उत्साह येतो. त्याची मुलाखत मुळातून बघण्यासारखी आहे.
'तुझं विजेतेपद कधीतरी जाईल तेव्हा तुझ्या भावना कशा असतील?' ह्या खोचक प्रश्नाला दिलेलं उत्तरही बघण्यासारखं आहे!
शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अरुणा आनंद ही त्याची मॅनेजर आहे!
कालिदासाच्या रघुवंशातली 'गृहिणी सचिवः सखी' हे ती प्रत्यक्ष जगते आहे. तिला विसरुन कसं चालेल?
लिहीत राहिलो तर अजून पानेच्यापाने भरतील पण कुठेतरी थांबायला हवेच.
तर असा हा आपला लाडका विशी. त्याला आपल्या सर्वांतर्फे मी शुभेच्छा देतो. आणि एक जबरदस्त रंगतदार सामना सर्व बुद्धीबळ रसिकांना बघायला मिळो अशी आशा व्यक्त करतो. आनंदने पुन्हा विजेतेपद राखले तर तो बहुदा विक्रम ठरावा.
(सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार.)
------------------------
विशेष सूचना -
सामन्याची ऑफीशियल वेबसाईट तयार झाली आहे. तिथेच सामन्याचे ठिकाण, प्रत्येक डावाचे दिवस आणि वेळा अशी इत्थंभूत माहिती दिलेली आहे. डाव थेट प्रक्षेपित होणार आहेत ते कुठे बघता येतील ते सुद्धा तिथेच दिले आहे. डाव भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होतील. दर दोन डावानंतर एक विश्रांतीचा दिवस आहे.
गेल्फंड - विशी सामन्याच्या वेळी मिपाकर रमताराम यांच्यासोबत मी सामन्यांचे चालते वर्णन दिले होते. परंतु यावेळी वेळाच्या दृष्टीने कसे जमेल मला माहीत नाही कारण माझ्या क्यालीफोर्निया वेळेनुसार रात्री १.३० वाजता सामना सुरु होणार आहे. (आधी नजरचुकीने २.३० वाजता असे लिहिले होते परंतु डे लाईट टाईमसेविंगमुळे ३ नोवेंबरपासून घड्याळे १ तास मागे गेली आहेत!) :( टायमिंग जमवायचा माझा आटोकाट प्रयत्न असेलच. परंतु रमताराम यांनी (किंवा इतर कोणी) स्वतः धागा सुरु करुन चालते समालोचन केले तर मला आनंदच होईल.
------------------------
आणखीन एक आनंदाची बातमी - यावेळच्या सामन्यात प्रथमच अँड्रॉइड आणि आयोएस दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन्ससाठी अॅप डेवलप केले गेले आहे जे १ नोवेंबरपासून उपलब्ध असेल. प्रत्येक खेळी केली गेली की एक विशिष्ठ टोन ऐकू येईल त्याने खेळीची सूचना मिळेल. शिवाय प्रत्येक डावादरम्यान टेक्स्टिंगद्वारे प्रत्यक्ष खेळाचे विश्लेषणही पुरवले जाईल.
खेळादरम्यान ५ सर्वर्स आंतरजालासाठी ठेवले आहेत ज्याद्वारे आपण सामना बघू शकू (लंडनच्या कँडिडेट मॅचेस दरम्यान शेवटल्या सामन्याला जालावरच्या गर्दीमुळे एकमेव असलेला सर्वर कोलमडून लोकांची निराशा झाली होती.)
शिवाय दूरदर्शनवरही सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
द हिंदू मधील बातमी - http://www.thehindu.com/sport/other-sports/novelties-for-anandcarlsen-ma...
ही आपल्या सगळ्यांसाठी पर्वणीच आहे. तुम्ही कुठेही असलात तरी सामना बघता आला नाही असे यावेळी शक्यतोवर होणार नाही. बुद्धीबळाच्या प्रसारासाठी देखील ही सुवर्णसंधी आहे! :)
---------------------------
बक्षीसाची रक्कम किती याबद्दल आधी कल्पना नव्हती त्यामुळे लेखात त्याचा उल्लेख आला नव्हता.
तर एकूण बक्षीस १० लाख (यूरोज) (साधारणपणे ८.५ कोटी रुपये) आहे.
१२ डावात विजेत्याचा निर्णय लागला तर रक्कम ६०% - ४०% अशी विभागली जाईल.
जर सामना टायब्रेकर राऊंडमध्ये गेला तर ५५% - ४५% अशी विभागणी असेल.
-(सामनोत्सुक)चतुरंग
प्रतिक्रिया
21 Oct 2013 - 12:32 pm | धन्या
कित्ती वर्षांनी उगवलात. हॅलेचा धुमकेतूच जणू.
असो. लेख अतिशय सुंदर आहे. बुद्धीबळाच्या क्षेत्रातील अतिशय रोचक आणि रंजक माहिती मिळाली.
21 Oct 2013 - 4:05 pm | मुक्त विहारि
बुद्धीबळाचे सामने असतील तरच असतात.
आणि मिपाकरांचे जीवन सुखकर करून जातात..
21 Oct 2013 - 12:44 pm | llपुण्याचे पेशवेll
रंगाशेठ,
वेलकम बॅक. सामना समालोचनाचा प्रतिक्षेत आहे आता.
21 Oct 2013 - 12:45 pm | मदनबाण
रंगाकाकांचा नेहमी प्रमाणेच माहितीने भरलेला सुरेख लेख.
