आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!!
तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला. तर त्यावेळची गोष्ट. एक आपलं गाव होत जवळपास. आता त्या गावाला आटपाटं म्हणाव अस काही फार मोठ्ठ नव्हत. अगदी गाव म्हणायला सुद्धा जरा शेरभर कमीच म्हणा. आपण वाडी म्हणु.
तर हा गाव तसा वेढ्याच्या जवळपासचा. जवळपासचा म्हणजे एक ४० मैलावर म्हणा. गावाजवळुन एक छोटीशी नदी वाहतेली. त्या नदिच्या पाण्यावर जगणारा गाव. अन गावाभोवती शिवारं. एक, तिस एक घर सुखानं नांदतेली. बायाबापड्या कपाळभर मळवटाची अन अंगभर लुगड्याची आस बाळगणार्या. बापय माणस वर्षाच्या पावसाची अन खंडीन मोजावं अश्या खळंभर धान्याची स्वप्न पाहणारी. आता सारा भागच तसा होता. तरीही नाही म्हणायला, गावात पाटलांचा चौसोपी वाडा होता. गावच्या वेशीवर मारुती छोट्या का होइना पण देवळात उभा होता. एका अंखंड दगडात कोरलेल्या त्या मुर्तीला नाही म्हंटल तरी, सकाळ संध्याकाळचा दिवा लागायचा. देवळात फिरणार्या डोंगळ्यांना दिवसातन एकदा का होइना पण एखादा गुळाचा खडा लाभायचा. आत बाहेर भुर्र उडणार्या चिमण्यांना मुठभर तांदुळ मिळायचे. दुपारच्या उन्हात सावलीला आलेल्या शेरडा करडांच्या लेंड्या कुणीस साळुता फिरवुन स्वच्छ करायच. गावच्या खालच्या बाजुला लक्ष्मीच ठाणं होत. तिला पावसाळ्याच्या सुरवातीला आंबीलीचा नैवेद्य घरपती पोचायचा. तिथल्याच जुळं म्हणाव अश्या जरा मोठ्या गावाच आणि या गावाच मिळुन एक ग्रामदैवत होत. काळ्भैरीचं. त्याची पण जत्रा माघी पौर्णिमेनंतरच्या सोमवारी व्हायची. येव्हढासा गाव माणसांनी फुलुन जायचा. माघारनी यायच्या, पावणे रावणे यायचे. एकुन सगळ सुखात होतं.
अन मग बघता बघता हे सुलतानी संकट गावावर कोसळल. जुळ्या गावच्या काठावरचं सुरेख दगडी शिवालय फोडुन तोडुन भग्न होउन पडल. त्याच्या भिंती कळसावर कोरलेली शिवलिंग रानभर झाली.
मुंगळे सुटावेत सुसाट; तसे मुघल सुटले ह्या गावांमधुन. माणसं जीव वाचवायला राना माळातुन पळाली. अन अश्या वेळेस गनिमाचा एक माजलेला सरदार; त्या मोकळ्या पडलेल्या पाटलांच्या वाड्यात मुक्काम ठोकुन राहिला. वेशीवरचा मारुती उभा फोडला. खालच्या बाजुची लक्ष्मी मंदिरासकट जमिनीत गाडली. नाही म्हणायला भैरोबाच ठाणं वाचल. कारण त्या ठाण्यावर होत्या दोन मोठ्या शिळा. त्यांत आमच्या बायाबापड्यांना दिसलेला देव ह्या घुसखोरांना दिसणं शक्यच नव्हता. माळरानावर उघडा बसुन गावावर नजर राखणारा तो भैरोबा तसाच राह्यला. बाकिचा सारा मुलुख मात्र लुटला गेला. उघडावाघडा झाला. बायाबापड्यांच्या तोंडुन शापवाणी शिवाय काही निघेना.पोरंबाळं हिनंदीनं झाली. कित्येक तरण्याताठ्या पोरींनी नदीचे डोह जवळ केले. बापयांच्या रक्तान जमिनी भिजल्या. जनावरं ह्या कसायांनी कापुन खाल्ली. युद्ध संपल. खर प्रत्येक गावात स्वतःची एक पिल्लावळ सोडुन हा गनिम माग हटला.
