अनामिक भटकंती ३ - रतनगड.

गणेशा's picture
गणेशा in कलादालन
23 Sep 2011 - 4:15 pm

अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323

मुंबईवरुन संध्याकाळी ६:३० ला गोदावरी गाडी ने नाशिक रोड ला उतरलो. सिन्नर चा माझा मित्र ह्रषिकेश यमाहा १३५ वर मला न्ह्यायला आलाच होता(मीच बोलावले होते, बिच्चारा मॅच सोडुन आला) .. नाशिक मधील जुने कलीग त्यांच्या फॅमीली बरोबर रात्री "छान" मध्ये जेवुन , जाताना मी चिकन खाल्ले म्हणुन २ शब्द मित्राकडुन उगाच ऐकुन आम्ही सिन्नर ला निघालो...

रतनगड ला तसे नाशिक वरुन ही जाता आले असते पण सकाळी डबा घ्यायचा असल्याने नाशिक च्या मित्राला सोडुन आम्ही सिन्नर ला गेलो. रतनगड ला ही बाकीचे लोक कॅन्सल झाल्याने आम्ही दोघेच जाणार होतो..
सकाळी लवकर उठुन .. २ ब्यागा भरण्यात आल्या.. आणि आम्ही रतनगड कडे कुच केली...

सिन्नर पासुन घोटी जवळच आहे .. सकाळचा तो प्रवास छान वाटत होता.. आल्हाददायक हवेने मन प्रसन्न होत होते.. थोडे पुढे जावुन पुन्हा एकदा टपरीवर चहा पिउन आम्ही पुढे निघालो, रस्त्यात दिसणारे कळसुबाई चे शिखर .. बाजुलाच अतिशय कठीण मानले गेलेले मदन्-अलंग-कुलंग या गडांची रांग खुणावत होतीच .. पुढच्या ट्रेकींगचा गड फिक्स होत होता.. कळसुबाई जवळील बारी गावा शेजारुन गाडी चालली होती... कौलारु घरे असलेले छोटेशे गाव खुप मस्त वाटत होते.. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे असे मी बोललो.. मित्र बोलला मग दुसरे कुठले आहे ? मी निरुत्तर .. कारण या जगात १ नंबर ला कोण हेच महत्वाचे समजले जाते... मित्राने उत्तर दिले साल्हेर ... साल्हेर दिसत नसताना ही फोटोत पाहिलेला साल्हेर त्याची भव्यता पुन्हा मनात कोरुन आम्ही पुढे निघालो ..

शेंडी गाव आले, अहमदनगर जिल्ह्यात आम्ही प्रवेश केला होता.. बाजार असल्या कारणाने बर्‍यापैकी वर्दळ आणि जीप ने वाड्या वाड्या वरुन येणारी माणसे दिसत होती.. सगळी कडे गडबड दिसत होती... या प्रवासातील हे पहिलेच गजबज असलेले गाव पाहुन छान वाटले...
थोडे पुढे गेलो की भंडारदरा धरण लागले .. १९२६ साली बांधुन पुर्ण झालेल्या आणि त्यावेळेस आशियातील सर्वात मोठ्या असणार्या धरणाच्या भिंतीवरुन आम्ही पुढील अमृतवाहिनीचा जलाशय ( प्रवरा नदी) मनसोकत पाहुन घेतला.. सुंदर निळ्याशार पाण्यात हळुच डोकावु पाहणारा सूर्य आणि हवेचा हलक्याच स्पर्षाने थरथरनारे तरंग खुपच छान दिसत होते..
भंडारदराच्या बॅक वॉटर च्या कडेने आम्ही रतनगडकडे निघालो.. जातानाचा घाट.. बॅक वॉटर मस्त नयनरम्य द्रुष्य दिसत होते.. सभोवतालचा निसर्ग जणु आपलेच मन आहे ,आणि आनंदाने हा निसर्ग वेडापिसा झाला आहे असे वाटुन गेले.

