प्रयास

अमृत's picture
अमृत in जनातलं, मनातलं
28 Jun 2012 - 2:05 pm

त्याचे खरे नाव वैभव आम्ही त्याला प्रेमाने 'सोन्टुल' म्हणतो. गोड निरगस चेहर्‍याचा सदा हसतमुख छोकरा, पण दुर्दैवाने जन्मतः मुकबधिर. वैभव आमचे दुसरे आणि शेवटचे अपत्य. मोठा मुलगा सर्वसामान्य अव्यंग. आम्हा उभयता पती पत्नीच्या तिसर्‍या पिढीपर्यंत कुणी मुकबधीर नव्हते. त्यामुळी अनुवंशिकता म्हणता येणार नाही. मात्र तो गर्भात असताना त्याच्या आईने दोन मुलांत अंतर असावे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करण्यासाठी अ‍ॅलोपॅथिक गोळ्या घेतल्या होत्या. औषधीस दाद न देता तो आमच्या कुटुंबात दाखल झाला. बाळंतपण सुलभतेने न होता विलंबामुळे सिझेरीन पद्धतीने करण्यात आले. ६ महिनेपर्यंत त्याच्या बहेरेपणाची जाणीव झाली नाही. त्यानंतर मात्र आवाजाला प्रतिसाद न देण्यामुळे त्याच्या श्रवणशक्ती विषयी शंका वाटू लागली. स्थानिक कान, नाक, घसा तज्ञाकडे त्याच्या कानाची तपासणी केली असता त्याला ऐकू येत नसल्याचे त्यांनी निदान केले. काही औषधी लिहून दिली. एका डॉक्टरचे निदान चुकीचे असू शकते म्हणून आणखी दुसर्‍या नामवंत डॉक्टरकडे धाव घेण्याचे प्रकार सुरू झाले. एकदा नागपूरच्या न्युरोसर्जनकडे देखील तपासणी करून घेतली. तेथेही काही निष्पन्न झाले नाही. त्यांच्याच सल्ल्याने मुंबईच्या जसलोक इस्पितळात तो अडिच वर्षांचा असताना त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. तेथे त्याच्या बहिरेपणावर पक्के शिक्कामोर्तब झाले. आम्हा उभयतांवर तो एक वज्राघातच होता. देवाने कोणत्या कर्माची शिक्षा म्हणून असे मूल आपल्या पोटी जन्माला घातले असे म्हणून मन आक्रंदून उठले. फुटके नशीब आणि दैवाला दोष देण्यापलिकडे असहाय माणूस काय करू शकतो? घरातील कुणी आप्त स्वर्गवासी झाले म्हणजे त्याच शोक काही दिवसांनी ओसरतो परंतु आपल्या लहानग्या मुलाचे उभे आयुष्य एका व्यंगाने ग्रासण्याचे दु:ख क्षणोक्षणी त्याच्या मात पित्याचा जीव जाळत असते. जसलोक इस्पितळात वाक्उपचार तज्ञाचा सल्ला घेऊन श्रवण यंत्र लावण्याचा आणि मूकबधीर शाळेत नाव दाखल करण्याचा हितोपदेश मिळाला.

आमच्या खेडेगावात सुतारकाम करणारा असाच एक एसम होता. तो हवेत बोटे नाचवायचा व तोंडाने मॅ मॅ मॅ मॅ करायचा. त्याला गावातील लोक मुक्यावाडी या नावानेच ओळखायचे. आणखी एका कुटुंबातील लागोपाठ ३ मुले अशीच होती. आपला मुलगा देखील आयुष्यभर असाच मॅ मॅ मॅ मॅ करीत रहाणार हा विचार मनाला छळू लागला की अस्वस्थ व्हायचे. कोणताही व्यवसाय करणारी अशी व्यक्ती असली तर त्याच्या नावाबरोबर मुका-मुकी हे संबोधन हमखास ठरलेले असते. बालपणी अशा मुलांना त्याचे सवंगडी देखील नावा ऐवजी या संबोधनाचा वापर करतात. त्यामागील हिणकस हेतू त्याच्या व्यंगाची जाणीव करून चिडविण्याचा असतो. गंमत अशी की जन्मतः बहिरेपणामुळे ते त्यांच्या गाविही नसते. आपल्या मुलास नियतीने प्रदान केलेले हे विशेषण मातापित्यांना मात्र शिवीसारखे सलते.

