उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०२ : ट्रुम्सो - डॉग स्लेडींग सफारी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
3 Mar 2013 - 2:21 pm

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

...हॉटेलवर पोचून चेक् ईन केले तेव्हा तीन-सव्वातीन वाजले होते. संघ्याकाळचा डॉग स्लेडींग म्हणजे बर्फावरच्या कुत्र्यांच्या गाडीतून फिरायला जायच्या कार्यक्रमासाठी सव्वासहाला निघायचे होते. म्हणजे चांगला तीन तासांचा वेळ होता. घरातून निघून तीन सलग विमानप्रवासांसह एकूण १४-१५ तास झाले होते. अंग जरा भरून आले होते. मस्तपैकी गरमागरम शॉवर घेतला आणि मोबाइलमध्ये दोन तासानंतरचा गजर लावून ताणून दिली.

झोपायचा प्रयत्न जरी प्रामाणिक असला तरी सहलीच्या उत्साहाने सगळा थकवा शॉवरच्या पाण्याबरोबर वाहून गेला होता. त्यामुळे जबरदस्तीने तासभर डोळे मिटून पडून राहिलो. नंतर न राहवून उठलो, म्हटले नुसते लोळण्यापेक्षा जरा ट्रुम्सोमध्ये एक चक्कर मारू... बघूतरी कसे आहे हे उत्तरेचे पॅरिस. संपूर्ण प्रवासात दुहेरी पायमोजे सोडले तर इतर काही वेगळे खास कपडे वापरले नव्हते. बहुतेक सर्व वेळ वातानुकूलित वातावरणात असल्याने काही वाटले नव्हते. पण ट्रुम्सो विमानतळाच्या दरवाजासमोर उघड्यावर हॉटेलच्या बसची वाट पाहताना दहा मिनिटांतच "यापुढे आणलेली सर्व कवचकुंडले वापरल्याशिवाय काही खरे नाही" हे सत्य पूर्णपणे कळून चुकले होते. आणलेली सगळी थंडी निरोधक चिलखते चढवू लागलो. अंतर्वस्त्रे, त्यावर रुपा थर्मलवेअर, त्यावर नेहमीचे शर्टपँट, त्यावर जॅकेट, पायात दुहेरी पायमोजे व जाड स्नीकर्स. सर्वसाधारण हिंडण्याफ़िरण्यासाठी इतके संरक्षण पुरेसे होते. बर्फाच्या आकर्षणांच्या वेळेस लागणारा खास गरम ओव्हरऑल व बर्फाचे बूट मिळतील अशी तजवीज अगोदरच करून ठेवली होती. एवढे सगळे झाले आणि ध्यानात आले की मी आणलेल्या लोकरी हातमोजांच्या दोन्ही जोड्या गायब आहेत. विमानतळावर बसची वाट पाहताना हातमोजांचे दोन्ही जोड एकावर एक घातले होते आणि तरी बोटांची टोके बर्फात ठेवल्यासारखी गार पडली होती आणि हॉटेलात चेक् इन करताना ते उतरवले होते... पण नंतरचे काहीच आठवेना. हॉटेलच्या स्वागतकक्षात चौकशी केली पण त्यांनीही तेथे अशी काही वस्तू नाही म्हणून सांगितले. शेवटी म्हटले की नाहीतरी ते संरक्षण तुटपुंजेच होते आणि अजून लागेल ती खरेदी ट्रुम्सोमध्ये करायचे ठरवले आहेच, चला, आता आहे त्या वेळेचा त्यासाठी सदुपयोग करा. सगळी तयारी करून खोलीच्या बाहेर पडलो.