रतनवाडी .. अतिशय सुंदर, निटनिटकी वाडी .. गेल्या गेल्या लक्षात येते ते हेमाड पंथी अम्रुतेश्वराचे मंदीर..
अम्रुतेश्वराचे मंदीर खुपच प्रसन्न आणि कोरीव आहे, कोरीव काम पाहताना मन थक्क होते .. बाजुला अम्रुतवाहिणीचे पाणी आणि आल्हाद दायक शांत वातावरण यामुळे तर आपण स्वर्ग पायथ्याला आलो आहे असाच भास जनु होत राहतो .. मंदिरातील नक्षीकाम थक्क करणारे आहेच, पण रतनगडावर उगम पावणारी अमृतवाहिणी(प्रवरा नदी) जमीनीतुन येथे वरती येते, येथील शिवलिंग हे त्याच पाण्याचा उगमामध्ये आहे आनि ते अर्धे पाण्यात बुडालेले आहे.

अमृतेश्वर मंदिर,

शिवलिंगातुन उगम पावणारी अमृतवाहिनी,

हृषिकेश

शिवलिंग आणि अम्रुतवाहिणी यांचे छानसे द्रुष्य मनात साठवुन समोरचा सुंदर कोरीव बारव पाहुन आम्ही पुढे निघालो ...बरोबर १२ वाजले होते.

समोर एका पुलावरुन आम्ही नदीच्या पलीकडील जंगलाकडे गेलो, रतनगड , त्याची भव्यता, खालुन ही निसर्गनिर्मीत दिसणारे रतनगडावरील निडलहोल, आणि काही वेळानंतर त्या निडल होल मध्ये आम्ही जाणार म्हणुन खुष झाले मन .. पुढे चालु लागलो.. समोर छोट्या दिसणार्या २ टेकड्या चांगल्याच मोठ्या भासु लागल्या होत्या, रस्ता जंगलातुन .. झाडाझुडपातुन चालला होता , आणि त्यावर ठेचकळत आम्ही चाललो होतो, कोणीच आजु बाजुला दिसत नव्हते .. थोडे पुढे आल्यावर असे वाटु लागले आपण रस्ता वेगळा घेतला आहे बहुतेक, कारण जी टेकडी आम्ही चढलो आणि त्या जंगलातुन बाहेर आल्यावर आपण दूसर्‍याच बाजुच्या शिखराकडे चाललो आहे की काय असे वाटु लागले.. पण याचे वाईट न वाटता आनंदच वाटत होता.. आपण तेथे पोहचणार ही जीद्दच असेल कदाचीत.

दोन जंगलामधील पठार,

तितक्यात एक गावकरी आम्हाला भेटले .. अरे रे ईकडे कोठे ? तुम्ही वाट चुकलाय.. नदिच्या खाल्लंगाने तुम्ही जायला हवे होते , हे खुप लांबुन चालला आहे असे आणि तसे .. शेवटी आम्ही त्यांनाच गाईड घ्यायचे ठरवले कारण उगाच उशीर लागु नये म्हणुन.. नाहितर फिरण्याला कोणाची ना असते म्हणा.. कोकणकडा पहायला जायचे होते संध्याकाळी म्हणुन मग आम्ही हा निर्णय घेतला.. आम्हाला ही एकमेकांना जोक सांगुन सांगुन कंटाळा आलाच होता... मग आम्हाला नविन माहिती मिळायला लागली.. जंगल तिथली झाडे वनऔषधी वगैरे .. बोलत बोलत आम्ही दुसरा डोंगर पार केला.. आता समोरील जंगल पार केले की उंचच उंच दिसणारे खडक बाजुने पार करुन वरती गडावर जाता येणार होते .. साधारणता १:३० तास संपला होता आणि अजुन १:३० -२ तासाचे अंतर राहिले होते.