एखादा चमत्कार होऊन आपले मुल बोलू लागेल या अभिलाषेपोटी गंडेदोरे, घरगुती सल्ले, देवधर्माचे विधी करण्यात आले परंतु कशालाही यश आले नाही. अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेदिक या तिनही चिकित्सा प्रणालींचे औषधी प्रयोग झाले परंतु गुण आला नाही. अलिकडे कानाचे मागील भगात शल्यक्रियेद्वारे कॉक्लियर इंप्लांट अर्थात एलेक्ट्र्नीक कानाचे रोपण करण्याच्य विदेशी डॉक्टरांच्या प्रयत्नास देखील ५२% यश आल्यची कबुली वृत्तपत्रातून वाचण्यात आली. अर्थात ४-५ लाख रूपये आवाक्या बाहेरचा खर्च करायचा मात्र १००% यशस्वी होण्याची खत्री नाही अस बेभरवशाचा वैद्यकेय इलाज. आजच्या वैज्ञानिक युगात मानवाने चंद्रावर पदार्पण केले. कंप्युटर टी. व्ही. सारख्या इलेक्ट्रॉनीक माध्यमांनी संपूर्ण जगात क्रांती घडवून आणली परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने कर्णबधिरास ध्वनिवर्धन करणार्‍या श्रवण यंत्राशिवाय कोणतीही देणगी दिलेली नाही. याला घोर उपेक्षाच म्हणावी लागेल. सामान्यासारखी उघडी बुबूळे असलेल्या जन्मांधाला दृष्टीसंवेदनावाहक मज्जप्रणाली बिघडल्यामुळी कितीही वरच्या नंबरचा चश्मा लावला तरी त्याचा उपयोग शुन्यवत होतो. तसेच जन्मजात तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलास श्रवणयंत्राचा उपयोग व्यर्थ ठरतो हे या क्षेत्रातील तज्ञांच्या पचनी न पडलेले कटु सत्य आहे. एकिकडे काहीच न बोलणारे आपले मुल मोडके तोडके का होईना, थोडेफार बोलावे ही प्रत्येक पालकाची वेडी आशा तर दुसरीकडे ऐकल्याविना बोलणे नाही, बोलल्याविना समजणे नाही आणि समजल्याविना भाषा आणि ज्ञानाची खिडक्या कवाडे बंद. अशी ही विचित्र कोंडी!

या कोंडीतून एक नवा विचार मनात रूजला. भाषा विकासासाठी श्रवण आणी वाचा यंत्रणेचा समान सहभाग आवश्यक असतो. यापैकी श्रवण यंत्रणेत दोष असला आणि वाचा यंत्रणा चांगली असली तर केवळ याच यंत्रणेचा उअपयोग करून जुजबी स्वरूपाचा वाणी विकास करता आला तरी काय वाईट आहे? काहीच नसण्यापेक्षा थोडेफार असण्यात काय हरकत आहे? एकदा माझे एक स्नेही श्री पद्माकर अंबुलकर घरी आले असता वैभवची तल्लख बुद्धी आणि नजरेच्या सुक्ष्म हालचाली पाहून त्याला जवळ बोलावले आणि आपल्या चेहर्‍याकडे पहायला सांगून 'भात' शब्द पुन्हा पुन्हा उच्चरण्यास सांगू लागले. ८-१० वेळा उच्चरून दाखविल्यानंतर वैभवने अनुकरणाचा प्रयत्न करून 'पात' असा अस्पष्ट उच्चार केला. त्यवेळी तो सुमारे ४ वर्षांचा असावा त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की श्रवणयंत्र न लावता देखील दृश्य आणि स्पर्शाच्या संवेदना द्वारे आणि आवश्यक तिथे बोटांच्या हालचालींचा खुणासारखा वापर करून अक्षरांचे उच्चर शिकविले जाऊ शकतील.

या प्रकारानंर विचारांना चालना मिळत गेली. घरातील आरसा चेहर्‍यापुढे घेऊन प्रत्येक अक्षराचा उच्चर करताना ओठाची व जिभेची हालचाल कशी होते, जीभ मुखातील कोणत्या भागाला स्पर्श करून हवा अडविते, हवा बाहेर पडताना मुखावाटे बाहेर पडते की नाकावाटे, हळू की जोरात ईत्यादी बारकावे कळू लागले. उदा. बंद ओठतून मुखावाटे हवा हळू बाहेर पडली तर 'प' चा उच्चार होतो आणि त्याच स्थितीत जोरात बाहेर पडली तर 'फ' चा उच्चार होतो. याउलट मुखाऐवजी नाकावाटे हवाबाहेर पडून ओठ उघडले तर 'म' चा उच्चार होतो. यावरून अक्षरांचेअ उच्चार ही केवळ एक 'तांत्रीक क्रिया' आहे हे स्पष्ट होते. मुलास शिकवण्यापूर्वी प्रथम पालकांनी उच्चारातील बारकावे समजून घेतले तर मुलाकडून त्याचे अनुकरणकरून घेणे सुलभ होईल. त्याच बरोबर प्रथम्दर्शनी क्लिश्ट वाटणार्‍या आगळ्या वेगळ्या पद्धतीची हळूहळू उकल होत जाईल.

