युद्धकथा-४...........जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला... ३ (शेवटचा)

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Jul 2012 - 7:24 pm

युद्धकथा-४...........जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला... १ ....

युद्धकथा-४...........जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला... १ ....

युद्धकथा-४...........जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला... ३

डेथ मार्च ऑफ बटान......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१० जानेवारीला एका ब्रूकलीन येथे रहाणार्‍या एका बाल्डासार नावाच्या अनुभवी सैनिकाची साक्ष झाली. या मास्टर सार्जंटने शपथेवर खोटे बोलायचे ठारवलेले दिसत होते. कोणाच्या सांगण्यावरून हे येथे स्पष्ट लिहायचे कारण नाही. इतरांप्रमाणे त्याने जपानी सैनिकांच्या अत्याचारांचे व्यवस्थित वर्णन तर केलेच पण अजून एक महत्वाची माहिती दिली. या सार्जंटने साक्षीत सांगितले की ज्या रस्त्यावर हजारो प्रेते पडली होती त्या त्या डेथ मार्चच्या रस्त्यावर त्याने स्वत: जनरल होम्माला एका मोटारीतून जाताना बघितले होते. त्या मोटारीवर एक पिवळा झेंडा होता. या साक्षीने जनरल होम्माला त्या रस्त्यावर आणून फिर्यादी पक्षाने मोठेच काम केले.

बाल्डासारचा दावा निखालस खोटा होता. कारण त्याने जनरल होम्माला तेथे पहाणे अशक्यच होते. अमेरिकन सैन्यातील अत्यंत उच्चपदावर असलेले काही अधिकारी सोडल्यास कोणालाही जनरल होम्मा हा कोण आहे हे माहीत असायचे कारण नव्हते व सत्य हे आहे की कोणाला ते नाव माहीतही नव्हते त्याला ओळखण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण मास्टर सार्जंट बाल्डासरने मात्र जनरल होम्माकडे डोळे रोखून शपथेवर सांगितले, “मी ज्या माणसाला त्या रस्त्यावर बघितले तो याच न्यायालयात आहे” जनरल होम्माकडे बोट रोखून त्याने ठामपणे सांगितले, “आणि हाच तो माणूस आहे – ले. जनरल मासाहारू होम्मा.”.

जनरल होम्माने त्याच्या रोजनिशीत नोंद केली, “ अखेरीस बटानच्या वळणावर हा खटला आलाच. असत्य आणि सत्य याच्या मधे आता हा खटला हेलकावे खात आहे. हे सगळे त्रासदायक आहे आणि संतापाने माझ्या डोळ्यात अश्रू येतात. अत्याचाराच्या या कहाण्या खोट्या असोत वा खर्‍या, त्या ऐकून मी मनाने व शरीराने खचलो आहे”.

त्याच आठवड्यात जनरल होम्माची सुविद्य पत्नी फुजिको मॅनिलाला आली. जनरल होम्माच्या चारित्र्याविषयी व स्वभावाबद्दल खात्री देण्यासाठी तिला न्यायालयात उभे करून थोडाफार फायदा होईल या कल्पनेने या वकिलांच्या संघाने तिला टोक्योवरून बोलावून घेतले होते. खरे तर घरंदाज जपानी स्त्रीने असे न्यायालयात उभे राहणे त्याकाळात शिष्टसंमत नव्हते पण ही स्त्री त्यासाठी तयार झाली. होम्माच्या वकिलांवर या फुजिकोची चांगलीच छाप पडलेली दिसते कारण पेल्झने त्या दिवशी त्याच्या रोजनिशीत नोंद केली, “फुजिको एक सुंदर व मनमिळवू स्त्री आहे. या खटल्याचे दडपण ती समर्थपणे पेलती आहे हे निश्चित. जेथे जाईल तेथे तिचा चांगलाच प्रभाव पडतोय”.
फुजिको होम्मा.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जनरल होम्माने अमेरिकन अधिकार्‍यांना फुजिकोला त्याला भेट देण्यासाठी परवानगी मागितली आणि आश्चर्य म्हणजे आर्मीने ती ताबडतोब दिली. ही भेट फेब्रूवारीच्या पंधरा तारखेला संध्याकाळी हायकमिशनर पॅलेसमधे झाली. फुजिको भेटीच्या खोलीत वाट बघत होती आणि जनरल होम्माने हातात आपली सिगारेटची छोटी नक्षीदार पेटी व छायाचित्रांचा एक अल्बम घेऊन त्या खोलीत प्रवेश केला. दोघांनी क्षणभर एकमेकांकडे बघितले. त्या नजरेत भुतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाच्या सर्व जाणिवांची देवाणघेवाण होत होती. त्यांनी भावनांना बांध घालून एकामेकांना अभिवादन करून त्यांच्या जागा घेतल्या. जनरल होम्मा तसा आनंदी दिसत होता. फुजिको त्याला भेटायला आली होती याचा त्याला आनंद झाला होता का फुजिकोला वाईट वाटू नये म्हणून हे आनंदाचे नाटक होते हे त्यालाच माहीत. त्यांनी मग त्यांच्या मुलाबाळांच्या गप्पा मारल्या व जून्या आठवणींना उजाळा दिला. पण जनरल होम्माने फुजिकोला खोटी आशा मात्र अजिबात दाखवली नाही. डोळ्यातील अश्रू त्याने मोठ्या कष्टाने आवरले आणि फुजिकोला तो म्हणाला, “ माझा अंत्यविधी अत्यंत साधेपणाने व्हावा अशी माझी इच्छा आहे. या अंत्यविधीला फक्त माझे जवळचे असे नातेवाईकच व काही मित्र उपस्थित राहतील याची काळजी घे ! आणि हो ! माझे स्मारक होणार असेल तर ते छोटे असावे.”

फुजिकोनेही उत्तर दिले, “मासाहारू, लक्षात ठेव आपण लवकरच आपल्या घरात एकत्र जेवण घेणार आहोत” ते ऐकून मासाहारू होम्माच्या चेहर्‍यावर एखाद्या बालकाच्या चेहर्‍यावर जसे हास्य पसरते तसे हास्य पसरले. म्हणजे ते फक्त हास्य असते त्याच्या मागे पुढे काही नसते. त्याने मान हलविली. “माझ्याच सैनिकांच्या अत्याचाराची भली मोठी यादी बघून मला खात्री आहे की मी हा खटला हरल्यात जमा आहे. पण मी तुला सांगतो, मी असले काही करायची आज्ञा कोणालाही आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात दिलेली नाही. मला वाटते तुझा त्यावर विश्वास बसेल ! पण हे जे सगळे घडले आहे त्याची शेवटी नैतिक जबाबदारी माझ्यावरच येते आणि मी ती स्विकारायला तयार आहे. माझ्या ज्या लाखो सैनिकांनी रणांगणावर प्राण ठेवले त्यांच्याकडे जायला मला वाईट वाटायचे कारण नाही.”

जनरल होम्माने या भेटीच्या शेवटी आपल्या हातातील सिगारेटची ती पेटी फुजिकोला दिली आणि त्यांनी एकामेकांचा निरोप घेतला. फुजिकोला अजूनही काहीतरी चमत्कार घडेल अशी आशा होती तर मासाहारूला त्याच्या मृत्यूची पक्की खात्री होती.

फुजिकोने तिच्या निवासस्थानी आल्यावर ती सिगरेटची पेटी उघडली. त्यात दोन लिफाफे होते. एकात जनरल मासाहारू होम्माची नखे होती तर दुसर्‍यात त्याच्या केसांचे पुंजके. ते बघितल्यावर मात्र फुजिकोच्या अश्रूंचा बांध फुटला कारण त्याचा अर्थ तिला चांगलाच माहीत होता. जनरल होम्माला खात्री होती की मेल्यानंतर त्याचे शव अमेरिका त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणार नाही. शेवटच्या अंत्यसंस्काराला उपयोगी पडणार्‍या त्याच्या शरीराच्या या दोनच वस्तू तो आता तिला देऊ शकत होता. या दोन वस्तू त्याच्या आत्म्याला मुक्ती देणार होत्या.

फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यात बचावपक्षाने होम्माच्या हाताखालच्या अधिकार्‍यांना साक्षीदारच्या पिंजर्‍यात उभे केले. यांच्या उलटतपासणीत जपानच्या सेनादलाची रचना व आदेश द्यायची पद्धत यावर प्रकाश टाकायची त्यांची योजना होती. यातच जनरल होम्माने त्याच्या हाताखालच्या युद्धकैद्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे वागवायची अधिकार्‍यांना आज्ञा दिली होती, हेही सिद्ध होणार होते. या साक्षीत उल्लेखनीय साक्ष झाली मेजर मोरिया वाडा याची. हा जनरल होम्माच्या हाताखाली रसदपुरवठा व नियोजन अधिकारी म्हणून काम करत होता. त्याने साक्ष दिली की एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात त्याने कॅंप ओ’डॉनेलला भेट दिली होती. तेथील सोयी सुविधा बघून तो वैतागला होता. “कैद्यांची राहायची व्यवस्था, गटारे, पाणी आणि अन्न याची अवस्था भयंकर वाईट होती. या सगळ्या व्यवस्था अपूर्‍या तर होत्याच पण धड कामही करत नव्हत्या. स्वच्छता गृहेही स्वच्छ ठेवली जात नव्हती.” वाडाने हे सगळे कॅंप कमांडरच्या कानावर घातले आणि त्याच्या कडून सुधारणा केली जाईल असे आश्वासनही मिळवले.

मग खालील प्रश्नोत्तरे झाली.
प्र: हे आपण जनरल होम्माच्या कानावर घातले का ?
उ: नाही.
पण या भेटीनंतर वाडाने एका महिन्यानंतर त्या कॅंपला अजून एक भेट दिली होती. तपासणी नंतर त्याला आढळले की त्याला ज्या सुधारणांची आश्वासने मिळाली होती त्याप्रमाणे काहीच झाले नव्हते. त्याने साक्षीत सांगितले की या नंतर मात्र त्याने जनरल होम्माला या बाबतीत एक सविस्तर अहवाल दिला.
प्र: तुम्ही अहवाल दिल्यावर जनरल होम्मा काय म्हणाला?
उ: ते म्हणाले की हे जे काय चालले आहे त्याने ते नाराज आहेत. त्यांनी मला या सगळ्याचा अभ्यास करून त्यावर उत्तरे शोधण्यास सांगितली. त्या कॅंपच्या कमांडंटला काढून टाकणे हे क्रमप्राप्त होते. त्याच वेळी जनरल होम्माने मला युद्धकैद्यांना सोडून द्यायचे धोरण काय आहे याचाही अभ्यास करायला सांगितले.
प्र: पुढे काय झाले ?
उ: काहीच दिवसात त्या कमाडंटला काढून टाकण्यात आले व अनेक फिलिपाईन्सच्या युद्धकैद्यांना सोडून देण्यात आले. जनरल होम्माने मी सादर केलेल्या सुधारणांच्या सगळया योजना मंजूर केल्या. त्यात काही वाद्ये आणि खेळाचे साहित्यही आणायला परवानगी देण्यात आली होती.

वाडाने साक्षीत हेही सांगितले की जनरल होम्माने फेब्रूवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत टोक्योला औषधांसाठी कमीत कमी दहा विनंतीअर्ज पाठवले होते. त्याने सायगाव येथील त्याच्या वरिष्ठांना दहा हजार टन तांदूळ पाठवायची विनंतीही केली होती. मेजर वाडाच्या मते डेथ मार्च घडला हे अत्यंत वाइट झाले पण ते मुद्दामहून कोणी ठरवून केले असेल असे त्याला वाटत नव्हते. कदाचित असे झाले असण्याची शक्यता आहे की जनरल होम्माचे आदेश पुरेसे स्पष्ट नव्हते किंवा ते सर्व सैनिकांपर्यंत पोहोचत नव्हते. जनरल होम्मा त्यावेळी पुढच्या लढाईच्या तयारीला लागला होता. जेव्हा अमेरिकन सैन्य जंगलातून बाहेर आले तेव्हा जपानी सैन्याची युद्धकैदी स्विकारायची तयारीही नव्हती.

५ फेब्रूवारीला जनरल मासाहारू होम्मा स्वत: युक्तिवाद करायला साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभा राहिला. त्याने उत्कृष्ट इंग्रजीमधे त्याचा बचाच सुरू केला.

“जपानच्या सेनादलाच्या रचनेमधे मला माझे स्टाफ अधिकारी निवडायचा अधिकार नाही. मी जे अधिकारी नीट काम करत नसत त्यांची बदलीही करू शकत नाही तो अधिकार फक्त टोक्योमधील मुख्यालयाला आहे. युद्धभूमीवर जपानच्या सेनादलात जपानी सेनाप्रमुखाने त्याच्या स्टाफ ऑफिसरच्या कामात ढवळाढवळ करायची परंपरा नाही तसेच स्टाफ ऑफिसरही जनरलला छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रास देत नाही. कमांडरला फक्त अत्यंत महत्वाच्या बाबतीतच अहवाल पाठवला जातो. लष्कराचे मुख्यालय हे एखाद्या यंत्राप्रमाणे काम करते. युद्धभूमीवर अधिकारी त्यांचे निर्णय स्वत:चे स्वत: घेतात.

आम्हाला बटानच्या विजयाची खात्री नव्हती. या लढाईत असे तीन प्रसंग आले होते की मला वाटले हे युद्ध आता हरल्यात जमा आहे. या तीनही प्रसंगात अमेरिकन सैन्याप्र्माणेच आम्हालाही अन्न, औषधे व दारूगोळा याची कमतरता भसत होती. मी टोक्योकडे मदतीच्या अपेक्षेने पाहू शकत नव्हतो. जपानच्या लष्करी परंपरेत एखाद्या जनरलने मदत मागणे हे कमीपणाचे मानले जाते. आम्हाला आमच्याकडे जे काही आहे त्यानेच लढावे लागते.

जनरल होम्माने मग त्याच्या साक्षीत इतर माहितीही दिली. त्याने सांगितले की त्याच्या काळात फिलिपाईन्समधे बलात्कार, लुटालूट इत्यादि कारणांसाठी एकूण १०० कोर्टमार्शल झाले. होम्माने हिही सांगितले की त्याने बलात्काराच्या गुन्ह्यामधे विशेष लक्ष घातले होते आणि त्याने त्या कोर्टमार्शलची कागदपत्रे त्या सैनिकांच्या घरी पाठविली होती जेणे करून स्वत:च्या अब्रूला घाबरून सैनिकांत शिस्त बाणली जाईल. जेव्हा त्याला विचारण्यात आले की ही पद्धत जपानी सेनेमधे पहिल्यापासूनच आहे का तेव्हा त्याने त्याचे नकारार्थी उत्तर देऊन त्यानेच ही पद्धत अमलात आणली असे सांगितले. जनरल होम्माने डेथ मार्चच्या रस्त्यावरून तो एकदोनदा गेला होता याची कबुली देताना म्हटले, “ इतर साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर अनेक प्रेते पडली होती पण ते तसे नसावे कारण मला ती दिसली नाहीत. अर्थात मी काही प्रेते शोड्धण्यासाठी बाहेर बघत नव्हतो हेही खरे आहे. मला वाटते अमेरिकन बळी हे तथाकथित डेथ मार्चचे नसून मलेरिया व उपासमार यांचे आहेत.”

फुजिको होम्माची साक्ष सगळ्यात शेवटी झाली. काळ्या किमोनोत, मागे बांधलेले केस अशी ती डोलदार पावले टाकत साक्षीदाराच्या पिंजर्‍याकडे गेली. पिंजर्‍यातील खूर्चीवर बसल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली. जनरल होम्माची व तिची नजरानजर झाल्यावर होम्माने तिच्याकडे बघून स्मितहास्य केले. दुभाषांनी भाषांतर केलेले प्रश्न ती लक्षपूर्वक ऐकत होती व त्यावर विचार करू उत्तरे देत होती.

साक्षी दरम्यान तिने सांगितले, “मला जनरल होम्मा नेहमी सांगायचे की लष्करी सामर्थ्य हे मातृभूमीच्या रक्षणासाठीच वापरले पाहिजे. जो देश आक्रमण करतो त्याच्या नशिबी पराभवच येतो. त्यानंतर तिने त्यांच्या आयुष्याबद्दल, त्याच्या संगिताच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या बौद्ध धर्माबद्दल, राजकीय विचारांबद्दल सांगितले व टोजोशी असणारे त्याच्या मतभेदाचे विवेचन केले.
तिच्या बोलणाने सगळे न्यायालय मंत्रमुग्ध होत होते. एका क्षणी तिने जनरल होम्माकडे रोखून बघितले व ती म्हणाली, “जरी माझा नवरा आज आरोपीच्या पिंजर्‍यात उभा असला तरी मला त्याचा अभिमान आहे. आम्हाला १७ वर्षाची मुलगी आहे. तिला माझ्या मासाहारू होम्मासारखाच नवरा मिळू दे अशी मी प्रार्थना करते.”

