मी बाई होते म्हणुनी.... भाग ०२

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
18 Dec 2012 - 12:02 am

मी बाई होते म्हणुनी.... भाग ०१ - http://www.misalpav.com/node/23333

भाग - ०२

दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा, मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली भीती काय अशी जाते काय छे...

पुढं -...

एक दिवस आम्ही मैत्रिणिंसोबत बसलो होतो बोलत तेंव्हा त्या खोलीबद्दल बोलणं चाललं होतं, माझी एक मैत्रिण जिचे बाबा आमच्या गावातले मोठे तालेवार सोनार होते, ती म्हणाली की ' अगं माझे बाबा सांगत होते, तुझ्या काकांनी एक मोठा चौरंग सोन्यानं मढवुन घेतला आहे आणि जेंव्हा पासुन तो चौरंग त्यांनी तुमच्या वाड्यावर पाठ्वुन दिला त्यानंतर तो बाहेर कधीच दिसला नाही तुमच्या घरात पुन्हा, तोच असेल तिथं त्या खोलीत ? मला तरी असा एखादा खुप मोठा चौरंग घरात कधी पाहिल्याचं आठवत नाही आणि तो देखील सोन्यानं मढवलेला तर मुळीच नाही, कारण सोन्या-चांदीची तशी कमतरता नाहीच आमच्याकडे. अगदी दररोजची जेवणाची ताटं सुद्धा चांदीची आहेत. मी ताईकडं पाहिलं,ती सुद्धा गप्पच होती म्हणजे तिला सुद्धा त्या चौरंगाबद्दल काही माहित नव्हतं. म्हणजे त्या खोलीत नक्कीच तो चौरंग असणार.

आणि अशातच एके दिवशी सकाळी स्वयंपाकघरात काम करत असताना ती बातमी कळाली, अजुन सहा दिवसांनी ती खोली उघडणार असल्याची. माझी पाच रात्रींची झोप उडाली. त्या दिवशी सगळ्या घरात एकच धामधुम होती,कितीतरी लोकं आली होती. आज ब्राम्हण सुद्धा खुप जास्त होते, देवघराच्या बाहेर त्या खोलीच्या मागे एक मोठा मंडप घातला होता तिथं कसलं तरी हवन चालु होतं पहाटेपासुनच. एकंदर सगळं शुभ वातावरण होतं, माझ्या मनात मात्र कुठंतरी दाटलेली भीती परत परत वेडावुन दाखवत होती. ताईला काही बोलणं शक्यच नव्हतं, तिला सगळ्यात जास्त आनंद झाला होता, मी दोन्ही धाकट्या बहिणिंना बोलुन दाखवलं तसं, त्यांची अवस्था देखील माझ्यापेक्षा फार वेगळी नव्हती. उत्सुकता आणि भीतीच्या सावल्या त्यांच्या चेह-यावर आलटुन पालटुन दिसत होत्या.

त्या खोलीत काय असेल याबद्दल आम्ही बरेच अंदाज बांधलेले होते, त्यांची सत्यासत्यता तपासुन पाहायची होती. आमच्या घरातल्या पुरुषांना त्या खोलीत काय आहे याची कल्पना होतीच पण बायका कधी त्या खोलीत गेल्याचं ऐकलं देखील नव्हतं, आई आणि काकु तर त्या खोलीचा विषय निघाला की गप्प गप्प राहायच्या. आमच्या मैत्रिणिंकडुन काही अर्ध्या मुर्ध्या गोष्टी कानावर येत होत्या पण त्याबद्दल देखील आई किंवा काकुकडं बोलणं शक्य नव्हतं. एक शक्यता त्या चौरंगाची होती, पण कशासाठी असेल तो चौरंग आणि काय असेल त्यावर, एखाद्या देवाची प्रतिमा की आमच्या कुलदेवतेच्या विशिष्ट पुजेसाठी तो चौरंग बनवलेला असेल काय माहित.

