कोर्टाची पायरी (भाग-१)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
4 Jul 2012 - 12:51 pm

दुपारचं जेवण बिवण शिस्तीत झालेलं. पोटातल्या अन्नाला सद्गती लाभत असल्याने डोळ्यांच्या पापण्या वारंवार अधोगतीस जाऊ पाहत होत्या. त्यांची गती रोखण्यासाठी हपिसातले कागद खालचे वर अन वरचे खाली करायचा उद्योग सुरु करावा काय या विचारात असताना एकदम भ्रमणध्वनी भुणभुणू लागला. बघितले तर खुद्द बॉस नं. १.
'मॅडम ?'
'यस सर् !'
'अहो उद्या त्या अपीझ इंजीन्सची तारीख आहे बघा कोर्टात. जरा पाटील वकिलांना फोन करा.'
'यस सर् !' ...मी.
सहा वर्षापूर्वी मी बदलीवर या हापिसात आले तेव्हा एका कुदिनी, तत्कालीन बॉस नं. १. ची सासू (त्याच्या घरी ) पाहुणी आल्यामुळे त्याची मन:स्थिती अतिशय नाजूक असताना हपिसातल्या एका स्फोटक क्षणी त्याने, या (तेव्हाच्या ) १० वर्षापूर्वी दाखल केलेल्या एका नुकसान भरपाई दाव्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. 'मला या केसचा पूर्वेतिहास माहिती नाही, मला कोर्टाचा अनुभव नाही, हपिसातलं काम सोडून त्या वकिलाच्या पाठी कुठ फिरत बसू ?' इ. इ. वचने त्या स्फोटक क्षणाचा नाजूक तोल सांभाळता सांभाळता माझ्या ओठावरच विरून गेली. अन गाफील नसलेल्या त्या क्षणी हे कोर्टाचं खटलं माझ्या गळ्यात पडलं. सहा वर्षात कोर्टापेक्षा वकिलाच्या हपिसाच्याच वाऱ्या जास्ती झालेल्या. आता केस १६ वर्षे मुरून मुरून, तितकीच जुनी दारू पिऊन झिंगलेल्या अट्टल बेवड्यासारखी रंगलेली. प्रतिपक्ष खेटे घालघालून घायकुतीला आलेला.
वकीलसाहेबांना भ्रमणध्वनी केला.
'मॅडम, उद्या ११ वा. कोर्टात या.' ...वकील साहेब.
'कुणाच्या कोर्टात ?' ....मी.
हो, पहिल्यांदा अशाच आमंत्रणावरून उत्साहानं कोर्टात गेले अन वकिलाला शोधता शोधता पुरेवाट झाली. भ्रमणध्वनी त्यानं बंद केलेला. तेव्हापासून धडा घेतलेला.
'अहो सरकारी कोर्टात ! ' ...वकील साहेब.
'तस नव्हे, कोर्टाचं नाव काय ?' ...मी.
'हां, हां .मुळ्ये मुळ्ये. मुळ्येसाहेबांचं कोर्ट.'
दुसरे दिवशी सकाळी ११ च्या ठोक्याला मी कोर्टाच्या आवारात अनेक दुचाक्यांच्या गर्दीत माझी दुचाकी लावली अन अदबशीरपणे कमानीच्या दरवाज्यातून न्यायदेवतेच्या पवित्र प्रांगणात प्रवेश केला. समोर भिंत अन तीन बाजूंनी तीन उंच इमारती. मधल्या मोकळ्या जागेत काळे डगले पहेनलेले अनेक वकील फायली घेऊन इकडे तिकडे फिरत होते. माझ्या समोर असणाऱ्या पाठमोऱ्या काळ्या डगल्याला मी विचारले,
'मुळ्ये , मुळ्येसाहेबांचं कोर्ट ?'
काळ्या डगल्याने आपला मोहरा माझ्याकडे वळवला अन एक बोट वरती केलं.
मी दचकलेच. म्हणजे केसचा निकाल लागायच्या आधीच मुळ्येसाहेबांचाच निकाल लागला की काय ?
मी जरा निरखून काळ्या डगल्याच्या चेहेऱ्याकडे पाहिल्यावर लक्षात आलं की त्याच्या तोंडात तंबाखूचा तोबरा असून तो डाविकडील इमारतीच्या पहिल्या मजल्याकडे पाहत आहे.
मी आभार प्रदर्शित करून जिन्याकडे वळले. मुळ्येसाहेबांचं कोर्ट पहिल्या मजल्यावर होतं.
कोर्टाची पायरी चढता चढता मनात दोन विचार आले. १. किती वेळ ताटकळावं लागणार आहे बरं आज ? २. हपिसातला बागकामाचा कंत्राटदार मुळ्ये हा कोर्ट मुळ्ये यांचा पाहुणा असेल काय ?