21 Oct 2013 - 2:06 pm | कपिलमुनी
नजीकचे प्रतिस्पर्धी सतत बदलत राहिले आहेत ..पण विश्वनाथन आनंद अजूनही चिरतरूण आहे..
21 Oct 2013 - 2:42 pm | अग्निकोल्हा
हे वास्तव असेल तर हा माणूस डॉमिनेटिंग आहे हे नक्कि. विश्वनाथना आव्हान तगडे आहे, आणी डेव्हिड वर्सेस गोलायथ सामना हा मला सगळ्यात जास्त आवडणारा प्रकार आहे. कार्लसनला माझ्या विषेश शुभेच्छा.
21 Oct 2013 - 2:55 pm | प्रसाद गोडबोले
वाह चरुतंग !!
लेखन आवडले आहे , मी फॉलॉ करत आहे टुर्नामेन्ट ह्या वेळेस .
बाकी ह्या वेळी आनंदचे विजेतेपद जाणार असे मला इन्ट्युटीव्हली वाटत आहे. कार्ल्सन इझ कंम्प्लीटली डिफरंट क्लास !!
( पण जर पहिले १२ चे १२ डाव ड्रॉ झाले अन टुर्नामेन्ट ताय ब्रेकर मधे गेली तर आनंद नक्की जिंकेल ...रॅपीड मधे कोणी आनंदच्या जवळपास फिरकु शकत नाही ... परवाच एक मॅच पाहिली... ५ मिन ...रॅपीड ... त्यात आनंद ने एका बेसीक ओपनिंग खेळीवर तब्बल १.४३ मिनिट विचार केलाय :O आणि तरीही डाव जिंकलाय ! आनंद रॉक्स !! )
प्रचंड आतुरतेने स्पर्धा सुरु होण्याची वाट पहात आहे.
( बाकी धावते समालोचन कसे देतात ? मागील धाग्याची लिन्क देता का ? )
22 Oct 2013 - 10:37 am | चतुरंग
'चरुतंग' बनवल्याबद्दल प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा! ;)
हा घ्या गेल्यावेळच्या सामन्याचा दुवा http://www.misalpav.com/node/21800
-रंगा
21 Oct 2013 - 3:43 pm | नानबा
विश्वनाथन आनंदबद्दल थोडेतरी वाचून होतो. मॅग्नुस कार्लसनबद्दल माहिती नव्हतं. (आमचं बुद्धी डिपार्टमेंट रिकामं असल्याकारणाने त्याला बळ देण्याचा कधी विचारच केला नाही.) *DASH*
21 Oct 2013 - 4:08 pm | मुक्त विहारि
बुध्धी बळाचे सामने आणि
चतुरंग, संक्षी , बिरुटे सर ह्यांचे धावते समालोचन.
21 Oct 2013 - 4:31 pm | तिमा
मातब्बर खेळाडुंविषयी लिहायला लेखकही त्याच तोलामोलाचा लागतो. सुंदर लेख. माहितीत भर टाकणारा.
21 Oct 2013 - 7:07 pm | रेवती
त्या विश्वनाथन आनंदच्या आयुष्यातल्या इतक्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तुम्ही, त्यातल्या त्याला तरी किती लक्षात असतील म्हणते मी!
23 Oct 2013 - 1:03 am | प्यारे१
और ये लगा 'खासा घरचा'....!
(ह. घ्या.)
सुंदर लेख हो चतुरंगसेठ!
प्रथम ने विनयशील पणं म्हटलेलं आमच्यासाठी तंतोतंत लागू होतं.
23 Oct 2013 - 10:23 am | रमताराम
'आणि इथे मेलं एक साधं लिंबू आणायला सांगितलं तर ते कसं बरोब्बर विसरतात' हे पुढचे वाक्य ऐकू आलं. (पळा)
23 Oct 2013 - 10:53 am | चतुरंग
लिंबू पिळा आमच्या!
24 Oct 2013 - 11:35 am | मी-सौरभ
=))
21 Oct 2013 - 9:27 pm | जे.पी.मॉर्गन
आपल्याला ह्या खेळातलं काही म्हणजे काही कळत नाही हो.... पण ज्या उत्साहानी तुम्ही सिसिलियन डिफेन्स, स्लाव, किंग्ज इंडियन, रे लोपेझ वगैरे नावं घेता ना..... आपल्याला तर स्क्वेअर कट, हुक, बॅकहॅन्ड क्रॉसकोर्ट, स्लॅम-डंक वगैरे ऐकल्यासारख्याच गुदगुल्या होतात. बुद्धिबळात एखादा खेळाडू दुसर्याचा कसा "धुव्वा उडवतो" ते अजून व्हिज्युअलाईझ करता नाही येत... पण तुमचं बुद्धिबळाविषयीचं लेखन आणि समालोचन वाचायला जाम आवडतं.
त्या समालोचनासाठी ह्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहतोय!
जे.पी.
21 Oct 2013 - 9:56 pm | चतुरंग
खेळाडू धुव्वा कसा उडवतो हे बघायचं झालं तर लेवॉन एरोनिअन विरुद्ध आनंदने याच वर्षी ७५ व्या टाटा स्टील स्पर्धेत जिंकलेला डाव बघण्यासारखा आहे.
http://www.youtube.com/watch?v=90kwP4SrIAI
दोन उंट, घोडा आणि वजीर अशा अफलातून काँबिनेशनने आनंदने केवळ २३ चालीत एरोनिअनला खडे चारले. तो डाव बघून कार्लसनसुद्धा थक्क झाला होता!!