त्या न्यायलयातून बाहेर जाताना तिने समोरच्या पाच न्यायाधीशांना जपानी पद्धतीने लवून अभवादन केले. सगळ्या न्यायाधीशांनी तिच्याकडे बघून स्मितहास्य केले तर एका जनरलने तिला उठून अभिवादनही केले. तेथे उपस्थित असलेला बटानच्या डेथ मार्चमधून वाचलेला मेजर टिसडेल म्हणाला, “ती एक सुंदर व प्रभाव पाडणारी स्त्री आहे यात शंकाच नाही पण तिला तिच्या नवरा खरा कसा आहे याची कल्पना नाही. ती बोलत असताना माझ्या डोळ्यासमोर त्या डेथ मार्चमधे चालताना खाली पडणारे माझे सहकारी दिसत होते.”

त्याच रात्री जनरल होम्माने त्याच्या रोजनिशीमधे लिहिले, “उरलीसुरली आशाही आता नष्ट झाली आहे. निराशेने मला घेरले आहे”.

दुसर्‍या दिवशी बचावपक्षाच्या वकिलांनी शेवटचा युक्तिवाद केला. त्यात त्यांनी खालील मुद्द्याम्वर जोर दिला –
१ आरोपीचा पुर्वेइतिहास बघता तो क्रूर आहे असे म्हणता येत नाही.
२ आरोपीला त्या तेथे काय चालले आहे याची कल्पना नव्हती.
३ आरोपीचे स्वत:चे सैन्यच उपासमारीने त्रस्त होते. त्यांच्याकडे एवढ्या प्रचंड संख्येने शरण आलेल्या युद्धकैद्यांना हलविण्यासाठी वाहनांचा तुटवडा होता.
४ जपानच्या सेनादलाच्या नियमांनुसार आरोपीला त्याच्या हाताखालच्या स्टाफ ऑफिसरला काढता येत नसे.
५ आरोपीने स्वत: युद्धकैद्यांना जिनेव्हा कराराप्रमाणे वागवावे असा हुकूम दिला होता.
६ आरोपीने स्वत: युद्धकैद्यांच्या छावणीच्या सुधारणेला पाठिंबा दिला होता...इत्यादि....

या युक्तिवादाचा शेवट बचावपक्षाच्या प्रमुख वकिलांनी खालील शब्दांनी केला.....
"हा खटल्यात खरे तर जपानची राज्यव्यवस्था, जपानच्या सेनेची परंपरा, त्यांची आक्रमक वृत्ती, यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले पाहिजे. हा एका माणसाचा गुन्हा होऊ शकत नाही. या आरोपीला अमेरिकन विचारसरणींनी जोखले जात आहे. त्याला जपानच्या संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर जोखले जावे ही आमची विनंती आहे. गेले सहा आठवडे आमची जनरल होम्मा हा निर्दोष आहे याची खात्री पटली आहे. याला जर फासावर दिले तर जागतिक शांततेसाठी खूप काही करू शकणारा एक चांगला माणूस आपल्यातून जाईल असे आम्हाला वाटते.”

त्यानंतर फिर्यादीपक्षाचा वकील ले. कर्नल मीक युक्तिवादासाठी उभा राहिला.
“जगातील सभ्यतेचे सर्व नीतीनियम या माणसाने मोडले आहेत... जे काही घडले आहे त्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि हा कोणीतरी म्हणजे जनरल होम्माशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही. या अत्याचारांची आरोपीला संपूर्ण माहिती होती कारण याचे कार्यालय या रस्त्यापासून अत्यंत जवळ होते. याच्या समोरूनच ७०,००० अमेरिकन सैनिक मरणोन्मुख अवस्थेत चालत होते...त्यांच्या आक्रोशाला याने जर प्रतिसाद दिला असता तर हे थांबणे शक्य होते.....

त्या दिवसाचे न्यायालयाचे कामकाज संपल्यावर पेल्झवर फुजिको होम्माला टोक्योला सोडण्याची जबाबदारी टाकण्यात आली. निघायच्या अगोदर त्यांनी दोघांनी बहुदा शेवटची ठरणारी भेट घेतली. जनरल होम्माने पेल्झचे आभार मानून तो त्यांच्या मदतीबद्दल समाधानी आहे असे सांगितले. पेल्झने त्याच्या रोजनिशीत लिहिले, “तो समाधानी आहे. हे प्रकरण संपले.....”
“आपली गाठ पडली हे मी माझे भाग्य समजतो” पेल्झ म्हणाला.
“आपण असे म्हणालात यातच माझा सन्मान आहे”
“परत भेटूच !” पेल्झ म्हणाला पण ते शक्य नव्हते हे त्याला चांगलेच माहीत होते.

सोमवारी, फेब्रूवारीच्या ११ तारखेला न्यायालय परत भरले. आज या खटल्याचा निकाल जाहीर होणार होता. जनरल होम्माला न्यायालयात आणण्यात आले. त्याने अंगात करड्या रंगाचा सुट घातला होता. त्याला त्या पाच न्यायाधीशांसमोर सावधानमधे उभे करण्यात आले आणि जनरल डोनोवॅन याने निकालपत्र वाचून दाखवले “गूप्त मतदान पद्धतीने हे न्यायालय आरोपीला दोषी ठरवत आहे. “The Commission sentences you to be shot to death with musketry”. जनरल मासाहारू होम्माच्या चेहर्याiवरची एक रेषाही हलली नाही.

ही शिक्षा बचावपक्षाच्या वकिलांनी एक प्रकारचा विजयच मानला. अशा प्रकारच्या खटल्यात शक्यतो मरेतोपर्यंत फासावर लटकवून मृत्यूदंड दिला जाई. गोळ्यांसमोर मरण स्विकारणे हे कुठलाही सैनिक मानाचे समजतो.

या खटल्याच्या जरा अगोदर जनरल यामाशितावर असाच खटला चालू झाला होता. त्याच्यावरही साधारणत: असेच आरोप निश्चित करण्यात आले होते. साक्षीपुरावेही होम्माच्या खटल्याच्या धर्तीवर सादर करण्यात आले होते. त्यालाही मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यावर त्याने हेबियस कॉरपसचे दोन रीट पेटिशन दाखल केले. हा विनंतीअर्ज सहा विरूद्ध दोन या मताधिक्क्याने फेटाळण्यात आला. न्यायालयाने हा अर्ज फेटळतांना एक नवीन मुद्दा उपस्थित केला. यामाशिता हा कमांडर असल्यामुळे त्याच्या सैनिकांना शिस्तीत ठेवण्याची जबाबदारी त्याचीच असायला पाहिजे इ. इ....या खटल्याच्या तपशिलात न जाता (जे या लेखाच्या आवाक्याबाहेर आहे) या खटल्याचा होम्माच्या खटल्यावर झालेल्या विपरीत परिणामांचा विचार करू. या विनंतीअर्जाच्या सुनावणीत त्या न्यायालयाने “कमांडची जबाबदारी” या कल्पनेचा उहापोह केला होता. त्यामुळे जरी होम्मावरचे आरोप जरा सौम्य होत असले तरीही त्यालाही “कमांडच्या जबाबदारी”चा नियम लावण्यात आला.

यामाशिताच्या बाबतीत झालेल्या या निर्णयामुळे होम्माचे रीट पेटीशन न्यायालयात पोहोचण्या अगोदरच गारद झाले व ज्या दिवशी हा निकाल मॅनिलामधे जाहीर झाला त्याच दिवशी वॉशिंग्टनमधे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे विनंती अर्ज फेटाळले. सर्वोच्च न्यायालयाने होम्माच्या या खटल्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही हे स्पष्ट केले.

