कोडी

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
20 Feb 2011 - 11:48 am

काही माणसांचे मेंदू हे धक्का स्टार्ट असतात. विशेषत: कमी वेळात एखादी गोष्ट करायला सांगितली तर मेंदू मूळ क्षमता सुध्दा गमावून बसतो. माझ्या बाबतीत तसेच आहे. त्यामुळे एका तासात १०० प्रश्न, असल्या परीक्षा देण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. ह्याच कारणामुळे व शिवाय मुळातच बथ्थड मेंदू असल्यामुळे मी कोडी या प्रकारांना फार घाबरतो. लहानपणी तर हा माझा कमकुवतपणा जगजाहीर झाल्यामुळे मित्रांनी व शिक्षकांनी मला ‘नको जिणे’ करून सोडले होते.
एकदा वर्गात मित्राने विचारले, ए बुधल्या, ‘रामाच्या दु कानांत उ, तम चिवडा’ म्हणजे काय ? मी उत्तरच दिले नाही. घरी येईपर्यंत विचार केला. घरी आल्याआल्या आईला विचारले. आईने लगेचच उत्तर सांगितले. नंतर बहिणी घरी आल्यावर त्यांना मी हेच विचारले. त्या तुच्छ्तेने हंसून म्हणल्या, आम्हाला तू काय बिगरीतल्या समजतोस ? दुसर्‍या दिवशी मित्राने विचारले, 'आलं का उत्तर ?' मी हो सांगून टाकले. लगेच त्याने दुसरे कोडे घातले. सांग बघू, 'दुकानांत डोकं' म्हणजे काय ?' हे कोडं आई व बहिणींनाही लगेच आलं नाही त्यामुळे मी खुष झालो. पण संध्याकाळी वडिलांना विचारताच पांच एक मिनिटात त्यांनी उत्तर सांगितले. दुसर्‍या दिवशी माझा मित्र म्हणाला , मला माहितीये, तू घरी विचारुनच उत्तरं सांगतोस.
अशीच फजिती वर्गात गुरुजी तोंडी हिशोब घालायचे तेंव्हा व्हायची. दोन मिनिटांत उत्तर पाटीवर लिहून पाटी पालथी घालायला सांगायचे. गणित कच्चेच असल्यामुळे मला दोन काय दहा मिनिटे सुध्दा पुरली नसती. मग पाट्या तपासताना, डोक्यावर टपली व ठोंब्या, गधड्या, दगड्या अशी विशेषणे ऐकताना वाईट वाटायचे, पण इलाज नव्हता.
पुढे 'रामरंग पांडूकलर डु डाय डु', 'नकादुचेण्यापकासके', 'एवढासा गडु, त्याला पाहून रडु', 'आकाशातून पडली घार, तिला मारली ठार, रक्त पितो घटाघटा, मांस खातो मटामटा' असली अनेक राक्षसी कोडी अंगावर चालून आली. पण एव्हाना मी अशा बाऊन्सर्सचा सामना करायला शिकलो होतो.
मोठं झाल्यावर हे असले हल्ले जरा कमी झाले होते. पण काही आयआयटीयन्स मेव्हणे लाभले. ते इतकी कठीण कोडी घालायला लागले की सुरवातीला 'चुपके चुपके' मधल्या अमिताभच्या 'करोला' या टेक्निकचा उपयोग करण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन पाहिला. पण मेव्हणेकंपनी माझ्यापेक्षा अर्थातच वस्ताद निघाली. शेवटी मला चक्क पांढरे निशाण फडकवायला लागले. त्यामुळे त्यांनी माझा नाद सोडून दुसरी 'गिर्‍हाईके' बघायला सुरवात केली.
या कोड्यांमुळे एक फायदा मात्र झाला. खर्‍याखुर्‍या जीवनात जी अगम्य कोडी पडली ती सोडवता न आल्याचे फार वैषम्य नाही वाटले. आता माझी नातवंडे विचारतात, 'आजोबा एक कोडं घालू का ?' तेंव्हा जराही न घाबरता मी मोठ्ठा हो देतो. आजोबांना पण आपले कोडे सोडवता आले नाही याचा आनंद त्यांच्या चेहेर्‍यावरुन ओसंडत असतो, तो बघायलाच मला खूप आवडतो, अगदी तोंडावर पदर घेऊन आजी खुदुखुदु हंसत असली तरी!!!

