२१ जून, मॉस्को..(२)

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
22 Jun 2013 - 2:08 am

संध्याकाळी घरी आल्यावर जेवून ८.४५ च्या सुमारास घराजवळील 'व्हिक्टरी पार्क' कडे निघालो.
व्हिक्टरी पार्क सोव्हियत युनियनच्या अंतीम काळात तयार झाले. हे रशिया आणि नाझी जर्मनीच्या 'ग्रेट पेट्रीयोटिक वॉर'(१९४१ ते १९४५ दुसरे महायुध्द)च्या विजयाचे स्मारक आहे. १९९५ मध्ये या विजयाच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी या स्मरकाचे उद्घाटन झाले. या जागेला आणखी ऐतिहासिक महत्व देखील आहे. १८१२ मध्ये याच ठिकाणी नेपोलियनचा पराभव झाला होता.

व्हिक्टरी पार्कचे प्रवेशद्वार

vp

येथे नयनरम्य कारंजाचे पांच मोठे चौकोन आहेत. या पांच चौकोनात मिळून एकूण १४१८ कारंजे आहेत. पाच चौकोन युध्दाची पांच वर्षे तर १४१८ कारंजे त्यातील प्रत्येक दिवसाचे प्रतिक आहेत.
f

येथील १५० मिटर उंचीचा विजय स्तंभावर विजयदेवता कोरली आहे.
vs

फुलांनी सुशोभित केलेले घड्याळ हे या जागेचे खास आकर्षण आहे. या घड्याळातली वेळ पहा रात्रीचे साडेनऊ वाजले आहेत आणि अजूनही कडक ऊन आजूबाजूच्या इमारतींवर स्पष्टपणे दिसत आहे.
आणि हो ओळख करून द्यायची राहून गेली. या दोन उंच सावल्यात उजवीकडे अस्मादिक आहेत तर डावीकडे 'अर्धांग' आहे!!
w

रशियन भाषेतील जाहिरात फलकावरील वेळ आणि आजूबाजूचे वातावरण...
w1

अजूनही सूर्यास्ताला जवळपास एक तास दहा मिनिटे बाकी आहेत. व्हिक्टरी पार्क मधून निघून 'क्रेमलीन'च्या दिशेने जाणारी बस पकडून 'मोक्सवा' नदीच्या पुलाकडे जायला निघालो. बसप्रवासात संध्याकाळ्च्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या इमारती मनाला भुरळ पाडत होत्या.
१.
g

२.
g2
'मोक्सवा' या नदीच्या नांवावरुनच या शहराला 'मॉस्को' हे नांव मिळाले. ही नदी ५०३ कि.मी. लांब असून या नदीच्या खो-यात १७६०० वर्ग किलोमिटरचा भाग येतो. मॉस्को शिवाय मोझाहायक्स, झेविगोड, झुकोवस्की, ब्रोनेस्टी, वोस्करेसेनक्स या शहरांचा प्रवास करून या नदीचा कलोम्ना येथे सुप्रसिध्द व्होल्गा नदीशी संगम होतो.
येथे पोहेचेपर्यंत ९.५० झाले आहेत. मात्र अगदी मनोरम संध्याछाया वातावरण प्रसन्न करीत आहेत. या पहा काही रंगछटा....
१.
r

२.
r1

३.
g2

निसर्गाचा एक अपूर्व सोहळा, पश्चिम क्षितिजावर भगवान सहस्त्ररश्मी तर पूर्व क्षितिजावर रजनीनाथ.
s m

आता सूर्यदेवही मावळतीकडे झुकले आहेत जणू काही आपल्या रीष्टवाचात 'अजून किती वेळ उरला आहे बाबा आजची ड्यूटी संपायला!' असाच विचार करीत असावेत.

