जशी रंग बोटांवर ठेवून... - २

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
27 Feb 2012 - 2:29 pm

जशी रंग बोटांवर ठेवून... - १

साडे नऊ वाजले होते. एव्हाना एक्स्प्रेस वे संपला होता. मध्ये फुड मॉल की असंच काहीसं नाव असलेल्या एका पेट्रोल पंप कमी मॉल अशा जागी पेट्रोल भरायला आणि पाय मोकळे करायला गाडी थांबवली होती तेव्हढंच. रावेत मागे पडलं, दहा मिनिटांनी वाकड आलं, आणि बघता बघता कोथरुड आलंसुद्धा. अश्विनने भुसारी कॉलनीत जायला गाडी उजव्या हाताला वळवली आणि त्याच्या कपाळावर आठया पडल्या. रस्ता खुपच अरुंद होता आणि रहदारीही खुप होती. शेवटी विचारत विचारत ते श्रेयाच्या घराचा लँडमार्क असलेल्या चौकात पोहचले. तिचे बाबा आधीच चौकात येऊन उभे होते. गाडीचा नंबर सांगितलेला असल्यामुळे ते गाडीजवळ आले. ओळख झाली. नमस्कार चमत्कार झाले. आणि सारा लवाजमा श्रेयाच्या घरी पोहचला.

पाहुणे येणार म्हणून घरी लगबग चालू होती. त्यांनी घरात प्रवेश करताच सार्‍यांनी अश्विन आणि त्याच्या कुटुंबियांचं स्वागत केलं. चौकात झालेली ओळख परेड पुन्हा एकदा झाली. तिच्या घरी तिची मुख्याध्यापिका पदावरुन रीटायर्ड झालेली आजी होती. आई प्राथमिक शाळेवर तर बाबा माध्यमिक शाळेवर शिक्षक होते. श्रेयाला एक लहान भाऊ होता. पण तो बाहेर गेला होता. एक आत्या आणि तिचे मिस्टर इंदोरवरुन आले होते. अश्विन जरी या सार्‍यांशी ओळख करुन घेत होता तरी त्याची नजर मात्र श्रेयाला शोधत होती. ती हॉलमध्ये आलीच नव्हती.

गप्पाटप्पा सुरु झाल्या. माहितीची देवाण घेवाण होत होती. बरीचशी माहिती त्या दोघांच्या मॅट्रीमोनी प्रोफाईल्समध्ये होती. पण एकदम विषयाला हात कसा घालणार, त्यामुळे सुरुवात अशीच करणे भाग होते. तिच्या घरचे कोकणात कधीच आले नव्हते. नाही म्हणायला श्रेया एकदा ऑफीसच्या पिकनिकला दापोलीला आली होती ताम्हिणीमार्गे. मग कोकण कसा छान आहे, समुद्रकिनारा कसा सुंदर आहे इथपासून ते पावसाळ्यात ताम्हिणीत धबधबे मस्त असतात इथपर्यंत सारं सांगून आणि ऐकून झालं. हवापाण्याच्या, कोकणात जाण्या-येण्याच्या गप्पा एव्हाना संपल्या होत्या. श्रेयांच्या बाबांची चुळबुळ सुरु झाली. ते श्रेयाच्या आईला आणि आत्याला खाणाखुणा करु लागले. त्या खुणांचा अर्थ "आता नाश्त्याचं आणा" असा होता हे मुलगी पाहण्याचा दांडगा अनुभव असलेल्या अश्विनने लगेच ओळखले. सेंटर टेबल सरकवलं गेलं. आतून चिवडा, रव्याचे लाडू, कलाकंद असे पदार्थ असलेल्या डीशेस बाहेर आल्या.

"करा सुरुवात." श्रेयाच्या बाबांनी हसत हसत म्हटलं.

अश्विनने नजरेच्या कोपर्‍यातून बाबांकडे पाहिले. बाबाही त्याच्याकडे पाहून कोणाला कळेल न कळेल असं हसत होते. तो एकदा टीटवाळ्याला एक एमबीए असलेली मुलगी पाहायला गेला होता. अर्थात ती एमबीए नसुन दादरच्या वेलिंगकरमधून तीने कसलंसं पार्ट टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डीप्लोमा केलं होतं आणि ते बोलण्याच्या ओघात कळताच मनातल्या मनात उखडलाच होता. पार्ट टाईम पी जी डी करण्यात काही वावगं नव्हतं. पण ती माहिती लपवून आपण दोन वर्षांची फुल टाईम युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट डीग्री केली आहे असं सांगण्याच्या खोटारडेपणाची चीड त्याला आली होती. त्याने त्याचे म्हणणं शक्य तेव्हढया संयतपणे तेव्हा बोलून दाखवलं होतं. अर्थात त्या मुलीने आणि तिच्या वडीलांनी "हा ही कोर्स एमबीए सारखाच असतो" असं म्हणून वेळ मारुन नेली होती.