आता हे सगळ कमी म्हणुन का काय ह्या उपटसुंभांनी ज्या त्या गावात आपले देव बसवले. त्यांनी मागे सोडलेले बाटवलेले असे मुसलमान त्या देवांना गावांवर लादु लागले. गनिम हटला तसे लोक हळुहळु परत गावावर येउ लागले. "अरारा! काय करुन ठेवल ह्या राक्षसांनी" अस म्हणत होते नव्हते ते दगड मांडुन चुली पेटल्या.गाव पुन्हा रडत खडत का असेना पण नांदु लागला.जी एक पिल्लावळ तिथे गावाचा उपटसुंभ मालक म्हणुन ठेवली होती तो पाटलांच्या वाड्यात राह्यला होता. पण आता पाटिलही परतले. उगा संख्याबळापुढे माघार घेतली वा पळ काढला म्हणुन आता या एकट्याला कोण जुमानतय? आता गावाचं संख्याबळ जोरदार ठरल आणि तो गपगुमानं वाड्यातच एका खोलीत राहु लागला. पाटलीन बाईन कंबर कसली अन गावात पुन्हा जाती घरघरु लागली. तलवारीनं छाटलेल्या खोडांना पुन्हा कोंबरे फुटले अन गावानं घागरीन पाणी घालुन पिक जागवलं, उभ केलं. होय, आता जर हटले तर पुन्हा उभारायला हातात काय रहाणारं?
आता ह्यांत आणि एक कुरापत करुन गेला होता गनिम. त्यांनी पाटलांच्या वाड्यातच खाई खणुन तिथ पंजा पुजला होता. आता त्याची निगराणी राखायला तो एक मुसलमान राहिला होता. त्याची बाईल गपगुमान पाटलीन सांगेल ती काम करायला लागली. मग पाटलीन बाईंनी तिला त्या पंजाला बाईमाणसाचा कसा विटाळ होतो ते पटवलं अन पंजा मुळच्या देवखोलीतनं वाड्याच्या एका कोपर्यात गेला. वर्षा मागनं वर्ष सरली अन त्या मुसलमानाला काय अस एकटं गावातल्या लोकांच्या नजरा चुकवत जगण जमेना. मग एक दिवस सगळा गाषा गुंडाळून गावाला रामराम ठोकुन तो निघुन गेला.
आता तो होता तोंवर गावातल्या एकाही देवाचा मागमुसं लागला नव्हता. मग एक दिवस लक्ष्मीची पडलेली सगळी दगडं हटली अन नुसता लक्ष्मीचा छोटासा कोरलेला दगड चारीबाजुला चार दगड उभी करुन पुन्हा स्थापला गेला. मारुतीच देउळ मोठं असल्याने पुरं उध्वस्त करुन त्या मारुतीची शकल शकल करुन टाकली होती. गावावर परतल्या परतल्या पाटलांनी रात्री कधीतरी जाउन तो भंगलेला मारुती एकत्र करुन पुन्हा गाडला होता. अजुन बाजुच्या गावातन असे मुसलमानांचे ठेकेदार असल्याने त्यांनी एक दिवस गुपचुप एक तुळशी वृंदावन उभारलं अन त्याच्या मधोमध ते भग्नं मारुतीचं शिल्प ठेवुन त्यात माती भरली. मग रोज सकाळ संध्याकाळ सुरु झाली त्या तुळशी वृंदावनाला पाण्याचा एक गडु वाहुन पूजा. त्या मारुतीला बाहेर पडायला पुढे शंभर वर्ष जावी लागली.
तर इतक होउनही आजवर नुसत्या एका मुसलमानाबरोबर गाव त्या पंजाला नाइलाजान का असेना पण पूजतं होत. आता तो नसतानाही भोळ्याभाबड्या मराठी मनाला काही; त्या पंजाची आपल्या देवांची झाली तशी गत करावीशी वाटली नाही. अन ते पंजे गावोगावी अजुनही पुजले जातात. त्यात काहीही राम नसला तरीही.
तर असा तो चिंध्यापिर पंजा पाटलांच्या वाड्यात निवांत होता. घरच्या देवांबरोबर त्यालापण गुळाचा खडा दिसत होता.
