सात अब्ज

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
2 Nov 2011 - 9:06 am

१८०० च्या दशकात जगाची लोकसंख्या प्रथमच एक अब्जापर्यंत पोचली. १९२७ साली म्हणजे उण्यापुर्‍या शतका मधे ती दुप्पट अर्थात २ अब्ज झाली, साधारण सत्तर वर्षात, १९९८ साली ती सहा अब्ज इतकी झाली तर केवळ १३ वर्षांमध्ये ती आता ७ अब्ज इतकी झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या औपचारीक अंदाजाप्रमाणे कालच्या एकतीस ऑटोबरला जागतीक लोकसंख्या ही ७ अब्ज झाली! पण अमेरीकन लोकसंख्या मोजणी आयोगाप्रमाणे सात बिलीयन्स होण्यासाठी अजून चार-पाच महीन्यांचा अवधी आहे. खालच्या आलेखात दाखवल्याप्रमाणे २०५० पर्यंत हा आकडा ९ अब्ज इतका मोठा होणार आहे!

(विकी)

जगाच्या ज्ञात इतिहासात प्रथमच लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जात आहे. जगाची लोकसंख्या ही २१५,१२० ने दरदिवशी वाढत आहे! भारतात नुसते जन्म किती होतात याचा विचार केल्यास सेकंदाला एक इतके होतात! त्यामुळेच किमान लोकसंख्येत तरी भारत चीनला २०२५ पर्यंत मागे टाकणार असा अंदाज आहे!

थोडक्यात येणार्‍या काळात या लोकसंख्येमुळे होणारे परीणाम विविध स्तरांवर दिसणार आहेत...

गेल्या काही दशकांमध्ये विकसीत आणि विकसनशील देशांची उर्जेची भूक सातत्याने वाढत गेली आहे. जस जसा एखाद्या भागाचा/राष्ट्राचा अधुनिकतेच्या निकषाने विकास होत गेला तस तसे तेथील जनतेच्या राहणीमानाच्या दर्जासंबंधातील अपेक्षा देखील उंचावत गेल्याचे दिसते. त्यात सुरवातीस शिक्षण आले, मग नोकरी-धंदा येते, मग आरोग्य, आयुष्याची मर्यादा वाढवणे, सुखसोयी वगैरे वगैरे येत जाते. पण त्याच बरोबर त्यातील आहेरे-नाहीरे ची विभागणी देखील वाढत गेलेली दिसते. त्याचे परीणाम मग स्थानिक वैमनस्यापासून ते कुठल्याही पातळीवरील युद्धापर्यंत होऊ शकतात. पण त्याचे मूळ हे बर्‍याचदा (धार्मिक कारणे सोडल्यास) नैसर्गिक साधन संपत्ती कुणाकडे आहे इथपासून विविध पद्धतीची आर्थिक कारणे असेच असते.

त्याच संदर्भात आता उर्जा, पाणी, सांडपाणी, अन्नधान्य, रहाण्यासाठी जागा, अशा सध्याच्या काळातील प्रत्येक मुलभूत गरजांसाठी आणि त्यांच्या स्त्रोताच्या नियंत्रणासाठी स्पर्धा होऊ शकेल, किंबहूना आजही होते असे ध्यानात घेतले तर ती अधिक तिव्र होऊ शकेल असे म्हणावे लागेल. एका गोष्टीसाठी सर्वच अवलंबून असले तरी प्रत्यक्ष स्पर्धा होणार नाही, ती म्हणजे पर्यावरण...

त्याशिवाय आता जगातील ५०% हून अधिक जनता ही शहरीभागात रहाते, त्यामुळे शहरीकरणाच्या समस्या वाढत जाणार आहेत. पण या समस्यांचे संधीमधे कसे रुपांतर करायचे हा प्रश्न आहे. त्या संदर्भातून आज अपारंपारीक उर्जेचा कसा वापर करता येईल, आरोग्य सेवा ही अधिकात अधिकांपर्यंत पोचवताना फायदेशीर कशी ठेवता येईल, दारीद्र्यरेषेखालील जनतेला वर आणताना कुठल्यापद्धतीच्या आर्थिक योजना आमलात आणता येतील, शिक्षण हे कसे दूरवर पोचवता येईल आणि त्यात व्यावहारीक शिक्षणास कसे प्राधान्य असेल (कोचिंग क्लासेस नाही!) या आणि अशा अनेक गोष्टींवरून धंदे काढता येऊ शकतात. नव्हे, असे अनेक उद्योग आज उभे आहेत, आणि अजून नवीन उभे रहात आहेत.

