झरण

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
12 Apr 2011 - 1:24 pm

लिहीतो आहे ते चर्‍हाट आनि पाल्हाळच आहे
पण जसं आठवतं आहे आणि आठवतं आहे तोपर्यंत लिहावंच असं म्हणत लिहीतो आहे .
म्हणजे ही गोष्ट डोंबीवलीची आहे.
फक्त चार फलाट असलेले स्टेशन होते तेव्हाची.
तेव्हा दिवा हे गुंड लोकांचं गाव आणि भांडूप तडीपारांचं गाव असं म्हटलं जायचं.
नवडोंबीवली नावाची सोसायटी उभी राहत होती तेव्हा
डोंबीवलीच्या घरांना भयगण्ड झाला नव्हता आणि दरवाजाच्या बाहेर लोखंडी जाळीचे सेफ्टी डोर नव्हते.
नव डोंबीवली सोसायटी आणि जळगावचे टँकरमधले दूध जवळजवळ एकाच वेळी डोंबीवलीत आले.
डोंबीवली म्हणजे फक्त डोंबीवली .
ठाकुर्ली वेगळीच.
तेव्हा चोळा पावर हाऊसच्या नळकांड्यातून काळा धूर येत होता आणि ठाकुर्ली स्टेशनच्या फलाटावर पण कोळशाची पावलं उमटायची .
बारा बंगल्याची शान टिकून होती आणि नवनाथ गॅंग आणि पनवेलकर गॅंगची कोळशाच्या राखेसाठी खून पाडत नव्हते त्यासुमाराची गोष्ट,
ठाकुर्ली आणि डोंबीवली एकमेकाच्या पायापायात येत नव्हते .सवा जोशी शाळेत ठाकुर्लीहून जायचे तर भाताची खाचरं आणि वांग्याच्या आकाराचे पिवळे हिरवे बेडूक तुडवत जायला लागायचं त्या दरम्यानची समजा ..
फारच लांबलचक होतंय पण नवडोंबीवली च्या बाजूला नवरे वखार त्यानंतर आफळे राम मंदीर त्यानंतर ओतूरकर कला मंदीर .
एक लाख चिमण्या एकाच वेळी चिवचिवतात ते मोठ्ठं झाड पण पाटकर बंगल्याच्या बाजूला नव्हतं तेव्हाची ही गोष्ट आहे.
पंचायतीची विहीर होती आणि पाण्याची पंचाईत नव्हती तेव्हाच्या डॉबीवलीची गोष्ट.
पाच मुलींच्या पाठीवर मुलगा झालेल्या (सहाच्या सहा बाळतपणं डॉक्टर वर्द्यांच्याच हातानीच )भक्कम बायका बालटीभर धुणं पाचशे एक च्या बारनी धोका आपटत धुवायच्या आणि मग घामानी थबथबलेल्या कपाळावर ओघळलेल्या दरबार गंधाची खूण नेटकी करून पुन्हा खाकी पावडर लावून कामाला लागायच्या त्या काळची गोष्ट .
(ज्यांच्या कडे पाचशे एक बार नव्हता त्यांच्या हिरण छाप काळा साबण होता आणि पैसेवाल्यांकडे सनलाईट बार होता)
मग डॉबीवली भरत गेली म्हणजे आंतर जिल्हा तांदूळ बंदी होती तेव्हापासून .
सवा जोशीच्या बरोबर साऊथ ईंडीयन एज्युकेशन सोसायटीची शाळ आली.
आता आपण ज्याला फ्लॅट म्हणतो त्याला तेव्हा लोकं ब्लॉक म्हणायची .
म्हणजे या दहा ओळीच्या पाल्हाळात दहा वर्षं पुढे आलोच की आपण.
आधी नवर्‍यांच्या वखारीवर पत्ता विचारला की पुरेसा व्हायचा आता मात्र बोडस मंगल कार्यालयाच्या पुढे आल्यावर पत्ता शोधायला लागायचा.
पत्ता विचारण्याची खूण आता लागायला लागली होती आणि या खूणेला मराठीत लँड मार्क म्हणायचे नाहीत .
ओतूरकरांच्या पुढे शेताडीत चाळी उभ्या राहील्या आणि शेताडीतल्या एका चाळीवर भिंतभरून पहीली जाहीरात लागली झरणची. भिंतीवरची त्या काळ्ची पहीलीच जाहीरात.
आता गनी आर्ट्सवाला रेल्वेच्या भिंतीचे महीन्याला अडीच लाख घेतो म्हणे.ते जाऊ देत.तर झरणची जाहीरात म्हणजे
लांब केस मोकळे सोडलेली बाई .तिच्या बाजूला एक छोटीश्शी कुपी आणि मोठ्ठ्या अक्षरात लिहीलं होतं झरण .
गाडीतून जाताना झरणची जाहीरात दिसायची .
स्लो गाडीतून जाताना झरण दिसलं की दिव्याला किंवा मुंब्र्याला उतरणारे ऊठून उभे रहायचे.
डोंबीवलीत रहाणारे पत्ता सांगताना झरण पर्यंत सरळ या मग डावीकडे किंवा उजवीकडे या असं वगैरे सांगायचे .
झरणची छोटीशी कुपी बाजारात मिळायची .
पाव किलो खोबरेलात मिसळली की हिरवंशार केशतैल तयार व्हायचं .
एकूणीसशे साठ सालचागुजरात अ‍ॅरोमॅटीक्स चा ब्रँड.
प्रकाशचं माक्याचं तेल किंवा दुनाख्यांचं शकुंतला हेअर ऑईल महाग पडणार्‍यांसाठी परवडणारे तेल.
दरबार गंध- खाकी पावडर -पाचशे एक बार -धनतक का डबल बी साबण -सनलाईट बार -डालडा असे काही मोजकेच ब्रँड तेव्हा होते .
मग गिरगावतली आणि गिरणगावतली माणसं रहायला इकडेच आली.
खानदेशी मास्तरं आली .
तीनशे ग्रॅम भाजी घेणारी जोडपी आली.
गाडगीळ चीफ ऑफीसर झाले -हेरंब सोसायटीसारखे शंभर लँडमार्क तयार झाले
सुबत्ता आली आणि झरण तेल नाहीसं झालं पण -डोंबीवली पूर्व झरणच्या पुढे -हा पत्ता कायम तसाच राहीला.
झरण म्हणजे एक अजरामर लँडमार्क झाला .
गुजराथ अ‍ॅरोमॅटीक डायरसाहेबाना (ब्रँडच्यामालकांना)पण डोंबीवलीच्या झरणचा इतिहास माहीती आहे की नाही
...क्या पता ?
माझी पण एक गडबड झाली मी झरण च्या ब्रँड बद्दल लिहीणार होतो पण ह्या झरणच्या कुपीचं बुच्चू काढलं आणि डोंबीवलीचा इतिहासच त्यातून भळभळून बाहेर पडला.
आता ह्यात माझी काय चूक बरं ?