अर्थात हे सारं आता आठवण्याचं कारण वेगळंच होतं. त्या टीटवाळ्याच्या मुलीला पाहायला गेल्यानंतर तिच्या घरीही आधी असेच नाश्त्यासाठी कसलेसे लाडू आणले होते. अश्विनने खाल्लं न खाल्ल्यासारखं करुन "बास" म्हणून मोकळा झाला होता. ते पाहून त्या मुलीच्या बाबांनी "हा आयटम आता जूना झाला असं दिसतंय. सगळीच मुलं नाही म्हणतात खायला." तिच्या बाबांनी कहर केला होता.

नाश्त्याला सुरुवात झाली. तरीही श्रेया बाहेर येईना हे पाहून अश्विन चुळबुळ करु लागला. त्याची ही चुळबुळ बाबांच्या लक्षात आली. त्यांनी श्रेयाला बाहेर बोलावण्याची विनंती केली. अश्विनच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तसा हा काही त्याचा पहिला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम नव्हता. मागच्या दोन वर्षांत त्याने सहा सात मुली पाहील्या होत्या. पण त्या मुलींबद्दल त्याला तितकंसं विशेष काही वाटलं नव्हतं. अर्थात त्या मुलींसाठी बोलणी करताना अश्विनने काही ना काही तडजोड केली होती. श्रेयाच्या बाबतीत मात्र तसं नव्हती. शिक्षण, रंग-रुप, नोकरी या सार्‍याच बाबतीत उजवी होती ती. निदान फोटोवरुन तरी दिसायला छान वाटत होती. आता ती जशी प्रोफाईलमधल्या फोटोत दिसते तशीच दिसत असली आणि स्वभावाने बर्‍यापैकी शांत, सालस आणि समजूतदार असली म्हणजे झाले. अर्थात तिनेही अश्विनला हो म्हणायला हवं होतं हे ही तितकंच खरं होतं.

श्रेया बाहेर आली. हसर्‍या चेहर्‍याची, मोरपीशी निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली श्रेया अश्विनला पाहताक्षणीच आवडली. हीच ती अशी त्याच्या अंतर्मनाने ग्वाही दिली. ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे चोरटया नजरेने पाहू लागले.पुन्हा एकदा त्याच हवापाण्याच्या, कोकणच्या गोष्टी झाल्या. श्रेया जरी त्या बोलण्यात भाग घेत नव्हती तरी तिचा चेहरा खुलला होता हे अश्विनच्या ल़क्षात आले होते. आपण तिला आवडलोय हे एव्हाना त्याला कळून चुकले होते. तिचं गप्प राहणं मात्र त्याला तितकंसं आवडलं नव्हतं. त्याचा याआधीचाही अनुभव असाच होता. या मुली एव्हढया शिकतात, मोठमोठया हुद्दयांवर काम करतात, आपल्या ग्रुपमधील मुलांसोबत अगदी मोकळेपणाने वेगवेगळ्या विषयांवर साधकबाधक चर्चा करतात, पण मुलगा पाहायला आला की मात्र अगदी मुग गिळून गप्प बसतात. त्यावेळची बोलणी मात्र मुलीचे आई वडील किंवा कुणी आत्या, मोठी बहीण वगैरे करतात. त्याला राहून राहून वाटायचं हे "मुलीने बोलायचं नाही" असले तथाकथित संस्कार फेकून देऊन काय हरकत आहे मोकळेपणाने चर्चा करायला. तिचं लग्न हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आणि त्याबद्दल तिने अगदी पुढाकार घेऊन बोललं नाही तरी त्या बोलण्यात निदान भाग घ्यायलाच हवा.

"मी एक विचारु?" चर्चा चालू असतानाच अचानक श्रेयाने विचारलं.
अश्विनने थोडसं चमकून वर श्रेयाकडे पाहिलं. हलकेच हसला. "विचार ना. त्यासाठी परवानगी कशाला हवी?"