कंत्राटदार मुळ्येचा चष्मा, चष्म्यामधून पाघळलेल्या मेणासारखा चेहरा अन वाक्य बोलून झाल्यावर खालीच लटकणारा जबडा माझ्या डोळ्यासमोर आला अन आठव्या पायरीला मी अडखळले. छे छे, कोर्ट म्हणजे एकदम भारदस्त, वजनदार प्रकरण असणार. कं. मुळ्येशी त्यांचा संबंध असणं शक्य नाही. पायरीवरच्या मुंगळ्याबरोबरच मी मनातल्या विचाराला झटकलं. झरझर उरलेल्या पायऱ्या चढून वर आले.
मुळ्येसाहेबांच्या कोर्टाच्या दारात दोन क्षण थबकून पाहिलं. आत जाणारे किंचित वाकडी मान करून जजसाहेबांकडे पाहून, छातीवर हात ठेऊन मान थोडी खाली झुकवून मगच आत शिरत होते. मी आत एक नजर टाकली. पाटील साहेबांचा पत्ता नव्हता. कॉरिडॉरमध्ये जाऊन वकिलसाहेबांना मिस कॉल केला. अन इतरांचं अनुकरण करीत छातीवर हात ठेऊन कोर्टात शिरले.
कोर्ट म्हणजे २० X ३५ चा हॉल. मागचा ७-८ फुटाचा भाग पार्टीशन लावून रेकोर्ड रूम म्हणून वापरात आणलेला. उरलेल्यापैकी १० फुट भाग स्टेजसारखा उंच. त्यावर १ मोठं व २ लहान टेबले, २-४ खुर्च्या आणि भाराभर फायलींचे ढिगारे. त्यातल्या बऱ्याशा खुर्चीवर कोर्ट स्थानापन्न झालेलं. स्टेज जवळ एक ३ फुट उंचीचा लाकडी पिंजरा ठेवलेला. त्याशेजारी २ उभी डेस्के. त्यावर कोपरे टेकवून काळे डगलेवाले दोन वकील गंभीर चेहेऱ्याने अन कुजबुजत्या स्वरात कोर्टाशी काहीतरी बोलत होते.
स्टेज समोर खुर्च्यांच्या एकूण पाच रांगा होत्या. पहिल्या अन दुसऱ्या रांगेतल्या खुर्च्या धडधाकट अन चकचकीत होत्या अन त्यावर काळे डगलेवाले वकील बसले होते. तिसऱ्या रांगेतल्या खुर्च्या धडधाकट पण रंग उडालेल्या, पत्र्याला पोचे आलेल्या होत्या. त्यावर वकिलांचे मदतनीस कागदांचे ढीग सांभाळीत बसले होते. चौथ्या रांगेत हातमोडक्या अन पायतुटक्या खुर्च्या ठेवल्या होत्या अन त्यांचे चेहेरे एकमेकींना मुळीच म्याच होत नव्हते. ही रांग रिकामीच होती. पाचव्या रांगेत एक लाकडी बाकडे लडखडत विसावले होते. त्यावर तुरळक संख्येने पक्षकार मंडळी बसली होती. त्यात बऱ्याच अंशी गावाकडील पावणे दिसत होते.
मी चौथ्या रांगेतली त्यातल्या त्यात धडधाकट खुर्ची पकडली अन आसन जमवले. आजूबाजूला एक नजर फिरवली अन कोर्टाकडे पाहिले. अन खुर्चीवरून पडता पडता वाचले. कोर्टाचा चेहेरा कं. मुळ्येशी भलताच म्याच होत होता. चष्म्याची काच अन गालाखालच्या वळकट्या अंमळ जाड आणि डोक्यावरचे केस किंचित विरळ एवढा तपशील सोडला तर कं. मुळ्ये अन कोर्ट मुळ्ये यात मुळीच फरक दिसत नव्हता. अगदी, लटकणाऱ्या खालच्या जबड्यासहित..! परत हापिसात गेल्यावर कं. मुळ्येकडे कोर्ट मुळ्यांची चौकशी करायचे ठरवले.
डेस्कासमोरचे वकीलद्वय अद्यापि कोर्टाशी ‘गुढ मधुर गुज’ करीत होते. माझ्याकडे असलेल्या त्यांच्या पाठीचे मी बसल्या बसल्या निरिक्षण केले. टक्कलवाल्या गोऱ्या स्थूल वकिलमहाशयांच्या मानेवरच्या दोन लठ्ठ वळकट्या एखाद्या गलेलठ्ठ उंदरासारख्या काळ्या कॉलरीतून बाहेर डोकावत होत्या. तर शेजारी उभ्या असलेल्या उंच काळेल्या वकिलाच्या मांजरासारख्या मिशा त्याच्या मानेबरोबरच इकडे तिकडे झुलत जणू त्या उंदरांचा माग काढीत होत्या. २-४ मिनिटे उन्दरा-मांजरांचा खेळ पाहिल्यावर मला कंटाळा आला.