उखाणेइतिहासशिक्षणमौजमजालेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2011 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही कोणी कोडं टाकलं की मी आजूबाजूला पाहतो. कोणी तरी उत्तर देईल या अपेक्षेने. सालं आपलं जे गणित आहे ते बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, या पलिकडे गेले नाही. लसावी, मसावी, दरसाल दर शेकडा या व्याजदराच्या गणितांनी आणि गणितांच्या कोड्यांनी माझ्या आयु्ष्यात लैच पंगुत्त्व आणले आहे. :(

साधं कोडं असलं तरीही ते गणिताचेच असेल असे वाटत राहते. आपलं आणि या कोड्यांचं न जमायला गणितच एकमेव अडथळा आहे असे मला अजूनही वाटतं.

’कोडी’ असे शिर्षक पाहिल्यावर या कोड्यांनी आपला पाठलाग मिपावरही सोडला नाही असे वाटले होते. पण मजकूर वाचून खूप आनंद झाला. :)

-दिलीप बिरुटे

लसावी, मसावी, दरसाल दर शेकडा या व्याजदराच्या गणितांनी आणि गणितांच्या कोड्यांनी माझ्या आयु्ष्यात लैच पंगुत्त्व आणले आहे.

ते लसावी मसावी नसुन लसावि - मसावि असावे असे वाटते . लघुत्तम- महत्तम साधारण विभाजक .
आपल्या सारख्या प्रख्यात प्राच्यार्यांकडुन अशी चुक नजरभुलीने झाली असावी. चु.भु.द्या.घ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2011 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>लसावी मसावी नसुन लसावि - मसावि असावे असे वाटते . लघुत्तम- महत्तम साधारण विभाजक .

योग्य शब्द निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. शुद्धलेखन म्हटले की मराठी आंतरजालावरील सदस्य, मराठी साहित्यातील थोर लेखक, मराठी पुस्तक प्रकाशक आपल्या लेखनाचे दाखले देतात हे मला माहिती आहे. त्यामुळे प्रतिसाद वाचतांना आपणास जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. :)

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

20 Feb 2011 - 6:03 pm | सुनील

लघुत्तम- महत्तम साधारण विभाजक

दोन्ही विभाजक कसे असतील?

लसावि = लघुत्तम साधारण विभाज्य (Least Common Multiple)

मसावि = महत्तम साधारण विभाजक (Greatest Common Divisor)

सकाळ सकाळी चौथीच्या गणिताच्या मास्तराची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

बाकी कोड्यांच्या लेखाबद्दल म्हणाल तर, आमच्याकडे "जरा डोके चालवा" ह्या नावाचे एक कोड्यांचे पुस्तक होते. त्यात अशी अनेक कोडी होती. त्यामुळे मीच इतरांना कोडी घालून "पकवत" असे!

लेख आवडला.

गनिताची त्वांडओळख व्याख्यानमाला चालू करावि अशि मि. टारझनाचार्य यांना मि णम्र ईनंती करत आहे.
.
.
.
.
.
लेख अजुन वाचला नाहीये, त्यामूळे प्रतिकिरिया नंतर......

धमाल मुलगा's picture

20 Feb 2011 - 4:31 pm | धमाल मुलगा

आमचीही काही वेगळी अवस्था नाही. :)
कोणी म्हणालंच की, 'चल, एक कोडं घालतो' की आम्ही शक्य तितक्या वेगात तिथून फरार होतो. :D

बाकी,

या कोड्यांमुळे एक फायदा मात्र झाला. खर्‍याखुर्‍या जीवनात जी अगम्य कोडी पडली ती सोडवता न आल्याचे फार वैषम्य नाही वाटले. आता माझी नातवंडे विचारतात, 'आजोबा एक कोडं घालू का ?' तेंव्हा जराही न घाबरता मी मोठ्ठा हो देतो. आजोबांना पण आपले कोडे सोडवता आले नाही याचा आनंद त्यांच्या चेहेर्‍यावरुन ओसंडत असतो, तो बघायलाच मला खूप आवडतो, अगदी तोंडावर पदर घेऊन आजी खुदुखुदु हंसत असली तरी!!!

हे फारच आवडलं. एकदम छान!!

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2011 - 9:25 pm | नगरीनिरंजन

अगदी हेच लिहीणार होतो.

हलक फुलक लिखाण एकदम आवडुन गेल. :)

यशोधरा's picture

20 Feb 2011 - 6:00 pm | यशोधरा

आवडलं. मस्त लिहिलंय :)

>> आजोबांना पण आपले कोडे सोडवता आले नाही याचा आनंद त्यांच्या चेहेर्‍यावरुन ओसंडत असतो, तो बघायलाच मला खूप आवडतो, अगदी तोंडावर पदर घेऊन आजी खुदुखुदु हंसत असली तरी!!! >>

हाहाहा !!!!
सुंदर लिहीलं आहे. पुलेशु.

