शाश्वत - १

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
13 Nov 2010 - 8:06 am

आजकाल मिपावरच्या अध्यात्म, समाधी इत्यादी विषयांवरच्या हिरीरीने चालणार्‍या चर्चा वाचून मला माझी ही जुनी गोष्ट आठवली. ती इथे टाकत आहे. या कथेत व्यक्त केलेले मत हे माझे स्वतःचे असून त्याला कोणताही धार्मिक वा अध्यात्मिक संदर्भ जोडू नये ही इच्छा. मी ही असा काहीही संदर्भ देऊ शकत नाही कारण अनेक पुस्तकांमधून वाचलेल्या अनेक विचारांतून आणि अनेक मतामतांच्या गदारोळातून मला जे वाटलं ते घेऊन मी लिहीलं आहे. हे बरोबरच आहे असा माझा दावा नाही त्यामुळे सर्व अध्यात्म मार्तंडांनी अवघड प्रश्न विचारून माझी गोची करू नये ही विनंती.

शाश्वत
ध्यानात एकतान आणि निर्विकार झालेलं त्याचं मन हळूहळू भानावर आलं तेव्हा सूर्य पश्चिमेकडे कलला होता. पश्चिमेकडून येणारा शीतल वारा, घरट्याकडे परतणार्‍या पक्ष्यांची किलबिल आणि सूर्याच्या लालीत न्हाऊन गुलाबी झालेली समोरची हिमशिखरे या सगळ्यामुळे वातावरणात एक उल्हास भरून राहिला होता. त्याने मात्र अत्यंत तटस्थपणे आपले मृगाजिन आवरले आणि शिळेवरून खाली उतरून रात्र काढण्यासाठी आसपासच्या वृक्षांखाली सोयीस्कर जागा शोधू लागला. इतकावेळ कठोरपणे विचारांपासून अलिप्त ठेवलं गेलेलं त्याचं मन नव्या उत्साहाने विचारांच्या जंगलात शिरून माकडासारखं एका विचाराहून दुसर्‍या विचारावर उड्या मारू लागलं. त्याचं ईप्सित ठिकाण आता अगदी जवळ आलं होतं. संपूर्ण आयुष्य ज्या गोष्टीचा ध्यास घेतला ती आता जणू हाताच्या अंतरावर आली होती. उद्या आपल्या आयुष्यातला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रवास आहे या जाणिवेने त्याने इतक्या वर्षांच्या साधनेने मिळवलेली तटस्थता काहीशी भंगल्यासारखी झाली. वर्षानुवर्षाच्या मिताहाराने आणि कठोर आत्मसंयमनाने तेजाळ झालेल्या त्याच्या चेहर्‍यावर मात्र कोणतेही भाव उमटले नाहीत. जवळ जवळ असलेल्या दोन-तीन वृक्षांनी मिळून झालेल्या एका बेचक्यात जराशी मोकळी जागा पाहून त्याने ती एका फांदीने स्वच्छ करायला सुरुवात केली. झाडाच्या खोडाकडे पाहताना का कोण जाणे पण एकदम बेसावधपणे त्याच्या मनात त्याच्या बायकोची आठवण जागी झाली. क्षणार्धासाठी वार्‍याच्या झुळकीत त्याला बायकोच्या श्वासाचा भास झाला आणि झाडाच्या खोडात तिची आकृती चमकून गेली. त्याने फांदी टाकून दिली आणि कपाळावर आठी घालून झाडाला टेकून बसला. शेवटच्या टप्प्यात आपलं हे असं व्हावं याचा त्याला फार राग आला आणि तो पुन्हा मन एकाग्र करायचा प्रयत्न करू लागला. तरी घर सोडून इतक्या वर्षानी तिची आठवण व्हावी याचं आश्चर्य चुकारपणे त्याच्या मनात रेंगाळलंच.
मन स्थिर करून त्याचा श्वास एका लयीत येतो न येतो तोच पावलांच्या आणि धापा टाकल्याच्या आवाजाने त्याचं लक्ष विचलीत झालं. वळून पाहिलं तर चार-सहा धट्टेकट्टे पुरुष एक मेणा घेउन येताना दिसले. चढ संपवून सपाटीला येताच त्यांनी अलगदपणे मेणा जमिनीवर ठेवला आणि डोक्याची मुंडाशी काढून ते घाम पुसू लागले. क्षण दोन क्षणातच मेण्याचे पडदे बाजूला झाले आणि आतून एक दागिन्यांनी मढलेला तुंदीलतनू वृद्ध अवतीर्ण झाला. त्याच्या रेशमी कपड्यांतून आणि हिरेमाणकानी मढलेल्या दागिन्यांतून श्रीमंती उतू चालली होती आणि सर्व भोग घेउन दमल्याप्रमाणे त्याचे डोळे आणि चेहरा तुपटपणे ओघळला होता. बाहेर येऊन उभा राहताच त्या वृद्धाने हात उंचावून आळस दिला आणि मग एकदम कंटाळा आल्यासारखे हात खाली सोडून दिले. तेवढ्या हालचालीने त्याचं गरगरीत आणि थुलथुलीत पोट थरथरलं आणि त्याचा रेशमी अंगरखा थोडावेळ वर सरकल्यासारखा होऊन हळूहळू खाली घसरला. इकडे तिकडे पाहताना त्या वृद्धाचं लक्ष त्याच्याकडे जाताच अभावितपणे त्याच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरलं. तो वृद्धही प्रतिसादादाखल हसला आणि भोयांना उद्देशून काहीतरी बोलून त्याच्या दिशेने चालू लागला.
