उंटांची चालच तिरकी!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 11:21 pm

सचिनला लगाम घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ब्रेटलीचे अस्त्र काढले तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियातच धू धू धुवून सचिनने वाळत घातला होता! गेल्या तीन आठवड्यांखाली विक अ‍ॅन झी इथे झालेल्या टाटा स्टील बुद्धीबळस्पर्धेत आनंदने लेवॉन अरोनियनला ज्या जीवघेण्या पद्धतीने पिसला ते बघून मला सचिन-ब्रेटली सामन्याची आठवण न होती तरच नवल. ह्या विजयाने आनंदने भल्याभल्यांची तोंडे बंद केली. स्पर्धेत विजेता ठरलेल्या मॅग्नुस कार्लसनने देखील 'माईंड ब्लोइंग' असं या डावाचं वर्णन केलं.

अरोनियन आणि आनंदमधली 'दुश्मनी' जुनी आहे. लेवॉनविरुद्ध आनंदचा स्कोअर तसा डावाच आहे. शिवाय आनंद विश्वविजेता असला तरी सध्या लेवॉनचे इलो रेटिंग त्याच्यापेक्षा जास्त आहे. अशा सगळ्या जोरकस पार्श्वभूमीवर पांढर्‍या मोहर्‍यांकडून खेळताना लेवॉनचे पारडे जड होते. या डावाकडे रसिकांचे लक्ष असणे स्वाभाविक होते.

डावाची सुरुवात क्वीन्स गँबिट प्रकारातल्या सेमी स्लाव मेरान उपप्रकाराने झाली.

1. d4 d5 2. c4 c6 3. Nf3 Nf6 4. Nc3 e6 5. e3 Nbd7 6. Bd3 dxc4
7. Bxc4
सहाव्या खेळीला पहिली मारामारी झाली. आनंदने सी४ चे प्यादे मारले आणि पांढर्‍या उंटाने काळे प्यादे मटकावले.
इथे आनंदने खेळी केली b5. प्यादे उंटावर घालून त्याने आक्रमक इरादा दाखवून दिला

8. Bd3 Bd6
लेवॉनचा पांढरा उंट मागे गेल्याबरोबर आनंदने त्याचा काळा उंट एच२ प्याद्यावर रोखला.

9. O-O O-O
नवव्या खेळीत किल्लेकोट करुन आपापले राजे सुरक्षित केले दोघांनी.

10. Qc2 Bb7
सी६ मधल्या दुबळ्या प्याद्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने लेवॉनने वजीर सी स्तंभात हलवला. आनंदने त्याचा पांढरा उंट पटाच्या मुख्य कर्णात स्थानापन्न केला. हे दोन्ही उंट किती प्रबळ ठरले ते दिसेलच.
आता काळ्याचे लक्ष्य सी६ चे प्यादे सी५ मधे सरकवणे आहे. परंतु त्याचे बी५ मधले प्यादे बिनजोरी असल्याने सध्या ती खेळी करता येत नाही. किंवा बी५ मधले प्यादे पांढर्‍या घोड्यावर बी४ असे येऊ शकते. ही संभाव्य खेळी रोखण्यासाठी पांढरा खेळला 11. a3
Rc8 काळ्याने हत्ती सी स्तंभात आणून प्याद्याला बळकटी दिली.

आता अकराव्या खेळीनंतर स्थिती नीट बघा. पांढर्‍याचा पांढरा उंट आणि त्यामागे वजीर असे एच७ प्याद्यावर निशाणा धरुन बसले आहेत. एफ६ मधला काळा घोडा त्या प्याद्याला जोर लावून असल्याने काळ्याला सध्या चिंता नाही. पांढर्‍याचा एक हत्ती आणि उंट जरा पिछडे हुए आहेत परंतु पटाच्या मध्यात त्याचा जोर जास्त आहे त्यामुळे स्थिती समसमान आहे.

11

12. Ng5
अरोनिअनने घोडा एच७ प्याद्यावर घातला. आता ते प्यादे वाचवायचे तर जी६ किंवा एच६ असे प्यादे पुढे टाकून किल्लेकोट मोडावा लागणार.
आनंद काय खेळणार? c5 आनंदने चक्क दुर्लक्ष करुन सी स्तंभातले प्यादे पुढे सरकवले!!
अरोनियन बराच वेळ विचार करत होता. शेवटी त्याने घोड्याने प्यादे मारलेच!
13. Nxh7
थेट हत्तीवर हल्ला. आतातरी आनंदला हत्ती हलवणे भागच आहे.
Ng4! आनंदने घोडा जी४ मधे आणला. आता Qh4 अशी धमकी आहे आणि वजीर तिथे आला तर मात अटळ आहे!!

