हत्ती, घोडे, उंट!

रेवती's picture
रेवती in जनातलं, मनातलं
25 Apr 2011 - 5:52 am

दोन महिन्यापूर्वी चिरंजिवांचा शाळेतला चेसक्लब बंद झाला आणि टाऊनच्या लायब्ररीत दर दोन अठवड्यांनी होणार्‍या बुद्धीबळ स्पर्धेला जायला सुरुवात झाली. अर्थातच बाबा त्याला घेऊन जात असतात. गेल्या दोन अठवड्यांपासून मात्र मलाही तयारीत ओढण्यात आले......... म्हणजे त्यांच्या गटातून बाहेर काढले गेले. डाव चालू असताना मध्येच येऊन जेवणासारख्या कमी महत्वाच्या गोष्टींसाठी न बोलावणे, दिनक्रमाची सक्ती न करणे, हत्ती, घोड्यांच्या भाषेत बोलल्यासच म्हणणे ऐकणे, असे प्रकार सुरु झाले. भारतीय क्लबतर्फे दरवर्षी होणारी बुद्धीबळ स्पर्धा जवळ आल्याची सगळी लक्षणे होती. संयोजकांची ई मेल आली की उत्साहाने फसफसणारे अनेकजण असतात. त्यापैकी दोनजण आमच्याकडे आहेत. या उत्साहाचा फेस बुधवारी एकदम विरला........का? स्पर्धेत भाग घ्यायचे ठरलेलेच होते पण नाव नोंदणी मात्र करायला आम्ही विसरलो होतो. आता काय होणार? संयोजकांनी त्यावर नाराजी न व्यक्त करता नावनोंदणी करून घेतली. स्पर्धेची प्रवेश फी त्या दिवशी भरल्यास चालणार होते. गुरुवार आणि शुक्रवारचे दोन्ही दिवस वेगवेगळ्या चालींचा सराव करण्यात दोघांनी घालवले.

शनिवारी भल्या सकाळी उठून जेवणाचे डबे, पोटभरीची न्याहरी करणे आवश्यक होते. मला बरे वाटत नसल्याने स्पर्धेला जाणे रद्द होणार अशी चिन्हे दिसू लागली. जरा नेटाने तयारी केल्यास ही वेळ पार पडेल असे ठरवून ब्रेकफास्ट उरकून, जेवणाचे डबे बांधून आम्ही तयार झालो. पहाटेपासून पाऊस रिपरिपत होता. मी पहिल्यांदाच बुद्धीबळ स्पर्धा पहायला जाणार होते. आमचा मुलगाही पहिल्यांदाच स्पर्धेत खेळणार होता. सकाळी नऊ वाजता सगळ्यांनी न्यु हॅम्पशायरातल्या 'वाय एम सी ए' मध्ये पोहोचायचे होते. पावसामुळे गाडीचा वेग बराच कमी झाला होता आणि पार्कींगला जागा मिळणे अवघड झाले होते. शेवटी सव्वानऊला पोहोचलो तर आमच्याआधी दहा बाराजण आले होते. काही मुलांचे शनिवारी सकाळी असलेले इतर क्लासेस संपवून मंडळी तडक इकडेच येणार होती.

मागल्या वर्षी लहान मोठ्या वयोगटाचा विचार न करता जोड्या ठरवल्या होत्या. बर्‍याच लहान मुलांनी मोठ्यांना अक्षरश: 'धूळ चारली' असल्याने या वर्षी दोन गट पाडण्यात आले. ;) पहिला गट, वय वर्षे ६ ते १६ आणि दुसर्‍या गटात वय वर्षे १७ ते १००. मोठ्या मुलांनी एकमेकांच्या ओळखी होण्याची वाट न बघता पाच मिनिटात 'वॉर्म अप' चे डाव मांडले. आई वडील उत्साहाने आपल्या मुलाची तयारी किती आहे हे आजमावण्यासाठी गर्दी करू लागले. सहा सात वर्षाच्या मुलांनी वेगळेच खेळ सुरु केले होते. बॉलचे कॅचेस, पळापळी सुरु होती. मुलींचा सहभाग 'शून्य' असणे ही खटकणारी बाब होती.

