चांदया म्हशीची गोष्ट

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
19 Jun 2011 - 6:32 pm

कसा काय मंडली. सगला ठीक हाय ना. मंग हारकत नाय. मी पन बरा हाय.
काय? मना नाय वलकलाव. मी दिप्या. धन्याचा शालेतला आनी आक्रावी बारावीचा दोस्त. मी आज तुमाला धन्याच्या चांदया म्हशीची गोष्ट सांगनार हाय.
आता तुमी म्हनाल म्हशीची काय गोष्ट आसनार. पन हाय. कारन ही गोष्ट फकस्त म्हशीची नाय.
ही गोष्ट जशी धन्याच्या चांदया म्हशीची हाय तशीच ती धन्यासारखा बॉरखांडयात म्हशी राकनारा पॉरगा आमेरिकन येनाराय कसा झाला त्याजीपन हाय.

आता उगंच हिकडचा तिकडचा सांगत नाय. येकदम गोष्टीला सुर्वात करतो.
धन्याचं बाबा गोरेगावच्या गरम पंचायतीत कामाला व्हतं. गोरेगांव आम्च्या गावाजवलचा म्हॉटा शेर. बाजारपेट हाय तितं. सगला मिलतो. धन्याला दोन बारकं भाव आनी सगल्यात ल्हान येक भयिन. म्हंजे धन्या सगल्यात म्हॉटा. सगल्यांचा दादा. सगल्या भावांडात फकस्त येकेक वर्षाचा फरक. धन्याच्या बाबाना तवा चांगला पगार व्हता. कायतरी दिड हाजार मिलतात आसा याग्दा धन्या बॉलला व्हता. धन्याचं बाबा तसं हुशार पन हायेत. धावी शिकलेलं. गावात, चार चवगात मान आसलेलं. पन धन्याच्या आयेचा काय यिचारू नुकॉ. त्याजी आये शाला तं शिकलेली नव्हतीच पन याग्दा का शिया द्याया लागली का मंग काय खरा नाय. काय पन बॉलायची. आग्दी आंगामासावरना शिया दयायाची. धन्याचं बाबा धन्याच्या आयेला लय वरडायचं मंग. पन ती काय आयकायची नाय.

धन्या आनी आमी सगलं पाच सा वर्शाचं झाल्यावर आमचा शालेत नाव टाकला. आमचा लय म्हॉटा गुरुप व्हता. मी, धन्या, संत्या, मंग्या किसना सगलं. आमी लय लय मजा करायचो. धन्या आब्यासात लय हुशार व्हता. आमचं पाटील गुर्जी त्याला ब्येष्ट मुलगा आसा काय तरी म्हनायचं. तसं पाटील गुर्जी लय च्याप्टर. आदी आमाला प्रश्न यिचारायचं आनी आमाला उत्तर नाय आला का मं धन्याला यिचारायचं. धन्याला उत्तर यायाचाच. पन धन्या कदी आकडायचा नाय. लय चांगला पॉरगा. धन्या हुशार व्हता म्हनून धन्याचं बाबा त्याला येवसाय बिवसाय, काय काय आनून दयायाचं आनि म धन्या ते येवसाय सॉडवायचा.

धन्याचा चवतीला पयला नंबर आला. तसा तो आदी दुस्री तिस्रीला पन आला व्हता म्हना. धन्याचं बाबा ज्याम खुश झालं. त्याज्या आयेला बाकी काय नाय वाटला. कारन तिला शिक्शेनाचा काय गंदंच न्हवता. धन्याला कदी कदी वाटायचा, आपली आये पन शिकलेली आसती तं. तिला पन कल्ला आसता आपून किती हुशार हाव ते. मंग तिनीपन आपला कवतूक क्याला आसता. पन काय नाय. पन धन्या ज्यास्त वायिट नाय वाटून घ्यायाचा.