"माझं इंजिनीयरींग चालू असताना मला एअर फोर्समध्ये जावं असं खुप वाटायचं. मी एअर फोर्सच्या परीक्षाही दिल्या होत्या. पण सेकंड लास्ट राऊंडला रिजेक्ट झाले. नंतर फ्लोरीडाच्या एविएशन स्कुल्समध्ये पायलट ट्रेनिंगची माहिती काढली. पण तो खर्च आम्हाला परवडणारा नव्हता. म्हणून मग इथेच हडपसरच्या फ्लायिंग क्लबला ग्लायडींगचं ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर इंजिनीयरींग झाल्यानंतर माझं फक्त तेव्हढया शिक्षणावर समाधान होईना म्हणून मी पीजीडीएमला अ‍ॅडमिशन घेतलं. त्यावेळी आई बाबांनी त्या शिक्षणासाठी एज्युकेशनल लोन घेतलं होतं. त्या लोनचे हप्ते लग्नांनंतरही मीच भरेन. चालेल ना तुम्हाला?"
"हो चालेल की. जर मुलीचा पगार सासरी जाणार असेल तर मग मुलीने आपल्या एज्युकेशन लोनचे हप्ते आपल्या पगारातून भरले तर बिघडलं कुठे?"

आणि मग अश्विनने त्याच्या एका मित्राच्या बाबतीत झालेला किस्सा सांगितला. त्याचा एक मित्र बीई झाल्यानंतर एका कंपनीत ट्रेनी इंजिनीयर म्हणून लागला. तिथेच त्याची एका मुलीशी ओळख झाली. तीही त्याच्यासारखीच ट्रेनी इंजिनीयर. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. गोष्टी लग्नापर्यंत गेल्या. आणि फिसकटल्या. का तर म्हणे मुलीला वडील नाहीत. तिचे दोन लहान भाऊ शिकत आहेत. त्यांचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत ती तिचा निम्मा पगार घरी देणार आहे. आणि हे माझ्या त्या मित्राला आणि त्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. माणसं शि़कून सवरूनही कधीकधी अडाण्यासारखं वागतात हेच खरं.

त्याचा एज्युकेशनल लोनचे हप्ते भरण्याला होकार ऐकून श्रेया खुश झाली आहे हे स्पष्ट दिसत होतं.

"बेटा जेवण करता येतं का तुला?" अश्विनच्या आईमधली भावी सासू जागी झाली.
"नाही हो. ती किचनमध्ये पाऊलही टाकत नाही. अभ्यासात तिला कधी वेळ मिळाला नाही. आणि आम्हीही तिला ते कधी करु दिलं नाही." यावेळी श्रेयाच्या आत्याने उत्तर दिलं. अश्विनने हळूच आईकडे पाहीलं. त्याला आईचा चेहरा थोडासा त्रासिक झालेला जाणवला त्या उत्तराने.
"हरकत नाही. तसे आता ते दोघेही कमवते आहेत म्हटल्यावर स्वयंपाकासाठी एखादी कामवाली बाई ठेवतील. तो काही फार मोठा प्रश्न नाही." अश्विनच्या बाबांच्या या बोलण्याने श्रेयाच्या आत्याच्या उत्तराने आलेला ताण कमी झाला.
"तुमच्या श्रेयाच्या कपडयांबद्दल काही अटी आहेत का? म्हणजे तिने साडीच नेसायला हवी वगैरे?" श्रेयाच्या आत्याचा पुढचा प्रश्न.
तिने अगदी थ्रीफोर्थ आण टीशर्ट घातले तरी मला चालेल असे उत्तर अश्विन देणार इतक्यात त्याच्या बाबांनी बोलणं सुरु केलं.
"नाही म्हणजे तिने गावी मात्र नविन असताना साडी नेसायला हवी. नंतर पुढे पंजाबी ड्रेस वापरत गेली तरी चालेल." अश्विनची बोलतीच बंद केली बाबांनी. तिथल्यातिथे काही बोलणं म्हणजे बाबांना खोटं पाडण्यासारखं झालं असतं ते. गप्प बसण्याव्यतिरिक्त अश्विनसमोर काही पर्याय नव्हता.