अरोनियनने धोका ओळखला आणि एफ४ असे प्यादे पुढे सारुन काळ्या उंटाचा एच२ प्याद्यावरचा जोर तोडला.
14. f4 cxd4
15. exd4 प्याद्यांची मारामारी झाली. आता आनंदची पुढची खेळी होती Bc5!! अरे काय चाल्लंय काय?
हत्ती आधीच घोड्यासमोर आहे तो वाचवायचा सोडून आता उंट प्याद्यासमोर टाकला?? अरोनियन वेडा झाला! सामना बघणारे सगळेच चक्रावून गेले.
समजा dxc5 तर Nxc5 आणि पांढर्‍या उंटावर घोडा आणि वजीर असा दुहेरी हल्ला होतो. शिवाय लगेच पुढे Qd4+ शह अशी धमकी आहे, आणि पांढर्‍याचा डाव कोसळतो!

16. Be2
अरोनियन ताडले की बात कुछ अलग है! उगीच हत्ती किंवा उंटाच्या मोहात पडण्यात अर्थ नाही आता बचाव करणे जरुरीचे आहे. त्याने उंट मागे घेतला. आता तरी आनंद गप्प बसेल? आनंदची पुढची खेळी तो जगज्जेता का आहे हे दाखवून देते

Nde5!!! आता घोडा त्या प्याद्यासमोर टाकला!!! एकाच वेळी हत्ती, उंट आणि घोडा बलिदानाला तयार आहेत. अरे काय खेळ म्हणायचा का चेष्टा!! हा डाव मला मिखाईल तालची आठवण देऊन गेला. ताल म्हणाला होता "Some sacrifices are sound the rest are mine!" बलिदानासमोर बचाव नसतो!
तालचं आणखी एक वचन मला आठवतं ते असं "You have to take your opponent into a deep, dark forest, where 2+2=5, and the path leading out is only wide enough for one!"
आत्ता डावाची स्थिती अगदी अशी झाली होती. विविध शक्यतांच्या जंगलातनं नेमकं काय करायचं हा अरोनियन समोर प्रश्नच होता. आनंद असा खेळतोय म्हणजे त्याने सगळ्या शक्यतांचा विचार केलेला आहे हे नक्की! आता खेळी चुकली तर गच्छंती!!
प्याद्याने घोडा किंवा उंट मारला तर वजीर डी४+ शह, राजा एच१, वजीर जी१+ शह, हत्तीxवजीर, घोडा एफ४+ शह आणि मात!
ह्याला स्मॉदर्ड मेट म्हणजे घुसमटून मात म्हणतात.

17. Bxg4 काट्यासारखा सलणारा घोडा मारला तर ताण जरा कमी होईल ह्या विचाराने जी४ वरचा घोडा अरोनियनने मारला. डी४ वरचे प्यादे मारुन आनंदचा शह. Bxd4+

18. Kh1 अरोनियनचा राजा कोपर्‍यात. (अक्षरशः कोपच्यात घेतलाय राजाला! ;) )
Nxg4 उंट मारुन दुसरा घोडा पहिल्या घोड्याच्या ठिकाणीच हजर!

19. Nxf8 बराच विचार करुन शेवटी अरोनियनने हत्ती मारला. आता वजीर एच७+ अशी धमकी आहे म्हणजे आनंदच्या राजाला घोडा मारावाच लागतो आणि त्याचा वजीर एच स्तंभात येऊ शकत नाही!
आता आनंद जी खेळी खेळला आहे ती केवळ आणि केवळ उच्च आहे! ब्रेटली किंवा अक्रमला सचिनने मारलेला अफलातून स्ट्रेट ड्राईव, किंवा अशक्य अंतर धावत येऊन नदालने मारलेला, थेट बेसलाईनला जाणारा अचूक बॅकहँड अशांचीच तुलना इथे होऊ शकते. खेळाच्या नजाकतीचा मूर्तिमंत आविष्कार! f5!!! एफ प्यादे दोन घरे सरकवून वजिराची आत घुसायची वाट बंद करुन आनंदने डावाचा नूरच पालटवला. ह्या घावाने अरोनियन खचलाच!!