मग पाटलांचा परिवार वाढला. पोरा बाळांची लग्न झाली. भावाभावांची मुलं लग्नाची झाली अन आता वाडा लहान पडु लागला. मग गावात एका घरात जिथे नुसत एक जोडपं रहात होतं, त्यांच्या माळीत(बाहेरची खोली) हा पंजा हलवला गेला. तरीही बाजुच्या गावातला मुसलमान त्याच्या पंजाला घेउन ह्या पंजाच्या भेटीला येउ लागला. आता इथे कुणी मुसलमान नव्हता उरला, मग गावातल्या माणसांनी आला सण साजरा करायचा या धबडग्या विचाराने तो पंजा उचलला अन नाचवला. काय एक दिवस करायला लागतयं तर करु. असेना का कुणाचा! असा उदार विचार करुन गावात चपात्यांचे लाडु करुन त्याला मलिदा म्हणुन गावाने खाल्ला.
अश्या पिढ्यांन मागे पिढ्या गेल्या. आन आली आमची पिढी.
तर मंडळी आता पर्यंत होती ती नमना आधीची घडाभर तेलाची घागर. मुळ कथा पुढे.
आता पर्यंत मारुती पुन्हा गावच्या वेशीला उभा र्हायला होता. त्याच काय झालं. तर पाटलांच्या घराण्यात पद्धतच पडुन गेली राव त्या तुळशी वृंदावनाला रोज पाणी घालायची.
आपल्यात हे एक बर असत, पुर्वजांनी केलं की आपण ते पुढ नेत रहायचं. आता एका तोंडची गोष्ट दुसर्याच्या कानावर गेली की तिला गावभरं व्हायला वेळ नाही लागत हे समिकरण धरुन मुळच्या माणसांनी काही गुपितं, तशीच राखली. असेल पुढच्यांची श्रद्धा तेव्हढ्या ताकदीची तर शोधतील आपल्या मनाने कारणं रुढींची! असा काहिसा खाक्या असावा. अन पुढच्या पिढीपर्यंत राह्यली श्रद्धा तर, अन पुढच्या पिढीला गरज असली श्रद्धेची तर, अन पुढची पिढी आपल्याच धर्माची जगली वाचली तर, अश्या सगळ्या अन ..अन ...तर न भारलेलं सगळ. उगा वादळात दिवा जपणं काही खायच काम नाही. जावे त्याच्या वंशा ..म्हणतात ते काही फुकाच नव्हे.
तर आजानं घातलं म्हणुन नातवानं घातलम, पणजा घालायचा म्हणुन पणतुनं वाहीलं, अस काय तरी घडत त्या वृंदावनावर रोज पाण्याची धार पडत राह्यली, एखादं वर्षी त्याची डागडुजी करायची राहुन गेली, अन त्यातुन ती भंगलेली मारुती रायाची मुर्ती सामोरी आली.
मग गावच्या श्रमदानानं एक साधसंच छप्पर का असेना पण उभारलं गेलं. अन मग आमच्या वेळेला तर सरळ सरळ घर असावं अस एक दोन खोल्यांच मंदिर तिथ कायमच होतं. मंदिराच्या मागच्या बाजुला आणखी थोडं बांधकाम करुन तिथं चांगली ताकात भिजवलेली लालभडक माती पसरली. चार दोन वस्तादांना गाठुन झाडपाला आणुन मिसळला अन सकाळ संध्याकाळ गावातली तरणी पोरं तिथं हुं हुं अशी जोर बैठका काढत घुमु लागली. मला वाटतय ह्या ब्रिटिश सरकारन पोलीस आणुन घात केला आपला. प्रत्येक गावात तालमित घुमुन घुमुन ही पोरं त्या त्या गावाच रक्षण करायचं आपल्या तरण्या खांद्यांवर घ्यायची. वडिलधार्यांच्या शब्दाखाली ते करुनही दाखवायची, अन रक्षणाची जबाबदारी उमजली की गावातल्या बायाबापड्यांकडे तिरकी नजर करुन बघायची लाजही वाटत असावी.
हे पोलीस आले अन ह्यांच्या खांद्यावरची जबाबदारी संपली. मग रिकामा न्हावी ...या न्यायान त्यांनी गावालाच तुंबड्या लावायला सुरवात केली. एकमेकाच्या कुरापती, उचापती या सार्याला भरपूर वेळ मिळायला लागला. अन जे काही घडेल ते पोलीसात जाउन सोडवलं जाउ लागलं. आता तो पोलीस झाला तिर्हाईत. त्याला काय कळं? नुकसान नाहीतर काय सांगा मला? जबाबदारी अंगावर पडली तर शहाणपण येतं बाबा. उगा पुस्तकात वाचुन थोडच सुधरतयं असलं समाजशास्त्र?