१.
ss

२.
ss2

येथून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घराकडे आम्हीही निघालो. मात्र पांचव्या मजल्यावर आपल्या घराकडे न वळता प्रथम सर्वात वरच्या नवव्या मजल्यावर जाऊन १०.१८ चा मुहूर्त साधायचा होता.
एक धीर गंभीर शांतता पसरली होती. सुर्यनारायण या वर्षातील आजची उत्तर गोलार्धातील सर्वात लांबलचक सेवा बजाऊन थकून भागून परतले होते. मॉस्कोच्या आकाश रेषेवर रक्तिमा पसरला होता.

se
जाता जाता या आकाशरेषेत सर्वात उंच तांबूस रंगाची इमारत 'मर्क्युरी सिटी टॉवर' आहे ही युरोपखंडातील सध्याची सर्वात उंच (३३९ मिटर) ७५ मजली इमारत आहे.

आजच्या दिवसात निसर्गाचा हा आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळाला तो आपल्या बरोबर अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे. २१ डिसेंबरला याच्या उलट परीस्थिती पाहायला मिळेल तेव्हा पाहुया जमले तर याच विषयावर पुन्हा भेटू..
समाप्त.

समाजजीवनमानभूगोलदेशांतरविचार

प्रतिक्रिया

जुइ's picture

22 Jun 2013 - 3:40 am | जुइ

दोन्ही भागांमधले फोटो आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2013 - 6:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकवीस जूनचा मास्कोतल्या निसर्गाच्या विविध छटांची ओळख आवडली. आपल्याबरोबर आमचीही मास्को सफर झाली. व्हिक्टरी पार्कचा फोटो पाहून इंडिया गेटची किंचित आठवण झाली. घड्याळी, रशियन जाहिराती, नेपोलियनच्या पराभवाची जागा, आणि सर्वच फोटो आवडले. दहा अठराला दिवस मावळला विज्ञान असेल त्यापाठीमागे पण निसर्गाच्या चमत्काराची मोठी गम्मत वाटली. बाकी, तुम्हा दोघांचा फोटोही सुरेख. :)

मला वाटतं तुम्ही मास्कोची तपशिलवार सफर आम्हाला घडवाच. आमचा आणि मास्कोचा संबंध यायचा तो रेडियोच्या एसडब्लू बँडवर चुकुन माकून मास्को रेडियो नावाचं स्टेशन लागायचं तेवढाच. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

22 Jun 2013 - 8:56 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Jun 2013 - 10:15 am | लॉरी टांगटूंगकर

दोन्ही भाग लै आवडले. प्रचंड सुंदर फटू.
उंचच उंच बिल्डिंगपेक्षा हे पसरट अन् सोनेरी झळाळलेलं बांधकाम लै च्या लैच राजेशाही वाटते.
इतक्यात समाप्त ? अंधारातले, संध्याकाळ/रात्रीचे फोटो टाकणार होता ना??

चित्रगुप्त's picture

22 Jun 2013 - 10:21 am | चित्रगुप्त

फोटो आणि वर्णन छान आहे.
एका गोष्टीविषयी मात्र आश्चर्य वाटले, ती म्हणजे नेपोलियन याचा १८१२ सालचा पराभव अमूकच जागी झाला, असे म्हणणे.
वॉटर्लूच्या (हल्लीचे बेल्जियम) युद्धात १८ जून १८१५ रोजी नेपोलियन चा पराभव झाला, हे सर्वविदित आहेच.

मास्कोत नेपोलियनने १५ सप्टेंबर १८१२ ला प्रवेश करून रिकाम्या असलेल्या क्रेमलिन राजवाड्यात वास्तव्य केले. या वेळेपर्यंत मास्कोतील २/३ लोक शहर सोडून निघून गेलेले होते. परंतु त्यापुढील सहा दिवसात मास्कोच्या गव्हर्नरच्या आज्ञेने मुद्दाम लावलेल्या आगीत मास्को शहर जळून गेले. नेपोलियनच्या सैनिकांनी जेवढे हाती लागेल, तेवढे लुटले, परंतु उपासमार, रोग, थंडी यांनी बेजार झालेल्या सुमारे ९५,००० सैनिकांसह १७ आक्टोबरला नेपोलियनने मास्कोतून माघार घेतली.