20. Ng6 घोडा मागे आणून वजीर एच४ ला जाणार नाही असा एक प्रयत्न करुन बघितला लेवॉनने
आनंदला घाई नाहीये Qf6 वजीर घोड्यावर आणला

21. h3 एच प्यादे सरकवून बचावाचा क्षीण प्रयत्न. आनंदने घोडा खल्ला Qxg6

आता एच प्याद्याने काळा घोडा मारुन चालत नाही अन्यथा वजीर एच ६++ अशी एकाच खेळीत मात!!
म्हणून 22. Qe2 वजीर आणि हत्तीच्या सहभागाने हातपाय झाडण्याचा अरोनियचा प्रयत्न!

आनंदने वजीर एच पट्टीत आणला Qh5 पांढर्‍या राजाच्या मृत्युघंटा वाजायला सुरुवात झाली.

23. Qd3 वजीर एच ३ प्याद्याच्या बचावाला आणायचा शेवटचा प्रयत्न!
Be3! उंट तिरका घालून आनंदने शेवटचा प्रयत्न हाणून पाडला!! अरोनियनने डाव सोडला.
मी हा डाव आंतरजालावर बघितला. नशीबवान ठरलो मी! शेवटच्या काही खेळ्यात अरोनियनचा चेहेरा कमालीचा उतरला होता.

डावानंतरच्या पत्रकार परिषदेत आनंदने सांगितले की स्लाव मेरान वेरिएशनची तयारी बोरिस गेल्फंडविरुद्धच्या जगज्जेतेपदाच्या सामन्याचा भाग होती. त्यामुळे काही वेरिएशन्स तयार होती परंतु बहुतांश भाग हा आयत्या वेळी पटावर घडणार्‍या खेळ्यांमधूनच शोधून काढावा लागला. लगेच आनंदद्वेष्ट्यांनी मुक्ताफळे उधळलीच की "आधीच्या तयारीचा भाग असल्याने आनंद जिंकला हे काही विशेष नाही" वगैरे वगैरे...
त्यात काही तथ्य नाही. अरोनियनच्या दर्जाच्या खेळाडूला, जो पुढच्या वर्षी जगज्जेतेपदासाठीचा एक प्रतिस्पर्धी म्हणून मॅग्नुस कार्लसनच्या बरोबरीने गणला जातो, असे हरवणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे!!
आनंद या डावात निर्विवाद श्रेष्ठ ठरला. संपूर्ण सामन्यातल्या काही डावात अतिबचावात्मक खेळून आनंद विजेतेपदाला गवसणी घालू शकला नाही हे खरे परंतु हा डाव त्याच्या ऑल टाईम ग्रेट डावांमधला एक झाला हे नक्की. शेवटी असे डावच तुमचं आयुष्य समृद्ध करतात. खेळाचा इतिहास लिहितात!! हॅट्स ऑफ टु विशी!!

खालील आकृतीत सगळा डाव एकेक खेळी करुन खेळून बघता येईल.

[Event "Tata Steel Chess, Wijk ann Zee, NED"][Site "?"][Date "2013.1.15"][Round "4"][White "Levon Aronian"][Black "Anand Vishwanathan"][Result "*"][WhiteELO "2802"][BlackELO "2772"]%Created by Caissa's Web PGN Editor1. d4 d5 2. c4 c6 3. Nf3 Nf6 4. Nc3 e6 5. e3 Nbd7 6. Bd3 dxc4 7. Bxc4 b5 8.Bd3 Bd6 9. O-O O-O 10. Qc2 Bb7 11. a3 Rc8 12. Ng5 c5 13. Nxh7 Ng4 14. f4 cxd415. exd4 Bc5 16. Be2 Nde5 17. Bxg4 Bxd4 18. Kh1 Nxg4 19. Nxf8 f5 20. Ng6 Qf621. h3 Qxg6 22. Qe2 Qh5 23. Qd3 Be3document.getElementById("cwvpd_1360460667").value=document.getElementById("cwvpg_1360460667").innerHTML;document.getElementById("cwvfm_1360460667").submit();