"कुच कुच होता हाय." पॅसेजमधून इलेव्हेटरकडे जाताना मागून अचानक हे शब्द ऐकू आले आणि थबकून मागे पाहिले. हॉटेलच्या दोन सफाई सेविकांनी हसत हसत अभिवादन केले "Good evening, sir. Indian? Indian?" त्या दोघीही मंगोलियन वंशाच्या दिसत होत्या. मीही त्यांना "हो इंडियनच आहे व शुभसंध्या" असे म्हणून कुतूहलाने थोडी चौकशी केली. त्या दोघीच नव्हे तर त्या हॉटेलमधल्या बऱ्याच सेविका इंडोनेशियन आहेत आणि त्यांना हिंदी सिनेमा आणि गाणी फार आवडतात असे कळले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्यांना बहुतेक वाटले असावे की माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. कारण त्यांतल्या एकीने मला हिंदी सिने-तारे-तारकांची नांवे इतकी धडाधड म्हणून दाखवली की मला इतकी सगळी नावे आठवायला पाच-दहा मिनिटे सहज लागली असती. त्यावर मी आश्चर्य व्यक्त केले तर दोन हिंदी गाण्यांचे मुखडेही म्हणून दाखवले. मग मात्र मी खुलेपणाने विश्वास बसल्याचे सांगून त्याचा निरोप घेतला. म्हणजे बॉलीवूड इंडोनेशिया मार्गे नॉर्वेमध्ये... अगदी नॉर्वेच्या अती उत्तरेला ध्रुवीय प्रदेशातही पोचले आहे म्हणायचे !

स्वागत कक्षामधून दुकानांबद्दल चौकशी करून हातमोजांच्या शोधात निघालो. हॉटेल अगदी मोक्याचा ठिकाणी होते. दोन मिनिटातच एक चौक ओलांडून मुख्य रस्त्यावर पोचलो. इतक्या उत्तरेला, अगदी ध्रुवीय प्रदेशांत इतके आधुनिक शहर बघून थक्क झालो. ६९,००० लोकवस्ती असलेले हे संपूर्ण नॉर्वेतले सातव्या क्रमांकाचे आणि उत्तर नॉर्वेतले प्रथम क्रमांकाचे नगर एका बेटावर वसलेले खोल बारमाही समुद्री बंदर आहे. शिवाय विमानतळ, जलमार्ग, रस्ते, पूल आणि पाण्याखालचे बोगदे अश्या अनेक अत्याधुनिक दळणवळणाच्या साधनांनी सर्व १२ महिने नॉर्वे व इतर जगाशी जोडलेले आहे. मुख्य रस्त्यावर अनेक जागतिक ब्रँडस् ची दुकाने दिमाखाने मिरवत होती...

.

रस्त्यावर पडलेला बर्फ गाड्यांच्या रहदारीने चेपून जाऊन दगडासारखा कडक झाला होता. येथे गाड्यांना खास बर्फासाठी बनवलेले टायर्स वापरत असल्याने त्या न घसरता वेगाने धावत होत्या... अगदी दुहेरी लांबीच्या सार्वजनिक बसेसही...

मात्र असले रस्ते खूप निसरडे असतात आणि पायी चालणाऱ्यांना फारच काळजीने ते पार करावे लागतात... नाहीतर सरळ लोटांगण !

थोडी चौकशी करून हे एक स्पोर्टस् दुकान शोधून काढले आणि खास स्किईंगचे हातमोजे खरेदी केले. हा निर्णय किती योग्य होता त्याची प्रचिती काही मिनिटांतच आली... कारण हात आणि विशेषतः बोटांची बोचऱ्या थंडीची तक्रार पाचेक मिनिटांत बंद झाली ! नंतर थोडे विंडो शॉपिंग करून परत आलो तोपर्यंत सहा वाजले होते. हॉटेलच्या लॉबीत बरीच गर्दी जमा झाली होती. ऑरोरा बघायच्या सगळ्या सहली साडेसहाच्या पुढे सुरू होतात आणि त्या सहलींची मजा द्विगुणित करण्याकरिता करण्यासाठी त्यांत डॉग स्लेडींग, रेनडियर स्लेडींग, डिनर क्रूझ, बर्फातल्या सफारी इत्यादींचा समावेश असतो. लोक आपापल्या गाईडसची वाट पाहत होते. मीही त्यांच्यात सामील झालो.

डॉग स्लेडिंगच्या ठिकाणी (Villmarkssenter) जायला बसने साधारण पाऊण तास लागला. अंधार भरून आला होता आणि शहराबाहेर पडलो तसे गाड्यांचे दिवे सोडून काही दिसत नव्हते. अर्थात ऑरोरा बधायचा असल्याने शहराच्या उजेडापासून जेवढे दूर जाऊ तेवढे चांगलेच होते. पण आकाशातली ढगांची गर्दी काही कमी झालेली नव्हती. "इथले वातावरण असेच लहरी आहे, कधी अचानक ढग येतील, बर्फ पडायला किंवा अगदी पाऊस पडायला सुरुवात होईल ते सांगता येत नाही" असे म्हणत आमच्या निराशेत गाईडने भर टाकली. कदाचित हे त्याच्या ध्यानात आले असावे. कारण लगेच, "पण त्याबरोबरच एकदम ढग दूर होवून नॉर्दर्न लाईट्स् दिसायला लागले अशाही घटना काही कमी नाहीत."अशी सारवासारवही केली.