सुर्य पुर्ण माथ्यावर येइस्तोवर पुजाअर्चा, हवनं चालु होती, मग नैवेदय झाले आणि तो क्षण आला, दोन तीन ब्राम्हणांनी मोठ मोठ्यानं मंत्र म्हणत त्या बंद दरवाज्यवरच्या प्रतिमेची पुजा केली आणि मग काकांनी ती प्रतिमा त्या दरवाज्यावरुन बाजुला केली. खोलीच्या दरवाज्यावर त्या प्रतिमेमागचा भाग तेवढा स्वच्छ राहिला होता, आणि प्रतिमेला वाहिलेल्या कुंकुवामुळं एक लाल चौकट तिथं तयार झालेली होती, अशी चौकट जिच्यातुन बाहेर पडणं अवघड असतं,काकांनी मागं सरकुन त्या दरवाज्याला साष्टांग दंड्वत घातला अन उठता उठता खांद्यावरचं उपरणं काढुन कमरेवर बांधुन घेतलं घट्ट, बायकांच्या बाजुला सगळ्यात पुढं काकु, आई होत्या, त्यमागं ताई अन मी ताईच्या मागं उभी होते. ती विस्फारल्या डोळ्यांनी सगळं पाहात होती तर मी डोळे किलकिलेच केलेले होते. काकांनी दोन्ही हात उंचावुन सुर्यदेवाच्या स्तुतीचे मंत्र म्हणले, मग दोन्ही हात छातीवर घट्ट नमस्कारात धरुन शिवस्तुतीचे एक दोन मंत्र म्हणले आणि मग आपल्या बलदंड हातांनी ते दार आत ढकललं.

दार उघडता क्षणी एक वेगळाच वास तिथं भरुन राहिला , दोन ब्राम्हण दोन समया घेउन आत गेले आणि क्षणार्धात ती खोली प्रकाशानं भरुन गेली. त्या खोलीत दोन वस्तु होत्या व्यवस्थित कापडानं गुंडाळुन ठेवलेल्या. आणि त्या दोन्ही एका मोठ्या चौरंगावर ठेवलेल्या होत्या. तोच तो सोन्यानं मढवलेला चौरंग, वरुन मोठं कापड पांघरलेलं असलं तरी त्याचे पाय दिसत होते खाली मोकळे आणि त्यावरुन अंदाज येत होता तो किती मोठा असेल याचा. आत जाउन ब्राम्हणांनी समया खाली ठेवल्या आणि बाहेर येउन पुजेचं ताट घेउन आत गेले, काका आणि बाबा त्या खोलीच्या उंब-याला नमस्कार करुन आत गेले आणि त्या चौरंगावरचं कापड बाजुला केलं. त्या चौरंगावर पुढच्या बाजुला एक लाकडी पेटी होती, खुप छान नक्षीकाम केलेली. पेटीचा आकार देखील मोठा होता जवळ्पास दोन हात लांब आणि एक हात रुंद होती ती पेटी, उंचीला देखील दोन हात उंच होती. काका आणि बाबांनी त्या चौरंगावरच्या दोन्ही वस्तुंना नमस्कार केला, ब्राम्हणांचं अनुक्रमे भुमिस्तवन आणि शिवस्तुती म्हणणं चालु होतं. त्या पेटीची पुजा केल्यानंतर, काका आणि बाबा मागच्या बाजुला गेले, तिथं काय आहे ते बाहेरुन दिसत नव्हतं.

पुजा झाल्यावर दोन्ही ब्राम्हण बाहेर आले, अजुन दोन समया खोलीत ठेवुन परत बाहेर आले, आतुन बाबांची हाक आल्यावर आम्ही सगळ्या बायका आत गेलो, तो उंबरा ओलांडतानाच मला एवढी भीती वाटत होती की मी ताईचा हात घट्ट पकडला, पण तिनं एका झटक्यानं तो बाजुला केला आणि चटकन आत गेली. दोन क्षण मी त्या उंब-यावरच घुटमळले, नाईलाज होता म्हणुन पाय आत टाकले. चार समयांच्या उजेडात ती खोली प्रकाशित झालेली होती, समोरचा सोन्यानं मढवलेला चौरंग झळाळुन निघाला होता, मी आत येताच बाबांनी दरवाजा बंद केला. आता खोलीत आम्ही आठच जण होतो आणि समोरच्या चौरंगावर ठेवलेली ती भलीमोठी पेटी आणि त्यामागं काय होतं ते मलातरी अजुन दिसलं नव्हतं. एक तर मी अजुन सुद्धा चौरंगापासुन बरीच लांब होते आणि त्यावरचं कापड अजुन तसंच होतं. सगळ्याजणी बाबांच्या बाजुला जाउन उभारल्यावर लक्षात आलं की मी एकटीच आहे एका बाजुला उभी असलेली, स्वेच्छेनं की बाकीच्यांनी मला एकटं सोडलं म्हणुन, पण अशा विचारांवर मनातल्या भीतीनं कधीच मात केली होती.

