संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
22 Feb 2011 - 2:54 pm

नमस्कार मंडळी,
औचित्य आहे दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसाचं. त्या निमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे. या दिवशी अधिकाधिक संपादने करून आपला सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी विकिपीडियाकडून सर्व मराठी भाषिकांना यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

विकिपीडियाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणं सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे. (उडीया आणि हिंदी आपल्यापेक्षा पुढे आहेत.) तरीही जर मराठी विकि पाने चाळली असतील, तर ही लेखसंख्या पुरेशी नाही हे लगेच कळून येतं. तेव्हा त्यात भर घालणं हे काम आपणा सर्वांनी पुढे येऊन करणं गरजेचं आहे. त्यासाठी छोटे लेख संपादित करणं(यांचीही यादी खूप मोठी आहे), नवीन लेख तयार करणं किंवा त्या त्या लेखाला पूरक अशी चित्रे/फोटोग्राफ्स अपलोड करणं असे खारीचे आणि सिंहाचे दोन्ही वाटे आपण सहजच उचलू शकू..

अधिक माहिती विकिपीडियावरून उचलून मी इथे डकवण्यापेक्षा सरळ या दुव्यावरच पहा:
http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन_१
इथे सहभागासाठी नोंदणी करता येऊ शकेल तसेच नोंदणी न करताही आपला हातभार लावता येऊ शकेल. पानाच्या शेवटी साहाय्यासाठी मदतकेंद्राचाही दुवा दिलेला आहे, तेव्हा लेखांत भर घालताना जास्त अडचणी येऊ नयेत.

धन्यवाद,
-मस्त कलंदर

भाषातंत्रसद्भावनामाहिती

प्रतिक्रिया

टारझन's picture

22 Feb 2011 - 2:56 pm | टारझन

मी हत्तीचा वाटा उचलायला तयार आहे ... कुठाय माझी सोंड :)

- हत्तीटारझन

कच्ची कैरी's picture

22 Feb 2011 - 5:50 pm | कच्ची कैरी

नक्कीच प्रयत्न करेल.

कलंत्री's picture

22 Feb 2011 - 7:41 pm | कलंत्री

या दिवशी आणि इतर दिवशीही भर घालण्याचा प्रयत्न राहील.

मुख्य म्हणजे कमीत कमी भेट देण्याचा प्रयत्न करावयाला हवा.

महेश_कुलकर्णी's picture

23 Feb 2011 - 1:46 pm | महेश_कुलकर्णी

>>मुख्य म्हणजे कमीत कमी भेट देण्याचा प्रयत्न करावयाला हवा.

की
मुख्य म्हणजे कमीत कमी भेट देण्याचा 'तरी' प्रयत्न करावयाला हवा.

-महेश कुलकर्णी

कुठली भेट? विकीपेडीयावर उगाच भेट देउन त्यांच्या सर्वरचा खर्च वाढवु नका. पैशांची भेट देणार असेल तर द्या, आता पुढच्या वर्षी.

(बाकी विकीपेडीयावर "भेट द्यायला पाहिजे" म्हणणारे म्हणजे मागच्याच्या मागच्या शतकातले असावेत)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2011 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अधून मधून मराठी विकि..वर भर घालतोच.
सत्तावीस तारखेला 'संपादनेथॉन'मधे सहभाग नोंदवणार.

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
[मराठी विकिपीडिया सदस्य खाते क्र. ११६५ आणि संपादन संख्या २०४ असलेला]

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Feb 2011 - 12:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शक्य झाल्यास त्या दिवशी मदत करेन. नाहीतर इतर दिवशी जमेल त्याप्रमाणे मदत करेन.

निनाद's picture

24 Feb 2011 - 9:00 am | निनाद

http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन_१
इथे सहभागासाठी नोंदणी करता येऊ शकेल तसेच नोंदणी न करताही आपला हातभार लावता येऊ शकेल.

मी माझे नाव नोंदवले आहे. तुम्ही ही नोंदवा.
आपल्या विषयावर एक एक लेख तरी लिहाच!

अमोल केळकर's picture

24 Feb 2011 - 10:04 am | अमोल केळकर

उपक्रमास शुभेच्छा

अमोल

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Feb 2011 - 7:22 pm | बिपिन कार्यकर्ते

उपक्रमास शुभेच्छा!

मस्त कलंदर's picture

24 Feb 2011 - 11:33 pm | मस्त कलंदर

मी हीच माहिती उपक्रम, मनोगत व मायबोली या संस्थळांवरही प्रकाशित केली होती. संकल्प द्रविड या सक्रिय विकिपीडियनने दिलेली काही माहिती इथे सर्वांसमोर देत आहे.

माहिती १: विकिपीडियावर संपादने कशी करावीत, यासाठी संपादनेथॉनेसाठी लिहिलेले हे पूर्वप्रसिद्धीपर ईमेल

नमस्कार!

विकिपीडिया हा मुक्त (= वाचायला, लिहायला, आधी भरलेल्या माहितीत नव्याने भर घालायला/दुरुस्त करायला सर्वांना खुला असलेला आणि मोफत स्मित ) ज्ञानकोश प्रकल्प आहे. मराठीसह इंग्लिश व जगभरातील २६०+ भाषांमध्ये विकिपीडिया प्रकल्प चालू आहेत. इंग्लिश विकिपीडिया (http://en.wikipedia.org/) हा सध्याच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मोठा व आशयसंपन्न ज्ञानकोश असून त्यात ३५ लाखांहून अधिक लेख उपलब्ध आहेत. मराठी विकिपीडिया तुलनेने अशक्त स्मित आणि बाल्यावस्थेत असून त्यात सध्या ३२,०००+ लेख आहेत. मराठी विकिपीडियावर तुम्ही खाली नोंदवलेल्या कोणत्याही मार्गाने सहभाग घेऊन जमेल तसा हातभार लावू शकता :

* उपलब्ध लेखांमधील माहितीत अधिक भर घालणे/ माहिती अद्ययावत करणे
* नवीन लेख बनवणे
* लेखांमधील संपादनाच्या चुका दुरुस्त करणे व लेखांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने यथायोग्य बदल करणे.
* लेखांमध्ये सचित्र स्पष्टीकरणे देण्यासाठी विकिमीडिया कॉमन्स (http://commons.wikimedia.org) या सामायिक रिपॉझिटरीतून विषयानुरूप चित्रे/फोटो लेखात जडवणे
* मराठी विकिपीडियाबाबत आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना माहिती देऊन प्रकल्पाची खबरबात अन्य मराठीजनांपर्यंत पोचवणे.
* ब्लॉग पोस्टी, ऑर्कुट/फेसबुक अश्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरील किंवा मराठी भाषेतील मायबोली, मनोगत, मिसळपाव, उपक्रम इत्यादी सार्वजनिक फोरम संकेतस्थळांवरील गप्पांमध्ये, ऑनलाइन चर्चा/वाद-विवाद, ईमेल इत्यादी माध्यमांतून मराठी विकिपीडियावरील माहितीचे/लेखांचे संदर्भ, दाखले नोंदवत मराठी विकिपीडियाची उपयुक्तता अप्रत्यक्षपणे इतरांसमोर मांडणे.

अर्थात हे सर्व तुम्ही तुमच्या सवडीनुसार, आवडीनुसार आणि अगदी खारीचा वाटा उचलत केलेत, तरी हरकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आठवड्याभरात वृत्तपत्रांत वाचलेल्या माहितीवरून रविवारी १५ मिनिटांत संबंधित लेखांमध्ये भर घातली/नवीन लेख बनवले, तरीही हरकत नाही - या सार्वजनिक प्रकल्पात तुमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग स्वागतार्हच आहे. फक्त दोन-तीन पथ्ये तेवढी पाळावीत :

* मराठी विकिपीडिया हा ज्ञानकोश (एन्सायक्लोपीडिया) प्रकल्प असल्यामुळे व्यक्तिगत अनुभवकथन/ टीकाटिप्पणी/ प्रवासवर्णन किंवा वृत्तांतपर ललित ढंगाने माहिती न मांडता त्रयस्थ वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहावी.
* हा प्रकल्प मराठी भाषेत असल्यामुळे प्रमाण मराठी भाषेत व देवनागरी लिपीतच मजकूर लिहिणे अपेक्षित आहे.
* हा प्रकल्प मुक्त असल्यामुळे कुणाचाही सहभाग विनामूल्यच धरला जातो (पगार/मानधन मिळत नाही स्मित. मात्र या ज्ञानकोशाचा वापर सर्वांना मोफत करता येतो, हा पैशातील मूल्यापेक्षाही मौल्यवान असणारा मोबदला जरूर मिळतो.

मराठी विकिपीडियाबद्दल ही झाली नमनाची माहिती. आता सुरुवात नेमकी कशी करावी, याबद्दल माहिती जाणून घ्यायला खालील दुवे चाळून बघा :

* विकिपीडिया:परिचय (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:परिचय )
* विकिपीडिया:सफर (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:सफर )
* सहाय्य:संपादन (http://mr.wikipedia.org/wiki/सहाय्य:संपादन )
* विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे)
* विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १ (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १)

आणखी काही मदत लागल्यास, व्यक्तिशः मला ईमेल करू शकता किंवा 'विकिपीडिया:चावडी' (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:चावडी) येथे आम्हां मराठी विकिपीडियनांना भेट देऊ शकता.

माझे प्रश्नः

मी आतापर्यंत नवीन लेख तयार केला नाहीय. आता करायचा मानस आहे, पण तत्पूर्वी माझ्या मनात शंका आहे की,
१.प्रत्येक पानावर त्या पानावरच्या माहितीची अनुक्रमणिका येते, त्याचा काही विशिष्ट मसुदा आहे का?
२. जर नसेल, तर साधारण कोणकोणत्या गोष्टींचा ढोबळमानाने पानामध्ये अंतर्भाव असावा?
३. विकिपीडियाच्या १०व्या वर्धापणदिनाच्या कार्यक्रमात क्रॉस रेफरन्सेस कसे द्यावेत, लिंक्स कशा द्याव्यात, याबद्दल माहिती दिली होती. तशा प्रकारची माहिती लिखित स्वरूपात तुम्हा लोकांकडे आहे का? [मी हाच लेख चार मराठी संस्थळांवर प्रकाशित केला आहे. अशी परिपूर्ण माहिती त्या त्या संस्थळांच्या सदस्यांपर्यंत पोचवल्यास केवळ काही शंकांमुळे तिथे न लिहिणारे लोकही लिहू इच्छितील.]

मला मिळालेलं उत्तरः
नमस्कार,
तू विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने सर्वसाधारण माहिती :
१. >> प्रत्येक पानावर त्या पानावरच्या माहितीची अनुक्रमणिका येते, त्याचा काही विशिष्ट मसुदा आहे का? <<

मराठी विकिपीडियातील एखाद्या लेखाच्या पानावर उपविभागांची अनुक्रमणिका दिसते, ती आपोआप तयार होते, त्यासाठी काही मसुदा नाही. मुळात लेखाचे स्वरूप 'अमुक तमुक क्रमानेच विस्तारावे', असा कोणताही सरधोपट नियम नाही. काही संकेत गेल्या काही वर्षांमध्ये बनलेल्या दर्जेदार लेखांच्या मांडणीनुसार (आपसूक) सहमत झाल्यासारखे आहेत.. अर्थात त्यात बदल, सुधारणा, अपवाद करायला कुणाचीही आडकाठी नाही. अंतिमत: लेखातील माहितीचा दर्जा उत्कृष्ट असल्याशी मतलब.

बाकी, मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर मुख्य सदर व उदयोन्मुख लेख ही दोन सदरे आहेत, त्यांचे आर्काइव्ह बघितल्यास त्यांत दर्जेदार लेखांचे संकलन आढळेल. ते चाळून बघितल्यास, थोडे निरखल्यास आपसूक काही गोष्टी ध्यानी येऊ लागतील.

२. >> साधारण कोणकोणत्या गोष्टींचा ढोबळमानाने पानामध्ये अंतर्भाव असावा? <<

वर नोंदवल्याप्रमाणे यासाठी कुठलाही 'अधिकृत' नियम नाही. मात्र एक प्रमुख मार्गदर्शक तत्त्व सांगता येईल - 'एखाद्या एन्सायक्लोपीडियात या 'अबक' विषयावर माहिती कशी नोंदवली असेल?' किंवा ''अबक' विषयावरील लेखाची विश्वकोशीय दर्जाची माहिती मला वाचक म्हणून मिळवायची असल्यास, त्यात मला कोणत्या गोष्टी वाचनीय / '''माहितीपूर्ण''' वाटू शकतील', हा प्रश्न आपणच आपल्याला विचारून जे उत्तर येईल, तेच. स्मित

उदाहरणार्थ : एखाद्या व्यक्तीवरील लेखात त्या व्यक्तीचे नाव, जमल्यास स्थानिक भाषेतील (म्हणजे त्या व्यक्तीच्या भाषेतील) नाव/लेखन, जन्मदिनांक व मृत्युदिनांक (व्यक्ती हयात असल्यास, मृत्युदिनांकाऐवजी 'हयात' म्हणून उल्लेख), त्या व्यक्तीचा पेशा किंवा ठळक नोंदवण्याजोगी कामगिरी या गोष्टी किमानपक्षी असणे सयुक्तिक ठरते.

एखाद्या ठिकाणाविषयीच्या लेखात ते ठिकाण कुठल्या देशात, त्या देशात कुठल्या प्रांतात/शहरात/विभागात आहे, ते लिहून, मग त्याच्या परिसरातील शेजारी देश/प्रांत इत्यादी लिहावेत. खेरीज त्या ठिकाणाचे विशेष महत्त्व (प्रांतीय राजधानी/जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र / कुठल्या उद्योगाचे/संस्थेचे मुख्यालय असणे इत्यादी) नोंदवावे. याशिवाय त्या ठिकाणाचा इतिहास, हवामान, लोकसांख्यिकी (डेमोग्राफिक्स) इत्यादी बाबींविषयीदेखील जमेल तितकी माहिती नोंदवावी.

३. >> विकिपीडियाच्या १०व्या वर्धापणदिनाच्या कार्यक्रमात क्रॉस रेफरन्सेस कसे द्यावेत, लिंक्स कशा द्याव्यात, याबद्दल माहिती दिली होती. तशा प्रकारची माहिती लिखित स्वरूपात तुम्हा लोकांकडे आहे का? [मी हाच लेख चार मराठी संस्थळांवर प्रकाशित केला आहे. अशी परिपूर्ण माहिती त्या त्या संस्थळांच्या सदस्यांपर्यंत पोचवल्यास केवळ काही शंकांमुळे तिथे न लिहिणारे लोकही लिहू इच्छितील.] <<

माझ्या याच पानावरच्या दुसर्‍या क्रमांकाच्या पोस्टीत या संदर्भातील सर्व माहिती लिखित स्वरूपात यापूर्वीच दिली आहे. त्यातल्या (http://mr.wikipedia.org/wiki/सहाय्य:संपादन), (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:परिचय ), (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:सफर ) या लिंका जरूर पाहा. अन्य संस्थळांवर तू लिहिलेल्या माहितीला पूरक माहिती म्हणून माझी वरची दुसर्‍या क्रमांकाची पोस्ट त्या-त्या ठिकाणी नोंदवायला हरकत नाही.

अजून काही मदत लागल्यास, इथे लिहा/ ईमेल करा किंवा विकिपीडियावर लिहा, विकिपीडिया आपलाच आहे. :-)

--------------------------------------------------------------------------------------------------------
खुलासा: हा आणि वरचा, दोन्ही प्रतिसाद संकल्पने लिहिले तसेच इथे डकवले असल्याने त्याच्या इमेल आयडीची लिंक इथे नाही. तरी मिपाकरांनी इथे मदतीसाठी दिलेल्या अन्य दुव्यांचा वापर करावा.