स्लेडिंगचे केंद्र आले पण ढग आपल्या जागीच होते. मात्र त्या केंद्रातल्या गाईडने आमचा ताबा घेऊन स्लेडींग करता लागणाऱ्या कुत्र्यांची निवड, पैदास, वाढ, खाणेपिणे, प्रशिक्षण, स्वभाव, कोणता कुत्रा स्लेडच्या साखळीत कुठे असावा याचे तंत्र आणि कुत्र्यांकडून योग्य काम करवून घेण्यासाठीचे मंत्र या सगळ्या माहितीत इतके गुंतवून ठेवले की आम्ही नॉर्दर्न लाइट्स थोडा वेळ विसरून गेलो. केंद्रात सगळीकडे फिरवून या सगळ्या गोष्टींचे प्रात्यक्षिकही दाखवले. या केंद्रात कुत्र्यांच्यासाठी खास दवाखाना, बाळंतपणाची खोली आणि लहान पिलांसाठी खास नर्सरीही आहे. या केंद्रात "अलास्कन हस्की" या जातीचे ३०० हायब्रीड कुत्रे आहेत.

कुत्र्यांची घरे

.

हे थंडीत राहणारे कुक्कुर, यांच्या घरावर बर्फ असले तरच यांना छान वाटते. धावून झाले की बर्फात लोळून अंग गार केल्यानंतरच यांना बरे वाटते. यांच्या अंगावरची जाड फर अगदी -३० / ४० सेंटिग्रेड तापमानातही त्यांना गरम ठेवते. ध्रुवप्रदेशाच्या मोहिमांत सामान वाहून नेण्यास फक्त कुत्रेच उपयोगी पडतात... इतर कुठलाही प्राणी नाही.

नर्सरीतली काही हस्की पिले गाईडने बाहेर आणली आणि प्रवाशांना त्यांच्याशी खेळण्याची मजा उपभोगू दिली...

तासभर -९ डिग्री थंडीत हिंडून खास डॉग स्लेडींगच्या पोशाखातही सगळे जण हुडहुडू लागले होते... ती गाईड मात्र नेहमीचे गरम कपडे घालून होती आणि "आज हवा जरा गरमच आहे नाही का?" अशा आविर्भावात हातमोजेही न घालता आरामात होती ! पण प्रवाशांची अवस्था पाहून ती म्हणाली, "पहिली फेरी मारायला गेलेल्या स्लेड्स यायला १५-२० मिनिटे आहेत. हवे असल्यास केंद्रात फेरी मारू शकता किंवा शेजारच्या तंबूत चहा-कॉफीची व्यवस्था आहे." अर्थात सगळ्यांचा मोहरा कोठे वळला हे सांगायला नकोच.

केंद्रातील तंबूचे अंतरंग...

स्लेडींग गियरमध्ये अस्मादिक... (शिरस्त्राण काढून ठेवले आहे)

थोड्या वेळाने स्लेडस् परत आल्या आणि आमचा नंबर लागला. ही माझी स्लेड...

एका स्लेडमध्ये दोन माणसे बसू शकतात आणि चालक मागच्या पट्ट्यांवर उभा राहून स्लेड हाकतो. तो मागच्या तिरक्या धातूच्या पट्टीवर दाब देऊन स्लेडला ब्रेक लावू शकतो. शिवाय मधून मधून आपल्याकडच्या लहान मुलांच्या पायाने ढकलायच्या तिचाकीप्रमाणे पायाने स्लेड पुढे ढकलून कुत्र्यांना मदतही करू शकतो. हे सर्व प्रवाशांनाही थोड्याश्या सरावाने जमते व इच्छा प्रदर्शित केली तर करायलाही मिळते. अर्थात नुसते स्लेडमध्ये बसून मजा अनुभवायची असली तरी हरकत नाही.

कुत्रे जोडून तयार स्लेड...

