उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०९ : किर्केनेसचे स्नो हॉटेल

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
21 Mar 2013 - 1:44 pm

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

...मोठ्या उत्साहाने बाहेर पडलो होतो पण माणसांची रहदारी कमी का झाली होती ते लगेच कळले. अगोदर थंडी होतीच पण सूर्यप्रकाश कमी झाल्यानंतर तिचा कडाका प्रकर्षाने वाढला होता. अर्ध्या तासातच हॉटेलच्या उबेत परत आलो आणि बसची वाट पाहत बसलो. पावणेसहाला स्नो हॉटेलचा गाइड येउन सगळ्यांची व्हाउचर्स तपासून गेला. बस बरोबर सहाला आली आणि आम्ही स्नो हॉटेलच्या दिशेने निघालो.

स्नो हॉटेल आर्क्टिक हॉटेलपासून तसे फार दूर नव्हते. केवळ पंधरा वीस मिनीटांतच पोहोचलो. गावाच्या बाहेरच्या भागात एका ठिकाणी बस थांबली आणि उतरल्यावर सगळ्यात पहिले या पाटीचे दर्शन झाले...

बसमधून उतरून अर्धप्रकाशीत बर्फाच्या रस्त्यावरून गाइडच्या मागून चालत गेलो आणि इतका वेळ उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या स्नो हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो...

इग्लूप्रमाणे बनवलेल्या प्रवेश्द्वारातून आत शिरल्यावर हॉटेलचे मुख्य द्वार लागले..

हा दरवाजाच हीच केवळ एकुलती धातूची वस्तू या हॉटेलमध्ये आहे आणि तेही हा दरवाजा सतत उडाझाप करून मोडू नये म्हणून ! याच्यातून प्रवेश करून आपण एका बर्फाच्या भिंतीसमोर येतो. हि भिंत रिसेप्शन आणि हॉटेलच्या अंतर्भागाचे दरवाज्यातून आत येणार्‍या वार्‍यासून रक्षण करते. तिला वळसा घालून आपण रिसेप्शन डेस्कसमोर येतो...

रिसेप्शन्च्या मागे ती बर्फाची भिंत दिसत आहे. तिच्यावर शोभेसाठी सुरूच्या फांद्या खोचल्या आहेत.

हे रिसेप्शनचे तेथील गर्दी कमी झाल्यावर काढलेले चित्र...

आणि हे आहे रिसेप्शनमधले बर्फाचेच झुंबर...

रिसेप्शनमधल्या खुर्च्याही बर्फाच्या होत्या. सर्व बाजूच्या भिंतींवर बर्फाची कोरीवकामे होती...

.

शोभेच्या वस्तूंसारखे ठेवलेले बर्फाचे शिल्प...

स्वागतिकेने फळांचा रस देवून आमचे स्वागत केले आणि आमच्या खोल्यांचे क्रमांक लिहिलेले कागद दिले. खोल्यांना दरवाजे नसून कापडी पडदे असल्याने किल्ल्या देण्याचा प्रश्नच नव्हता ! हॉटेलचा आकार इंग्लिश Y अक्षरासारखा होता. त्याचा खालचा देठ म्हणजे प्रवेश्द्वार आणि तिन्ही रेषा मिळतात तेथे रिसेप्शन होते. वरच्या दोन फांद्या म्हणजे दोन व्हरांडे होते. प्रत्येक व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला खोल्या होत्या. प्रत्येकात दहा म्हणजे एकूण २० खोल्या होत्या.

व्हरांडा...

खुर्च्यांवर बसायला टाकलेली कापडे, बेडवर टाकलेल्या चादरी आणि दरवाज्यावरचे पडदे सोडले तर हॉटेलच्या आत इतर सर्व काही बर्फाचे होते.

बर्फाचा कचरा टाकायचा डबा...

गाइडने सांगीतले की, "दर खोलीत एक थीम धरून भिंतीवर कोरीवकामे केलेली आहेत. आपापल्या खोल्यात जाण्याअगोदर सर्वांनी सर्व खोल्यांना भेट देवून बघून घ्या." मग काय कॅमेर्‍याला मेजवानीच मिळाली...

