मेसोअमेरिका(६) - आस्तेक

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
13 Jan 2013 - 6:57 am

छोट्या विश्रांतीनंतर मेसोअमेरिका पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील मागचा भाग -
मेसोअमेरिका(५) - तोल्तेक(Artisan)

***

सन १५१९. नवीन प्रदेशाच्या शोधार्थ निघालेल्या धाडसी स्पॅनिश सैनिकांनी आपल्या क्युबन वसाहतीतून मेक्सिकोच्या दिशेने कूच करण्यास प्रारंभ केला. या सैन्याने Popocatepetl पर्वताच्या बर्फाच्छादीत रांगा ओलांडताच क्षणी त्यांना समोर अद्भभूत नजारा दिसू लागला. छोट्या छोट्या तलावांच्या आसपास बांधलेल्या आखीवरेखीव वसाहती, त्यांना मधूनचं छेदणारे रस्ते, छोटी छोटी तळी आणि त्यावर बांधलेले पूल. या भूमीत पाउल ठेवण्याआधी स्पॅनिश सैन्याला इथल्या मूळ निवासी जमातीबद्दल थोडंफार ऐकीव ज्ञान होतं पण उंचावरून समोर दिसणारा नजारा अचंबित करणारा होता. स्पॅनिश सैन्याला अचंबित करणारी ही भूमी होती लढवय्या आस्तेकांची.

https://lh6.googleusercontent.com/-m-il6rF5mPY/UOkr9WknA2I/AAAAAAAAAgw/ESLZqRYqY8I/s713/Tenochtitlan.gif

आस्तेकांनी जगाला अनेक वस्तुंची ओळख करून दिली. त्यांनी जगाला मका, तंबाकू, मिरची, रबर, कोको दिला. आस्तेकांच्या नौवात्ल भाषेत कोको म्हणजे 'चोकोलात्ल'. आस्तेक राजा कोकोची पूड आणि डिंक पाण्यात मिसळून पीत असे. यातूनच पुढे चॉकोलेट तयार झालं. मेक्सिकोच्या आसपास सापडणाऱ्या 'सापोदिल्ला' नावाच्या झाडाचा चिक तोंडात घोळवत रहायची आस्तेकंना सवय होती. अमेरिकेबरोबर झालेल्या एका लढाईत मेक्सिकन जनरल Antonio de Santa Anna ने या चिकाचा नमुना अमेरिकन फोटोग्राफर आणि व्यावसायिक Thomas Adams ला दिला आणि त्यातूनच पुढे च्युइंगमचा जन्म झाला.

या मालिकेतील काही लेख मेसोअमेरिकन भूमीवरील मायांइतकेच किंबहुना त्याहून काकणभर सरस अशा आस्तेकांबद्दल.

आस्तेकांचा इतिहास बर्‍याच प्रमाणात सविस्तर लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. बरीचशी माहिती स्पॅनिशांनी आस्तेकांचं राज्य काबीज केल्यावर लिहून ठेवलेली आहे. काही आस्तेक ग्रंथ, हस्तलिखितं उपलब्ध आहेत ती चित्ररूपात आहेत. या हस्तलिखितांमधील महत्त्वाचं हस्तलिखित म्हणजे Codex Mendoza. इ.स १५२५ मध्ये पहिला स्पॅनिश व्हॉइसरॉय Don Antonio Mendoza याने प्रमाणित केलं. त्यात चित्ररूपात आस्तेक राज्यांबद्दल सविस्तर माहिती आहे.

साधारण १६ व्या शतकात लिहील गेलेलं Codex Aubin आणि Code xolotl, १७ व्या शतकात Fernanado de Alva Ixtlilxochitl या इतिहासकाराने संग्रहित केलेली माहिती, तसंच १५६९ साली बारा भागात पूर्ण झालेलं Friar Bernardino de sahagin या स्पॅनिश धर्मगुरू लिखित ‘General History of the thing of New Spain ‘ अशा अनेक ग्रंथात आस्तेक समाजजीवनाची माहिती संकलित केली आहे. Bernardino चा शिष्य Churchman Diego Duran याने पुढे 'Indies of New Spain, book of Gods and Rites and the ancient Calendar’ या ग्रंथांचं लेखन केलं. स्पॅनिश सेनानी अर्नान कोर्तेसने त्याकाळी केलेला पत्रव्यवहार यातून अस्तेकांबद्दल अधिक माहिती उपलब्ध होते.