एका स्लेडला—किती वजन ओढायचे आहे त्यावरून-- तीन ते पाच कुत्र्यांच्या जोड्या जोडतात. सगळ्यात पुढच्या जोडीतील कुत्रे आकारमानाने लहान असले तरी चालतात पण बुद्धिमत्तेने उत्तम असणे जरूरीचे असते. कारण ते खूप मागे असलेल्या चालकाच्या आज्ञेचे आवाज ऐकून स्लेड ओढायला सुरू करणे, थांबवणे, डावी-उजवीकडे वळणे, चढ-उतारावर वेग नियंत्रणात ठेवणे वगैरे कामे करण्यात तरबेज असणे जरूरीचे आहे. नाहीतर स्लेड बर्फाच्या खाईत कोसळायला निमंत्रण दिल्यासारखेच होईल. मधल्या फळीत मात्र बळकट मोठे कुत्रे लावतात आणि हेच स्लेडचा ओढण्याचा बहुतेक भार सहन करतात. मागच्या भागात नवीन (ट्रेनी) मडळी असते… चालक त्यांच्यावर नीट लक्ष ठेवून असतो आणि त्याच्या निरीक्षणाच्या आधारावर (येथे पण इव्हॅल्युएशन असेत बरं का !) त्यांची बढती पुढच्या फळीत की मधल्या फळीत होणार का डिसमिस होणार ते ठरते.

कृष्ण त्रयोदशीची रात्र आणि ढगांचे दाट आवरण यामुळे दाट अंधारात केवळ छोट्या टॉर्चच्या प्रकाशात झालेल्या डॉगस्लेडसफरीची मजा काही औरच होती. अंधारातही अरुंद ट्रॅकवरून कुत्रे वेगाने वळणे घेत चढउतारावरून स्लेड ओढत होते...अगदी डिस्नेवर्ल्डमधल्या अंधारातल्या रोलरकोस्टरसारखी मजा आली.

४५ मिनिटे कशी संपली ते कळलेही नाही. परत आल्यावर कोणीतरी वैतागून म्हणाला, "हे काय? अजूनही आकाश ढगाळलेलेच आहे." तेव्हा ध्यानात आले... अरे ही “नॉर्दर्न लाइट” डॉग स्लेडींग सफारी होती ! आता ध्यानात आले की दर नॉर्दर्न लाइट सफरी बरोबर "सबजेक्ट टू वेदर कंडिशन" हे डिसक्लेमर का होते ते ! हा धोका ध्यानात घेऊनच ट्रुम्सोमघ्ये तीन रात्रीच्या तीन सफारी बुक केल्या होत्या. पण या पहिल्या दिवसाने दिलेल्या धक्क्याने ऑरोराबद्दलची काळजी वाढवली एवढे मात्र खरे.

सफारी संपवून सर्वजण परत तंबूत जेवणासाठी गोळा झाले. उत्तर नॉर्वेमध्ये सफारीचे जेवण मात्र थातूर मातूरच असते... सूप, ब्रेड कॉफीवरच बोळवण करतात. शेजारच्या टेबलावर सहा मंडळी हिंदी बोलताना ऐकली. त्यातल्या एकाने माझ्याकडे बघून स्मितहास्य केले. बस, हलो-हाय म्हणून गप्पा मारायला अजून काय जास्त पाहिजे? ते सहाही जण नॉर्वेच्या तेल व्यवसायात काम करणारे इंजिनियर होते. सहा-सात वर्षांपूर्वी आलेले दोन तेलगू महाशय नॉर्वेचे नागरिकही बनले होते. इतर चार जण बिहार-उत्तरप्रदेशचे होते आणि काही काळानंतर मिळणार्‍या नागरिकत्वाची वाट पाहत होते.

आवांतर :
१. एका मराठी माणसाने तर नॉर्वेत फार मोठी झेप घेतली आहे. श्रीयुत अरविन गाडगिळ नावाचे नाशिकमध्ये जन्मलेले सद्-गृहस्थ सध्या नॉर्वेच्या केंद्रिय मंत्रिमंडळात उपमंत्री आहेत ! याबाबत अधिक माहिती येथे मिळेल.
२. नॉर्वेच्या स्पित्झबर्गन या अतीउत्तरेकडील बेटावर भारतीय शात्रज्ञ वातावरणातील बदल व हिमनद्यांचे वितळणे यावर संशोधन करीत आहेत.
३. अजून एक भारतासंबद्धिची आश्चर्यकारक आणि अभिमानस्पद गोष्ट पुढच्याच भागात सचित्र येणार आहे... आताच सगळे सांगून तिची मजा कमी करण्याची इछा नाही !