.

 ................

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

नंतर सगळ्यांना खास थंडी निरोधक आयुधे देण्यात आली… त्यात मुख्य म्हणजे माकडटोपी, हातमोजे, स्लिपींग बॅग आणि तिच्या आत वापरायची एक कापडी पिशवी. एका गाइडने ह्यातल्या शेवटच्या दोन गोष्टी कशा वापरायच्या त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रथम कापडी पिशवीत शिरायचे...

आणि मग तिच्यासह स्लिपींग बॅगमध्ये शिरायचे...

या स्लिपींग बॅग्ज -१५ सेल्सियस तापमानापर्यंत संरक्षण करू शकतात. इग्लूमध्ये साधारण -४ सेल्सियस तापमान असते, म्हणजे चिलखत जरूरीपेक्षा जास्तच मजबूत होते ! मात्र त्याच्या आत एकट्याने शिरताना बर्‍यापैकी कसरत करावी लागणार होती !

यानंतर आम्हाला ५०-७५ मीटर दूर इतर सुविधा असलेल्या लाकडी इमारतीत (log hut) नेण्यात आले. जर कोणाला रात्री स्नो हॉटेल फारच थंड वाटले तर येथे येऊन झोपण्यासाठी काही कोच होते. शिवाय स्वच्छतागृह, शॉवर, सौना, चहा-कॉफीची व्यवस्थाही होती. आपापल्या इग्लूमध्ये जाऊन बॅगेत शिरण्याअगोदर आठवणीने स्वच्छतागृहाचा वापर करण्याची खास सुचना गाइडने दिली... कारण जर रात्री निकड वाटली तर बॅगेतून बाहेर पडून योग्य कपडे चढवून -१० ते -१५ अंश तापमानात ५०-७५ मीटर चालत येइपर्यंत बहुतेक स्वच्छतागृहाचा वापर करण्याची गरज राहणार नाही अशीच शक्यता जास्त होती!

लाकडी इमारत (log hut)...

त्यानंतर आम्ही शेजारीच असलेल्या दुसऱ्या लाकडी इमारतीत असलेल्या जेवणाच्या व्यवस्थेकडे गेलो. हे तिचे प्रवेशद्वार...

बाहेरून जरी लहानशी दिसत असली तरी ही इमारत आत बरीच मोठी होती आणि ४० पेक्षा अधिक प्रवासी आरामात बसून जेवण्या येवढी प्रशस्त होती. मध्यभागी एक शेगडी आणि त्याभोवती स्वागतकक्ष आणि जेवायला बसायची व्यवस्था होती. आत छान गरम वातावरण होते त्यामुळे आम्हाला आमची सगळी थंडीनिरोधक चिलखते उतरवून आरामात जेवणाचा आस्वाद घेता आला...

.

आजच्या जेवणाचा बेत फारच मस्त होता. सुरुवात रेनडियर सॉसेजने झाला. प्रत्येकाने हेवे ते सॉसेज निवडून सळईला टोचून मधल्या शेगडीवर हवे तेवढे भाजून घ्यायचे आणि बटाट्यापासून बनवलेल्या चपातीसारख्या पातळ नॉर्वेजियन ब्रेडमध्ये गुंडाळून खायची अशी मजेदार सुरुवात झाली. या बटात्याच्या चपातिला लुंप असे म्हणतात. स्वागतिकांबरोबर शेफ स्वतः जातीने प्रवाशांची व्यवस्था पाहत होता. त्याने आमच्याकरिता बनवलेल्या बेताची माहिती देत होता, जेवणाच्या पदार्थांबद्दलच्या प्रवाश्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. एकंदर एकदम घरेलू आणि खेळिमेळिचे वातावरण निर्माण झाले होते. जेवणही छान चवदार होते. मुख्य कोर्समध्ये भाजलेले कॉड व सामन मासे, भाजलेला बटाटा आणि नॉर्वेजियन सॅलॅड होते.