सकाळी संध्याकाळी जसा वेळ मिळाला तसे वैभवला सोबत घेऊन बसावे, आधी शिकविलेल्या उच्चारांची उजळणी घ्यावी, उच्चार सदोष असतील तर ते सुधारण्याचा प्रयत्न करावा, चुकिबद्दल राग वा नापसंती चेहर्‍यवर दिसू नये एव्हडे पथ्य पाळले. हे सर्व असले तरी शेजारातील मुलांबरोबर खेळण्याच्या वेळात पप्पा रोज घेऊन बसतात म्हणून त्याची आईकडे कूरकूर, कधी चिडावे तर कधी जवळ घेऊन बसल्यावर असहकार पुकारावा अशा त्याच्या बालसुलभ लिला! मग त्याला विश्वासात घेऊन प्रेमानी कुरवाळत एक गोष्ट त्यच्या मनावर बिंबवावी लागायची की 'बघ मी, आई, दादा आणि तुझे मित्र या सर्वांना ऐकू येते म्हणून ते बोलतात. तुला ऐकू यत नसल्याने असं शिकवावं लागतं तु दररोज बोलायला शिकला म्हणजे तुला पण बोलता येईल'. अर्थातच हे सर्व खुअणांनीच. कधी प्रेमाने, सम्जुतीने तर कधी चॉकलेट किअंवा बक्षिसाचे प्रलोभन अशा विविध प्रकारे प्रोत्साहीत करून आणि क्वचीत रागवून त्याला समजून घेऊन सम्जावून द्यावे लागे.

वैभव ४ वर्षांचा झाल्यावर त्याला वर्धेच्या जगदंबा मुकबधीर विद्यालयात दाखल करण्यात आले. वैभवची अक्षराअक्षराने वाढ होताना त्याच्या शाळेतील शिक्षकवृअंद या सर्वांशी या विषयावर वेळोवेळी चर्चा उपयुक्त ठरली. प्रथम सोपी अक्षरे, सोबत त्यांची बाराखडी मग जोडाक्षारे अशी शब्दाकडे वाटचाल करताना श्रीमती प्रभाताई घाटे यांच्या चित्रमय शब्दसंग्रहाचा शब्द स्मरणासाठी फार उपयोग झाला. वैभवचा शब्दसंग्रह वाढू लागला तसा तो खुणांऐवजी शब्दांचा वापर करू लागला. शब्दांचे उच्चार येऊ लागल्यानंतर टि.व्ही. बघताना सिनेमा, मालिकांची नावे, त्यातील अभिनेत्यांची नावे तो बोलून वाचू लागला. शेजारच्या मित्रांना नावाने हाक मारू लागला. त्याची जिज्ञासा जागी झाली पुधे तो स्वतः कशाला काय म्हणतात तुमची कशाबाबत चर्चा सुरू आहे असे चौकस प्रश्न विचारू लागला. त्यच्या प्रश्नाला उत्तरादाखल बोलून सांगणे आणि तळहातावर बोटाने किंवा कागदावर पेनने लिहून देणे अशी त्याची कुटुंबाच्या सानिध्यात शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे हे सर्व दोन अडिच वर्षात कानाला श्रवणयंत्र न लावता घडून आल. वैभवची मुंबईच्या अलीयावर जंग राष्ट्रिय श्रवण विकलांग संस्था येथे ८ वर्षाचा असताना पुन्हा सर्वंकश तपासणी केली असता श्रवण र्‍हास ९०-९५ डेसिबल्स अर्थात तीव्र श्रवणदोषात मोडणारा होता.

गेल्या ३ वर्षांपासून वैभव नागपूरच्या शंकरनगर स्थित मुकबधीर औद्योगीक शिक्षण संस्थेत वसतीगृहात ८ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याला बर्‍यापैकी वाचता येऊ लागले आहे. बोलताना तो सुटे शब्द आणि छोटी वाक्ये यांचा वापर करतो. वाक्यरचना करता येणे हा दुसरा टप्पा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी आपली मायबोली असले तरी भाषेच्या व्याकरणानुसार शब्दांची निवडक वाक्य तयार करायला कर्णबधिरांना शिकवणे हा अत्यंत अवघड विषय आहे. आजवर केलेल्या प्रयत्नांच्या वाटचालीच्या अल्पशा यशात पूर्ण समाधान नाही, कारण भाषा विकासाचा लांब पल्ला गाठायचे बाकी आहे. शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहू लागल्यापासून त्याची घरची शाळा बंद झाली आहे.

