.तर अश्या पद्धतीने गावचा मारुती पुन्हा वेशीला उभा राहिला. अजुन ही उभाच आहे, त्याच्या अंगावरल्या घणांच्या घावांत आता चुना भरलाय, अन दरवेळच्या नव्या शेंदराने त्या भेगा जरी उठुन दिसत नसल्या तरी त्या भेगा आहेतच. आता याच दु:ख मानुन घ्यायला आम्ही काय मायनॉरीटीवाले, आमच्या दु:खांना काही किंमत नाही. आता हे ही असोच. भेगाही असोच अन आमच दु:खही असोच.
तर पुढे
तर झाल काय ? तर तो जो जुलुमान लादलेला पंजा गावात होता, तो तसाच त्या एका घरात देवघर बांधुन पडुन होता. एक जरा ऐसपैस चौथरा बांधुन त्यावर जरा कमान बिमान बांधुन तो पंजा त्या घरात पड्लेला असायचा. दुपारच्यावेळी त्याच्यावर शेळ्या करडं बसायची. कधी कोंबड्या खुडुक बसायला तीच जागा शोधायच्या. अस आपलं चाललं होत. मग वर्षातुन एकदा शेजारगावचा मुसलमान उठुनं; त्याच्या गावातला पंजा, गावातल्या माणसांच्या मदतीने बसवायचा अन तिकडं बसला म्हंटल की इकडं गावातलया चिंध्या जमा करुन ज्या दिवशी नाचवायचा त्या दिवशी कसाबसा हा ही पंजा जरा अंगान भरायचा. कोण उचलत नाही ,म्हंटल्यावर एक दिवस पाटलांच्यातल्याच एकाने उचलला अन नाचवला. अन मग गावातल्या बाया बापड्यांनी आपल्या परंपरेनुसार दिंडीतल्या वारकर्यांच्या पायावर घालतात तसं घागर घागरभर पाणी त्या नाचणार्या माणसाच्या पायावर घातल.
मग एकदा काय झाल? तर गावातल्या एका घरात होती शिडी, ती ह्या पाटील बाबांना हवी झाली. खर, आता रानातुन बांबु आणुन, ते तासुन, त्याला पायंड्या करुन एव्हढी कष्टानं बनवलेली शिडी अशी उगा कुणी मागितली म्हणुन द्यायची का? आँ! नेणार्याला त्या कष्टाची किंमत नको? उगा नेतात अन मोडुन परत आणुन देतात. मोडली म्हणुन सांगत सुद्धा नाहीत असा त्रागा झालेल्या त्या घरच्या शिडीच्या मालकिणीनं; नाही म्हंटल. झाल का? पाटलांचा नांगा मोडल्यासारखा झाला! काय नाही. गप गप बसले पाटिल. पण अस किती दिवस गप राहणार? मग काय आला त्यातच हा पंजाचा सण. या वर्षी हा देव त्या नांगा मोडलेल्या पाटलांच्या अंगात घुमु लागला राव! मग गेला पंजा घरोघरी. पायावर पाणी , कपाळाला गुलाल! असा घुमत घुमत गेला शिडीवालीच्या दारी. तर तिला जरा लेकिला मुलगा नसल्याची भ्रांत पडलेली. तीनं पंजाच्या पायावर घातल घागरभर पाणी अन विचारल देवाला, होइल का माझ्या जनीला या वर्षी तरी एक पोरगा घरी? पंजा घुमतेला, जमेल तेव्हढं मुसलमानी बोलायचा. म्हणतो कसा? शिडी मांगनेको आया तो नयं बोलतीय और फिर कायकु पोरगीको लडका हुने को मांगतीय? शिडी देंगा तो हुयेंगा नय तो नय हुएंगा। बजाव रे बजाव।
तिन सरळ त्याचं मडंच उठवलं. असला आहे होय पंजा? याला काय ठावं माझी शिडी नाही म्हंटलेलं? चल पुढ हो! तसा ही आमचा नव्हेच देव हा. पुढच्या वेळी माझ्या दाराला आलास तर बघ! असा दम भरुन मोकळी झाली.