प्रवेश फीचा चेक दिल्यानंतर संगणकावर जोड्या ठरवण्यात आल्या. यावर्षी पिल्लांचा सहभाग मोठ्यांपेक्षा बराच होता त्यामुळे त्यांचे सहा राऊंडस् तर मोठ्यांचे चार राऊंडस् घ्यायचे ठरले. प्रत्येक राऊंडला निदान एक तास धरायला हवा.........सहा राऊंडस् चे सहा तास अधिक एक तास लंचब्रेक असणार होता. आपली मुलं इतका वेळ धीर धरतील काय अशी शंका प्रत्येकाच्याच मनात होती. दहा वर्षावरील मुलांना आणि मोठ्यांना बुद्धीबळाची घड्याळे देण्यात आली. त्यांना नियमांचे पालन करण्याबाबतही सूचना करण्यात आली. लहान मुलांसाठी नियम शिथील करण्यात आले. अर्थातच तसे सांगितले गेले नाही.;) लहान मुले एकमेकांना चाली सांगणे, एकदा मोहरीला हात लावल्यानंतर तिनेच डाव न खेळणे असे अभावितपणे करत होती. ते त्यांच्या वयाला साजेसेच होते. आईवडीलांना मुलांच्या जवळ जाऊन चाली सांगण्यासही मनाई केली होती, तो नियम काही पालकांनी जुमानला नाही ही गोष्ट वेगळी! आम्ही हरण्याजिंकण्याचा कोणताही उल्लेख मुलासमोर टाळला होता. आपल्याला हा खेळ आवडतो म्हणून खेळण्यास सांगितले. चतुरंग मागल्या वर्षी चौथ्या स्थानावर होता. त्याने थोडी वेगळ्या चालींची तयारी यावर्षी केली होती.

पहिल्या राऊंडनंतर मुलाने हळूच येऊन तो हरल्याचे सांगितले. आईवडीलांनी आपापल्या मुलांना धीर देणे, रागावणे, लगेच चालींचा सराव करून घेणे इत्यादी प्रकार सुरु केले. सगळ्यांसाठी भारतीय संस्थेतर्फे बरीच स्नॅक्स पाठविण्यात आली होती. मुलांनी खाऊचा समाचार घेण्यास सुरुवात केली. रंगाच्या एका चुकीच्या खेळीमुळे प्रतिस्पर्ध्याला त्याच्या वजीराने तीन प्यादी मारण्यात यश आले होते. दोन हत्ती आणि उंटाच्या मदतीने एक तासांनतर चतुरंगाने प्रतिस्पर्ध्यावर डाव उलटवला. पहिली फेरी संपली.

दुसर्‍या फेरीत मुलांना एकमेकांचा अंदाज आला होता. त्यांनी अधिक मन लावून खेळणे सुरु केले होते. तासाभराने पहिल्या फेरीत हरलेली बरीच मुले दुसर्‍या फेरीत जिंकली होती. त्यांनी दमलेल्या मेंदूला साखर पुरवण्यास सुरुवात केली.;) इकडे चतुरंगाने दुसर्‍या फेरीदरम्यान नजरचुकीने हत्ती गमावला होता. संकाटात सापडलेल्या डावाला बाकीचे फोर्सेस जमवून वाचवण्यात दीड तास खर्ची पडला होता पण डाव आपल्या बाजूने करण्यात त्याला यश आले होते. त्याने ज्यूसचा ग्लास हातात घेऊन पुढील डावांचा विचार सुरु केला. चिरंजीव दुसर्‍या डावात जिंकल्याने घाईघाईने जाऊन बाबांना सांगितले गेले होतेच.