येथे नम्रपणे एक सुचवावेसे वाटते की माता पित्यापैकी एकाने जरी आपल्या मुलासाठी रोज अर्धा तासाचा वेळ देऊन सोशिकतेने, नाउमेद न होता चिकाटीने प्रयत्नांची पराकष्टा केली तर 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे अक्षराअक्षराने मुलाचे शब्दभंडार वाढ्वीत नेले तर आपल्या मुलास 'मूकं करोती वचलम्' हा चम्तकार मनात आणल्यास कुणीही पालक करू शकेल. मोकबधीर शाळातील शिक्षकांच्या प्रयत्नास पालकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळल्यास सध्याची स्थिती पालटून कर्णबधिरांच्या जिवनात आनंद खेळू लागेल यात शंका नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता.....
**************************************************************
**************************************************************
माझे वडील श्री पंजाब शिरभाते यांनी लिहिलेल्या 'आणि वैभव बोलू लागला' या पुस्तकातील हे एक प्रकरण. हे पुस्तक १९९८ मधे प्रकाशित केलं गेल. बाबांनी या पुस्तकाच्या मोफत प्रती महाराष्ट्रातील सर्व शाळांना पाठविल्या. शिक्षणपद्धती, शरीरशास्त्रा, मानसशात्रा या विषयांचा काहिही पूर्वानुभव नसताना केवळ स्वतःच्या मुलाल जर मी बोलतं केल तर इतरांनापण त्याचा लाभ व्ह्यावा हा हेतू. या नविन 'प्रयास' पध्हतीवर आधिरीत या पुस्तकाला बर्‍याच जणांचा विरोध होता पण मिळालेलं घवघवित यश कुणिही नाकारू शकलं नाही. या पद्धतीवर संशोधन करून निरंतर त्यात प्रगती करून माझ्या वडिलांनी कित्तेक कर्णबधीर मुलांना(श्रवणयंत्राशिवाय) बोलतं केलेलं मी बघितलेलं आहे. याच पुस्तकात सुधारणा करून 'मुकबधीर वाणी विकास' हे स्वतः हिन्दीत लिहिलेलं सचित्र पुस्तक २००८ मधे त्यांनी प्रकाशित केलं. या दोन्ही पुस्तकांवर विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांच्या स्तुतीचा अक्षरशः पाऊस पडला. महाराष्ट्रातील बर्‍याच शाळात बाबांनी मुकबधीर मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी शाळाच्या निमंत्रणावरून कार्यशाळा पण केल्यात. गेल्याच वर्षी 'नॅशनल बुक ट्रस्ट, दील्ली' नी या पुस्तकाचे ८ भारतीय भाषांत भाषांतर करून प्रकाशित करण्याचे ठर्विले आहे. पैकी मराठी आवृत्ती प्रकाशित सुद्धा झाली. या कार्या साठी बाबांनामहाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र हिन्दी साहित्य अकादमीच्या 'डॉ. होमी भाभा' प्रथम पुरस्कार गेल्या वर्षी देण्यात आला.

नुकतंच कर्करोगावर मात करून जीवघेणी केमोथेरपी संपवून बाबा परत आपल्या कार्याला लागले आहेत.
गेल्या २० वर्षात केवळ या एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन कार्य करताना बघताना कधी कधी घराकडे होणार्‍या दुर्लक्षामुळी चीड यायची पण क्षणीकच. येत्या जुलै महिन्यात माझे वडील श्री पंजाब शिरभाते ६१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यनिमीत्त्य हा लेख. ही गोष्ट मी कधी बोलून दाखवीली नाही आणि कदाचीत बोलू शकणारही नाही पण आज इथे लिहितो मला माझ्या वडिलांच्या कार्याचा आणि वैभवचा मोठा भाऊ असल्याचा सार्थ अभिमान आहे!'

भाषासमाजशिक्षणसद्भावनासमीक्षा

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Jun 2012 - 2:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अप्रतिम लेख. आज मिपावर येणे सत्कारणी लावलेत.

मूकवाचक's picture

28 Jun 2012 - 2:31 pm | मूकवाचक

_/\_

पप्पुपेजर's picture

28 Jun 2012 - 2:41 pm | पप्पुपेजर

वाचन खुण साठवलि आहे..

बाबांच्या, वैभवच्या आणि आपणां सर्वांच्याच जिद्दीला सलाम! बाबांच्या एकसष्टीनिमित्त त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा!

इनिगोय's picture

28 Jun 2012 - 2:40 pm | इनिगोय

तुमच्या वडिलांना सादर नमस्कार, आणि हे सगळं शब्दांत मांडल्याबद्दल तुमचे आभार. विमेंशी सहमत..

श्रावण मोडक's picture

28 Jun 2012 - 2:42 pm | श्रावण मोडक

पणती!
_/\_

प्रभो's picture

28 Jun 2012 - 7:03 pm | प्रभो

पणती!
_/\_

टवाळ कार्टा's picture

28 Jun 2012 - 3:01 pm | टवाळ कार्टा

तुमच्या बाबांच्या प्रयत्नांना सलाम

मराठमोळा's picture

28 Jun 2012 - 3:07 pm | मराठमोळा

_/\_

स्टँडींग ओवेशन.. हॅट्स ऑफ..

उदय के'सागर's picture

28 Jun 2012 - 3:27 pm | उदय के'सागर

सलाम सलाम सलाम ... शब्दच अपुरे आहेत, काय बोलावे. खरंच हॅट्स ऑफ!

वैभव आणि बाबांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा :)

सर्वसाक्षी's picture

28 Jun 2012 - 3:29 pm | सर्वसाक्षी

अमृत,

तुमच्या वडिलांना आणि त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नाला व त्याहुनही सकारात्मक वृत्तीला प्रणाम. तुमच्या वडिलांना सादर प्रणाम.