आमी पाचवीला गोरेगावच्या शालेत जायाला लागलो. सगलं येगदम पाचवी ब तुकडीत. आमचा आक्काच्या आक्का गुरुप याकाच तुकडीत. मंग आमी त्या नागांव, भिंताडच्या पॉरांना ज्याम दम दयायाचो. आगदी कदी कदी गोरेगावच्या पॉराना सुदा भीती दाकवायचो. तसा धन्या बाकी आमच्या दादागिरित कदी नसायचा. तो आपला बिचारा गरीब. फकस्त आब्यास करायचा.

तवा आमच्याकड म्हशीचा धंदा लय जॉरात व्हता. म्हयिस बालगायची आनी तिजा दुद गोरेगावला न्हेवून यिकायचा. माजी आये म्हनायची चांगलं पयसं मिलतात. आगदी म्हयन्याचा घरखर्च निगतो त्या दुदाच्या पयशात. धन्याच्या बाबानी पन येक म्हईस आनली. धन्याच्या आयेला कायतरी काम हावा म्हनून. मंग धन्या आमच्यासोबत म्हशीला चरायला घेवुन यायाला लागला. सकाली धा साडेधा वाजेपरत ढॉरा चरायला न्हायाची. आनि पान्यावर न्हेवून आनुन वाडयात बांदायची. आनी मंग शालेत जायाच्या गोरेगावला तीन किलोमिटर चालत. आमी ढॉरांकड पन लय मजा करायचो. तिकडं बॉरखांडयाकड येक बारीक नदी व्हती. आमी तिला घुटका म्हनायचो. घुटक्याला काय ज्याम पानी
नसायचा. मंग आमी हिकडना म्हशीना च्यापायचो पान्यात पलिकड जायाला. आनी आमी म्हशींच्या श्यापटया याका हातान धरून दुसरा हात पान्यावर मारायचो. आनि आसा करता करता आमी पवायला पन शिकलो.

धन्याची जी म्हयिस व्हती ती बाकी सगली काली व्हती पन तिज्या कपालावर फकस्त म्हॉटा पांडरा टिकला व्हता. म्हनून धन्यान तिजा नांव चांदी ठयावला व्हता. तशी चांदी म्हयिस लय चांगली व्हती पन कदी कदी आतरंगपना करायची. धन्या "चांदे थांब थांब" म्हनला तरी फुडंफुडंच जायाची. मग धन्या तिज्या पाटीवर धावायचा. "चांदे मांगं फीर नाय तं व्हलटून मारीन बग" आसा जॉरात वरडत हातातली काटी चांदीवर व्हलटायचा. मंग मातर चांदी मांगं फीरायची. आसा आसला तरी धन्याचा चांदीवर लय जीव व्हता. लय लाड करायचा तो तिजं.

आमी आता सगलं सावीला ग्येलो व्हतो. धन्यान पाचवीला पन पयला नंबर काडलान. आगदी आमच्या वरगात पांडरपेशांची पॉरा आसुनसुदा. पन झाला काय, सावी सुरु झाल्यावर धन्याला शेक सरांनी भायेर बोलवून न्हेलं. शेक सर आमाला पाचवीला हिंदी शिकवायला व्हतं. त्यानी धन्याला भायेर न्हेलं आनी म्हनलं का तू लय हुशार हायेस. तुला आमी सावीला अ तुकडीत बसवतो. तो आयिकल्याबरोबर धन्या येगदम रडायलाच लागला. शेक सरान यिचारलं का रडतेस तं म्हनला का माजं सगलं मयतर ब तुकडीत हायेत. मी नाय जानार अ तुकडीत. मंग शेक सरानी त्याला यिचारलं का तुजं येगदम जवलचं मयतर कोन. त्यानी माजा आनि किसनाचा नाव सांगितला. याडा कुटचा. मंग झाला ना. त्याज्यापाय आमानापन सावी अ तुकडीत जायाला लागला तवा.