लाल टोपी's picture

22 Jun 2013 - 10:32 am | लाल टोपी

कदाचित रशियाच्या बाजूने केलेल्या प्रचाराचा भाग असावा. 'या ठिकाणी शहरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न नेपोलियन ने केला' असा मोघम उल्लेख या ठिकाणी आहे. त्याचाच स्थानिक गाईड 'नेपोलियनचा पराभव' असा कदाचित लावत असावेत. कारण काही दशकांपूर्वी पर्यंत व्हिक्टरी पार्क हा मॉस्को शहराचा भाग नव्हता.

वारकरि रशियात's picture

22 Jun 2013 - 10:34 am | वारकरि रशियात

pfu, इंटरक्लब, डिप. कॉर्प्स्, दोम तुरिस्ट, साल्युत, स्पुतनिक, युगोझापद्नाया (मेट्रो स्टेशन - या शब्दाचा अर्थ नैऋत्य) पासून प्रास्पेक्त वर्नात्स्कोवो, प्रास्पेक्त लेनिन्स्की ते अगदी प्रास्पेक्त मीरा पर्यंत,
नदीपल्याडचे कॅथेड्रल, सेंट बसिल कॅथेड्रल, पार्क पबेदी (वर दिलेले victory park), क्रेमलिन आणि व्हाईट हाऊस, सेरेमेतोवो आणि दमेदेदोवो (दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि असे (तसेच इतरही बरेच) काही आठवले.

यानिमित्ताने अनेक पूर्वस्मृतींना उजाळा मिळाला. आधीच्या पहिल्या भागासही प्रतिसाद दिला होता, ते अगदीच न राहवल्याने.
धन्यवाद लाल टोपी जी.

मदनबाण's picture

22 Jun 2013 - 12:29 pm | मदनबाण

फोटु आणि माहिती आवडली... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2013 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

वर्षातील एका महत्वाच्या दिवसाची सचित्र मॉस्कोसफारी खूप आवडली. फोटो अप्रतिम आलेत !

वर प्रा. डाँनी म्हटल्याप्रमाणे मॉस्को शहराचे आणि इतर रशियाचेही प्रवासवर्णन वाचायला आवडेल... जरूर लिहा.

प्यारे१'s picture

22 Jun 2013 - 1:38 pm | प्यारे१

मस्तच! अजून येऊ दे.

आधीचे आणि हेही फोटू आवडले. सर्वात मोठ्या दिवसातील वेगवेगळ्या वेळांची चित्रे काढून ठेवण्याची कल्पना आवडली.

Dhananjay Borgaonkar's picture

23 Jun 2013 - 12:03 pm | Dhananjay Borgaonkar

साहेब, आयुष्यात पहिल्यांदा रात्री ९:३० सुर्य पाहिला. धन्यवाद!! तुमच्यामुळे मॉस्कोची मस्त सफर झाली.
अवांतर - रशिया बद्दल माझ्या मनात खुप कुतुहल आहे. जमल तर रशियन जीवन पद्धती, लोक, राहणीमान आणि पुतिन विषयी पण लिहा :)

लाल टोपी's picture

24 Jun 2013 - 8:32 am | लाल टोपी

सर्वांचे मनापासून आभार. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. वेळोवेळी रशियासंदर्भात जरुर लिहीणार आहे.

अमोल केळकर's picture

24 Jun 2013 - 10:38 am | अमोल केळकर

छान . २१ डिसेंबर च्या प्रतिक्षेत !! :)

अमोल केळकर

पैसा's picture

24 Jun 2013 - 10:14 pm | पैसा

वर्णन, फोटो आणि सावल्या सगळेच छान! रशियाबद्दल अजून लिहा! आणि २१ डिसेंबरच्या आधी मीच तुम्हाला आठवण करून देईन!

लाल टोपी's picture

25 Jun 2013 - 1:40 pm | लाल टोपी

धन्स ज्योतीताई, शक्यतो मी लक्षात ठेवीनच पण तुमच्याही लक्षात राहिले तर अजूनच छान!