परतताना डॉग स्लेडींगच्या मजेचा आनंद मानायचा की ऑरोराने धोका दिला म्हणून दु:ख करायचे याचा निर्णय होत नव्हता. पण अजून दोन दिवस ट्रूम्सोमध्ये आहेत आणि शिवाय दोन दिवस क्रूझचे आहेत असे मनाला समजावले. आता मात्र गेल्या ३० तासांच्या दगदगीने डोळे जड होऊ लागले होते आणि हॉटेलवर परतल्यावर गादीवर पडल्या पडल्या गाढ झोप लागली.

(क्रमशः)

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

हाही भाग लैच भारी. उत्तरेकडचे प्यारिस भारीच दिसतेय, इथली खादाडी कशीकाय याबद्दल लिहा की :)

आणि तुमच्या ज्याकेटावर ते चमचमणारं काय आहे म्हणे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 4:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

सफारीच्या ओव्हरऑलवर काहिसे स्वयंप्रकाशी व प्रकाश उत्तमरित्या परावर्तीत करणार्‍या कापडाचे पॅचेस असतात. विषेशतः रात्री कोणी हरवल्यास त्याला अंधारात शोधायला त्यांचा फार उपयोग होतो.

उत्तर नॉर्वेमध्ये केवळ किर्केनेस सोडले तर काही खास खाण्यापिण्याच्या गोष्टी दिसल्या नाहीत. किर्केनेसमध्य जाऊ तेव्हा मात्र ही उणीव भरून निघेल.

धन्यवाद! वाट पाहतोय पुढच्या भागाची.

मोदक's picture

3 Mar 2013 - 4:46 pm | मोदक

भारी सुरू आहे वाचतोय..

येथे गाड्यांना खास बर्फासाठी बनवलेले टायर्स वापरत असल्याने त्या न घसरता वेगाने धावत होत्या... अगदी दुहेरी लांबीच्या सार्वजनिक बसेसही...

इथे त्या टायर्सचा / स्पेशल टायरवाल्या बसचा फोटो आहे का..? नेमका हाच फोटो दिसत नाहीये. :-(

रशीयामध्ये असतात तसे साखळी गुंडाळलेले टायर नव्हते का तिथे..?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 5:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मलाही कळत नाही की हाच खास फोटो नेमका का गायब होतोय. तीनदा चढवला. दर वेळेस काही मिनीटे दिसतो आणि परत गायब होतो. एवढ्या दूरदराज, डोंगराळ बेटांच्या क्षेत्रातही किती अत्याधुनिक आणि दुहेरी लांबीच्या बसेस सरकारी सार्वजनीक सेवेत आहेत हे दाखवायला हा खास फोटो टाकला आहे.

संमं याबाबतीत काही करू शकतील का?

सर्वच गाड्यांचे टायर खास बर्फाळ रस्त्यांवर पकड घेतील असले खोल "ट्रेड्स्" असलेले असतात, पण साखळ्या वगैरे गुंडाळलेल्या नव्हत्या. दुरून काही फार वेगळे दिसत नव्हते पण आपण स्वतः त्या रस्त्यांवरून चालायचा प्रयत्न केला की घसरगुंडी होउन तारांबळ ऊडते. अजून उत्तरेला तर दिवसाचे २४ तास बर्फ उपसणार्‍या गाड्या काम करत असतात तरी रस्त्यांवर बर्फाचे थर असतातच. नंतर मी बुटावर चढवायचे स्पाईक्स विकत घेऊन माझ्यापुरता हा प्रश्न सोडवला.

फोटोची लिंक देता का इथे..?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2013 - 6:31 pm | श्री गावसेना प्रमुख

राव तुम्ही जी लिंक देताय ती गंडलीय अगोदर त्या फोटो ची प्रायवसी सेटींग चेंज करा

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्री गावसेना प्रमुख, धन्यवाद !

@ मोदक : आता ती बस दिसू लागली आहे. हा खालचा फोटो खास तुमच्याकरता कारण यात बसचे टायर नीट दिसतोय.