जेवणानंतर आम्ही परत स्नो हॉटेलवर परत आलो. रात्रीच्या अंधुक प्रकाशात तो परतीचा रस्ता फारच गुढरम्य वाटला...

सरतेशेवटी आम्ही खोलीकडे जायला आमच्या गुहेत शिरलो...

माझ्या खोलीचे प्रवेश्द्वार...

माझ्या खोलीचा आतून पाहताना (पडद्याने झाकलेला) दरवाजा...चित्राच्या खालच्या भागात माझ्या बर्फाच्या दिवाणाचा पायाकडील भाग दिसत आहे.

आणि हा मी, झोपायच्या पिशवीत पूर्णपणे लुप्त होण्याअगोदरच्या अवस्थेत...

रात्री झोप छान आली. मात्र या पिशवीत झोपताना एका कुशीवरून दुसरीवर वळताना सर्व पिशवीला आपल्याबरोबर फिरविण्याचे भान ठेवावे लागते. नाहीतर पिशवीचा चेहऱ्याकडचा उघडा भाग डोक्याच्या मागच्या बाजूला जातो आणि परत योग्य अवस्थेत येण्याकरता बरीच कसरत करावी लागते ! अश्या अवस्थेत झोपण्याची सवय नसल्याने एक दोनदा जाग आली. सकाळी न्याहारीच्या वेळी अश्या पिशवीत प्रथमच झोपणाऱ्या प्रवाश्यांच्या या अनुभवाच्या कहाण्या ऐकून बरीच करमणूक झाली !

====================================================================

सकाळी सहालाच जाग आली. नऊ वाजता परतीची बस पकडून ओस्लोचे विमान पकडायचे होते. झोप पुरी झाल्याने ताजातवाना होतोच. शिवाय शॉवर वगैरेची व्यवस्था सार्वजनिक होती. त्यामुळे सर्वाच्या अगोदर लॉग हटमध्ये शिरून आपले काम आटपून घ्यायचे ठरवले होते. लगेच पिशवीतून बाहेर पडून आवश्यक कपडे चढवले, खोलीचे शेवटचे दर्शन घेतले आणि बाहेर पडलो. हा निर्णय किती फायदेशीर होता हे हॉटेलच्या बाहेर पहिले पाऊल टाकले तेव्हाच ध्यानात आले. रात्री अंधारामुळे नीट न दिसलेला परिसर आता सकाळच्या अंधुक प्रकाशात एका वेगळ्या जगात घेऊन गेला.

हा परिसर जुन्या नॉर्वेजियन खेड्यासारखा बनवला होता...

थोड्या दूरवर दिसणारी सुविधा इमारत...

तिच्या बाजूचे आमचे जेवणघर...

सुविधा इमारतीच्या रस्त्याच्या दुतर्फा बर्फाने भरलेली झाडे...

.

आवारातले बर्फाचे शिल्प...

हॉटेलपासून जरा दूर गेल्यावर झालेले हे त्याचे दर्शन...

.

गर्दी होण्याअगोदर सर्व भराभर आटपून न्याहारी चोपून झाली. न्याहारी करताना सतारीवर हिंदुस्तानी संगीताचे सुर ऐकू येत होते. स्वागतिका तिच्या कामातून थोडी वेगळी झाली की तिला विचारू असे म्हणत होतो तेवढ्यात तिनेच टेबलजवळ येऊन मी भारतीय आहे का असे विचारले. मी हो म्हणताच मोठ्या उत्साहाने तिच्या भारत भेटीची कहाणी सांगितली. तिने दिल्ली परिसर आणि राजस्थानला भेट दिली होती. भारतीय संगीत फार आवडले... गाण्यांचे शब्द नीट कळले नाही तरी सुर मनाला भिडतात असे काहीसे म्हणाली. येताना संगीताच्या बर्‍याच सीडीज आणल्या आहेत आणि येथे नेहमी लावते असेही सांगितले. भारतीय संगीताची मोहिनी उत्तर ध्रुवाजवळ पण पोचलेली आहे ! भारताला परत भेट देण्याचा विचार आहे असेही म्हणाली. ती श्रीलंकेतही फिरून आली आहे पण तिथल्या लोकांच्या वागण्याबाबत तिची तक्रार होती. नॉर्वे उभय देशांच्या आणि जागतिक पातळीवर श्रीलंकेच्या तमिळ जनतेची बाजू सतत उचलत असतो, बहुदा त्याचा परिणाम असावा.