मी आता काकु आणि आईच्या मागं उभी होते, आणि समोर चौरंगाच्या दुस-या बाजुला काका आणि ताई उभे होते. ताईनं काकांकडे पाहिलं, तिच्या नजरेनंच परवानगी मागितली अन काकांनी डोळ्यांनीच हो म्हणलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, मी एकदम चमकले, काकुकडं पाहिलं ति देखील रडत होती, आई पण,बाबा पण. अरे पण का,का रडत आहेत सगळे, काही कळेना. विस्फारल्या नजरेनं जे होतंय ते पाहात राहिले. ताई पुढं आली तिनं त्या पेटीला नमस्कार केला अन ती उघडली, काही क्षण ती तशीच बसुन होती त्या पेटीसमोर, एकदम तिनं काकुला विचारलं ' खरंच या पेटीतच होते मी, अगदी खरं ना, का थट्टा करताय तुम्ही सगळे माझी? ' काकांनी निशब्द मान हलवली, काकु पटकन पुढं होउन ताईकडं गेली, तिला उठवुन आपल्या मिठित घेत म्हणाली ' होय बाळा, तु याच पेटीत होतीस, जेंव्हा आम्हाला सापडलीस तेंव्हा, आजपर्यंत हे सत्य तुला सांगितलं नव्हतं, पण कधीतरी ते तुला समजणारच होतं म्हणुन तुम्ही सगळ्याजणी मोठं होण्याची वाट पाहात होतो, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्यावरच की अशा गोष्टी समजावुन घेउ शकाल म्हणुन.'

आम्हां तिघिंसाठी हा आश्चर्याचा धक्का होता, म्हणजे ताई काका-काकुंची मुलगी नाही, ती त्यांना सापडली होती या पेटीत. एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरुन आतापर्यंतचं आमचं सगळं आयुष्य सरसरत गेलं, प्रत्येकवेळी ताईला मिळणारी वेगळी वागणुक, ती मोठ्या काकांची मुलगी आहे म्हणुन मिळत असेल अशी माझी समजुत होती पण त्यामागचं कारण हे होतं खरंतर. ' आणि ते मागं काय आहे ?' माझ्या धाकट्या बहिणिनं विचारलं. अशा वेळी खुप छोटं असणं फार फायद्याचं असतं, खोट्या मोठेपणाचे मुखवटे वागवावे लागत नाहीत चेह-यावर. एका बाजुनं बाबा आणि एकाबाजुनं ताई पुढं झाली, आता मलादेखील तिकडं जायचं होतं, पण पुढं होताना काकुच्या पायावर पाय पडला आणि तिथंच थांबले. तिथुन पुढं जाईपर्यंत ते जांभळ्या रंगाचं कापड बाबांनी सरसरत ओढलं होतं, आणि मी पहिल्यांदाच एवढं मोठं धनुष्य पाहिलं, एवढं मोठं म्हणजे बाबांच्या धनुष्यापेक्षा मोठं पण एकदम साधंसंच, एखाद्या भिल्लाचं असावं तसं. दोन टोकांना मात्र दोन माणकं लावलेली होती, तीसुद्धा करड्या रंगाची.

समोर ठेवलेल्या समयांच्या प्रकाशात त्या धनुष्याच्या अर्धवर्तुळांच्या सावल्या भिंतीवर पडल्या होत्या, त्या सर्पासारख्या दिसत होत्या आणि टोकाला लावलेली ती करडी माणकं त्या सर्पजिव्हेसारखी लवलवत होती, कितीतरी काळ या खोलीत बंद असुन देखील त्या धनुष्यावरची चमक कमी झालेली नव्हती, साधारणपणाचा एकही गुण त्याच्यात दिसत नव्हता. आता मी जाउन ताईच्या मागं उभ्री राहिले होते. ' मी उचलु हे धनुष्य ?' मी काकांकडं पाहात विचारलं, त्यांच्या थकत चाललेल्या डोळ्यांत देखील एक चमक होती, नजरेनंच त्यांनी मला होकार दिला, मी ताईच्या मागुन पुढं झाले. खांद्यावरुन खाली घसरु लागलेलं उत्तरीय कमरपट्ट्यात खोचलं आणि त्या धनुष्याला वाकुन नमस्कार केला. दोन्ही हात त्या अर्धवर्तुळांच्या मध्यभागी ठेवले आणि ते धनुष्य उचललं, दोन पावलं मागं आले चौरंगापासुन. वाटलं होतं तसंच ते वजनदार होतं ते आणि जर उभं धरलं असतं तर जवळपास माझ्या एवढीच त्याची उंची झाली असती, त्याच्यावर कपाळ टेकवुन ते पुन्हा चौरंगावर ठेवायला गेले आणि माझाच तोल गेला, मला वाटलं ते धनुष्य आता खाली पडेल, मोठा आवाज होईल पण तसं झालं नाही. तोल सावरुन मी वर पाहिलं तो ताईनं ते माझ्यापेक्षाही सहज पेललं होतं, ते सुद्धा एकाच हातानं अगदी त्याच्या मध्यभागी धरुन, माझ्याकडं पाहुन ती हसत होती, मी खाली वाकुन माझ्या पायात गुंतलेली त्याची प्रत्यंचा सोडवत होते, तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या प्राण्याच्या आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली गेली, माझ्या हातावर अजुन एक रेघ ओढुन .....