धन्या लय वाचायचा. चांदोबा, ठकठक, गंमत जंमत आशी पुस्तका. धन्याच्या घरी ग्रंतं बिंतं व्हतं. आनी हारियिजय कतासार, रामयिजय कतासार आशी पन पुस्तका व्हती. धन्या ती सगली वाचायचा. आमच्याकड सरावनात ग्रंत लावतात कुटलातरी. हारीयिजय, रामयिजय, पांडवप्रताप, काशीखंड ह्यातला कुटला तरी येक. रोज रात्री मंग येक आदयाय वाचायचा. म्हंजे धन्याचं बाबाच वाचायचं भावकीतल्या कुनाच्यातरी घरी. कदी कदी धन्यापन बसायचा वाचायला. म्हनजे धन्याला काय फोडबिड कर्ता यायाची नाय. तो वाचायचा आनि त्याजं बाबा फोड करायचं. त्या गरंतांमदल्या जोडाक्शर वाल्या वव्या धन्या कसा पटापट वाचायचा काय म्हायित.

आता आमी जरा म्होटं झालो व्हतो. धन्या चांदया म्हशिला चांगली राकायचा. धन्याच्या बाबानी मग आजून येक म्हयिस घेतली. ती तिकडच्या जापराबादकडची व्हती म्हनून आमी तिजा नाव गुजरी ठयावला. आनी धन्याच्या मामाच्या बाबानी पन धन्याच्या आयेला येक गाय आंदान दिली. त्या गायला येक बारीक कालवड व्हती. धन्या तिला सॉना म्हनायचा. आता धन्याकड चार ढॉरा झाली व्हती. चांदी, गुजरी, ती गाय आनि सॉना. आमचा शालेत जायाच्या आदी ढॉरा चरायला न्ह्यायाचा चालूच व्हता.

याक्दा काय झाला. दिवालीची सुट्टी पडली व्हती. कापनी बिपनी झालि व्हती खलाटीत. त्यापाय सगला मॉकला व्हता. मंग आमी ढॉरा लावून घरी यायाचो आनि संदयाकाली आनायला जायाचो. त्यादिवशी जरा इपितारच झाला. आमी संदयाकाली ढॉरा आनायला गेलो. बगताव तं काय. धन्याची चांदी म्हयिस बोडनीत आडाकली व्हती. म्हंजे येकादा म्हॉटा खडडा आसला का पावसाल्यात त्याज्यात पानी साटतो, आतल्या मातीचा चिकल व्हतो. दिवालीच्या टायमाला पानी आटत जातो आनि हा चिकल हालू हालू सुकायला लागतो. पन जोपरत हा चिकल येकदम सुका खट व्हयित नाय तोपरत त्यात जायाचा नाय. नायतं पाय आडाकतात त्यात. त्या दिवशी आसाच झाला. चांदी पानी पियाला म्हनून त्या बोडनीत गेली आनि चिकलात आडकून बसली. धन्या ज्याम रडायला लागला. आमी कसाबसा त्याला गप केला. धन्याच्या घरी जाऊन सांगितला. मंग धन्याच्या आयेन सद्या तात्या, खेल्या मामा आशा पासा जनाना बोलवून चांदीला दोरीबिरीन वडीत भायेर काडली. तवापासना धन्या मंग ढॉरा राकायलाच जाया लागला आगदी खलाटी खाली व्हती तरी.

फुडं चांदी गाबन र्‍हावून यियाली. चांदीसारखीच पारडी झाली. गवरी पुजनाच्या दिवशी झाली म्हनून धन्यान त्या पारडीचा नाव गवरी ठेवलान. मंग ती गवरी जरा म्होटी झाल्यावर जशी ती धन्याची जशी काय मयतरीनच झाली. धन्या, गवरी आनि सॉना. येक मान्साचा पॉरगा. येक म्हशीची पोरगी आनि येक गायची पोरगी. पन लय चांगला जमायचा तिगांचा.