बाहेर आलो तेव्हा आठच वाजले होते. आता बरेच उजाडले होते, परिसराचा फेरफटका करायला बाहेर पडलो. तेथे एका विभागात रेनडियर होते...

एका बाजूला एका भले मोठे बर्फाने थिजलेले तळे होते...

आणि त्याच्या बाजूच्या टेकडीमागून सूर्य डोकावू लागला होता...

दूरवर त्या तळ्यावर कुत्रांच्या स्लेडच्या सफारीची तयारी सुरू झाली होती...

बसची वेळ होत आली तसे आम्ही सगळे सामान गोळा करून १०० मीटरवरच्या बस थांब्यावर पोहोचलो. बसने आम्हाला आर्क्टिक हॉटेलपर्यंत आणून सोडले. हॉटेलबाहेर अगोदर सांगितलेल्या स्लेडवाल्या ढकलगाड्या आपल्याकडे सायकली चेन लावून ठेवतात तशा लावलेल्या होत्या ते बघून मजा वाटली...

तेथून विमानतळावर जाणारी सार्वजनिक बस पकडली. रात्री भरपूर बर्फवृष्टी झाली होती. काल संध्याकाळी साफ केलेले सगळे रस्ते परत बर्फाने भरून गेले होते...

विमान वेळेवर आले आणि आम्हाला पोटात घेऊन त्याने ऑस्लोच्या दिशेने भरारी घेतली...

(क्रमशः )

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Mar 2013 - 1:58 pm | प्रचेतस

मस्तच.
हे स्नो हॉटेल म्हणजे मानवाने केलेला चमत्कारच आहे.

+१११११११११११११११११११११११.

डोळे पूर्ण निवले. स्नो हॉटेलमागच्या कल्पकतेला आणि परिश्रमांना एक सलाम! खूप देखणं आहे :)

बाकी ते थाळीतलं गुलाबी काय आहे म्हणे? मला आपलं बालपणात बिग बबुल चिंगम आठवलं , कलर तसाच दिसतोय ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2013 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

वल्ली व बॅटमॅन अनेक धन्यवाद !

@ बॅटमॅन : ती गुलाबी तुकडी सामन माश्याची आहे. त्याशेजारची पांठरी कॉड माशाची आहे.

बॅटमॅन's picture

21 Mar 2013 - 2:39 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

अवांतरः खा रोज कॉड खा, सॅमन खा!!! ;)

(जळून खाक झालेला) बॅटमॅन.

एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवून आणल्या बद्दल धन्यवाद. :)

सूड's picture

21 Mar 2013 - 2:57 pm | सूड

भर उन्हाळ्यात गारेगार वाटलं. मागे एक मित्र हिरव्या देशातून जाऊन आला त्याने अशाच एका स्नो बारचे फोटो दाखवले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2013 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे

मागे एक मित्र हिरव्या देशातून जाऊन आला त्याने अशाच एका स्नो बारचे फोटो दाखवले होते.
ही कल्पना स्नो बारची कल्पना दुबईतील एका रेस्तरॉने ओस्लोमधील स्नो बार वरून उचलली आहे असे कळते.

वा... खुपच मस्त... पु.भा.प्र. :)

nishant's picture

21 Mar 2013 - 3:27 pm | nishant

पु.भा.प्र....

मोदक's picture

21 Mar 2013 - 4:38 pm | मोदक

भारी वर्णन...

सव्यसाची's picture

21 Mar 2013 - 4:42 pm | सव्यसाची

बॅटमॅनशी सहमत.. जळून खाक झालो आहे. :)

५० फक्त's picture

21 Mar 2013 - 6:07 pm | ५० फक्त

लई भारी, नशीब ते बेडशीट तरी काळे होते, ते पण पांढरे असते आणि दिसले नसते म्हणजे हालच.