-(आनंदवेडा)चतुरंग

क्रीडाअभिनंदनआस्वादसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

11 Feb 2013 - 12:00 am | कवितानागेश

सावकाश वाचेन. :)

राजेश घासकडवी's picture

11 Feb 2013 - 12:09 am | राजेश घासकडवी

पहिल्यांदा लेख न वाचताच नुसता भरभर खेळून बघितला. आनंदचा खेळ म्हणजे अक्षरशः 'सर को कफन बॉंधे हुए' चालू आहे असं वाटत होतं. सतत 'अरे हा हत्ती खा की. तेवढं नाही पुरे? मग हे घे, घोडा खा.. आणि हा उंट कसा वाटतो... ' आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पांढरा त्यातलं काहीच खायला घाबरत होता. कसला घुमवलाय त्याला... अगदी एखाद्या शाळकरी पोरासारखी परिस्थिती करून ठेवली.

त्या इम्मॉर्टल गेमची आठवण झाली. मस्त.

राही's picture

11 Feb 2013 - 12:19 am | राही

बुद्धिबळातले काहीही समजत नसूनसुद्धा आपल्या लेखातून एखाद्या युद्धकथेचा थरार अनुभवास आला.आनंदचे धाडस आपण शब्दांत अचूक पकडले आहे.

मुक्त विहारि's picture

11 Feb 2013 - 8:36 am | मुक्त विहारि

असेच म्हणतो...

सोत्रि's picture

13 Feb 2013 - 9:47 am | सोत्रि

हेच म्हणतो!

-(रंगाकाकांचा पंखा) सोकाजी

संजय क्षीरसागर's picture

11 Feb 2013 - 12:37 am | संजय क्षीरसागर

तुमचं आनंदप्रेम असंच उत्तरोत्तर वाढत राहो आणि विशी एकसोएक बाजी जिंकत राहो!

आनन्दिता's picture

11 Feb 2013 - 1:32 am | आनन्दिता

सुपर्ब......
एखादा युद्धप्रसंग शोभेल इतकी सुंदर खेळी. आणि तितकंच थरारक वर्णन!!

आदूबाळ's picture

11 Feb 2013 - 2:29 am | आदूबाळ

ती शेवटची आकृती नीट चालत नाही आहे. चतुरंगजी, त्या आकृतीचा दुवा द्याल तर उपकार होतील.

अगोचर's picture

11 Feb 2013 - 9:05 am | अगोचर

क्रोम मधून शेवटची आकृती चालत नव्हती. फायरफ़ोक्स मधून चालली.
असो, हा खेळ इथे पण खेळून बघता येईल.

काळा पहाड's picture

11 Feb 2013 - 3:05 am | काळा पहाड

लेख बुकमार्क करून ठेवला आहे. जवळ बुद्धीबळ नाहीये. आणि ते नसताना वाचणे शक्य नाही.

स्पंदना's picture

11 Feb 2013 - 5:52 am | स्पंदना

तुमच्या लेखणीला सलाम!
चतुरंग बुद्धीबळ म्हण्टल की तुमची लेखणी अशी झुळ्झुळ वाहु लागते, मग त्यात सगळ्या खेळांची अगदी समरस होउन वर्णनं येतात.

प्रीत-मोहर's picture

11 Feb 2013 - 8:00 am | प्रीत-मोहर

मस्तच रंगाकाका

मन१'s picture

11 Feb 2013 - 8:30 am | मन१

निव्वळ अशक्य असा डाव.
असा धुमाकूळ पहायला मिळणे म्हणजे नशीबाचे सार्थक.
परवाच कुठल्यातरी मराठी ब्लॉगवर ह्याच डावाबद्दल वाचलं; आणि खेळ्या पाहून डोके चक्रावून गेले.
हत्ती वाचावायचे सोडून उंट काय, घोडा काय देत सुटणे हे स्वतः वेडा असण्याचे किंवा सम्रोअच्याला वेड लावण्याचेच उद्योग आहेत.

रमताराम's picture

11 Feb 2013 - 8:48 pm | रमताराम

हाच डाव आमच्या आणखी एका मित्राने आमच्या निदर्शनास आणून दिला होता रंगाशेट. हा बघा

रमताराम's picture

11 Feb 2013 - 8:49 pm | रमताराम

च्यामारी त्या दुव्याचे काय झाले

प्रचेतस's picture

11 Feb 2013 - 10:09 pm | प्रचेतस

दुवा दुरुस्त करून दिलाय.