हा लेख/चर्चाप्रस्ताव केवळ एक या विषयावरील माहिती एकत्र करण्याची सुरवात आहे... अधिक माहिती प्रतिसादांमधून घालेनच पण वाचकांनी देखील त्यात सहभागी व्हावे ही विनंती.

-------------

समाजजीवनमानराहणीलेखमाध्यमवेध

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

2 Nov 2011 - 9:25 am | कच्ची कैरी

खरच खूप भयानक होत चालली आहे ही समस्या

मदनबाण's picture

2 Nov 2011 - 10:52 am | मदनबाण

हो मनुष्य प्राणी,इतर प्राण्यां सारखाच मनुष्य हा देखील पृथ्वी नावाच्या ग्रहावर राहणार्‍या अनेक प्राण्यांपैकीच एक आहे. स्वतःजवळ असलेल्या असामान्य बुद्धीमत्तेने त्याने या ग्रहावर आपली प्रचंड प्रजा निर्माण केली आहे ?

लोकसंख्येचा विस्फोट हा त्याचे घातक परिणाम दाखवणाराच आहे,आणि मनुष्य प्राण्याच्या वाढत्या संख्येमुळे इतर प्राण्यांच्या संख्येवर मात्र भयानक परिणाम होणार /होतात/झाले आहेत हे मात्र नक्की ! :(
काही वर्षांनी वन्य जीवन हे फक्त डिस्कव्हरी चॅनल सारख्या माधमातुन येणार्‍या पिढीला दिसेल... :(
माणसांना माणसांचाच कंटाळा येईल्,गर्दीचा कंटाळा येईल... कारण आपण निसर्गाचाच भाग आहोत आणि निसर्ग नष्ट झाल्यास त्याचा परिणाम आपल्यालाच भोगायला लागेल. :(

जाता जाता :--- एजंट स्मिथ म्हणतो... http://www.youtube.com/watch?v=UOi6v5DD_1M&feature=related

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2011 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल सकाळी 'दै. दिव्य मराठीला ' उंबरठ्यावर पाय ठेवण्याचा मान मिळाला. आणि फ्रंट न्युज ने माझा मेंदू जागा झाला. '' जग झाले सात अब्ज लोकांचे ; भारताच्या नर्गीसला मान ! '' बातमी वाचत गेलो आणि मग इतर देशांमधील मूल ही सात अब्जावे मानले जात आहे. लोकसंखेच्या समस्या वगैरे आणि नेहमीप्रमाणेच बातमीचा समारोप झाला की, संयुक्त राष्ट्र संघाने मात्र अशा कोणत्याही सात अब्जाव्या मानल्या जाणार्‍या संकेताला नकार दिला. बातमी विसरुनही गेलो.

आणि आत्ता चर्चाप्रस्ताव वाचल्यावर पुन्हा विचारांचे चक्र सुरु झाले. आपल्याला आता रडत-पडत का असेना सर्व सुविधा मिळत आहे. पूर्ण समाधानी नसू पण समाधान मानल्यावरचा आनंद आत्ता आहेच. पण येणारी पिढी आणि त्याच्या पिढीच्या वाटेला जीवन सुखमय, स्वास्थमय, आणि समृद्धी असणारं असं लाभेल काय ? वाढत्या लोकसंखेच्या समस्या म्हटलं तर नुसत्या समस्या आणि समस्यांचा पर्वत दिसू लागतो. वाढती लोकसंख्या आणि शिक्षण, वाढती लोकसंख्या आणि आरोग्य, वाढती लोकसंख्या आणि उत्पन्न अशा कितीतरी गोष्टी या लोकसंखेशी संबंधित आहे.