मी फोटोत असल्याने अगोदर तो टाकण्याचे टाळले होते. पण आता टाकलाच आहे तर इतर काही गोष्टींही दिसतील / सांगतो: बसची उत्तम स्थिती, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, बस वातानुकुलीत असतात (अर्थात ही चैन नसून गरज आहे), चालक सतत पुढच्या थांब्याची माहिती देत असतो, सर्व सेवा नम्रपणे होते, थांबा माहित नाही सांगीतले तर "मी बरोबर उतरून देईन काळजी करू नका" म्हणाला आणि मला एकदम भरून आले +D

nishant's picture

3 Mar 2013 - 10:34 pm | nishant

मध्य व उत्तर युरोपात (जिथे हिमव्रुष्टी खुपच जास्त होते) गाड्यांचे टायर साधारण ऑक्टोबर दर्म्यान बद्ल्ले जातात..यांना विंटर टायर किंवा (M+S Tyres - mud and snow) असेहि म्ह्णतात. दिसाय सर्वसाधारण टायर साऱखे दिसत असले तरी त्यांच्या वर्चे आवरण ट्ण़़क व त्याचे "tread grooves" जास्त खोल असते जे गाड्यांना घसर्ण्यापासुन वाचवते :)

मोदक's picture

3 Mar 2013 - 11:29 pm | मोदक

टायर..

अवांतर - तुम्ही दिलेल्या माहितीवरून एक रोचक संदर्भ आठवला. २००१ / २००२ च्या दरम्यान; ज्यावेळी मायकेल शुमाकर ऐन भरात होता त्यावेळी फेरारीने पिटस्टॉप च्या एकूणच प्रोसेसमध्ये बरेच नवीन नवीन प्रयोग करून वेळेच्या गणितात अविश्वसनीय सुधारणा केली होती. त्यावेळी एकदा मलेशियन किंवा कॅनेडीयन जीपीमध्ये पाऊस आला असताना फेरारीने अत्यंत वेगाने टायर बदलून; अनेकदा तर हवामानाप्रमाणे त्या त्या वेळी हवे तसे टायर बदलून शुमाकरला वेळेमध्ये आघाडी घेण्यासाठी मदत केली होती. ते असलेच टायर असावेत. ओलसर जागेवरून न घसरणारे..

नंतर FIA ने बरेच नियम बदलून फेरारीच्या अशा युक्त्यांना चाप लावला. ;-)

मोदक's picture

3 Mar 2013 - 8:28 pm | मोदक

दिसला एकदाचा.

भारी बसेस आहेत.

मला असले काहीतरी अपेक्षीत होते.

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे प्रकरण फारच भारी आहे... असं काही नॉर्वेत दिसले नाही.

गाड्या घसरत का नाहीत असे विचारले आणि गाईडने सांगीतले तेव्हाच कळले की हे टायर खास आहेत.

लाल टोपी's picture

7 Mar 2013 - 12:48 am | लाल टोपी

सध्यातरी रशियात अशा प्रकारचे टायर दिसून येत नाहीत

नीलकांत's picture

3 Mar 2013 - 4:50 pm | नीलकांत

प्रवास वर्णन झकास चाललेले आहे. नवीन प्रदेश आणि वेगळे वातावरण वाचायची उत्सुकता वाढवत आहेत. पुढील भाग येऊ द्या.

- नीलकांत

आदूबाळ's picture

3 Mar 2013 - 4:54 pm | आदूबाळ

वाचतोय...

येऊ द्या...

अनन्न्या's picture

3 Mar 2013 - 6:41 pm | अनन्न्या

चांगल्या धाग्यांना द्या की शंभरीचा आनंद!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा प्रतिसाद वाचला आणि नि:शब्द झालो ! आभार प्रकट करायला शब्दच नाहीत.

इतक्या पाठिंब्याचा प्रतिसाद आल्यावर पुढील भाग लिहायला हत्तीचं बळ आलं नाही तरच नवल. अनेकानेक धन्यवाद !

५० फक्त's picture

3 Mar 2013 - 8:08 pm | ५० फक्त

मस्त हो मस्त एकदम.

धन्या's picture

3 Mar 2013 - 8:14 pm | धन्या

तुमच्याबरोबर आम्हीही या सफरीचा व्हर्च्यूअली आनंद घेतोय. पुढचा भाग लवकरच लिहा !