वाङ्मयइतिहासविचार

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Apr 2011 - 1:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काका,
मस्तच जमलाय.... मजा आली वाचतांना....

ज्यांच्या कडे पाचशे एक बार नव्हता त्यांच्या हिरण छाप काळा साबण होता आणि पैसेवाल्यांकडे सनलाईट बार होता

हे तर भारीच....

प्रचेतस's picture

12 Apr 2011 - 1:34 pm | प्रचेतस

रामदासकाकांचे लिखाण म्हणजे मेजवानीच.

प्रदीप's picture

12 Apr 2011 - 1:50 pm | प्रदीप

आठवणीचा लेख (मेमॉयर-- नेमका मराठी प्रतिशब्द काय?) नुसत्या डोंबिवलीच्या स्थित्यंतराचाच नव्हे तर बदलत्या काळाचा, त्यानुसार बदललेल्या संकल्पनांचा नेटका आलेख.

पण भांडुप तडीपारांचे नक्की केव्हा म्हटले जायचे? माझ्या आठवणीनुसार मुंब्रा हे तडीपारांचे गाव समजले जायचे पूर्वी (भांडुप बृहनमुंबईच्या हद्दीत येते).

ह्या दरबार गंधवरून आठवले-- आमच्या एका मित्राने, दुसर्‍या एका मित्राकडे दिलेला चहा 'अगदी दरबार गंधासारखा झालाय बघ!' असे त्याच्या बायकोला सांगून तिचा रोष ओढवून घेतला होता. 'तुला आता माझ्याकडे कधीच चहा मिळणार नाही' असे त्याला ऐकून घ्यावे लागले होते.

तुमच्या इतकी जुनी डोंबिवली पाहिली नाही. पण २५ एक वर्षांपुर्वीची डोंबिवली आठवतेय. आत तर २० वर्षात कधी तिकडे जाणं झालच नाही. त्यामुळे जुन्या सगळ्या खाणाखुणा विरुन गेल्या असतील.
डोंबिवली = डास असही एक समिकरण होतं. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Apr 2011 - 2:15 pm | परिकथेतील राजकुमार

मुंबईची माहिती नाही.

पण लेखनशैली नेहमीप्रमाणेच खिळवुन ठेवणारी.

लिखाळ's picture

4 May 2011 - 10:24 pm | लिखाळ

पराशी सहमत.
सुंदर लेखन.

अजया's picture

12 Apr 2011 - 2:20 pm | अजया

झरण ला आम्ही झरण पाटी म्हणायचो. ती खरच एक पाटी होति आत्ताच माहिती झाली!

माझे माहेर डोम्बिवली !
[अगदी डा. वर्द्यान्च्या हातची]
अजया

गवि's picture

12 Apr 2011 - 2:25 pm | गवि

तुमचे लिखाण हल्लीच वाचायला लागलो आणि अक्षरशः खजिना हाती लागलाय.

अप्रतिम.. अगदी टायटलपासून शेवटापर्यंत शब्दन शब्द.

वाह.