क्रमशः

कथासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

कुसुमिता१'s picture

18 Dec 2012 - 12:10 am | कुसुमिता१

सीतेची गोष्ट आहे का ही? छान चालू आहे कथा..लवकर पुढचे भाग येऊ देत!

हेच म्हण्णार होतो. वर्णनशैली मस्तच!!!!

खबो जाप's picture

18 Dec 2012 - 12:23 pm | खबो जाप

मला तर लेडी कर्णाची वाटते आहे ......

रेवती's picture

18 Dec 2012 - 1:53 am | रेवती

वाचतिये. पुभाप्र.

शेखर काळे's picture

18 Dec 2012 - 5:21 am | शेखर काळे

उत्कंठा वाढवून शेवटी जरासा सुगावा दिलात.
अत्यंत छान शैली !

स्पंदना's picture

18 Dec 2012 - 6:29 am | स्पंदना

अंहं! काय खुमासदार वर्णन अन तेही उर्मिलेच्या तोंडुन.
सुरेख. बरच काही उलगडत जाणार अस दिसतय. समईच्या खाली तेवणारी पणती उठावदार जरी नसली तरी तिच जळण समई एव्हढच ज्वलंत असत. आपल्याला दिसत नाही एव्हढच. शेवटी तुलना होते ना?

सूड's picture

18 Dec 2012 - 8:24 am | सूड

वाचतोय.

किसन शिंदे's picture

18 Dec 2012 - 9:29 am | किसन शिंदे

मस्तच!

इनिगोय's picture

18 Dec 2012 - 9:42 am | इनिगोय

मस्त.. मस्तच!

मानलं तुम्हाला..!

प्रचेतस's picture

18 Dec 2012 - 9:48 am | प्रचेतस

एका वेगळ्याच धर्तीची कथा.
खूप छान.

स्पा's picture

18 Dec 2012 - 9:58 am | स्पा

भारिच........

चिर्कुट's picture

18 Dec 2012 - 10:08 am | चिर्कुट

सीतेची गोष्ट आहे का? असली तर या अँगलने कधी वाचली नव्ह्ती.

उत्सुकता आहे. पटापट पुढचा क्रमशः टाका.. :)

मी-सौरभ's picture

18 Dec 2012 - 12:57 pm | मी-सौरभ

सहमत

सुरेख लेखनशैली. कथा सहज उलगडत जाते..

अरुण मनोहर's picture

18 Dec 2012 - 1:14 pm | अरुण मनोहर

उत्कंठा वाढविणारी शैली!
पु.ले.शु.

इष्टुर फाकडा's picture

18 Dec 2012 - 4:13 pm | इष्टुर फाकडा

मला हि कथा मध्ययुगीन वाटत होती...तुम्ही तर डायरेक्ट रामायणात घुसून राहिले. वेगळा अँगल खूप आवडला. पुभाप्र !

सोत्रि's picture

18 Dec 2012 - 7:06 pm | सोत्रि

अगदी सहमत, संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

- (उत्सुकता वाढलेला) सोकाजी

अत्रन्गि पाउस's picture

18 Dec 2012 - 4:25 pm | अत्रन्गि पाउस

सुंदर आहे..

पैसा's picture

18 Dec 2012 - 5:58 pm | पैसा

वाचताना उलगडतंय की ही कथा ऊर्मिला सांगते आहे. छान!

प्यारे१'s picture

18 Dec 2012 - 6:56 pm | प्यारे१

छान सुरु आहे... येऊ द्या लवकर लवकर :)

मालोजीराव's picture

18 Dec 2012 - 7:12 pm | मालोजीराव

वाचत आहे....पुढचा भाग लवकर टाका ...अजूनही कथेचा अंदाज लागत नाहीये....वर्णन मस्त

दिपक.कुवेत's picture

19 Dec 2012 - 7:33 pm | दिपक.कुवेत

दोन्ही भाग वाचले...छान आहेत...पुढिल कथा वाचण्यास उत्सुक...

आनंद भातखंडे's picture

26 Dec 2012 - 10:04 am | आनंद भातखंडे

मस्तच .... पुढिल भागांच्या प्रतिक्षेत ...

क्रान्ति's picture

5 Jan 2013 - 11:13 pm | क्रान्ति

लेखनशैली अगदी खास! प्रत्यक्ष पहात आहोत सगळा प्रसंग, असं वाटत रहातं सतत. विषय पण आवडला.

रुमानी's picture

6 Jan 2013 - 11:04 am | रुमानी

मस्त...........!
भाग ०३- लवकर येउदेत