चिखलू's picture

28 Jun 2012 - 3:30 pm | चिखलू

जेथे दिव्यत्वाची प्रचिती, तेथे कर माझे जुळती.
_/\_

मृत्युन्जय's picture

28 Jun 2012 - 3:38 pm | मृत्युन्जय

तुमच्या वडिलांच्या जिद्दीला सलाम. वैभव आता व्य्वस्थित बोलु शकतो काय? आणि त्याची इतर प्रगती सामान्य माणसासारखी आहे काय हे समजुन घ्यायला आवडेल. ९८ साली ८वीत होता म्हणजे एव्हाना वैभवचे शिक्षण पुर्ण झाले असेल म्हणुन विचारतो आहे.

जयंत कुलकर्णी's picture

28 Jun 2012 - 3:42 pm | जयंत कुलकर्णी

आपल्या वडिलांचे आभार मानवेत तितके कमी आहेत.

मुख्य म्हणजे हे ज्ञान स्वतःपाशी न ठेवता त्यांनी सर्वांना दिले हे फार म्हणजे फार महत्वाचे आहे. यातून अजून जरी एखाद्या मुलाला बोलता आले तर .......ज्याला बोलता येत नाही त्याला बोलता यायल्या लागल्यावर काय वाटेल हे तोच सांगू शकेल.

आपण हे येथे लिहिलेत त्याबद्दल आपले आभार नाहीतर मला तरी हे कळाले नसते.
परत एकदा आपल्या दोघांचे आभार....

स्मिता.'s picture

28 Jun 2012 - 3:44 pm | स्मिता.

अमृत, तुमच्या वडिलांना सादर प्रणाम, अभिनंदन आणि शुभेच्छा!!

इथे माहिती दिल्याबद्दल अनेकोनेक आभार.

काही वेळा इतके प्रयत्न करुनही निराशा पदरी पडते त्यातुन मग त्रागा ,चिडचिड द्वेष जन्माला येतो .
खुपच सहनशक्ती अन चिकाटी लागते हे अस काहीस फेस करायला तुमच्या वैभवच अन बांबांच अन तुम्हा सर्वांच कौतुक :)

बाप बेटा दोघांनाही साष्टांग प्रणिपात _/|\_. खरेच असे अनुभवसमृद्ध लेखन वाचायला मिळणे ही कपिलाषष्ठीसम पर्वणीच :)

इष्टुर फाकडा's picture

28 Jun 2012 - 3:48 pm | इष्टुर फाकडा

......

कानडाऊ योगेशु's picture

28 Jun 2012 - 4:49 pm | कानडाऊ योगेशु

+१
तसेच एकसष्टीनिमित्त तुमच्या वडिलांना दिर्घायु चिंतितो.!

मी_आहे_ना's picture

28 Jun 2012 - 3:59 pm | मी_आहे_ना

"सक्षम" च्या संस्थळावर आपल्या वडिलांचा आणि "प्रयास"चा सन्दर्भ वाचला होता. आपण इथे सम्पूर्ण माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या वडिलांना शतशः प्रणाम!
वि.मे. नी म्हणल्याप्रमाणे खरोखर आज मिपावर येणे सत्कारणी लागले.

दशानन's picture

28 Jun 2012 - 4:53 pm | दशानन

_/\_

अप्रतिम लेख...
काय जिद्द आहे तुमच्या वडिलांची. हॅट्स ऑफ..
आणि आई-वडिलांचं मुलावर असणारं प्रेम पण खरोखर चमत्कार घडवतं..
------------------------/\------------------------

तुमच्या वडिलांना (इन अ‍ॅडव्हान्स) साठाव्या वाढदिवसाबद्दल अनेक शुभेच्छा.

तुमच्या आई-वडिलांचे अभिनंदन. वैभवला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि हा लेख इथे दिल्याबद्दल तुमचे आभार.

पैसा's picture

28 Jun 2012 - 5:18 pm | पैसा

तुम्ही तुमच्या भावाबद्दल आधीही लिहिलं होतं. तो लेखही आवडला होता. तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीचं कौतुक वाटतं! तुमचं नशीब की असे वडील लाभले. त्याना केमोथेरपीचा उपचार घ्यावा लागला, म्हणजे त्यांची स्वतःची तब्येतही फार उत्तम अशी नव्हे. तरी त्यातून सावरून परत कामाला लागण्याच्या त्यांच्या धैर्याला सलाम! आणि हा लेख इथे लिहिल्याबद्दल तुम्हाला अनेक धन्यवाद!

प्रास's picture

28 Jun 2012 - 5:26 pm | प्रास

पैसाताई नि विमेंशी सहमत.