खंडाळ्याच्या घाटातला अमृतांजन ब्रिज आठवला.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Apr 2011 - 2:27 pm | बिपिन कार्यकर्ते

स्साला! या माणसाकडे डिटेलिंग शिकावं की वाचकाला कडेवर बसवून सहजपणे बरोबर न्यायची खुबी शिकावी की अनवट विषय काढून त्यायोगे कुठच्याकुठे फिरवून आणायची हातोटी शिकावी की ..... की .... की.... की.... जाऊ दे.

मृत्युन्जय's picture

12 Apr 2011 - 3:12 pm | मृत्युन्जय

असेच म्हणतो. +१००१

प्रमोद्_पुणे's picture

12 Apr 2011 - 2:31 pm | प्रमोद्_पुणे

मस्त..

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 2:37 pm | प्यारे१

सुंदर लेख.... नेहमीप्रमाणेच.

रामदास काका
एक नंबरी .....

श ना नवऱ्यांची आठवण झाली
अगदी हुबेहूब वर्णन केलंत

अवांतर :
चोळा पावर हॉउस बॉयलर च्या स्पोटाने उध्वस्त झाल , बरेच कामगार मुर्त्युमुखी पडले
त्या नंतर बरीच वर्ष ते पडीक होत, आम्ही भटकायला म्हणून तिकडे जायचो
त्या ३ एकर जागेवर वसलेल्या जुन्या भव्य कारखान्यात दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकणे एक धाडसच असायचं आमच्यासाठी
आत बरीच आंब्याची, जांभळाची, बोरांची झाड असायची. जुने रेल्वे मार्ग..
एक दत्ताच देऊळ , मालगाडीचे जुने गंजलेले डबे... दगडी कोळसा साठवण्याची स्टोर्स, आगीचा एक जुना बंब
फुटलेली बॉयलर ...
कुठल्या कुठल्या विभागात जळलेली कागदपत्र, हे सर्व हाताळताना लय भारी वाटायचं

उध्वस्त झालेला तो कारखाना बघताना खूप वाईट वाटायचं, एकेकाळी इथे हजारो हात राबत असतील,
यंत्रांचे आवाज घुमत असतील, सकाळ संध्याकाळ कारखान्याचा भोंगा वाजत असेल (तो मात्र अजूनही वाजतो )
पण आज तिथे फक्त स्मशान शांतता नांदते

अस म्हणतात कि ठ्कुर्लीतले बरेच आगरी, कारखान्यातल पितळ, तांब विकून करोडपती झालेत
तेव्हापासून रेल्वेने तिथे २४ तास कडक पहारा ठेवला आहे.

आता तिथे कारशेड झालेलं आहे.. थोड्या दिवसात तो प्लांट पुन्हा सुरु करणार आहेत असे म्हणतात
बघूया काय होतंय ते.

-- (ठाकुर्लीकर)स्पा

कुंदन's picture

12 Apr 2011 - 3:51 pm | कुंदन

>>रामदास काका
एक नंबरी .....

आवडला लेख.

>> थोड्या दिवसात तो प्लांट पुन्हा सुरु करणार आहेत असे म्हणतात
ग्यॅस वर चालवणारे म्हणे आता तो प्लांट .

-- (ठाकुर्लीकर)कुंदन

सन्जोप राव's picture

12 Apr 2011 - 2:41 pm | सन्जोप राव

झरणचे स्मरण आवडले. असेच इतर ब्रँडसबद्दलही लिहा.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Apr 2011 - 3:20 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह छान झरणाबद्दल माहीती नाही काही. डोंबिवलीत अनेक वेळा गेलो आहे. प्रत्येक वेळेला डोंबिवलीला गेलो की पूर्वीपेक्षा ती जास्त गजबजलेली दिसते.

श्रावण मोडक's picture

12 Apr 2011 - 3:25 pm | श्रावण मोडक

क्या बात है...
तुमची चूक इतकीच की हे असं सातत्यानं लिहित नाही तुम्ही. ते जेव्हा लिहाल तेव्हा झरणीची ही आठवण रस्ता सोडून गेल्याचं काहीही वाटणार नाही हे शंभर टक्के नक्की.
स्मृतिरंजनाचाही एक आगळा नमुना. कारण इथं उगाच गेले ते दिन गेले टाईपचं रडगाणं नाही. जे होतं ते अगदी स्वच्छ.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Apr 2011 - 3:33 pm | बिपिन कार्यकर्ते

पूर्ण सहमत.

सखी's picture

12 Apr 2011 - 6:26 pm | सखी

श्रामोंशी पूर्ण सहमत. रामदास तुमच्यासाठी हे कदाचित पाल्हाळ असेल, पण आमच्यासाठी तुमचे लेख हिरे, मोती, माणकं आहेत. जमेल तसे लिहित रहा ही विनंती.