जवळ येताच वृद्धाने दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला आणि सावकाशपणे त्याच्या समोर बसला.
"मी विष्णुदास शर्मा. मथुरेहून आलोय. अंबरनाथाच्या मंदीराकडे चाललोय". विष्णुदासच्या आवाजात आणि बोलण्यात एक श्रीमंती आब तर होताच शिवाय एखाद्या कर्तबगार आणि आत्मविश्वासपूर्ण पुरुषाप्रमाणे त्याचं बोलणं वजनदार होतं.
"मी ही अंबरनाथाच्या मंदीराकडेच चाललो आहे. ", तो म्हणाला. मात्र हा लठ्ठ वृद्ध अंबरनाथाच्या मंदीराकडे निघाला आहे हे ऐकून वाटलेलं आश्चर्य लपवून ते वाक्य बाहेर काढण्यासाठी त्याला महत्प्रयास करावे लागले. विष्णुदास काही तरी समजल्यासारखं हसला. एखाद्या व्यवहारचतुर आणि बेरकी व्यापार्‍याप्रमाणे हातातल्या पाचूच्या अंगठीशी चाळा करत तो पुन्हा बोलू लागला, "आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की माझ्यासारख्या सामान्य व्यापार्‍याला अंबरनाथाच्या मंदीराबद्दल कसं कळालं. ".
अभावितपणे त्याने मान डोलावली.
स्वत:वरच खुश होत विष्णुदास उत्साहाने सांगू लागला, " गंमत आहे पाहा. आयुष्याची साठ वर्षे मी भरभरून जगलो. अमाप पैसा कमावला. देशोदेशी फिरलो. व्यापार केला, वेगवेगळी उत्तमोत्तम पक्वान्ने चाखली, उत्तमोत्तम पेयांचा आणि मद्याचा आस्वाद घेतला, एकाहून एक सुंदर स्त्रिया भोगल्या, सुंदर आणि मौल्यवान रत्नांचा संग्रह केला. सगळं काही मजेत चाललं होतं. पण गेल्या पाच वर्षांपासून सगळ्याची चव गेल्यासारखं झालं. कशातच मन रमेना. मृत्युची चाहूल लागताच आयुष्याचा अर्थ शोधायची मला निकड भासू लागली. मग मी चारी दिशाना माणसं पाठवली आणि मोठमोठ्या ऋषीमुनीना पाचारण करून त्याना आयुष्याचं प्रयोजन विचारू लागलो. कोणीच माझं समाधान होईल असं उत्तर देऊ शकला नाही. अखेर एका विक्षिप्त साधूने मला या अंबरनाथाच्या मंदिराबद्दल सांगितलं आणि मी प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. "
ज्या मंदीराचा दृष्टांत मिळण्यासाठी आपल्याला पंचवीस वर्ष घोर साधना आणि अखंड वणवण करावी लागली त्या मंदीराचा पत्ता या विषयसुखात लडबडणार्‍या सामान्य मनुष्यास केवळ पाच वर्षात मिळावा याचं त्याला थोडं वैषम्य वाटलंच पण सरावाने आलेल्या सहजतेने त्याने ती भावना मनातून हद्दपार केली. त्याची कथा विष्णुदासाच्या अगदी विरुद्ध होती. समज येताच त्याला आयुष्याबद्दल अनेक प्रश्न भेडसावू लागले. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने अनेक ग्रंथ वाचले. अनेक विद्वानांशी चर्चा केली, शिष्यत्व पत्करलं पण त्याच्या बुद्धीला पटेल असं उत्तर त्याला मिळू शकलं नाही. लग्न झाल्यावरही त्याचं मन रमेना आणि मग त्याने घर सोडलं. पंचवीस वर्षं भटकून, अनेक गुरू करून, ध्यानधारणा करून अखेर त्याला एक दिवस या अंबरनाथाच्या मंदीराचा दृष्टांत झाला आणि तेथे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि शाश्वत अशा सत्याचं ज्ञान आपल्याला होईल अशी त्याला खात्री पटली. मग मजल दरमजल करीत आज तो तेथे पोचला होता.
एकमेकांची माहिती देताघेता एक प्रहर उलटला. विष्णुदासाच्या भोयांनी तोपर्यंत राहुटी उभारून अन्न शिजवले. विष्णुदासाच्या आग्रहावरून त्याने थोडेसे अन्न खाल्ले आणि राहुटीत झोपण्यास तयार झाला. थंड वातावरणात गरम अन्न पोटात गेल्याने आणि दिवसभराच्या थकव्याने सगळे लवकरच निद्राधीन झाले.

(क्रमशः)

कथाविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

13 Nov 2010 - 11:07 am | रणजित चितळे

छान आहे