सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
18 Nov 2011 - 4:56 pm

राम-राम मंडळी.. लै दिवसांनी बोर्डावर येणं झालंय...

तर सांगायचं म्हणाल तर असं, की सध्या मी मेघालयात आहे, आणि मेघालय सरकारनी मला आमपाटी नावाच्या एका पहील्या नजरेत "अहाहा ! निसर्गरम्य.." आणि लवकरच पकायला लावणार्‍या सब-डिव्हीजनला आणून बसवलाय..

तर ऑफीसात बसून-बसून फायलींच्या संगतीत पकल्यावर आणि थोडाफार फिल्डमध्ये लोकांच्या तक्रारी, शिव्याशाप आणि इतर बरंच काही ऐकून झाल्यावर, एका विकांताला आम्ही जरा शिलाँग-चेरापुंजीला भटकून यायचे ठरवले.. (तसाही शिलाँगला माझा "मुंह दिखाई" चा कार्यक्रम व्हायचा होता..)

शिलाँगपासून चेरापुंजी ( लोकली "सोहरा") जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे. चेरा-मौसीनग्राम जगात सर्वाधिक पावसासाठी तर प्रसिद्ध आहेच, पण इथे इतरही बर्‍याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या.. उदाहरणार्थ, सेव्हन सिस्टर फॉल्स, जिथे एकाच दरीत सात धबधबे कोसळतात (पण हे पहायला नशीबाची साथ हवी.. पावसाळ्यात बरेचदा दर्‍या अख्ख्या ढगात बुडालेल्या असतात किंवा पावसाळ्यानंतर धबधबेच आटतात..) चुनखडीच्या गुफापण एक नक्की बघेबल जागा आहे. भुगोलात शिकलेले स्टॅलेक्टाईट्स, स्टॅलेग्माईट्स इथे बघायला मिळतात. बाकी "बादलों में डुबी वादीयां" तर एनी टाईम..

आम्ही हे सगळं आधीच बघीतलेलं असल्यामुळे आम्ही ह्यावेळी थोड्या वेगळ्या जागेवर जायचं ठरवलं.. ही जागा म्हणजे "डबल डेकर लिव्हींग रुट्स ब्रिज" अर्थात जिवंत मुळांचा दुमजली पुल.. हे पुल म्हाणजे एक बायो-इंजिनीयरींग वंडर (मराठी शब्द?) आहे. "वार खासी" प्रजातीच्या लोकांनी ह्यांचा शोध लावला..

ह्यांत रबर प्रजातीतल्या (फायकस एलास्टिका) झाडांच्या मुळांना, सुपारीच्या झाडाच्या पोकळ खोडांच्या माध्यमाने नदीच्या किंवा ओढ्याच्या दुसर्‍या काठाकडे वळवून रोवल्या जाते. एकदा मुलांनी जमीन पकडली की मग बाकीच्या मुळांनाही ह्याच पद्धातीने एकमेकांमधे गुंतवून एक "जिवंत पुल" बनवल्या जातो.. हा पुल बनायला सुरुवात केल्यापासून पुर्ण व्हायला २५-३० वर्षे लागतात आणि एकदा पुर्णपणे विकसीत झाल्यावर असा पुल जवळपास ५०० वर्षेपर्यंत टिकू शकतो..

तर आम्ही "चेरा रिसॉर्ट" नावाच्या जागेहून सुरुवात केली. समोर दिसणार्‍या दर्‍या-ढगांमधे कुठेतरी जायचे होते..

इथून आम्ही जवळपास ४-५ किलोमीटर गाडीने गेलो. तिथून दरीत उतरणार्‍या पायर्‍यांना सुरुवात होत होती.. (जाण्या-येण्यात तुम्ही जवळपास सात-साडेसात हजार पायर्‍या चढता-उतरता. आणि हो, पायर्‍या म्हंजी चांगल्या स्टीप पायर्‍या, काही ठिकाणी जवळपास ७० डिग्री स्टीप..

तर उतरायला सुरुवात केल्या-केल्या ह्या साहेबांनी वेलकम केलं..

थोड्याच पुढं ह्यांचे भाऊसाहेब आम्हाला "अॅब्स" दाखवत लटकले होते..