धर्म आणि लोकसंखेच्या बाबतीतला मुद्दा चर्चेला घेतला तर आपल्या लक्षात येते की, लोक जितके धार्मिक आणि अशिक्षित तितकी लोकसंख्या अधिक वाढत चालते असे म्हटले तर वावगे ठरु नये. रुढी,श्रद्धा, आणि समज आणि शिक्षणाचा अभाव, या कारणाने अशी कुटूंबे मोठी होत जातात. मोजकेच उत्त्पन्न असल्यावर त्याचा परिणाम आहारावर होतो, राहणीमानावर होतो. शिक्षणावर होतो, आरोग्यावर होतो तसाच सामाजिक स्वास्थ्यावर होतो. गुन्हे, बेकारी, वाढत चालतात.लोकसंख्या वाढीचा सर्वात मोठा परिणाम पायाभूत सुविधांवर पड्णारा ताण. तेव्हा अधिक शिक्षित समाजच काळाची पावले ओळखून प्रथा, परंपरेतुन योग्य मार्ग शोधेल आणि तोच वर्ग भविष्यात अधिक सुस्थित असेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

3 Nov 2011 - 6:14 am | विकास

तेव्हा अधिक शिक्षित समाजच काळाची पावले ओळखून प्रथा, परंपरेतुन योग्य मार्ग शोधेल आणि तोच वर्ग भविष्यात अधिक सुस्थित असेल असे वाटते.

सहमत. त्यावरून रामदासांच्या १७ व्या शतकातील चपखल ओळी आठवतात.

लेंकुरें उदंड जालीं| तों ते लक्ष्मी निघोन गेली |
बापडीं भिकेसी लागलीं| कांहीं खाया मिळेना ||१||

लेंकुरें खेळती धाकुटीं| येकें रांगती येकें पोटीं |
ऐसी घरभरी जाली दाटी| कन्या आणी पुत्रांची ||२||

हे मी पूर्वीही म्हटले होते; आताही म्हणतो आहे. एकूण पृथ्वीचा आवाका लक्षात घेता १ अब्ज मानवांच्या क्रिअय आणि ७ अब्ज मानवांच्या क्रिया ह्याने पडणार्‍या ताणात नक्की किती फरक आहे हे एकदा कॅल्क्युलेट व्हायला हवे.

समजा पूर्वी, ५ कोटी वर्षापूर्वी जगात १० झुरळे होती, आता १० दश लक्ष ब्ज आहेत, म्हणून पृथ्वीचा ताण वाढला असे नाही. ७ अब्ज हा आकडा हा मानवी मनाला मोठा वाटणारा आकडा खरेच तित्का मोठा पृथ्वीच्या परिणामात आहे का हे पहायला हवे. अजूनही मुद्दे आहेत. जमल्यास नंतर टंकतो.

लोकसंख्या नियोजन ही खरोखर मोठी समस्या आहे, हे मान्य.

मनस्विनि२५१'s picture

2 Nov 2011 - 4:34 pm | मनस्विनि२५१

अतिशय योग्य मुद्द्याला हात घातलात.
सध्या ही जी वाढ होत आहे मग ती लोकसंख्या असो, कि आर्थिक दरी; येणाऱ्या पिढीसाठी जीवघेणी ठरू शकते, जर आपल्या पिढीने त्याला वेळीच सावरण्यासाठी निदान पायवाट शोधण्याचा प्रयत्न केला नाही तर !!
तुम्ही म्हणताय तसे अनेक संधी व्यवसायासाठी उपलब्ध होऊ शकतात, पण त्यासाठी समाज आणि राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे वाटते, तसेच समाजाची नवीन उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टीदेखील महत्वाची भूमिका बजावू शकते.
बाकी माहिती संग्रह चांगला आहे.