"तुमच्या घरी नॉनव्हेज खाण्याच्या बाबतीत कसं आहे? श्रेया एगेटेरीयन आहे. तिला नॉनव्हेज अजिबात चालत नाही. मागे आलेलं एक स्थळ मुलगा नॉन्व्हेजेटेरीयन आहे म्हणून आम्ही नाकारलं होतं.
आता आली का पंचाईत. अश्विनच्या घरी नॉनव्हेज जेवण अधूनमधून व्हायचं. निदान रविवारी तरी असायचंच असायचं. आणि अश्विनच्या दोन ऑस्ट्रेलिया वार्‍यांमध्ये तो दोन वर्षे तिकडेच होता. त्या दोन वर्षांमध्ये तिकडचं घासफुस न आवडल्यामुळे तो अगदी प्युअरली नॉनव्हेजेटेरीयन राहीला होता. बाका प्रसंग होता. नॉनव्हेज तर तो खात होता. खोटं बोलण्याची त्याला मनस्वी चीड होती. काय करायचं हा मोठा प्रश्न होता. नॉनव्हेज खाण्याच्या सवयीमुळे त्याला श्रेयाला गमवायचं नव्हतं. ठरलं, आपण नॉनव्हेज सोडायचं. अश्विनने झटक्यात निर्णय घेऊन टाकला.

"आत्या, आमच्या घरी अगदी फ्रीक्वेंटली नॉनव्हेज जेवण बनत नाही. आता मी दोन वर्ष बाहेर राहील्यामुळे माझे नॉनव्हेज खाणं खुप होतं. पण ते बरेचवेळा चांगला पर्याय नसल्यामुळे. तसंच असेल तर मी नॉनव्हेज खाणं सोडू शकेल."

त्याने एका दमात बोलून टाकलं आणि चोरटया नजरेने श्रेयाकडे पाहीलं. ती गालातल्या गालात हसत होती.

आता विशेष काही विचारण्यासारखं काही राहीलं नव्हतं. निदान पहिल्या भेटीत जे विचारलं ते पुरेसं होतं.

जेवण झालं. पाच दहा मिनिटे पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

"छान वाटलं. तुम्ही आला, बोललात. आम्ही विचार करतो. तुम्हीही करा. मग ठरवू काय करायचं ते." श्रेयाच्या बाबांनी आपलं मत व्यक्त केलं.
निघायची तयारी सुरु झाली. अश्विनने श्रेयाच्या घरच्यांना आणि श्रेयाने अश्विनच्या आई-बाबांना नमस्कार केला. त्याने चलाखीने श्रेयाला आपलं व्हिजीटींग कार्ड दिलं. आणि तितक्याच चलाखीने तिचाही मोबाईल नंबर घेतला. दुसर्‍या दिवशी रविवार असल्यामुळे अश्विनने आई बाबांना सोडण्यासाठी बागमांडल्याला जायचे ठरवले.

गाडीने चांदणी चौक ओलांडला आणि ताम्हीणीच्या दिशेने धावू लागली.

आपण श्रेयाला आणि तिच्या घरच्यांना आवडलो आहोत या जाणिवेनं अश्विन भलताच खुश झाला होता. आता गावी बागमांडल्याला जाताना त्याची स्विफ्ट ताम्हीणी घाट उतरणार नव्हती तर जणू त्याच्या स्वप्नांतील परी श्रेयाच्या रुपाने आकाशाच्या पायर्‍या उतरणार होती...

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त रे धना.
सर्व प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभे केलेस.

ते स्विफ्ट ऐवजी आयटेन असायला हवंय ना? ;)

काय हो वल्लीशेठ, तुम्हाला तुमच्या वेळेची आठवण झाली वाटतं... ;)

- पिंगू

प्रचेतस's picture

27 Feb 2012 - 3:02 pm | प्रचेतस

:)

धन्या's picture

27 Feb 2012 - 3:04 pm | धन्या

या तुमच्या स्मायलीचा अर्थ तुमच्यावरही अशी वेळ आली होती असा घ्यायचा का?

५० फक्त's picture

27 Feb 2012 - 6:19 pm | ५० फक्त

होय होय वेळ आली होती पण काळ आला नव्हता म्हणुन वाचले अन अजुन काय ? नाहीतर एव्हाना निरागसता जपायची वेळ आली असती हो हो म्हणता...

ते स्विफ्ट ऐवजी आयटेन असायला हवंय ना?

कुठल्याही कलाकृतीची प्रेरणा ही त्या कलाकृतीला जन्म देणार्‍या कलाकाराच्या खाजगी आयुष्यात विशेषत: त्याने अनुभवलेल्या प्रसंगांमध्ये दडलेली असते. :D

प्रचेतस's picture

27 Feb 2012 - 3:05 pm | प्रचेतस

थोडक्यात सत्यघटनेचा आधार असलेली काल्पनिक कलाकृती. ;)

प्रचेतस's picture

27 Feb 2012 - 3:03 pm | प्रचेतस

दोनदा आल्यामुळे प्रकाटाआ

विजुभाऊ's picture

27 Feb 2012 - 3:07 pm | विजुभाऊ

माताय . एप्रील मे जवळ येत जातोय तसा मिपावर सुद्धा आता बहुतेक लग्नाचा सिझन सुरू झालेला दिसतोय.
सुब्याच्या मिशा झाल्या आता हे श्रेया प्रकरण.

