मेसोअमेरिका(५) - तोल्तेक(Artisan)

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
17 Sep 2012 - 7:35 pm

मेसोअमेरिका(४.४) - माया (The Artist)

मायन्सच्या र्‍हासानंतर मेसोअमेरीकेच्या वायव्येस उदयास आलेली अजून एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे 'तोल्तेक'. नौवात्ल भाषेतील "Tollan" या शब्दावरून "तोल्तेक" हा शब्द बनला असावा. तोल्तेक या शब्दाचा अर्थ Artist. हे लोक मेक्सिकोच्या आसपास नक्की कुठून आले याची ठोस माहिती इतिहासात नसली तरी बहुतेक दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात या लोकांची वस्ती असावी. तशी एकूणच तोल्तेकांबद्द्ल फार कमी माहीती उपलब्ध आहे.

तोल्तेकांचं वास्तव्य मुख्यत्वे नकाशात असलेल्या भागात होतं :

साधारण इ.स. ९०० च्या सुमारास मायन्सच्या र्‍हासानंतर मेक्सिकोच्या वायव्येस पसरलेल्या काही संस्कृती प्रबळ होऊ लागल्या. यातूनच जन्म झालेली एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे "तोल्तेक". इतिहासात तोल्तेकांचा काळ साधारणपणे इ.स. ८०० - १००० मानला जातो. तोल्तेकांचा पहिला राजा Mixcoal. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा 'तोपित्ल्झीन ' (Topiltizin) हा तोल्तेकांचा राजा आणि धर्मगुरू झाला. "तोपित्ल्झीन" हा शांतताप्रिय आणि केत्झ्ल्कोत्ल (Quetzalcoatl) या देवाचा एकनिष्ठ उपासक. Topiltizin राजाच्या कल्पनेतून निर्माण झालेलं तुला हे शहर तोल्तेक राजधानी. सध्या ती मेक्सिकोच्या State of Hidalgo या राज्यात आहे.

केत्झ्ल्कोत्ल :

त्याकाळी केत्झ्ल्कोत्ल हा महत्त्वाचा देव असला तरी Tezcatlipoca नावाच्या अजून एक लढाऊ देवाची उपासना चाले. या दोन देवांच्या उपसाकांमध्ये आपापसात वैर होतं. त्यांच्या आपापसात बरेचदा लढाया होतं. अशाच एका लढाईत अखेर तोपित्ल्झीन राजाचा पराभव झाला आणि त्याला आपल राज्य सोडावं लागलं. त्याची आख्यायिका अशी की राजाने नाईलाजाने राज्य सोडलं. त्याने सापांचा तराफा केला आणि समुद्रामार्गे पूर्वेस पळून गेला. पण जाताना "मी नाईलाजाने जात असलो तरी भविष्यात परत येईन आणि माझं राज्य काबीज करेन" असं आश्वासन प्रजेला दिलं. पुढील कित्येक पिढ्या या आख्यायीकेचा प्रभाव लोकांवर होता. पुढच्या अनेक राजांनी तोपित्ल्झीनची वाट पाहिली. या घटनेनंतर बर्‍याच वर्षांनी स्पॅनिश सेनानी अर्नान कोर्तेसने याच आख्यायिकेचा वापर आस्तेक राजा माँतेझुमाविरुद्ध पुरेपूर वापर करून घेतला.

तोल्तेक राजधानी तुला :

तुला शहरांचं वैशिट्य म्हणजे अटलांटिसचे भव्य पुतळे. हे सैनिकी वेशातले पुतळे नक्की कुणाचे आहेत याची ठोस माहिती नाही पण या पुतळ्यांना केत्झ्ल्कोत्ल या देवाचं प्रतिक मानलं जातं.

अटलांटिसचे पुतळे :

तोल्तेक लढाऊ होतेच परंतु त्यांचे समकालीन मायन्स बरोबर व्यापारी संबध असल्याचे बरेच पुरावे तुला आणि चिचेन इत्झा या दोन शहरामध्ये मिळाले आहेत. साधारणपणे बिन्स, कोको, मश्रुम, मिरच्या या वस्तुंचा व्यापार चाले.

तोल्तेकांचा कालखंड माया व आस्तेकांएवढा मोठा नसला तरी त्यांनी आस्तेकांच्या बर्‍याच गोष्टींवर त्यांचा प्रभाव जाणवून येतो. तोल्तेकांनी शेतीसाठी नवनवीन सिंचनाच्या पदधती शोधून काढल्या. डोंगराळ भागात पायर्‍या पायर्‍यांनी चर खणून शेती करण्याची पद्धत मेसोअमेरिका प्रांतात तोल्तेकांनी सर्वप्रथम विकसित केली. अनेक औषधी वनस्पतींचं ज्ञान तोल्तेकांना होतं.

तोल्तेकांना कोरफाडीसारख्या दिसणार्‍या Maguey पासून बनवलं जाणारं मेक्सीकन पारंपारिक पेय Pulque चे जनक मानलं जातं.

Pulque :

तोपित्ल्झीन राजाने तुला सोडल्यानंतर, तुला जिंकलेल्या क्रूर लोकांनी सैनिकी अंमल आणला. जिंकलेल्या प्रदेशातल्या लोकांकडून खंडणीच्या रूपात वस्तू लुटायला चालू केलं. युद्ध्कैद्यांना बळी द्यायची प्रथा चालू केली. हीच प्रथा तोल्तेकांकडून आस्तेकांनी उचलली.

साधारण ११ व्या शतकाच्या सुमारास आलेल्या अवर्षणामुळे तुला ओस पडू लागलं. इतर टोळ्यांकडून होणार्‍या हल्ल्यांमुळे ते अधिकच कमकुवत बनलं. साधारण इ.स. ११९० मध्ये ते पूर्णपणे नेस्तनाबूत झालं. तोल्तेकांनंतर आलेल्या आस्तेकांनी तुलाचे काही भाग वापरले

फारशी माहिती उपलब्ध नसली आणि तोल्तेकांचा कालखंड जरी फार नसला तरी आस्तेक परंपरांवर त्यांचा प्रभाव पहाता तोल्तेकांचं योगदान खचितच मोठं आहे.

पुढच्या भागात : आस्तेक

वृद्ध स्त्री पारंपारिक पेय Pulque पिताना :

कोरफाडीसारखं दिसणारं Maguey :

तोल्तेक कलाकारीचा नमुना :

***
संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व : मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Ancient Wisdoms - Gayle Redfern
३) Lost Civilization (Parragon Books)
४) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
५) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Sep 2012 - 6:14 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे..

कवितानागेश's picture

20 Sep 2012 - 11:37 pm | कवितानागेश

छान. :)

शिल्पा ब's picture

21 Sep 2012 - 11:13 am | शिल्पा ब

आवडेश.