या न्यायालयाच्या दोन न्यायाधिशानी (जस्टीस मर्फी व जस्टिस रूटलेज यांनी मात्र या एकंदरीत प्रक्रियेबद्दल आपले कडवट मत प्रकट केले. नुसते प्रकट करून ते थांबले नाहीत तर त्यांनी तशी नोंदही केली. ती टिप्पणी मुळातून वाचण्यासारखी आहे. त्याचे स्वैर मराठी भाषांतर खाली दिले आहे –

“ या देशाची प्रतिष्ठा आज.... पणाला लागली आहे. या प्रकारचे खटले आपण आपल्या राष्ट्राच्या घटनेनुसार चालवावेत नाहीतर ही न्यायदानाची नाटके बंद करावीत. हे असले न्याय करण्यापेक्षा काळाचे चक्र उलटे फिरवून जंगलाचा न्याय प्रस्थापित केलेला बरा. मला वाटते आता त्याचीच सुरवात झाली आहे. पण माझ्यापूरते बोलायचे झाले तर मी या दुष्कर्मात भाग घेणार नाही. अप्रत्यक्षपणे ही नाही.”
न्यायाधिश मर्फी यांनी मग ज्या घाईघाईने हा खटला चालवला गेला त्यावर सडकून टीका केली.
“सूप्रीम कमांडर ऑफ अलाईड पॉवर्सने (यात जनरल डग्लस मॅकार्थर) जी अघटनात्मक प्रक्रिया तयार केली आहे त्यामुळे खोटे तयार केलेले पुरावे, व इतर अनेक बाबींचा या खटल्यामधे वापर करता आला हे नाकारता येत नाही”
या टिप्पणीचा शेवट त्यांनी खालील शब्दांनी केला-
“कायदा पायदळी तुडवून आज जनरल यामाशिता आणि जनरल होम्मा या दोन पराजित सेनाधिकार्‍यांचा बळी दिला जात आहे. याच्या विरूद्ध कोणी निषेध नोंदवणार नाही याची मला कल्पना आहे. पण उद्या जर हाच पायंडा पडला तर हेच अस्त्र सर्रास वापरण्यात येईल. कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला घटनात्मक अधिकार न देता कायद्याच्या दगडांनी ठेचून मारायची रानटी पद्धत आता सूरू झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.

वस्तुनिष्ठ विचारांच्या पराभव येथे एकदाच होणार आहे व पुढे असे काही होणार नाही असा दावा कोणीही करू शकत नाही....नव्या जगाची आशा या एकाच खटल्याने संपूष्टात येणार नाही असा दावाही कोणी करायला जाऊ नये....युद्ध संपल्यानंतरच्या युद्धज्वरात एखाद्या देशाने मनूष्याची प्रतिष्ठा व कायद्याचा आदर यांचा त्याग केल्यामुळे त्या देशाचा नाश होऊ नये....”

ज्या दिवशी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्याच दिवशी फुजिको होम्मा जनरल डग्लस मॅकार्थरला भेटायला त्याच्या कार्यालयत गेली. तिला माहीत होते की या आरोपींना माफी जाहीर करण्याचे शेवटचे अधिकार त्याला आहेत.
जनरल मॅकार्थर ने फुजिकोचे चांगले स्वागत केले. त्याने त्याच्या आठवणीत लिहिले आहे की तो क्षण त्याच्या आयुष्यातील सगळ्यात कसोटीचा क्षण होता. त्याने तिला सहानभूती दाखवून तिच्या दु:खावर फुंकर मारायचा प्रयत्न केला.
नंतर बर्‍याच वर्षांनी फुजिकोने त्या भेटीचा वृत्तांत इतिहासकार ऑर्थर स्विन्सन याला कथन केला. या भेटीत फिजिकोने जनरल मॅकार्थरला विचारले “आपल्याकडे जनरल होम्माच्या खटल्याची कागदपत्रे आली आहेत. आपण ती एकदा नजरेखालून घालावीत अशी माझी विनंती आहे.”
“होय ! मी ते लवकरात लवकर करेन”
“असे ऐकिवात आहे की त्याच्या मृत्यूदंडाची शिक्षा आपल्या मंजूरीसाठी आपल्याकडे आली आहे. मला कल्पना आहे, आपले काम कठीण आहे”
"आपण कृपया माझ्या कामाची काळजी करू नये”
जनरल मॅकार्थरचे हे उत्तर फुजिकोला जरा उद्धटपणाचे वाटले. निघतांना फुजिकोने त्याचा निरोप घेतला आणि त्याच्या बायकोला नमस्कार सांगितला.

फुजिकोला दिलेल्या वचनाला जागत जनरल मॅकार्थरने ते कागदपत्र नजरेखालून घातले व त्याच्यावर २० मार्चला शेरा मारला “या खटल्याइतका निरपेक्ष पद्धतीने कुठलाच खटला चालवला गेला नसेल. आरोपीला स्वत:चा बचाव करायची पूर्ण संधी देण्यात आली होती. यात झालेल्या युक्तिवादांवरून हे लक्षात येते की आरोपीकडे एखाद्या कमांडचे खंबीर नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असे गुण नाहीत. आरोपीचे गुन्हे हे इतिहासात भयंकर व सैनिकांचे न्याय्यहक्क तुडवणारे म्हणून ओळखले जातील....मी शिफारस करतो की कमांडींग जनरल, युनायटेड स्टेट्स फोर्सेस ऑफ वेस्टर्न पॅसिफीक यांनी ही शिक्षा अमलात आणावी.”

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जनरल होम्माने त्याच्या मुलांना शेवटचे पत्र लिहिले, “तुमच्या वडिलांनी तुम्हाला लिहिलेले या आजन्मातील हे शेवटचे पत्र असेल. मी एंग्लो-सॅक्सन न्यायाबद्दल बरेच काही लिहू शकतो पण मी ते लिहिणार नाही. मला ठोठवण्यात आलेली मृत्यूदंडाच्या शिक्षेचा अर्थ मला माझे गुन्हे मान्य आहेत व मी गुन्हेगार आहे असा होत नाही. यातून त्यांनी माझा सूड घेतला आहे एवढाच अर्थ निघू शकतो.”

होम्माला यानंतर एका लॉस बानोस नाचाच्या छोट्या गावात हलविण्यात आले. एप्रिलच्या दोन तारखेला तो रात्री त्याच्या कोठडीत अमेरिकन पाद्री व मिलिटरी पोलिसांबरोबर बर्‍याच काळ बीयर पीत जागा होता. तसा तो आनंदात दिसत होता. एका वेळी तर त्याने आपला पेला उंचावत म्हटले “चला मला माझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा द्या बरे !” पण एका क्षणी मात्र त्याचा तोल सुटला. त्याने विचारले “बटानसाठी तूम्ही मला ठार मारताय, पण हिरोशिमामधे दीडलाख निष्पाप जपानी मारले गेले त्या अत्याचाराला जबाबदार कोण आहे मॅकार्थर का ट्रूमन ?”

जनरल मॅकार्थरचे उद्दीष्ट त्याचा पराभव करणार्‍या त्याच्या शत्रूचे नाव इतिहासातून पुसून टाकायचे हे असेल तर त्याने ते साध्य केले असे म्हणावे लागेल. जेथे होमाला ठार मारण्यात आले तेथे आता माती आणि जंगलाशिवाय काही नाही. एवढेच काय जपानमधेही साडो सोडल्यास जनरल होम्मा कोणाला आठवत असेल असे वाटत नाही.

१९४६ एप्रिलच्या तीन तारखेला रात्री एक वाजता मिलिटरी पोलिसांच्या एका तुकडीने जनरल मासाहारू होम्माच्या कोठडीत प्रवेश केला. त्यांनी त्याच्या हातात हतकड्या अडकवल्या. दोन रांगांच्या कवायतीत जनरल होम्माला एका मोकळ्या मैदानात नेण्यात आले. दिव्यांच्या झोतांनी हे मैदान प्रकाशीत करण्यात आले होते.

त्या सैनिकांनी जनरल मासाहारू होम्माला एका खांबाला बांधले व त्याच्या डोक्यावर काळी टोपी ओढली. जनरल होम्मा शांतपणे हे सगळे करून घेत होता. एका आर्मी डॉक्टरने मग त्याच्या छातीवर डाव्याबाजूला पांढर्‍या कापडाचा एक तुकडा चिकटवला.

जनरल मासाहारू होम्मापासून पंधरा पावलांवर बारा सैनिकांनी त्यांच्या जागा घेतल्या आणि त्यांच्या M-16 उचलून खांद्याला लावल्या. आर्मीच्या नियमानुसार या बारापैकी चार रायफल्समधे वायबार होते. कोणाच्या गोळीने समोरचा मेला हे कोणालाही कळू नये म्हणून ही पद्धत सिव्हील वॉरमधे पाडली गेली होती.