सूर्यपुत्र's picture

20 Feb 2011 - 9:32 pm | सूर्यपुत्र

मला सुद्धा कोणी कोडं (टाळण्याचा अथक प्रयत्न करुनही न टळलेलं) घातलं की मी कोड्यातच पडत असे. आणि याचे प्रयोजन काय हे तर अजिबातच समजत नसे. उदा. : "'आकाशातून पडली घार, तिला मारली ठार, रक्त पितो घटाघटा, मांस खातो मटामटा" हेच कोडं... आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतांना अजूनच खोड्यात सापडतो....

-सूर्यपुत्र.

आत्मशून्य's picture

21 Feb 2011 - 12:43 am | आत्मशून्य

बाकी कोड्यात मी मंदच म्हणून मला शंका येते की हा डीस्लेक्सीया तर नाही ना ?

सहज's picture

21 Feb 2011 - 6:13 am | सहज

शेवट मस्तच!!

लेख मस्त तसेच शेवट्पण एक्दम खासच.

यावरुन, कमलाकर वैशंवायन यांच्या एका कॅसेट्मधला एक किस्सा आठवला.

मुलगा - बाबा, एक कोडं घालु का ?
बाबा - घाल.
मुलगा - बाबा, एक कोडं येइल का सोडवता ?
बाबा - अरे अशी बरिच कोडि सोडवलीत म्हणुन तर तु झालायंस,

रेवती's picture

22 Feb 2011 - 1:53 am | रेवती

छान लेख.
अगदी माझीच अवस्था!
माझ्या बाबांनाही नातवंडांसमोर हरल्याचे नाटक करावे लागते.
नाहीतर ते तसे मनातल्यामनात मोठ्ठाली आकडेमोड करतात.
बाबांबरोबर ब्यांकेत जाणे हे माझ्यासाठी दिव्य असायचे.
कोणकोणत्या नवीन स्किमा आल्यात, त्यावर व्याजाचा व पुढे येणारी आकडेमोड.......
एक मात्र झाले, मी वेगवेगळ्या स्किम्सवर लक्ष ठेवायला शिकले....आता नवरा आकडेमोड करतो.;)

चतुरंग's picture

22 Feb 2011 - 5:46 am | चतुरंग

'स्किमिंग' म्हणावे का? ;)

चतुरंग's picture

22 Feb 2011 - 5:51 am | चतुरंग

मी कोड्यात मंद वगैरे बहुदा नसावा पण जिद्दीने कोडी सोडवण्याची आवड आहे असेही म्हणता येणार नाही.
आई मला लहानपणी कोडी घालत असे ती मी बर्‍यापैकी वेळा सोडवलेली आठवतात.
सध्या रोजचे मुलाचे वागणे हेच एक कोडे असते त्यामुळे वेगळ्या कोड्याची गरज पडत नाही! ;)

('कोड'गा)चतुरंग

प्राजु's picture

22 Feb 2011 - 5:52 am | प्राजु

लेखाचा शेवट आवडला. :)

मराठे's picture

22 Feb 2011 - 6:41 am | मराठे

नाव वाचून (धाग्याचं नाव.. लेखकाचं नव्हे) धागा उघडण्याचं धैर्य होत नव्हतं .. पण उघडल्यानंतर या जगात माझ्यासारखे अनेक आहेत हे पाहून अतीव आनंद झाला !
छान लेख! पु.ले.शु.

शिल्पा ब's picture

22 Feb 2011 - 9:57 am | शिल्पा ब

आम्ही पण तुमच्यासारखेच....पण लेखातल्या कोड्यांची उत्तरं द्या..

सविता's picture

22 Feb 2011 - 10:36 am | सविता

हेच म्हणणार होते

विजुभाऊ's picture

22 Feb 2011 - 11:03 am | विजुभाऊ

एक कोडे घालतो
मेरा बाप जिसका ससूर है उसका बाप मेरा ससूर है.
तो मेरा उससे क्या रिश्ता है?

शिल्पा ब's picture

22 Feb 2011 - 11:31 am | शिल्पा ब

पति पत्नी

ramjya's picture

22 Feb 2011 - 11:14 am | ramjya

विक्रम और वेताळ मधील कोडी आणी विक्रमाचे उत्तर आवडयचे........मस्त लेखन...

सुहास..'s picture

22 Feb 2011 - 4:38 pm | सुहास..

छान !!