जरा कान दिल्यावर काही तुटक शब्द माझ्या कानावर येऊ लागले.
'पश्चिमेला मैदान, दक्षिणेला तिवारे यांचे घर...कम्पाउंड च्या पलीकडे १० फुटाची पट्टी....जागा मोजून तुम्ही वादीस देणे...थकबाकी रक्कम परतावा...’ इ. इ. मी पुन्हा कंटाळून आसपासच्या परिसराचे निरिक्षण करावयास सुरुवात केली. त्यात आढळलेल्या काही गोष्टींचे प्रयोजन काही मला समजले नाही. उदा. चारी बाजूंच्या भिंतींवर 'दक्षिण', 'उत्तर', 'पश्चिम', 'पूर्व' अशी, त्या त्या दिशेची नावे लिहिली होती. जजमहाशयांच्या डोक्यावर छतापासून लटकणाऱ्या तारेला एक दिव्याची शेड टांगली होती, पण त्यात दिवा वगैरे काहीच नव्हते. त्यांच्या शेजारी एक कॉम्प्यूटर, प्रिंटर अन एक क्यामेरा ठेवला होता. या वस्तूंचे तोंड कोर्टाच्या खुर्चीच्या विरुद्द्ध दिशेला होते. बहुधा कॉम्प्यूटर चालक आज गैरहजर असावा.
जज मुळ्येसाहेबांनी मधेच तोंडापुढे हात आडवा धरला. पण हाताआडची जांभई माझ्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. मी आजूबाजूला पाहिले. वकील मंडळी, मदतनीस अन शेवटी पक्षकार अशा सर्व स्तरांमधून त्या जांभईचे
पडसाद लाटेसारखे उमटत अन विरत गेलेले मला दिसले. तारेवर बसलेले कावळे उगाचच इकडे तिकडे उडून पुन्हा जागेवर बसावे तसे पुढच्या दोन रांगांमधले वकील मधूनच लगबगीने उठून इकडे तिकडे फिरून पुन्हा येऊन बसत होते. आमच्या वकिलांचा अजुनी पत्ता नव्हता. पुन्हा एक मिस कॉल करावा का या विचारात असतानाच पाटीलसाहेब आत आले. माझ्यापाशी येऊन एक जाडजूड फाईल माझ्या हातात ठेवली अन ते कुजबुजले, 'ही पहा, तोवर मी आलोच....’ अन पुन्हा वळून दारातून बाहेर पडले.
मी 'ती' पाहिली. तिच्यात बरेच बिनकामाचे कागद कोंबलेले होते. मधूनच एखादा महत्त्वाचा कागद दिसत होता. २०० प्रश्नांपैकी नेमका परिक्षेत येणारा प्रश्न कोणता असा प्रश्न एखाद्या मठ्ठ परिक्षार्थीला पडावा तसा, यातला कोणता कागद वाचला असता जजसाहेबांच्या प्रश्नाचे पर्फेक्ट उत्तर देता येईल हा प्रश्न मला पडला.
इतक्यात स्टेजच्या दिशेला थोडा गलबला झाला. पाहिले तर डेस्कापुढचे काळे डगले खुर्च्यांवर येऊन बसले अन ताज्या दमाचे दोन नवीन डगले डेस्कासमोर उभे राहिलेले दिसले. त्यातल्या तरुण वकिलाने हातात कायद्याचे जाडेसे पुस्तक उघडून धरले अन त्यातली तरतूद तो जजमहाशयांना वाचून दाखवू लागला.
'बिफोर कम्प्लिशन ऑफ वन यर ऑफ मॅरेज ....^^**@$^**.......#/*>>**<%$......(((;;$^^^>>//*%.......'
मुळ्येसाहेबांची मान आणि त्याबरोबरच लटकणारा जबडा काळ्या डगल्याच्या बोलण्याच्या तालावर डुलू लागले.
अर्धा एक तास कायद्याच्या किचकट तरतुदींचा किस काढून झाल्यावर वकिलद्व्यय आणि जज अंमळ थकल्यासारखे दिसू लागले. मुळ्येसाहेबांनी चष्मा काढून पुसला अन परत नाकावर ठेवला. शेजारी बसलेल्या सहायिका बाईंशी मसलत केली अन समोरच्या कागदावर काहीतरी खरडले. मग एकदम ते उठून 'चेंबर' असे लिहिलेल्या दारातून आत गेले. त्याबरोबर सर्व काळे डगले बाहेरील दाराकडे चालू लागले. जेवणाची सुट्टी झाली होती.
मी फाईल सांभाळत बाहेर आले. पाटीलसाहेब बाहेर भ्रमणध्वनीवर बोलत उभे होते. त्यांच्याकडे 'ती' सोपवली.
'१ तासाने या' ते भ्रमणध्वनीतून डोके बाहेर काढून वदले.
क्रमशः