आणखी खाली उतरल्यावर आम्हाला पहीला "लिव्हींग रुट ब्रिज" भेटला..

आणखी खाली उतरायचं होतं.. मी मारे माझे रुपकुंड वाले ट्रेक शुज घालून आलो होतो, की च्यायला "रुपकुंड" चढलाय ह्यांनी, ये क्या चीज है ? पण हे विसरलो होतो, की त्यांची बर्‍यापैकी झीज झाली आहे. त्यातच भरपुर पाऊस असल्याने भरपुर शेवाळपण होतंच.. पाय सटकत होते. तेव्हा आनेवालों, सावधान. चांगले शुज घालून या !!
हां तर आणखी खाली उतरल्यावर आम्ही एका छोट्या धबधब्याजवळ आलो, आणि "सुंदर, सुपर्ब, अहाहा" ला मागे टाकणारं दृष्य समोर होतं.. माझ्या आयुष्यात मी पाहीलेला निळंशार पाणी असलेला हा पहीला धबधबा..

ह्या धबधब्याला क्रॉस करण्यासाठी एक लोखंडी झुलता पुल होता. येकदम झक्कास.. कसाबसा एक फूट रुंद असेल. बनवणार्याने "प्रहार" मधला "एक आदमी को चलने के लिए कितनी जगह लगती है?" हा नानाचा प्रश्न समोर ठेवून बनवला असावा. ;-) च्यायला, अशा पुलावरुन आदिवासी लोक पाठीवर ओझं घेवून चालतात म्हणजे कमाल आहे..

आता पुन्हा काही पायर्‍या चढायच्या होत्या.. (बादवे, सरकारला जिथं-तिथं शिव्या देतांनाच, अश्या कठीण जागेवर नरेगा-बिरेगा मधून पायर्‍या बांधून लोकांचं जीवन थोडंफार सुकर करतंय सरकार हे पण ध्यानात घ्यायला पाहीजे.) तर बर्‍यापैकी चालून झाल्यावर आम्ही त्या जगातील एकमेव अश्या "बायो-इंजिनीयरींग वंडर" जवळ पोहचलो..

हा पुल दुमजली तर आहेच, पण जबरदस्त मजबूतही आहे. मिळलेल्या माहीतीनुसार, ह्यावर एकावेळी ५०-६० जण उभे राहू शकतात. आणि आता आणकी एक "मजला" चढवायचा विचार सुरु आहे.. फोटोत एकदम टॉपला दिसत असलेल्या मुळांना रुजवून..

परततांना हे दोघे "काय-बाय" करत होते.. त्यांच्या प्रायवेट मोमेंट्स टिपल्यात म्हणून "सॉरी शक्तिमान"..

दुसर्‍या दिवशी "डेव्हीड स्कॉट ट्रेल" म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका ट्रेकला गेलो.. हा तसा सोपा रुट आहे. डेव्हीड स्कॉट नावाच्या एका ब्रिटीश रेसिडेंट कमिशनरने हा रस्ता घोड्यावरुन प्रवासला होता.. जवळपास संपुर्ण रस्ता पेव्ह्ड आहे.. हे त्याचे फोटोज..

पुन्हा भेटूया...

प्रवासछायाचित्रणप्रकटनशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

गवि's picture

18 Nov 2011 - 5:00 pm | गवि

फार सुंदर रे. कधीही न पाहिलेली वेगळी रिजन पहायला मिळाली. अनेकानेक धन्यवाद चिगो.....

चिगो's picture

21 Nov 2011 - 5:00 pm | चिगो

ऑलवे़ज वेलकम, गवि... बादवे, तुमच्या "स्क्रीन काळा मोठा गोळा"ची लिंके तुम्ही मागे एकदा मिपावर डकवली होती, ती प्लिज व्यनितून पाठवता का? धन्स...

अर्र. हा प्रतिसाद पहायचाच राहिला.. सॉरी... आता लगेच करतो व्यनि.

आत्मशून्य's picture

18 Nov 2011 - 5:00 pm | आत्मशून्य

निळंशार पाणी असलेला हा पहीला धबधबा..

खरोखर मस्त.