धन्या's picture

27 Feb 2012 - 3:13 pm | धन्या

काय हे विजूभौ.

कुणाच्या लग्नाची गोष्ट ऐकून खरं तर माणसाला बरं वाटायला हवं. अगदी बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना असं नको व्हायला पण वपुंनी त्यांच्या कुठल्याशा कथेमधे म्हटल्याप्रमाणे, "शादी किसीकी भी हों, अपना दिल गाता हैं" असं वाटायला काहीच हरकत नाही. ;)

अन्या दातार's picture

27 Feb 2012 - 3:09 pm | अन्या दातार

असं असतं होय ते!!! ब्वॉर्र्र!

मीनाक्षी देवरुखकर's picture

27 Feb 2012 - 3:10 pm | मीनाक्षी देवरुखकर

उत्तम जम्लिये

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Feb 2012 - 3:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मस्त मस्त,

सुरुवात तर छान झाली आहे. तसेच छान पैकी पुर्ण करा ही कळकळीची विनंती.

मि.पा. वर काही सिध्दहस्त लेखक असे आहेत ज्यांना वाचकांना टांग मारण्यात प्रचंड आनंद मिळतो. तुम्ही त्या गटात सामील होउनये ही सदिच्छा.

(मंदाकिनी ची भन्नाट वाट पहाणारा)

प्यारे१'s picture

27 Feb 2012 - 3:27 pm | प्यारे१

अच्छा ! असं झालं तर.

उजवी भुसारी का? बरं बरं! बाकी मुंबईकडून तिकडं जाताना हायवेवरुन डावीकडं वळावं लागतं बरंका.
रिपोर्ट आणखी फास्ट येऊ दे . :)

धन्या's picture

27 Feb 2012 - 4:29 pm | धन्या

उजवी भुसारी का? बरं बरं! बाकी मुंबईकडून तिकडं जाताना हायवेवरुन डावीकडं वळावं लागतं बरंका.

मुंबईकडून भुसारी कॉलनीत जायला आधी पौड रोडला जावे लागते. त्यासाठी हायवे सोडून डावीकडे उतरावं लागतं. नंतर मात्र पौड रोडला लागल्यावर उजवीकडे वळावं लागतं. ;)

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 4:32 pm | वपाडाव

पुढच्या भागात स्विफ्ट पुण्याहुन निघुन ताम्हिणीतच थांबणार आहे म्हणे... ;)

स्वातीविशु's picture

27 Feb 2012 - 4:13 pm | स्वातीविशु

वा.... वा....मस्त....हळु हळु रंग चढ्तोय कथेला.......
पु. भा. ल. टा :)

sneharani's picture

27 Feb 2012 - 4:17 pm | sneharani

पुढे???
:)

५० फक्त's picture

27 Feb 2012 - 6:19 pm | ५० फक्त

मस्त हो, छान अनुभव कथन आहे. एवढं प्रामाणिकपणे लिहिणं ते सुद्धा पत्ते आणि नावांसहित जमत नाही सगळ्यांनाच, त्यासाठि एक आध्यात्मिक बैठक असावी लागते, ती तुमच्याकडे आहे हे माहित आहे, आणि जाणवतं पण आहे.

पुढच्या भागांची उत्सुकता यासाठीच आहे की काही वैयक्तिक अनुभवांचं शब्दांकन कसं करताय ते पहायला आवडेल. हा प्रामाणिकपणा काही गोष्टी लिहिताना जीवघेणा होईल, तेंव्हा लिहिताना तुमची बोटं किंचित कंप पावतील हे लक्षात येतंय.

पाषाणभेद's picture

28 Feb 2012 - 1:21 am | पाषाणभेद

हा हा हा
जबरा प्रतिसाद!

पुढील भागाची वाट पाहतोय.

धन्या's picture

28 Feb 2012 - 3:59 pm | धन्या

तुम्हालाही असंच वाटतंय ना.

असो. लवकरच पुढचा भाग टाकण्यात येईल आणि त्यानंतर मात्र तुमचा हा गैरसमज दूर होईल.

वाचतिये.
हा अनुभव तुमचा नाही हे पक्कं लक्षात आहे. काळजी नसावी.;)

मी-सौरभ's picture

28 Feb 2012 - 4:28 pm | मी-सौरभ

सुरवात जमलीये; आता जरा ईस्पीड घेऊद्या कथेला :)