आता धन्या जरा सुदरायला लागला व्हता. म्हंजे तो आमच्याशी बॉलताना जरी आशुद्द भाशेत बॉलायचा तरी गोरेगावच्या पॉरांशी मातर शुद्द बोलायचा. त्याज्या बाबानी त्याजी वाचायची हाउस बगून लायब्रीत खाता काडला व्हता. लायब्रीत तिन पुस्तका मिलायची. सुटटीच्या दिवसात तं धन्या सकाली तिन पुस्तका आनायचा आनि संदयाकाली बदलायला न्हयायाचा. रात्री दुसरी पुस्तका वाचायला मिलावी म्हनून. कारन धन्या लय फास वाचायचा. आदि त्या लायब्रीच्या म्याडम द्यायाच्याच नाय बदलून पुस्तका. पन नंतर नंतर त्यांच्या लक्शात आला का हा पॉरगा खरंच याका दिवसात तिन पुस्तका वाचतो. मंग त्या पन धन्याला कायपन न बॉलता पुस्तका दयायाला लागल्या. सुटटीच्या दिवशी आमी जवा ढॉरांकड यिटी बिटी ख्यालायचो तवा हा याडा तिकडं निवांत झाडाखाली बसून म्हॉटयाम्हॉटया कादंब्र्या वाचायचा.

बगता बगता आमी सगलं धावीला आलो. धन्याच्या आयेला धन्याच्या शिक्शेनाशी काय घ्यानादयाना न्हवता. ती आपली धन्या कदी आब्यास करायचा हाय म्हनून ढॉरा न्ह्यायाला नाय म्हनला काय धन्याला ज्याम घान घान शिया दयायाची. काय पन बोलायची त्याला. पन धन्या समजुतदार व्हता. आये काय बोलते तिकडं लक्शेच नाय दयायचा. धन्या मंग जमला तं टायिम काडून ढॉरा न्ह्यायाचा नाय तं मया दिन्याला म्हंजे त्याज्या बारक्या भावाना म्हस्का मारुन ढॉरा न्ह्यायाला सांगायचा.

धन्या धावीला कलास बिलास नसुनसुदा आग्दी चांगल्या मार्कानी पास झाला. डिष्टिन्शन का कायतरी मिलवलान. शालेच्या बॉर्डावर नाव आला धन्याचा. आनी धन्यान घरी सांगून टाकलान का तो आक्रावीला सायन्सला जानार हाय. त्याला बारावीनंतर डीग्री करायची हाय. आमच्या गावापसना आटेक किलोमिटरवर लोनेरला डीग्रीचा कॉलेज व्हता. मागं यागदा शेक सरांनी शालेच्या क्याम्पला त्याला तितं न्हेलं व्हतं तवाच त्यानी ठरवलान का बिये बिये काय नाय करायचा.

हितंच कायतरी क्याम्पुटर बिम्पुटरची डीग्री करायची. आता मातर धन्याला ढॉरांकड जायला येल मिलायचा नाय. सगला टायिम कॉलेज, आब्यास, जनरल लिवन्यातच जायाचा. आनि खरा सांगायचा तं धन्या आता भयानक वाचायला लागला व्हता. त्यानी सुशि, बाबा कदम आसल्या लेककांची यिट्रेश्टींग पुस्तका वाचायची सोडून वपू काले वगैरे वाचायला लगला व्हता.

धन्याचं बाबा हापिसला ग्यालावर धन्याची आनि धन्याच्या आयेची जॉरात भांडना व्हयाची. धन्याला आब्यास करायचा आसायचा आनी त्याजी आये बिच्यारी त्याला कामा सांगायची. धन्या जमंल तशी कामा करायचाच. पन कदी तो नाय
म्हनला तं त्याज्या आयेला सन व्हयाचा नाय. तिला तिज्या पॉराची सोपनं बिपनं आजीबात कलायची नाय. कारन तिला शिकशेनाचा काय गंदंच न्हवता.