आता हे ही असोच. खरी गोष्ट अजुन पुढेच.
कंटाळा आला असेल ना माझ्या खरी गोष्ट पुढेच आहे चा?
आता मात्र खरी गोष्ट !
तर ऐका!
आम्ही पोराटकी. शेताभातातुन, बांधा बाभळीतून सुसाट सुटणारी. शाळेला सुट्टी म्हणजे ह्ये ऽऽ धुडगुस! आमच्याच वयाचा श्रीहरी. ज्या घरात पंजा होता, त्या घरचा एकुलता मुलगा. गोरापान, काटकुळा, लांबसडक हातपाय, जरा जास्तच लांबसडक, त्यामुळे ढांगुळा म्हणावा असा हर्या. हो आम्ही त्याला हर्याच म्हणायचो. कधी मधी झाडावर चढायचा. शाळेत काही फारशी गती नसावी. मला आठवणारा हर्या, एका लांब पैरणीत (दिवार कट असल्यासारखी गोलसर कटींगची अन चांगली गुढग्यापर्यंत असणारी) असायचा. शेंबडा होता. डोळे हिरवट म्हणावे असे. त्याला एक लहाण बहिण होती. तीही अशीच लंबसडक अंगाची, पण का का का काळी. अगदी पक्क्का काळा रंग. बघाव तेंव्हा आईचा पदर धरुन कधी रडत, कधी गपगुमानं चालत असायची. आईला सोडुन अशी कधी आठवतच नाही मला ती.
तर आम्ही सारी पोरं शेतात उनाडक्या करत असु, त्यात हरीही असायचा. नदिवर मासे पकडायचे, जाळीतली बोरं आणायची, उंबर गोळा करायची. या सार्या उद्योगात कुठेना कुठे हर्या असायचा. मग आम्ही सारे वाढीला लागलो. तसा हर्यापण आडवयात आला. या वयाची एक स्पेस्श्यालीटी असते. आपल अस, एक काहीतरी वेगळ करुन दाखवायची हुषारी असते या वयात. तर असल्या वयात हर्या एकदा आम्हाला शेतावर भेटला. कुणाचं तरी शेत करत होता. माझ्या बरोबरच्या एकान छेडल, " आं हर्या? अरे मागच्या वर्षी तर त्या दुसर्यांच रान करत होतास? मग आता ह्ये नविन काय?"
"हां! त्याला काय सोनं लागलय? आणि त्याचच शेत करायला मी काय त्याची बायको आहे? आपलं आपल हातावरच पोट! जिकड खोबरं तिकड चांऽऽगभलं!!" बरोबरचे सगळे मोठ्याने हसले. मी मात्र ते "खोबर तिकडे चांऽऽगभलं " ऐकुन चाट पडले. म्हणजे त्याचा म्हणायचा अर्थ होता, ज्या देवाचा खोबर्याचा प्रसाद हातात येइल त्याच्या नावने चांगभलं म्हणुन रिकाम व्हायचं. कुणाला बांधुन नाही रहायच. थोडक्यात काय जिकडे फायदा तिकडे पाय वळवायचे, जिथे सुर्य ती उगवती मानुन चालायचं. माझ्याही अडनिड्या वयात तो नवा दृष्टीकोण मला एकदम भारी वाटला.
आणि एक दोन सुट्ट्या गेल्या अन गावात एकेदिवशी पंचांनी हर्याला बोलावलं. आता त्याला सगळेजण 'हरी' म्हणायचे. राबणारा झाला होता. मान होता आता त्याच्या कष्टाला. तर आता पंचांनी हर्याला कशाला बोलावला हे पहायला बाकिचे आम्हीही तिथे हजर.