काही पालकांच्या योग्य विनंतीवरून लहान मुलांचे डाव लवकर सुरु करण्यात आले. धाकट्या भावंडांची भुकेची व झोपेची वेळ टळू नये म्हणून आयांची कसरत चालली होती. पावणेबाराच्या सुमारास पिझ्झे' ऑर्डर' करण्यात आले. ते येईपर्यंत मुलांची तिसरी फेरी संपली होती. आम्ही घरून नेलेले डबे खाणार होतो म्हणून लंचरूममध्ये गेलो. लंचनंतर मोठ्यांचा तिसरा डाव लगेच सुरु झाला तर छोट्यांचा चौथा! दुसर्‍या डावात जिंकलेल्या लहानग्यांनी सातत्य राखत पाचव्या डावापर्यंत चांगली खेळी करत आत्मविश्वास कमावला होता. आमचे चिरंजीव 'ओव्हरकॉन्फिडंट' झाल्याचे बढायांवरून लगेच लक्षात येत होते. समजावून उपयोग झाला नाही. प्रत्येक पुढच्या फेरीत मागल्या फेरीच्या विरुद्ध रंग, जास्त गुणसंख्या असलेला किंवा जास्त गुणसंख्या असलेल्या स्पर्धकाला बाद केलेला खेळाडू समोर येत होता. एकच फेरी शिल्लक होती. "मला जिंकायचय, मला जिंकायचय" मुलगा जवळ येऊन उड्या मारत होता. सहावी फेरी जिंकल्यास तो निदान दुसरा येण्याची शक्यता होती.

शेवटच्या फेरीची घोषणा झाली आणि आमच्या मुलासमोर १४ वर्षाचा, अत्यंत संयमित चाली खेळणारा, आतापर्यंतच्या सर्व फेर्‍यांचा विजेता, अखिलेश आला. मी त्याच्याकडे कौतुकाने पहात होते तर त्याचे वडील आमच्या मुलाकडे कौतुकाने पहात होते. रंगाचा तिसरा प्रतिस्पर्धी बराच आक्रमक खेळी करणारा होता. वेगळा विचार करावा लागणार होता. एक हत्ती आणि एक उंट 'सॅक्रिफाईस' करून आक्रमक चाल करायचे रंगा ठरवत होता. त्यासाठी पुढच्या सहा चालींचा विचार करणे आवश्यक होते. ही खेळी यशस्वी झाल्यास डाव आपल्या बाजूने करणे सोपे होते. शेवटी झालेही तसेच.

हळूहळू सगळे खेळाडू, पालक आणि प्रेक्षक थकायला लागले होते. लहान भावंडे स्ट्रॉलरमध्ये झोपली होती. पाऊस अजूनही चालू होता. मुलांची सहावी फेरी नुकतीच सुरु झाली होती. सगळे पालक जागेवर स्थिर उभे होऊन आपापल्या मुलांचे खेळ पहात होते. रंगा त्याच्या तिसर्‍या फेरीत जिंकून मुलाचा खेळ पहायला आला होता. अखिलेशने अर्ध्या तासाने शेवटी आमच्या मुलावर मात केली. आम्ही त्याचे अभिनंदन केले. सगळ्यांना पुन्हा नवीन स्नॅक्स देण्यात आली. रंगाची चौथी फेरी सुरु झाली होती. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे लगेच दिसून आल्याने चतुरंगाने दोन घोडे व एक हत्तींनी त्यावर मात केली आणि डाव पाऊण तासात संपला. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत जिंकल्याने रंगा विजेता घोषित केला गेला. मुलांमध्ये तीन क्रमांक घोषित केले गेले. अर्ध्या गुणाने कमी पडल्याने आमचा मुलगा पहिल्या तिनात येऊ शकला नाही. चांगल्या खेळ्यांबद्दल आम्ही त्याचे कौतुक केले. न कंटाळता सगळ्या मुलांनी हा दिवस यशस्वीरित्या पार पाडला होता.

chess participants 001" alt="" />

chess participants 006" alt="" />

समाजक्रीडाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

25 Apr 2011 - 6:04 am | बहुगुणी

समालोचनाचं लिखाणही आवडलंच.

गणपा's picture

25 Apr 2011 - 7:05 am | गणपा

धावतं समालोचन मस्त.
रंगाशेट आणि लेखाच अभिनंदन. :)

टारझन's picture

25 Apr 2011 - 12:22 pm | टारझन

लै भारी :)

५० फक्त's picture

25 Apr 2011 - 9:39 am | ५० फक्त

पहिल्यांदाच कुठल्याही खेळाच्या स्पर्धेचं खे़ळ सोडुन होणा-या इतर गोष्टींचं समालोचन वाचलं, मजा आली वाचायला.