आस्तेकांना त्यांच्या नौवात्ल भाषेत तीन नावं आहेत. 'आस्तेक' हे नाव त्यांना बहुतेक त्यांच्या मूळ भूमी ‘Aztlan’ यावरून मिळालं असावं. त्यांना 'मेहिका' असंही संबोधतात. अभ्यासकांच्या मते त्यांच्या अनेक देवांपैकी हे एक नावं असावं. 'तेनोच' या आस्तेक राजाच्या नावावरून त्यांना Tenochca असंही म्हणतात. आस्तेक स्वत:ला मेहीका म्हणत आणि त्यावरून ते रहात असलेल्या भागाला आपण आज मेक्सिको सिटी (Mexico स्पॅनिश उच्चार मेहिको [१]) म्हणून ओळखतो. साधारणपणे १८ व्या शतकाच्या सुमारास अभ्यासकांनी 'आस्तेक' हे नाव इतिहासात वापरायला सुरवात केली.

आस्तेक – इ.स. च्या १३ व्या शतकात उत्तरेकडून काही पोटार्थी टोळ्या दक्षिणेकडे स्थलांतरीत झाल्या. त्यांच्या या स्थलांतरामागच एक मुख्य कारण म्हणजे त्यांचा देव व्हीत्सोलोपोचीत्ली (Huitzilopochtli) म्हणजेच सूर्य. आस्तेक हे सुर्यपूजक. आस्तेक समजुतीनुसार आजवर पाच सूर्य झाले. त्यातले चार सूर्य इतर देवांशी लढताना नाश पावले. आताचा सूर्य हा पाचवा सूर्य आणि त्याचं रक्षण करणं हे आद्यकर्तव्य. सूर्याच्या रक्षणासाठी अनेक विधी करावे लागत त्यासाठी त्यांना स्वत:चं राज्य आवश्यक होतं.

आस्तेक राज्य स्थापन करण्यासाठी योग्य जागेच्या शोधात होते. त्यासाठी धर्मगुरुंच्या आज्ञेनुसार निवडुंगाच्या झाडावर जिथे गरुड साप खात बसला असेल अशी जागा शोधण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांना हवी तशी योग्य जागा दक्षिणेत एका पठारावर सापडली. पण त्या पठारावर आधीच वस्ती होती. शूर आस्तेकांनी या मूळ लोकांशी युद्ध करून त्यांना हरवले आणि शेवटी या स्थानिक लोकांनी आस्तेकांना जवळच असलेल्या ‘तेहकोको’ सरोवरात एक बेट देऊ केलं.

https://lh6.googleusercontent.com/-JWasqs_p9J8/UO5Saw_EJiI/AAAAAAAAAhs/5J4JDjLlqWs/s512/astek-symbol.jpeg

(Codex Mendonza मधलं निवडुंगाच्या झाडावर गरुड साप खात बसलेल्या तेहाकोको बेटाचं चित्रण.)

मेक्सिकोने पुढे याच चिन्हाला आपल्या राष्ट्रध्वजावर स्थान दिलं. आस्तेकांना मिळालेलं हे बेट खडकाळ, निवडूंगाने भरलेलं होतं. आस्तेकांनी तिथे आपली वसाहत उभारली आणि या भागाचं नाव त्यांनी "तेनिच्तीत्लान" (तेनोच = आस्तेक गुरु व तीत्लान = निवडुंग) असं ठेवलं. हळूहळू आस्तेकांनी आपलं राज्य स्थापन केलं आणि खडकाळ जमिनीला आपली राजधानी बनवली. खडकाळ अशा या प्रदेशात मोठ्या कष्टाने त्यांनी सुंदर रस्ते बांधले. मंदिर, राजवाडे, पूल, बंधारे, पिरॅमिडस बांधून काढले. स्पॅनिश सैन्याने पर्वतराजीतून पाहिलेलं हेच ते नयनरम्य तेनोचीत्त्लान शहर. पोटार्थी आस्तेकांनी खडकाळ अशा बेटाचा खुबीने कसा कायापालट केला ते पाहू.

आस्तेकांनी तेनिच्तीत्लान या खडकाळ बेटावर वसाहत तर उभी केली पण मेसोमेरिकन भूमीवरील अनेक जमातींप्रमाणे आस्तेकांजवळ ना ओझं वाहणारे प्राणी (घोडे,हत्ती) होते ना शेतीसाठी लागणारी हत्यारं. चाकाची माहिती असूनही, चाक सूर्य चंद्रासरखं गोल असल्या कारणाने त्याचा वापर करण त्यांनी टाळलं. आस्तेकांकडची हत्यारं अतिशय प्राथमिक स्वरुपाची. आता अशा या प्राथमिक स्वरूपाच्या हत्याराच्या सहाय्याने अत्यंत खडकाळ व कठीण अशी जमीन खोदणं हे जिकिरीचं काम. यामुळे आस्तेकांनी शेतीची नवीन पद्धत अंमलात आणली. तिला Chinampa असं संबोधलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं तर Chinampa हे मानवनिर्मित कृत्रिम बेटं होती. शहराबाहेर असलेल्या तलावात साधारण २०० मीटर लांब बांबूच्या टोपल्या ते बनवत. या टोपल्या मातीने भरून टाकत. त्या तळाला जाऊन हळूहळू ती जागा मातीने भरून जाई व जमीन तयार होत असे. प्रत्येक Chinampa म्हणजे छोटा आयताकृती पट्टी असे. साधारणतः खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे.