एका खोलीतला तो हंस, थेट 'हंस येई तो वनी, नाद चित्र रेखितो ...' वाला वाटला.

रेवती's picture

21 Mar 2013 - 6:27 pm | रेवती

खासच आहेत फोटू!
वर्णन इतकं प्रभावी झालय की तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं.
आमच्याकडेही काल थोडं बर्फ झालं आणि तुम्ही बर्फाच्या हाटेलाचे लेखन आज टाकणार काय अशी आठवण आली.
हा बर्फाळ प्रदेश बघताना तुम्हाच्याकडे गरम कपडे तर होतेच पण आपण किंचितसे का होईना थंड हवामानाला सरावलोय असे वाटले का? अगदी पहिल्यांदा गार वार्‍याच्या झुळुकीनेही शहारून जाणारे मनुष्य हळूहळू सरावते हे जाणवले का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2013 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

तापमानातला फरक मला इतका त्रास देत नाही. उबदार कपड्यांच्या तयारिनिशी गेलो असल्याने नॉर्वेत काहीच त्रास झाला नाही. थंडी मला घामट उकाड्यापेक्षा केव्हाही जास्त आवडते.

A/c विना रोज दिवसा ५०+ अंश पर्यंत वर आणि रात्री ४-६ अंश पर्यंत खाली असे तापमान सतत काही आठवडे पुर्वी अनुभवले आहे... अरबी वाळवंटाच्या 'रब अल खाली' (Empty Quarter) मध्ये. मजा वाटली होती. अर्थात परत मुद्दाम असे करायला जाणार नाही :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2013 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

गणपा, सूड, Mrunalini, nishant, मोदक, सव्यसाची आणी ५० फक्त : आपल्या सर्वांना अनेक धन्यवाद !

अनन्न्या's picture

21 Mar 2013 - 6:52 pm | अनन्न्या

वाचताना हुडहुडी भरली!!

अभ्या..'s picture

21 Mar 2013 - 7:47 pm | अभ्या..

मस्त हाटेल. अगदी हाटेलाच्या लोगोपासून सगळी कोरीव कामे आवडली.
धन्यवाद :)

हरिप्रिया_'s picture

21 Mar 2013 - 9:55 pm | हरिप्रिया_

सुरेख…
त्या एका हॉटेलच्या रूमच्या थीम मध्ये ताजमहाल आहे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2013 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

होय... आणि ते बघून बर्‍याच जणांना हेवा वाटला कारण बाकी सर्व थीम बर्फ आणि नॉर्वेशीच संबद्धीत होते :)

शिल्पा ब's picture

21 Mar 2013 - 10:18 pm | शिल्पा ब

एकदम मस्त.

प्यारे१'s picture

21 Mar 2013 - 11:21 pm | प्यारे१

थिजलो! :)

एक्का मालक आम्हाला स्वाक्षरी बदलायला लावणार तुम्ही! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2013 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरं झालं तुम्हीच हा मुद्दा पुढे आणलात... मला तर असा प्रश्न पडला होता +D

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2013 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनन्न्या, अभ्या.., हरिप्रिया_, शिल्पा ब आणि प्यारे१ : आपल्या सुंदर प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद !

फोटो पाहता पाहता कुड्कुडायलाच लागले!! एक नंबर आहे हे सगळं!

अर्धवटराव's picture

22 Mar 2013 - 1:16 am | अर्धवटराव

नॉर्वे, तुमची लेखनशैली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा हौशी स्वभाव... सगळच ग्रेट.

अर्धवटराव

सानिकास्वप्निल's picture

22 Mar 2013 - 4:28 am | सानिकास्वप्निल

अप्रतिम!!
बर्फाचे हॉटेल,कलाकृती, बर्फाच्या खुर्च्या, दीवाण सगळे खासचं :)
मस्तं भाग .
पुभाप्र

मला ते शेकोटीला बसलेले शिल्प फार कल्पक वाटले. त्यात आणि त्याखाली लालसर प्रकाशयोजना तर मस्तच.