रंगा आणि तुमचे चिरंजिव दोघांचही अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीकरिता अतिशय शुभेच्छा.

आणि हो यशस्वि तयारि करिता तुमचंही अभिनंदन.

पैसा's picture

25 Apr 2011 - 11:33 pm | पैसा

सहमत!

पिंगू's picture

25 Apr 2011 - 10:08 am | पिंगू

रंगाशेठच अभिनंदन आणि रेवतीतायच्या चिरंजीवांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. बाकी खुसखुशीत समालोचन अतिशय आवडले.

- पिंगू

मृत्युन्जय's picture

25 Apr 2011 - 10:13 am | मृत्युन्जय

रंगाशेठचे आणि तुमच्या चिरंजीवांचे दोघांचेही अभिनंदन. समालोचन आवडले.

विसोबा खेचर's picture

25 Apr 2011 - 6:30 pm | विसोबा खेचर

सहमत..

शिल्पा ब's picture

25 Apr 2011 - 10:30 am | शिल्पा ब

छान लेख...तुमचा मुलगा अन रंगा दोघांचेही अभिनंदन.

मराठमोळा's picture

25 Apr 2011 - 11:24 am | मराठमोळा

तिघांचे अभिनंदन.. :) आणि पुढील स्पर्धेस शुभेच्छा.

अभीनंदन !
रंगाशेठ.
मिपा च्या लोकंची एखादी ऑनलाइन स्पर्धा घेता येइल का?

प्रास's picture

25 Apr 2011 - 1:08 pm | प्रास

बुद्धीबळ स्पर्धेचा लेखाजोखा छान लिहिलाय.
चतुरंगशेठ (थोरले) यांचे अभिनंदन!
चतुरंग (धाकले) यांना पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

अवांतर -

चतुरंगशेठांनी जिंकलेल्या ट्रॉफी वगैरेचा फोटू आला असता तर अंमळ जास्त आनंद झाला असता.

बुद्धीबळात बट्ट्याबोळ असलेला ;)

रमताराम's picture

25 Apr 2011 - 1:19 pm | रमताराम

मज्जानुं लाईफ.
रंगाशेठचा एखादा सदरा पाठवून देता का? सुखी माणसाचा सदरा म्हणून जपून ठेवेन.

वाडा पातळीवरचा बुद्धिबळ खेळाडू*- रमताराम

*खेळाडू = खेळणारा, खेळता येणारा नव्हे

खुसपट's picture

25 Apr 2011 - 6:08 pm | खुसपट

बुद्धीबळाची स्पर्धा खरेतर गंभीर वातावरणात चालते, पण तुम्ही त्याचे अगदी खेळकर व खुसखुशीतपणे वर्णन केले आहे. वाचताना मजा आली. माझ्या भावाची मुले काही तासांसाठी जरी आमच्याकडे ( भारतात येतात तेव्हा ) आली तरी रंगून बुद्धीबळ खेळतात त्याची प्रकर्षाने आठवण झाली. मी शाळेत होतो तेव्हा ( ६४-६५ साली )सोसायटीच्या वार्षिक उत्सवात मी व माझे वडील दोघेही असेच उत्साहाने भाग घेउन बुद्धीबळाच्या स्पर्धांमध्ये खेळत होतो, तो माहोल डोळ्यांपुढे उभा राहीला. त्या एवढ्याश्या बुद्धीबळाच्या पटावर अगदी अटीतटीने लढाई होत असे. लहानपणी बुद्धीबळ खेळण्यात एक वेग़ळीच मजा होती.आपले वेगळे लिखाण एक आगळाच आनंद देवून गेले. अश्याच लिहीत रहा ताई.

एक शालेय बुद्धीबळपटू ( खुसपट )

स्वाती दिनेश's picture

25 Apr 2011 - 6:17 pm | स्वाती दिनेश

बुध्दीबळ स्पर्धेचे वर्णन आवडले रेवती,
स्वाती

सखी's picture

25 Apr 2011 - 6:25 pm | सखी

तुमच्या तिघांचे अभिनंदन! समालोचन शिर्षकासहीत आवडले.
जिंकण्या-हारण्यापेक्षा तुमची दोघांची खेळात आनंद घेण्याची भूमिका खूप आवडली. इतक्या वे़ळ लहानग्यांनी धीर धरुन शेवटपर्यंत खेळणे हे खरचं कौतुकास्पद आहे.