या डावावर मी आधी लेखही लिहिला होता.
http://www.misalpav.com/node/23895
वाचून बघा.
21 Oct 2013 - 10:56 pm | उन्मेष दिक्षीत
मी आधी चेस खेळतही नव्हतो आणि फॉलोही करत नव्हतो. तुमच्या इथल्या २०१२ वर्ल्ड चँपिअनशिपबद्दलच्या सामन्यांची माहीती आणि समालोचन वाचुन मी जरा चेस फॉलो करु लागलो आणि इंटरेस्ट आला. हा डाव मी इथे पाहीला होता.
http://www.youtube.com/watch?v=kDF0OcvZxQ8
वर दिलेल्या लिंकचे चॅनल धमाल आणि अतिशय माहीतीपुर्ण आहे. बर्याच प्रसिद्ध डावांचे विश्लेषण आणि त्यातल्या महत्वाच्या चाली नेमक्या का खेळल्या गेल्या याचे वर्णन अगदी रंजक पद्धतीने आणि थोडक्यात केलेले आहे. इट्स अ फन लर्निंग.
अगदी बिगीनरला ही त्यामूळे खेळात चटकन इंटरेस्ट निर्माण होउ शकेल. आनंद चे गेम्सही आहेत या चॅनलवर.
22 Oct 2013 - 10:39 am | चतुरंग
इंटरेस्ट निर्माण झाला हे वाचून आनंद झाला.
-रंगा
22 Oct 2013 - 1:39 pm | उन्मेष दिक्षीत
चेस काय बाप गेम आहे आणि आता खेळलो जरी नाही तरी एक प्रेक्षक म्हणून गेमचा आनंद घेता येइल नोव्हेंबर मधे. धन्यवाद तुम्हाला त्याबद्दल :). नुसतं समजण्यासाठीही आधी थोडं स्वतः शिकायला हवं. बाकीच्या गेम्स्/स्पोर्ट्स सारखं नाही हे काम :)
28 Oct 2013 - 4:52 pm | जे.पी.मॉर्गन
बाकीचं जाऊद्या हो..... हे इतक्या पटापट चाली करतात? डोक्यात मेंदूच असतात ना?
जे.पी.
28 Oct 2013 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले
इतकी वर्ष खेळत असल्याने बर्याचदा अंदाज आलेलाच असतो , कित्येक ओपनिंग्स च्या तर १५-२० खेळ्या जवळपास ठरल्या सारख्या असतात .
.
फास्ट खेळणे भारी आहेच पण खरी मजा आहे ती नॉव्हेल्टी पाहण्यामधे ... जी रॅपीड चेस मधे क्वचितच पहायला मिळते !
तुम्ही पॉल मॉर्फी चे गेम्स पहा ... काय भन्नाट खेळायचा हा माणुस !!
http://en.wikipedia.org/wiki/Paul_Morphy
28 Oct 2013 - 10:33 pm | चतुरंग
चालींच्या खेळात एवढ्या पटपट चाली कराव्या लागत नाहीत.
रॅपिड चेस मध्ये सगळा डावच २० मिनिटात संपवायचा असतो. आणि ब्लिट्झ किंवा लाइटनिंग चेस मध्ये फक्त ५ मिनिटात!
वेगाने खेळणारा आनंद बघायचा असेल तर हा डाव बघा -
http://www.youtube.com/watch?v=kUr_gdKQ8j4
शेवटल्या दीड मिंटात कळायचं बंद होतं!!
डोक्यात मेंदूच असतात आणि वर्षानुवर्षांच्या सरावाने ते कंडिशन झालेले असतात फार क्वचित ब्लंडर होतो देखील.
पण ते क्वचितच - हा पहा कास्पारोवने रॅपिड मध्ये आनंद बरोबर खेळताना केलेला ब्लंडर -
http://www.youtube.com/watch?v=TY41yF1gX1w
मेंदूचे कंडिशनिंग जितके उच्च दर्जाचे तितका तो खेळाडू सरस. अतिशय वेगाने टाकलेले चेंडू अचूक रीड करुन बाउंड्री तडकावणे हे सचिनला जमते ते याचमुळे. ताशी १२० किमि किंवा त्याहून जास्त वेगाने चेंडू गोलंदाजाच्या हातातून निघाल्यानंतर तो नीट वाचून त्यावर रिअॅक्ट होण्याइतका वेळ फिजिकलीच शक्य नाहीये. मग हे सचिनला किंवा कोणत्याही उच्च फलंदाजा शक्य कसं होतं? अनेक वर्षांच्या सरावाने ते गोलंदाजाची बॉडी लँग्वेज अचूक वाचू शकत असतात. गोलंदाजाचा हात, कंबर, डोके यांच्या स्थितीवरुन चेंडू कसा आणि कुठे येणार आहे याचा अंदाज त्यांना चेंडू हातातून सुटायच्या आधीच आलेला असतो. बॅट, पावलं आणि डोकं आधीच हलायला सुरुवात झालेली असते. चेंडू अचूक मारला जाणं हा फक्त अॅक्शन फॉलोथ्रू असतो! मनातल्या मनात त्यांनी तो काही दशांश सेकंद आधीच मारलेला असतो!!!