https://lh3.googleusercontent.com/-fm68Zr6QOcE/UOkr9cyklLI/AAAAAAAAAgs/SbKN_VGFh7g/s300/chinampa.jpg

छोटे Chinampa साधारणपणे ५ X ५० फूट आकाराचे बनवले जात परंतु बरेचसे Chinampa हे ३०० फुट लांब व १५ ते ३० फुट रुंद असत. या Chinampa वर बांबूच्या गवती घरात शेतकरी रहात असे. काही Chinampa एका ठिकाणावरून दुसरीकडे नेता यावे यासाठी लाकडी होडीवर बांधले जात.

Codex Mendoza

Chinampa बनवण्यासाठी सर्वप्रथम बांबूच्या तराफावर चिखलाचा थर दिला जाई. हा थर कडक झाल्यावर आयताकृती कापून त्यात बिया पेरण्यासाठी छोटी छोटी छिद्रे करीत. पाळीव जनावरे नसल्यामुळे प्राण्यांची विष्ठा खत म्हणून वापरता येत नसली तरी शहरातल्या शौचालयातून मानवी विष्ठा गोळा करून शेतकऱ्यांना विकण्यात येत असे. प्रत्येक पिकासाठी पेरणीचा कालावधी अशा रीतीने ठरवलेला असे की Chinampa वर्षभर कार्यरत असत.

https://lh5.googleusercontent.com/-HhjVm7BPJ_E/UPDbypcuWLI/AAAAAAAAAik/Z_IJ3_Jr1tE/s512/chinampa-map.jpg

१६ व्या शतकातला हा नकाशा तेनिच्तीत्लान या शहराचा एक भाग आहे. या नकाशात अतिशय प्रमाणबद्ध असे Chinampa, त्यांच्या मालकांची चित्रलिपीत लिहिलेली नावं दिसतील. या नकाशात जवळजवळ ४०० Chinampa आहेत. मधोमध कालव्याने विभागला गेला असून महत्त्वाचे कालवे नागमोडी रेषांनी तर कालव्यांच्या कडेचे रस्ते पाउलखुणांनी दर्शविलेले आहेत. प्रत्येक घराच्या आसपास साधारणपणे ६-८ Chinampa असत. एक chinampa बांधायला साधारपणे १०-१५ लोकांची गरज लागे.

आस्तेकांनी अशी छोटी छोटी अनेक बेटं शहराभोवती बांधली. ही बेटं कालव्यांमार्फत मुख्य शहरांना जोडलेली असत. यात वर्षातून वेगवेगळी पिके घेत असत. एका अर्थाने त्यांची ही तरंगती शेतीच होती. शहराभोवती खोदलेले असंख्य कालवे आणि त्यात तरंगणाऱ्या होड्या पाहून कोर्तेसने या शहराची तुलना व्हेनिसची केली होती.

या Chinampa मध्ये मुख्यत्वे घेतलं पिकं म्हणजे 'मका'. साधारणपणे मार्च ते मे या काळात मक्याची पेरणी करण्यात येई. आदल्या वर्षीच्या पिकामधून चांगल्या प्रतीचे बियाणे बाजूला पेरणीसाठी काढून ठेवण्यात येई. पेरणीच्या वेळी या बिया देवळात नेउन Chicomecoalt या मक्याच्या देवीला दाखवण्यात येत. त्यानंतर या बिया २ ते ३ दिवस पाण्यात भिजवून पेरत असत. याच काळात पेरणीआधी शेतकरी काठीने जमीन उकरून काढित आणि छोटी छोटी छिद्रे बनवीत. या छिद्रात बिया पेरून छिद्र बंद केली जात.

शेतकरी Chinampa वर एका छोट्या आयताकृती झोपडीत रहात. ही घर मातीची असत. आणि त्यांचा वापर मुख्यत्वे जेवण्यासाठी व झोपण्यासाठी करीत. घरात रोजच्या वापराच्या वस्तू जसे झाडू, जमीन खोदण्याची काठी, बिया ठेवण्याच्या टोपल्या, स्वयंपाक घरात वापरण्यात येणारी भांडी, मका दळण्यासाठी दगड असे. प्रत्येक घरात देवाच्या मूर्ती असत.

https://lh4.googleusercontent.com/-jwdFDge2n0c/UPEPNVhlYXI/AAAAAAAAAjA/rzatDGHi0DA/s705/astek_tortilla.gif

एका कोपऱ्यात तीन दगडाच्या चुलीवर मक्याच्या भाकऱ्या (tortilla) भाजल्या जात. त्या भाजण्यासाठी मातीच्या तव्याचा उपयोग केला जाई. जळणासाठी सुकलेली पानं, निवडुंग, मक्याची सालं वापरत. पोटापाण्यासाठी आस्तेक शेतीबरोबर मासेमारी करीत.