म्हणजे काय ? हत्ती कोण ? घोडा कोण ?

अहो असं काय करता रामदास काका? ते बुध्दीचे बळ खेळायला ते प्राणी हत्ती, घोडा, उंट आणि झालच तर राजा, वजीर पण लागतात ना? म्हणून रेवतीताईंना (रेवतीबाई नव्हे, ऐकतेस ना रेवती? ;)) म्हंटल शिर्षकही आवडले :) आम्हाला बुध्दीबळाबद्दल तेवढचं माहीती आहे हो, कारण आमच्या बुध्दीचे बळ तेवढेच असावे!

रेवती's picture

27 Apr 2011 - 7:08 am | रेवती

ऐकत्ये हो सखी! ;) तूच काय ती मला ताई म्हणतेस्....आता रेवतीबाळ म्हणणारे कोणी भेटते आहे का ते बघते.;)
हे रामदासकाका आजकाल मला आणि माझ्या नवर्‍याला टोमणे का मारत असतात तेच कळत नाहीये. तरी बरं, त्यांच्या सगळ्या लेखांना मी प्रतिसाद देत असते.;)

नगरीनिरंजन's picture

25 Apr 2011 - 7:17 pm | नगरीनिरंजन

छान समालोचन!

प्रभो's picture

25 Apr 2011 - 7:23 pm | प्रभो

झ का स!!!

धनंजय's picture

25 Apr 2011 - 7:28 pm | धनंजय

तिघांचे अभिनंदन!

शाहरुख's picture

25 Apr 2011 - 8:46 pm | शाहरुख

अरे व्वा !

अवांतर - fresschess.org

रामदास's picture

26 Apr 2011 - 12:07 am | रामदास

तर आतापोतर सगळ्या म्याच्या जिंकल्या असत्या.

श्रावण मोडक's picture

30 Apr 2011 - 4:46 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा...

आपल्या मुलाला मिपातर्फे अर्धा गुण देण्यात येत असल्याने त्याचा पहिल्या तिघात क्रमांक आल्याचे जाहिर करण्यात येत आहे.
तिघांचेही अभिनंदन.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2011 - 12:54 pm | बिपिन कार्यकर्ते

काकू, पोट्टा आणि काकांचे अभिनंदन. काकूंनी वृत्तांत एकदम मस्तच लिहिलाय. डोळ्यासमोर घडते आहे असे वाटत होते.

दीविरा's picture

26 Apr 2011 - 1:53 pm | दीविरा

सगळ्यांचे अभिनंदन!

:)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Apr 2011 - 2:41 pm | निनाद मुक्काम प...

समालोचन आवडले .
मुलींचा सहभाग शून्य ( ही बाब खटकली )
रंगा व तुमच्या मुलांचे अभिनंदन
हा खेळ बुद्धीला चालना देणारा मानसिक व्यायाम करून घेणारा आहे .
अश्या स्पर्धेमध्ये मुलांनी सहभागी होणे व त्यात पालकांनी हिरारीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे म्हणजेच मुलांवर चांगले संस्कार करणे आहे .

स्मिता.'s picture

26 Apr 2011 - 2:53 pm | स्मिता.

रंगाभाऊ आणि चिरंजीवांचे अभिनंदन! आणि शेवटपर्यंत त्यांचा उत्साह कायम ठेवल्याबद्दल तुमचेही अभिनंदन!

अमोल केळकर's picture

26 Apr 2011 - 2:58 pm | अमोल केळकर

खुप छान अभिनंदन !!