हा बघा प्रसिद्ध सचिन ने ब्रेट ली ला धुतलेला!! चेंडूचा वेग आणि सचिनचे फटके कळायचं बंद होतं की हा माणूस हे करतो कसं??
http://www.youtube.com/watch?v=vUQPLAlU0Sw
-रंगा
30 Oct 2013 - 10:51 am | जे.पी.मॉर्गन
रंगाकाका आणि गिरिजा दोघांनाही. वर्षानुवर्षाच्या सरावाने हा वेग येणार हे खरंच. पण ह्या लेव्हलला चालींमधली क्लिष्टता काय च्या कायच वाढत असेल ना? इतक्या हजारो चाली आणि त्यांची कॉम्बिनेशन्स प्रोसेस करणं म्हणजे कर्मकठीण काम आहे. एक शंका अशी की ही लोकं अॅकॅडेमिकली पण हुशार असतात का हो?
अजून एक - बुद्धिबळ फॉर डमीज असा काही छोटा खेळ का नाही? ज्यांना टेनिस झेपत नाही ते कसे पॅडल खेळायला देतात....तसा लहान मुलांना हा खेळ पिक अप करणं अजून सोपं होईल असा १६ ऐवजी ८ पीसेसचा वगैरे एखादा खेळ नसतो का? जनरल घरी बसल्या बसल्या पत्ते कुटायचे तर पोरं हे खेळतील. ह्या खेळातली क्लिष्टता थोडी कमी झाली तर खूप नवीन पोरं हा खेळ खेळायला लागतील असं वाटतं.
जे.पी.
30 Oct 2013 - 11:30 am | चतुरंग
वाढते हे जरी खरं असलं तरी प्रत्येक खेळीला सगळ्या मोहोर्यांच्या खेळ्या तपासत बसायला लागत नाही. पटाचा विशिष्ठ भाग आणि त्यावरची मोहोरी ह्याचा एक पॅटर्न बनतो आणि त्यावरच लक्ष केंद्रित करुन त्याभोवती खेळ्यांची गुंफण सुरु असते. आपण जसं शब्द वाचताना सुरवातीला एकेक अक्षर वाचत शिकतो नंतर सरावाने एकेक अक्षर न वाचता शब्दच्याशब्द एकदम वाचतो आणि त्यापुढची पायरी म्हणजे शब्दांचे समूह वाचत वाक्यच वाचतो तोच प्रकार. मग कोणतंही पुस्तक दिलं तरी वाचनाच्या पद्धतीत फरक पडत नाही. हां, विषय क्लिष्ट असेल तर आपण जरा सावकश वाचू पण पद्धत तीच.
असे खेळाडू अॅकॅडमिकली हुषार असतातच असे नाही. बर्याचदा नसतातच. किंबहुना त्यांची इतर बाबतीतली मेमरी सुद्धा सर्वसामान्य व्यक्तींइतकीच असते. बुद्धीबळाबाबतची मेमेरी ही डेलीबरेट प्रॅक्टीसमुळे काहीच्याकाही वाढलेली असते.
साधारण खेळाडू एखाद्या खेळीचे अॅनालिसिस मेंदूच्या ज्या भागाने करतात त्याऐवजी त्याच खेळीला ग्रँडमास्टर्सची लाँग टर्म मेमरी आणि त्याच्याशी निगडित मेंदूचे भाग सक्रीय होतात. त्यामुळे ती खेळी एक स्वतंत्र खेळी न राहता एका विशिष्ठ पॅटर्नचा भाग बनते आणि ताबडतोब त्याच्याशी संबंधित डाटा मेंदूत प्रोसेस व्हायला सुरुवात होते. (हे सगळे एम आर आय स्कॅनिंग वापरुन अभ्यासले गेले आहे) सर्वसाधारणपणे १० वर्षांच्या सरावात असे १ लाख पॅटर्न्स ग्रँडमास्टर्सनी नजरेखालून घातलेले असतात! त्यामुळे त्यांच्या दृष्टीने पटावरची परिस्थिती ही पहिल्यांदाच न येता कितव्यातरी शे वेळा आलेली असते - फरक लक्षात येतोय ना? सहाजिकच त्यावरची प्रतिक्रियाही तेवढीच झटपट आणि अचूक असणार.
खरं पाहता बुद्धीबळ शिकणं अजिबात अवघड नाहीये, विशेषतः लहान मुलांना तर नाहीच. सुरुवातीला नुसती मोहोरी मांडून बसणे आणि पटावरती चाळे करत राहणे इतकाच उद्योग करु देत. कुठले मोहोरे कुठे बसते आणि ते कसे हालते एवढेच काही दिवस. नंतर चाली शिकताना काय पाहिजे ते खेळू देत फक्त नियमबाह्य चाली नकोत इतके बघावे.
जरा बर्या खेळणार्या मुला/मुलींबरोबर नवख्यांना बसवा आणि त्यांना हरू द्या. ते कशामुळे हरले हे समजावून सांगा. न हरण्यासाठी काय करावे लागेल हे सांगा. ७-८ वर्षाची मुले साधारण महिन्याभरात खेळ पिकअप करतात.
सुरुवातीला मात्र संगणक कटाक्षाने टाळा प्रत्यक्ष मोहोरी, पट त्यावरचा त्रिमित खेळ याने मेंदूत कनेक्शन्स घट्ट व्हायला मदत होते.
असो. अजून काही मदत लागली तर मी करीनच.
30 Oct 2013 - 12:36 pm | जे.पी.मॉर्गन
लई म्हंजे लईच भारी एक्सप्लेनेशन. पोराचं दिवाळी गिफ्ट ठरलंच बघा ! :)
जे.पी.