मग पंचांनी हरीला जवळ बसवुन घेतल अन मग एकजण म्हणाला, "हरी तुझ्या घरात ते मुशलमानाच देवस्थान आहे ना?"
हरी म्हणाला " व्हय तर! तुम्हीच लोकांनी ढकललय नव्हे ते आमच्या घरात?"
पंच हसले, " अरे देव आपल्या आपण ठरवतो कुठं जायच ते आम्ही नुसते निमित्त्यमात्र"
यापंचांची एक भानगड होती. ही पंचमंडळी तशी मिश्किलं. गावतली भांडण वगैरे हसत हसत वाटेला लावणारी. बायका तर जाम वैतागायच्या ह्या पंचांवर. "हीन माझी घागर चेपली", म्हणुन जावं तर," मग तू तीची चेप!" म्हणुन सांगुन रिकामे व्हायचे, वर आणि खुदुखुदु हसायचे. बाकिची भांडण मात्र एकदम सिरियसली सोडवली जायची. त्यातही अधनंमधनं हास्याच्या लकेरी उठायच्याच. या पंचात असायचे गावातले सुशीक्षित लोक. त्यातले तिन प्राथमिक शाळा मास्तर, एक शिक्षीत शेतकरी, अन एक सगळ्यांची बारशी जेवलेले म्हणजे खडानखडा गावाची माहिती असणारे एक वयोवृद्ध. फार कोण ऐकेना झाला तर उठुन,"थोतरीत देतो बग!" म्हणायचा हक्क असणारे.
तर ह्या सगळ्या मंडळींनी हरीला जवळ बसवुन घेतल म्हंटल्यावर आमच कुतुहल असं नुसत आगीच्या ज्वाळांसारख लपलपु लागलं. अन उकळत्या पाण्यासारख खळखळु लागल.
तर पंचमंडळी पुढे," अरे आजवर ते गावच्या पाटलांच्या अंगात यायच, तर आता त्यांना झेपत नाही. मग कुणी तरी पुढे चालवायला हव का नको? "
हरी म्हणाला,' चालवा की. माझं कुठं काय म्हणनं."
"तुझं काय म्हणनं नाही ना? मग बरं झालं" पंचांचा अजुन काही ठावं लागत नव्हता.
" तर, आमच काय म्हणनं, ते आता तू चालवं बघु? तूझ्या घरच झालं आता ते."
"आता चालवायच म्हणजे काय?" हरी नाही म्हंटला तरी आमच्याच वयाचा, बाळबोध!
" अरे चालवायचं म्हणजे अंगावर घ्यायच. देव नुसता बसवुन चालतो? तो अंगात आणावा लागतो, नाचवावा लगतो, तर तो देव."
हर्या चांगला फुटभर उडालाच. " अहो, माझ्या कुठं येतो तो अंगात?"
"आणायचा." पंचमंडळी निवांत.
" तो आणि कसा?" हर्याच्या चक्कीत जाळ निघत होता.
" ते आम्ही बघतो, तू घरी जाउन आईची परवानगी काढ, बाबाला विचार. आमच म्हणनं सांग , आम्ही उद्या देव अंगात आणायला येतो, काय?"
हर्या बाहेर पडला. त्याचे काटकुळे खांदे उगा ओझ्याने धसल्यासारखे दिसत होते. आम्ही सगळे पळत पळत जाउन त्याला भेटलो. हर्याला जरा कायतरी वेगळ असं महत्त्वाच वाटत होतं. मग आमची त्या मुशलमान देवाबद्दल बरीच चर्चा झाली. तो लागतो कसा , धरतो कसा. ते नाचताना त्या लोकांची तोंड वेडीवा़कडी कशी होतात, एक ना दोन! त्यातच भुताच्या गोष्टी कधी शिरल्या त्यात, पत्तापण नाही लागला .