यानिमित्याने लहानपणी सांगलीला ' नुतन बुध्दीबळ ' तर्फे आयोजीत स्पर्धॅत भाग घेतल्याची आठवण झाली.
भाऊसाहेब पडसलगिकरांना पहायला मिळाले हेच नशिब समजतो

अमोल केळकर

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार!:)
प्रास, अजून बक्षिस समारंभ झालेला नाही.
जूनमध्ये आहे.
चतुरंग व मला त्याच्या प्रथम पारितोषकाबद्दल आनंद तर झालाच पण आमचा मुलगा पहिल्यांदाच शाळा व लायब्ररीच्या बाहेर स्पर्धेत खेळला त्याबद्दल समाधान वाटले. आपणही आमच्या आनंदात सामील झाल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!:)

प्राजु's picture

26 Apr 2011 - 7:46 pm | प्राजु

मस्तच! आणि अभिनंदन!

केशवसुमार's picture

27 Apr 2011 - 9:34 am | केशवसुमार

रंगाशेठ हर्दिक अभिनंदन...
रेवतीतै लेख उत्तम.. तुमचे आणि तुमच्या चिरंजीवांचे सुद्धा अभिनंदन!!
(आनंदित)केशवसुमार

ज्ञानेश...'s picture

27 Apr 2011 - 10:39 am | ज्ञानेश...

रंगाशेट ज्युनिअर आणि रंगाशेट सिनीअर यांचे अभिनंदन.
(रेवतीकाकूंचा धागा असूनही आवर्जून प्रतिसाद दिल्या गेला आहे याची नोंद घ्यावी. ;))

@रंगाशेट- आपलं ते 'बुद्धीबळाचे नियम मराठीत' प्रोजेक्ट कुठवर आलंय हो? एवढ्या मोठ्या कलमाचे भाषांतर करून दिले तुम्हाला.. विसरलात की काय? :)

रेवतीकाकूंचा धागा असूनही आवर्जून प्रतिसाद दिल्या गेला आहे
शेवटी काहीही झालं तरी पाशवी शक्ती म्हणून काही असते की नाही?;)
आणि हो, ते बुद्धीबळाचे मराठीतले नियम प्रसिद्ध झालेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Apr 2011 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll

वा छान. दोघांचेही अभिनंदन.
तुमच्या चिरंजीवांना अजून थोडे लहान असताना पाहीले होते. तेव्हा हे मोठे होऊन बाहूबळानेही अनेकांना मात देतील असे वाटले होते (जरी तेव्हाची त्यांची यष्टी तशी नसली तरी). :)

मदनबाण's picture

27 Apr 2011 - 6:06 pm | मदनबाण

लेखन आवडले... :)

इंटरनेटस्नेही's picture

27 Apr 2011 - 6:49 pm | इंटरनेटस्नेही

मस्त लेख रेवती ताई! :)

पुन्हा एकदा धन्यवाद मंडळी!

मुलींचा सहभाग 'शून्य' असणे ही खटकणारी बाब होती.

"तुम्ही" काय केलेत मग :P

मी काय करणार?
ज्यांना मुली आहेत त्यांनी हा विचार करायचाय.
फारतर मी अश्या स्पर्धेची झायरात करू शकेन.
तुम्हाला मुलगी असेल तर तिलाही स्पर्धेला पाठवा.;)

भडकमकर मास्तर's picture

28 Apr 2011 - 7:55 pm | भडकमकर मास्तर

मस्त समालोचन...
घरातल्या दोन बुद्धिबळवेड्यांना सांभाळण्याचं महकठीण काम तुम्ही करताय , अभिनंदन....

आणि विजेत्यांचे आणि उत्तम सहभाग घेतलेल्या खेळाडूंचेही अभिनंदन....

चित्रा's picture

30 Apr 2011 - 12:07 am | चित्रा

अभिनंदन रेवती, चतुरंग आणि चिरंजिवांचे..
>>"मला जिंकायचय, मला जिंकायचय" मुलगा जवळ येऊन उड्या मारत होता.
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले!

रेवती's picture

30 Apr 2011 - 1:27 am | रेवती

पेन, भडकमकर मास्तर आणि चित्राताई, धन्यवाद!
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले!
हा हा हा...... हो, तू त्याला बरेचदा पाहिले आहेस म्हणून डोळ्यासमोर आले.

श्रावण मोडक's picture

30 Apr 2011 - 4:46 pm | श्रावण मोडक

प्रतिसाद देतो आहे. नोंद व्हावी.
अभिनंदन.