बरं ते ही जाउ दे. तर अश्या पद्धतीने गावचा मारुती पुन्हा वेशीला उभा राहिला. अजुन ही उभाच आहे, त्याच्या अंगावरल्या घणांच्या घावांत आता चुना भरलाय, अन दरवेळच्या नव्या शेंदराने त्या भेगा जरी उठुन दिसत नसल्या तरी त्या भेगा आहेतच. आता याच दु:ख मानुन घ्यायला आम्ही काय मायनॉरीटीवाले? आमच्या दु:खांना काही किंमत नाही. आता हे ही असोच. भेगाही असोच अन आमच दु:खही असोच.
(क्रमशः)
साऊ
प्रतिक्रिया
20 Mar 2013 - 4:44 am | साऊ
खुप दिवस मिसळपाव वाचत होते. मग इथले वाचुन आपणही आपले साधे अनुभव लिहु शकतो अस वाटलं. तरीही इथे लिहिणं सोप नव्हत. आवडल तर पुढचा भाग टाकेन.
20 Mar 2013 - 5:45 am | नगरीनिरंजन
दमदार आहे! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
20 Mar 2013 - 6:02 am | स्पंदना
बरच काही लिहिल आहे.
पण तरीही छान.
20 Mar 2013 - 7:42 am | ५० फक्त
खुप आवडलं, भाषेची बुज राखण्यात भावना थोड्या विस्कळल्य,पण पोहोचल्या त्याकाळचं एक चित्र उभं करु शकलात हे निश्चित.
20 Mar 2013 - 8:47 am | प्रचेतस
सुरुवात आश्वासक झालीय.
एकदम वेगळ्या धर्तीची कथा आवडलीय.
इथे मुघलांच्या ऐवजी आदिलशाही सैनिक किंवा तत्सम शब्द हवा.
ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कथा लिहिताना उल्लेख शक्य तितके अचूक हवेत.
20 Mar 2013 - 11:03 am | साऊ
मग मुघल कोणाला म्हणायच? मी मुसलमानांना मुघल म्हंटल ते चुकीचे आहे का?
20 Mar 2013 - 12:27 pm | प्रचेतस
मुघल हे वांशिक नाम आहे.
मुघल म्हणजे चंगीजखानाच्या मंगोलियन वंशापासून उत्क्रांत झालेले मूळचे तुर्की लोक.
हे दिल्लीचे राज्यकर्ते होते. उदा. बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औंरंगजेब इत्यादी.
तर पन्हाळ्याचा वेढ्याचा सिद्दी जोहर हा आदिलशाही सरदार होता. आदिलशाही घराणे हे बहमनी राजवटीतून फूटून निघाले. त्यांचे मूळ पर्शियन आहे.
बाकी हा सिद्दी जोहर मात्र अॅबिसिनियाचा (हबसाणातला) मूळचा निग्रो.
जरी हे सर्व मुस्लिम असले तरी त्यांचे वंश मात्र वेगवेगळे आहेत.
20 Mar 2013 - 12:53 pm | साऊ
धन्यवाद . मग काय म्हणु बहमनी म्हणु? की अफ्रिकी म्हणु? मोगल कस मस्त वाटत. असो
धन्यवाद.
20 Mar 2013 - 12:57 pm | प्रचेतस
इदिलशाही सैनिकच म्हणा ओ.
बाकी तुम्ही काहिही नाव दिले तरीही आमचे काहीही म्हणणे नाही हो.
शक्य तितकी अचूकता यावी म्हणून हा प्रपंच.
20 Mar 2013 - 4:03 pm | ५० फक्त
ओ वल्ली शेट, कथा लिहिताहेत ते, सभासदांची किंवा संपादकांचि बखर नाही,
लिहा हो तुम्ही, काय मुघल का काय ते, झाला तो बट्याबोळच ना, मग करणा-याच्या नावानं काय फरक पडतोय.
20 Mar 2013 - 8:59 am | शिद
मस्त...आन दो और भी...
पु.ले.शु.
