तो हसत होता

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
27 Mar 2013 - 9:53 am

मी चालत होतो. भोवताली अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिव्यांची लखलख होती पण हा भाग तसा अंधाराच होत. वातावरणात चांगलाच गारवा होता. थोड्यावेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे पायवाट ओली होती. अंदाजे मैलावर असलेली प्रकाशाने न्हाहून निघालेली इमारत माझी मंझील होती. तिच्याकडे पाहत कशाचीही परवा न करता मी चालत होतो.

आजूबाजूला अगदी तुरळक वावर होता. चुकूनच एखादा माझ्यासारखा वाटसरू दिसत होता. जसा जसा उशीर होत होता तसा माझ्या पावलांचा वेग वाढत होता. मोठ्या स्तंभाला मागे टाकून मी आता परावर्तीत तळ्याच्या काठावर आलो होतो. तळ्यामध्ये एका बाजूने स्तंभाचे तर दुसर्या बाजूने इमारतीचे प्रतिबिंब पडले होते. त्या प्रतिबिंबाकडे पाहत मी क्षणभर स्थिरावलो. सभोवती नीरव शांतता भासत होती. गजबजलेल्या रस्त्यांच्या जवळ असूनही या वातावरणात तुमचे मन शांत करणारी जादू होती. या जगावर हुकुमत गाजवणाऱ्या नगरीत इतके शांत ठिकाण असावे याचे मला आश्चर्य वाटले. जर जमीन ओली नसती तर मी तिथेच थोडा वेळ बसलो असतो. आजकाल अशी शांतता फार क्वचितच मिळते. मनात कुठलेही विचार नव्हते. जणू त्या निर्मळ पाण्याने माझ्या मनातले सगळे विचारही कुठे तरी दडवून टाकले होते.

पण ती इमारत मला परत खुणावत होती. मी पुन्हा चालायला सुरुवात केली. पायऱ्यांवर गर्दी दिसत होती. मी मात्र त्याच्या चेहऱ्यावर लक्ष देवून पुढे चढत होतो. आणि एक क्षण आला. तो भव्य दिव्य पुतळा त्या तळ्याकडे पाहत बसला होता आणि मी त्याच्या समोर उभा होतो. कुठे तरी मला वाटत होते की तो माझ्याकडे पाहून मंद हसतो आहे. त्याचा तो करारी चेहरा सांगत होता जरी तू या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती झालास तरी तुझ्यासामोरील संकटांच्या रांगा संपायच्या नाहीत आणि या संकटात सुद्धा तू तुझ्या विचारांपासून ढळू नकोस. अशा कठीण समयी तुला नेहमी काही पळवाटा दिसतील. त्या तुला खुणावतील - सोडून दे तुझ्या कल्पना आणि तुझे उद्दिष्ट. पण तुझा निश्चय कठोर कर आणि त्यांना नकार दे. जर तू हे करू शकलास तर खचितच एक परिणामकारक व्यक्तिमत्व होण्याची ताकद तुझ्यात आहे.

माहिती नाही पण लिंकनला जेव्हा बूथ गोळ्या घालत होता तेव्हा लिंकन नक्कीच मंद हसला असणार - त्याने त्याचे ध्येय स्वतःचे बलिदान देऊन पूर्ण केले होते - अमेरिकेतील एका मोठ्या समाजाला गुलामगिरीतून मुक्त केले होते - आणि या स्वतंत्र देशात खरोखर स्वतंत्रपणे वावरायचा हक्क दिला होता. आज जवळ जवळ दीडशे वर्षांनंतरही त्याचा तो संदेश माझ्यापर्यंत पोहोचला होता आणि माझी पायपीट खरोखर सफल झाल्याचे समाधान मिळाले होते.

1

2

3

4

मुक्तकजीवनमानप्रवासदेशांतरप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Mar 2013 - 12:58 am | श्रीरंग_जोशी

यास नेमके स्थलवर्णन पण म्हणू शकत नाही. पण जे काही आहे ते भावले.

स्पंदना's picture

28 Mar 2013 - 4:20 am | स्पंदना

वर्णनं ढिगाने मिळतील, पण प्रवासी म्हणुन नुसत धावपळ करत ओझरत पहाण्यापेक्षा काही वेगळं मांडल आहे.
आवडल. फोटोचे अ‍ॅगल सुरेख. खुप काही दडवल्यासारखे. मिस्टीक!