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 6:08 pm | धमाल मुलगा

सालं, एव्हढं निळंशाऽऽर पाणी आमच्यासारख्या हायजिन मॅनिअ‍ॅक शहरी लोकांनी पाहिलं तर , "इज धिस पॉयझनस?" असा कर्मदरिद्री प्रश्न विचारतील अशी भिती वाटली रे!

अशक्य सुंदर दिसतंय ते.

मोहनराव's picture

18 Nov 2011 - 6:12 pm | मोहनराव

बिस्लेरीचे पाणी झक मारेल तिथे!!

चिगो's picture

21 Nov 2011 - 5:07 pm | चिगो

@आत्मशून्य, आमच्या डोळ्यांचेही पारणे फिटले हो.. सगळे श्रम झुप्पकन उडून गेले..
@धमु, अरे मला वाटतं ते दगडांमुळे असावं तिथल्या.. च्यायला, जास्तीचे कपडे सोबत नेले नव्हते म्हणून स्वतःलाच लै शिव्या मोजल्या राव.. नाहीतर "पॉयझनिंग" बद्दल खात्रीशीर सांगू शकलो असतो..
@ मोहनराव, खरंय तुमचं.. बिस्लेरीचं पाणी झक मारत्यं तिथल्या झर्‍यांच्या पाण्यापुढे..

विजुभाऊ's picture

18 Nov 2011 - 5:47 pm | विजुभाऊ

झक्कास सुंदर. मेघालय अजून भरपूर फिरा.
आणि आम्हालापण दाखवा इथे मिपावर

राजघराणं's picture

18 Nov 2011 - 5:47 pm | राजघराणं

अवतार सिनुमाची आठवण झाली

मदनबाण's picture

18 Nov 2011 - 5:54 pm | मदनबाण

सुंदर ! चिगोराव तुम्ही तर स्वर्गात राहत आहात की !
तो कोळी आणि ते सॉरी शक्तीमान वाले काही शॉट मी सुद्धा टिपले आहेत... :) ते टाकायची या निमित्त्याने इच्छा झाली हाय बघा. :)

जबरा आणि अजुन काय लिहिणार ओ, कधी आलोच त्या एरियात तर हुडकु तुमच्या पाउलखुणा.

धबधबा लई भारी.

मोहनराव's picture

18 Nov 2011 - 6:08 pm | मोहनराव

अहो चिगो मस्त फोटो आहेत!!
तो दुमजली बायोपुल आवडला बुवा!! अधेमधे लिहिलेल्या कमेंटसहि छान!!

सुहास झेले's picture

18 Nov 2011 - 6:09 pm | सुहास झेले

व्वा व्वा... एकदा डिस्कव्हरीवर बघितलं होतं लिव्हींग रुट ब्रिजबद्दल... मस्त जागा आहे.

नक्की भेट द्यायला आवडेल :) :)

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 6:10 pm | धमाल मुलगा

काय च्यायला एकेक जागा शोधून काढतोस बेट्या तू पण.
डोळ्याचं पारणं फिटल्याबिगर र्‍हातच नाही जी. :)

गणपा's picture

18 Nov 2011 - 6:50 pm | गणपा

अगदी असेच म्हणतो.

अर्धवटराव's picture

19 Nov 2011 - 12:55 am | अर्धवटराव

खरच जबरी.

अर्धवटराव

देखणा निसर्ग,चित्तवेधक फोटो आणि सुरेख वर्णन.

Nile's picture

18 Nov 2011 - 8:09 pm | Nile

त्या झाडाच्या मुळांपासून बनवलेल्या पुलाची लाईफ स्टोरी फार भारी आहे! पिढ्या असे पुल कसे बनवायचे ह्याचं शिक्षण आपल्या लहान मुलांना देतात तिथे. एक पुल बनायला दोन तीन पिढ्या सहज लागत असतील, किंवा जास्तच.

भारी फोटू!
मुळांचा पूल ही कल्पनाच आश्चर्य वाटवणारी आहे.
निळंशार पाणी अतिसुंदर आहे.
समुद्राचा निळा रंगही कधीकधी अतिनिळा वाटतो पण हा रंग अफलातून आहे.