अर्थात बाकी सारेच मस्त.

अस्मी's picture

22 Mar 2013 - 10:26 am | अस्मी

वा..एकदम मस्त हा भाग पण!!
स्नो हॉटेलचे सगळे फोटो एकदम छान(ताजमहाल थीम पण) :)

वैशाली हसमनीस's picture

22 Mar 2013 - 11:12 am | वैशाली हसमनीस

सुन्दर अति सुन्दर.शब्द नाहीत भावना व्यक्त करायला.

शिद's picture

22 Mar 2013 - 12:46 pm | शिद

ज ब र द स्त...!!!

तुमची प्रवाससवर्णने वाचुन/बघुन हेवा वाटतो कधीकधी...(ह.घ्या.)

गणामास्तर's picture

22 Mar 2013 - 1:18 pm | गणामास्तर

काय दणदणीत फटू हो तिच्या XXXXXXXXXXX ..

कवितानागेश's picture

22 Mar 2013 - 1:36 pm | कवितानागेश

परत परत बघतेय फोटो... फार सुंदर जागा आहे.
प्रकाशयोजना मस्त आहे होटेलातली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2013 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

आनन्दिता, अर्धवटराव, सानिकास्वप्निल, aparna akshay, अस्मी, वैशाली हसमनीस, शिद, गणामास्तर आणि लीमाउजेट : आपल्यालाही या सफरीत मजा येत आहे म्हणजे माझ्या लेखनाचा उद्देश सफल होत आहे... यासारखी अजून आनंदाची गोष्ट ती काय असणार ? असाच लोभ असू द्या. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद !

मालोजीराव's picture

22 Mar 2013 - 2:02 pm | मालोजीराव

गोठवून टाकणारा लेख आणि फोटो…अप्रतिम !
राजकारणात असता तर टुरिझम मिनिस्टर झाला असता ना राव तुम्ही…!

चेतन माने's picture

23 Mar 2013 - 1:08 pm | चेतन माने

निळा निळा रंग डोळ्यांना फार सुखावतोय. हॉटेल लैच भारी आहे. असल्या हॉटेलांमध्ये ड्रिंक सुद्धा बर्फाच्याच ग्लास मध्ये देतात असं पाहिलं होत. गंम्मत नै का !!!!

पुभाप्र :) :) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2013 - 5:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

मालोजीराव आणि चेतन माने : अनेक धन्यवाद !

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2013 - 5:19 pm | टवाळ कार्टा

खोल्यांना दरवाजे नसून कापडी पडदे असल्याने किल्ल्या देण्याचा प्रश्नच नव्हता

;)

नानबा's picture

23 Mar 2013 - 5:31 pm | नानबा

तुमच्या या संपूर्ण लेखमालेबद्दल नेमकं काय लिहू तेच कळत नाहीये.. प्रत्येक भागाने डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटवलं.. कमाल कमाल आणि फक्त कमालच....

चिगो's picture

23 Mar 2013 - 10:15 pm | चिगो

खोल्यांना दरवाजे नसून कापडी पडदे असल्याने किल्ल्या देण्याचा प्रश्नच नव्हता !

"थिजवणार्‍या" थंडीचा योग्य फायदा केलाय पैसे वाचवायला हॉटेलवाल्यांनी.. ;-)
हा भागपण जबरा झालाय, मालक.. तुमच्या ह्या सफरीत मजा येतेय..

धमाल मुलगा's picture

26 Mar 2013 - 6:36 am | धमाल मुलगा

=)) चिन्म्या!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2013 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रथम फडणीस आणि चिगो : आपल्या सुंदप्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद !

दिपक.कुवेत's picture

24 Mar 2013 - 12:32 pm | दिपक.कुवेत

निव्वळ क्लास! आयुष्यात एकदा तरि असा बर्फ भरभरुन अनुभवायचा आहे :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2013 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे

आणि तुमच्या बर्फाळ सहलीसाठी अनेक शुभेच्छा !