क्रमश:

मेक्सिकोचा राष्ट्रध्वज(मधोमध आस्तेकांचं चिन्ह ) :

https://lh3.googleusercontent.com/-wJWfePiaDwo/UPHzi3cCjxI/AAAAAAAAAjc/cMagjgdLXAw/s622/banderamexico.jpg

चिकूसारखं दिसणारं सापोदिल्लाचं फळं :

https://lh4.googleusercontent.com/-ZpGsKuayW2I/UPHzrv1Q1rI/AAAAAAAAAjw/I47j2jGdyg8/s200/sapodilla_191445.jpg

जमीन खोद्ण्यासाठी वापरण्यात येणारी काठी. या काठीचा वापर कुदळीसारखा केला जाई.
https://lh3.googleusercontent.com/-zb23p--MeFQ/UPDZdactURI/AAAAAAAAAiI/avJmr2GxQJc/s250/astek_diggin_stick.jpg

***

टिपा :

१] मेक्सिको - स्पॅनिश उच्चार मेहिको. स्पॅनिशमध्ये 'X' चा उच्चार 'ह' होतो.

संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व : मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Everyday Life of Aztecs - Warwick Bray
३) Lost Civilization (Parragon Books)
४) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
५) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

13 Jan 2013 - 7:37 am | श्रीरंग_जोशी

सदर लेखामधील चित्रे फारच आकर्षक आहेत वर्णन देखील रोचक वाटले.

पु.भा.प्र.

चेतन's picture

13 Jan 2013 - 12:48 pm | चेतन

लेख रोचक.

तिमा's picture

13 Jan 2013 - 2:09 pm | तिमा

तुमचा लेख पाहून आनंद झाला. लेख व चित्रे आवडली. लिहित रहा.

पैसा's picture

13 Jan 2013 - 5:39 pm | पैसा

बरेच दिवसांनी छान माहितीपूर्ण लेख!

मुक्त विहारि's picture

13 Jan 2013 - 10:03 pm | मुक्त विहारि

अतिशय उत्तम लेख..

अभ्या..'s picture

13 Jan 2013 - 10:48 pm | अभ्या..

खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख. चित्रांचा सुध्दा उत्तम उपयोग.
अवांतरः सन फार्मास्युटिकलने त्यांच्या कुटुंबातल्या उपकंपन्यांना सूर्यपूजक जमातींची नावे दिली आहेत त्यातले अ‍ॅझटेक आठवले.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2013 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा

खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख. चित्रांचा सुध्दा उत्तम उपयोग.>>> +१

अवांतरः सन फार्मास्युटिकलने त्यांच्या कुटुंबातल्या उपकंपन्यांना सूर्यपूजक जमातींची नावे दिली आहेत त्यातले अ‍ॅझटेक आठवले.

अशी भानगड आहे होय... एक अ‍ॅझटेक सॉफ्टवेअर पण आहे ना - पण ती काही सन फार्माची लेकावळी नसावी.

कवितानागेश's picture

14 Jan 2013 - 12:03 am | कवितानागेश

अत्यंत आवडता विषय आणि सुंदर लेख.
धन्यवाद. :)
पुढचे लेख लवकर लवकर येउ देत.

अनन्न्या's picture

14 Jan 2013 - 12:05 am | अनन्न्या

सुंदर संकलन!!

५० फक्त's picture

14 Jan 2013 - 7:53 am | ५० फक्त

खुप सुंदर लेख. धन्यवाद.

आधीच्या लेखांसारखाच छान लेख. आवडला.

Keanu's picture

18 Jan 2013 - 8:00 am | Keanu

माहितीपूर्ण लेख.

खूपच रोचक माहिती आहे ह्या लेखमालिकेमध्ये..

- पिंगू

किलमाऊस्की's picture

18 Jan 2013 - 11:38 pm | किलमाऊस्की

या मालिकेतील पुढचा लेख : मेसोअमेरिका (६.१) - आस्तेक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2013 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय माहितीपूर्ण असं लेखन. वाचतोय.लेखातील चित्रांमुळे लेख अधिक वाचनीय होतो. धन्स.

-दिलीप बिरुटे