यागदा तं लयंच झाला. धन्याला कायतरी जनरल लिवायचा व्ह्ता. पन ढॉरा वाडयात बांदून व्हती. मया आनि दिन्या हे धन्याचं बारकं भाव पन घरात न्हवतं. म्हनून मंग धन्याच्या आयेन त्याला ढॉरा फिरवायला न्ह्यायाला सांगितली. पन धन्यान माजा आब्यास हाय, मी नाय न्ह्यानार म्हनताच ती ध्यायबान झाली. धन्याला लय घान शिया दयाया लागली. धन्या आयेला समजवायला बगत व्हता पन तयाजी आये आयकूनच घ्यायाला तयार न्हवती. ती धन्याला भस्कान म्हनाली, "म्याल्या हेरी बेस त्या दिप्याकड रांडा फलवायला जाशील. आनि जरा ढॉरा फीरवून आन म्हनताय तं मेला नाटका करताय". आपल्या आयेला समजवन्यात काय आर्त नाय हा धन्याला म्हायती व्हता. बिचारा उटला, वाडयात ग्याला. ढॉरांच्या कान्या सोडल्या आनी ढसाढसा रडत ढॉरांच्या पाटीवर बॉरखांडयाकडयाच्या वाटंला लागला.

आसा करत करत, भल्या वायिट परसंगाना ताँड देत धन्याची बारावीपन झाली. धन्याला बारावीलापन चांगलं मार्क मिलालं. धन्याच्या बाबानी आडमिशनच्या पैशाची जमवाजमव केली आनि धन्या यिंजिनीरींग कॉलेजला जायाला लागला...

फुडं धन्यान त्याज्या बाबाना यिस्वासात घ्यातला. त्यानी बाबाना सगला समजावून सांगितला. त्याला कसा म्हॉटा व्हयाचा हाय, त्याजी काय सोपना हायेत आसा सगला. तसं त्याजं बाबा समजुतदार व्हतं. त्यानी मंग ढॉरा राकायचा काम धन्याच्या बारक्या भावाना करायला सांगितला. नाय म्हनायला धन्या आयेला कापनी बिपनीला मदत करायचा शेतावर जावून...

आसा करता करता चार वर्शे ग्येली. धन्या यिंजिनीयर झाला. सा म्हयनं त्याज्याच कॉलेजला शिकवालान. पन त्याज्यात काय मन लागला नाय म्हनून मुंबयला ग्याला. वर्शे दिड वर्शे लय हाल काडलान. बारीक म्हॉटया कंपन्यात पॉग्रामर म्हनून काम केलान. पन वायिट दिवस र्‍हायलं नाय. धन्या त्या म्हॉटया शिमिटच्या कंपनीत सॉप्टेर यिंजिनीयर म्हनून कामाला लागला. धन्याचं वायिट दिवस संपलं. आनी बगता बगता धन्या येक दिवस यिमानात बसून आम्येरिकेला ग्याला....

ही आम्च्या धन्याची गोष्ट. धन्या डीग्रीला आसताना धन्याची चांदी म्हयिस म्हातारी झाल्यापाय म्येली. धन्याचं बारकं भाव पन डाकटरी बिक्टरी शिकायला ग्यालावर धन्याच्या बाबानी ढॉरा कमी केली घरची. सॉना कालवड आता गाय
झाली व्हती. आनी राकायला कोन नाय म्हनून त्याज्या मामाच्याच गावाला परत न्हेलं. नाय म्हनायला गवरी घरी व्हती. धन्याच्या बाबानी ती मारायला येते म्हनून तिला यिकायची म्हनून ठरवली व्हती. पन धन्यान तसा काय करुन
दिला नाय. धन्याचा तिज्यावर लय जीव व्हता. फुडं धन्या आमेरिकंला आसताना धन्याच्या बाबानी धन्याला येक दिवस फोनवर सांगितला का गवरीला यिकून टाकली. लय मारायला यत व्हती....

तवा धन्याच्या डॉल्यात पानी आला व्हता. त्याला त्याज्या ल्हानपनाशी जॉडनारा धागा तुटला व्हता...

जीवनमानराहणीप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jun 2011 - 6:58 pm | प्रकाश घाटपांडे

मस्त धनाजीराव, आमच्या चंद्री म्हशीची आठवण आली. अगदी चांदी वानी व्हती.