गर्द झाडीतुन दिसणारा खुट्टा

समोरील जंगलातुन जाताना खुपच मजा येत होती.. एक जण हळदीचे झाड तोडत होता, आमच्या गाइड च्या ओळखीचा होता, आम्ही विचारले कोणी असे पकडत नाहि का .. तर ही काळी हळद आहे पिवळी कुठे आली इकडे असे उत्तर आले. आम्ही पुढे चालु लागलो, तिव्र चढ असल्याने चांगलेच दमायला झाले होते, मित्र सडपातळ असल्याने तो माझ्या पेक्षा बराच कमी थकला होता, आम्ही आयटीत राहुन फॉस झालोय ह्याची जाणीव झाली आनि पुन्हा पहिल्याप्रमाणे व्यायाम केलाच पाहिजे हे फर्मान सुटले ... असो .. मित्राने आणलेले लिंबु कापुन आम्ही मस्त सरबत केला आनि पिउन घेतला, चांगलीच तरतरी जाणवु लागली होती.. मस्त जंगलातुन वाट काढत आम्ही निघालो होतो , मध्येच फोटो काढ, मस्त झाड दिसले की त्याखाली फोटो काढ असे प्रकार चालु होते. आणि आता जी जंगलातील वाट होती, ती इंग्रजाच्या काळात हरिशचंद्र गडाकडुन इगतपुरी ला जाणारा रस्ता होता अशी माहिती गाईड पांडु यांच्याकडुन मिळाली. पुढे रस्त्याच्या कडेला नंबर कोरलेला दगड उभा दिसला .. हा दगड त्या काळातीलच आहे हे कळाले, आणि आम्ही त्या नंबरच्या दगडाचे फोटो काढले..

खुष होउन आम्ही पुढे चालु लागलो.. आणि पुढे जाणार इतक्यात गाईड ने जाणिव करुन दिली की आता वर जायचे आहे, या जंगलातुन सरळ नाही , नाहितर तुम्ही पुन्हा त्या पहिल्या रस्त्याच्या सेम लाईन ला येताला आनि पुन्हा गड उंचच दिसेल ..( माझा मित्र मात्र माझ्या काणात कुजबुजला हा रस्ता योग्य आहे असे वाटते आहे, २ रस्ते आहेत बहुतेक येथे जायला) ही शंका मी बोलुन दाखवल्यावर गाईड म्हणाला बरोबर आहे , उलट हा रस्ता लांब असला तरी येथे चढन कमी आहे, आणि पहिला जो रस्ता आहे तो जवळचा असला तरी तिव्र चढणीचा आहे, आपण उतरताना त्या रस्त्याने जावु.

ओके आम्ही झपकन जंगलात वरती शिरलो, रस्ता दिसत नव्हताच, खडकातुन वर गेलो आणि एक पायवाट दिसली.. आता थोडेच अंतर राहिले असे वाटत होते ... आणि जंगलातुन चालुन आम्ही बाहेर आलो, समोर रतनगडच्या बाजुचे शिखर होते , त्याच्या बाजुने मागच्या साईड ने आम्हाला रतनगडा वर जाता येत होते.. समोरच दिसत असल्याने २० मिनिटात पोहचु आपण असे वाटले, तितक्यात निसर्गप्रेमी ग्रुप दिसला तो काल आला होता आणि माघारी चालला होता. आज संपुर्ण दिवसात दिसलेला तो गडावरील पहिला आणि शेवटचा गृप होता. त्यांना आम्ही या रस्त्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले आम्ही पहिल्या रस्त्याने आलो, आणि येथुन जात आहे, येथुन यायला जमत नाहि कारण जंगलात माणुस चुकतोच , जाताना पायथ्यावर जायचे माहित असल्याने मार्ग आखता येतो. आम्हाल त्यांनी सांगितले अजुन तुम्हाला वर जायला ४५ मिनिटे तरी लागतील .. आम्ही आतुर झालो होतो... १५ मिनिट अंतरावर वाटणारा गड ४५ मिनिटे .. मन जोरात चालायचे म्हनत होते.. पोटात कावळे ओरडत होते... आनि मागच्या दरीकडील वाटेवर आम्ही आलो, एका बाजुला तिव्र उतार आणि दुसर्या बाजुला खाली राहिलेले जंगल असे द्रुश्य दिसत होते, मागच्या बाजुने अलंग-कुलंग-मदन यांचे दर्शन होत होतेच ... सोबत जमीनीतुन दिसणारी सांदण दरी दिसली.. आणि जमल्यास संध्याकाळी तेथे गाडीने जाऊ हे ठरले ...

आता मस्त पायर्या लागल्या होत्या, २ भल्या मोठ्या कातळीतुन आम्ही वरती येत होतो, अनुभव तर खुप उंच होता. सभोवताली असणारे दोन उंच कातळ आणि मधोमध रस्ता चढत असणारे आम्ही , आणि खडकाचा स्पर्श ही शांत गार आपलासा वाटत होता. जणु आमच्या भेटीसाठी तो आमचीच वाट पाहत उभा होता..