दुसर्या दिवशी संध्याकाळी हर्याच्या घरासमोर चारपाच माणसं दिसली. मग आम्हीही शिरलो चारपाचजण त्यात. झाली आठदहा माणसं. त्याला वेळ लागतो माणसं जमायला? घरात बाहेरच्या खोलीत जेथे तो मुसलमानाचा देव होता तो कट्टा जरा सारवलेला वगैरे दिसत होता. चारपाच उदबत्त्या लावल्या होत्या. अन ओल्याचिंब कपड्यात हर्या तिथे बसला होता. त्याच्या जरा मागे पंचमंडळी .
"हे बघ हरी, नुसत त्या देवाकडे बघायच, आणि कुठे लक्ष विचलीत करायच नाही" एक मास्तर बोलले.
"हो ना? आता आपल्या गितेत सांगितलच आहे तसं एकचित्तान देवाच स्मरण केलं की तो आपल्याला दिसतो म्हणुन", दुसरे मास्तर. हे श्रावणात गावात पोथ्या पुराणं वाचायचे.
हर्या पुरा गोंधळलेला.
पंचमंडळीना जरा घाई असावी. पण पोरसवदा हर्याला, जीवनाच मर्म समजावुन सांगणं काही तंबाखु मळण्याइतक सोप नसावं.
"हं! हरी दिसला का देवं?" एकान जरा घसा खाकरुन विचारलं.
"नाही हो!" हरी
" अरे दिस म्हण्टल्यावर दिसणार तो. तू दिस म्हण्टलास का?"
"म्हणतोय नव्हे कधीचा." हर्या जरा वैतागला होता. नाही म्हंटल तरी ओल्या कपड्यात तसं कुडकुडत रहाण्याने तो वैतागला असावा. मागच्या पंचात जरा नजरांनजरी झाली अन मग गावातले लक्ष्मणमास्तर जरा हर्याच्या जवळ सरकले.
"हर्या काय होतय सांग बघु तूला?" मास्तरनी अगदी ठेवणीतला आवाज काढला होता.
" काय होतय म्हणजे?" हर्या जरा चढ्या आवाजात बोलला.
" यांयलायं ! यांयलायं! ते देवस्थान जरा अस रागाचच असतयं. चढ्या आवाजातच बोलतय." इति. लक्ष्मण मास्तर.
" होय! होय!" सगळे पंच माना डोलावु लागले.
पुन्हा लक्ष्मणमास्तर हर्याकडे जरा झुकुनं म्हणाले, "हरी काय होतय?"
आता हर्या विचारात पडला होता. आवाज चढवुन बोलल्यावर कानाखाली निघायच्या ऐवजी "यांयलयं, यांयलयं " ऐकुन त्याच्या डोक्यात हळु हळु प्रकाश पडायला लागला होता. आणि थोड्यावेळाने त्या प्रकाशाची वलयं नसती दिसली त्याच्या डोक्याभोवती तरच आश्चर्य!
" काय होतय हरी तूला?" पुन्हा ल्क्ष्मण मास्तर अगदी ठेवणीतल्या आवाजात.
" जराशी मुंगी चावल्यागत होतय." हर्या
" आरे मग घांवला तूला देवं. ते मुंगी चावल्यागत जे होतय तेच देव, त्याच्या पुढ आपण वाढवायच असतय हर्या!!" अनावधानान लक्ष्मण मास्तर हरी विसरले.
मागं बसलेले पंचपण जीव भांड्यात पडल्यासारखे झाले.
"अस्स हाय होय?" आता हर्यापण चेव चढल्यासारखा म्हणाला, " मग सोप्प हाय. जमतय मला."
"जमतयं नव्हे? मग काय काळजी नाही. अरे देव आहे तो, असा जातोय कुठं. आता उचल ते पंजा अन नाचवं जरा तासभर. आज जरासा का असेना देव आलाय; त्याला असा रिकामा नको पाठवु", इति. लक्ष्मण मास्तर.