20 Mar 2013 - 9:18 am | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे. आवडलं.
20 Mar 2013 - 9:59 am | मैत्र
थोडं वेगळं आहे आणि पहिला प्रयत्न उत्तम आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा! (पुलेशु)
20 Mar 2013 - 10:50 am | आतिवास
चांगलं लिहिलं आहे. विषय वेगळा आहे. थोडी भाषेच्या प्रवाहाची गडबड झाली आहे -पण तुमचा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घेतलं तर उत्तम सुरुवात आहे. पुढचा भाग नक्की लिहा.
20 Mar 2013 - 11:06 am | साऊ
नगरी निरंजन, aparna akshay, ५० फक्त, वल्ली, शिद, यशोधरा, मैत्र अन अतिवास प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
20 Mar 2013 - 11:11 am | मृत्युन्जय
कथेचा अजुन नीट्स अंदाज येत नाही आहे. पण ऐसपैस फुलवली आहे कथा हे मात्र नक्की. पुढे वाचायला नक्की आवडेल. पुलेशु.
अवांतरः आम्ही नवे आहोत. अजुन लिहिता येत नाही. शुद्ध लेखन अजुन जमत नाही. थोडेफार इंग्रजी शब्द (म्हणजे ५०- १००) चालायचेच, असे म्हणत पान पान भर हागुन ठेवलेल्या सदस्यांच्या मांदियाळीत तुम्ही उठुन दिसत आहात असे आनंदाने नमूद करु इच्छितो.
20 Mar 2013 - 11:29 am | प्रीत-मोहर
+११
20 Mar 2013 - 11:42 am | आदूबाळ
छान लिहिली आहे.
भाषेचा लहेजा मस्त जमलाय!
मृत्युंजय यांच्या प्रतिसादासारखंच अजून एक सांगू का हो - इतक्या छान कथेत शुद्धलेखनही तितकंच अचूक हवं. उत्तम जमलेल्या वांग्याच्या भाजीतला मसाला थोडा पुढे आल्यासारखं वाटलं.
20 Mar 2013 - 11:54 am | बॅटमॅन
उत्तम वर्णनशैली. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. आणि सिद्दी जौहरच्या वेळेस हल्ला करणारे आदिलशाही सैनिक होते, मुघल नव्हते.
20 Mar 2013 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
विषय वेगळ्या अंगाने हाताळलाय... अशा विषयासंबद्धी लिहिताना जो भडकपणा, आक्रस्ताळेपणा सहजपणे येतो, तो टाळलाय हे फार आवडले. तरी सुद्धा भावना मात्र पुरेपूर पोचल्या, हे विशेष. भाषा काय जसे अजून लिहाल तसतशी विकसित होइलच. भावना पोचवणे जास्त महत्वाचे.
पुलेशु आणि पुभाप्र.
20 Mar 2013 - 1:36 pm | सानिकास्वप्निल
वाचत आहे
पुभाप्र :)
20 Mar 2013 - 2:36 pm | स्मिता.
सुरुवात आवडली आणि कथेबद्दल आशाही निर्माण झालीये. पुभाप्र.
20 Mar 2013 - 2:56 pm | नन्दादीप
मस्त लिहीलय..... छान जमलाय पहिलाच भाग...
पुढील भागास शुभेच्छा.....
20 Mar 2013 - 4:21 pm | श्रावण मोडक
लिहा. वाचतोय...
20 Mar 2013 - 4:29 pm | रेवती
वाचतिये. सुरुवात आवडली.
20 Mar 2013 - 5:03 pm | किसन शिंदे
कथेची सुरूवात तर मस्तंच आहे. पुढचा भाग लवकर टाका.
20 Mar 2013 - 5:50 pm | मदनबाण
लेखन फार आवडले. :) और भी आने दो.
20 Mar 2013 - 10:43 pm | पैसा
पुढचा भाग येऊ द्या लवकर!
21 Mar 2013 - 4:53 am | इष्टुर फाकडा
गोनीदा गोनीदा .....भेटूया एकदा :)
22 Mar 2013 - 7:52 am | धमाल मुलगा
वट्ट कोल्लापुरी लहेजा जाणवतोय गा. :)
भारी लिहिताय! येऊ द्या पुढचे भाग. वाचतोय आम्ही. :)
22 Mar 2013 - 10:17 am | तिमा
पहिलंच लेखन आणि बाजी मारलीत हो! येऊ द्या पुढचा भाग.