4 Nov 2013 - 5:17 pm | llपुण्याचे पेशवेll
चायला असं असतं होय हे. मी एकदा १३-१४ वर्षाचा असताना आमच्या हुशार हुषार म्हणून नावाजल्या गेलेल्या एका ८ वर्षाच्या मामेभावाकडून चारीमुंड्या चीत झालो होतो बुद्धीबळात. आम्ही आपले उंट तिरका, हती सरळ, घोडा अडीच, मोहरे एक राजा एक आणि वजीर अडीच सोडून कसाही एतक्या जुबबी आणि न अनुभवलेल्या ज्ञानावर खेळत होतो. तेव्हापासून स्वतःच्या बुद्धीचा आणि त्याच्या बळाचा संपूर्ण न्यूनगंड येऊन कधीही त्या वाटेला गेलो नाही. कदाचित थोडा वेळ सरावाने हे जमलेही असते.
21 Oct 2013 - 10:27 pm | आतिवास
माहितीपूर्ण लेख; स्पर्धेबद्दल कुतूहल जागृत करणारा ...
22 Oct 2013 - 11:38 am | पैसा
हे दोघेही इंट्युइशनवर अवलंबून खेळ करतात असं दिसतंय. तर विशीला त्याच्या अनुभवाचा आणि थंड डोक्याचा निश्चितच जास्त उपयोग होईल असं वाटतंय. "ब्रेक" चा उपयोग कार्लसन नक्कीच करून घेणार असंही वाटतंय. भारतात स्पर्धा आहे म्हणून हा आजारीपणाच्या ब्रेकचा स्पेशल क्लॉज कबूल करून घ्यायला नको होता. तुला यायचं तर ये नाहीतर गेलास खड्ड्यात असं म्हणायला हवं होतं खरं तर. भरताला अजून हे भिकारी लोक कमी समजतात आणि आपण त्यांना तसे करू देतो हे अजिबात आवडलं नाही.
22 Oct 2013 - 11:46 am | मदनबाण
तुला यायचं तर ये नाहीतर गेलास खड्ड्यात असं म्हणायला हवं होतं खरं तर. भरताला अजून हे भिकारी लोक कमी समजतात आणि आपण त्यांना तसे करू देतो हे अजिबात आवडलं नाही.
१००% सहमत !
अर्थात त्यांचा हा समज दॄढ करण्यात आपल्या हरामखोर राजकारण्यांचा गेंड्याचा वाटा आहे.या हरामखोर भ्रष्ट राजकारण्यांनी आपल्या देशाची लाज पार वेशीला टांगली आहे, मग तुमचा आणि तुमच्या देशाचा सन्मान कोण ठेवील ?
22 Oct 2013 - 11:04 pm | चतुरंग
परंतु एकदम सगळ्याच गोष्टी एकत्र करुन भागत नाही. आपलं ऐकलं जात नाही याला खेळाव्यतिरिक्तही बरीच कारणं असतात आणि ती कारणं खेळाच्या मधे येऊ नयेत असे वाटत असते.
स्वतः आनंद अतिशय स्वाभिमानी आहे. तो उगाच फालतूपणा चालवून घेत नाही. रोखठोक बोलतो. कास्पारोवने फालतू कॉमेंट्स केल्यावर आनंदने त्याला पुढील शब्दात झापले होते -
"I think, Kasparov regrets his decision to retire. Kasparov lost his match in 2000 (to Kramnik) and retired in 2005. Then since 2011, he has been trying to make me retire too. He is perhaps missing the attention he used to get as the World champion."
सगळ्याच गोष्टी त्याच्याही हातात नसतात परंतु परिस्थितीत बदल होतोय. भारतात उत्तम खेळाडू आणि पर्यायाने पुढील विश्वविजेते तयार करणे हे यावरचे एक सणसणीत उत्तर असू शकते. आनंद चेन्नैला चेस अकादमी काढणार असल्याची कुण्कुणही मध्यंतरी कानावर होती. कदाचित या विश्वचषकानंतर त्याला मूर्त रुप येईलही.
-(आशावादी)चतुरंग
22 Oct 2013 - 3:14 pm | रमताराम
या वेळी आम्हीही हापिसला असल्याने याचा आस्वाद घेणे आम्हालाही अवघड झाले आहे. अर्थात अधूनमधून डोकावणे शक्य आहे, फार वेळ देणे अवघडच दिसते. नव्या दमाचे आस्वादक उभे रहावेत अशी अपेक्षा. मागच्या वेळीही बरेच लोक होते आपल्याबरोबर. ते लोक यावेळी धमाल करतील अशी आशा करतो.
22 Oct 2013 - 10:33 pm | चतुरंग
बरं, पण तरीही प्राडॉ, आणि मागल्या वेळी जॉईन झालेले सगळे + नवीन सभासद धमाल करतील अशी आशा आहे.
22 Oct 2013 - 6:12 pm | गणपा
रंगाशेट तुमचं लेखन वाचंणं ही ट्रीट आहे.
पण हल्ली ही ट्रीट फार महाग झालेय बॉ.
-(अधाशी) गणा
23 Oct 2013 - 1:30 am | चतुरंग
ताजी मुलाखत. छोटेखानीच आहे परंतु वाचनीय!
-रंगा
23 Oct 2013 - 7:29 am | मन१
मस्त परिचय.