हर्याने उठुन नुसताच रिकामा पंजा उचलला अन पंचातल्या दोघांनी लागलीच उठुन त्याला धरला. आता त्यांनी हर्याला त्याच्या अंगात देव आलाय म्हणुन धरला होता का, ते झुलु लागल्यावर हर्याला कसं झुलायचं ते उमगत होतं; हे काय आम्हाला समजल नाही. तोवर उरलेल्या पंचांनी घरात बसलेल्या हर्याच्या आईला घागरभर पाणी आणुन हर्याचे पाय धुवायला सांगितले. जरा तसंच पुढे सरकुन, जवळच्या दोन घरातल्या बायांना "देव आलाय " हे कळवल. त्यांसरशी त्याही उदबत्ती अन पाणी घेउन आल्या. बघता बघता हर्या लाज मागे सारुन पुरा देव झाला. अगदी इतमानानं त्याने पायावर पाणी घालुन घेतल, उदबत्त्यांचा धुर छातीभरुन ओढुन घेतला. आणि गावातल्या मुशलमान देवाचा उत्सवाचा बोळा निघुन पाणी वाहते झाले.
आज हरीचं देवस्थान कधी नाही ते जोरात चाललयं. त्याने दिलेला कौल खरा ठरतोच ठरतो. अगदी तिनचार गावची माणसं त्याचा उरुस म्हणुन गावावर यायला लागली. नुसता पंजा जिथे असायचा तिथे आता काचेची हंड्या झुंबरे चकाकतात. नक्षीदार रुमाल चढतात. बर्यापैकी उत्त्पन्न आहे देवाचं. एकुण हर्याला खोबरं दिसल्याबरोबर त्याने चांऽऽगल भलं करुन घेतलं!
मध्यंतरी गावात चार मुसलमान पोरं शिरली. गाव जरा सावध बसुन राह्यला. ती पोरं हरीच्या घरात शिरली अन थोड्यावेळाने निघुन गेली. हरी गल्लीत येउन सांगु लागला. चांगल बांधुया म्हणतात. तूझी व्यवस्था बघतो म्हणतात. गावान विचारलं आजवर काय टाकलाय होय रे तूला? कुणाच्या जोरावर मोठा झालास? आजवर गावात त्यांच्यातला माणुस नाही अन इथुन पुढेही नको आम्हाला. काय जगभर चाललयं दिसत नाही व्हय तूला? तुझा काय देव आहे तो आम्ही सांभाळतो, त्यांच्या जीवावर जगायची तूला काही गरज नाही. हर्या जरा पडक्या तोंडाने का असेना पण होय म्हणाला. आता पुढचं देव जाणे!!!
(समाप्त)
प्रतिक्रिया
24 Mar 2013 - 12:55 pm | प्रचेतस
वेगळ्या धर्तीची कथा आवडली. इतिहासकाळातून वर्तमानकाळात होणारा कथेचा प्रवास खूपच सुरेख मांडलाय.
मात्र शेवट जरा घाईघाईत उरकल्यासारखा वाटला.
24 Mar 2013 - 12:59 pm | यशोधरा
पहिल्या भागाची लय दुसर्या भागात सापडली नाही :(
उरकून टाकल्यासारखी वाटली कथा. पहिला भाग खूप मस्त जमला होता.
24 Mar 2013 - 1:04 pm | साऊ
नाही हो, घाई नाही केली मी. पण आत्ता जे घडलं ते लिहिलं आहे. अन वर्तमानात लिहिणयाचे जास्त तपशील नाही आहेत.
आम्ही लहाण होतो तेंव्हा हा देव हर्याच्या अंगात कसा घुसवला ते पाहिलं आहे, आणि ती शिडीची गोष्ट तर गावात खुप फेमस होती.
24 Mar 2013 - 1:41 pm | आतिवास
पहिल्या भागाच्या विस्ताराच्या मानाने दुसरा भाग आटोपता घेतला असं वाटलं.