त्या रात्रीच्या भयाण शांततेत एका अधिकार्‍याने स्वच्छ आवाजात आरोपीचे सगळे गुन्हे, व
त्याला ठोठवण्यात आलेली शिक्षा वाचून दाखविली. मग त्याने आपला उजवा हात वर केला. त्याबरोबर सगळ्या सैनिकांनी अचूक नेम घेतला. दुसर्‍याच क्षणी त्याने तो हात खाली आणत हुकूम दिला “फायर !

त्या शांततेत त्या बारा रायफल्सचा आवाज फारच मोठा वाटला. डॉक्टरांनी त्या शरीरावरच्या जखमा बघितल्या, नाडी बघितली आणि त्याच्या मृत्यूची घोषणा केली.

जनरल मासाहारूच्या छातीवर असलेल्या त्या पांढर्‍या कापडाच्या तुकड्यावरचा लाल ठिपका हळूहळू मोठा व्हायला लागला व थोड्याच वेळात त्या ठिपक्याने ते कापड ओलांडून जनरल मासाहारूच्या क्रीम रंगाच्या सूटावर आक्रमण केले...............

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

लेखमालिका संपन्न.
जयंत कुलकर्णी.
पुढची युद्धकथा.........?
प्रत्येक सेनाधिकार्‍याच्या आयुष्यातील विरोधाभास त्याच्या पदचिन्हांमधे परावर्तीत होत असतो. पाने आणि तलवारी ही ती खूण - जणू जन्म आणि मृत्यू.....

इतिहासकथालेख

प्रतिक्रिया

इतिहासातील आणखी एक अस्वस्थ पान वर काढल्याबद्दल धन्यवाद.

सचिन कुलकर्णी's picture

29 Jul 2012 - 10:12 pm | सचिन कुलकर्णी

वाचण्याआधी १ प्रतिक्रिया.. शनिवार रविवार सुट्टी घेणार म्हंटल्यावर निराश झालो होतो. आता धागा बघितल्यावर अशी कळी खुल्लीये आमची..

संपूर्ण लेखमाला आवडली

सचिन कुलकर्णी's picture

30 Jul 2012 - 12:46 am | सचिन कुलकर्णी

सुन्न.. जस्टीस मर्फी व जस्टिस रूटलेज यांनी वर्तवलेली शक्यता दुर्देवाने खरी ठरतेय. सद्दामच्या बाबतीत तेच झाले. बाकी बार्काव्यान्साहीत असलेली हि लेखमाला (नेहमीप्रमाणेच) अप्रतिम. पुन्हा १दा धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

30 Jul 2012 - 3:34 am | प्रभाकर पेठकर

अतिशय प्रभावी लेखन. लेखातील शब्दांनी जो परिणाम अपेक्षित होता तो १०० % साध्य झाला आहे.
जनरल होम्मा जेत्यांच्या न्यायाच्या नाटकाचे बळी ठरलेत असेच वाटते.

पण..
एवढेच काय जपानमधेही साडो सोडल्यास जनरल होम्मा कोणाला आठवत असेल असे वाटत नाही.

ह्याचे कारण कळले नाही.

हंस's picture

30 Jul 2012 - 2:51 pm | हंस

<एवढेच काय जपानमधेही साडो सोडल्यास जनरल होम्मा कोणाला आठवत असेल असे वाटत नाही.>
पेठकरकाका अगदी खरयं हे, ही लेखमाला (भाग १) वाचताना मी माझ्या जापानी सहकार्‍याला ज. मासाहारु होम्माचा फोटो दाखवला आणि त्याला विचारले की तुला माहित आहे का हा कोण आहे ते, पण त्याला तो ओळखता आला नाही, पण त्याच लेखात स्क्रोल डाउन केल्यावर त्याला ज. मॅकआर्थर चा फोटो दाखवला तर क्षणाचाही विलंब न लावता त्याने तो ओळखला :( , ह्यावरुन होम्माला भविष्याची कल्पना आली असावी, तसेच त्याची दुरद्रुष्टीताही दिसुन येते.

खुप सुंदर लेखन, अतिशय धन्यवाद सर.

इरसाल's picture

30 Jul 2012 - 9:31 am | इरसाल

सुन्न झालो शेवट वाचुन.

असं पण जपानवर कायम अन्याय झाला आहे असे सारखे वाटत रहाते.

क्लिंटन's picture

30 Jul 2012 - 11:04 am | क्लिंटन

जनरल होम्मांवर ते निर्दोष असूनही असा अन्याय झाला असेल तर त्याचे अजिबात समर्थन नाही आणि कोणी ते करू ही नये.

असं पण जपानवर कायम अन्याय झाला आहे असे सारखे वाटत रहाते.

पण जपानवर कायम अन्याय कसा? पर्ल हार्बरवर हल्ला करायला जपानला कोणी सांगितले होते? वाघाची कुरापत काढलीत आणि मग वाघाने फाडून खाल्ले तर त्याची तक्रार करू नये. असो.

मन१'s picture

30 Jul 2012 - 12:07 pm | मन१

पण जपानवर कायम अन्याय कसा? पर्ल हार्बरवर हल्ला करायला जपानला कोणी सांगितले होते? वाघाची कुरापत काढलीत आणि मग वाघाने फाडून खाल्ले तर त्याची तक्रार करू नये. असो.

+१
पण तरीही युद्धात अणुबॉम्ब पडलेला एकमेव देश म्हणजे जपान. ही शिक्षा जर्मनी-इटाली ह्यांनाही भोगावी लागली नाही.

जयंत कुलकर्णी's picture

30 Jul 2012 - 11:11 am | जयंत कुलकर्णी

जपानने जे अत्याचार केले त्याच्यावरही केव्हातरी लिहीन...विशेषतः चीनमधे....आणि पर्ल हार्बरवर जेव्हा लिहेन तेव्हा जपानने तो हल्ला का केला तेही लिहेनच....

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jul 2012 - 11:45 am | विश्वनाथ मेहेंदळे

रेप ऑफ नानजिंग/नानकिंग बद्दल म्हणत आहात ना ? मागे एक पुस्तक चाळले होते त्यावर. अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घटना लिहिल्या होत्या.

इरसाल भाऊ , तो प्रसंग "Second worst atrocities in the world (In the modern history असेल कदाचित), Only behind atrocities done by Pakistani army in Bangladesh in 1971 " दुसऱ्या महायुद्धात अनेक पाश्चिमात्य देशात जितके मृत्यू ४-५ वर्षात झाले त्यापेक्षा जास्त कत्तल जपान्यांनी केवळ ६ आठवड्यात केली होती त्यातही बहुतकरून सिव्हिलिअन नागरिक.

जकु लिहितीलच म्हणा सविस्तर.
(जकुंचा पंखा) विमे

झकासराव's picture

30 Jul 2012 - 10:43 am | झकासराव

लेखन आवडले. जेत्यांचा न्याय (???) सुन्न करुन गेला.

जयंत कुलकर्णी's picture

30 Jul 2012 - 11:06 am | जयंत कुलकर्णी

ज्यांनी हे लेखमालिका वाचली व आवडल्याचे कळवले आहे व जे पुढे कळवतील (कळवले तर....:-) )त्या सर्वांचे आभार मानतो........

मृत्युन्जय's picture

30 Jul 2012 - 12:06 pm | मृत्युन्जय

एरवी कधी जनरल बद्दल वाचाले असते असे वाटत नाही. वाचुन बरे वाटले.

जनरल दोषी होते की निर्दोष ते नाही माहिती. पण जर ते निर्दोष असतील तर मॅकआर्थरचे खालील वाक्य योग्य ठरते:

यात झालेल्या युक्तिवादांवरून हे लक्षात येते की आरोपीकडे एखाद्या कमांडचे खंबीर नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असे गुण नाहीत.

असो जपान काय आणि अमेरिका काय. दोघेही एकाच माळेचे मणी. हिरोशिमा आणी नागासाकी वर बोंब टाकुन लाखो जीव मारणारे आणी लाखोंचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अमेरिकन्स काय वेगळे होते?