सर्वसाक्षी's picture

18 Nov 2011 - 9:08 pm | सर्वसाक्षी

झकास वर्णन आणि झकास चित्रे. पाहताच जायची झाली. मुळांच्या वीणीचा पूल अफलातुन.
उत्तरपूर्वे विषयी ऐकुन आहे, कधी योग येतो ते पाहायचे.

जाता जाता:
बायो-इंजिनीयरींग वंडर = जैविकाभिकीयांत्रिकी आश्चर्य.

प्रास's picture

18 Nov 2011 - 9:59 pm | प्रास

मस्त जागा, मस्त वर्णन आणि मस्त फोटो!

मेघालयाचा आणि तिच्यासह असलेल्या सातही बहिणींची अशीच फोटोसकट माहिती द्या.

पुढील वाटचालींसाठी (शासकिय आणि बिनशासकिय) हार्दिक शुभेच्छा!

:-)

अवांतर - (यकुशेठांच्या कार्यक्षेत्रात लुडबुड करत) बायो-इंजिनीयरींग वंडर = जैव-अभियांत्रिकी आश्चर्य असं म्हणता येईल का? ;-)

चिगो's picture

21 Nov 2011 - 5:09 pm | चिगो

मेघालयाचा आणि तिच्यासह असलेल्या सातही बहिणींची अशीच फोटोसकट माहिती द्या.

सगळ्यांची तर नाही पण काही जागा भटकलो होतो, त्यांच्याबद्दल इथे लिहीलय..

http://www.misalpav.com/node/15366

पैसा's picture

18 Nov 2011 - 10:39 pm | पैसा

पहिल्या वाक्यापासून पकडून ठेवलय लेखाने. काय मस्त वर्णन फोटो आणि एकूणच फील!! खास. आम्हा मिपाकरांसाठी सरकार तुम्हाला आणखी काही दिवस असंच पकवत ठेवू दे अशी त्या 'मनमोहन'चरणी प्रार्थना!!!

स्मिता.'s picture

19 Nov 2011 - 3:17 am | स्मिता.

फार वेगळे आणि अप्रतिम सुरेख फोटो. निळा धबधबा आणि मुळांच्या पुलाचे फोटो तर क्लासच!
ईशान्य भारताचे आणखी फोटो असतील तर तेही येवू द्यात. तेच बघून डोळ्यांचे पारणे फिटतील.

क्लास्स्स्स.

@पैसाताई, मनमोहन कशाला? सोनिया चरणी म्हणा. ;)

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2011 - 10:45 am | प्रभाकर पेठकर

जिवंत मुळांचा पुल??
प्रथमच ऐकलं आणि तुमच्या कृपेने पहावयास मिळालं. खरंच, (श्री. सर्वसाक्षीजींच्या साक्षीने) जैवाभियांत्रिकी की काय म्हणतात तसले आश्चर्य आहे.

स्वागत's picture

19 Nov 2011 - 4:44 pm | स्वागत

फोटो आणि प्रवास वर्णन दोनीही १ नंबर

झक्कास चिगो.. स्वर्गाची सफर घडवून आणली रे..

- पिंगू

सुधांशुनूलकर's picture

19 Nov 2011 - 7:53 pm | सुधांशुनूलकर

चिंगोराव, लई भन्नाट.

इथं मिपावर बसल्याबसल्या आम्हाला मेघालयची सफर घडवलीत की राव....

सोत्रि's picture

20 Nov 2011 - 1:10 am | सोत्रि

झक्कास! एक नंबर!!

- ('ब्रिज' + इश असलेला) सोकाजी :)

नंदन's picture

20 Nov 2011 - 12:50 pm | नंदन

सगळेच फोटो अप्रतिम. जिवंत मुळांच्या पुलाची माहिती आणि फोटो विशेष आवडला. काही सनातन संकेतस्थळीय वादांच्या संदर्भात याची प्रतीकात्मकता विशेषत्वाने जाणवली ;)

विलासराव's picture

23 Nov 2011 - 11:41 pm | विलासराव

कधी येउ???????

चिगो's picture

25 Nov 2011 - 2:33 pm | चिगो

फक्त डिसेंबरात किंवा थंडीच्या दिवसांत येत असाल तर थंडीचे कपडे वगैरे घेवून या. बर्‍यापैकी थंडी आहे..