कदाचित मग हरीचं पुढं काय होतं - असा तिसरा भाग होऊ शकतो.
पण एकंदरित वेगळ्या थाटातलं लेखन आवडलं.
24 Mar 2013 - 2:07 pm | आदूबाळ
छान जमलीय कथा!
"जिकडं खोबरं तिकडं चांगभलं" हे तत्त्वज्ञान असलेला हरी काहीतरी भरीव करण्याच्या ऐवजी देवस्थान चालवून "इझी मनी" करतो हे वाचून वाईट वाटलं. गावातली शहाणीसुरती पंचमंडळी हरीला या वाटेला ढकलतात हे मात्र पटलं नाही बुवा. [पंचमंडळींच्या वर्णनाप्रमाणे त्यांनी हरीला असल्या वाटेला ढकलणं तर सोडाच, पण उलट परावृत्त केलं असतं तर जास्त नैसर्गिक वाटलं असतं.] हा उद्योग करण्यासाठी पंचमंडळींची काही कारणं असतील - पण ती कथेत आलेली नाहीत. (वल्ली आणि यशोधरा यांना हेच म्हणायचं असावं बहुतेक.)
शेवटून दुसर्या परिच्छेदात हा भाग संपवला असता तर जास्त परिणाम साधला गेला असता. शेवटचा परिच्छेद खरं तर तिसरा भाग आहे. (देवस्थानाची काळजी घेणारा हिंदू हरी, देवस्थानावर कबजा करू पहाणारे मुसलमान तरूण आणि दोघांकडेही समान संशयाने पहाणारा गाव.) तिसरा भाग लिहाच!
24 Mar 2013 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
कथा छान आहे, आवडली. गावोगावीचे गल्लीबोळातले देव हे असेच कोणाच्या ना कोणाच्या धूर्त स्वार्थातून निर्माण झाले आहेत.
हरीने "खोबरं दिसल्याबरोबर त्याने चांऽऽगल भलं करुन घेतलं" हे ठीक आहे. पण झोपी गेलेलं "मुशलमानाच देवस्थान" हिंदु पंचांनी प्रयत्नपुर्वक जागृत केलं याच्यामागे काहितरी गौडबंगाल असणारच. ते तसंच अनुत्तरित राहिलंय. त्यामुळे कथेचा शेवट जरासा खटकतोय.
मात्र तुमची लेखनशैली आवडली... अजुन वाचायला आवडेल.
24 Mar 2013 - 4:27 pm | मन१
वेगळ्या धाटणीचं कथानक आवडलं.
24 Mar 2013 - 4:30 pm | पैसा
दुसर्या भागात काही अनुत्तरित प्रश्न राहिल्याने समाप्त झाली असं वाटलं नाही. पण तुमची लिहिण्याची शैली छान आहे. हे अनोळखी जग आम्हाला भेटायला आणत रहा!
24 Mar 2013 - 4:32 pm | यशोधरा
लिहायच्या शैलीबद्दल अगदी सहमत, म्हणून तर नवीन भाग दिसताच पटकन आधी वाचायला घेतला होता.
24 Mar 2013 - 4:41 pm | बॅटमॅन
इतिहासातून वर्तमानात छान आणलेत. कथा फार काही घाईने उरकल्यागत नाही वाटली. तपशील कमी पण नेमके दिल्याने चांगले वाटले.
24 Mar 2013 - 9:20 pm | लौंगी मिरची
दोन्ही भाग उत्तम .
एक शंका : गुलाल तिकडं चांगभलं ! असं काहिसं म्हणतात हे ऐकलय ,
25 Mar 2013 - 6:01 am | धमाल मुलगा
छानच लिहिता. भाषेचा लहेजा उत्तम सांभाळलाय.