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2012 - 9:41 pm | स्वाती दिनेश

ज्योतिसारखेच म्हणते,
स्वाती

नंदन's picture

29 Jun 2012 - 11:48 pm | नंदन

तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीचं कौतुक वाटतं! तुमचं नशीब की असे वडील लाभले. त्याना केमोथेरपीचा उपचार घ्यावा लागला, म्हणजे त्यांची स्वतःची तब्येतही फार उत्तम अशी नव्हे. तरी त्यातून सावरून परत कामाला लागण्याच्या त्यांच्या धैर्याला सलाम! आणि हा लेख इथे लिहिल्याबद्दल तुम्हाला अनेक धन्यवाद!

पूर्णपणे सहमत!

sneharani's picture

28 Jun 2012 - 5:34 pm | sneharani

_/\_

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2012 - 7:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आज मिपावर आल्याचे सार्थक झाले.
तुमचे वडील आणि भाऊ या दोघांनाही माझा सलाम. __/\__
आपल्यावर आलेल्या आपत्तीला यशस्वीरित्या तोंड देऊन, त्या बरोबरच आपल्या समदु:खी लोकांना मदत करणे हि गोष्ट नेहमीच सृहणीय आणि प्रेरणादायी असते.
अश्या व्यक्ती मला नेहमीच आदरणीय.

त्यांच्या या कार्यात माझ्याकडून काहीही हातभार लावता आला तर मी स्वतःला धन्य समजेन.

प्रेरणा पित्रे's picture

28 Jun 2012 - 7:00 pm | प्रेरणा पित्रे

तुमच्या वडिलांच्या जिद्दीला आणि अथक परिश्रमांना सलाम...

वैभवला पुढिल वाटचालीसाठी शुभेछा...

तुमच्या वडिलांना दिर्घायुष्य लाभो..

प्रेरणा पित्रे's picture

28 Jun 2012 - 7:00 pm | प्रेरणा पित्रे

तुमच्या वडिलांच्या जिद्दीला आणि अथक परिश्रमांना सलाम...

वैभवला पुढिल वाटचालीसाठी शुभेछा...

तुमच्या वडिलांना दिर्घायुष्य लाभो..

प्रेरणादायी लेखन आहे. अशा लोकांबद्दल आदर वाटतो. स्वत:च्या जिवाला घोर लागलेला असताना त्यातून सकारात्मक दृष्टीकोन ठेवायचा व इतरांनाही वाट दाखवायची हे महान कार्य आहे.

सुहास..'s picture

28 Jun 2012 - 8:33 pm | सुहास..

ग्रेट !!

तुमच्या वडिलांना नमस्कार आणि एकसष्टी निमित्त शुभेच्छा!

मस्त कलंदर's picture

28 Jun 2012 - 9:00 pm | मस्त कलंदर

तुमच्या बाबांच्या चिकाटी आणि प्रयत्नांना तोड नाही. त्यांना वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा, आणि पुस्तकासाठी अभिनंदन..

तुमच्या बाबांना सलाम त्यांना दीर्घायुष्य लाभो ही मनापासून प्रार्थना

फारएन्ड's picture

28 Jun 2012 - 10:12 pm | फारएन्ड

तुमच्या वडिलांना सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

अर्धवटराव's picture

28 Jun 2012 - 11:19 pm | अर्धवटराव

तुमच्या वडिलांनी आपली वडीलकी केवळ आपल्या अपत्यापुरती मर्यादीत न ठेवता अलम मुकबधीर दुनीयेच्या पाठीशी उभी केली. याला म्हणावं "बाप". हॅट्स ऑफ्फ.

अवांतर - संजीव कुमार, जया भादुडीचा एक जुना चित्रपट आठवला... बहुदा "कोशीश". त्यात ते दोघेही मुकबधीर असतात. संघर्ष करत आपलं कौटुंबीक जीवन सफल करतात. शेवटी संजीवकुमारच्या अव्यंग मुलाला एका मुकबधीर मुलीचा बाप लग्नाची मागणी घालतो. मुलगा ते लग्न नाकारतो. त्यावर संजीवकुमार त्याला मुकबधीर "भाषेत" रागावतो, समजावुन सांगतो . अभिनयचे मास्टरपीस म्हणावे असा सीन.

अर्धवटराव

jaypal's picture

28 Jun 2012 - 11:13 pm | jaypal

तुमच्या वडिलांना मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी माझ्या भावास शुभेच्छा!

अमितसांगली's picture

29 Jun 2012 - 8:01 am | अमितसांगली

सुपर लेख...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....

प्यारे१'s picture

29 Jun 2012 - 1:06 pm | प्यारे१

नतमस्तक...

आपल्या वडिलांना सलाम!
मोठे आजार आपले वाईट भोग लवकर संपवतात असं कुठंसं वाचलंय.
व्यक्तिशः मला हे सकारात्मक वाटतं म्हणून पटतं.
वडिलांचं चांगलं काम त्यांना आणखीच मोठं करतंय.