पैसा's picture

3 Mar 2013 - 8:18 pm | पैसा

तुमची नेहमीची खासीयत! आम्हालाच तिकडे गेल्यासारखं वाटतंय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

नीलकांत, आदूबाळ, ५० फक्त, धन्या, पैसा : आपल्या सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

रेवती's picture

4 Mar 2013 - 12:33 am | रेवती

भारी फोटू आणि वर्णन.

प्रचेतस's picture

4 Mar 2013 - 10:18 am | प्रचेतस

लै भारी ओ.
पुढचा भाग येऊ द्यात लवकर.
ते कुत्रे बघून एट बिलोची 'एट बिलो'ची आठवण झाली.

मस्त मस्त... पुढला भाग लौकर लौकर टाका... पुढला प्रवास आणि अनुभव वाचायची इच्छा प्रचंड वाढली आहे..

झकासराव's picture

4 Mar 2013 - 11:27 am | झकासराव

प्रवास वर्णन कसं लिहावं ह्याचं स्टॅण्डर्डच सेट करताय तुम्ही. :)

मस्त सुरु आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2013 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

रेवती, वल्ली, प्रथम फडणीस आणि झकासराव : सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

@ झकासराव : कसचं, कसचं ! +D

मृत्युन्जय's picture

4 Mar 2013 - 11:46 am | मृत्युन्जय

खुपच झक्कास.

सानिकास्वप्निल's picture

4 Mar 2013 - 12:56 pm | सानिकास्वप्निल

वाचत आहे, लेखनशैली आवडली:)

विलासराव's picture

4 Mar 2013 - 1:30 pm | विलासराव

वाचले.
सफर आवडतेय.
आता संपेपर्यंत मज्जाच मज्जा.

स्मिता.'s picture

4 Mar 2013 - 5:20 pm | स्मिता.
स्मिता.'s picture

4 Mar 2013 - 6:32 pm | स्मिता.

छान झाला हा भाग. वेगवेगळ्या फळीत वेगवेगळ्या कौशल्याच्या कुत्र्यांनी बर्फावर ओढायची स्लेज बघून '८ बिलो' या सिनेमाची आठवण आली.

प्रतिसादांची वाट बघत लिहायचे की नाही हे ठरवू नका प्लीज. ज्यांना वाचायचे आहे ते वाचतील, ज्यांना प्रतिसाद द्यावेसे वाटते, ते देतील. समजा जरी १० प्रतिसद आले तरी प्रामाणिकपणे, मनापासून आलेले ते प्रतिसादही तितकेच महत्वाचे नाहीत का? :)

बाकी प्रव वाचते आहे आणि तुमचा हेवाही वाटतो आहे. तिकडे असतानाच इथे प्रव लिहिले असतेत, तर त्या कुत्र्यांचे खूप लाड करा, असे लिहिले असते :) कसले गोडू असतात ते हस्कीज! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 4:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या अश्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत !

सुमीत भातखंडे's picture

5 Mar 2013 - 11:32 am | सुमीत भातखंडे

.

स्पंदन..'s picture

5 Mar 2013 - 2:59 pm | स्पंदन..

साहेब, चीन च्या प्रवास वर्णनानंतर खूप आतुरतेने तुमच्या पुढच्या प्रवास वर्णनाची वाट बघत होतो.

धन्यवाद, आम्हाला जास्त वाट बघायला लावु न दिल्याबद्द्ल. हे हि सदर उत्तम चालु आहे.

सर्..खरं सांगतो, खुप हेवा वाटतो आहे तुमचा....पुढच्या लेखाची आतुरतेने वाट बघत आहे....

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2013 - 3:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

मृत्युन्जय, सानिकास्वप्निल, विलासराव, स्मिता, यशोधरा, सुमीत भातखंडे आणि स्पंदन.. : आपणा सर्वांना उत्साहवर्धक प्रतिक्रंयांसाठी अनेकानेक धन्यवाद ! असाच लोभ असू द्या.

चेतन माने's picture

5 Mar 2013 - 4:56 pm | चेतन माने

ऐन गर्मीत आता तुम्ही जी हुडहुडी भरवताय त्याबद्दल धन्यवाद :)
पहिला आणि हा दुसरा दोन्ही भाग मस्त जमलेत
पुभाप्र :):):)

पुन्हा एकदा तुमच्याबरोबर छान सफर घडवत आहात, धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 4:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

चेतन माने व श्रिया : अनेक धन्यवाद !