बाकी रंगाशेठ, दिक्षित ह्यांनी बोलून दाखवलं; पण तसे बाकीचे इतरही बरेच जण आहेत; जे तुमच्या एल्खांमुळे चेसकडे प्रथम ओढले गेले. तस्मात, सवड काढून लिहित रहाच. असे गायब होउ नका प्लीज.
23 Oct 2013 - 10:54 am | चतुरंग
सध्या वेळाकडून जाम कात्रीत आहे. साठवून, साठवून अशा एखाद्या सामन्यासाठी वेळ मिळू शकतोय...:(
25 Oct 2013 - 10:38 pm | चतुरंग
यू ट्यूबवरचा हा दुवा दिला आहे -
http://www.youtube.com/watch?v=zDwr_zPDe10&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVD...
कार्लसन आणि आनंद यांच्यातल्या आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १४ डावांचे संकलन आहे.
धन्यवाद ररा! :)
27 Oct 2013 - 12:44 am | चतुरंग
http://mateinchennai.com/
आनंद जर्मनीतल्या बॅड सोड्न या लहानश्या गावात दिसला होता असे ब्लॉगलेखक म्हणतो. तिथे गरम पाण्याचे झरे आहेत. भरपूर पोहोणे, धावणे आणि सायकलिंग याद्वारे आनंदने त्याचे वजन ६ किलोने घटवले आहे (हे चांगले झाले, कारण मध्यंतरी तो जरा जास्तच गुबगुबीत झालेला चित्रात दिसत होता! ;) ) 'चेस टायगर ट्रेनिंग सेंटर' मधे बुद्धीबळाचा सराव करतो आहे.
-रंगा
29 Oct 2013 - 2:15 am | चतुरंग
हे खेळाडू एवढ्या भराभर चाली कशा करु शकतात.
आणखीन एक उदाहरण मध्यंतरी सापडले होते ते देतोय. कास्पारोव्-कार्पोव विश्वविजेतेपदाचा सामना १९९०.
यातल्या एका डावात कार्पोवच्या खेळीला प्रत्युत्तर म्हणून कास्पारोवने केलेल्या खेळीबद्दल त्यानेच विश्लेषण करुन दाखवले आहे की ती खेळी का खेळली. ज्या प्रकारे कास्पारोव त्याची कॅलक्यूलेशन्स दाखवतोय ते केवळ थक्क करुन टाकणारे आहे. कास्पारोवची सात मोहोरी आणि कारपोवची ५ मोहोरी अशा मिसळीतून होणारी सगळी काँबिनेशन्स तो करुन दाखवतो आणि प्रत्येक वेळी तो कसा जिंकतोय हे दाखवतो.
http://www.youtube.com/watch?v=SMe-hvCwTRo
डाव सुरु असताना एकाही मोहोर्याला हात न लावता डोक्यातल्या डोक्यात हे सगळे खेळून बघणे आणि मग योग्य खेळी ठरवणे, मान गये बॉस! तेथे पाहिजे जातीचे!! (एरवी तसा कास्पारोव माझा फारसा आवडता खेळाडू नाहीये परंतु त्याचे हे असले विश्लेषण बघून मी ख्याक झालो!)
29 Oct 2013 - 10:50 am | अमोल केळकर
खुप छान लेख :)
विश्वनाथ आनंदला सामन्यासाठी अनेक शुभेच्छा
अमोल केळकर
29 Oct 2013 - 11:09 am | चतुरंग
छोटा लेख. १९७२ च्या फिशर-स्पास्की लढतीनंतर एवढी प्रसिद्धी मिळालेली ही पहिलीच लढत आहे.
http://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/chess/Anand-Carlse...
29 Oct 2013 - 3:09 pm | पद्मश्री चित्रे
मी बुद्धीबळ फार खेळत नसले तरी तरी माझी दोन्ही मुले-(१३ व ९ वर्ष ) खेळतात, शिकत आहेत, रेटींग आहे पण सुरुवात आहे. त्यांना लेख, दुवे फार च आवडले. यु ट्यूब वर जावून हल्ली या लिंक बघत असतात आणि चर्चा पण करतात. . छान धागा दिल्याबद्दल धन्यवाद. वाचन खुण साठवली आहे.
29 Oct 2013 - 10:14 pm | चतुरंग
लिंका बघून खेळणे आणि चर्चा ही सुरुवात असते. त्यांना जमेल तितक्या सामन्यांमधून भाग घ्यायला लावा. सामन्यांमधून मिळणारा अनुभव लाख मोलाचा असतो. त्यांचे खेळलेले डाव ते लिहून काढतात की नाही? नसतील तर आवर्जून डाव लिहून काढायला सांगा. नंतर त्याचे विश्लेषण करुन बघणे फार महत्त्वाचे असते.
http://www.houdinichess.com/
हुडिनी चेस इंजिन त्यांना डाऊनलोड करुन द्या. हे चेस अॅनालिसिस सॉफ्ट्वेअर आहे (मोफत आहे!)
तुमच्या मुलांना शुभेच्छा!
-रंगा
30 Oct 2013 - 12:25 pm | पद्मश्री चित्रे
हो,भरपूर सामन्यात भाग घेतात. बक्षिस मिळालं ,नाही मिळालं तरी एन्जॉय करतात गेम. अर्थात, मिळालं बक्षिस खूप खुश असतात. सामने एक वेगळा अनुभव असतो हे खरच. त्यांना पण आणि मला पण.(त्या वर लिहीन म्हणते एकदा) मात्र गेम लिहायचा कंटाळा करतात. अगदी कम्पलसरी असेल तर च गेम लिहितात. सांगली, पुणे, नाशिक, महापौर चषक यात लिहावाच लागतो , मग लिहितात आणि मग सरांसोबत विष्लेषण करतात. हे सोफ़्ट्वेर घेते. तसे ते chesstacties.com वर खेळतात आणि कधीतरी ओनलाइन पण. पण सातत्य व मेहनत अजून खूप हवी यात.,नाही का?