नंदन's picture

12 Apr 2011 - 11:38 pm | नंदन

क्या बात है...
तुमची चूक इतकीच की हे असं सातत्यानं लिहित नाही तुम्ही. ते जेव्हा लिहाल तेव्हा झरणीची ही आठवण रस्ता सोडून गेल्याचं काहीही वाटणार नाही हे शंभर टक्के नक्की.
स्मृतिरंजनाचाही एक आगळा नमुना. कारण इथं उगाच गेले ते दिन गेले टाईपचं रडगाणं नाही. जे होतं ते अगदी स्वच्छ.

--- सहमत आहे! सुरेख लेख.

सूड's picture

14 Apr 2011 - 2:34 pm | सूड

अगदी सहमत !! लेख छानच.

प्रीत-मोहर's picture

12 Apr 2011 - 3:31 pm | प्रीत-मोहर

मस्त खिळवुन ठेवणारा लेख !!!

चावटमेला's picture

12 Apr 2011 - 3:42 pm | चावटमेला

हेच म्हणतो.

sneharani's picture

12 Apr 2011 - 3:49 pm | sneharani

मस्त लेख!!

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2011 - 3:58 pm | स्वाती दिनेश

सुंदर स्मरणरंजन...
शन्नांच्या डोंबिवलीवरच्या एका जुन्या लेखाची आठवण झाली.
तुमचा लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
स्वाती

सहज's picture

12 Apr 2011 - 4:05 pm | सहज

>ह्या झरणच्या कुपीचं बुच्चू काढलं आणि डोंबीवलीचा इतिहासच त्यातून भळभळून बाहेर पडला.
आता ह्यात माझी काय चूक बरं ?

चूक हीच की अश्या चूका किती कमी वेळा करता.

तुमच्या माळ्यावरुन (आजची स्टोअर रुम / गॅराज मधुन) जी काही बॉक्स, ट्रंका, गाठोडी बांधली आहेत ती अशीच अधुन मधून सोडा.

>पण जसं आठवतं आहे आणि आठवतं आहे तोपर्यंत लिहावंच असं म्हणत लिहीतो आहे

जोवर माळ्यावरुन काढणे, शोधणे, नीट लावणे जमत आहे तोवर जरा जोमाने आवराआवरी करायचे बघा!

प्रास's picture

12 Apr 2011 - 4:06 pm | प्रास

रामदासकाका,

१९७६ सालच्या डोंबिवलीत काही वर्ष काढलीत पण त्या काळची काहीही आठवण ठेवण्याची क्षमता तेव्हा या मेंदूने मिळवलेलीच नव्हती. आज तुमच्या लेखाने बर्‍याच ऐतिहासिक नोंदी टिपल्या आहेत. एकदम झकास लिहिलंत तुम्ही काकाजी! वरती गविभौ नि बिकाभौंशी तंतोतंत सहमत.

स्पा,

मूळ लेखाला तुमच्या प्रतिसादाने गरम गरम मूगाच्या डाळीच्या खिचडीला कैरीचे करकरीत लोणचे जसे बनवते तसे लज्जतदार बनवले आहे.

एके काळचा डोंबिवलीकर.....

रामदासकाका,
मस्तच लेख!! तुमच्या लेखणीला कुठल्याही विषयाचे वावडे नाही! कथा, चिंतन, विचार, आत्मानुभव, स्मरणरंजन नि अजून काय काय!!

हा लेख वाचून मला तरी लोणावळा-खंडाळ्याच्या अमृतांजन पुलाची आठवण झाली! तिथेही अशीच अमृतांजनची जाहीरात हजारो वर्षे टिकल्याने पुलाचे नावच बदलून "अमृतांजन ब्रिज"झाले. :-)

--असुर

लेखन भारी!
अजूनही त्या भागाला 'झरण' असे नाव आहे काय?

रामदास्रकाका एकदम भारी लिखाण, दंडवत आपल्याला.

@ स्पा, पुरवणी मस्त रे, वाटलंच होतो पक्का ठाकुर्लीकर काहीतरी टाकणार.

चतुरंग's picture

12 Apr 2011 - 6:29 pm | चतुरंग

रामदास, झरण हे नाव कधीतरी वाचलेले अंधूक स्मरते. तुमच्या बोटाला धरुन, वळणं वळसे घेत जाणार्‍या कथेतून, फिरुन यायची आता इतकी सवय झालीये की रोज संध्याकाळी गोष्ट ऐकल्याखेरीज जशी लहान मुलं झोपत नाहीत तसं रोज मिपावर तुमचं लेखन दिसलं नाही की दिवस चुळबुळत जातो! तुमझी झरणी अशीच झरत राहूद्या ब्वॉ!

-रंगा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Apr 2011 - 8:32 pm | निनाद मुक्काम प...