बाकी पुण्याजवळ असाल तर डॉ. राजीव यंदे म्हणून पौड फाट्याजवळ (दशभुजा गणपती जवळ) इ एन टी स्पेशालिस्ट आहेत.
माझे व दोन्ही बहिणींचे कानाचे ऑपरेशन त्यांनी केलेले आहे. तिघांनाही ऐकण्याचा प्रॉब्लेम होता.
रिझल्ट चांगले आहेत.
जे डॉक्टर श्रवणयंत्र वापरा म्हणतात त्यांना ऑपरेशन जमत नाहीत म्हणून ते असे म्हणतात.

प्रमोद्_पुणे's picture

29 Jun 2012 - 3:57 pm | प्रमोद्_पुणे

तुमच्या वडिलांच्या जिद्दीला सलाम...

स्पा's picture

29 Jun 2012 - 4:09 pm | स्पा

__/\__

काय बोलू...
आज मिपावर आल्याच सार्थक झालं, एवढंच म्हणेन

गणपा's picture

29 Jun 2012 - 4:16 pm | गणपा

वरील सर्वांशी सहमत.

५० फक्त's picture

29 Jun 2012 - 4:39 pm | ५० फक्त

मानाचा मुजरा तुमच्या वडिलांना. काही लिखाण मिपाचं सर्वोत्तम लिखाण म्हणुन जपायचं ठरलं ते हे त्यात घ्यावं.

मोदक's picture

1 Jul 2012 - 1:30 am | मोदक

+१

___/\___

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 6:12 pm | नाना चेंगट

ग्रेट !!

स्पंदना's picture

29 Jun 2012 - 6:37 pm | स्पंदना

.......

निराशावादी न होता प्रयत्न करत राहीले याचं प्रचंड कौतुक.

एक मात्र बोलावसंच वाटतं: तुमच्या वडीलांच्या काळी गर्भपाताच्या गोळ्या घेउनसुद्धा मुल जन्मले तर त्याच्यात दोष उत्पन्न होउ शकतात हे माहीत नव्हतं का? ज्या डॉक्टरने गोळ्या घ्यायचा सल्ला दिला त्याला/तिला ही माहीती नव्हती का? असो. झालं ते झालं.

जर दोन मुलात अंतर ठेवायचं तर तशी काळजी घ्यायला हवी. नंतर केवळ अंतर हवं म्हणुन गर्भपात करणं पटण्याजोगं नाही. नंतर मग दैवाला, नशिबाला दोष का द्यायचा? त्या बाळाचा काय दोष? - काहीही नाही.

दादा कोंडके's picture

29 Jun 2012 - 11:54 pm | दादा कोंडके

ब बैंशी सहमत!

तुमच्या वडीलांच्या जिद्दीला सलाम!

तुमचा मुद्दा पटला पण या विषयावर मी आई-वडीलांशी कधी चर्चा केली नाही.

अमृत

मुक्त विहारि's picture

30 Jun 2012 - 8:12 pm | मुक्त विहारि

आता उतार वयात त्यांना अजून हा त्रास कशाला?

झाले गेले गंगेला मिळाले..

प्रभाकर पेठकर's picture

30 Jun 2012 - 2:04 am | प्रभाकर पेठकर

हिमालया एवढी समस्या. पण खचून न जाता एक एक पाऊल पुढे पुढे टाकत शिखर गाठलं. त्या शिखरावर पोहोचल्यावर त्या आपल्याच यशाला कुरुवाळत न बसता इतर अनेक गरजूंसाठी दिपस्तंभ बनून मार्गदर्शन केले.

अपल्या वडिलांच्या धैर्य, चिकाटी आणि मेहनतीला सहस्त्र प्रणाम.

दिपक's picture

30 Jun 2012 - 3:11 pm | दिपक

दंडवत.

रमताराम's picture

30 Jun 2012 - 4:48 pm | रमताराम

जबरदस्त चिकाटी. _/\_.
अमृतशेट लेख इथे टाकला त्यामुळे शेअर करण्यास हरकत नसावी असे गृहित धरून फेबुवर शेअर केला आहे.

सहज's picture

30 Jun 2012 - 6:19 pm | सहज

अभिनंदन व शुभेच्छा!

मन१'s picture

30 Jun 2012 - 6:23 pm | मन१

भगीरथ प्रयत्न हा फक्त एक वाक्प्रचार म्हणून ऐकला होता. प्रथमच त्याच्या एखाद्या साक्षीदाराकडून कथन ऐकतोय.

किसन शिंदे's picture

30 Jun 2012 - 6:54 pm | किसन शिंदे

अतिशय सुंदर लेख.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2012 - 8:07 pm | मुक्त विहारि

मस्त लेख..

हारुन शेख's picture

30 Jun 2012 - 8:22 pm | हारुन शेख

तुमच्या वडिलांच्या जिद्दीला सलाम ! ह्या अश्या लोकांमुळेच माणुसकीवरचा विश्वास टिकवून ठेऊ शकतो. दिपस्तंभांसारखी हि माणसे निराशेच्या काळोखात हरवलेल्यांना मार्गदर्शक ठरतात.