29 Oct 2013 - 5:14 pm | सुहासदवन
बुद्धिबळातील महिलांबद्दल अजून कसं कोणीच नाही बोललं.
एवढे दुवे आणि लिंका दिल्यात तसंच आम्हा पामरास ह्या खेळातील बुद्धिवंत महिलांबद्दल काही माहिती दिली तर जरूर जाणून घ्यायला आवडेल…
29 Oct 2013 - 5:35 pm | प्रसाद गोडबोले
जुडीथ पोग्लर आणि कोनेरु हंपी वगळता जास्त महिला अंतरराष्ट्रीय बुध्दीबळात प्रसिध्द नाहीयेत . ( माझ्या माहीती प्रमाणे कोनेरु , जगात २ नंबरला आहे )
बाकी महाराष्ट्रातल्या मुलीही आता नाव काढु लागल्या आहेत , इशा करवडे आणि भक्ती कुलकर्णी तर बहुतेक भारतातल्या टॉप १०० मधे येतात !!
29 Oct 2013 - 10:35 pm | चतुरंग
जोरात सुरु झाली आहे. विशेषतः पुण्यातून अनेक लहानलहान मुले-मुली झपाट्याने पुढे येत आहेत.
वूमन इंटरनॅशनल मास्टर मृणालिनी कुंटे हिने पुण्यात चेस अकादमी सुरु केली आहे.
तिथे अनेक जण प्रशिक्षण घेऊन उत्तम खेळ करत आहेत.
29 Oct 2013 - 9:32 pm | प्यारे१
महिला 'पटावरचं' बुद्धीबळ जास्त खेळत नसाव्यात.
सॉरी रंगाशेठ, शॉर्ट बॉल मिळाला म्हणून हाणला. ;)
29 Oct 2013 - 10:24 pm | चतुरंग
महिला बुद्धीबळाबद्दल मी अजून काही लिहिलं नाहीये ही खरी गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ त्या पिछाडीवर आहेत असा बिल्कुल नाही. ज्यूडिथ पोल्गर ही पहिली जगज्जेती महिला ठरली. खरेतर तिनेच महिलांच्या मोठ्या बुद्धीबळ प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली म्हटले तरी चालेल.
आत्ताच्या चेन्नै सामन्याला ज्यूडीथ पोल्गर विशेष समालोचक म्हणून उपस्थित राहणार आहेच!
त्यानंतर बर्याच महिला खेळाडू झाल्या. सध्या चीनची हाऊ यीफॅन ही जगज्जेती आहे.
भारतातूनही सुरुवातीला सांगलीच्या वासंती, जयश्री आणि रोहिणी या तीघी बहिणींनी अतिशय जोमदार खेळ करुन महाराष्ट्राचे नाव मोठं केलंच होतं. शिवछत्रपती आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते कै. भाऊसाहेब पडसलगीकरांचे मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं. मला स्वतःला पडसलगीकरांचा खेळ बघायला मिळाला आहे.
असो. मी महिला बुद्धीबळावरही एक लेख लिहीन.
29 Oct 2013 - 8:47 pm | पद्मश्री चित्रे
हरिका द्रोणावल्ली आणि सौम्या स्वामिनाथन पण आहेत भारतातुन.
30 Oct 2013 - 12:28 am | चतुरंग
यांनी आनंदला शुभेच्छा देण्यासाठी एक वेबसाईट उघडलीये तिथे जाऊन तुम्हाला आनंदला शुभेच्छा देता येतील. तिथेच चेपु आणि ट्विटरच्या लिंक्ससुद्धा आहेत.
http://www.wish4vishy.com/index.php
1 Nov 2013 - 2:30 am | चतुरंग
अखेर आज कार्लसनचा सेकंड कोण आहे ते समजले! जॉन लुडविग हॅमर हा कार्लसनचा मित्रच त्याचा एक सेकंड आहे हे पक्के.
दुसरा सेकंड (कदाचित असू शकेल) तो म्हणजे लोरँ फ्रेसने.

हा रॅपिड आणि ब्लिट्झ एक्स्पर्ट आहे. विशेषतः १२ मुख्य डावांनंतर सामना जर टायब्रेकर मध्ये गेला तर याची कार्लसनला मदत होऊ शकेल.
कार्लसन आणि हे दोघे अशी सगळीच टीम एकदम तरुण आणि नवीन आहे त्यामुळे हे तिघे कोणते नवीन डावपेच लढवतात ते बघणे अत्यंत थरारक असणार. भरपूर आतषबाजी बघायला मिळेल अशी आशा आहे!
(अधिर) रंगा
2 Nov 2013 - 9:59 am | मोदक
वाचतोय!
धन्यवाद.
2 Nov 2013 - 12:34 pm | प्रसाद गोडबोले
मिपाने आता पाडव्या नंतर मुखपृष्ठावर काऊट डाऊन क्लॉक सुरु करावे अशी अॅडमीनला विनंती करीत आहे :)
4 Nov 2013 - 9:59 am | सुहासदवन
कार्लसन देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ
एक मस्त गाणे होऊन जाऊ दे वाल्गुदेवा....