काका अगदीच हळवे केले डोंबिवलीची गोष्ट काढून
आमचा व आमच्या मातोश्री ह्यांचा जन्म डोंबिवलीचा
पूर्वेला वाडा संस्कृतीत जन्मलो .अधून मधून आमच्या कुर्ल्याच्या बटाट्याच्या चाळीत सुट्टीत झालेले आमच्या वरील संस्कार ही सोज्वळ वाडा संस्कृती अलगज पुसून टाकायची .
आजही क म पा च्या वाचनालयाच्या बाजूला सुभाष डेअरी च्या जागी आईचा घोटीकर वाडा त्याच्या परसात विहीर व मागे फळा फुलांनी बहरलेली झाडी हे चित्र अजून डोळ्यासमोर आहे
.माझे किमान ४० नातेवाईक म्हणजे माझे मामा आईचे मामा मावश्या सगळे डोंबिवली कर .आहेत त्यामुळे डोंबिवलीच्या सर्व भागात व सभागृहात लग्न व मुंजी ,बारशी ह्यामुळे भटकंती व्हायची .

मागे स्वाती ताई व दिनेश दा ला पहिल्यांदा भेटलो तेव्हा क्रिसमस मार्केट फिरतांना सहज डोंबिवलीचा विषय निघाला तेव्हा दिनेश दा ची आमच्या नातेवाईकांशी ओळख निघाली .
खानदेश व विदर्भातील अनेक मास्तर येथे थेट उतरले .त्यात आमचे आईचे वडील होते.
तर आमचे वडील चाळ संस्कृती सोडून डोंबिवली कर झाले .आजही टिळक व गोपी व नाईलाज असेल तर रामचंद्र मध्ये सिनेमे पाहिलेले आठवतात .
आमच्या पालकांचे शुभ मंगल हे ब्राह्मण सभेत झाले तेव्हा अष्ट विनायक हा सिनेमा टिळक ला हाउस फुल चालला होता.
तेव्हा समस्त बटाट्याची चाळीने ६४ तिकीट ३ च्या शो ची बुक करून खास कुर्ल्याहून येथे सिनेमा पहिल्याच्या कथा कानावर अधून मधून पडतात .

नेहरू मैदान येथे रेल्वेच्या जागांवर अनेक कर्मचारी वर्गाने सुरेख वाडे बांधले होते .
तेथे इमारती होतांना बिल्डर ला '' ते झाड जमल्यास तोडू नका'' असे सांगणारे माझे आजोबा हे काही एकटे नव्हते .
आई चा डोंबिवलीचा रुईयाचा ग्रुप जेव्हा संध्याकाळी स्टेशन वर यायच्या तेव्हा तेथे शुकशुकाट असायचा हे माझ्या बालपणी ८० ते ९० च्या दशकात खोटे वाटायचे .आता तर ...
थाकुर्लीचा लाकडी पुलावरून सायकल न्यायला धमाल यायची .आता वेस्ट चे रेल्वे मैदान व ५२ चाळी एक बडा बिल्डर विकत घेत आहे असे कानावर वृत्त आले आहे .
आजही फडके वरील कुलकर्णी ह्यांचे पियुष व श्रीखंडाच्या वड्यांची चव जिभेवर आहे .

लग्न ठरल्यावर साखरपुडा झाल्यावर फडकेवरून भावी नवर्या बरोबर फडकेवरून एक चक्कर मारायची .म्हणजे अर्ध्याहून जास्त डोंबिवलीकरांना त्याबद्दल आपसूक माहिती मिळायची
आजही जेव्हा जमते तेव्हा आमच्या वर्गातील सर्वच दिवाळी पहाट साजरी करायला फडकेवर जमतो .
लग्न झाल्याने नाईलाजाने वर्गभगिनी झालेल्या अनेक भगिनी अवचित एखादे किरटे घेऊन समोर येते ( आमचा चोकलेट चा खर्च वाढतो .)
एकदा एका मैत्रिणीने '' मामा परदेशात असतो ,तेव्हा काप त्याला मस्त '' असे दुकानात शिरतांना आपल्या गुंड्याला सूचना दिली .तेव्हा मी म्हटले '' अजिबात नाही ,तुझी आई शाळेत माझ्याशी नेहमी भांडायची ,तिसरीत मला बोचाकारले सुद्धा होते ''
गुंड्या माझ्याशी प्रचंड सहमत होता हे त्यांच्या अविर्भावातून समजते .

आजही आमची मराठी शाळा जगवण्यासाठी आमचे माजी विद्यार्थी मित्र संघ अनेक योजना राबवत असतो .अर्धे शाळकरी अमेरिकेत आहेत पण चेपू च्या कृपेने ओर्कुट मुळे आजही संपर्कात आहोत.

अवांतर ( आधीच माझ्या प्रतिक्रिया दीर्ध असतात .त्यात जन्म भूमीबद्दल लेख त्यामुळे अश्या अजून डझन भर प्रतिक्रिया देऊ शकतो .पण सध्या आवरते घेतो .)

आजही आमच्या सारख्या पोरांचे आई बाप जेव्हा नोकर्या करण्यासाठी दूरदेशी मुंबापुरीत जायचे तेव्हा शाळा सुटल्यावर मून मून ची मिसळ आम्हाला तेथील आजी प्रेमाने खाऊ घालायच्या .
त्यात मिसळीत आजीचे प्रेम असायचे. .मागच्या वेळी डोंबिवलीत पत्नी सह आलो तेव्हा मुनमुन ची मिसळ व कैलास नाथची लस्सी चमच्याने खाल्ली .