नितिन थत्ते's picture

30 Jun 2012 - 8:27 pm | नितिन थत्ते

_/\_

प्रयासांना साष्टांग नमस्कार.

(फेसबुकावरील रमताराम यांच्या पोस्टमुळे हा लेख वाचला. त्यांनाही सलाम)

चतुरंग's picture

30 Jun 2012 - 8:33 pm | चतुरंग

तुम्हा सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन. तुमचा भाऊ बोलायला लागला याचा आनंद असीम आहे.
तुमच्या वडिलांच्या जिद्दीला सलाम. त्यांच्या एकसष्टी निमित्त त्यांना दीर्घायुष चिंततो.
अशी माणसं आहेत असं नुसतं समजलं तरी उत्साह येतो! :)

---------------------------------------------
मी बघितलेली एक घटना सांगतो - कुठे बघितली मला नक्की लक्षात नाही बहुदा शांघायला एका हॉटेलात..
त्यावेळी शांघायला मूकबधिरांची कुठलीशी स्पर्धा होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धा असावी कारण हॉटेलात सगळीकडची मुले-मुली दिसत होती. मी सकाळी ब्रेकफास्ट लाउंजला गेलो. टेबलापाशी बसून खायला सुरुवात केली. हळूहळू मुले येत होती बघता बघता दीडशे-दोनशे मुले जमली. त्यांचा उत्साह आणि डोळ्यांमधली चमक अचंबित करणारी होती.
खाताखाता अचानक मला लक्षात आले की सगळेजण हातवार्‍यांनी आणि ओठांच्या हालचालींनी 'बोलत' आहेत, पार हॉलच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत टाचा उंचावून बोलणे सुरु होते परंतु सर्वत्र शांतता होती! मी थरारलो, अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं. एका पहाडाएवढ्या व्यंगावर निसर्गाच्या विजिगीषेनं केलेली ती मात होती. आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर काटा उभा राहतो! सलाम!!

(नतमस्तक) रंगा

भरत कुलकर्णी's picture

1 Jul 2012 - 12:13 am | भरत कुलकर्णी

सुंदर लेख. आपल्या वडिलांच्या प्रयत्नांना सलाम. वैभवला शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2012 - 4:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

_/\_

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

1 Jul 2012 - 9:24 pm | रमताराम

आमचे मित्र श्री अशोक पाटील - जे मिपा सदस्य नसल्याने इथे प्रतिसाद देऊ शकत नाहीत - त्यांचा प्रतिसाद.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"श्री.अमृतराव > तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी अत्यंत हृद्यपणे शब्दबद्ध केलेले "वैभवचित्र" मला किती भावले हे निव्वळ एकदोन ओळीत सांगणे केवळ अशक्य अशीच बाब झाली आहे. इथे प्रकटलेल्या सार्‍या प्रतिसादकर्त्यांच्या उत्स्फूर्तपणात तुम्हा कुटुंबियांबाबत जी आदराची भावना समोर आली आहे त्यामागे जितके श्री.पंजाबरावांचे अथक प्रयत्न तितकीच वैभवची 'मीही तुमच्यासारखाच बनून दाखविणार' हे सिद्ध करण्याची जिद्द कारणीभूत आहे. मला खात्री आहे, त्याला तुमच्या प्रेमाची उब इतकी भावत असेल की सर्वसामान्यांच्या तुलनेत आपल्यात काहीतरी शारीरिक न्यून आहे ही कल्पनाही शिवत नसेल. लेखात पुस्तकांची माहिती तुम्ही दिली आहे ते छानच झाले. वैभवचे 'यशस्वी' उदाहरण याच गटातील अन्यांना देण्यासाठी मी जरूर या पुस्तकांची शिफारस करीन.

वैभवची जडणघडण अष्टपैलू हिर्‍यासारखी होत राहावी यासाठी शुभेच्छा !

-अशोक पाटील
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमृत's picture

1 Jul 2012 - 9:58 pm | अमृत

आपल्या सर्वांना प्रतिक्रीया, शुभेच्छा व सद्भावनांबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. तुमच्या माहितीत जर कोणी मुकबधीर व्यक्ती असतील व काही मार्गदर्शनाची गरज असेल तर व्यनी करावा. माझे वडील नक्कीच त्यांना मदत करायचा प्रयत्न करतील.

सर्वांचं मनापासून दाखविलेल्या आत्मियतेबद्दल परत एकदा आभार.

अमृत

विसुनाना's picture

2 Jul 2012 - 12:02 pm | विसुनाना

आपल्या वडिलांच्या जिद्दीला सलाम. त्यांना यापुढे उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ इतरांना मिळत राहो ही सदिच्छा. त्यांच्या प्रयत्नांना साथ देणार्‍या वैभव आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचे अभिनंदन.

नि३सोलपुरकर's picture

10 Jul 2012 - 12:44 pm | नि३सोलपुरकर

त्रिवार ____/\_____

नतमस्तक..
नि३