5 Nov 2013 - 5:34 am | चतुरंग
अँड्रॉईड फोन्ससाठी अॅप्लिकेशन तयार झाले आहे आणि ते इथून उतरवून घेता येईल.
माझ्या फोनवर मी घेतले आहे. चांगले वाटते आहे, अजून जास्त खेळून बघितले की जास्त समजेल.
या बातमीनुसार कार्लसन आणि त्याचा गोतावळा चेन्नैला पोचला आहे! आता ७ नोवेंबरला तमिळनाडूच्या मुख्यमंत्री मा.जयललिता यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल आणि त्यांच्याच हस्ते ड्रॉ निघेत त्यात पांढरे आणि काळे मोहोरे कोणाचे असेल ते ठरेल.
5 Nov 2013 - 5:55 am | चतुरंग
बातमीनुसार माननीय श्री. गॅरी कास्पारोव हे देखील ११-१२ नोवेंबर रोजी चेन्नैला भेट देऊन तिसरा सामना बघणार आहेत! (कास्पारोवला प्रत्येक जगज्जेतेपदाच्या सामन्याला, खेळाडू म्हणून नसेना का पण प्रेक्षक म्हणून तरी, हजेरी लावल्याखेरीज चैन पडत नाही असं दिसतंय! ;) )
5 Nov 2013 - 11:30 pm | चतुरंग
महाबलीपुरम इथली छोटी सुट्टी संपवून काल सोमवारी आनंद चेन्नैत दाखल झाला.
हाएटला भेट देऊन त्याने त्याच्या राहण्याच्या जागेची पाहणी केली.
इंडियन एक्स्प्रेसमधला एक छोटेखानी लेख. आनंद आणि अरुणा एका प्रसन्न मुद्रेत.
http://newindianexpress.com/sport/Anand-not-scared-assures-Aruna/2013/11...
-रंगा
6 Nov 2013 - 9:41 am | सुहासदवन
विशीच्या शर्टवर NIIT चा लोगो का असतो बऱ्याच वेळेला?
NIIT च्या branding ची एवढी गरज आहे का ?
6 Nov 2013 - 11:27 am | चतुरंग
आणि त्यांच्या सहयोगाने विशी चेन्नैमधे चेस अॅक्टिविटीज घेतो असे माझ्या माहितीत आहे. त्यामुळे तो लोगो.
6 Nov 2013 - 12:02 pm | चतुरंग
सामन्याबद्दलची मते. रोचक.
http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/kasparov-wants-carlsen...
6 Nov 2013 - 12:31 pm | ऋषिकेश
वाट बघतोय.. इथे लाईव्ह नाही तरी तुमच्या उपलब्ध वेळेनुसार सामन्यांचे विश्लेषण जरूर येऊ दे
8 Nov 2013 - 1:01 am | चतुरंग
मा. जयललिथा यांनी औपचारिक उद्घाटनानंतर ड्रॉ काढला त्यात कार्लसन पहिला डाव पांढर्या मोहोर्यांनी सुरु करेल.
दोन्ही खेळाडूंची पत्रकार परिषद झाली त्याचा हा दुवा.
http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/anand-vs-carlsen-offic...
सामने जगभरातल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या वेळेला दिसतील याबद्दल आणि थेट प्रक्षेपण/लाईव स्ट्रीमिंग कुठे बघता येईल अशा माहितीसाठी हा दुवा बघा. तू नळीवर स्ट्रीमिंग दिसणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे! :)
http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/summary-of-anand-vs-ca...
कधी एकदा शनिवार उजाडतोय असं झालंय आता! :)
-रंगा
9 Nov 2013 - 6:20 am | चतुरंग
9 Nov 2013 - 11:27 am | चतुरंग
पहिला डाव कार्लसन पांढरी मोहोरी आणि आनंद काळी मोहोरी आहेत.
मी पहिल्या डावासाठी अजून साधारण तीन तासांनी निराळा धागा सुरु करणार आहे.
9 Nov 2013 - 1:00 pm | प्रसाद गोडबोले
लय भारी !
आता मजा येणार !!
9 Nov 2013 - 2:25 pm | मृत्युन्जय
आनंदला शुभेच्छा.
कार्लसन जिंकला तर तो कास्पारॉव नाक उंच करुन सग्ळीकडे हिंडणार. ते नकोच म्हणुन कार्ल्सन हरु देत. एरवी त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही
11 Nov 2013 - 11:05 pm | चतुरंग
http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/garry-kasparov-reaches...
आपण 'चेस टूरिस्ट' म्हणून आलो असून फिडे प्रेसिडेंट निवडणुकीचा कुठल्याही प्रकारे प्रचार ४८ तास करणार नाही अशी ग्वाही त्याने दिली. कार्लसनला शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलोय असे देखील तो म्हणाला.
'फिडे'चे अधिकारी किंवा भारतील चेस फेडरेशनच्या कुठल्याही पदाधिकार्याने त्याचे विशेष स्वागत केले नाही इतकेच नव्हे तर सामन्यानंतर होणार्या पत्रकारपरिषदेतही त्याला रीतसर बंदी आहे. एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणूनच त्याला तिथे वावरावे लागणार आहे. अर्थात त्याच्या नावाचा करिष्मा एवढा आहे की त्याला बघायला प्रचंड गर्दी होणार हे नक्की!