धन्यवाद.
आणखी कोणी यायला तयार आहे का?

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 7:16 am | मदनबाण

लिव्हींग रुट्स ब्रीज.. हे पाहुन मला आफ्रिकेतील पिग्मींज ने बांधलेला ब्रीज आठवला... पिग्मी हे नाव हा धागा वाचला तेव्हा आठवत नव्हते...आत्ताच तो व्हिडीयो मला मिळाला तो इथे देत आहे.

प्रभाकर पेठकर's picture

25 Nov 2011 - 9:17 am | प्रभाकर पेठकर

अप्रतिम अभियांत्रिकी आणि समुह कार्य साहाय्य. मस्तं चित्रफित.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

वॉव ! लै भारी !!

लय म्हणजे लय म्हनजे लय भारी रे चिनु !!

अजुन येवु देत !!

शिल्पा ब's picture

29 Jul 2012 - 12:03 am | शिल्पा ब

निशब्द :
मुळांचा पुल जो ५०० वर्ष टिकतो ! तुमच्यामुळे माहीत झालं. अजुन अशा जागांची माहीती द्या.

एक बारीक प्रश्न : चेरापुंजीत जो पाउस पडतो त्याच्या पाण्याचा काय उपयोग करतात ? म्हणजे विज निर्मिती किंवा अजुन काही.

चिगो's picture

29 Jul 2012 - 1:31 pm | चिगो

चेरापुंजीत जो पाउस पडतो त्याच्या पाण्याचा काय उपयोग करतात ?

त्याचा एकमेव उपयोग म्हणजे बांग्लादेशात पुर आणणे... ;-)

नि३सोलपुरकर's picture

30 Jul 2012 - 12:34 pm | नि३सोलपुरकर

चिगो साहेब,
जिवंत मुळांच्या पुलाची माहिती आणि फोटो विशेष आवडले
खुप खुप धन्यवाद

सुनील's picture

17 Apr 2014 - 3:38 pm | सुनील

पुढील महिन्यात चेरापुंजीला जाण्याचा बेत आहे. तेव्हा थोडी माहिती मिळवण्यासाठी धागा वर काढला.

प्रमोद देर्देकर's picture

17 Apr 2014 - 4:43 pm | प्रमोद देर्देकर

धन्यवाद सुनिलजी आम्हाला पण निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता आला. बाकी तुम्ही जावुन आलात की तुम्हीसुध्दा असेच भरपुर फोटो आणि प्रवास वर्णन लिहायला विसरु नका. तिथल्या लोकांचे जीवन, राहणीमानाविषयी लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

मस्तच... बघावे ते नवलचं.

टिनटिन's picture

17 Apr 2014 - 9:57 pm | टिनटिन

चेरापुन्जीला खुप छान भुमिगत गुहा आहेत. सिमेन्ट प्लान्ट जवळुन जाता येते. आतमध्ये पूर्ण अन्धार असतो. गाईड घेणे जरूरी आहे. ३-४ तास वेगळीच दुनिया असते.

आतिवास's picture

17 Apr 2014 - 10:45 pm | आतिवास

एक मस्त लेख चिगो. फोटो तर अप्रतिम. माझ्याही मेघालय प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या.

अवांतरः २०११-१२ मध्ये कधीतरी मी शिलाँगला आले होते तेव्हा तुमच्याबद्दल मला सांगण्यात आलं होतं (मराठी माणूस म्हणून). ठरवलं असतं तर भेटताही आलं असतं - पण तेव्हा मी 'मिपा'वर नव्हते त्यामुळे चिगो ही काय चीज आहे ते माहिती नव्हतं ;-) - म्हणून कंटाळा केला.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा

वॉव! वाचता..वाचता..फोटो बघता..बघता.. मन शांत तृप्त झालं!

बालगंधर्व's picture

20 Apr 2014 - 2:55 pm | बालगंधर्व

चिगो, तुमचय मुले मन सहन्त झले. पोतो चन अहेत. मल वेल झला के एक्दाआ मे जैन चेरपुन्जेला. मलअ नविन थिकना शोधाय्चे हयेत्च. करन अशया थिकने गद्री कमीए अत्से. अनि त्उया थिकनचे अननद घेउ शक्तो.