क्लिंटन's picture

30 Jul 2012 - 12:59 pm | क्लिंटन

असो जपान काय आणि अमेरिका काय. दोघेही एकाच माळेचे मणी. हिरोशिमा आणी नागासाकी वर बोंब टाकुन लाखो जीव मारणारे आणी लाखोंचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अमेरिकन्स काय वेगळे होते?

काही हजार अमेरिकन जीवांचे प्राण वाचवायला काही लाख जपानी नागरीकांना मारणे भाग होते. ते अमेरिकेने केले आणि त्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही. पूर्ण जगात हिरोशिमा हल्ल्याचे समर्थन करणारा एक मनुष्य असेल तर तो मी आहे आणि त्याचा कसलाही विषाद मला वाटत नाही.

महायुध्दात अमेरिका उतरली ७ डिसेंबर १९४१ रोजी आणि हिरोशिमा हल्ल्याच्या आदल्या दिवशीपर्यंत (५ ऑगस्ट १९४५) पर्यंत एकूण दिवस होते १३३७. युध्दात एकूण अमेरिकन सैनिक मारले गेले होते सुमारे ४ लाख-- म्हणजे सरासरी दररोज ३००. जर अणुहल्ला करून जपानचे कंबरडे मोडले नसते तर युद्ध अजून लांबले असते.अगदी एक महिना तरी युद्ध लांबले असते तर (३०० गुणिले ३०= ९,०००) अमेरिकन सैनिक अजून मारले गेले असते. (एक महिना हे माझ्या मते बरेच कॉन्झर्व्हेटिव्ह एस्टिमेट आहे. जर युद्ध लांबले असते तर भविष्यात कदाचित जपानच्या मुख्य भूमीवर सैनिकी हल्ला करण्याशिवाय पर्याय राहिला नसता आणि यात अनेक हजार अमेरिकन सैनिक आणि कदाचित काही लाख जपानी लोकही मारले गेले असते हे नक्की).

तेव्हा अमेरिकन नागरीकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी जे आवश्यक होते ते अध्यक्ष ट्रुमन यांनी केले. जपानी सरकारच्या पापांची शिक्षा सामान्य जपानी नागरीकांना द्यायची नाही म्हणून युध्द लांबवायचे आणि जपानी सरकारच्या पापांची शिक्षा अमेरिकन सैनिकांच्या जीवांच्या रूपात का द्यावी? ते सैनिक असले तरी अमेरिकन नागरीकच होते आणि सैन्यात बळीचे बकरे म्हणून गेलेले नव्हते. युध्दाच्या स्थितीत शत्रूच्या नागरिकांची पर्वा करायचे अध्यक्ष ट्रुमन यांना काही कारण नव्हते पण अमेरिकन नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते. इतकेच नव्हे तर अमेरिकन सरकारने जपानला मॉस्कोतील जपानी वकिलातीमार्फत ताबडतोब शरण या नाहीतर सर्वनाशाला सामोरे जायची तयारी ठेवा हा इशारा २८ जुलै रोजीच दिला होता. आणि १ ते ५ ऑगस्ट दरम्यान प्रमुख जपानी शहरांवर विमानांमधून हाच इशारा देणारी हजारो पत्रके (इंग्रजी आणि जपानी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेली) अमेरिकन विमानांनी टाकली होती. आता हा इशारा जपान सरकारला कळला नसेल (किंवा कळूनही त्याविषयी काहीही करायचे नाही हा दुराग्रह असेल) तर जपान सरकारच्या त्या दुराग्रहाची किंवा बेअकलीपणाची किंमत अमेरिकन लोकांच्या जीवांनी भरायचे काहीही कारण नव्हते.

मृत्युन्जय's picture

31 Jul 2012 - 12:03 pm | मृत्युन्जय

हिरोशिमा - नागासाकी वर टाकल्या गेलेल्या अणुबाँबचे समर्थन अतिशयच चुकीचे आहे. त्यामुळे एक न भरुन येणारे नुकसान झाले आहे हे अमान्य करणे मुर्खपणाचे ठरेल. युद्ध जिंकण्यासाठी काहिही करणे योग्यच ठरते अश्या मनोवृत्तीचे आपण दिसता आणि त्याचे मी समर्थन करु शकत नाही. याच न्यायाने हिटलर आणि स्टॅलिनच्या मनुष्यसंहाराचे देखील समर्थन करता येइल. उद्या उठुन एखादा नाझी समर्थक म्हणेल की " हिटलरने जर पोलंडमधले ज्यु आणि इतर नागरिक मारले नसते तर त्यांनी हिटलर विरुद्ध उठाव करण्याची शक्यता होती. त्यात जर्मन सैनिक मारले गेले असते आणी हे जर्मनीच्या हिताचे नव्हते" सामान्य नागरिकांची हत्या "जर - तर च्या शक्यतेवरुन" करणे हा एक प्रचंड मोठा गुन्हा आहे हे मी नमूद करु इच्छितो.

शिवाय आपण माझे वाक्य नीट वाचावे. जपान काय आणि अमेरिका काय एकाच माळेचे मणी. एक चांगला एक वाईट असे मी म्हटलेले नाही. दोघांनीही चूका केल्या. नरसंहार केला. पण त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी नागरी वस्त्यांवर अणूबाँबचे हल्ले करणे प्रचंड चुकीचे होते. यातही अजुन काही मुद्दे लक्षात घ्यावे:

१. युद्धाचा निकाल स्पष्ट झाला होता. जर्मनी हरले होते, इटली संपली होती. जपानचा पराभव नितळ स्पष्ट होता. अश्या परिस्थितीत सर्वसंहारक शस्त्राचा वापर करणे निव्वळ उद्दामपणा होता.

२. अणुबॉम्बचा वापर करण्याचे एक मुख्य कारण असे होते की एवढा खर्च करुन तयार केलेले शस्त्र न वापरता युद्ध जिंकले गेले असते तर मोठ्या खर्चाचे समर्थन अवघड गेले असते. शिवाय शस्त्र तयार झाले आहे तर त्याचा उपयोग झालाच पाहिजे या मताचे काही जनरल्स आणी काही राजकारणी होते.

३. अणुबाँबचा संहार किती महाभयानक असेल याची ओपेनहायमर सकट कुठल्याच शास्त्रज्ञाला पुर्णपणे कल्पना नव्हती. त्याने जो भीषण संहार झाला ते कळल्यावर त्या मोहिमेत सहभागी असलेल्या अनेक शास्त्रज्ञांना धक्का बसला होता. मोहिमेत भाग घेतलेला एक वैमानिक तो भीषण संहार बघुन चक्क वेडा झाला. अश्याप्रकारचे अज्ञान आणी अनभिज्ञता असताना केवळ " प्रयोग " म्हणुन किंवा त्यांची " संहारकता तपासण्यासाठी " केवळ अणुबाँबचा उपयोग झाला हे सर्वशृत आहे. हा एक "कॅलक्युलेटेड युज" नव्हता तर केवळ " प्रयोग " होता. याची तुलना मी केवळ नाझी यातना तळांवर गंमत म्हणुन जिवंत मनुष्यांवर केल्या गेलेल्या वैद्यकीय प्रयोगांशी करेन.

४. अति संहारक जैविक आणि आण्विक अस्त्रे (अणुबाँब नव्हे) हिटलर आणि अमेरिका दोहोंकडेही होती. परंतु जेव्हा पारडे समसमान होते तेव्हा प्रतिस्पर्ध्याची तयारी किती आहे हे माहिती नसल्यानी दोन्ही देशांनी ती अस्त्रे वापरली नाहित. हिटलर मेल्यावर मात्र अमेरिका निर्धास्त झाली आणि त्यांनी तोवर विकसैत केल्या गेलेल्या सर्वात प्रबळ आण्विक अस्त्राचा उपयोग करुन बघितला. अर्थात नंतर त्यांनी तो उपयोग केला कारण आता " प्रयोग करण्यात काही धोका नव्हता"

क्लिंटन's picture

31 Jul 2012 - 12:49 pm | क्लिंटन

मला बाकी कशाविषयी चर्चा करण्यात फारसा इंटरेस्ट नाही. मला केवळ एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे की अमेरिकन सरकारने त्यांच्या देशाच्या नागरिकांच्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या नागरिकांच्या जीवाची पर्वा का करावी? जपान सरकारच्या चुकांची शिक्षा जपानी नागरिकांना द्यायची नाही आणि म्हणून ती अमेरिकन नागरिकांना द्यायची असली बिनबुडाची बेगडी मानवता अमेरिकेला मान्य नव्हती त्यात काय चूक आहे?

हा हल्ला जपानने शरणागती पत्करल्यानंतर झालेला नव्हता त्यामुळे केवळ गंमत म्हणून केलेल्या प्रयोगांशी त्याची तुलना करणे सर्वथैव अयोग्य आहे. आणि हा हल्ला जपानने शरणागती पत्करल्यानंतर केला असता तर त्याचे समर्थन मी नक्कीच केले नसते.

तेव्हा मला केवळ जपान सरकारच्या दुराग्रहासाठी अमेरिकन सैनिकांचे बळी का द्यावेत या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.

युध्दाच्या दरम्यान माझ्या देशाच्या एका नागरिकाचा जीव शत्रू देशातील हजार जीवांपेक्षा जास्त प्रिय आहे असे अमेरिकेच्या अध्यक्षांना वाटले तर त्यात काय चूक आहे? असली शत्रूला फालतूची मानवता दाखविणे मला तरी अजिबात मान्य नाही. (अवांतरः भारत-पाकिस्तान युध्दाची वेळ आली आणि फॉल-आऊट सांभाळण्याइतकी भारताची ताकद/क्षमता तोपर्यंत आली असेल तर वाट न बघता भारताने पाकिस्तानवर पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकावा असे मला स्पष्टपणे वाटते. शत्रूविषयी तुमचे हृदय जरूर भळभळत असेल माझे नाही. (विशेषतः युध्दप्रसंगी) एका भारतीय नागरिकाचा जीव माझ्यासाठी हजारो पाकिस्तानींपेक्षा अधिक मूल्यवान असेल.

जर १९४५ मध्ये जपानवर अणुहल्ला करून पॉल-आऊट सांभाळायची अमेरिकेची क्षमता असेल तर तसे त्यांनी केले. माझे भारत- पाकिस्तान संदर्भात असे मत असेल तर अमेरिका-जपान संदर्भात वेगळे मत ठेवायचे कारण मला अजिबात वाटत नाही.

मृत्युन्जय's picture

31 Jul 2012 - 2:25 pm | मृत्युन्जय

मी परत एकदा आपले लक्ष ज्या परिस्थितीत आणी ज्या कारणासाठी अणुबाँबचा वापर करण्यात आला त्याकडे वेधु इच्छितो:

१. जपानचे सर्व मित्र राष्ट्र शरण आले होते. जपानदेखील पराभवाच्या छायेत होते. सपशेल पराभवाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी होती. अश्या परिस्थितीत अणू बाँबचा वापर सर्वथा अयोग्य होता.

२. आण्विक अस्त्र युद्ध थांबवण्याचा एक मार्ग म्हणुन नव्हे तर केलेल्या खर्चाच्या पुर्ततेसाठी आणि एक प्रयोग म्हणुन करण्यात आला हे विशेष आहे. अश्या परिस्थितीत अमेरिकेने अळीमिळी गुपचिळी हाताची घडी तोंडावर बोट ठेवुन बसणे अपेक्षित नव्हते. त्यावेळेस आणी त्या परिस्थितीत जितकी शक्ती वापरणे गरजेचे होते ती वापरण्यात काहीच गैर नव्हते. प्रश्न आहे त्या परिस्थितीत थेट अणूबाँब वापरण्याचा ज्याच्या शक्तीच योग्य अंदाज खुद्द अमेरिकेला देखील नव्हता. ही अमेरिकेसाठी केवळ एक गंमत किंवा प्रयोग होता.

३. जर स्वसंरक्षणाच्या दृष्टीने आण्विक प्रयोग योग्य ठरत असेल तर प्राप्त परिस्थितीमध्ये डेथ मार्च देखील वाजवी ठरते. मला नाही वाटत जपान्यांकडे अजुन काही उपाय होता. आणी तसे असेल तर मी पहिल्या प्रतिसादात जे म्हटले की " दूसर्‍या महायुद्धातल्या पार्श्वभूमीवर तरी दोघेही एकाच माळेचे मणी" ते अतिशय योग्य विधान ठरते.

युद्धाच्या सुरुवातीला किंवा जेंव्हा विजय दृष्टीक्षेपात नव्हता तेव्हा त्याचा वापर करणे अगदी योग्य होते. आजही भारताने पाकड्यांवर एक - दोन अणुबाँब टाकले तर मी त्याचे समर्थनच करेन. पण पाकिस्तान पराभवाच्या छायेत असताना आणि आता केवळ गुडघेच काय ते टेकायचे बाकी असताना त्याचा प्रयोग केला तर मानवतेच्या दृष्टीकोनातुन मी त्याचा विरोधच करेन. मी प्रथम एक माणूस आहे आणि मग एक भारतीय आहे हे माझ्या सुदैवाने मी अजुन विसरलेलो नाही म्हणुन माझ्यातली माणुसकी अजुन शिल्लक आहे.

शत्रूविषयी तुमचे हृदय जरूर भळभळत असेल माझे नाही.

अतिशय बेजबाबदार आणि घातकी वक्तव्य. हे खासकरुन तुमच्याकडून आले याचा अतीव खेद होतो आहे. Despite all the difference we have / had, I always regarded you as a level headed person and it is disappointing to hear something like this from you.

असो. यानंतर या संदर्भात अजुन चर्चा करणे मुर्खपणाचे ठरेल असे वाटत असल्याने माझ्याकडुन चर्चेला विराम.

क्लिंटन's picture

31 Jul 2012 - 2:35 pm | क्लिंटन

Despite all the difference we have / had, I always regarded you as a level headed person and it is disappointing to hear something like this from you.

यू आर वेलकम. पण इतरांना काय वाटते/वाटेल हा माझ्यासाठी मते बनवायचा मापदंड अजिबात नाही.

यानंतर या संदर्भात अजुन चर्चा करणे मुर्खपणाचे ठरेल असे वाटत असल्याने माझ्याकडुन चर्चेला विराम.

माझ्याकडूनही.

मृत्युन्जय's picture

31 Jul 2012 - 2:56 pm | मृत्युन्जय

प्रतिसाद नक्की फायनल झाला ना?

मन१'s picture

30 Jul 2012 - 12:08 pm | मन१

मालिकेचा शेवट काही प्रश्न पाडून गेला...

मंदार दिलीप जोशी's picture

30 Jul 2012 - 3:05 pm | मंदार दिलीप जोशी

सुन्न.. जस्टीस मर्फी व जस्टिस रूटलेज यांनी वर्तवलेली शक्यता दुर्देवाने खरी ठरतेय. सद्दामच्या बाबतीत तेच झाले. बाकी बार्काव्यान्साहीत असलेली हि लेखमाला (नेहमीप्रमाणेच) अप्रतिम. पुन्हा १दा धन्यवाद.
>> सचिनला अनुमोदन

Dhananjay Borgaonkar's picture

30 Jul 2012 - 3:17 pm | Dhananjay Borgaonkar

मासाहारुचा इतिहास उलगडुन सांगितल्या बद्दल धन्यवाद.
खुपच मस्त झालाय शेवटचा भाग.

सहज's picture

30 Jul 2012 - 3:18 pm | सहज

हॅम्टन साईड्सच्या ह्या लेखावर आधारीत हा लेख होता काय?

जनरल होम्मावर चालवलेल्या खटल्यावरुन नव्हे तर जगातल्या कोणत्याही घटनेबद्दल मत मतांतरे होतील. युद्धाची झळ निरपराधांना बसते इथे तर होम्मो उच्च लष्करी अधिकारी. फिलीपाईन्समधे काय सांस्कृतीक मंडळ घेउन जनरल होम्मो आला नव्हता.

एकंदर जपान व दुसरे महायुद्ध या इतिहासाच्या अभ्यासातुन पहाता हा लेख व त्याचे ध्येय व खल काय पटला नाही.

एप्रील २०१२ मधे आंतरराष्ट्रीय न्यायालयात लाबेरीयाचा अध्यक्ष चार्ल्स टेलरला देखील शिक्षा झाल्यावर अमेरीकेलाच दोष द्यावासा वाटला.

Although Taylor was not on the battlefield in Sierra Leone, the court saw his position of power as president of the neighboring country and the use of his own military's capabilities to stoke up RUF rebels as making him directly responsible for the bloodshed he encouraged.

Taylor does not see himself as a war criminal but as a victim -- a leader wronged by corruption and a hypocritical hand of justice with a political agenda.

"I never stood a chance," he said last week during his final courtroom stand. "Only time will tell how many other African heads of state will be destroyed."

Taylor accused the United States government of throwing the trial by paying prosecutors millions of dollars and claimed that witnesses had been bought.

He has expressed no remorse and insisted his intent was far from what had been portrayed by prosecutors. He has described himself as a peacemaker, saying he should be spared a harsh sentence.

His defense attorneys pointed to the former Liberian president's role in the peace process that ended the civil war as a mitigating factor in his sentencing.
----------
http://edition.cnn.com/2012/05/30/world/africa/netherlands-taylor-senten...

भविष्यात चार्ल्स टेलरच्या बाजुनेही लेख वाचायला मिळेल बहुदा.

जयंत कुलकर्णी's picture

30 Jul 2012 - 3:33 pm | जयंत कुलकर्णी

हो ! त्याच लेखावर व अजून एका लेखावर. मी तसे दुसर्‍या भागात लिहिले होते. हा लेख मी कॉपी करून ठेवला होता पण त्याचे नाव विसरलो. दुसर्‍या डॉक्युमेंटचे नाव लिहिले आहे.

तुम्ही जे लिहिले आहे ते जेत्यांचा न्याय व जिंकणे महत्वाचे का हा मुद्दा अधोरेखीत करत आहे.

रणजित चितळे's picture

30 Jul 2012 - 4:40 pm | रणजित चितळे

अप्रतिम

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2012 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

जपानी इतिहासातील एका महत्वाच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकल्याबद्दल आभारी आहे.¦

अन्या दातार's picture

30 Jul 2012 - 11:12 pm | अन्या दातार

सहमत

जयंत कुलकर्णी's picture

31 Jul 2012 - 3:26 pm | जयंत कुलकर्णी

काही प्रश्न मनात उभे राहतात -
१ युद्धात गुन्हे फक्त पराभूत राष्ट्रांकडून घडतात का ?
२ जर दोन्ही बाजूने माणूसकीला काळीमा फासण्याचे गुन्हे घडत असतील तर दोन्ही बाजूंच्या लोकांवर खटला का भरला जाऊ नये.
३या कामी युनो काय काम करते ?
४ होम्माच्या बाबतीत सामान्य सैनिक सुटले, ज्यांनी अत्याचार केले. ज्यानी युद्ध सुरू केले ते राजे ही सुटले. त्यांचा न्याय कोणी व कसा करायचा.
५ युरोपियन राष्ट्र किंवा युरोपियन वंशाच्या राष्ट्रावर अमेरिकेने अणूबाँब टाकला असता का ?
६ मी असे म्हणतो कारण कूटच्या (माझा यावरचा लेख वाचणे-मला आता सापडत नाही ) युद्धात भारतीय सैनिकांचे याहूनही जास्त हाल झाले तेव्हा कुठल्याही गोर्‍या राष्ट्राध्यक्षांनी या बाबतीत असे काही केलेले आढळले नाही.
७ शेवटी युद्धगुन्हेगार म्हणजे काय ?
असे अनेक प्रश्न..............

अस्वस्थामा's picture

31 Jul 2012 - 4:28 pm | अस्वस्थामा

आपल्या प्रत्येक प्रश्नाशी सहमत...

पण तुम्हीच सांगा उत्तरे आहेत एवढी सोपी सरळ ?

जयंत कुलकर्णी's picture

31 Jul 2012 - 5:03 pm | जयंत कुलकर्णी

आहेना !
म्हणूनच युद्ध जिंकणे फार म्हणजे फार महत्वाचे आहे.....

मृत्युन्जय's picture

31 Jul 2012 - 5:15 pm | मृत्युन्जय

शतप्रतिशत सहमत.

एकदा युद्ध जिंकल्यावर सगळ्या गोष्टी जस्टिफाय करता येतात आणि लोकांकडुन वदवुन सुद्धा घेता येतात. अगदी वॉर क्राइम्स सुद्धा.

प्रश्नांचा रोख समजला. त्यातून उत्तर अपेक्षित नाही हे ही समजते.

३या कामी युनो काय काम करते ?

जे इराक युद्धात अमेरिकेविरोधात करताना (किंवा काहीही न करताना) दिसले तसेच करते असे म्हणता यावे.

४ होम्माच्या बाबतीत सामान्य सैनिक सुटले, ज्यांनी अत्याचार केले. ज्यानी युद्ध सुरू केले ते राजे ही सुटले. त्यांचा न्याय कोणी व कसा करायचा.
राजे लोकांबद्द्ल त्यामुळच मला आश्चर्य वाटतं. केवळ जपानच्याच राजाला नाही, तर इटालीच्या राजालाही सोडून दिलं गेलं होतं. मला वआटतं पहिलोया महायुद्धात तुर्कस्थान आणि जर्मनीचे राजवंश खालसा केले गेले; सत्ताभ्रष्ट केले गेले; पण त्या दोहोंचे सत्ताधीश कधीही खटल्याला सामोरे गेले नाहीत.

५ युरोपियन राष्ट्र किंवा युरोपियन वंशाच्या राष्ट्रावर अमेरिकेने अणूबाँब टाकला असता का ?
तेव्हाची परिस्थिती पाहता "टाकला नसताच" असे खात्रीने म्हणू शकत नाही. महायुद्धोत्तर काळात नेहमीच रशिया -अ मेरिका ह्यांना एकमेकांची धास्ती वाटायची, कधीही बॉम्ब टाकतील म्हणून.(baby boomers ह्या डॉक्युमेंट्रीमध्ये national geographic वाल्यांनी ह्याचे बरेच वास्तववादी चित्रण शीतयुद्ध कालीन साक्षीदारांकडून केलेले आहे. कित्येकदा पाहताना इतकी घाबरलेली, बावचळलेली माणसे पाहून खुदकन हसूही येते. एकदा तर चक्क अमएरिकन शाळांत "एकाएकी अणुस्फोट होउ लागला(अणुस्फोटाची सूचना आल्यास) तर काय काळजी घ्यावी " ह्याबद्दल थिअरी व प्रॅक्टिकल करुन दाखवणे सुरु केले गेले.) दोघांनाही सुरुवातीला वाटत होते की समोरचा कधीही आपल्यावर अणुबॉम्ब टाकेल.

बाकी प्रश्नांची वर म्हटाल्याप्रमाणं सोपी उत्तरं नाहीत.

एस's picture

3 Aug 2012 - 12:40 am | एस

>>> ६ मी असे म्हणतो कारण कूटच्या (माझा यावरचा लेख वाचणे-मला आता सापडत नाही ) युद्धात भारतीय सैनिकांचे याहूनही जास्त हाल झाले तेव्हा कुठल्याही गोर्याझ राष्ट्राध्यक्षांनी या बाबतीत असे काही केलेले आढळले नाही.

सर, तुम्हाला Battle of Pah-Qy-Ti-Koot (1855) असे म्हणायचे आहे का?

Indian

ह्या शब्दाचे शब्दशः

भारतीय

असे भाषांतर झाले आहे काय? कृपया खुलासा कराल का?

संदर्भ -

जयंत कुलकर्णी's picture

3 Aug 2012 - 7:17 am | जयंत कुलकर्णी

पहिल्या महायुद्धातील कूट येथील युद्ध....यावर मी एक मोठ्ठा लेख लिहिला होता (तसे मा्झे सगळेच लेख मोठ्ठे असतात म्हणा.....;-)

एस's picture

3 Aug 2012 - 10:24 pm | एस

अच्छा...
जालावर माहिती शोधण्याचा प्रयत्न करून पाहतो... धन्यवाद.

मदनबाण's picture

31 Jul 2012 - 3:50 pm | मदनबाण

ही लेखमाला आवडली ! :)

सुहास झेले's picture

31 Jul 2012 - 5:17 pm | सुहास झेले

काका, नेहमीप्रमाणे निव्वळ अप्रतिम लेखमाला....

प्लीज युद्धकथा ही लेखमाला थांबवू नका, अजून अश्याच महत्वाच्या व्यक्तींवर माहिती द्याल अशी अपेक्षा करतो :) :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Jul 2012 - 5:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

दोन्ही वाक्यांशी १००% सहमत

नरेश माने's picture

8 Jan 2016 - 4:01 pm | नरेश माने

मस्तच आहे ही लेखमालिका अनेक माहित नसलेल्या गोष्टींबद्दल माहिती मिळतेय.