वरती गेल्यावर गडाच्या दगडी दरवाजाची कमान लागली, त्यामागे दगडाचीच बिजागीरी सारखा मोठा भाग दिसला, यालाच दरवाजा लावला असणारा असा कयास करुन आम्ही पुढे चालु लागलो, गड चढलो होतो, आणि निडल च्या बरोबर पुढे आणि खाली आम्ही आलो होतो, आमच्या गाईड ने पुढे चला असे सांगितले आम्ही म्हणालो वरती तेथे ते बिळ दिसते आहे ना शिखराला तेथे जाता येत नाहि का? गाईड म्हणाले तेथे काही नाही, आपण देवीकडे जावु डायरेक्ट, आणि येथे तुम्हाला चढता येणार नाही आणि वेळ जाईन खुप, पण त्याचे ऐकणार्यातले आम्ही नव्हतो , आम्ही वरती निघालो आणि फक्त १५ मिनिटात वरती पोहचलो .. अहाहा काय सुंदर हवा अंगाला स्पर्श करुन जात होती, थकवा कुठल्या कुठे पळुन गेला होता.. निसर्गाच्या या चमत्कारामध्ये आपण उभे आहोत हे पाहुन छान वाटत होते.. वरुन खाली दिसनारी छोटीशी वाडी आम्ही पाहिली खुपच छोटी वाटत होती. जंगल चांगलेच मोठे दिसत असले तरी त्या ही पेक्षा आपण आता त्या जंगलाचा राजा आहोत अश्या अविर्भावात आम्ही होतो.

निडल होल,

भुक लागल्याने तेथेच आम्ही जेवायला घेतले, स्वछ वातावरण आणि सुंदर हवेतील जेवण झाले आणि आम्ही पुढील बाजुने न जाता मागील बाजुने चालु लागलो... तो रस्ता खरोखर खुप सुंदर आहे, तो गडावरील त्यावेळेस चा रहदारीचा रस्ता होता असे वाटते, समोर दिसणार्‍या दरी आमचे मन आकर्षुन घेत होत्या.. थोडे पुढे गेल्यावर पाण्याच्या टाक्या दिसल्या .. पाणी मात्र स्वछ नव्हते.. समोरच चोर वाट दिसली .. आत बुजवली असली तरी खडकातुन खोदुन डायरेक्ट गडामध्ये येणारी ती वाट सुंदर भासत होती.. आम्ही तीचे गडाकडील टोक शोधले.. ते एका गुहेत जात होते, गुहा आतुन मोठी आहे असे गाईड ने सांगितले, पुर्वीच्या काळी येथे आक्रमण वगैरे झाले कींवा चोर दरवाजातुन आले की राहता येत होते असे सांगितले . आत गुहे मधेय जागा आहे, नंतर पुन्हा दगडाची भिंत आहे आणि त्या पलीकडे २ भाग आहेत .. एकात खुप थंड पानी आहे असे सांगितले त्यांनी ..
मग आम्हाला राहवेना, त्या २ x २ च्या बोगद्यातुन मी आत गेलो , मित्र ही आला. मस्त मोठी गुहा होती, थोडेफार जाळाणे काळसर झालेले खडक दिसले, त्यानंतर समोरील दगडी भिंतीतुन आत अंधारात मी फोटो घेतला तर काठोकाठ भरलेले पाणी आढळले, हळुच हात आत घातला आणि थंडगार पाणी हाताला लागले , पाणी बाटलीत भरुन घेतले, मिनरल वॉटर झक मारीन असे ते पाणी होते, पिउन खुप त्रुप्त वाटले, दुसर्या बाजुला आणखिन एक गुहाच होती... हे सर्व पाहुन आम्ही बाहेर आलो.

पुढे चालु लागलो , कल्याण दरवाजाच्या बुरुजावर चढलो , पढझडीला आलेला हा दरवाजा अजुन ही शान मध्ये उभा होता, बुरुजावर उभे राहुन संपुर्ण प्रदेश न्ह्याहळण्याची हौस उगाच भागवुन घेतली..