ऋषिकेश's picture

12 Apr 2011 - 7:34 pm | ऋषिकेश

वाह! एक काळ उभा केलात.. इतक्या पूर्वी डोंबिवली बघितलं नसलं तरी नुसत्या शब्दांनी आम्हाला कुठल्याकुठे फिरवून आणलत!
सलाम!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 7:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोंबिवली बघितलं नसलं तरी नुसत्या शब्दांनी आम्हाला कुठल्याकुठे फिरवून आणलत! सलाम!

-दिलीप बिरुटे

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 7:36 pm | पक्का इडियट

असं झरण तुम्ही झर झर लिहिता आणि नंतर गायब होता.. .झुरवता !!

हे वागणं बरं नव्हं !!

प्रभो's picture

12 Apr 2011 - 7:45 pm | प्रभो

मस्त!!

मुक्तसुनीत's picture

12 Apr 2011 - 7:50 pm | मुक्तसुनीत

लेख आवडला.
- डोंबिवलीचा जावई. :)

ताक : डोंबिवली/कल्याण परिसराबद्दल नॉस्टाल्जिक होणे अगदी सहज शक्य आहे. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे, आपापल्या न्याचरल ह्याबिटॅट मधून आर्थिक/सामाजिक कारणांपायी स्थलांतरित झालेल्या लोकांनी वसवलेलं गाव म्हणजे डोंबिवली. यातही संख्याबळ गिरगावकरांचे अधिक असल्यामुळे असेल (चूभूदेघे) एकूण तोंडवळा बामणी खरा. असे असले तरी या शहराच्या नागरी सुविधांमधे लक्ष घालून, त्यात सुधारणा घडवून आणण्याकरता लागणारे राजकीय धैर्य हा समाज दाखवू शकला नाही असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. या अशा मध्यमवर्गीय अल्पसंतुष्टपणामुळे म्हणा, डोंबिवली कल्याणच्या परिसराची अक्षम्य अशी हेळसांड झालेली आहे. शहरातले रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा यांचे प्रश्न १९९० च्या दशकात जटिल बनले. मला २००० पासूनची खूप माहिती नाही खरी पण परिस्थितीत फार सुधारणा झाली असे मानण्याबद्दल मी अत्यंत साशंक आहे. मुंबईची सीमारेषा ओलांडल्यावर लागणार्‍या ठाणे जिल्ह्यातला अतिशय दाटीदाटीचा हा भाग. परंतु ठाणे शहराला काही उत्तम दर्जाच्या आयुक्तांमुळे प्लानिंग आणि सुविधा या संदर्भात जो नवा चेहरामोहरा मिळाला ते या परिसरात यायला अजून दोन दशकं जावी लागली. इथल्या जनतेइतका सोशिकपणा मी अन्यत्र कुठेही पाहिला नाही. "डोंबिवली फास्ट" मधला उद्रेक झालेला नायक या शहरातला आहे ही योगायोगाची गोष्ट नव्हे.

अर्थात या परिसरातल्या लोकांच्या रसिकतेबद्दल , त्याच्या मराठीपणाबद्दल अनेक कलाकारांना तेथे आपली अदाकारी दाखवायला आनंद होतो हे खरे आहे. शहरातल्या ग्रंथालयांच्या सुविधा अतिशय अपुर्‍या आहेत परंतु विशेष करून मराठी साहित्याचा विचक्षण वाचकवर्ग इथे सापडतो.

आजही वैयक्तिक कारणांमुळे डोंबिवलीला जाणे होतेच. जो मराठीपणा मुंबईच्या उपनगरांतून आणि ठाण्यातून हद्दपार झाल्याचा कधीकधी भास होतो तो इथे भेटतो. धार्मिक पुस्तकं , जानवीजोड, देवळं , व्याख्यानमाला, नाट्यसंगीताच्या मैफली, किर्तनं , साहित्यिक गप्पा, मिसळ , आजीबाईंच्या पोळ्या, जुन्या चाळी आणि हो , ट्रॅफिक अडवणार्‍या गोठ्यातल्या म्हशीसुद्धा. पु ल देशपांडे असते तर त्यांनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वीच्या रंगवलेल्या काळच्या चाळीशी मिळतेजुळते वातावरण त्यांना अजूनही इथे भेटले असते.

पिवळा डांबिस's picture

12 Apr 2011 - 10:16 pm | पिवळा डांबिस

झरण...
आयला, वाचता यायला लागल्यापासून नंतरच्या २५ वर्षांत शेकडो वेळा ती पाटी वाचली असेल....
'मी झरण पाटीजवळ रहातो' असा पत्ता सांगणारा दोस्तही होता आमचा....
पण ते झरण म्हणजे नक्की काय ते आत्ता तुमचं लिखाण वाचून कळालं!!!!

म्हणूनच म्हटलं,
तुम स्वामी, हम दासा...
__/\__

धनंजय's picture

12 Apr 2011 - 11:18 pm | धनंजय

झरण आठवले.

(इतक्या साहजिक गप्पागोष्टी वाटाव्या, आणि वाचत राहावेसे वाटावे, हे दोन्ही साधणे म्हणजे कठिण प्रकार आहे. मात्र रामदासांच्या लेखणीतून अपेक्षितच!)

इतक्या साहजिक गप्पागोष्टी वाटाव्या, आणि वाचत राहावेसे वाटावे, हे दोन्ही साधणे म्हणजे कठिण प्रकार आहे. मात्र रामदासांच्या लेखणीतून अपेक्षितच!

हेच म्हणतो... अधिक काय लिहणे..

केशवसुमार's picture

14 Apr 2011 - 12:27 pm | केशवसुमार

लेख आवडला.. इतक्या साहजिक गप्पागोष्टी वाटाव्या, आणि वाचत राहावेसे वाटावे, हे दोन्ही साधणे म्हणजे कठिण प्रकार आहे. मात्र रामदासांच्या लेखणीतून अपेक्षितच
(रामदासांचा फंखा)केशवसुमार

अनामिक's picture

12 Apr 2011 - 11:51 pm | अनामिक

जुन्या आठवणींनी आधीच नॉस्टॅल्जीक व्हायला होते, त्यात रामदास काकांचा लेख म्हंटल्यावर त्या आठवणी आपण स्वतःच जगलोय की काय असं वाटून देणारा. शब्द न शब्द शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
रामदास काकांनी त्यांच्या आठवणींचा/लेखांचा खजिना असाच कायम आमच्यापुढे रिता करत रहावा असे वाटते.

हुप्प्या's picture

12 Apr 2011 - 11:59 pm | हुप्प्या

२०-३० वर्षापूर्वीची डोंबिवली, अगदी गटारे डासांसहितही रम्य वाटायची. झाडे, फळे, फुले, पक्षी बर्‍यापैकी बघायला मिळायचे. खाडीवर फिरायला गेलो की खेड्यातच गेल्यासारखे वाटायचे. पण आता निव्वळ एक काँक्रीट जंगल आणि तुडुंब वाहणारी गर्दी. कुणाही नेत्याला, राज्यकर्त्याला, बिल्डरला असे का वाटू नये की थोडी तरी झाडे, खाजणे, मैदाने टिकवावीत. मिळ्तय ते सगळे ओरबाडून उध्वस्त करायचा हावरटपणा
अगदी बोचतो.

पण अशा आठवणी वाचल्या की एक आल्हाददायक झुळुक आल्यासारखे वाटते.
आभारी आहे.

सहमत.
२० वर्षांपूर्वी गेले असताना डोंबिवली वेगळी होती. गटारे होती आणि लाल डब्यातून ठेसनावर उतरताना त्यात लोळणारी डुकरे पाहून तिथल्यातिथे वमन(त्यातल्यात्यात बरा शब्द) झाल्याचे आठवते. त्यानंतर काही त्रास झाला नाही पण डोंबिवली भयंकर आवडली होती. आधी वाटलं होतं की हा मुंबईचाच एक भाग आहे पण डोंबिवलीकरांना बहुतेक तसे म्हटलेलं आवडत नाही (माझा अंदाज). जवळच्या एका सौथिंडीयन देवळात सक्काळी दर्शनाला येणारे लोक, खासकरून स्त्रिया कपाळाला अंगारा लावून येत ते आठवते.

शिल्पा ब's picture

13 Apr 2011 - 2:30 am | शिल्पा ब

इतक्या बाहेर फारशी कधी गेले नाही...पण स्मरणरंजन खुप छान.

चित्रा's picture

13 Apr 2011 - 4:29 am | चित्रा

स्मरणरंजन फारच आवडले.

मागे कधीतरी शंना नवर्‍यांच्या लेखातून वाचले होते डोंबिवलीबद्दल, पण माझ्या आठवणीतील डोंबिवली कायम गर्दीची, जवळजवळ घरे असलेली, अशीच आहे. पुण्याइतके सौंदर्य, जागा, हवामान कधीच्या काळी असले आणि आता लुप्त झाले असले तरी डोंबिवलीकरांचा उत्साह, चैतन्य, मैत्री-आणि स्पर्धा या सर्व गोष्टींमधली जिद्द वाखाणावी असे आहे.. छान लेख.

सुनील's picture

13 Apr 2011 - 5:14 am | सुनील

अस्सल रामदासपंथी लेख!

मदनबाण's picture

13 Apr 2011 - 7:56 am | मदनबाण

क्लास १ लिखाण... :)

वाहीदा's picture

13 Apr 2011 - 6:03 pm | वाहीदा

कामाच्या रगाड्यात रामदास काकांचा लेख वाचायला मिळावा म्हणजे रणरणत्या उन्हात "थंडी हवा का झोका" सहज जवळून "पास" व्हावा अशी अनुभुती !
बाकी ते झरण के काय तुम्ही म्हणता ते लिक्वीड होते का ?
झरणची छोटीशी कुपी बाजारात मिळायची .
पाव किलो खोबरेलात मिसळली की हिरवंशार केशतैल तयार व्हायचं

होतं काय हे अजब रसायन ?
बाकी तीनशे ग्रॅम भाजी घेणारी जोडपी आली.
हे ओब्जरवेशन भारीच ..छान ! पण स्वाती ताई म्हणते तशी डोंबिवलीकरांचा उत्साह खरंच दांडगा आहे. मैत्री , स्पर्धा, चुरस अगदी नेहमी लोकल मध्ये प्रवास करणार्‍या त्यांच्या डोंबिवलीकर ग्रुप मध्ये पण दिसून येतो. अन मुख्य म्हणजे त्यातील काही जण लोकल प्रवास व्यतिरिक्त ही मैत्री जपतात हा माझा तरी अनुभव आहे.
बाकी अशी कधी न पाहीलेली डोंबीवली(की डासावली) ची मस्त सफर घडवून आणल्याबध्दल धन्यवाद ! :-)
@ स्पा : तुझा प्रतिसाद ही मस्तच !

सर्वसाक्षी's picture

14 Apr 2011 - 12:54 am | सर्वसाक्षी

रामदासबुवा,

आम्हाला कुठे कुठे नेता?

अफलातुन लेख. मस्त!

सुवर्णमयी's picture

14 Apr 2011 - 2:59 am | सुवर्णमयी

रामदास,
नेहमीप्रमाणे तुमचे हे लेखनही आवडले . अगदी प्रवाही आणि सहज..असे.

ज्ञानेश...'s picture

14 Apr 2011 - 12:01 pm | ज्ञानेश...

फार सुंदर ! 'आवडले' हा शब्द अगदीच अपुरा आहे काय वाटले ते सांगण्यासाठी.
स्पा आणि निनादचे प्रतिसादही छान !

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 2:27 pm | प्राजक्ता पवार

लेख आवडला .

चिंतामणी's picture

15 Apr 2011 - 12:59 am | चिंतामणी

माझी पण एक गडबड झाली मी झरण च्या ब्रँड बद्दल लिहीणार होतो पण ह्या झरणच्या कुपीचं बुच्चू काढलं आणि डोंबीवलीचा इतिहासच त्यातून भळभळून बाहेर पडला.
आता ह्यात माझी काय चूक बरं ?

निशब्द

जयंत कुलकर्णी's picture

5 May 2011 - 11:46 am | जयंत कुलकर्णी

आठवणी कशा लिहाव्यात याचा उत्कृष्ट नमूना.

तुम्हाला असला आठवणींचा खजिना रिकामा करण्यासाठी काय द्यावे लागेल बरे ?

आणि आम्हाला त्याचा आनंद लुटावा असे वाटणे यात आमची काय चूक ?

आदूबाळ's picture

17 Aug 2013 - 3:53 pm | आदूबाळ

परत थोडं उत्खनन.

:)

रामदासांचा हा लेख वाचलाच नव्हता, बिका म्हणतात तसं 'डिटेलिंग' म्हणजे काय याचा रामदास हे आदर्श आहेत, आणि म्हणूनच पिडा म्ह्णतात तसं या दासाचाही स्वामींना नमस्कार!

[रामदासांचं असं लिखाण वाचलं की या एन्सायक्लोपेडिक (खरोखरीच्या बहुगुणी!) माणसाने 'जोपर्यंत आठवतं आहे तोपर्यंत लिहावं' असं म्हणून आम्हाला धास्तावू नये, तुमची स्मरणशीलता कायमच अबाधित राहो इतकीच सदिच्छा!]

तुमचा अभिषेक's picture

17 Aug 2013 - 7:24 pm | तुमचा अभिषेक

__/\__

यापेक्षा सुंदर पाल्हाळ नसावं !

उत्खनन केलेल्याचे धन्यवाद

दत्ता काळे's picture

17 Aug 2013 - 9:01 pm | दत्ता काळे

हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.
जुनी डोंबिवली..१९७६ ते १९८३ ह्या सुमारास मी डोंबिवलीमध्ये रहात होतो. कोपररोडला. फिरायला जायचं ठिकाण टेकडी नाहीतर ठाकुरली. त्यावेळी ठाकुरलीला एकच रस्ता होता. अतिशय निसर्गरम्य. बाजूनी दाट झाडी. त्यात दडलेले रेल्वे ऑफिसर्सचे बंगले. निर्मनुष्य आणि शांत रस्ता होता.

विनोद१८'s picture

18 Aug 2013 - 12:05 am | विनोद१८

धन्यवाद..रामदासजी....!!!!

माझ्या डोम्बिवली व झरण बद्दल भरभरुन लिहील्याबद्दल.... आज हा लेख वाचला आणि आनन्द झाला. १९७७ ते २००० पर्यन्त झरणच्या मागे म्हात्रे नगरमध्ये राहिलो आता गोग्रासवाडीत. खरेच किती सुन्दर होती आमची डोम्बीवली तेव्हा....!!!

रामदासजी आजही आपण डोम्बीवलिकर आहत काय ???

विनोद१८