धन्या's picture

19 Jun 2011 - 7:50 pm | धन्या

धन्यवाद काका !!!

मस्त लिहिलंय, आणि एक विशिष्ट भाषा पहिल्यापासुन शेवटपर्यंत छान लिहिली आहे.

धन्या's picture

19 Jun 2011 - 7:49 pm | धन्या

एक विशिष्ट भाषा पहिल्यापासुन शेवटपर्यंत छान लिहिली आहे.

ही भाषा रायगड जिल्ह्याच्या माणगांव, महाड, म्हसळा आणि रोहा या तालुक्यांच्या ग्रामिण भागातील बोलीभाषा आहे.

स्वैर परी's picture

20 Jun 2011 - 2:23 pm | स्वैर परी

असेच म्हणते! घरी आणि बाहेर किती हि शुद्ध बोललो, तरी मधुन मधुन 'घेतलान, केलान' असे शब्द तोंडात येतातच! आणि ते तसेच बोलण्यात देखील वेगळीच मजा आहे! :)

प्रास's picture

19 Jun 2011 - 7:57 pm | प्रास

धनाजीराव तथा दिप्या,

तुमी लई म्हनता लई झ्याक गोष्ट सांगितलीय वो, तुमची भाशा पन आमाला लई आवल्डी.

तुमच्या फुल्ड्या लिकानासाटी आमच्या शुबेच्चा!

:-)

प्रीत-मोहर's picture

19 Jun 2011 - 8:07 pm | प्रीत-मोहर

लै भारी. आमच्या आईकड बी आश्शीच चांदी म्हस व्हती ...

यकु's picture

19 Jun 2011 - 10:01 pm | यकु

मस्त रे धन्या !

पैसा's picture

19 Jun 2011 - 10:56 pm | पैसा

लै आवाडली रे दिप्या!

बेस बेस, मना मॉप आवाडली. आस्साच लिवित जावा !!

शिल्पा ब's picture

19 Jun 2011 - 11:17 pm | शिल्पा ब

छान.

कौशी's picture

20 Jun 2011 - 12:07 am | कौशी

आवडली.

स्वाती२'s picture

20 Jun 2011 - 1:21 am | स्वाती२

छान गोष्ट!

स्वाती२'s picture

20 Jun 2011 - 1:21 am | स्वाती२

छान गोष्ट!

उच्च .....

हि स्क्रिप्ट "वैभव मांगलेला" द्यायला हवी

किसन शिंदे's picture

20 Jun 2011 - 3:24 pm | किसन शिंदे

मस्त गोश्ट सांगीतली तुमी....खरचचं हि स्क्रिप्ट वैभव मांगलेंना मिळायला हवी.

आचारी's picture

20 Jun 2011 - 12:22 pm | आचारी

उत्तम !!

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2011 - 12:30 pm | स्वाती दिनेश

गोष्ट आणि ती सांगण्याची शैली आवडली.
स्वाती

सुनील's picture

20 Jun 2011 - 12:59 pm | सुनील

मस्त! गोष्ट आवडली.

चावटमेला's picture

20 Jun 2011 - 2:05 pm | चावटमेला

मस्त आहे गोष्ट, आवडली
पुलेशु..

स्वैर परी's picture

20 Jun 2011 - 2:27 pm | स्वैर परी

रायगडाकडची बोलीभाषा यकदम जश्शीच्या तश्शी उतरवलीन हो! आनि गोश्ट पन लय छान लिव्लीन! ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Jun 2011 - 3:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जाम भारी बोल!!

RUPALI POYEKAR's picture

20 Jun 2011 - 4:02 pm | RUPALI POYEKAR

लई झ्याक

राही's picture

20 Jun 2011 - 5:19 pm | राही

माणगाव,लोणेरे,गोरेगाव,नागाव परिसर डोळ्यांसमोर जिवंत झाला.

आनंदयात्री's picture

20 Jun 2011 - 8:51 pm | आनंदयात्री

अरे काय मस्त लिहलेस रे. मजा आली वाचायला.