मनस्विनि२५१'s picture

2 Nov 2011 - 4:34 pm | मनस्विनि२५१

अतिशय योग्य मुद्द्याला हात घातलात.
सध्या ही जी वाढ होत आहे मग ती लोकसंख्या असो, कि आर्थिक दरी; येणाऱ्या पिढीसाठी जीवघेणी ठरू शकते, जर आपल्या पिढीने त्याला वेळीच सावरण्यासाठी निदान पायवाट शोधण्याचा प्रयत्न केला नाही तर !!
तुम्ही म्हणताय तसे अनेक संधी व्यवसायासाठी उपलब्ध होऊ शकतात, पण त्यासाठी समाज आणि राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे वाटते, तसेच समाजाची नवीन उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टीदेखील महत्वाची भूमिका बजावू शकते.
बाकी माहिती संग्रह चांगला आहे.

आनंदी गोपाळ's picture

2 Nov 2011 - 9:53 pm | आनंदी गोपाळ

मग तुम्ही काय केलंत?
हे संकट टाळण्यासाठी? :-?

संजय गांधींनी माणसांसाठीसक्तीची नसबंदी राबवली. त्यांच्या अर्धांगिनी मनेकाजींनी कुत्र्यांची नसबंदी करा असा आदेश देण्यास सुप्रीम कोर्टास भाग पाडले... मूर्ख लेकाचे!

(रात्री मो.सा. वर बसून घरी जातांना अंगावर येणार्‍या कुत्र्यांमुळे दु:खी झालेला,)
"आनंदी" गोपाळ

पैसा's picture

2 Nov 2011 - 10:40 pm | पैसा

या ७ अब्जापैकी २०११ च्या जनगणनेनुसार १ अब्ज २१ कोटी लोक भारतात रहातात. तर चीनमधे १.३४ अब्ज. म्हणजे या २ देशातच जगातले २.५५ अब्ज लोक रहातात (जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ३६.४२%). फरक इतकाच की चीनची लोकसंख्या गेल्या दशकात ५.४३% वाढली तर भारताची १७.६४%. आशा वाटण्यासारखी एकच गोष्ट म्हणजे भारताचा लोकसंख्या वाढीचा दर गेल्या दशकापेक्षा कमी झालाय, तर दर हजारी महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत ९३३ वरून ९४० वर पोचलीय. (जागतिक स्तरावर हेच आकडे ९८६ आणि ९८४ असे आहेत.)

या प्रचंड लोकसंख्येला पॉवर म्हणून चीनने यशस्वीरीत्या वापरलंय, पण आपल्याकडे सगळ्याना पुरेसं काम देणं फार कठीण आहे. त्यातून गावातल्या लोकांना सरकार इतकं काही देत असतं की ते काम करायला तयार होत नाहीत असा एक समज आहे. (किती खरा, ते मला माहिती नाही.) त्याचवेळी कितीतरी मुलं शिक्षणाला वंचित राहून घरकाम आणि पैसे मिळवायला हातभार लावतानाही आढळतायत. शिवाय उच्चशिक्षित लोकांचा कल अधिक संधी असलेल्या ठिकाणी, म्हणजेच परदेशात नोकर्‍या करण्याचा असतो. भले आपल्याला अभिमान वाटतो, की आम्ही सगळ्या जगाला इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञ पुरवतो, पण त्यांच्या शिक्षणाचा भारताला किती उपयोग होतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

या वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, त्यात सगळ्यात मोठा वाटतो तो पिण्यायोग्य पाण्याचा आणि पर्यावरणावर होणार्‍या परिणामांचा. पेट्रोल आणि इतर खनिजं काही अमर्याद नाहीत त्यामुळे त्यांचे साठे दिवसेंदिवस कमी होत जाणार. त्याना काही पर्याय शोधावे लागतील. अन्नधान्याची उपज करणार्‍या जमिनी घरांसाठी वापरल्या जातील, त्यामुळे अन्नधान्याचा प्रश्न आ वासून उभा राहील. बेकारी आणि त्याबरोबर इतर इतर समजविघातक गोष्टी वाढतील. विचार करावा तितकं अधिक भयानक चित्र डोळ्यापुढे उभं राहतं.