आहाहा... लयं नशिबवान हाय बघा तुम्ही ! अवं आमसनी फकस्त या बद्धल ठावं व्हतं,पन तुमी तर चक्क राहुनच आलात की तिकडं,आमी या हाटिल बद्धल वाचल व्हतं,कुनच्या टिव्ही कार्यक्रमामंदे ह्यो हाटिल पायल व्हत... लयं भारी लिवल्म हाय तुमी ! असच लिवा म्होरं म्होरं. :)

जाता जाता :--- या धाग्यामुळे मला दोन गोष्टी आठवल्या...
१) डाय अनदर डे या बॉन्डपटातील आइस हॉटेल.
२)आता बॉन्डपट म्हंटले की मादक ललना येणार की वो...मला त्या चित्रपटात आवडलेली ही कोमलांगिनी. ;)
Rosamund Pike
Bond Girl

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2013 - 1:55 am | निनाद मुक्काम प...

हे फोटो पाहून मला त्याचं सिनेमाची आठवण झाली.
व हिची आणि हेली बेरी ची शेवटची विमानातील मारामारी जबराच होती .
ह्यात हेले बेरी तिला उद्देशून डाय बीच ज्या त्वेषात म्हणते त्याला तोड नाही.
पण हि बॉंड गल नव्हती
हेले बेरी होती ,
येथे गेलेच पाहिजे.
पण खरे सांगायचे तर पहिल्या वर्षी सर्वत्र पसरेल्या अथांग बर्फाचे प्रचंड कौतुक वाटले ,
माझ्या आख्यानात आगाऊ पणे अनेक फोटो टाकले ,
आता मात्र जाम कंटाळा येतो , कधी कधी तिडीक येते ,
येथे लहान जन्मलेल्या बाळाला डी विटेमीन च्या गोळ्या विरघळून द्याव्या लागतात.
कारण सूर्य संपावर असतो.
सूर्याला देव का म्हणतात ते अश्या वातावरणात कळले ,
भरपूर आराधना केली तर कधीतरी दर्शन देतो ,
जेव्हा मी भारतात जातो तेव्हा चुकूनही मुंबई च्या उकाड्याला नाव ठेवत नाही ,
मनमुराद अनुभवतो ,

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2013 - 12:32 am | डॉ सुहास म्हात्रे

काय पावनं, आत्ताश्या दावता व्हय तो फटु? अदुगर दावला असतासा तर गच्ची धरून ईचारलं असतं नाय काय त्या हाटिलवाल्याला की बेन्या कुटं लपवलस हिला म्हून ? +D

सुज्ञ माणुस's picture

25 Mar 2013 - 10:58 am | सुज्ञ माणुस

सुर्य पाहिलेला माणूस असतो तसे भू-तलावरचा स्वर्ग पाहिलेला माणूस म्हणून तुमचे (खरे) नाव घावे लागेल. :)

स्पा's picture

25 Mar 2013 - 11:36 am | स्पा

__/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2013 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुज्ञ माणुस आणि स्पा : अनेक धन्यवाद !

पैसा's picture

25 Mar 2013 - 8:54 pm | पैसा

अशक्य सुंदर आहे सगळं!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2013 - 4:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

असं एक स्नो व्हिलेज फिनलंडमधे मागे पाहिलं होतं. पण अशा ठिकाणी रात्रभर रहाणं भारीच आहे. पहाटेचा फोटो खूपच सुंदर आहे.

धमाल मुलगा's picture

26 Mar 2013 - 6:35 am | धमाल मुलगा

लै भारी! काय अफलातून आहे ते हाटेल. फोटो पाहूनच येडा झालो राव! तिथं प्रत्यक्ष पाहताना काय मस्त वाटत असेल! :)

ही अख्खी लेखमालिका आणि फोटो सगळंच अफलातून भारी आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2013 - 9:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

पैसा, ३_१४ विक्षिप्त अदिती, धमाल मुलगा आणि यशोधरा : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

उत्कृष्ट वर्णन आणि छायचित्रे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Mar 2013 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !