कोर्टाची पायरी (भाग-२)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
6 Jul 2012 - 4:16 pm


भाग १ वरुन पुढे..

जेवण आवरून मी न्यायदेवतेच्या प. प्रां. पुन्हा प्रवेश केला. दहा एक मिनिटांनी कोर्ट चेंबरमधून बाहेर येऊन खुर्चीत स्थानापन्न झाले. चष्मा पुसून त्यांनी समोरच्या कागदावरचा मजकूर वाचला अन नुकत्याच येऊन खुर्चीत शिरत असलेल्या सहायिकेशी पुन्हा मसलत केली.
मग दाराकडे तोंड करून ते बोलले, 'कुलकर्णी वकील...'
त्यासरशी आतापर्यंत गायब असणारा एक पांढऱ्या कपड्यातला ‘पट्टेवाला’ दाराशी दिसू लागला. त्याने ‘आलेपाक वालेय...’ च्या सुरात आरोळी दिली, 'कुलकर्णी वकी SS ल...'.
मी पट्टेवाल्याचे निरिक्षण केले. पण त्याच्या पेहेरावात 'पट्टा' नामक जिन्नस मला कुठेही आढळला नाही.
मग जजसाहेबांनी भराभरा काही नावे सांगितली. ती मला मुळीच ऐकू आली नाहीत. पण दूर दारापाशी असलेल्या 'आलेपाक' वाल्याला बरोबर समजली. त्याने पटापट सर्व नावे खड्या आवाजात पुकारली. त्याबरोबर वातावरणात थोडी गडबड उडाली. बरेचसे काळे डगले एकदम आत आले. आतली बरीचशी मंडळी बाहेर गेली अन बाहेरची आत आली. त्यामध्ये एक पंचविशीची ठेंगणी ठुसकी गोरटेली मुलगी होती. तिने सलवार कमीज पहेनले होते अन ओढणीचा पदर डोक्यावर घेतला होता. बालूशाहीच्या आकाराच्या तिच्या चेहऱ्यावरून बालूशाहीवरून तूप निथळावे तसा मठ्ठपणा निथळत होता. मघाचे ताज्या दमाचे तरुण वकील हातात कायद्याचे पुस्तक घेऊन तिच्या पुढे चालत होते. तिच्या मागून सुमारे तिच्या दीडपट उंचीचा तिशीच्या आसपासचा एक तरुण चालत आला.
ता. द. त. वकील डेस्कापुढे उभे राहिले अन ठे. ठु. तरुणी लाकडी पिंजऱ्याजवळ, 'लाजते, पुढे सरते, फिरते...' अशा ष्टाइलमध्ये उभी राहिली. मागून आलेला तरुण तिच्यापासून दोन फुटांवर किंचित मागे उभा राहिला.
मुळ्येसाहेबांनी नाकावरचा चष्मा अन लटकणारा जबडा वर ढकलून ठे. ठु. तरुणीकडे एकवार पाहिले. घसा साफ केला अन ते बोलले,
'हं, कशासाठी डिवोर्स हवा आहे ?'
ठे. ठु. तरुणी मान खाली घालून गप्पच उभी.
पुन्हा जजसाहेबांनी विचारले, 'का डिवोर्स घ्यायचा आहे, काही भांडण आहे का ?'
ठे. ठु. ने मान वर करून डोळ्यांच्या पापण्या २ वेळा फडफडवल्या, डोक्यावरचा ओढणीचा पदर मागेपुढे केला अन पुन्हा मान खाली घातली.
जजसाहेबांनी वैतागून ता. द. त. वकीलांकडे नाराजीने पाहिले. ता. द. त. वकील हसऱ्या चेहेऱ्याने पुढे झाले अन तरुणीला उद्देशून म्हणाले, 'घाबरू नका, ताई ! सांगा स्पष्ट सगळं साहेबांना.’
ठे. ठु. च्या एकंदर आविर्भावावरून ती घाबरत वैग्रे असेल असे मला चुकूनही वाटले नाही.
तिने मान एकदा इकडे अन एकदा तिकडे झटकली. मग डोक्याला ताण देऊन जड जिभेने ती बोलली,
'विचार...विचार...विचारामुळे, साहेब..'
साहेब हैराण झाले. 'मग लग्नापूर्वी नव्हता का केला विचार ?’
ता. द. त. वकीलही गोंधळले. त्यांनी जरा डोके झाडल्यासारखे केले. बहुधा आपण पक्षकाराला पढवलेले डायलॉग आठवून पाहात असावेत. इतक्यात मागे उभा असलेला तो तरुण (तोच तिचा विभक्त होऊ घातलेला पती असल्याचे मला नंतर समजले) मदतीला धावला.
'अं, म्हणजे वैचारिक मतभेद .., वैचारिक मतभेदामुळे, साहेब.'
तो बऱ्यापैकी शिकला सवरलेला अन कोर्टाच्या वातावरणाला सरावलेला वाटला.
'असं, असं. वैचारिक मतभेद काय ?' ...जजसाहेब.
आता ठे. ठु. ला गळा फुटला. 'व्हय, व्हय. वैचारिक मतभेद..'
प्रपंचात वैचारिक मतभेद असला तरी या मुद्द्यावर मात्र दोघा पती-पत्नींची एकवाक्यता दिसली.
'एखादे उदाहरण सांगू शकाल ?' जजसाहेब.
ठे. ठु. तरुणीचा चेहरा पुन्हा मठ्ठ दिसू लागला. तिने मदतीच्या अपेक्षेने वि. हो. घा. प. कडे पाहिले. तो पुन्हा मदतीस धावला.
'म्हणजे तसा खास काही प्रसंग नाही आठवत आता पण वारंवार वैचारिक मतभेद होते.'
'वैचारिक मतभेद' या मुद्द्यावर तो ठाम दिसला.
जजसाहेबानी आळीपाळीने दोघांकडे रोखून पाहिले. पण 'वैचारिक मतभेदा'च्या भिंतीपलीकडचे काहीच दिसेना. ते पुन्हा हैराण झाले. मग त्यांनी रोख बदलला.
'मुले आहेत का ?'
'व्हय' ठे. ठु. तरुणी.
'किती ?'
'दोन.'
'त्यांची कस्टडी, ..आपलं, ताबा कुणाकडे पाहिजे ?'
'माज्याकडं, साहेब'
'त्यांच्या पालन-पोषणाची काय सोय ?'
ठे. ठु. तरुणीचा चेहेरा आणखीनच मठ्ठ दिसू लागला.
'तुमच्या आर्थिक मिळकतीची काही व्यवस्था आहे का ?' जजसाहेबांनी आपला प्रश्न स्पष्ट करून सांगितला.
आता ता.द.त. वकील मदतीला धावले. 'साहेब, पोटगी मागितली आहे.'
'व्हय, पोटगी मागीतल्याली हाय.' तिने वकिलांची री ओढली.
जजसाहेबांनी वि. हो. घा. प. कडे अपेक्षेने पाहिले. त्याची काहीच हरकत दिसली नाही. मग त्यांनी समोरच्या कागदावर काही नोंद केली अन म्हणाले, 'ठीक आहे..बसा.'
वि. हो. घा. पती पत्नी मागे जाऊन लाकडी बाकड्याच्या दोन विरुद्ध टोकांवर टेकले. ता.द.त. वकील पुन्हा डेस्कापाशी जाऊन कागदे आवरू लागले. फायली अन पुस्तकांचा ढिगारा सावरत ते मागे आले अन आपल्या पक्षकारांकडे पाहून खूण करून बाहेर पडले.. त्यासरशी ते दोघे उठून त्यांच्यापाठोपाठ बाहेर पडले.
जजसाहेबांनी पुढ्यातला पाण्याचा ग्लास घशात रिकामा केला अन खिशातून पांढराशुभ्र रुमाल काढून खसाखसा चेहरा पुसला. मग पेनाचे टोक जबड्यावर टेकवून समोरच्या कागदावरच्या नोंदी लक्षपुर्वक न्याहाळल्या अन चष्मा काढून ते खुर्चीत जरा मागे रेलून बसले. २-४ मिनिटे अशीच रेंगाळत पसार झाली.
आता आमचे वकील अन आमच्या प्रतिपक्षाचे वकील डेस्कापुढे उभे राहिले.
मी खुर्चीतच अंमळ सावरून बसले.
खर्ज लावून नांदी व्हावी तशा नरम संभाषणाने दोन्ही वकिलांनी सुरुवात केली. सुमारे १० मिनिटे संभाषणाच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांची देवाण घेवाण इ. कार्यक्रम चालला. मग दोघांचा आवाज थोडा वरच्या पट्टीत गेल्यावर मला काही वाक्ये ऐकू येऊ लागली.
प्र.प. वकील मुळ्येसाहेबांना म्हणाले , 'साहेब, एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार इतक्या रकमेचा सेटॉफ आहे. वादींनी त्याचे काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही..'
'साहेब, ती बिले कंपनीच्या इतर गावातील शाखांची आहेत त्याचा या शाखेशी काहीच संबंध नाही.' पाटील वकील.
'पण कंपनी एकच ना..'
'तिथल्या कामाचा अन इथल्या कामाचा काही संबंध नाही...' पाटीलांनी आपले टुमणे चालूच ठेवले.
थोडा वेळ दोघेही बोके गुरागुरावे तसे एकमेकांवर गुरगुरले. आता जजसाहेबांनी हस्तक्षेप केला.
'ठीक आहे, ठीक आहे. पण आता प्रतिवादींचे काय म्हणणे आहे ? त्यांना बोलवा.'
प्र. प. वकिलांनी मागे बघून खूण केली. त्याबरोबर मागे बसलेले २-३ गृहस्थ त्यांच्याजवळ जाऊन उभे राहिले. त्यांना कोर्टाने विचारले, 'तुम्ही तडजोडीला तयार आहात ना ? मग भेटला काय वादीला ?'
त्यांच्यापैकी एक भामट्यासारखा दिसणारा गृहस्थ बोलला. 'ते साहेब हजर नव्हते हो हापिसात...'
जजसाहेब पाटीलसाहेबांकडे वळले. 'कुठायेत हो मॅडम ?'
मी खुर्चीतून उठून पुढे गेले अन लाकडी पिंजऱ्यापाशी उभी राहिले.
'तुम्हीच पाहता ना ही केस ?' जजसाहेबांनी चष्मा सावरत सवाल टाकला.
'होय साहेब.' मी.
'तुमचे नुकसान झाले आहे ना ?'
'होय साहेब.'
डिग्रीच्या परिक्षेला जोमाने तयारी करून बसावे अन बिगरीचा प्रश्न पेपरात पडावा तसे मला वाटले.
त्यांनी घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला. ५ वाजून गेले होते. आता कोर्टात अशिले कुणीच नव्हती अन वकीलही एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले होते.
मग एकदम घाई झाल्यासारखे ते प्रतिपक्षाकडे वळले अन त्यांना म्हणाले, 'तुम्ही उद्या या मॅडमकडे जा अन त्यांच्या वरिष्ठांच्या सल्ल्याने त्या सांगतील त्याप्रमाणे रक्कम ठरवून घ्या. अन मग परवा मला भेटा.'
अन समोरच्या कागदावर घाईने २ ओळी खरडून त्यांनी दोन्ही वकिलांना नजरेनेच निरोपाचे विडे दिले अन ते लगबगीने चेंबरमध्ये निघून गेले. बहुधा घरच्या कोर्टाने त्यांना वेळेत हजर होण्याची तंबी दिली असावी.
मी अन आमचे वकील तसेच प्रतिपक्ष अन त्यांचे वकील बाहेर आलो. भामटे गृ. त्वरेने माझ्याजवळ आले अन केसबद्दल चर्चा करू लागले. मलाही आता घराचे वेध लागल्याने मी याच्या तावडीतून सुटका कशी करावी हा विचार करू लागले. इतक्यात पाटीलसाहेब माझ्या मदतीला धावले.
'मॅडम तुम्ही उद्या तुमच्या वरिष्ठांना सांगा कोर्टाचा आदेश आणि मग यांना भेटवा.'
'बरं.' मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन दडादडा कोर्टाची पायरी उतरले अन बाहेरची वाट धरली. एकंदरीत केस कोर्टाबाहेरच मिटतेय म्हणायची. हेच १६ वर्षांपुर्वी केले असते तर कोर्टाची पायरी अनोळखीच राहिली असती ना ?

समाप्त.

रेखाटनप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

आगाऊ कार्टा's picture

6 Jul 2012 - 5:00 pm | आगाऊ कार्टा

तुमचे निरिक्षण खूपच छान आहे.
मग जजसाहेबांनी भराभरा काही नावे सांगितली. ती मला मुळीच ऐकू आली नाहीत. पण दूर दारापाशी असलेल्या 'आलेपाक' वाल्याला बरोबर समजली. त्याने पटापट सर्व नावे खड्या आवाजात पुकारली. त्याबरोबर वातावरणात थोडी गडबड उडाली. बरेचसे काळे डगले एकदम आत आले. आतली बरीचशी मंडळी बाहेर गेली अन बाहेरची आत आली.
अप्रतिम.
ठे. ठु. ने मान वर करून डोळ्यांच्या पापण्या २ वेळा फडफडवल्या...
फारच बारकाईने निरिक्षण करता हो तुम्ही.

मी_आहे_ना's picture

6 Jul 2012 - 5:10 pm | मी_आहे_ना

निरीक्षण आणि त्याचे कथेत वर्णन आवडले. कथेतील पात्रं डोळ्यांपुढे उभी राहिली.
(एक छोटी शंका, कौटुंबिक न्यायालयातच कंपनी डिस्प्यूटची केस चालते का?)

बहुधा आमच्या गावासारख्या छोट्या शहरात कोर्टांची संख्या कमी असल्याने सर्व दिवाणी दावे एकाच कोर्टात चालत असावेत. मागे श्रीयुत परा यांच्या एका प्रतिसादामधून असे समजले की मिपावर वकील लोकांची रेलचेल आहे. तेव्हा याबाबतीत जाणकारांचा सल्ला मिळण्यास अडचण नसावी.
अवान्तर : सदर केस डिस्प्यूटची नसुन नुकसानभरपाईची होती.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2012 - 6:02 pm | श्रीरंग_जोशी

कौटुंबिक न्यायालयांची स्थापना गेल्या काही वर्षांत झाली.
महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यातील खटल्यांच्या संख्येनुसार तेथील न्यायालयांची संख्या बदलते.

४ किंवा ६ न्यायालये असणारी तालुक्याची ठिकाणं मी पाहिली आहेत अन काही ठिकाणी एकाच न्यायालयात दोन तालुक्यांमधील खटले चालतात.

कलम ३०२, ३०७, ३७६ फौजदारी सारखे खटले मात्र सत्र न्यायालयातच चालू शकतात जे शक्यतो जिल्हयाच्या ठिकाणी असते अपवाद तालुक्याची ठिकाणे असणाऱ्या काही शहरांचा.

मी_आहे_ना's picture

9 Jul 2012 - 10:35 am | मी_आहे_ना

प्रतिक्रिये-बद्दल दोघांचेही धन्यवाद.

मी_आहे_ना's picture

6 Jul 2012 - 5:11 pm | मी_आहे_ना

डु.प्र.का.टा.आ.

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2012 - 6:38 pm | श्रीरंग_जोशी

न्यायालयाचे असे चपखल वर्णन बरेच दिवसांनी वाचायला मिळाले.

पहेनले होते च्या ऐवजी परिधान केले होते हे अधिक समर्पक वाटेल.

डिवोर्सलाही मराठी शब्द आहेतच ज्यांचा वापर बराच होतो उदा. घटस्फोट, काडीमोड.

अवांतर - पोटगी या शब्दासाठी खावटी हा शब्द पण बऱ्याच ठिकाणी वापरला जातो...

खावटी हा शब्द नवीन आहे मला तरी. आपण साधारणतः कुठे हा शब्द वाचला/ऐकला कृपया काही सांगू शकाल काय? तेवढीच माझ्या ज्ञानबहर्भर.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2012 - 3:46 am | श्रीरंग_जोशी

या प्रतिसादात त्याचे उत्तर मिळेल.

ज्ञानबहर्भर हा शब्द मी प्रथमच वाचतोय. संस्कृत शब्द आहे का? ज्ञानात भर असा त्याचा अर्थ असावा असा अंदाज आहे. कृपया समजावून सांगावे, तेवढीच माझ्याही ज्ञानात भर.

बॅटमॅन's picture

10 Jul 2012 - 4:45 pm | बॅटमॅन

"त्या" प्रतिसादात याचा उल्लेख/संबंध दिसतच नाही कुठे.

बाकी ज्ञानात भर च्या ऐवजी चुकून ज्ञानबहर्भर असे टंकले गेले.

मन१'s picture

6 Jul 2012 - 6:53 pm | मन१

मस्त मांडलय. "पहेनले" मलाही जरा खटकलच.
पण इंदूरकरांसमवेत किंवा अगदि नागपूरींसोबतही राहिल्यानं भाषेवर असे संस्कार होत असावेत.

एकदम खुसखुशीत लिहिलंय. तुमची निरीक्षणशक्ती अन ते संगणकावर टाइपायची शक्ती दोन्ही मस्त.

अजुन एक : त्या श्रीरंग जोश्यांचं कै ऐकु नका..उगंच स्वतःला कीती वेगवेगळे शब्द माहीती आहेत ते सांगताएत दुसरं कै नै..तुमची लिखाण शैली (वा!!) आवडली आहे तिच चालु ठेवा.

सुनील's picture

7 Jul 2012 - 2:15 am | सुनील

आवडले.

प्रभाकर पेठकर's picture

7 Jul 2012 - 2:44 am | प्रभाकर पेठकर

हुश्श.. माझेही टेन्शन उतरले. कोर्ट म्हंटले की मनावर ताण येतोच. आपण निर्ढावलेले नसतो नं! पण कोर्टाच्या आवारात, अगदी खून पाडलेले, आरोपीही हसत खेळत वकिलांशी गप्पा मारताना दिसतात. ते पाहून मात्र आश्चर्य वाटते.

'कोर्टाच्या पायरी'चे अनुभव, कोर्टाच्या निरिक्षणांसहित अतिशय बोलक्या शब्दांत मांडले आहेत. मनावर दडपणही होते आणि वाचताना मजाही आली.

अभिनंदन.

मस्त लिहिलय, विविध लोकांना दिलेली नाव हि खुप वेगळी वाटली आणी त्यांचा लघुरुपात वापर तर पहिल्यांदा पाहिला. त्यामुळे वाचताना थोड अडखळत होतो
ठे. ठु. -- ठेंगणी ठुसकी (व्वा व्वा, काय नाव ठेवलय, शेवट होता होता ३-४ वेळा परत वर जावुन वाचाव लागल)
ता. द. त. वकील -- ताज्या दमाचे तरुण वकील
वि. हो. घा. प. -- विभक्त होऊ घातलेला पती :-)

--टुकुल

अन्या दातार's picture

7 Jul 2012 - 5:49 am | अन्या दातार

लघुरुपांमुळे रसभंग होत होता.

बार-कावे छान टिपलेत. :-)

शुचि's picture

7 Jul 2012 - 3:56 am | शुचि

धमाल वर्णन!!!

मजा आली, अजुन काही असतील तर येउद्या किस्से.

अमितसांगली's picture

7 Jul 2012 - 8:41 am | अमितसांगली

नेहमीप्रमाणेच उत्तम...

स्मिता.'s picture

9 Jul 2012 - 2:28 pm | स्मिता.

दोन्ही भाग एकत्र वाचून काढले, फार बारीक निरिक्षण करून छान लिहिलं आहे. वाचायला मजा आली.

पण ठिकठिकाणी लघुरूपं वापरल्याने तिथे अडखळून थोडा विचार करून मग पुढे जायला लागत होतं. पुढच्या वेळेपासून तेवढं टाळल्यास मस्त लिखाण :)

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद व सूचनांबद्दल आभार.
बहुतेकांनी माझ्या सुक्ष्म निरीक्षणाबद्दल लिहिले आहे. माझ्या मते माझी निरीक्षणशक्ती तितकीशी चांगली नाही. पण न्यायालयात बसल्यावर दुसरे काही कामच नसल्याने ते काम चांगले जमले.