रेखाटनप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

गणेशा's picture

4 Jul 2012 - 1:45 pm | गणेशा

छान लिहिले आहे...

लिहित रहा.. वाचत आहे ..

अमित's picture

4 Jul 2012 - 1:50 pm | अमित

वर्णन शैली आवडली

कोर्ट डोळ्यासमोर उभे केलेत :)

प्रचेतस's picture

4 Jul 2012 - 2:28 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.
पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

4 Jul 2012 - 2:14 pm | मुक्त विहारि

जूने दिवस आठवले..

मी_आहे_ना's picture

4 Jul 2012 - 2:17 pm | मी_आहे_ना

छान लिहिलंय, पु.भा.प्र.

कुसुमिता१'s picture

4 Jul 2012 - 2:21 pm | कुसुमिता१

मनोरंजक लिहीले आहे! मजा आली!

मृत्युन्जय's picture

4 Jul 2012 - 3:16 pm | मृत्युन्जय

मनोरंजक आहे. वाचतोय .

अमितसांगली's picture

4 Jul 2012 - 3:28 pm | अमितसांगली

छान वर्णन केलय...

प्रभाकर पेठकर's picture

4 Jul 2012 - 3:43 pm | प्रभाकर पेठकर

अचूक निरिक्षण आणि मोजक्या शब्दांमधून उभारलेला रोमांचकारी कोर्टसीन हेच ह्या लेखाचं पहिल यश म्हणावे लागेल.
पुढील कथानकाची उत्सुकता पुरेशी वाढली असतानाच 'क्रमशः' च्या भिंतीवर डोकं आदळलं. आता पुढील भागांची वाट पाहणे आले.

अभिनंदन आणि शुभेच्छा...!

लय भारी, कोर्टात एखादी केस चालु असताना न हसता बसणे हा सगळ्यात मोठा परिक्षेचा भाग आहे, विशेषतः एखादी जमिन व्यवहाराची केस ज्यात एखादा साक्षिदारीत ड्ब्बल ग्राजवेट साक्षिदार असावा आणि त्याच्यासमोर एखादा नविन वकील.

एकदम खुसखुशीत लेख. पटापटा भाग येउ द्या.

सुनील's picture

5 Jul 2012 - 12:06 am | सुनील

भाग आवडला.

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2012 - 1:45 am | श्रीरंग_जोशी

न्यायालयाचे व न्यायालयीन वातावरणाचे चित्रण खूपच छान!!

मला ते फार भावले कारण माझे वडील न्यायालयातच नोकरीला होते. त्यामुळे नेहमीच चकरा व्हायच्या, कधी डबा पोचवून देणे, कधी काही निरोप देणे या निमित्ताने. कारण न्यायालयात दूरध्वनी फारच कमी असायचे.

न्यायालयाच्या पायऱ्यांवर खेळता खेळता मी लहानाचा मोठा झालोय असे म्हंटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. कुठलेही कौटुंबिक संमेलन असले की माझे काका लोक वडिलांकडून जुन्या व गाजलेल्या खटल्यांचे (त्यातही खास करून खून खटल्यांचे) किस्से ऐकण्यास उत्सुक असायचे.

म्हणूनच चित्रपटांत व टीव्हीवरील मालिकांमधले (नाटकी) न्यायालय कधीच भावले नाही.

सर्व खटला हिंदीमध्ये चालल्यावर शुद्ध उर्दूतून निकालपत्र जाहीर व्हायचे.

"तमाम सबूतो और गवाहो को मद्दे नजर रख्ते हुए ये अदालत मुल्जिम को कत्ल के इस इल्जाम मे गुनहगार करार देती हैं और इस गुनाह के लिए उसे सजा-ए-मौत सुनाती है!"

पुभाप्र!!

रेवती's picture

5 Jul 2012 - 4:51 am | रेवती

लेखनशैली आवडली.