मग आणखिन पुढे वळसा देवुन आम्ही पुन्हा गडाच्या या बाजुच्या दरवाजातुन आता जावु लागलो ( पहिल्या रस्त्याने येथे आलो असतो),

वर गेल्यावर कमानीवर मस्त कोरीव काम दिसले .. पुढे खडकाच्या आत गुहेप्रमाणेच भाग होता, पण दरवाजा मोठा होता, लेण्याप्रमाणेच तो भाग होता म्हणा, तेथे रत्नाई मातेचे मंदिर होते, तीचे दर्शन घेतले.. बाजुचा हॉल पाहिला आणि थोडा वेळ घालवुन आम्ही खाली निघालो.
४ वाजुन गेले होते, पटकन १ तासात खाली जावुया असे ठरवले, पण रस्ता खरेच खुप अवघड वाटत होता, २ दा सिडीवरुन खाली उतरावे लागले.. सिडी ही व्यव्स्थीत नव्हत्या, त्यामुळे अश्या उंच गडावरुन खाली उतरने खुपच भारी होते..
खाली उतरलो .. पुन्हा नविन मार्ग .. जंगल तेच पन वाटा वेगळ्या.. मित्र भरभर चालत होता, पण तिव्र उत्तार आणि मोठे दगड यामुळे थोडे सावकाश जानेच योग्य वाटले आणि एक काठी हातात घेवुन मी आनि गाईड चालु लागलो.. थोड्या वेळाने जंगलातील तो मागचा रस्ता पुन्हा लागला... आणि कळाले जर त्यावेळेस जंगलात आम्ही वरती वळालो नसतो तर येथे आलो असतो, तेथे दगडावर कोरलेला नंबर होता ४/४/२ आणि येथे ५/५ पुन्हा त्या ऐतिहासिक वाटेच्या साक्षिदाराचा फोटो काढुन घेतला आणि आम्ही पुढे निघालो, उतार असुनही मोठ्या दगडांमुळे थोडे दमल्यासाराखे वाटु लागले आणि आम्ही लिंबु सरबत पुन्हा करुन पियुन घेतला. आनि पुढे चालु लागलो, या रस्त्यावर मात्र मध्ये मध्ये टेकड्या नव्हत्या , सोबत होते प्रवारा नदिचे पात्र , कधी या बाजुला कधी त्या बाजुला असा प्रवास करत करत आम्ही पायथ्याला आलो.. ६ वाजत आले होते, आम्ही ठरवलेल्या टाईम पेक्षा आम्ही १-१.३० तास उशिरा खाली आलो होतो.. तरीही वाडीतुन एक चक्कर मारुन आम्ही गाडी हातात घेतली आणि निघालो ....

आता परत जाताना पटकन फास्ट जावु असे ठरले .. आणि कोकणकडा हा प्रॉग्रॅम रहित झाला.. मित्राने गाडी हातात घेवुन लवकर फास्ट चालवतो सांगितले पण त्याने गाडी ३० च्या पुढे न्हेलीच नाही.. कारण रस्ता अवघड आहे असे मत होते त्याचे, शेवटी. शेंडी गावात आम्ही प्रवेश केला, सर्व शांत होते.. २-४ हॉटेल्स ओपन होती.. मला चहा प्यायचा होता आणि मित्राला (संगायची गरज नसावी) .. शेवटी त्याला उशीर लावु नको १५ मिनिटात आवर म्हणुन मी चहा प्यायला गेलो. ७:३० वाजले होते, आता निघालो की आम्ही ९:३० ला घरी पोहचणार होतो. चहा एकदम मस्त फक्कड होता..दिवसभरातला आनंद त्यात मिसळला गेला आहे की काय असेच वाटत होते.. मित्राकडे गेलो.. दिवस भराचा थकवा घालवण्याचा जालीम उपाय अजुन अर्ध्यावरच होता.. घाईने ८:२५ ला आम्ही गाडी कडे आलो, १ तास वायाला गेला असे माझे म्हणने होते.. पण ते मित्राला मान्य नव्हते. घरी स्वयपाक बनवणार असल्याने आम्हाला बाहेर जेवता ही आले नसते ( मित्राला ही ते आवडले नसते ) आणि घरी उशीर होउ नये म्हणुन लवकर ही जायला पाहिजे होते..
गाडी यावेळेस मात्र मी हातात घेतली.. पण घात झाला .. पहिल्या किकलाच गाडीचे फुटरेस्ट तुटले.. आता गाडी कशी चालवायची याच चिंतेत मी व्यस्त होतो, मित्राला मात्र जास्त टेंशन लगेच आले नव्हते.. गाडी तशीच स्टार्ट करुन पाय कधी मागच्या फुट्रेस्ट वर कधी समोर लावलेल्या लोखंडी नळीवर ठेवुन गाडी चालु ठेवली. पण स्लो चालवुन उपयोग नव्हता.. आणि ब्रेक ही महत्वाचा.. पुढचा ब्रेक तर लागत नव्हताच. अश्या स्थीतीत आणखिन एक विघ्न म्हनजे पुढचा लाईट उडाला.. आणि आम्ही अंधारात घाटातुन चाललो होतो, मध्येच गाडी अनकंट्रोल झाली १-२ दा. भीती वाटली.. पण माझे पुर्ण कौशल्य वापरुन आणि चंद्राचा उपयोग करुन ५०-६० ने गाडी चालवुन आम्ही १० ला घरी पोहचलो एकदाचे.