बाकी रंगाशेठचे डावाचे विवेचन नेहमीप्रमाणेच जबरदस्त.

प्रसाद गोडबोले's picture

11 Feb 2013 - 11:31 pm | प्रसाद गोडबोले

मस्तच !!

चतुरंगराव आग्रहाची विनंती ...अजुन लिहित चला ! आम्ही वाचत आहोत !

(आणि लिहिणारच असाल तर मॉर्फीसाहेबांच्या गेम्स ने सुरुवात करा ही आगाऊ विनंती )

पैसा's picture

11 Feb 2013 - 11:39 pm | पैसा

मस्त डाव आणि तेवढेच मस्त वर्णन!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Feb 2013 - 1:21 am | विश्वनाथ मेहेंदळे

सुरेख डाव आणि सुंदर वर्णन. पूर्ण डाव खेळून पहिला तेव्हा बराचसा कळला. पण वरून १५ अजून प्रश्न पडले. अमुक वेळेला एखादी विशिष्ट चाल का नाही केली ते कळले नाही. ते सगळे विचारायचे म्हणजे रंगकाकांची शिकवणी लावावी लागेल.

मोदक's picture

12 Feb 2013 - 11:51 am | मोदक

वाचनखूण साठवली आहे..

जबरा वर्णन.

अमोल केळकर's picture

12 Feb 2013 - 6:33 pm | अमोल केळकर

छान वर्णन. या लेखासंबंधी इथेही काही लिहिलेले आढळले
असो

अमोल केळकर

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 7:27 pm | परिकथेतील राजकुमार

रंगाकाका रॉक्स !

अप्रतिम... भारतात धुपाटण्याने धुणी कशी धुतात याचं बसल्या जागी प्रत्यंतर आलं असेल त्या लॅवॉनला..
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला.. :) :)
आहेतच भारतीय तसे हुश्शार..

पुढची स्पर्धा कँडिडेट चँपिअनशिप, लंडन इथे मार्च १५ ते एप्रिल १ अशी भरणार आहे. सहभागी खेळाडूंची यादी बघूनच रसिकांच्या तोंडाला पाणी सुटावे अशी परिस्थिती आहे - मॅग्नुस कार्लसन, लेवॉन अरोनिअन, बोरिस गेल्फंड, अलेक्झांडर ग्रिश्चुक, वॅसिली इवन्चुक, व्लादिमीर क्रामनिक, तैमूर रादजाबोव आणि पीटर स्विडलर!
या स्पर्धेचा विजेता २०१४ साली होणार्‍या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत आनंदचा प्रतिस्पर्धी असेल! म्हणजे काय जिगरीने स्पर्धा खेळली जाईल याचा अंदाज येऊ शकेल.
मॅग्नुस कार्लसन आणि लेवॉन अरोनिअन या दोघांपैकी एक जिंकेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे, पण अनेकदा आश्चर्यकारक निकालही लागतात!
सामन्यांचं वर्णन देण्याचा प्रयत्न जरुर असेल. पुरेसा वेळ आणि रमतारामांसारखा एखादा साथिदार मिळाला तर कळीच्या सामन्यांचं धावतं समालोचन करण्याचाही प्रयत्न असेल! :)
धन्यवाद!

-चतुरंग

धनंजय's picture

14 Feb 2013 - 5:14 am | धनंजय

आणि चतुरंगांच्या धावत्या वर्णनामुळे अधिक समजला. (बी७ वरचा उंट किती महत्त्वाचा आहे, ते अगदी शेवटच्या ३-४ खेळ्यांपर्यंत माझ्या लक्षात आले नव्हते. १२व्या खेळीतील c5 चा इतक्या दूरपर्यंत जाणारा स्ट्रॅटिजिक परिणाम!)

ऋषिकेश's picture

14 Feb 2013 - 8:53 am | ऋषिकेश

आरामात वाचायला म्हणून बाजुला ठवला होता. सगळ्यांसारखं आमचं डोस्क चटाचटा चालं न्हाई म्हणून दमानं एकेक खेळी करून बघत मग लेख वाचला.. ज्याम मजा आली!!!

रंगरावांनी लाईव्ह सामन्याची कॉमेंट्री करावी तशा उत्साहात लेखन केलयं!.. मस्तच!