वर जन्ता जनार्दनानं म्हणल्याप्रमाणं दोन्ही भाग वाचून काढल्यावर एक जरा टोकाला टोक जुळल्यासारखं काही वाटेना बा. पण तुम्ही लिहा, आणखी भरपूर लिहा. वाचायला मजा येतेय. :)
अवांतरः तुम्हाला जॉन वूचे सिनेमे आवडतात का? त्याचीही स्टाईल अशीच धागा अधांतरी सोडून द्यायची आहे. आपण सिनेमा पाहून झाल्यावर आपलेच विचार लढवत बसतो की बाबा, आसं नं आसं, आन आता ह्याच्या पुढं कसं झालं असेल आन काय झालं असेल. :)
25 Mar 2013 - 8:32 am | साऊ
सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार.
खरतर लेखनाचा पहिला भाग हा ज्या गावात एकही दुसर्या धर्माचा माणुस नाही त्या गावात असणार्या पंजाचा इतिहास सांगणारा म्हणुन लिहिला होता. खरी गोष्ट सुरु होते ती हरी पासुनच, जेथुन ती मी पाहिली. त्यातला विनोद मी पुर्णतः समोर नाही आणु शकले ही माझी कमतरता.
किंवा असही असु शकेल की लेखन वाचताना, वाचक धर्माच्या भावनेत वहावुन लेखणातला विनोद दुर्लक्षत असावा.
गावतल्या लोकांनी आपल्या नसलेल्या ध्र्माच्या देवाच्या उद्धरणा बाबत जे प्रश्न आहेत, त्याच उत्तर मी पहिल्या भागात दिले आहे. पुर्वजांनी केलं ते चालू ठेवायचं हा एकच आपला सहज भाव असतो देवादिकांबाबत. त्याला अनुसरुन या लोकांनी दोनएक वर्षात शेजार गावचा मुलाणी तसाच परत फिरला म्हणुन बंधु भावाने होता तो सण पुढे साजरा करायचे ठरवले. आपण कधीही कुणाची मंदिरे वा देव अपमानित करत नाही. तेच वागण पंचांच होतं. या प्रकरणात तिथुन पुढे पंचांचा काहीही फायदा नाही झाला, पण हरी मात्र जरा बर्या स्थितीत आला इतकच. आता इतक्या पिढ्या हा देव कधी कुणाला इतका का नाही भावला अन आता अचानक तो एव्हढा भरभराटीला कसा आला याच उत्तर मलाही नाही माहित.
थोडस विवरण आवश्यक वाटल म्हणुन हा प्रतिसाद.
धन्यवाद.
25 Mar 2013 - 8:37 am | ५० फक्त
चांगलं लिहिलंय, तो काळ ते हा काळ हे ट्रांझिशन थोडं स्मुथ व्हायला हवं होतं, बाकी मजा आली.
25 Mar 2013 - 8:52 am | स्पंदना
मला तरी साधारण हसु आलं वाचताना. देव अंगात येणे अन आणणे. देवा परमेश्वरा!
22 Jul 2013 - 1:09 pm | drsunilahirrao
मस्त !
22 Mar 2015 - 11:21 am | प्रथम म्हात्रे
अलिबाग तालुक्यात मेढेखार नावाचे एक गाव आहे. तिथे पूर्वी कधीतरी गावातील कोण्या एकुलत्या एक मुस्लिम व्यक्तिने घरातच छोटेखानी प्रार्थनास्थळ बांधले.
आज त्या गावात एकही मुसलमान नाही, पण मोहरमला हिंदूंच्या अंगात मात्र हे पीर दरवर्षी न चुकता येतात.
त्यावेळी या अंगात आलेल्यांसमोर मिठाई फेकली जाते आणि ही पायदळी तुडवलेली मिठाई प्रसाद म्हणून भक्षण केली जाते.
इथे कोणी अंनिसवाले असतील तर त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देउन असले प्रकार बंद करवावेत.
22 Mar 2015 - 1:10 pm | नगरीनिरंजन
गोष्ट फार आवडली. आणखी लिहा.