----------------- शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन

प्रवासभूगोलमौजमजारेखाटन

प्रतिक्रिया

घ्या घ्या पिशव्या, पर्सा आणि तुटलेल्या चपलांचे जंजाळ न घेता केलेले ट्रेक आठवुन घ्या, वर्षभराने धागा काढुन वाचाल ना तेंव्हा तुमचीच जळजळ होणार आहे, असो.

अवांतर - हा प्रतिसाद फक्त कल्पनाविस्तार नाही, थोडासा अनुभवाचा पण भाग आहे, तसेच कोणत्याही शब्दाचा धागाकर्ता अथवा प्रतिसादकर्ता यांच्या पुर्वपरवानगीशिवाय अर्थ लावत बसु नये.

किसन शिंदे's picture

23 Sep 2011 - 5:01 pm | किसन शिंदे

लैच भटकतोस रे लेका....आता बरोबर पायात खोडा घातला जाईल. ;)

अंवातर: कोरीगडापासुन तुझी हि हौस ओळखीची झालीय, स्टाईलमधे उभे राहुन फोटो काढून घ्यायची. :)

शाहिर's picture

23 Sep 2011 - 9:11 pm | शाहिर

लै भारी ...रतन गड- अमृतेश्वर- कळसू बाइ
एक नंबर आहे हा भाग

आम्ही आयटीत राहुन फॉस झालोय ह्याची जाणीव झालेला
शाहिर

पाषाणभेद's picture

24 Sep 2011 - 12:34 am | पाषाणभेद

लेका मजा करतोस तू. फोटो अन वर्णनही छान.
गाडीचे हेडलाईट गेलेले असतांना रात्री काय वाट लागते ते चांगलेच अनुभवलेय. पुढचा मुक्काम कुणीकडे?

५० फक्त's picture

24 Sep 2011 - 7:23 am | ५० फक्त

पाभे, माझा प्रतिसाद वाचला काय, मुक्काम काय अहो, सातच्या आत घरात ची प्रॅक्टिस सुरु आहे सध्या गणॅशाची.

प्रचेतस's picture

24 Sep 2011 - 8:27 am | प्रचेतस

फोटू आणि वर्णन लै भारी रे.
एकदम डिट्टेलवार लिहिलेस रे, आमच्या रतनगडाच्या सर्व आठवणी जाग्या केल्यास. आम्ही जाताना शिडीच्या मार्गाने व उतरताना त्र्यंबक दरवाजातून पायर्‍यांच्या मार्गाने उतरलो होतो. अगदी गडमाथ्यावर जाईपर्यंत ऊन लागत नाही इतकी दाट झाडी आहेत गडमार्गावर. वरून दिसणारा नजारा जबरदस्तच. सह्याद्रीच्या कड्यांचे एकेक पदर एकदम खतरी दिसतात.

बाकी खालच्या प्रवरेच्या पात्रात डुंबला नाहीस का? पाण्यातले फोटू दिसले नाहीत तुझे कुठेच. ;)
मला वाटते रतनगडानंतरच्या पुढच्या १०/१५ दिवसातच तुझी सांदण वारी झाली ना?

पैसा's picture

24 Sep 2011 - 8:29 pm | पैसा

वर्णनही छान आणि फोटो पण.

जाई.'s picture

24 Sep 2011 - 8:55 pm | जाई.

फोटो व वर्णन छान आहे